ज्याचं त्याचं स्वातंत्र्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
3 Nov 2008 - 7:01 pm

"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात! अनेक हजार वर्ष जुन्या असलेल्या भारतीय समाजात स्थल-कालपरत्वे अनेक बदल होत गेले, आणि त्याप्रमाणे रुढी, परंपराही बदलत गेल्या, कधी स्वसंरक्षणासाठी, कधी नवीन शोध लागले म्हणून! पण व्यक्ती आणि पर्यायाने समाजात बदल हे कोणत्याही टिकून राहिलेल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य ठरावं. पण आपण खरोखर सहजरित्या बदल स्वीकारतो का?

बदल कसे होतात, का होतात, कोणामुळे होतात? छोटे-मोठे बदलतर होतच असतात. सुरुवातीला बदलांना बराच विरोध होतो पण हळूहळू ते बदल बहुजनमान्य होतात आणि मग बहुतांश वेळा, या नाही तर पुढच्या पिढीकडून, विरोधाच्या जागी अनुकरण व्हायला सुरूवात होते. अगदी आपल्याकडची छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तर आता चाळीशी पार केलेल्या लोकांशी बोललं तर ते लोक त्यांच्या वेळेला बेल-बॉटम ट्राउझर्स घालायला लागले तेव्हा आरडाओरडा झाला असं सांगतील; पण त्यांतलेच अनेक लोकं आपल्या पुढच्या पिढीतल्या मुली सर्रास जीन्स, ट्राउझर्स घालून फिरतात याची तक्रार करतील. पण असे बदल सहज चालून जातात, बहुसंख्य मुली ट्राउझर्स घालून फिरताना दिसतात आणि काही वर्षांतच विरोध मावळतो. पण माणूस म्हणजे फक्त त्याचे कपडेच असतात? आधुनिक कपडे घातले की विचारही तसेच होतात का? आणि आधुनिक विचार म्हणजे तरी नक्की काय? आधुनिक विचार म्हणजे फक्त पाश्चात्य विचार का? आणि पाश्चात्य विचार म्हणजे नक्की काय? अमेरिका आणि इंग्लंड (+ बहुतेकसा पश्चिम युरोप) या दोन भूभागातल्या लोकांच्या विचारातही फार फरक आहे, अटलांटीक महासागराच्या ईशान्येला लोकांचा व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि त्याच वेळी (खर्‍या) समाजवादावर बराच जास्त विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत.

माणसातले बदल हे परिस्थिती बदलल्यामुळे होतात तर काही बदल हे इतर काही विचारांमधल्या बदलामुळे होतात. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या कामाचं स्वरूप बदललं त्यामुळे कपड्यांचे रंग, पोत, फॅशन हे कामाच्या ठिकाणी का असेना पण बदललं. तसंच पूर्वीच्या राजेशाहीची जागा लोकशाहीने घेतली त्यामुळे लोकांमधे बदल झाले, आणि कायद्यापुढे सगळेच सारखे असा विचार मान्य होऊ लागला; विचाराधारेतल्या बदलामुळे माणसांची विचार करण्याची पद्धतही बदलली. स्वातंत्र्य हा शब्द किमान ओळखीचा झाला. आज आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे, कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं ते आपण ठरवतो. कुठे रहायचं, काय प्रकारची नोकरी करायची याचंही स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण आपण खरोखर "स्वतंत्र" आहोत का? बदलांच्या विरोधाची जागा अनुकरण घेतं, पण ते अनुकरण प्रत्येक वेळा करता येतंच का? लोकल ट्रेनमधे साड्या, ओढण्या सांभाळण्यापेक्षा ट्राउझर्स-टॉप सोयीस्कर असतात म्हणून वापरले जातात पण विचारांचं अनुकरण करता येतं का? स्वातंत्र्य दुसर्‍याकदून मिळवता येतं का स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळू शकतं का? आपण स्वतःलाच जखडून ठेवतो का?

