एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकृती

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
30 Mar 2009 - 7:09 pm

तरुण आहे रात्र अजुनी,
राजसा निजलास का रे?

कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात!

असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी.

यायला उशीर होणार हे माहीत होतेच. म्हणून संध्याकाळी कचेरीतच काहीतरी अरबट-चरबट खाऊन घेतले असल्यामुळे भूक नव्हती. झोपही येत नव्हती. शेल्फमधले एक पुस्तक काढले.

लॉर्ड टेनीसन - एक प्रतिभावान कवी.

Home they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
'She must weep or she will die.'

लढाईवर गेलेल्या एका तरुण वीराचा मृतदेह घरी आणलेला. मागे उरलेत फक्त त्याची तरूण पत्नी आणि तान्हे मूल. कलेवराकडे दिग्मूढ होऊन बसलेली पत्नी आणि तिने आपला थोपवलेला आवेग मुक्त करावा, धाय मोकलून रडावे आणि आपले मन मोकळे करावे, अशा प्रयत्नात असलेले तिचे स्वकीय. हर प्रयनांनेही ती बधत नाही हे पाहिल्यावर, एक म्हातारी उठते आणि त्यांच्या तान्हुल्याला तिच्या मांडीवर ठेवते. तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो.

Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee--
Like summer tempest came her tears--
'Sweet my child, I live for thee.'

डोळे भरून येतात. पुढचे काही वाचवत नाही. बिछान्यावर पडतो आणि ते मघाशी ऐकलेले गाणे पुन्हा मनात रुंजी घालू लागते. आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.

एकच प्रसंग, दोन समर्थ कवींनी किती सुंदरतेने चितारलाय.

अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?
..
..
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

आणि मूळ गझलेत असलेले (पण गाण्यातून वगळलेले)

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

टेनीसन आणि सुरेश भट - दोघेही तोलामोलाचे आणि प्रतिभासंपन्न कवी. अकाली वैधव्य आलेल्या युवतीचे अंतरंग किती हळूवारपणे शब्दबद्ध केले आहे त्यांनी!

टीप - भटसाहेबांच्या ह्या सदर गझलेचा हा मला (नव्याने) उमगलेला अर्थ. भटसाहेबांना हाच अर्थ अभिप्रेत होता काय, याविषयी मला निश्चित माहिती नाही.

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2009 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

सुनीलभौ डोक्याला शॉटच लावला की हो तुम्ही एकदम.

आणि मूळ गझलेत असलेले (पण गाण्यातून वगळलेले)

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
खरच ही एक नविनच माहिती मिळाली आज.
अवांतर :- 'मला कित्ती कित्ती आणी काय काय माहिती ' हा गैरसमज असे काहि वाचले की धुळीला मिळतो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

केशवराव's picture

30 Mar 2009 - 7:29 pm | केशवराव

सुनिल, मन विद्ध का काय म्हणतात तसे झाले.
भट आणि लॉर्ड टेनीसन दोघे महान प्रतिभावान कवी; पण तुम्ही दिलेली प्रचीती काही औरच.
तुमच्या व्यासंगाला सलाम !!

मराठमोळा's picture

30 Mar 2009 - 8:05 pm | मराठमोळा

केशवरावाशी सहमत!!!
प्रतिसाद द्यायला दुसरे शब्द नाहीत...

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Mar 2009 - 7:41 pm | बिपिन कार्यकर्ते

सुनील,

नको वाटतं असं काही वाचायला. इतक्या थोड्या आणि नेमक्या शब्दात असलं जीवघेणं लिहिलंय....

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

अप्रतिम, असामान्य.

आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.

ही एका प्रगल्भ वाचकाची निशाणी.

Like summer tempest came her tears--
'Sweet my child, I live for thee.'

परवाचा वैशाली हसमनीस यांचा आयसीयु लेख आठवला. त्यांच्यावर आलेला असाच काहीसा प्रसंग आणि त्यांना जिद्द देणारे असेच काहीसे कारण. काल आयबीएन-लोकमत वर आशा भोसले यांची मुलाखत होती 'ग्रेट भेट' मधे. त्यातही त्यांनी नेमके असेच सांगितले. "माझी मुलं मी रस्त्यावर येऊ देणार नाही. त्यांच्यासाठी तरी मला गावेच लागेल." अंगावर मारहाणीमुळे झालेल्या जखमा घेऊनही त्यांनी गाणी रेकॉर्ड केली आहेत. तर अशी ही सार्वकालिक भावना नेमकी मांडणे, त्याला शब्दरूप देणे हेच टेनिसन सारख्या कवींचे मोठेपण.

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

30 Mar 2009 - 7:46 pm | शाल्मली

भट साहेबांच्या कवितेचा तुम्हाला उमगलेला अर्थ बरोबर आहे.
मलाही हा अर्थ माहित नव्हता. परंतु झी वरच्या मराठी सारेगमपच्या मागील पर्वात आलेल्या कोणीतरी व्यक्तीने (नक्की कोण ते आत्ता आठवत नाहीये.) हा अर्थ सांगितला होता.

लॉर्ड टेनीसन यांचीही कविता सुंदरच आहे.

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

भट साहेबांच्या कवितेतील ह्या ओळीसुद्धा आप्रतिम आहेत.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

--शाल्मली.

मराठी_माणूस's picture

31 Mar 2009 - 8:14 am | मराठी_माणूस

परंतु झी वरच्या मराठी सारेगमपच्या मागील पर्वात आलेल्या कोणीतरी व्यक्तीने (नक्की कोण ते आत्ता आठवत नाहीये.) हा अर्थ सांगितला होता.

एकदम बरोबर. सर्व मराठी रसीकाना ह्या गाण्याच्या अर्थाची नव्याने ओळख झाली होती.

