दोन धनगर (पुर्वार्ध)

Primary tabs

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
16 Nov 2008 - 10:54 pm

बर्‍याच दिवसांनी ३ दिवस सुट्टी लागून आली होती. १५ ऑगस्ट आणि शनिवार-रविवार. अशी मोठी सुट्टी मला तरी मुंबईत राहून घालवायची नव्हती. शिवाय पावसाळा होता. पण यंदा दरवर्षी प्रमाणे एखादा, धबधबा, कोंकण/पुणे प्रांतातला गड करायची का कोण जाणे इच्छा होईना. एका नव्या किल्ल्यावर जायचे मनात होते. तेव्हा एक असाच माझ्यासारखा "भटक्या" जमातीतील मित्र आणि मी अश्या दोघांनीच यंदा सातारा भागात जायचं ठरवलं.. आमचं मायबाप गाईड "डोंगरयात्रा" (-आनंद पाळंदे) काढलं.. आणि वारूगड-संतोषगड असे दोन गड दोन दिवसात करायचे ठरवलं.. लगेच फलटणपर्यतचं बुकींग करून निघालो देखील..

रात्री निघालेली भरगच्च यस्टी.. लोकं फक्त खिडक्यांवर लटकायची बाकी होती.. आपण रिझर्वेशन केलंय हे किती बरं असं म्हणेपर्यंत आमच्या पायाशी एक कुटुंब विसावलं देखील होतं त्यात त्यांच्याकडे कसलंस पोतं होतं ते पायाशी आल्याने मी एकदम 'आखडू' झालो होतो ;).. अर्धवट जाग.. अर्धवट झोप.. पायाजवळच्या पोत्यावर, बाजूला, मागे असे माझे चाललेले आसनप्रकार, कुटूंबप्रमुखाचं दर तासाला 'तमाखू' मळणं... शेंबड्या पोरांची भररात्री चाललेली भांडणं या सगळ्या साग्रसंगीतासकट यष्टीनं पुणं गाठलं... पुण्याला मंडळींची पोटं भरल्यावर मात्र माझ्यासकट सारी मंडळी पेंगू लागली.. यस्टीच्या खिळखिळ्या काचा आणि मध्येच एखाद्याचं पचाककन थुंकणं सोडल्यास फारसे आवाज नव्हते. जसा डोळा लागला असं वाटलं असतानाच, पूर्वेला फटफटू लागलं आणि अचानक फलटण आलं. सार्वजनिक "सुलभ" सोयीचे उपकार पदरात पाडून, यस्टीच्या ठेवणीतील कळकट्ट क्यांटिनात गडद रंगाचा गरम उसाचारस चहा या नावाखाली प्यायलो. तोंड गोड-मिचकुट्ट झालं असलं तरी मस्त तरतरी आली.. गिरवीची यस्टी पकडायचं ठरवलं होतं, पण तिथून ३-४ मैलावर असणार्‍या वारूगडाच्या पायथ्याला असणार्‍या जाधववाडी पर्यंत दिवसात एक यस्टी जाते हे कळलं आणि रस्ता तिथे यस्टी अश्या घोषवाक्याच्या राज्य परिवहन मंडळाचे पुन्हा दरवेळप्रमाणे मनापासून आभार मानले.

सूर्याने कोवळी किरणे टाकेपर्यंत "जाधववाडीऽऽ!!! " असं मास्तरांनी ओरडलं आणि आम्हा दोघांना एका डोंगराखाली सोडून बस निघून गेली. इनमिन १५-२० घरांची ती वाडी आणि लगेच डोंगर सुरू. "गड" या विशेषणाला न शोभणारा ठेंगणासा डोंगर पुढे उभा होता. वाट अशी नाहीच. तिथे मेंढरं चारणार्‍या पोराने सांगितलं "तो फड्या दिसतोय ना थितपातर कसही जा.. नंतर फकस्त घायपाताच्या अंगानं दरवाज्याला जा.. नायतर चार्‍याला पोचाल".. पावसाळी भटकंती म्हटल्यावर डोळ्यापुढे जी हिरवीकंच दरी येते त्याला उभा छेद या गडानं दिला होता. वातावरण ढगाळ होतं पण ढग खार-सांताक्रुजवरून जाणार्‍या विरार फास्ट लोकलसारखे या मधल्या ठेसनांकडे ढुंकूनही न पाहत आपल्याच तंद्रीत पुढे पळत होते आणि गड हिरवा आहे की काय इतकी शंका यावी इतपतच हिरवा होता.

