दोन धनगर (उत्तरार्ध)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
23 Nov 2008 - 2:28 pm

दोन धनगर (पुर्वार्ध)

आदल्या दिवशी गावकर्‍यांकडून वाट घोकून घेतली होतीच. दुसर्‍या दिवशी बरीच चाल असल्याने सकाळी सूर्योदयापूर्वीच निघायचा बेत होता. पण जरा डोळा लागला आणि सहा साडेसहाला उगवत्या सूर्याबरोबरच निघालो. "शीतामायच्या आधी कोळुस्करवाडीला ह्यीर हाए" असे कळल्याने अंघोळीसाठी तिथे ब्रेक घ्यायचा ठरवून सरळ वाट पकडली.. वारूगडाचा बालेकिल्ला मागे पडत होता. मागच्या सीताबाईच्या डोंगराला जाणारी गुरांची वाट पकडली.
वाटेत एक मुलगा दप्तर घेऊन चढत होता. त्याला हटकलं "शाळेत जातोस का? "
"व्हय"
"कितवीत? "
"सहावी"
"काय रे! शाळा बुडवून इथे कुठे भटकतोयस? "
तो हसला.. "आवो.. हितं वरच शाळा हाय! "
मी गपगार!
"खाली वाड्यामधी चवथीपातूर शाळा हाएत.. फ़ुडं शिकायला हित डोंगरावरच आटवी पर्यंत शाळा हाय.. नंतर मग गिरवी नायतर फलटण"
"मग रोज तुम्ही चढून जाता? "
"हा मग! " असं म्हणून ते पोरगं पळालं
"नको बाबा! ते कॉलेज किती लांब आहे.. ट्रेन मग बस... "वगैरे कारणे देणाऱ्या आम्हाला रोज जर डोंगरावर जावे लागले असते तेही चढत तर शिकलो असतो की नाही देव जाणे

कोळुस्कर वाडी आली. तिथे भर चौकात असलेल्या ह्यीरीवर अंघोळी उरकल्या... विहिरीवर.. उघड्यावर.. माळरानाची हवा खात केलेल्या अंघोळीची मजाच वेगळी...; )(माझ्या मित्राच्या मते तर ट्रेकच्यावेळी दरीत एखाद्या झुडुपामागे बसून येतो ना तेव्हा खालून येणार्‍या गार वार्‍यासारखा आनंद विरळाच ; ) मी त्याच्याशी सहमत आहे ) पुढे अचानक गर्द झाडी लागली.. इतका वेळ खुरटी झुडपे, हिरवळीसारखा थर असणार्‍या प्रदेशात अशी डोंगरमाथ्यावरची हिरवाई मन प्रसन्न करून गेली.

हिच ती सीताबाई. इथे तिचं मंदिर आहे. इथे त्या परिसराचं आणि रामायणाचं किती घनिष्ट नातं आहे ते कळलं. सीतेला रामाने सोडल्यावर ती जिथे राहिली होती तो हा डोंगर.. सीताबाईचा डोंगर. आणि वारूगड म्हणजे ती जागा जिथे लव-कुशाने यज्ञाचा घोडा (वारू) अडवला होता. हे कळल्यावर त्या जागेविषयी आदर दुणावला. जरी या लोककथांना इतिहास पुष्टी देतो की नाही ठाऊक; तरी मला लोककथा-समजुती आवडतात. बाकी हि जागा अगदी सुंदर.. एखादे उत्तम गिरीस्थळ. थंडगार हवा, उत्तम वनराई, शांततेचा हवाहवासा भंग करणारा वार्‍याचा आवाज, त्या वनराईत लपलेलं सीतेचं मंदिर.. वा! आठवणीनेही कसा उत्साह दुणावला. तिथे दोन पोरं चिंचोके वाटून घेत होती. त्यांना हाक मारली तर ते पळून गेले..