प्राजु's picture

30 Mar 2009 - 7:47 pm | प्राजु

म्हणजे त्याच्या अशा वेगळ्या अर्थाबद्दल एकदा अवधूत गुप्तेंनी सारेगमच्या मंचावर उल्लेख केला होता.
त्याच्या अर्थ.. सरळ पहिलं तर ते एक शृंगार रसप्रधान गीत वाटते. पण खोल अर्थ असा दडलेला आहे त्याचा.
मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या संदर्भात या गाण्याचा अर्थ मला हवा होता... तेव्हा तात्यांशी यावर चर्चा केलेली आठवते.
दोन्ही अर्थानी हे गाणं अत्युच्च आहे इतकंच म्हणेन. भट साहेबांचा लेखणीपुढे नतमस्तक!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

30 Mar 2009 - 10:39 pm | भाग्यश्री

सहमत.. मलाही तेव्हाच कळला याचा गर्भितार्थ!

प्रमोद देव's picture

30 Mar 2009 - 8:03 pm | प्रमोद देव

सुनील,भटसाहेबांच्या त्या गाण्याचा अर्थ तसाच आहे जसा आपण काढलेला आहे. वरवर ते शृंगारगीत वाटते पण तसे ते नाहीये.
ह्या बाबत पूर्वी कधी तरी वाचल्याचे आठवतंय मात्र ह्याक्षणी त्याचा दुवा देणे कठीणच आहे.
टेनीसनची कविताही भारी आहे.
एकाच घटनेकडे पाहताना दोन दिग्गज कवींची मनोभूमिका एकच असणे हा निव्वळ योगायोग वाटतो.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

आळश्यांचा राजा's picture

30 Mar 2009 - 8:12 pm | आळश्यांचा राजा

ग्रेट! सुरेख शब्दांत नेहमीच्या ऐकण्यातल्या गाण्याचा लपलेला अर्थ दाखवून दिलात.

आळश्यांचा राजा

घाटावरचे भट's picture

30 Mar 2009 - 8:15 pm | घाटावरचे भट

हम्म्म....इंटरेस्टिंग इंटरप्रिटेशन.

मीनल's picture

30 Mar 2009 - 9:04 pm | मीनल

प्राजु तुला आठवत का ह्या गाण्याबद्दल?
तू हे गाण `अष्ट्नायिका` या तुझ्या रेडिओच्या कार्यक्रमात केला होतास.पण तेव्हा शृंगार रसप्रधान म्हणून केला होतास.
मी तुला म्हटल होत की त्या कवीची हे गीत लिहिण्यामागची भावना वेगळी होती.अर्थ वेगळा आहे अस ऐकल.

मला हवच होता हा अर्थ कुणीतरी लहायला. कारण मला खात्रीलायक लिहिता येत नव्हते.
सुनिल धन्यवाद.
इंग्रजी ओळींची तुलना ही उत्तम केली आहे तुम्ही.
मीनल.

निखिल देशपांडे's picture

30 Mar 2009 - 9:06 pm | निखिल देशपांडे

फारच छान लिहिले आहे... मी पण ह्या गाण्याला शृंगार रसप्रधान समजत होतो....
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

मस्तच ओळि

लिखाळ's picture

30 Mar 2009 - 9:47 pm | लिखाळ

लेख आवडला.
टेनिसनची कविता छान आहे.
तुमचा व्यासंग आणि तरलतेचे कौतूक वाटले.

'तरूण आहे रात्र..' यावर मागे मनोगत/उपक्रम/मिपा वर चर्चा झाली होती. बहुधा अवधूत गुप्तेने सारेगममध्ये उल्लेख केला होता त्यामुळे ती चर्चा झाली होती. आणि त्यात कुणी जाणकाराने (बहुधा चित्तरंजन यांनीच असावे. मला नीटसे आठवत नाही आहे.) तो गैरसमज आहे सांगीतले होते. ती कविता शृंगारिक आहे असेच त्यांचे म्हणणे होते असे मला आठवत आहे. पण वरील सर्व प्रतिसाद पाहता मी आठवणीबाबत गोंधळलो आहे. ती चर्चा मी शोधायचा प्रयत्न केला पण सापडली नाही. असो. पण तसा अर्थ असेलच असे आपलेही म्हणणे नाही असे आपण तळटीपेत लिहिले आहेच. काव्य भावले म्हणजे झाले !!
-- लिखाळ.

धनंजय's picture

30 Mar 2009 - 11:10 pm | धनंजय

मी केवळ शृंगारिक अर्थच लावत होतो. पुन्हापुन्हा वाचता मृत्युशय्येचा गर्भितार्थ अटळ वाटतो आहे. आतापर्यंत कोड्यात टाकणारी दु:खी चाल एकदम समजली. तुमच्या लेखनाने त्या गझलेला माझ्या मनात वेगळेच बनवले आहे, खूप खोल नेले आहे.

धन्यवाद सुनील. टेनिसनची वीरविधवा आणि सुरेश भट यांची युवतीविधवा - या दोन कवितांचे लागेबांधे सुचणार्‍या तुमच्या आस्वादक मनाला सलाम.

चित्रा's picture

30 Mar 2009 - 11:45 pm | चित्रा

या दोन कवितांचे लागेबांधे सुचणार्‍या तुमच्या आस्वादक मनाला सलाम.

वरील कवितेचा हा अर्थ अवधूत गुप्ते यांनी सांगितला होता ते आठवले.

