'ग्रॅन टोरिनो' - आ़जोबांची शिकवण!

मुशाफिर's picture
मुशाफिर in जनातलं, मनातलं
11 Mar 2009 - 3:55 am

क्लिंट ईस्टवूड हा माझ्या फार आवडत्या कलाकारांपैकी एक. खुप लहान असताना माझ्या मोठ्या मामेभावाने 'द गुड द बॅड ऍंड द अगली' हा त्याचा चित्रपट दाखवून ह्या कलाकाराशी माझी पहीली ओळख करून दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याच्याविषयीचा आदर वाढतच गेला आहे. त्याच्या सुरवातीच्या काळातील 'मारधाड' किंवा 'वेस्टर्न' चित्रपटातील त्याची असलेली प्रतिमा लक्षात घेता, त्याचे अलिकडील चित्रपट उदा. 'मिलियन डॉलर बेबी', 'चेंजलिंग', 'लेटर्स फ्रॉम इवो जिमा' इ. हे फारच वेगळे आहेत. एका संवेदनशील कलाकाराची ते साक्ष देतात (यातील काही चित्रपटात त्याने स्वतः काम केलेले नाही तर ते दिग्दर्शित केले आहेत/निर्मिले आहेत).

गेल्या जानेवरीत त्याचा 'ग्रॅन टोरिनो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो पहायचाच हे मी आणि माझ्या सहधर्मचारिणीने ठरवून ठेवल्याने आम्ही त्याप्रमाणे चित्रपट पहायला गेलो. क्लिंट ईस्टवूड तीलाही आवडत असल्याने त्याविषयी वाद होणार नव्हताच!

चित्रपटाची जाहीरात पाहून त्याच्या कथेविषयी निर्माण झालेल्या सगळ्या कल्पनांना एका दणक्यात भुईसपाट करणारा शेवट! हे ह्या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेलं. क्लिंट ईस्टवूडच्या चित्रपटांची परिक्षणं वाचून आम्ही तो सिनेमा पाहयचा की नाही हे कधीच ठरवतं नाही. आणि आजपर्यंत त्याच्याकडून फार निराशा कधीच झाली नाही. आजोबांचा (मी आणि माझ्या सहधर्मचारिणीने क्लिंट इस्टवूड ला दिलेले हे नावं. त्याचा उल्लेख आम्ही बर्‍याचदा असाच करतो :)) चित्रपट म्हणजे हमखास काहीतरी वेगळं असणार हे नक्की!

तब्बल चार वर्षांनी क्लिंट ईस्टवूड पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आलाय आणि तोही एका निवृत सैनिकाच्या (वॉल्ट कोवॉल्स्कीच्या) भुमिकेत. वॉल्ट कोवॉल्स्की फक्त एक निवृत सैनिक नाही. त्याला कोरियन युद्धात शौर्यापदक मिळालयं पण त्याचबरोबर काही वेदनाही! ज्या तो कोणालाच सांगु इच्छित नाही. एका पराकोटीच्या अभिमानी (किंवा किंचीत दुराभिमानी) माणसाची ही व्यक्तिरेखा क्लिंट ईस्टवूडने फार सुंदर रंगवली आहे.

त्याच्या मृत पत्निची शेवटची इच्छा म्हणजे, एकदातरी वॉल्ट कोवॉल्स्कीने चर्चमध्ये पाद्र्यासमोर आपल्या पापांची कबुली (कन्फेशन) द्यावी. पण आपली कुत्री 'डेझी' शिवाय कुणाकडेच तो मोकळेपणाने बोलत नाही, हेच त्या व्यक्तिरेखेचं एककल्लीपण अधोरेखीत करतं!

वॉल्ट कोवॉल्स्कीने युद्धानंतर 'फोर्ड' कंपनीत काम केलयं. त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये त्याने जपून ठेवली आहे त्याची आवडती गाडी 'ग्रॅन टोरिनो'! स्वसंरक्षणासाठी वॉल्टकडे एक 'एम-१ ' रायफलही सदैव सज्ज असते.

वॉल्ट कोवॉल्स्कीला त्याचीच मुलं, नातवंड पारखी झालेली आणि आजुबाजुला होणारे बदल त्याला न पटणारे आहेत. त्याचा नातीशी झालेला संवाद हा त्यांच्या नात्यातली वीण किती उसवली आहे? याचच प्रत्यंतर देणारा. त्यातच त्याचे शेजारीही एक एक करून शेजार सोडुन गेलेले आणि त्यांच्या जागी त्याला नकोसे वाटणारे नवे 'एशियन' शेजारी येतायत. आयुष्य असचं एकाकी जगण्यात जात असताना एके रात्री तो शेजारच्या घरातल्या 'टाओ' ला त्याच्या गॅरेजमधून 'ग्रॅन टोरिनो' च्या चोरीचा प्रयत्न करताना पकडतो.