असो. आता थोडं पुढे गेलो आणि सीताबाईच्या डोंगराचा निरोप घेऊन खाली उतरलो.. आता शेताडीतून ७-८ मैल तुडवल्यावर दुपारी 'थातवडे' नावाच्या संतोषगडाच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. इथून संतोषगड वारूगडापेक्षा उंच वाटला.. मात्र खालूनच जवळजवळ गडाच्या अर्ध्यापर्यंत जाणारी नीट वाट दिसत होती. माझा हिरमोड झाला. कारण जरी मला नांदते गड आवडत असले तरी मुंबईच्या ज्या गर्दीपासून दूर म्हणून यावं तिथे पुन्हा गर्दीच असेल तर बोअर होतं. गडाजवळ गेल्यावर तर त्या वाटेवरून एखाद- दोन घोळके वर जाताना दिसले. आणि पायथ्याशी पोचल्यावर तर अर्ध्यावर असणारी एक टपरी, तिथे असणारा लाऊडस्पीकर वगैरेचा आवाज येत होता. इथूनच परत फिरावं असं मनात आलं.. पण आलोच आहोत तर माथा गाठून लगेच उतरूया असे ठरवले.

अर्धी वाट चढेपर्यंत वाटसरूंकडून कळलं होतं की मधली टपरी म्हणजे कुठलासा मठ आहे आणि आज तिथे श्रावणातली कसलीशी पुजा आहे. आम्ही पूजेप्रीत्यर्थ लागलेली "चोली के पिछे क्या है?.. ", "काटा लगा.. ", " माझा नवीन पोपट हा.... " अशी विविध भजने ऐकत मध्यावर जाऊन पोचलो. त्या मठात शिरायला फारच गर्दी होती.. आम्ही वाट बदलली आणि एका पडक्या बुरजावरून माथा गाठावा असं ठरवलं.. त्या पडक्या बुरुजाशी पोचलो मात्र पुढे जायला वाट मिळेना.. आता पर्यंतच्या ट्रेकच्या किंचित अनुभवामुळे बुरूज चढता आला असता.. मात्र त्याच्या वर आणखी किती चढण आहे अंदाज येत नव्हता..
आता काय करावे? त्या म्युझिकल मठाच्या मागून एक रस्ता आहे असे वाचले होते.. पण त्या मठाकडे फिरकण्याचा धीर होईना.. इतक्यात मागच्या दरीतून एक तरुण अवतरला.. डांबराचा रंग उसना घेतलेला, टपोर डोळ्यांचा, धिप्पाड, केसांची झुलपं वाढवलेला, काहीश्या मळक्या शर्ट-प्यँटच्या आधुनिक वेषातला, कमरेला कोयता, हातात काठी, कपाळाला बुक्का (असावा.. कारण बुक्का आणि त्याच्या रंगात फारसा फरक नव्हता) त्या दरीतून कसा काय वर आला कुणास ठाऊक.. वर आला नि हसला.. आम्ही तर चकीत होतो.. मागची दरी पाहून इथून कोणी हाईक-कीट शिवाय चढू शकेलसं वाटत नव्हतं.
हात झटकत बोलला "रामराम.. म्या कवापासून हाका मारतूया खालून.. चिचेच्या आंगानं म्हून... "
"हो.. का..? काही ऐकूच नाही आलं.. "
"मठाकडून वाट हाए ना.. "
"नको तिथून नको.. केवढा धिंगाणा आहे.. आत शिरायला जागा देखील नाही"
"हा! हरवर्साचं हाय... त्येंचं जाऊ द्या.. चला मी वाट दाखवतो.. "
गेलो त्याच्या मागून.. तो गडाच्या छातीवरून आडवा गेला आणि एका चिंचेच्या झाडाच्या आडून झपाझप वर चढू लागला.. आमचे पाय सरकत होते.. त्याने बूट काढायला लावले.. त्याच्या मागून "चारही पाय" वापरून माकडांसारखं चढताना मजा येत होती आणि एकीकडे फाटतही होती पण शेवटी अंगावरचे कोणतेही कापड प्रत्यक्षात न फाटता वर कसे पोचलो आम्हालाच ठाऊक

त्या आमच्या "ब्लॅक हिरोने" एक विशिष्ट शीळ वाजवली आणि "आलूच म्या" असं म्हणून दरीत लुप्त झाला... इथे माथ्यावर मात्र मी आणि माझा मित्र दोघंच.. सुसाट वारा सुटला होता. आम्ही माथा फिरून घेऊ मग जेवून खाली उतरू असं ठरवलं... जरा पुढे गेल्यावर एक मोठा खड्डा होता आणि आतून झाड वर आलं होतं.. जरा जवळ गेल्यावर कळलं की ती एक खोल विहीर आहे.. आणि आत जायला मस्त पायऱ्या आहेत.. आम्ही विहिरीत उतरलो.. दोघांनी भरपूर फोटो काढले.. पुन्हा वर येऊन घरून घेतलेले ठेपले, काकड्या वगैरे काढले... ठेपले संपवले इतक्यात आम्ही ज्या तटबंदीवर बसलो होतो तिथून बाजुने एक काठी वर आली त्यापाठोपाठ मघासचा ब्लॅक हिरो. आम्हा एकदा चढताना फेस आला होता आणि हा घरचे जिने चढावेत इतक्या सहजतेने गड चढत-उतरत होता..