श्रावण मोडक's picture

31 Mar 2009 - 4:59 pm | श्रावण मोडक

या गाण्याचा मी आजवर घेतलेला अर्थ शृंगारिकच आहे. यापुढेही तो तसाच राहण्याची शक्यता आहे. हा लेख वाचल्यानंतर किमान तीनदा ते गाणं मी पुन्हा ऐकलं. आशाताईंच्या आवाजात. पण काही केल्या शृंगारिक भावातून मृत्यू या कल्पनेशी संबंधित भावात जाताच आले नाही.
पण या रचनेकडे टेनिसनच्या त्या रचनेच्या संदर्भातून वेगळ्या दृष्टीने पाहण्याची कल्पना भिडली. चांगला लेख.

नंदन's picture

30 Mar 2009 - 11:40 pm | नंदन

लेख, अतिशय आवडला. 'अजुनि रूसून आहे, खुलता कळी खुलेना' ही कविता अनिलांनी त्यांच्या पत्नी (कुसुमावती देशपांडे) यांच्या मृत्युसमयी लिहिली होती, असे मागे एका जाणकार व्यक्तीकडून कळले होते. भा. रा. तांबे यांची काही गीते जशी वरकरणी प्रियकराला, पण मुळात परमेश्वराला उद्देशून आहेत; तसेच या वरवर शृंगारिक भासणार्‍या कवितांच्या मागची अर्थातली ही ड्युऍलिटी इथे स्पष्ट केल्याबद्दल आभार.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

30 Mar 2009 - 11:46 pm | चित्रा

तसेच हेही एक असेच अनिलांचेच दुसरे गाणे, ज्याचा एरवी सामान्य अर्थ वेगळाच लागू शकतो.

प्राजु's picture

31 Mar 2009 - 12:14 am | प्राजु

दुव्यासाठी धन्यवाद चित्राताई.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवराव's picture

1 Apr 2009 - 3:30 pm | केशवराव

चित्रा, अतिशय समर्पक दुवा दिलास. एकुणचस चर्चा सुंदर चालली आहे.

- - - - - - केशवराव.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2009 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll

भा. रा. तांबे यांची काही गीते जशी वरकरणी प्रियकराला, पण मुळात परमेश्वराला उद्देशून आहेत; तसेच या वरवर शृंगारिक भासणार्‍या कवितांच्या मागची अर्थातली ही ड्युऍलिटी इथे स्पष्ट केल्याबद्दल आभार.
यावरून आठवले की, वसंतराव देशपांडे जेव्हा अमेरीकेच्या दौर्‍यावर आले होते तेव्हा ते ज्यांच्या घरी उतरले होते त्यानी त्यांच्याशी झालेल्या गप्पा रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. त्यात वसंतराव म्हणतात "गझल म्हणजे शुद्ध अध्यात्म आहे कारण 'गझल' या शब्दाचा अर्थ काय? तर पडद्याकडे बघून बोलणे. गझलेत 'आशिक' आणि 'माशुका' यांच्यातल्या नात्याचे वर्णन असते. 'माशुका' म्हणजे काय तर 'जे पडद्यामागे लपलेले आहे ते'. म्हणजे मुस्लिम स्त्रिया पडदा घेतात म्हणून प्रेमिकेला माशुका म्हटले आहे असे वरकरणी वाटते. पण त्याचा नक्की अर्थ काय तर, जो या सॄष्टीच्या पडद्यामागे लपला आहे तो. म्हणजे परमेश्वर. त्याला माशुका म्हटले आहे. आणि आशिक म्हणजे जो या पडद्यामागच्या परमेश्वराच्या प्रेमात पडला आहे तो. म्हणून गझलेचा अर्थ वरकरणी एक वाटतो आणि आतला कदाचित वेगळाही असू शकतो. मेहंदी हसन, गुलाम अली यानी गझलेला भावगीतासारखे सादर केले म्हणून त्यातल्या या दुसर्‍या अर्थाचा विचार कोणी करत नाही. पण बेगम अख्तर यानी गझल गायली ती भावगीतासारखी गायली नाही, ती गझल म्हणून गायली, म्हणून मला त्यांची गझल आवडते. त्यामुळे तुम्ही गझल ऐकताना ही अशी ऐका तुम्हाला रसनिष्पत्तीतला फरक जाणवेल".

अर्थात वरील सर्व मते वसंतरावांची स्वतःची मते आहेत. ती मी फक्त इथे मांडली आहेत.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सुनील's picture

31 Mar 2009 - 12:36 am | सुनील

कवी कविता लिहून जातात आणि रसिक त्या कवितांचे अन्वयार्थ लावीत राहतात.

बालकवींची "औदुंबर" ही कविता घ्या. जेमतेम ८ ओळींची. पण त्यावर त्याचा अर्थ लावण्यावरून कित्येक पाने खर्ची पडली असावीत! विशेषतः त्यातील शेवटच्या ओळीतील - पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर - "असला" ह्या शब्दावर!

कवी अनिल यांच्या "अजुनी रुसून आहे" चा उल्लेख वर आलाच आहे.

टेनीसनची कविता ही "नरेटीव" पद्धतीची. ज्यात एखादी त्रयस्थ व्यक्ती एखाद्या घटनेबद्दल सांगत असते. अशा कविता साधारणपणे सरळधोप असतात. याउलट गझल हीच मुळी उपमांच्या विळख्यात अडकलेली! गझलेत नुसता चंद्र म्हटला तरी तो खगोलशास्त्रीय चंद्र नसून प्रियतमेचा मुखडा असतो!