मला असं वाटतं हो, आपणच स्वतःलाच कोंडून ठेवतो, कधी देव बनण्याच्या प्रयत्नात कधी कष्ट टाळण्यासाठी! मुलींना लहानपणापासूनच सुपरवुमन, सुपरमॉम कशा महान असतात हे शिकवलं जातं आणि तिच्याकडून काम करवून घेतलं जातं; मुलांना (मुलगे) आज्ञाधारक असणं किती आदर्श असतं हे किंवा असंच काहीसं शिकवलं जातं आणि मग आपली (बहुदा पालकांची) म्हातारपणाची सोय लावली जाते. पाश्चात्य देशातल्या तान्हुल्यांच्या तोंडातलं बूच पाहिलं की मला पूर्वी वाईट वाटायचं. आई-बाबांना त्यांचा 'त्रास' नको म्हणून मुलांचं तोंड बंद करणं बरोबर नाही असं वाटायचं. पण हीच मुलं जरा बोलायला लागली, स्वतःचं स्वतः "भूक लागली", "झोप येत्ये" म्हणायला लागली की ती बूचं काढतात ती कायमचीच! पण आपल्याकडे काय दिसतं? थोडी समज यायला लागली की मग "तुला काय समजतंय, मी मोठा/ठी आहे ना तुझ्यापेक्षा?" असंच ऐकवलं जातं. विचार करण्याची सवयच तर सोडाच पण संधीही मिळत नाही. आणि या साच्यातून तयार होऊन आपण "एवढ्या वर्षांची परंपरा आहे, प्रथा आहे, काहीतरी तथ्य असणारच त्यात", असा एक गुळमुळीत आणि सोपा विचार करतो. सोपा विचार मी याला यासाठी म्हणते की एकदा चौकट आखून दिलेली असली की मग त्यातच स्वतःला बसवणं सोपं असतं. संस्कृत (किंवा जर्मनही घ्या) सारखी भाषा ज्यात व्याकरणाचे काटेकोर नियम आहेत त्यात प्रथम नियम शिकायला लागतात. लहानपणापासून तेच कानावर पडत असेल तर उत्तमच! हे नियम एकदा रटले की मग काही प्रश्नच येत नाही, वेगळा विचार करण्याची गरजच नसते. इथे मुद्दा भाषेचा अजिबातच नाही आहे, पण एक उदाहरण दिलं. शिस्त ही काही प्रमाणात चांगलीच, पण कधी आणि किती? चारचौघात असताना आपल्या स्वातंत्र्यामुळे किंवा आपल्या 'बेशिस्ती'मुळे दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचं आकुंचन झालं नाही म्हणजे शिस्त पुरेशी नाही का?

पण स्वतःच स्वतःसाठी नेहेमीच्या चौकटीपेक्षा वेगळी चौकट आखायची असेल तर? अशी चौकट जी इतरांच्या चौकटीला बर्‍याचदा छेदत नाही पण छळतही नाही. काहीही नवीन गोष्ट करायची असेल तर बर्‍याचदा त्यासाठी आधी स्वतःचाच विरोध मोडावा लागतो. आखून दिलेल्या चौकटीत जगणं खूपच सोपं असतं. जगानी नियम बनवलेले असतातच आपण फक्त ते मान्य करायचे, "का" असा प्रश्न न विचारता! मुलींना लहानपणापासूनच त्यांनी घरही सांभाळायचं, सगळ्यांची "सेवा" करायची आणि करीयरमधेही यशस्वी व्हायचं असं शिकवायचं, भले तिला स्वत:ला माणूस म्हणून जगता नाही आलं तरी चालेल. मुलांना लहानपणापासून मोठ्यांचं ऐकायचं आणि हाताखालच्या (म्हणजे वयानी लहान) यांच्यावर अधिकार गाजवायचा याचं शिक्षण मिळतं. पण माणूस म्हणून जगायला आणि मुख्य म्हणजे दुसय्रांनाही माणसासारखं वागवायच्या शिक्षणाचं काय? घरातल्या मुलांनाही घरातले निर्णय घेण्याचा हक्क असतो, आपल्या स्वत:बद्दलचे निणय घेण्याचा हक्क असतो याची जाणीव कधी होतच नाही, किंबहुना होणारच नाही याची काळजी घेतली जाते, "तू लहान आहेस, तुला काय कळतंय?" आणि हीच मनोवृत्ती पुढे आपल्याला विचार करू देत नाही. मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी चांगल्याच, छापलेलं आहे म्हणजे ते खरंच असणार असा काहीसा आपला विचार बनतो आणि मग फारसं पटत नसलं तरीही आपण अनेक गोष्टी मान्य करतो.