हा हा म्हणता, तासा-सव्वा तासात गडाच्या दारावर पोचलो देखील. जसजसं जवळ जात होतो तसतशी तटबंदी नजरेत भरत होती. इतकी एकसंध टिकलेली तटबंदी विसापूरनंतर बर्‍याच दिवसांनी बघत होतो. हातात जालावरून मिळवलेल्या छापील माहितीचा कागद होता. त्यानुसार एकेक खुणा दिसू लागल्या होत्या. आम्ही माचीवर पोहोचलो समोरच बालेकिल्ला, सदरेची इमारत, आणि तटबंदीवर एखाद्या तपस्वीसारखी दाढी सोडून बसलेला वड दिसला आणि किल्ला एकदम आवडून गेला. जरा माचीवरून पुढे गेलो तो एक अगदी आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धारीत मंदिर दिसू लागले.. जसजसे जवळ जाऊ लागलो तसतसे टाळ, चिपळ्यांचे आवाज कानावर पडले आणि आम्ही प्रचंड खूश झालो. गडावर जाऊन एकट्याने रात्र काढण्यात एक वेगळी मजा असते तशीच वेगळी मजा नांदत्या गडावर रात्र काढण्यात असते. त्यामुळे अनपेक्षितरीत्या नांदत्या गडावर येऊन खूप आनंद झाला. मंदिराजवळ आलो.. आत भजन रंगात आलं होतं.. १२-१५ मुंडासी असावीत.. आनंदाने डुलणारी ती रंगेबरंगी मुंडासी, एखादी गांधीटोपी फार मनोहारी दिसत होती. आम्ही बाहेरच पारावर बसलो. खंडोबाची भजनं चालू असल्याचं कळत होतं. शब्द आता लक्षात नाहीत. पण एकूणच माहोल रंगून गेला होता. समोरच्या हापशावर जाऊन मस्त फ्रेश झालो आणि पारावर भजन ऐकत नसलो होतो. इतक्यात झाडामागून आवाज आला
"पावनं.. कुणीकडचं?! " एक सुरकुतलेला आवाज कानावर आला.
"मुंबई!! "
"तसं नव्हं.. "
शब्दाशब्दागणिक कोणीतरी चालत येतंय हे लक्षात येत होतं.. काठीचा आणि त्याबरोबर घुंगराचा आवाज टाळ-ढोलकीच्या आवाजातही वेगळा जाणवत होता. आणि ते आजोबा संथपणे पुढे आले
"तसं नव्हं.... मुळचं कुठलं? "
"आम्ही मुंबईचेच.. जन्मापासून मुंबईच"
"बरं-बरं"
काय मस्त म्हातारा होता. डोक्याला मस्त धनगरासारखं पागोटं, धोतर, हातात घुंगराची काठी, चेहेऱ्यावर भरपूर सुरकुत्यांचं जाळं, पांढरी धोप दाढी, खांद्यावर घोंगडं आणि चेहर्‍यावर समाधानी हास्य अश्या वेषातला तो म्हातारा आमच्या बाजूला येऊन बसला.
"काय मग कसा काय वाटला गड? " त्यांना आमच्या उत्तराची अपेक्षाच नव्हती ते पुढे बोलतच होते.. "म्हणजे तुमाला आवडेलच.. पण मला पण आवडतो.. ल्हान असल्यापासून इथेच गडावर आसतो.. "
आजोबा माहिती देत होते... "आज हितं सप्ताव चालू हाये.. खंडोबाचा.. दर शावनात असत्यो.. "
या मंदिरातील भजनाचं कारण इथे श्रावण सप्ताह चालू आहे असे कळलंच पण त्याच बरोबर गडावरच्या पठारावर सात वाड्या आहेत, दर वाडीला एक दिवस दिला असतो, आज घोडेवाडीचा दिवस आहे वगैरे सगळी माहिती न मागताच मिळाली.
"आज रात्री इथंच मुक्कामाला आहोत.. उद्या संतोषगडाला जाऊ.. सीताबाईचा डोंगर कुठला हो? "
"हा काय!.." आमच्या पाठी वारूगडाचं मोठं भावंड वाटावं असा तो डोंगर उभारला होता.. "हितं चडा.. मागल्या अंगाला कोळूस्करवाडी.. थितून माळरानातून गेलात की आली शीताबाय"
"हं.. तिथून संतोषगडावर जाता येतं ना? "
"हाव. येतं ना! पठारावरून फुडं गेल्यावर शीतामाय दिसेनाशी झाली की उतरायचं आणि मधल्या शेताडीतून फुडं ग्येलात की आला संतोष"
हे 'गडकरी' वेगवेगळ्या डोंगरांना, गडांना शीताबाय, संतोष असे अगदी एकेरीत बोलवत होते. का नाही बोलावणार, त्यांचे जन्माजन्मांचे मित्रच ते.
"भजन दुपारपर्यंत का? "
"न्हाई हो संपलं आता.. " इतकं म्हणे पर्यंत भजन फारच रंगात आलं.. इथे म्हातारा डुलू लागला.. मंडळी बेभान झाली,, केवळ टाळ, चिपळ्या आणि ढोलकीवर अख्खा समुदाय डुलत-नाचत होता.. पद्धतशीरपणे भजनं झाल्यावर गुलाल-बुक्क्याने भरलेली आणि भजनानं भारलेली माणसं त्या देवळातून बाहेर येऊ लागली. त्यातल्या मोजक्या टोपीधारी लोकांपैकी एक समोर आला. " पुन्हा तुमी कुठचे, गडावर कसे" वगैरे प्रश्नांची उजळणी झाली. "जेवणाची चिंता करू नका आज इथे भाकरतुकडा असेल तो आमच्या सोबत घ्या दुपारच्याला" असं आमंत्रणही मिळालं.