कवी अर्थांबाबत मुग्ध राहतात. आपण वाचत रहायचे. कधीतरी अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहोचूच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

31 Mar 2009 - 12:43 am | विसोबा खेचर

सुनीलदादा,

आपल्याला आमचाही सलाम!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

31 Mar 2009 - 1:14 am | मुक्तसुनीत

सुनीलरावांचे हे लिखाण आवडले. असे म्हणतात की लेखकाचे मन कुठून कुठून काय काय घेऊन येत असते. अंतर्मनातून झिरपलेले अबोध मनात रुजते आणि नवे अंकुर घेऊन कुठे तरी बाहेर येते. रसिक मनाचे सुद्धा यापेक्षा फार वेगळे नसावे. एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेताना आपण अनेकदा आयुष्यातल्या अनेक गोष्टींची , इतर आस्वादलेल्या कलाकृतींची सांगड आपल्यासमोरच्या आस्वाद्य गोष्टीशी घालत असतो. "ब्रह्म हे उष्टं नसतं" असे योगी परमहंस म्हणून गेले. ब्रह्माचे माहिती नाही , परंतु सगळे पार्थिव अनुभव हे असे , कमी अधिक प्रमाणात उष्टे आहेत.

"Home they brought her warrior dead" या सुप्रसिद्ध कवितेची मराठी मनाशी ऐतिहासिक सांगड घातली गेली आहे ती गोविंदाग्रजांच्या "राजहंस माझा निजला" या अजरामर काव्याशी. टेनिसनच्या कवितेमधे वीराचे शव त्याच्या पत्नीपाशी नेले. "राजहंस" मधे एका अश्राप बालकाचा मृतदेह त्याच्या आईपुढे ठेवलाय. आणि आईला हा मृत्यू मान्यच नाही. तिचा "राजहंस निजलेला आहे".

ते हृदय कसें आईचें
आनंदेंही जे रडतें
दु:खात कसें ते होई
मी उगाच सांगत नाही

या त्या प्रसिद्ध ओळी.

सुनील यांच्या रसिक मनाने , एरवी शृंगाराची परमावधी मानली गेलेल्या या गाण्यातही , हा असा , करुण शोकावेग शोधला आहे. कविता लेखणीतून उतरून कागदावर छापून आली की ती त्याचीच रहात नाही. प्रत्येक रसिकाच्या मनात ती नव्याने जन्म घेते. याचीच पुनर्प्रचिती हा लेख वाचून येते आहे. नंदनने दिलेला "खुलता कळी खुलेना"चा उल्लेख फार अचूक आहे या संदर्भात.

बाकी कै. सुरेश भट यांच्या कवितेची ही ताकद अशी की , ही कविता आपल्याला आपल्या मनातले अज्ञात प्रदेश दाखवते. मला स्वतःला त्यांच्या काही ओळी वाचताना असा अनुभव आला आहे की, अरे ! कितीही जन्म घेतले तरी हा सत्याचा कण चिरंतन आहे ! खालील ओळीच घ्या :

कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसूं आरशात आहे !

माझ्यामते वरील शब्दांमधला अनामिक अनुभव हा असा , घुसमटवून टाकणारा आहे.

सुनील यांना माझा कुर्निसात.

मिसळपाव's picture

31 Mar 2009 - 1:30 am | मिसळपाव

सुनील, सा-या ओळींचा अर्थ या तू सुचवलेल्याप्रमाणे लागतो - एक सोडून;
उसळती ह्र्दयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
ती युवती कुठल्या अर्थाने असं म्हणेल?

तुझा लेख वाचून थक्क झालो. काय अर्थ लावला आहेस तू. आणि कसा सुचला तेही निव्वळ नि:शब्द करणारं आहे. अतिशय सुंदर लेखन. धन्यवाद.

युवतीचे हृदयात जे प्रेम लाटांसारखे उचंबळते आहे, ते अमृत आहे, त्याला अंत नाही.
"तू" मात्र युवतीच्या शेजारी आहे, हृदयाच्या जवळ आहे, किनार्‍यासारखा. पण ते अमृत "तू"ला लागत नाही - "तू" कोरडा राहातो. ("तू" मृत आहे, ते अमृत जवळ असून त्याला मिळाले नाहीच असा अर्थ मी लावला.)

मिसळपाव's picture

31 Mar 2009 - 2:38 am | मिसळपाव

धनंजय...सुंदर विवेचन.

सुनील, असं काहितरी वाचलं की, दिवसातला बराचसा भाग आपण (मी तरी) किती क्षुल्लक, क्षुद्र गोष्टिंमधे घालवतो हे जाणवतं. खरंच, काय अप्रतिम अर्थ आहे.

चतुरंग's picture

31 Mar 2009 - 1:49 am | चतुरंग

भटांची ही गजल मी आत्तापर्यंत शृंगारगीत म्हणूनच ऐकत आलो होतो.
हा नवा अर्थ सापडलाय, आता पुढल्यावेळी ऐकताना मनस्थिती निश्चितच वेगळी असणार.
नेहेमीच्या दिवसातल्या एका साध्या घटनाक्रमातून अभावितपणे दोन महान कलाकृतींमधील दुवा तुमच्या मनाच्या तरलतेमुळे साधला जावा हा किती सुंदर योग आहे! आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे अगदी आतून आलेल्या ह्या अनुभवाचे तुम्ही अतिशय नेमक्या शब्दात वर्णन करुन त्या अनुभवाला आपलेसे करण्याची संधी आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच.

चतुरंग

बामनाचं पोर's picture

31 Mar 2009 - 2:47 am | बामनाचं पोर

दादांची प्रतिभा खरेच थक्क करणारी आहे..

अश्याच अर्थाचे कुमार गंधर्व यांचे अजुन एक गाणे.. कवि अनिल.. प्रत्यक्षात हे पत्नीच्या निधन प्रसंगी लिहीले होते ( ? ) ..