एकाने एखादी गोष्ट अमान्य केली आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की त्याला अडवणार्‍यांचीही कमतरता नसते. थोडक्यात कोणीही एका ठराविक चौकटीच्या बाहेर पडूच नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आणि या पिंजर्‍यातून कोणी निसटली की ती व्यक्ती बर्‍याचदा फार लक्ष देण्याजोगी रहात नाही. अर्थात याला अपवाद आहेत, चौकटीच्या बाहेर पडलेली व्यक्ती लौकिकार्थानी अतिशय यशस्वी झाली, म्हणजे चांगल्या मार्गाने पैसा कमावून श्रीमंत होणं किंवा नावापुढे पदव्यांची माळ असणं, की मग मात्र त्या व्यक्तीच्या चौकटीतून बाहेर पडण्याकडे कौतुकानी पाहिलं जातं. अर्थात क्रांतिकारक दुसर्‍याच्या घरातच जन्माला आलेला बरा असतो. प्रत्येक माणसाची चौकटीबाहेर पडून(ही) यशस्वी होण्याची कुवत असतेच असं नाही; अशाच माणसांसाठी चौकट बनवलेली असते. ज्याला विचार करायचा नाही किंबहुना ज्याची तेवढी कुवत नाही त्याच्यासाठी चौकट आहे, पण चौकट माणसांसाठी आहे, माणसं चौकटीसाठी आहेत का? सगळीच माणसं सारखी नसतात मग ही चौकट सारखी का असावी?

स्वतःशी केलेला थोडा विचार; स्त्रियांचं गाडी चालवण्याचं कौशल्य, "बंदिनी"चं शीर्षक गीत, या विषयांवरून थोडा विचार केला तेव्हा असं वाटलं:
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी" असं का म्हणायला लागावं? स्त्री हीपण माणूसच आहे असा विचार स्त्रिया स्वत:च का करु शकत नाही. स्वतःच्या फावल्या वेळाचा उपयोग घरातली कामं करण्यासाठी करायचा का गाडीचं बॉनेट उघडून आतल्या यंत्रांचा अभ्यास करण्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घरातल्या मुख्य स्त्रिला मिळत नाही; किंबहुना ती घेतच नाही. कारण आपला वेळ आपल्यासाठीही असतो हे तिच्या गावीच नसतं, असं तिला दाखवलंच जात नाही. स्त्रीची देवी बनवलेली असते, "आमची मुलगी किती काम करते घरात" याचं कौतुक होतं, पण "घरचं काम ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळेजण थोडा वेळ काढतात आणि होऊन जातं", असा विचार किती पालक करतात? मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळाले, "आईला वेळ नसतो का अभ्यास घ्यायला?", घर अस्वच्छ आहे, "काय ही बाई, घरात थोडं कामही करता येत नाही!" असाच विचार होतो आणि दुर्दैवानी या विचारांना स्त्रियाच प्रथम बळी पडतात. "आत्ता मजा करुन घे, सासरी जाऊन कामं करायचीच आहेत", असं आपणच आपल्या मुलीला, भाचीला ऐकवतो, पण मुलांना घरातल्या कामांच्या या जबाबदारीची जाणीव किती पालक करून देतात, बोलण्यातून आणि स्वतःच्या वागण्यातूनही? घरात कामांमधे मदत केली तर "काय बायकीपणा करतोस" किंवा "बायकोनी मुठीत ठेवलंय" हे आपण मुलांना म्हणतो ना? स्त्रियांना गणित जमत नाही, तर्कशास्त्र जमत नाही म्हणताना मजा वाटते पण ज्या स्त्रिया तर्कशुद्ध विचार करतात त्यांच्या "नवर्‍याला काय त्रास" असेल/होईल असा तर्कदुष्ट विचार डोक्यात येतोच! लग्नानंतर मुलीनीच घर सोडायचं, स्वतःची जन्मापासून असलेली ओळख संपवायची, "आता तू त्यांची" असं तिनेच ऐकायचं जसं काही ती एक वस्तू आहे. यात मला सगळ्यात राग येणारा प्रश्न, "मुलगी कुठे दिली?" किती क्रूर आहे हा प्रश्न, पण आपण काही चूक करत आहोत हे विचारणार्‍याला कळतही नाही, कारण "तशीच पद्धत आहे" आणि एखादी गोष्ट एकदा रूढ चौकटीमधली असली की ती चूक असू शकतच नाही!