मात्र आता येताना हा एकटा नव्हता त्याच्याबरोबर त्याच्या बर्‍याच जणी आल्या होत्या.. त्याच्या बर्‍याच शेळ्या होऽऽ; )पुन्हा एकदा बाजूला येऊन बसला
"काकडी खाणार का? "
"हा खाऊ की.. " त्याला काकडी दिली... मीठ दिलं..
पुन्हा तो बोलू लागला
"मगाशी तुम्हा पायलं.. आधी वाटलं वर चढताय का पडताय? इतका ओरडतोय पन तुमचं लक्ष कुठाय म्हून मग म्याच आलो वर"
"आम्हाला ओरडणं ऐकू येत नव्हतं ना राव"
"असं कसं?.. मला तर तुमचं बोलणं आयकू येत व्हतं.. "
आम्ही पुन्हा चाट.. याला अर्ध्या डोंगरावरचं बोलणं खाली ऐकू येतं याचं अप्रूप वाटत असताना तो पुन्हा बोलला
"तो खाली शेतात मानूस दिसतोय? तो बैलांना काय सांगतोय ते ऐकू येतंय का? "
मी उत्तरच दिलं नाही.. "तुला येतंय ऐकू? "
"व्हय. "
आता मात्र त्याचे पाय पकडायचे बाकी होते. त्याच्या दोन काकड्या खाऊन केव्हाच संपल्या होत्या त्याला अजून दोन दिल्या. आमच्या नाजूक मेंदूला अजून धक्के पचणार नाहीत तेव्हा विषय बदलावा म्हणून विचारलं
"इथे कधीच पाऊस नसतो का यंदाच? "
"यंदाच.. दरवेळी या वक्ताला दूरवर एकदम हिरवं हिरवं असतं.. काय मस्त दिसतं!! "
दोन मिनिट तो दृश्य डोळ्यासमोर तरळल्या सारखा बसून होता मग बोलू लागला
"तुमी इथे कशापायी? "
"असंच.. तिथे मुंबईत धूर पिऊन कंटाळा आता जरा हवा कशी लागते ते बघूया म्हटलं! "
"तुमी असे नेहमी येता? "
"नेहमी नाही रे!.. सुटती मिळेल तशी.. दोन दिवसापेक्षा मोठ्या सुट्टीला मात्र हमखास बाहेर असतो. "
"तुमाला कोनी सांगितलं या गडाबद्दल"
"अरे पुस्तकात असतं हे बघ.. " त्याला डोंगरयात्रा दाखवलं.. त्यानं संतोषगडाबद्दलचं पटकन वाचून काढलं.. वा एकदम नकाशा बी हाए अशी पावत तर दिलीच वर नकाशात दाखवलेले महिपतगड वगैरे कुठले ते दाखवले..
"हे असं पुस्तक असलं की किती बरं.. हवं तिथे भटकता येईल ना? "
त्यालाच जाणवलं.. त्याला होकाराची अपेक्षा नसावी तो बोलतच होता.. "मला पण असं भटकायला आवडतं.. म्या पार वणी, शिंगणापूर, सोलापूर सगळीकडे जाऊन आलो हाय.. एकदा तर पुण्याला बी गेल्तो.. मला न्हाई आवडलं पुनं.. मोटारी लई हाएत.. पन असं पुस्तक असलं ना तर किती बरं.. "
"तुला आवडतात पुस्तक? "
"मंग म्या लई वाचतो.. पार फलटणला जाऊन आणतो नि हितं गडावर येऊन वाचतो.. माझ्या शेळ्यांना वाचून दाखवतो.. मला एकदम "अल्केमिस्ट" मधला शेळ्यांशी बोलणारा धनगर आठवला..
"लग्न झालंय का? "
"व्हयं.. गेल्या वर्सीच"
"पोरं? " असं विचारल्यावर चक्क लाजला.. असला मर्द गडी असा लाजलेला बघून गंमत वाटली..
"मुंबईला कधी राहावंसं वाटतं का? "
"न्हाई.. हितं बरंय.. आपली माणसं.. आपले गड.. घरचा म्हातारा म्हणतो आपल्याला शिवबाने हे गड राखायला दिले आहेत.. तवा ते टाकं साफ ठेवणं, बुरुजावर पोळं होऊ नये त्ये पाहणं असं सगळं कोन करणार?.. आमच्यासारखे धनगर उरले नाहीत तवा त्या शिंव्वगडाची कशी जत्रा झाली हाए.. हितं नगं व्हायला तसं.. "