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥

प्राजु's picture

31 Mar 2009 - 8:01 am | प्राजु

बामनाच्या पोरा...
आवडल्ं हे गाणं. याची ध्वनीफीत असेल तर मला लिंक पाठवाल का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

31 Mar 2009 - 7:35 am | शितल

ह्या गाण्या बद्दल आमच्या ग्रुप मध्ये ५/६ महिन्या पुर्वीच चर्चा झाली होती तेव्हा मी त्या दृष्टीने विचार करून ते गाणे ऐकले होते तेव्हा त्या गाण्याने डोळ्यात पाणी आणले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2009 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरुण आहे रात्र अजुनी,
राजसा निजलास का रे?

भटांची गझल शृंगारगीत म्हणूनच ऐकायलाच सुंदर वाटते. सैनिकाच्या पत्नीची विरहभावना हा अर्थ असाच मराठी संकेतस्थळावर कुठेतरी वाचलेला. तेव्हा आता वरील गझलेकडे पाहण्याचा नजरियाच बदलून गेला. या निमित्ताने 'लॉर्ड टेनीसन'या प्रतिभावंताची ओळख करुन दिल्याबद्दल सुनिलचे आभार !!!

-दिलीप बिरुटे

केदार_जपान's picture

31 Mar 2009 - 10:45 am | केदार_जपान

छानच लेख लिहिला आहे सुनील्...मला पण भटांच्या या गाण्याचा असा अर्थ माहित नव्हता :)

याच प्रकारे मी कवी ग्रेस यांच्या 'ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता' या गाण्याविषयी ऐकले आहे... मला वाटत होते की कवी, त्याची आई वारली आहे, आणि तिच्या विरहाने दु:खी होउन हे गाणे म्हणत आहे असे आहे काय्...पण तुनळी वरच्या गाण्यावर मी असे वाचले कि, खरेतर, कवीची आई, कविला एकटे टाकुन तिच्या प्रियकरा बरोबर गेली आहे, आणि तो अघात सहन न होउन कवी ते गाणे म्हणत आहे... :(

बर्‍याच वेळेला आपल्याला कवितेचा अर्थ वेगळा वाटत असतो, पण कवीला मात्र निराळाच अर्थ अभिप्रेत असतो..

-----------------------
केदार जोशी

स्वाती दिनेश's picture

31 Mar 2009 - 11:27 am | स्वाती दिनेश

सुनील, दोन कवी आणि त्यांच्या कलाकृतींचा तुम्हाला जाणवलेला अर्थ फार सुंदर उलगडून दाखवला आहे. वरील अनेक अभिप्रायही त्यात भर घालणारेच..तुमचा हा लेख एक उत्तम कलाकृती झालेला आहे.
(भटसाहेबांच्या वरील गीताबद्दल सारेगमप मध्ये अवधूत गुप्तेने केलेले विवेचन अंधुकसे आठवत होते,पण मनोगतावर झालेली उलटसुलट चर्चाही आठवत होती. )
स्वाती

बेसनलाडू's picture

2 Apr 2009 - 1:33 am | बेसनलाडू

(स्मरणशील)बेसनलाडू

विसुनाना's picture

31 Mar 2009 - 12:05 pm | विसुनाना

या गाण्याचा या दृष्टीने विचार अवधूत गुप्त्यांमुळे झाला होता.
पण 'होम दे ब्रॉट' शी तुलनात्मक किंवा साधर्म्यात्मक चर्चा करणारा हा लेख आवडला.
प्रतिक्रियाही माहितीपूर्ण आहेत.
माझी थोडी भर -
"नववधु प्रिया मी बावरते" हे भा.रा. तांब्यांचे गीत मृत्यूला उद्देशून आहे. (तू म्हणजे मृत्यू असे ऐकले आहे.)
नंदन, धनंजय इ. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

नितिन थत्ते's picture

31 Mar 2009 - 12:26 pm | नितिन थत्ते

नाही पटले

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे... आणि तू मिटलास का रे?

हे अध्यात्मिक आहे हे पटू शकत नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

यन्ना _रास्कला's picture

7 Apr 2009 - 5:45 am | यन्ना _रास्कला

श्वास हा थांबलेला आहे असे कुठे म्हटले नाहिये तर तो (मधु) मंद चालु आहे असेच भट साहेब म्हणतात. म्हणजे आपल्या हिरोला पहाटे पहाटे शांत झोप लागली असावी.

जागु's picture

31 Mar 2009 - 12:31 pm | जागु

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

काय जबरदस्त लिहलय आणि तुम्ही दिलेली माहीतीही खुप छान आहे.

दशानन's picture

31 Mar 2009 - 1:26 pm | दशानन

कवितेतले ह्यातले काही कळत नाही पण सुनील जेव्हा कविता वाचली व तुझे परिक्षण वाचले व परत एकदा कविता वाचली तेव्हा कळाले की तुला काय म्हणायचे आहे, मस्तच !

ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?

ह्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत.

गणा मास्तर's picture

1 Apr 2009 - 7:20 pm | गणा मास्तर

सुनिल अरे वाचता वाचता काटाच आला अंगावर....

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 7:44 pm | क्रान्ति

खरच भटकाकांनी "तरुण आहे " शृन्गारकाव्य म्हणून न लिहिता अशा वेगळ्या अर्थानंच लिहिलेल आहे. त्यांच्या तोंडूनच ते विश्लेषण ऐकण्याच महद् भाग्य लहानपणी मला लाभल, अर्थात त्यावेळी ते कळण्याच वयही नव्हत, पण या चर्चेमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप चांगल वाचायला मिळाल. खरच कविमनाचा मागोवा घेण किती कठीण असत, हे अशा वरवर एक भाव, आणि अन्तर्यामी वेगळाच अर्थ अभिप्रेत असणार्‍या कितीतरी कविता वाचताना लक्षात येत. आता अशा कविता शोधायचा नवा छन्द लागला! खूप खूप छान लेख आहे खरच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 2:08 pm | सुधीर कांदळकर

सांगितल्यावरच कळला. टेनिसनचीहि कविता मस्तच. मराठी कविताच कळत नाहीं मग इंग्रजीच्या वाटेला कोण जाईल? म्हणून ठाऊकच नव्हती. खरेंच अव्धूतनें सांगितल्यावर पण माझीहि आपण म्हटल्याप्रमाणें

डोळे भरून येतात. पुढचे काही वाचवत नाही. बिछान्यावर पडतो आणि ते मघाशी ऐकलेले गाणे पुन्हा मनात रुंजी घालू लागते. आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.