आता गड बघून यावा म्हणून निघालो..
"वर बालेकिल्ल्यावर कुठून जाता येईल? "
"चला मी दावतो" आजोबा एका पायावर तयार! आम्ही त्यांच्या बरोबर निघालो. इतक्या रंजक पद्धतीने कुठलाही गड मी बघितलेला नाही. आजोबांचा उत्साह थक्क करून सोडणारा होता..
"आमी ल्हानपना पासून हितं गडावरच.. शाला शिकलोच न्हाई.. इतं गुरांबरोबरच ऱ्हायचं, गवळणी गायच्या"
"गवळण? "
" हा मंग.. ऐकायची हाये काय ऐका..! "
असं म्हणून एकदम खड्या आवाजात कृष्णाची एक गवळण ऐकवली.. त्यात कृष्ण गोपिकांचे कपडे लपवतो. त्या नाही म्हणतात. मग कृष्ण एक युक्ती करतो म्हणतो तुम्ही जर मला दोन्ही हात जोडून नमस्कार केलात तर कपडे मिळतील. त्या गवळणी लाजेस्तव छातीभोवती कवटाळलेले हात सोडून नमन करतात वगैरे.. ... म्हातारा लबाड होता ;)
बाकी, म्हातार्‍याचा आवाज काय भारी होता... वार्‍याची शीळ, काठीवरच्या घुंगरांनी धरलेला ठेका आणि गवळण काय, पोवाडा काय.. आम्ही म्हणू ती फर्माइश पूर्ण होत होता. आजोबा तर गिरकी काय घ्यायचे नाचायचे काय.. एकदम भारी!! तोपर्यंत आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो.. इतका वेळ गाणारा म्हातारा इथे शांत झाला. मनापासून जमिनीवर डोकं टेकला. "थितं खाली खंडोबाचा गदुड हाये.. पन हितं आमचा शिवबा आजून जिवंत हाये आणि तोच आमचा द्येव... तिथं मी देवळाभायेर बसतो पण हितं खरा द्येव.. माझा शिवबा... मला समोर दिसतो. त्येच्यासमोर डोकं टेकावच लागतं. त्यानंच तर आम्हाना हक्काचं घर दिलं हाय -म्हंजी ह्ये गड दिले हाएत " म्हातारा एका खाली गप्प बसून राहिला. आम्ही एकदम भारावलो होतो. गदगदलो होतो. मगासपासून माचीवर वाहणारा अवखळ वारा इथे स्तब्ध होता. आम्ही डोळे मिटून एका बुरुजावर बसून राहिलो.. कितीतरी वेळा त्या तंद्रीत असेच बसून होतो. अचानक दूरवरून "पावनंऽ" हाळी आली म्हणून पुन्हा खाली निघालो.. ती पावन शिवभूमी भारतीय स्वातंत्र्यदिनी मन भरून अनुभवली याचा आनंद झाला. शरीरावरचा एकेक रोमांच पुलकित झाला होता.