इथुन सुरू होतो वॉल्ट कोवॉल्स्कीचा एक वेगळाच प्रवास. 'टाओ' शी आलेल्या संबंधातून आपल्या घराजवळ वाढत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी त्याचे निर्माण झालेले वैर, 'टाओ' ला त्याने केलेली मदत. 'टाओ'च्या बहिणीवरच्या अत्याचाराबद्दल गुंडाना धडा शिकवण्यासाठी त्याने केलेला उपाय हा तर केवळ अनपेक्षितच!

या चित्रपटातील काही प्रसंग तर फारच सुरेख आहेत. विशेषतः वॉल्ट कोवॉल्स्की चर्चमध्ये पाद्र्यासमोर आपल्या पापांची कबुली देतो आणि त्यानंतर पाद्रीच रक्तपात होउ नये, म्हणून पोलिसांना घेवून त्या गुंडांच्या घरी जातो. हा प्रसंग फार छान आहे. ह्यातला विरोधाभास आणि नर्मविनोद चांगलाच जमलाय.

मानवी भावभावनांचे वेगवेगळे कांगोरे दाखवत आणि आपण सगळेच बरेचदा किती पूर्वग्रहदुषीत विचार करत असतो? हे नेमकं टिपत हा चित्रपट संपतो. या वेळीही आजोबांनी त्यांच्या चित्रपटातून एक वेगळीच शिकवण दिली आणि ती खुप महत्वाची आहे!

अवांतरः चित्रपटाच्या कथेतले बारकावे देणे/ संपूर्ण कथानक देणे, मुद्दाम टाळले आहे. जिज्ञासुंनी अधिक माहीतीसाठी इथे पहा: http://en.wikipedia.org/wiki/Gran_Torino_(film)

चित्रपटप्रकटनअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मी ही आजोबांचा पंखा आहे (स्वारी हं न विचारताच तुमचं दिलेलं नाव वापरतोय).. माझीही ओळख झाली त्या भन्नाट गुड बॅड अगली मधूनच....बघतोच परत हा शीणेमा....

-
अफाट जगातील एक अडाणि.

सहज's picture

11 Mar 2009 - 7:41 am | सहज

आजोबांचा मी देखील पंखा आहे.

सवडीने नक्की बघेन.

प्राजु's picture

11 Mar 2009 - 8:32 am | प्राजु

नक्की बघेन हा चित्रपट.
छान परिक्षण लिहिलं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुशाफिर's picture

11 Mar 2009 - 8:14 pm | मुशाफिर

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

मुशाफिर.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 8:53 pm | बिपिन कार्यकर्ते

हा आजोबा भारी आहेच. नेमकी ओळख करून दिलीत.

असे चित्रपट जालावर कुठे बघायला मिळतील का?

बिपिन कार्यकर्ते

मुशाफिर's picture

11 Mar 2009 - 9:02 pm | मुशाफिर

http://www.fastpasstv.com/gran-torino-2008/ हा दुवा चांगला वाटला.

मुशाफिर.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 9:14 pm | बिपिन कार्यकर्ते

तातडीने दुवा पुरवल्याबद्दल धन्यवाद!!!!

बिपिन कार्यकर्ते

सूर्य's picture

11 Mar 2009 - 8:55 pm | सूर्य

आजोबांचा सध्या फॅन झालोय. 'डर्टी हॅरी' पासुनचे सगळे चित्रपट बघणे चालु आहे. ;)
परिक्षण चांगले आहे. अजुन परिक्षणे येउद्यात.

चकली's picture

11 Mar 2009 - 10:03 pm | चकली

नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद

चकली
http://chakali.blogspot.com

लिखाळ's picture

11 Mar 2009 - 10:06 pm | लिखाळ

वा.. चित्रपटाची ओळख आवडली. क्लिंट ईस्ट वुडचा अभियन मला आवडतो.
आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.
-- लिखाळ.

शब्देय's picture

11 Mar 2009 - 10:34 pm | शब्देय

या विकांताला जरुर पाहणार...नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद

स्वाती राजेश's picture

11 Mar 2009 - 11:56 pm | स्वाती राजेश

मी पण आजोबांची फॅन आहे....
आजच त्यांचा space cowboys पाहिला.