खूप काही हरवलं आहे!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
17 Dec 2007 - 7:24 pm

राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.

कुठलं होतं ते भावगीत?

'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! :) अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं! :)

कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं! :)

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !

यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे! :)

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत! :)

हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? :) पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही! :)

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे! सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला! :)

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :)

आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला! माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीची वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.

संस्कृतीवाङ्मयविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

17 Dec 2007 - 7:40 pm | विसुनाना

आम्हीही अगदी त्याच काळातले.
'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच.

गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय.

मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :)
असेच असेच...!

नंदन's picture

17 Dec 2007 - 7:46 pm | नंदन

पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात.

-- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.

योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे.

असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

संजय अभ्यंकर's picture

17 Dec 2007 - 7:47 pm | संजय अभ्यंकर

तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही.
अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत.
किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा.

संजय अभ्यंकर.

प्राजु's picture

17 Dec 2007 - 8:01 pm | प्राजु

पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे.
गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती.
आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा.

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2007 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत.....
मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो-------
(विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही )

मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून
किराणा किंवा भाजीपाला घेत नाही.
तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून
किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं
मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं
म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो.
तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात
माझी खरेदी सुरु होते.
सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं
स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी-
लागल्यासारखं वाटतं
मग नको असलेल्या वस्तूंचीही मी
मनमुराद शॊपींग करतो
जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन.....
माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं
मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो.
न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन
भांडण वगैरे होत
पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही.
(महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

17 Dec 2007 - 9:26 pm | सहज

वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन"

आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते.

आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात.

तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे.

एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

सर्किट's picture

18 Dec 2007 - 1:43 am | सर्किट (not verified)

आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते.

तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले.

जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ?

फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ?

(हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.)

- सर्किट

आजानुकर्ण's picture

17 Dec 2007 - 9:35 pm | आजानुकर्ण

केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही.
'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस.

(गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय's picture

17 Dec 2007 - 10:40 pm | धनंजय

मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात.

तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट's picture

17 Dec 2007 - 10:32 pm | सर्किट (not verified)

"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे.

सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती.

इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या.

- सर्किट

ऋषिकेश's picture

17 Dec 2007 - 10:37 pm | ऋषिकेश

बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख.
मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :)
-ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2007 - 12:35 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, आपण एकाच घरात एकत्रच वाढलो का हो? हे तर माझेच बालपण आहे हो...

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2007 - 12:37 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, आपण एकाच घरात एकत्रच वाढलो का हो? हे तर माझेच बालपण आहे हो...

स्वाती दिनेश's picture

18 Dec 2007 - 12:51 am | स्वाती दिनेश

तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,)
स्वाती

विसोबा खेचर's picture

18 Dec 2007 - 9:01 am | विसोबा खेचर

सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो...

विसुनाना,

गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय.

क्या बात है, खरं आहे! :)

नंदनशेठ,

तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत.

खल्लास!

प्राजू,

गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती.

आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात!

बिरुटेशेठ,

मग नको असलेल्या वस्तूंचीही मी
मनमुराद शॊपींग करतो
जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन.....

तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:)

सहजराव,

बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो.

क्या बात है!

असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार...

आपला,
(जुनापुराणा!) तात्या.

प्रशांतकवळे's picture

18 Dec 2007 - 10:18 am | प्रशांतकवळे

खरच तात्या, ते दिवस गेले.

परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या.

महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत.

असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या.

प्रशान्त.

अवलिया's picture

18 Dec 2007 - 1:43 pm | अवलिया

वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं.....

(कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....)

नाना

विजय पाटील's picture

18 Dec 2007 - 2:00 pm | विजय पाटील

मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा).
सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या.
-विजय

धोंडोपंत's picture

18 Dec 2007 - 4:22 pm | धोंडोपंत

वा वा वा वा वा तात्या,

अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास.

सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा.

त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती.

पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे.

अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं

पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे.

फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे.

आपला,
(आतूर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अवलिया's picture

18 Dec 2007 - 4:29 pm | अवलिया

पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे.

येवढे हताश होवु नका.
पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही.
थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही
भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे.

हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे)

बदल हा स्थायी भाव आहे
जगाचा नियम आहे
तरी हताश होवु नका

नाना

II विकास II's picture

28 Jan 2010 - 9:44 am | II विकास II

तात्या, जुन्या दिवसांची आठवण झाली.
सुंदरे लेख

विजुभाऊ's picture

28 Jan 2010 - 9:52 am | विजुभाऊ

रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत.
त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते.
याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी.
टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि's picture

28 Jan 2010 - 10:12 am | शुचि

सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

महेशकुळकर्णी's picture

28 Jan 2010 - 11:07 am | महेशकुळकर्णी

सगळं अगदी मनातलं लिखाण....

(B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...)

महेश

भानस's picture

28 Jan 2010 - 11:25 am | भानस

मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल?
हाहाहा!
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे's picture

28 Jan 2010 - 12:52 pm | उदय सप्रे

खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच !
अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच !
एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते !
अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच.....
प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....)
तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील.....
"आम्ही चालवू हा पुढे वारसा !"
तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार?
रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा !
उदय सप्रे

ज्ञानेश...'s picture

28 Jan 2010 - 1:13 pm | ज्ञानेश...

तात्यासो,
काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला.

असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2010 - 2:35 pm | भडकमकर मास्तर

रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे...
आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय's picture

28 Jan 2010 - 3:00 pm | अन्वय

तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु's picture

29 Jan 2010 - 3:00 am | प्रशु

अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता....
सुंदर गाणी असतात.....

पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद's picture

29 Jan 2010 - 3:49 am | पाषाणभेद

वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला.

बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो.

नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड's picture

29 Jan 2010 - 7:06 am | फारएन्ड

एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति's picture

29 Jan 2010 - 8:45 am | क्रान्ति

तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो.
लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :)

क्रान्ति
अग्निसखा

अमोल केळकर's picture

30 Jan 2010 - 12:11 pm | अमोल केळकर

मस्त लेख
साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे.
बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब's picture

3 Sep 2010 - 10:39 am | शिल्पा ब

हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते...
प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात...
आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल...

लेख छान.

माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात .............
हल्ली नाही तसं होत .......

एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच...

सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली...
हसून हसून वाट लागली माझी .......

पैसा's picture

3 Sep 2010 - 8:11 pm | पैसा

कोणाला ते टेकाडेभावजी आठवतात का?