आपलं आयुष्य कसं असावं याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य मोठ्या लोकांनाही मिळतंच असं नाही. सचिन तेंडूलकर, आता म्हातारा होत चालला आहे तरी आपण घरात टी.व्ही.वर बघत म्हणणार, "अजून वीस वर्ष सचिननी खेळलं पाहिजे". तो पण माणूस आहे, त्याचं त्याला समजतं, त्याचं त्याला ठरवू देत, पण नाही. त्याला एकदा देव म्हणून बंदी बनवायचं आणि मग खरंतर माणूस असणारा सचिन चुकला की आपण चुकचुकत बसायचं. पण तेव्हाच अतिशय हुशार गणाले जाणारे अल्बर्ट आईनश्टाईन किंवा स्टीफन हॉकिंगही आयुष्यातली किती (कमी) वर्ष महान शोध लावू शकले याकडे दुर्लक्ष करायचं.

माणसाला देव किंवा बंदीवान न बनवता माणूस म्हणून जगू देणं एवढं कठीण आहे का?

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 7:13 pm | चतुरंग

दिल्या घरी तू सुखी रहा! (म्हणजे तू आणि तो दोघेही ऑफिसातून आलात तरी नवरोबा पाय पसरुन बसतील आणि तू कशीही असलीस तरी सुखीच आहेस असे आम्ही मानू!) ;)

(खुद के साथ बाता : चल रंग्या, मिपा बास आता. डिशवॉशर लोड करायचाय ऊठ! B) )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 7:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा नवरा बिच्चारा आहे असं अनेकांचं मत आहे, कारण फारीनला फारच शिकलेल्या पोरीशी लग्न केलंन त्यानी! त्याला विचाराल तर तो म्हणेल भाजी करणं आणि घरात इतर थोडी कामं करणं मामूली आहे, कारण त्याला बायको सतत येऊन अमुक करू का, फलाणा शर्ट घाल असली वाक्य ऐकायला लागत नाहीत.

अवांतरः आत्ता मी घरी आल्यावर पाय पसरून मिपा-मिपा खेळत्ये आणि तो त्याच्या संगणकावर शोधतोय, दिल्लीतलं महाराष्ट्र भवन कुठे आहे, आणि त्या भागात दगड सापडतील का ते!

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 7:13 pm | विनायक प्रभू

वी आर आर ऑल प्रिझनर्स ऑफ अवर ओन डीवाईस.
ईगल चे हॉटेल कॅलिफोर्निया. ऑल टाईम क्लासिक
एलियन वरुन माणसात आलीस. छान

शितल's picture

3 Nov 2008 - 7:21 pm | शितल

>>>माणसाला देव किंवा बंदीवान न बनवता माणूस म्हणून जगू देणं एवढं कठीण आहे का?

हे खुपच मनाला भावले.

उत्तर कदाचित असे ही असेल , अपेक्षा स्वतःच्या स्वतःकडुन आणि दुसर्‍याकडुन ही. :)

लिखाळ's picture

3 Nov 2008 - 7:26 pm | लिखाळ

लेख छान आहे. यावर बराच उहापोह व्हावा. स्त्रीया भरडल्या जातात हे खरेच आहे. पण पुरुषांवर सुद्धा अर्थिक स्थैर्याची, घरातल्या इतर अनेक कामांची जबाबदारी समाजाने टाकलेली असते की तो पण बिचारा भरडलाच जात असतो. पण स्त्री जास्त भरडली जाते हे निर्विवाद.