आम्ही खाली आलो.. आयुष्यात आतापर्यंत खाल्लेली सगळ्यात बेष्ट बाजरीची भाकरी वाट पाहत होती. इतकी भन्नाट भाकरी असल्यावर तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता मन लावून खात होतो. चुलीवरच्या बाईने आत परस्पर "भाकर आवडली गं त्यान्ला" असं कळवून टाकलं आणि आम्हाला सांगू लागली "ही पाच महिन्यांनी बाजरी.. तुमी मुंमईत खाता ती हायबीड बाजरी सा आठवड्याची" आजपर्यंत हायब्रीड बियाणांना मराठीत संकरित म्हणतात असं उगाच वाटायचं. हायबीड शब्द आवडला :) मस्त जेवण झाल्यावर बाहेर मंडळी पारावर बसलीच होती. मग पुन्हा एकदा माझा उद्याचा प्लॅन, जायच्या वाटा वगैरेची उजळणी करून घेतली. इतक्यात मित्राने खिशातून ट्रेकक्षितीजचं प्रिंट काढलं आणि त्यात जे टाकं लिहिलं आहे त्याबद्दल विचारू लागला. झालं! गावकर्‍यांना आपल्याबद्दल काय लिहिलं आहे हे ऐकायचं होतं.. एकदा त्या कागदाचं जाहीर वाचन झालं. पुढे त्यादिवशी जवळजवळ ६-७ वेळा तो कागद वेगवेगळ्या लोकांसमोर वाचण्यात आला :)

