हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Feb 2022 - 2:50 pm

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक

७ नोव्हेंबरची सकाळ. कालचा मुक्काम पिथौरागढ़मध्येच होता. दुमजली घर, अंगण आणि अंगणात सुंदर झाडं आणि फुलं! इथे पूर्वेच्या बाजूला मोठा डोंगर नाहीय. त्यामुळे ऊन सकाळी ६ वाजताच आलं. हे घर थोडं उंचावर असल्यामुळे समोर पिथौरागढ़ शहराचा विस्तार दिसतोय. आणि शहराला लागून छोट्या- मोठ्या डोंगर रांगा. इथून चंडाक हिल परिसराचं अंतर साधारण ८ किलोमीटर आहे. तिथून थोडं पुढे मोस्टा मनू मंदिर आहे. तिथपर्यंत फिरायला जायचं ठरवलं. जाऊन येऊन साधारण १८- २० किलोमीटर ट्रेक होईल. कधीही न बघितलेल्या परिसरामध्ये मस्त ट्रेक होईल. पाण्य़ाची बाटली, काही चिक्क्या असं थोडं सामान पाठीवर घेऊन निघालो. रस्ता आधी पिथौरागढ़ शहरामध्ये जाईल आणि नंतर तिथलं मेन मार्केट असलेल्या सिल्थाम परिसरातून चंडाक हिलचा रस्ता मिळेल. ह्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आयटीबीपी आणि बीआरओचे सेंटर्स आहेत. मिलिटरीची ये- जा असतेच. फास्ट वॉक करत वीस मिनिटांमध्ये मुख्य शहरात पोहचलो. इथे नाश्ता करता येईल असं वाटलं. पण थोडं पुढे बघू असं करत करत हॉटेल मागे पडले. आणि सकाळी आठला जास्त हॉटेल सुरूही नव्हते. पुढे चंडाक परिसरात हॉटेल मिळेल असं कळालं आणि सोबतच्या चिक्की खाऊन पुढे निघालो. हळु हळु पिथौरागढ़ शहराची वस्ती विरळ होत चालली आणि लवकरच शांत परिसर मिळाला. इथे अनेक जण सकाळी फिरताना दिसत आहेत. मोकळा परिसर आल्यानंतर चंडाक हिलचा परिसर दूरवरून दिसायला लागला.

उत्तराखण्डमध्ये सर्वत्र मन्दिरं खूप आहेत. ह्या वाटेवरही अनेक मंदिरं लागली. त्यापैकी एक मन्दिर "उल्का माँ" नावामुळे लक्षात राहिलं! रस्ता हळु हळु चढत वर जातोय आणि आजूबाजूचा दूरवरचा परिसर नजरेच्या कक्षेत येतोय. वाटेत कुमाऊँ मण्डल विकास निगमचं पर्यटक निवास लागलं. तिथे ॐ पर्वताच्या फोटोसाठी चक्कर मारली. पण अद्याप हे हॉटेल जागंच झालं नाहीय, त्यामुळे लगेच पुढे निघालो. चंडाक हिल डोंगरावर आहे आणि इथून आणखी पुढे गेल्यावर रस्ता खाली उतरतो तिथे प्रसिद्ध चंडी मंदिर आहे. सूर्य जसा वर चढतोय तसे धुक्यामधून दूरचे हिम शिखर डोकावत आहेत. समोरच्या बाजूला डोंगराच्या खाली अनेक छोटी गावंही दिसत आहेत. एक रस्ता मुख्य रस्त्यापासून वेगळा होऊन खालच्या गावाकडे जातोय. पुढे गेल्यावर ते गाव वरून खूप छान दिसलं. एक पर्यटन स्थळ असल्यामुळे इथला रस्ता खूप चांगला आहे. इथे सायकल चालवायला मजा आली असती. खूप मोठा घाट आणि आजूबाजूला नितांत सुंदर परिसर!

इथे काही मंदिरांच्या पायवाटाही जातात. इथे प्रादेशिक सेनेच्या निगराणीमध्ये एक इको पार्कही आहे. काही वळणं घेऊन रस्ता आता डोंगरावर आला आहे. सगळीकडे देवदारांचं प्रभूत्व! सहा किलोमीटर झाले तरी थकल्यासारखं अजिबात वाटत नाहीय. कारण हा सर्व प्रवास आल्हाददायक अशा नैसर्गिक एसीमध्ये सुरू आहे! शिवाय नजारे इतके अप्रतिम की थकण्याचा प्रश्नच नाही! इथे फिरायला आल्याबद्दल स्वत:ला मनोमन अनेक धन्यवाद देतोय! समोर काही अंतरावर मोबाईलचं टॉवर दिसतंय. म्हणजे ह्या डोंगराचा माथा हाच असेल. पुढे कदाचित रस्ता थोडा खाली उतरेल. इथे काही वस्ती आहे. पराठा मिळेल असं हॉटेल मिळालं नाही. त्यामुळे पुढे निघालो. इथून चंडी- मंदीर आणि मोस्ता- मानू मन्दिराचे मार्ग वेगळे होतात. मोस्ता मानू मंदिराच्या दिशेला वळालो आणि वस्ती जशी किंचित मागे गेली, तसं देवदारांचं एक घनदाट वन समोर आलं! अक्षरश: स्वप्नवत दृश्य! गमतीने मी माझ्या मित्रांना म्हणतोय सध्या की, मी कमालीचा अय्याश झालोय. सतत चंगळ करतोय. सतत आनंदाची लूट करतोय! इतक्या जवळून देवदारांचा सत्संग आणि त्यांच्या पलीकडून डोकावणारे हिमशिखर! लवकरच मोस्ता मानू मन्दिराजवळ पोहचलो. हे शिव मंदिरासारखं मंदिर होतं. आजूबाजूला थोडी घर आणि वस्ती. काही वेळ मंदिरामध्ये शांत बसलो आणि परत निघालो.