अशीच अवस्था झाली होती. धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

पाषाणभेद's picture

5 Apr 2009 - 5:37 pm | पाषाणभेद

दोन्ही कविता मस्तच. आणि आपल्याला लागलेला अर्थ तर छानच.
- पाषाणभेद

_समीर_'s picture

7 Apr 2009 - 5:58 am | _समीर_

तुम्ही काढलेला अर्थ आधी नक्कीच ऐकलेला होता. म्हणूनच वरती कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे उपक्रमावर शोध घेतला असता खालील लोकसत्तेतील पत्र सापडले. सदर पत्रलेखकाला/लेखिकेला सुद्धा नेमका हाच अर्थ आणि त्याअनुषंगाने हीच इंग्रजी कविता सुचावी हा निव्वळ योगायोग की आणखी काही ह्यावर विचार करतो आहे.

गमतीचा भाग म्हणजे साक्षात चित्तरंजन भटांनी ही निव्वळ शृंगारीक कविता आहे असा केलेला खुलासाही तिथेच आढळला आणि त्याचवेळेला वरचे काही भावनाप्रधान होऊन डोळ्यातून पाणी काढणारे आणि कसला कसला गहिवर येणारे प्रतिसाद पाहून मौजही वाटली.

-समीर

मराठी_माणूस's picture

7 Apr 2009 - 7:47 am | मराठी_माणूस

निव्वळ योगायोग की आणखी काही ह्यावर विचार करतो आहे.

विचार करण्यासारखीच गोष्ट आहे

सुनील's picture

7 Apr 2009 - 7:57 am | सुनील

अशाच आशयाची खरड मला माजी मिपाकर आजुनुकर्ण यांनी उपक्रमावर पाठवली होती तेव्हा मलादेखिल ह्या योगायोगाचे आश्चर्य वाटले होते. माझ्यापुरते म्हणाल तर, मी हे लोकसत्तातील पत्र काय किंवा अवधूत गुप्ते यांचा कर्यक्रम काय, दोन्हीही पहिले नव्हते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

त्यातील कारुण्याची शक्यता हृदयनाथ मंगेशकरांनाही जाणवली. वर्तमानपत्रातील "मालवून टाक दीप"चे रस-विडंबन अतिशयोक्त आहे.

"तरुण आहे रात्र" साठी हृदयनाथांनी लावलेली चाल (http://www.youtube.com/watch?v=_eEbqofJs4w), आणि "मालवून टाक दीप" साठी हृदयनाथांनीच लावलेली चाल (http://www.youtube.com/watch?v=vVinL1a7liw) यूट्यूबवर ऐकावी.

आता सुरेश भटांच्या मनात शृंगारावेगळे काही नसेलही, पण एकदा का कवीच्या हातून कविता प्रकाशित झाली, की त्याचा कवितेच्या अर्थावर एकाधिकार राहात नाही. कवी रसिकाच्या पुढे अनेक शक्यता ठेवतो, एकच काटेकोर अर्थ असलेले कंत्राटपत्र ठेवत नाही.

"मालवून टाक दीप" मधील स्त्री प्रियकराला पुढे अमुकतमुक करायच्या सूचना देत आहे (मालवून टाक दीप; गारगार या हवेत, घेउनी मला कवेत, मोकळे करून टाक; घे टिपून एक एक रूपरंग), त्यामुळे रसिकाने आशावादी अर्थ घेण्यास कवीने खूप जागा ठेवली आहे.

"तरुण आहे रात्र" मधील स्त्री होऊन गेलेल्या घटनांबद्दल तक्रार करत आहे (निजलास, त्या कुशीवर वळलास, विझलास, मिटलास, लुटलास, कोरडा उरलास, रुसलास). भविष्यात प्रियकर काही ऐकेल, करेल, करावे, असे काही सांगतच नाही. मग कोणी रसिकाने निराशेचा सुर पकडला, तर कवीने त्याला रोखण्यासाठी एकही शब्द दिलेला नाही.

"मालवून टाक दीप" मध्ये आसुसलेला प्रणय आहे, "तरुण आहे" मध्ये निराश प्रणय आहे, असे म्हणायला तरी नक्कीच जागा आहे. (निराश प्रणयाची पराकोटी म्हणजे वैधव्य. हा रसिकाचा दु:खी कल्पनाविलास.) _समीर_ यांना मौज वाटते ती का? शृंगार भावनाप्रधान असू शकत नाही, निराश झालेला प्रणय दु:खद नसतो, कोणाला दु:ख जाणवल्यास तो भंपकपणा आहे, ही भावना त्या मौजेच्या मुळाशी आहे का?

सुरेश भटांच्या वहीतून कोणाला "तरुण आहे" कवितेच्या आणखी द्विपदी सापडल्या, त्यात प्रियकर उठून प्रेयसीला आलिंगन देतो, असे असेल, तर ती खरोखरच नवी कविता होईल.

मुक्तसुनीत's picture

8 Apr 2009 - 4:15 am | मुक्तसुनीत

सुरेश भटांच्या वहीतून कोणाला "तरुण आहे" कवितेच्या आणखी द्विपदी सापडल्या, त्यात प्रियकर उठून प्रेयसीला आलिंगन देतो, असे असेल, तर ती खरोखरच नवी कविता होईल.