संध्याकाळी एका गुराखी पोराबरोबर दरीत फिरून आलो. रात्र झाली पुन्हा आजोबा आले. इतका वेळ कुठे होते कुणास ठाऊक. पुन्हा गप्पा रंगल्या. म्हातारा रंगेल होता
"माजी ४ लग्न झाली हायेत" त्याचे पहिलाच बॉल असा टाकला की आम्ही फलंदाज भांबावलो... "पन आता चारही म्येल्या.. आमी बायांच्या लई खोड्या काडायचो"
म्हातार्‍याने चक्क डोळ मारला.. आम्ही नुसतेच हसलो :)
"तसा म्या सगळ्या वाड्यात एकदम हुशार! लोक निवाड्याला यायचे.... " आजोबा पुन्हा भूतकाळाच्या दुनियेत शिरले होते.. समोरच्या जगाकडे पुन्हा दुर्लक्ष करून स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते "एकदा जाधववाडीचे लोक आल्येले.. त्यांच्याकडं एका बाईला म्हणं कुत्रं झालं"
"कुत्रं झालं म्हणजे? " माझ्या मित्राचा बाळबोध प्रश्न
"म्हंजी तिला कुत्रं निपजलं.. सारं गाव गोळा झालं.. तिच्या मुलाच्या नावावर गावच्या देवळाची जमीन होणार होती.. ती म्हणे या कुत्र्याच्या नावावर करा"
"लोक म्हनत होते.. इतके दीस ती बाई वांझोटी.. आजच कसं तिला कुत्रं झालं?.. मंग लोकांनी मला बोलिवलं.. म्या हुशार! ".. इथे ते उगाच जरा थांबले.. आमचे उत्सुक चेहरे पाहिल्यावर पुन्हा आपल्या दुनियेत गेले
"तही बाय लई भरलेली.. तिला म्हन्लं, जर तुला कुत्रं झालं तर छातीवर कुत्र्याचे ओरखडे आसतील ना ते दाखव! हा हा हा!!! "
आजोबा स्वतःच्याच हुशारीवर खूश होते..
"ओह! सो! चीप" वगैरे गळा काढणार्‍या, बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे वगैरे भाषणे ठोकणार्‍या संस्थांपासून (सुदैवाने) दूर असलेला हा म्हातारा "आहे तसं" वागणं मोकळेपणाने सांगत होता.. अचानक मला विचारलं
"तुझं लगीन झालं हाय का? "
"म्हटलं नाही"
"कर कर.. लई मौज आस्ते.. या नव्वद वर्षाच्या म्हातार्‍याच ऐक .. मस्त पीकर लावून लगीन कर"
मला हा मिश्किल म्हातारा फारच आवडला.. त्याचं वय ऐकून उडालोच.. नव्वद!!!!!!.. या वयात शहरात वार्‍याऐवजी धूर पिणार्‍या आमचं शरीर कसं असेल कोण जाणे.. असे नाचू नक्कीच शकणार नाहि (बाकी पीकर = लाऊडस्पीकर ही भाषाशुद्धीवाल्यांना मिळालेली दुसरी चपराक नोंदवून घ्यायला हरकत नाहि ;) )

रात्र खूप झाली चंद्र डोक्यावर आला होता. म्हातार्‍याने घोंगडं अंथरलं आम्हीही स्लिपिंग बॅग काढल्या.. अचानक काय डोक्यात आलं कोण जाणे म्हातारा विचारतो "द्येवाला जवळचं कोण? आमी हितले का तुमी शहरातले? " माझ्या मनात जराही संदेह नव्हता "तुम्हीच.. देवाला, खूप जवळचे.. आमच्यापेक्षा कितीतरी जवळ" म्हातारा खूश..!!! कुठलीशी गवळण गुणगुणत झोपी गेला..

खरंतर त्याच्या ह्या आनंदी असण्याचं कारण म्हटलं तर कळत होतं म्हटलं तर शोधत होतो. खरंतर म्हातार्‍याचा मुलगा मुंबईत असतो. गेल्या ३० वर्षांत तोंड दाखवलेलं नाही. पण म्हातार्‍याला त्याचं काही नाही. डोंगरावरचा निर्विष वारा पिऊन तो मजेत जगतो आहे.. गवळणी गातो आहे, पोवाडे म्हणतो आहे, शिवरायांना बघतो आहे.. आम्ही शहरातली माणसं त्या आनंदाचे दोन थेंब वेचू शकलो यातच समाधान मानत होतो... सकाळी म्हातार्‍याच्या मनापासून पाया पडलो.. त्याच्यासोबत काढलेला निर्भेळ निर्मळ सोनेरी दिवस मनाच्या कुपीत बंद झाला.. एका नव्या सोनेरी दिवसाच्या नव्या सूर्याला नमस्कार करून संतोषगडाकडे निघालो...

अनुभवसंस्कृती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Nov 2008 - 11:10 pm | यशोधरा

म्हातारबुवांचा, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याच मस्तीत आयुष्य घालवलय, त्या सर्वाचा हेवा तर वाटलाच, पण ऋषिकेश, तुमचाही वाटला, कारण तुम्हाला अश्या अवलियाला भेटायला मिळालं. असे अनुभव समृद्ध करुन जातात ना?

टारझन's picture

16 Nov 2008 - 11:51 pm | टारझन

च्यामारी ऋषीभाव ... लैच झकास लिवलाव ... झटक्यात वाचून काडला ...