तू जो विचार केलास तो विचार करणारे लोक प्रत्येक काळी प्रत्येक समाजात असतातच. ते कमी असतात. त्यातले काही थोडे ते विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवतात आणि त्यांचे दाखले सामान्य जन देत आपले सामान्य आयुष्य ढकलतात.

विचारांचं अनुकरण करता येतं का? स्वातंत्र्य दुसर्‍याकदून मिळवता येतं का स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळू शकतं का?
हा प्रश्न फार छान आहे. अतिशय आवडला. अनेकदा स्वातंत्र्याचे विचार आवडतात पण मूळ संकल्पना कळत नाही. म्हणून मग जो स्वतंत्र आहे त्याच्या वागण्याचे, कपड्यांचे अनुकरण केले जाते. आणि मग यालाच अनेक जण पुरोगामित्व समजून बसतात. स्त्री-पुरुष समान कसे हे नकळल्याने स्त्रीला हॉटेलात खुर्ची ओढुन देऊन 'मी स्त्रीचा सन्मान करतो' असे पुरुषाला वाटते आणि घट्ट पँट घातली की आपण स्वतंत्र झालो, पुरुषांच्या बरोबरीला आलो असे स्त्रीला वाटते. स्वातंत्र्य किती सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे ते स्वतंत्र झाल्याशिवाय कसे कळणार ! ते थोरामोठ्यांना बुद्धीच्या झेपेने समजते.

--लिखाळ.

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 7:33 pm | ऋषिकेश

सुंदर लेख-प्रकटन-स्वगत वगैरे!.. वाचून अनेक वेगवेगळ्या विचारांचे काहूर माजले आहे.. जरा विचार झिरपू दे.. मग सगळे विचार एकत्र बांधून नीट प्रतिसाद देतो :)

-(अस्ताव्यस्त) ऋषिकेश

चित्रा's picture

3 Nov 2008 - 8:50 pm | चित्रा

कुठेही आक्रस्ताळेपणा न करता विषय जबाबदारीने मांडला आहे याबद्दल अभिनंदन. मांडणी छान आणि विचार करायला लावणारे मुद्दे. लहान मुलांच्या बुचाचा तर अगदी असाच विचार मनात आला होता, मागे कधीतरी - ते आठवले.

ऋषिकेश म्हणतात त्याप्रमाणे हे वाचून अनेक विचारांचे काहूर माजले आहे. कदाचित लहानपणी आजूबाजूला घडलेल्या गोष्टी, स्वतःच्या- नातेवाईकांच्या बाबतीतल्या आठवणी, या सर्व एकत्र मनात आल्याने असेल. लिहीण्यासारखे बरेच आहे, पण थोडक्यात मला सांगायचे आहे ते असे की स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी खरे तर एकत्रच शिकवायला हव्यात, जिथे त्या एकत्र नसतात तेथे प्रश्न तयार होतात असे आपण पाहतो. शिवाय स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा जबाबदारी कुठपर्यंत मानायची असेही अनेक महत्त्वाचे प्रश्न उद्भवू शकतात. तसेच समाजातील काही घटकांमध्ये कालानुरूप बदल झाले आहेत, ते बदल सर्व स्तरांपर्यंत सारख्या प्रमाणात झाले नाही आहेत त्यामुळेही माझ्या परिघात मी ज्याला स्वातंत्र्य म्हणते त्याला दुसर्‍या एका स्तरातील बाई (किंवा पुरूष) यत्कश्चित समजण्याची शक्यता आहे किंवा उलटेही. जबाबदार्‍यांचेही तसेच आहे. त्यामुळे समाजातील सर्व थरांमध्ये असे समान बदल झालेले नसले तर दुसर्‍याच्या स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍यांच्या कल्पनांबद्दल साशंक होणे सहज शक्य आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 9:29 pm | प्रकाश घाटपांडे