किंवा एखाद्या धार्मिक व्यक्तीला सत्यवान्-सावित्रीच्या कथेचा दृष्टांतही दिसेल ! ;-)

सुनील's picture

8 Apr 2009 - 5:13 am | सुनील

"तरुण आहे रात्र" मधील स्त्री होऊन गेलेल्या घटनांबद्दल तक्रार करत आहे (निजलास, त्या कुशीवर वळलास, विझलास, मिटलास, लुटलास, कोरडा उरलास, रुसलास). भविष्यात प्रियकर काही ऐकेल, करेल, करावे, असे काही सांगतच नाही. मग कोणी रसिकाने निराशेचा सुर पकडला, तर कवीने त्याला रोखण्यासाठी एकही शब्द दिलेला नाही.
माझा विशेष रोख आहे तो शेवटच्या कडव्यावर (जे कोणत्या कारणाने हृदयनाथांनी रेकॉर्ड करताना गाळले, ते माहित नाही). त्यात हा निराशेचा सूर प्रकर्षाने जाणवतो.

प्रतिसादाची जागा किंचित चुकली आहे. सदर प्रतिसाद हा धनंजय यांना आहे, मुक्तसुनित यांना नव्हे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

एकलव्य's picture

8 Apr 2009 - 9:46 am | एकलव्य

या अंगाने या ओळींकडे पाहिलेच नव्हते... डोळे बंद मिटून राहावेसे वाटते आहे.

आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद सुनील.

"... कुणीतरी या गाण्याचा अर्थ सांगताना हे मृत्युगीत आहे असा अर्थ सांगण्यात आला. मला वाटत नाही कि मी मृत्युगीताला इतकी शृंगारिक चाल लावेन. आणि ती चाल भटांनी पण ऐकली होती भटांना अतिशय आवडलेली चाल आहे ती. आणि भटांनी असा माझ्याजवळ कधीही उल्लेख केला नाही कि हे मृत्युगीत आहे म्हणून. पण हे शृंगारिक गाणे आहे. प्रेयसी प्रियकराची मनधरणी करते. आणि तो तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. तिने जास्तीत जास्त तिच्यात आर्तता यावी.तिने अधिक संवेदनशील व्हावं ह्या उद्देशाने तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय हे भटांचं म्हणणं होतं..."

इथे ऐका:

https://youtu.be/EXrwDBiUyOM?t=172

अमर विश्वास's picture

5 Nov 2020 - 6:15 pm | अमर विश्वास

खुद्द सुरेश भटांनी सांगितले आहे कि तरुण आहे रात्र अजुनी ही प्रेम / शृंगार कविताच आहे

गरवारे कॉलेज सभागृहात झालेल्या एल्गार कार्यक्रमात त्यानी हे सांगितलेले मी स्वतः ऐकले आहे

बाकी खुद्द हृदयनाथांच्या शब्दात ऐका

https://www.youtube.com/watch?v=EXrwDBiUyOM&ab_channel=GaneshPitre

संजय क्षीरसागर's picture

5 Nov 2020 - 6:58 pm | संजय क्षीरसागर

आज नवे प्रतिसाद बघतांना दिसला
शेजेच्या फुलांचा तिरडीच्या फुलांशी त्याचू टाईप संबध जोडून गाण्याचा विचका करण्याचा भंपक प्रयत्न होता हा !

गामा पैलवान's picture

5 Nov 2020 - 7:51 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

निद्रा आणि मृत्यू यांना सख्खी भावंड मानलं जातं. तर मग चिरनिद्रेवर निद्रेचा आरोप होणं बऱ्यापैकी नैसर्गिकच नव्हे काय?

आ.न.,
-गा.पै.

श्वासही मधुमंद का रे? म्हटलंय ! बंद का रे ? नाही.

संग झाल्यावर श्वास मंद होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. आणि सखी मात्र अजून अतृप्त आहे असा सरळ अर्थ आहे. तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे ? एवढयातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

सगळ्या कवितेचा एकूण नूर तोच आहे.

कुणी काहीही अर्थ लावतो ! मी नसेन इथे बहुदा त्या वेळी नाही तर इतका पसारा वाढू दिला नसता !

गामा पैलवान's picture

6 Nov 2020 - 1:45 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

मृत्यूचं प्रतीक हा अर्थ माझा नाहीये. असा अर्थ लावणं काहीजणांना साहजिक वाटू शकतं, इतकाच माझा मर्यादित दावा आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

6 Nov 2020 - 1:57 pm | संजय क्षीरसागर

घोर चुकीचा आहे हे साकारण सांगून या प्रकरणावर आता पूर्ण पडदा पाडला आहे !

गामा पैलवान's picture

6 Nov 2020 - 6:41 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

अर्थारोपण चुकीचं असू शकेल किंवा नसेल. पण काहीजणांना हे अर्थारोपण नैसर्गिक वाटू शकतं, हा दावा चुकीचा कसा काय?

आ.न.,
-गा.पै.

गामाजी, त्यांनी म्हटलंय ना की "असा अर्थ किंवा दावा घोर चुकीचा आहे हे साकारण सांगून या प्रकरणावर आता पूर्ण पडदा पाडला आहे !" मग तुमची हिंमत कशी झाली त्यांना प्रतिप्रश्न करण्याची?

ते म्हणाले सूर्य पश्चिमेला उगवतो तर पश्चिमेलाच उगवतो. ते म्हणाले पॄथ्वी सपाट आहे तर सपाटच आहे. त्यांचा शब्द अंतिम आहे, त्यांचं सगळंच भव्य आहे, त्यांचं सगळंच दिव्य आहे. त्यांचे शब्द मोती आहेत. ते लिहीतात तेव्हा जगावर उपकार करतात.