परत फिरल्यावर मात्र भूक लागली. इथे आलू पराठा किंवा व्हेज असं हॉटेल चटकन मिळालं नाही. जवळचे हॉटेल नॉन व्हेजचे आहेत. त्यामुळे अखेरीस चहा- बिस्कीट असं खाल्ल. पुढे पिथौरागढ़मध्ये नाश्ता करेन असा विचार करून निघालो. हा परिसर दुस-या बाजूने जातानाही किती वेगळा आणि सुंदर दिसतोय! मी मघाशी ज्या रस्त्यावरून आलो होतो, तो रस्ता वरून मस्त दिसतोय. परतीच्या वाटेवर हलका पण उतार असल्यामुळे थकवा वाटला नाही. शिवाय गेले अनेक दिवस रोज पाच- सहा किलोमीटर फिरतोच आहे. त्यामुळे अजिबातच ताण वाटला नाही. हळु हळु पिथौरागढ़ जवळ येत गेलं. आणि मेन मार्केटपाशी एका ठिकाणी आलू पराठ्याचा नाश्ता केला. सोबतची मंडळी पिथौरागढ़मध्ये एका नातेवाईकांना भेटायला गेले आहेत. मला त्यांनी तिकडे बोलावलं. त्यामुळे रस्ता शोधत तिकडे निघालो. आणखी काही किलोमीटर चालायला मिळालं!

त्यांचं घर पिथौरागढ़मध्ये दुस-या बाजूला आहे. जुजबी पत्त्यानुसार रस्ता विचारत गेलो. काही जणांनी शॉर्ट कट सांगितला, त्यानुसार गेलो. हा रस्ता म्हणजे शहरामध्ये गल्ली- बोळातून जाणारी पायवाट आहे. काही काही ठिकाणी तर ती डोंगरातून व शेताजवळूनही जातेय. पिथौरागढ़च्या अगदी आतून फिरायला मिळतंय! ही पायवाटही मस्त आहे! इथे जिथे कुठे फिरू तिथे सुंदर नजारे आणि‌ ट्रेक आहेच! त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा एकूण १९ किलोमीटर होऊन गेले. चालण्याचा वेळ ३ तास २२ मिनिटं आहे. थकवा इतकाच वाटतोय की, थंडी वाजत नाहीय! नंतर तिथून परत मार्केटमध्ये येताना एक किलोमीटर चाललो आणि संध्याकाळी सत्गडला पोहचल्यावर तिथलाही छोटा ट्रेक केला. त्यामुळे एकूण दिवसभरात मिळून २१ पेक्षा जास्त किलोमीटर झाले. एक अगदी वेगळ्या प्रकारची हाफ मॅरेथॉनच झाली! दुस-या दिवशीचा माझा प्लॅन ठरवून टाकला. बुंगाछीनावरून कनालीछीनामार्गे सत्गडला आलो होतो, तो रस्ता खूपच आवडला होता. उद्या त्या रस्त्यावरच २५ किलोमीटर तरी फिरेन. पहिले तर विचार केला होता की, बुंगाछीनापर्यंत जाईन आणि येताना जीपने येईन. पण मग वाटलं की, त्यामध्ये जास्त वेळ जाईल, जीप लवकर मिळेल असं नाही आणि पैसेही जातील! म्हणून असा विचार केला की, त्या रस्त्यावर अर्धं अंतर जाईन आणि परत येईन. तो रस्ताही फिरायला मिळेल आणि वेळही वाचेल व पैसेही वाचतील! तोही ट्रेक अतिशय जबरदस्त राहिला. त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बोलेन.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)

(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)

समाजप्रवासलेखअनुभव

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

18 Feb 2022 - 7:40 pm | Nitin Palkar

आधीच्या सर्व लेखांप्रमाणेच सुंदर. सुरेख वर्णन आणि अप्रतिम प्रची.

Nitin Palkar's picture

18 Feb 2022 - 7:43 pm | Nitin Palkar

नकाशा खालील प्रकाश चित्रे स्वतंत्र दिसत नाहीत(एकच कोलाज दिसतोय).

गोरगावलेकर's picture

18 Feb 2022 - 9:21 pm | गोरगावलेकर

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

कॅलक्यूलेटर's picture

19 Feb 2022 - 12:28 pm | कॅलक्यूलेटर

वा मस्तच!!!! अप्रतिम फोटो

मार्गी's picture

21 Feb 2022 - 12:23 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

@ नितीन पालकर जी, तो नकाशा म्हणजे रनिंगच्या strava app वर केलेल्या नोंदीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात ती एंट्री तशी दिसते. त्यामुळे फोटोही तसेच दिसतात. App वर गेलात तर तिथे ती एंट्री तपशीलवर बघता येते. धन्यवाद.