स्वातंत्र्याचा मुद्दा आला कि स्वैराचाराचा मुद्दा येतोच. त्याच उत्तर ही ठरलेले असते. "स्वातंत्र्य व स्वैराचार यातील सीमारेषा पुसट आहे"
स्री मुक्ती का मुक्त स्त्री? असे लेख पुर्वी आले की काय झोडलय स्त्री मुक्तीला असे म्हणुन पुरुष मंडळी खूष असायची.
शेवटी स्वातंत्र्य म्हणजे अधिक बंधनाकडून कमी बंधनाकडे प्रवास. स्वातंत्र्य देखील असह्य होते. मग आपण कशात तरी गुरफटून घेतो म्हणजे बंधनाकडे प्रवास.
पिंजरा चित्रपटात "तुम्हावर केली मी मर्जी बहाल" या गाण्याच्या वेळी मास्तरांशी झालेला नायकीणीचा संवाद आठवतो.
घेई छंद मकरंद नाट्यगीतातील "मिटता कमल दल होई बंद धुंद" केलेले भुंग्याचे वर्णन आठवते.
बंधन आहे म्हणुन स्वातंत्र्याला महत्व आहे. चोर आहेत म्हणुन साव आहे. अंधार आहे म्हणुन प्रकाशाचे महत्व.
अंधार घाटपांडे

वर्षा's picture

3 Nov 2008 - 9:53 pm | वर्षा

चांगलं मांडलयस. मला तर कित्येकदा वाटतं स्त्रियांच्या 'स्टिरिओटाईप' (मराठी शब्द आठवत नाही) जगण्याला बर्‍याचदा स्त्रिया स्वतःच जबाबदार असतात!
यात 'आमच्या मुलाला चहासुद्धा करता येत नाही पण मुलीला सर्व पाककला येते हो' असा डांगोरा पिटणार्‍या आयांपासून ते ऑफिसमध्ये फालतू गोष्टींमध्ये पॉलिटिक्स करणार्‍या महिला बॉसेसपर्यंत अशा सर्व स्त्रिया येतात.
चहा 'करणे' जाऊदे पण स्वतःचा कप्/जेवणाचं ताटही उचलून न ठेवता परस्पर हात धुवायला पळणारे पिता/पुत्र मला ठाऊक आहेत! अशा वागण्याला आईकडूनच लटक्या वगैरे रागाचं आणि कौतुकाचं खतपाणी मिळालं की मग ती मुलं पुढे बायकोकडून 'साडीच नेस', 'मंगळसूत्रच घाल' असल्या आणि या वर्गातील इतर असंख्य अपेक्षा न करतील तरच नवल!

-वर्षा

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2008 - 10:20 pm | स्वाती दिनेश

अदिती,प्रकटन आवडले.
चित्रा म्हणते त्याप्रमाणे मुद्देसूद आणि आक्रस्ताळेपणा न करता मांडले आहेस.
वर्षा म्हणते तसे कित्येकदा स्त्रीच स्वातंत्र्यावर स्वत:च बंधने घालून घेते आणि पुढच्या पिढ्यांनीही तसेच वागावे अशी अपेक्षा ठेवते.
अतिमुक्तता आणि अतिपारंपरिकता यातला सुवर्णमध्य परस्पर सामंजस्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर जेव्हा सर्वत्र होईल तेव्हा साधला जाईल असं वाटतं.
स्वाती

आनंदयात्री's picture

4 Nov 2008 - 4:49 pm | आनंदयात्री

>>अतिमुक्तता आणि अतिपारंपरिकता यातला सुवर्णमध्य परस्पर सामंजस्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर जेव्हा सर्वत्र होईल तेव्हा साधला जाईल असं वाटतं.

अगदी हेच्च म्हणतो. पण सहसा आपण किती मुक्त आहोत किती पुढारलेल्या विचारांचे आहोत याचा अभिनिवेष, रुढी म्हणजे फोलपटं, देव पाहिले की बुडवा पाण्यात ईई विचारच ऐकायला मिळतात.

अदितीचा लेख बर्‍यापैकी संतुलित आहे, सगळ्याच विचारांशी सहमत आहे असेच नाही, सवडीने विस्त्रुत प्रतिक्रिया देईन.

