सांज..

Primary tabs

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
1 Feb 2008 - 12:01 am

संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली

घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली

गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली

संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली
उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली

तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..

- प्राजु

कवितागझलप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Feb 2008 - 12:08 am | विसोबा खेचर

वा प्राजू,

खरंच छानच कविता केली आहेस. अगदी चित्रदर्शी झाली आहे. कवितेतली सांज डोळ्यासमोर येते...! और भी लिख्खो...

संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली

या ओळी फार आवडल्या...

आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला,

तात्या.

सुनील's picture

1 Feb 2008 - 1:00 am | सुनील

आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला

काय हे तात्या?

मी काल संध्याकाळी, संध्या करून, व्याकरणाच्या पुस्तकातील संधी वाचीत शेजारच्या संध्येशी बोलण्याची संधी शोधत होतो!!

प्राजू,

कविता छान!

(संध्यासक्त) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वरदा's picture

1 Feb 2008 - 12:11 am | वरदा

सुरेख वर्णन

स्वाती राजेश's picture

1 Feb 2008 - 12:12 am | स्वाती राजेश

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली

या ओळी आवडल्या.

चतुरंग's picture

1 Feb 2008 - 12:18 am | चतुरंग

प्राजु सुरेख काव्य झालंय.

अवांतर - तुझं गीत वाचून "संधिकालि ह्या अशा धुंदल्या दिशा दिशा" ह्या गाण्यानं मनात एकदम फेर धरला!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

1 Feb 2008 - 12:54 am | इनोबा म्हणे

वाह! झकास जमली आहे कविता.

घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली

या ओळी विशेष आवडल्या

ऋषिकेश's picture

1 Feb 2008 - 3:22 am | ऋषिकेश

अप्रतिम कविता

गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली

ह्या ओळी विषेश आवडल्या. मला हि कविता वाचून काहि ओळी (त्या इतक्या सशक्त नाहि आहेत पण तरीही) सुचल्या त्या इथे वाचा.

-ऋषिकेश

प्रमोद देव's picture

1 Feb 2008 - 10:59 am | प्रमोद देव

गजलसदृष्य कविता आवडली.
घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली

तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..

ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Feb 2008 - 11:28 am | प्रकाश घाटपांडे

अशीच सुधीर मोघ्यांची ,श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली नादमय कविता आहे. आशा भोसलेंनी जीव ओतून गायली आहे.

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली

धूळ उडवीत गाई निघाल्या
श्याम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

केशवखुमारांचे यावर विडंबन असेलच. मी एकदा कुठेतरी वाचले होते. पण ते हस्तलिखित होते.
पर्वत्यांची दिसे सून लांब
काजळाची जरी दाट रेघ
...............
असे पुसटसे आठवते आहे.

प्रकाश घाटपांडे

siddhumarathe's picture

1 Feb 2008 - 3:18 pm | siddhumarathe

वाह , छान कविता.

प्राजु's picture

1 Feb 2008 - 8:20 pm | प्राजु

तात्या, वरदा, स्वाती, विनायक, ऋषिकेश, चतुरंग.. धन्यवाद.
प्रमोदराव, अहो गझल सदृश म्हणू नका. कारण मला गझल येत नाही लिहायला आणि या कवितेत तर गझलेचे सगळे नियम मी धाब्यावर बसवले आहेत.
आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

- प्राजु

आपला अभिजित's picture

7 Feb 2008 - 10:50 am | आपला अभिजित

संधीकाली `घोट' पोटी रिचवून सांज आली
गटाराला नवा पाहुणा देऊन सांज आली

वस्त्यावस्त्यांतून पेटली ती भट्टी लपलेली
त्रुषार्थाची त्रुष्णा विझवून सांज आली

मुले-बाळे अन् माऊली घरी परतलेली
`अस्ता'स चैतन्याच्या घेऊन सांज आली

सुरू आता कोलाहल अन् शिव्यांची लाखोली
आयुष्याची लक्तरे फेडून सांज आली

पावलास त्या घराची वाटही न गवसलेली
वाटेवरच्या नजरा अन् थिजवून सांज आली

उद्ध्वस्त होत मने अन् गात्रेही गोठलेली
रक्त शुष्क भावनांचे पिऊन सांज आली

-------------

प्राजु's picture

8 Feb 2008 - 12:50 am | प्राजु

वा वा...
अभिजीत..
केशवाच्या पाऊलावर पाऊल...
माफि वगैरे नका हो मागू...
छान जमली आहे.. पण इथे का लिहिली आहे तुम्ही... स्वतंत्र लिहायचित ना?

- प्राजु