काकड्या संपल्या तसा कुठलंसं मराठी चित्रपट गीत गात "चला येतो म्या" म्हणून निघून गेला

आम्हीही वाट काढत खाली आलो.. यावेळच्या ट्रीपमधले हे दोन धनगर कायमचे डोक्यात घर करून गेले.. तसं तर या दोघांमध्ये ना वय सारखं... ना अनुभव.. ना विचारसरणी. तरीही दोघंही आनंदी वाटले.. एक पिढी अजूनही गडावरचे शिवराय पाहत आहे. त्यांच आणि हल्लीच्या वेगाने बदलत्या जगाचं नातं नाहि म्हणावं तर त्यांना 'पीकर', मोबैल, प्याट्रोलचा वाढता भाव याबद्दल माहित आहे. मुखावर कृष्णाचं नाव असलं तरी सत्संगाला लागल्याने आनंद मिळवत आहेत असं म्हणवत नाहि. सार्‍या अप्रिय गोष्टींना गडावरून भिरकावून मस्तपणे जगत आहेत. दुसरीकडे नव्या पिढीला शिक्षण मिळालं आहे, वाचनाने आकांक्षांना धुमारे फुटू पाहताहेत तरी अजून(तरी) ही पिढी गडाविषयी आपल्या प्रेमाला जागताहेत. अव्याहत जीवनामागे पळणार्‍या जगापेक्षा दूर असूनहि (खरंतर असल्याने) जीवनाला हवे तसे पळवताहेत. वाचनाची आवड असणारा, कधी वर-कधी खाली असा गडाच्या अंगाखांद्यावर खेळणारा, शेळ्यांशी मनसोक्त गप्पा मारणारा, या राकट वातावरणात राहूनही अजूनही लाजू शकणारा हा असा दुसरा धनगरही आमची सहल संस्मरणीय करून गेला यात शंका नाही.

(समाप्त)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Nov 2008 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋष्या... हे दोन्ही धनगर परत भेटले कधी तुला तर माझा दंडवत सांग रे बाबा!!! बरेच वेळा असे अनपेक्षितपणे खूप वेगळे लोक भेटतात, आणि आपल्यालाच समृद्ध करून जातात. गड किल्ल्यांचं सार्वजनिक पब्स मधे रुपांतर करणारे किंवा त्यांचं राजकारण करणार्‍यांपेक्षा असे साधे सरळ लोक बरे. माझ्या माहितीतला एक धनगर, त्याच्या घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा अशीच जनावरांशी किंवा शेतातल्या रोपांशी गप्पा करताना बघितली आहेत.

अवांतरः गार वारा भरारा.... तुझ्या मित्राच्या निरीक्षणाशी १००% सहमत. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय हा तर ठरलेला डायलॉग... ;)

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

23 Nov 2008 - 3:15 pm | स्वाती दिनेश

डोंगरावरची शाळा,म्युझिकल मठ आणि भजनं,घरचे जिने चढावे अशा सहजतेने डोंगर चढणारा दुसरा धनगर हिरो.. सगळंच खूप आवडलं..सुंदर लिहिले आहेस ऋषिकेश..
त्या वाचायला आवडणार्‍या हिरोला डोंगरयात्रा भेट दिलस की नाही?:)
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2008 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असंच म्हणते.
मलाही स्वातीताईसारखाच प्रश्न पडलाय.

ऋषिकेश's picture

25 Nov 2008 - 10:27 am | ऋषिकेश

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
पण मी पुस्तक देऊ केले नाहि.. कारण ते माझे गाईड आहे.. मला साधारण दर महिन्याआड ते लागते.. आणि त्याला त्या पुस्तकाचा तसा फायदा काहिच नव्हता.. वगैरे वगैरे...