यस्टीच्या खिळखिळ्या काचा आणि मध्येच एखाद्याचं पचाककन थुंकणं सोडल्यास फारसे आवाज नव्हते.

=)) =)) आहो ही तर अस्सल भारतीय परंपरा ... भर रस्त्यात पच्च्चाआआक्कन थूंकणे.. जय हो

यष्टीतले , आसनप्रकार, तमाखु , पीकर , उसाचारस , आणि रंगेल म्हतारोबा बेष्ट ...

आलो की आम्ही पण तिकडंच ट्रेकवावं म्हणतो... आपण तर तुपले फॅन झालो गड्या ... कोट्या एकदम क्लास...

(मिसळलेला) टाऋषीकेश

अभिज्ञ's picture

17 Nov 2008 - 12:39 am | अभिज्ञ

जबरि लिहिलेस !
म्हाता-याचा अनुभव खल्लासच.
अशाच ट्रेकच्या गमती जमती येऊ द्यात.

अभिज्ञ.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2008 - 1:01 am | बिपिन कार्यकर्ते

अरे कसला म्हातारा रे... लै चावनटपना करत होता रे... मजा आली.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 1:54 am | विसोबा खेचर

ऋष्या, मस्तच लेख रे..! :)

नंदन's picture

17 Nov 2008 - 2:17 am | नंदन

लिहिलं आहेस, ऋषिकेश. म्हातारबुवा एकदम आवडले. त्यांचे आणि या ट्रेकचे फोटोज आहेत का? पुढच्या भागात येणार्‍या दुसर्‍या धनगरबाबांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

17 Nov 2008 - 3:02 am | प्राजु

तो म्हातारा धनगर डोळ्यापुढे उभा राहिला.
सगळेच वर्णन मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृदुला's picture

17 Nov 2008 - 4:34 am | मृदुला

व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

मृदुला's picture

17 Nov 2008 - 4:35 am | मृदुला

व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

घाटावरचे भट's picture

17 Nov 2008 - 6:56 am | घाटावरचे भट

मस्त लिवलंयस रे गड्या!!!

सहज's picture

17 Nov 2008 - 9:05 am | सहज

फोटो काढुन इथे टाकायला पाहीजे होतास ह्या इसमाचा. अजुन मजा आली असती.

अनिल हटेला's picture

17 Nov 2008 - 9:22 am | अनिल हटेला

बुवाचे फोटो पायजे व्हते...

लेख एकदम जबरी.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुमीत's picture

17 Nov 2008 - 11:40 am | सुमीत

अतिशय वेगळे, चित्त प्रसन्न करणारे लेखन.
प्रवासवर्णन आणि व्यक्ती चित्रण एकत्र. :)

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 2:07 pm | विसोबा खेचर

सहमत आहे.. :)

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

राघव's picture

17 Nov 2008 - 12:25 pm | राघव

फारच छान लेख.. :)
म्हातार्‍याला म्हातारा म्हणवत नाही बॉ! ;) अगदी रंगेल अन् रगेल माणूस!
फोटोजची उणीव प्रकर्षाने जाणवली.
मुमुक्षु

अभिरत भिरभि-या's picture

17 Nov 2008 - 12:27 pm | अभिरत भिरभि-या

चित्रण आवडले.
सगळ्यांप्रमाणे मलाही चित्रांची उत्सुकता आहे.

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 12:39 pm | आनंदयात्री

सुरेख लिहलय. पुढल्या भागाची वाट पहातो.

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2008 - 1:19 pm | स्वाती दिनेश

धनगर आजोबा, नांदते डोंगर,किल्ले आवडले रे .. सुंदर लिहिले आहेस. संतोष,सीताबाय ह्यांच्या भेटीची कहाणी लिही लवकर.
स्वाती

सुनील's picture

17 Nov 2008 - 5:11 pm | सुनील

रंगेल म्हातारा आवडला बॉ!

फोटूही चालला असता की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसुनाना's picture

17 Nov 2008 - 6:35 pm | विसुनाना

लेख खूप आवडला.
यस्टी, म्हातारा,वारू, संतोस, सीताबाय,देऊळ, भजन, श्रावण सगळे डोळ्यासमोर आले.
यशस्वी लेख.