एक लक्षात घ्या, त्यांनी बाजारातून सडकं केळं जरी विकत घेतलं तरी त्याला ते उच्च प्रतीचं केळं म्हणणार. आणि इतरांनी जरी कितीही उच्च प्रतीचं केळं विकत घेतलं तरी ते त्याला रताळं म्हणणार.

त्यांचं केळं केळं आणि लोकांचं केळं रताळं.

हे मृत्यूगीत आहे ते तुमचं एकूण काय आकलन आहे त्यानी सिद्ध करुन दाखवा. जमत नसेल तर बाष्कळ पचपच करु नका.

हे दाखवून दिल्यावर पुन्हा चुकीची बाजू उचलून धरणं रास्त नाही.

गैरसमज होऊ शकतो पण एकदा मुद्दा क्लिअर झाला तरी त्याचूगिरी चालूच ठेवणं, हे काम इथले एकमेव सदस्य करु शकतात.

संगणकनंद's picture

7 Nov 2020 - 10:26 am | संगणकनंद

एकदा मुद्दा क्लिअर झाला तरी त्याचूगिरी चालूच ठेवणं, हे काम इथले एकमेव सदस्य करु शकतात.

आणि हे एकमेव सदस्य स्वतःला सर्वज्ञानी आणि जगाला मूर्ख समजतात.

गामा पैलवान's picture

7 Nov 2020 - 10:56 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

मी चुकीची बाजू उचलंत नाहीये. ती अतार्किक असूनही इतरांना का बरोबर वाटतेय, यावर विचार मांडतोय.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

7 Nov 2020 - 11:27 pm | संजय क्षीरसागर

मुन्नी बदनाम हुई हा विधवा विलाप आहे असं म्हणेल !

नवर्‍यानं सुसाइड नोट लिहिल्यानं मुन्नीची बदनामी झाली आहे. तरीही प्रेमापायी ती त्याला आजही डार्लींग म्हणते.

तीला अंगभर कपडे नसल्यानं ती केवळ लाज राखण्यापुरती वस्त्रं परिधान करुन आहे.
तीच्या कमनीय बांध्याकडे पाहू नका, उपासमार दाखवण्यासाठी ती पोट उघडं ठेवून नाचतेय.
लोकांची धुणं-भांडी आणि फरश्या पुसणं करुन तीचं अंग इतकं मोडून आलं आहे की तीला सर्वांगाला झंडू बाम हवा आहे आणि ते ती सांकेतिक पद्धतीनं सांगतीये.

तुम्ही काढाल का असा अर्थ ?

गामा पैलवान's picture

8 Nov 2020 - 3:31 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुम्ही काढाल का असा अर्थ ?

माझं जाउद्या. समजा इतर कोणी काढलाच तर त्याचे हेतू तपासून बघायला हवेत ना?

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

8 Nov 2020 - 5:28 pm | संजय क्षीरसागर

म्हणूनच हा प्रतिसाद प्रपंच !

इतक्या सुरेख गाण्याचा लोक वर्षानुवर्ष आनंद घेतायंत. पुढच्या पिढयांना त्या गाण्याचा अंदाज शृंगारिक अभिव्यक्तीचा मार्गदर्शक ठरेल. तर अशा अप्रतिम गाण्याचा रसभंग कशापायी करावा ?

गामा पैलवान's picture

9 Nov 2020 - 2:15 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे. पण काये की हजार नव्या वाटा धुंडाळता एखादीच अप्रतिम वाट सापडते. तेव्हा कितीही रसभंग झाला तरीही प्रयत्नांना कमी लेखू नये, इतकीच अपेक्षा आहे.

मी इथे थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2020 - 9:08 am | संजय क्षीरसागर

रसभंग करुन काहीही विधायक होणं असंभव कारण ती वृत्तीच मुळात निर्मितीशी विसंगत आहे.

याला चांगल्या चाललेल्या गाडीचं बॉनेट उघडणं म्हणतात !

गामा पैलवान's picture

11 Nov 2020 - 9:28 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

मला इथे रसभंग झाल्याचं वाटंत नाही. रसहानी म्हणता येईल.

शेवटचं कडवं फारसं कुणाला माहित नाही. ते वगळून गीत बघितलं तर संशयाचा फायदा द्यायला वाव आहे, असं माझं मत.

आ.न.,
-गा.पै.

स्मिता.'s picture

5 Nov 2020 - 7:17 pm | स्मिता.

तब्बल साडे अकरा वर्षांनी हा धागा वर आला, अनेक जुने आयडी दिसले आणि स्मरणरंजन झाले.

बाकी हे गाणं वरचा खुलासा कळल्यानंतर अनेकवेळा ऐकूनही ते विरहगीत/मृत्यूसमयीचं दु:खी गीत वाटत नाही. माझ्यापर्यंत तरी त्यातून 'का रे दुरावा' सारखा शृंगारीक भावच पोहोचतो.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2020 - 9:05 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर !
असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते.
शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2020 - 9:05 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2020 - 9:05 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर !
असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते.
शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.

सतिश गावडे's picture

10 Nov 2020 - 9:51 pm | सतिश गावडे

कवीने ज्या अर्थाने काव्य लिहीले तो अर्थ, काव्याच्या लोकांनी लावलेला अर्थ यांसहीत एखादा काव्य रसिक वेगळाच अर्थ लावू शकतो.

उन्मेष दिक्षीत's picture

11 Nov 2020 - 3:10 pm | उन्मेष दिक्षीत
उन्मेष दिक्षीत's picture

11 Nov 2020 - 3:12 pm | उन्मेष दिक्षीत
उन्मेष दिक्षीत's picture

11 Nov 2020 - 3:16 pm | उन्मेष दिक्षीत