अर्थात हे नंतरचे विचार झाले.. जिंक्स असा की मी पुस्तक देऊ केले नाहि :(

-(कुचका) ऋषिकेश

नंदन's picture

23 Nov 2008 - 3:47 pm | नंदन

छान लिहिलं आहेस ऋषिकेश, शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

23 Nov 2008 - 7:38 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

उर्मिला००'s picture

23 Nov 2008 - 4:29 pm | उर्मिला००

बेश्ट झालया लिखान.लय भारी लिव्हलत वो.

कपिल काळे's picture

23 Nov 2008 - 8:00 pm | कपिल काळे

--------------------------------------

ऋषिकेश's picture

23 Nov 2008 - 10:58 pm | ऋषिकेश

?????????

-( :/ ) ऋषिकेश

वर्षा's picture

23 Nov 2008 - 11:21 pm | वर्षा

पहिल्या धनगरापेक्षा हा धनगर जास्त भावला.
उत्तम लेखनशैली!

यशोधरा's picture

24 Nov 2008 - 9:52 am | यशोधरा

ऋषिकेश, मस्तच लिहिलं आहेस रे!
दोन्ही धनगर एकदम आवडले!

विसोबा खेचर's picture

24 Nov 2008 - 10:38 am | विसोबा खेचर

वाचनाची आवड असणारा, कधी वर-कधी खाली असा गडाच्या अंगाखांद्यावर खेळणारा, शेळ्यांशी मनसोक्त गप्पा मारणारा, या राकट वातावरणात राहूनही अजूनही लाजू शकणारा हा असा दुसरा धनगरही आमची सहल संस्मरणीय करून गेला यात शंका नाही.

वा ऋष्या,

अतिशय सुरेख लिहिलं आहेस... जियो..!

तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

24 Nov 2008 - 11:35 am | अभिरत भिरभि-या

मस्तं हायती तुमची धनगरे.
भेटुन बर वाटले

>> आम्ही विहिरीत उतरलो.. दोघांनी भरपूर फोटो काढले..

आमालाबी दावा की फोटु येक डाव :)

विसुनाना's picture

24 Nov 2008 - 11:35 am | विसुनाना

दोन्ही भाग उत्कृष्ट.
शाळकरी पोर, म्युझिकल मठ, चिंच, सरपटणे, विहीर, इथला धनगर सगळे मनात छान रंगले.
कुकुडकुंभा (भारद्वाज) किंवा कोकीळ यांची साद आपोआप जोडीला आली.

फोटोंबद्दलचं तुमचं मत बरोबर आहे. वाचनातून डोळ्यासमोर उभे राहणारे दृष्य मेंदूत ठसते.

अनिल हटेला's picture

24 Nov 2008 - 1:07 pm | अनिल हटेला

>> आम्ही विहिरीत उतरलो.. दोघांनी भरपूर फोटो काढले..

कुठायेत ?

लेख बाकी मस्तच !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मृदुला's picture

25 Nov 2008 - 4:50 am | मृदुला

पुस्तकं वाचणारा धनगर आवडला.
उत्तम लेखन.

सहज's picture

25 Nov 2008 - 6:54 am | सहज

ऋषिकेश हा भाग देखील आवडला.

स्वातीताई म्हणाली तसे पुढच्या वेळीस ट्रेकला जाताना एक पुस्तक बरोबर घे.

ऋषिकेश's picture

25 Nov 2008 - 10:29 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे, आणि आवर्जून प्रतिक्रीया देणार्‍यांचे अनेक आभार!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

राघव's picture

25 Nov 2008 - 12:45 pm | राघव

बाकी येचं थ्येच्याशी कंपारिझन कराचीच कशापायी म्हनतू म्या?? मपल्याला दोनीबी धनगर आवडलान्!
ऋषिशेठ, अस्साच लिवत रावा! आक्षी गडावर फिरून आल्यावानी वाटतंया! :)
फोटू नाय टाकलंसा थेचं कारन पटलं, पन तरीबी थे दोघांचं फोटू चिकटवलं हिथं तरी बी फुरेसं हाये आमास्नी!! बगा जमलं तर लावा हिथं :)
(मर्‍हाटमोळा)मुमुक्षु

प्रदीप's picture

7 Jan 2009 - 3:49 pm | प्रदीप

आणि एकदम प्रत्ययदर्शी वर्णन. असेच अजून येवू दे.