(गुप्त अक्षरे लिहिली नसती तरी कळाली असती. वाचक तसे बरेच सूज्ञ असतात. ;))

वेताळ's picture

17 Nov 2008 - 6:48 pm | वेताळ

प्रवासवर्णन व व्यक्तीचित्र एकाच लेखात...फोटो असेल तर पुढच्या भागात चिकटवा.
वेताळ

विनायक प्रभू's picture

17 Nov 2008 - 9:02 pm | विनायक प्रभू

पहिल्या धारेची. एकदम कडक

ऋषिकेश's picture

17 Nov 2008 - 11:16 pm | ऋषिकेश

सगळ्यांचे मस्त मस्त प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!.. :)

खरंतर अनुभवकथनात फोटो देणे मी साधारणतः टाळातो.. कारण प्रत्येकाच्या डोक्यात जे लेखनातून-शब्दातून चित्र उमटलं आहे ते तसंच असु द्यावं, विस्कटू नये, अश्या मताचा मी आहे..
पण तुमच्या सार्‍यांच्या आग्रहाखातर फक्त आजोबांचा फोटो इथे देतो. बाकी वारूगडाचे-संतोषगडाचे काहि फोटो कलादालनात नंतर एखाद्या विकांताला चढवीन (मात्र पुढल्या भागात भेटणार्‍या (भेटलेल्या) दुसर्‍या धनगराचा फोटो माझ्याजवळ नाहि)
हे ते आजोबा:

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रदीप's picture

23 Dec 2008 - 4:04 pm | प्रदीप

वर्णन. तो प्रांत, तो म्हातारा सगळे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. खरेच ह्या फोटूची जरूर नव्हती.

असेच अजून लेखन येऊदे.

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 11:19 pm | लिखाळ

फार छान.. फार छान.. लेख आवडला.. पुढचा लवकर येउदे..
-- लिखाळ.

baba's picture

18 Nov 2008 - 12:55 am | baba

" त्यानंच तर आम्हाना हक्काचं घर दिलं हाय -म्हंजी ह्ये गड दिले हाएत "
हे बाकी १००% खरं.. त्या घराचा मान राखनारा, काळ्जी घेनारा आणि शिवबांची आठवण ठेवनारा म्हातारा खूपच आवडला..

पुढचा लवकर येउदे..

..बाबा

वाटाड्या...'s picture

18 Nov 2008 - 1:04 am | वाटाड्या...

अतिशय सुंदर लेखन....

म्हातारा आवडला....नव्व्दीमधे असला उत्साह वाखाणण्यासारखाच...
जियो..ऋषिकेश भाई...

मुकुल

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 9:58 am | जैनाचं कार्ट (not verified)

मस्त !

एकदम जबरा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

फक्त संदीप's picture

20 Dec 2008 - 8:42 pm | फक्त संदीप

पाहीला गड पाहिला तुमच्या सोबत..............
फार उत्तम वर्णन केले आहे. क्षणभरासाठी वाटले मी हि तुमच्या सोबत आहे..

डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

सिद्धू's picture

23 Dec 2008 - 2:30 pm | सिद्धू

मित्रा, छान लिहिलं आहेस रे...म्हातारबुवा डोळ्यांसमोर उभे राहिले....
आता लवकरच उत्तरार्ध येऊ दे.

ऋषिकेश's picture

30 Dec 2008 - 9:00 pm | ऋषिकेश

धन्यवाद!
उत्तरार्ध इथे वाचता येईल:

-ऋषिकेश

संदीप चित्रे's picture

30 Dec 2008 - 11:26 pm | संदीप चित्रे

ऋषिकेश...
म्हातारबुवांचे, गडाचे वगैरे वर्णन खूपच मस्त जमलय रे मित्रा...
'गदुड' -- काय सुंदर शब्द वापरलाय रे त्या आजोबांनी...
तुझा 'निर्विष' शब्दही खूप आवडला..

फिरता रहा.... लिहिता रहा ... ..