अवांतरः आपल्या संपादकियांमधे असे विषय आले पाहिजेत.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 10:27 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला भडकमकर मास्तरांच्या ज्याच त्याच अभयारण्य ची आठवण आली
प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत's picture

3 Nov 2008 - 10:53 pm | मुक्तसुनीत

लेख आवडला. त्याचे स्वरूप चिंतनाच्या स्वरुपाचे आहे. या अनुषंगाने काही चांगले मुद्दे आलेले आहेत. "स्वातंत्र्य" या संकल्पनेची व्याप्ति मोठी आहे. व्यक्तिव्यक्तिंमधल्या स्वातंत्र्याबद्दलची चर्चा सामाजिक , राजकीय व्याख्येच्या दिशेने जाईल. उदा. अभिव्यक्तिस्वातंत्र्य (राजकीय स्वांत्र्यात भाषण, लिखाण , मुद्रणादि गोष्टी आल्या. ) धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा राजकीय आणि सामाजिक दोन्ही बाबीना गवसणी घालतो. आंतरिक (एक भावना म्हणून , एक विचार म्हणून ) स्वातंत्र्याचा विमर्श हा तत्त्वज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या दिशेने जातो. उदा. "फ्री विल" ही महत्त्वाची तात्विक संज्ञा. इथे स्वातंत्र्याचा संबंध निवडप्रक्रियेशी येतो. (चॉइस) याचबरोबर , स्वतःच्या विचाराबरहुकूम वागायचे स्वातंत्र्य - इथे मुद्दा विवेकाशी संलग्न आहे.

आदितीबाईंचा लेख यापैकी स्त्रीस्वातंत्र्याला आणि "क्वेश्चनिंग द कॉमन बेलिफ्स ऍंड अथॉरिटी" च्या स्वातंत्र्याला स्पर्श करतो. स्त्रीस्वातंत्र्याचा मुद्दा अर्थातच सामाजिक-राजकीय (सोशिओ-पोलिटीकल) या वर्गवारीतला एक महत्त्वाचा भाग आहे.

फ्रन्सिस बेकन , मार्टिन ल्युथर आणि स्पेन्सर्-मिल यांच्यापासून जी पाश्चात्य जगातली वैचारिक क्रांती घडली तिचे लोण आपल्या देशात परकी राजवटीद्वारे आले. स्त्री-स्वातंत्र्याचे वारे खेळणे हा या मोठ्या प्रक्रियेचा भाग. मात्र अजूनही ही प्रक्रिया पूर्ण व्हायचे सोडा, आपल्या देशाचा विस्तार नि लोकसंख्या लक्षात घेता, पुरेशी परिपक्व सुद्धा झालेली नाही. अशा परिस्थितीमधे , एका "ट्रान्झियंट " समाजरचनेतल्या , प्रगती करू पहाणार्‍या, मोकळा श्वास घेऊ पहाणार्‍या स्त्रियांच्या मोठ्या वर्गातील लेखिका जेव्हा लिहीतात, तेव्हा त्यातून काही महत्त्वाचे असे साहित्य निर्माण होत असते. आदितीबाईंचे लिखाण म्हणजे असेच , एक स्पंदन समजायला हवे. परंपरांचा ओढा, सामाजिक रूढींचा पगडा यात आपले स्थान शोधणरी आजची स्त्री तिला जे प्रश्न पडतात ते मांडते. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचाच हक्क ; पण समाजातल्या मोठ्या वर्गाला त्याची मोथी किंमत मोजावी लागते. स्त्रिया हा त्यातला सर्वाधिक मोठा घटक. या दृष्टीने अदिती यांचे लिखाण पारदर्शक आहे.

"क्वेश्चनिंग द कॉमन बेलिफ्स ऍंड अथॉरिटी" हा मुद्दा आदिती आपल्या लेखात मांडतात. याचे नाते स्त्री असण्याशी नसून , विवेकाशी (रीझनशी ) आहे. मी असा विचार करतो म्हणून मी असा वागतो. ठराविक चाकोरी, चौकटी मला मान्य नाहीत. इथे विचारांना पटेल ते वागण्याचे धैर्य दाखवणे हे विवेकवादाशी इमान राखण्याचे लक्षण आहे. त्याकरता ज्या रूढि परंपरा मोडाव्या लागतात त्याचा संबंध सामाजिक स्वातंत्र्याशी येतो.

लेखात अनेक स्तर आहेत. त्याच्यातील विचारसौंदर्य मला विलक्षण आवडले. एकमेकात मिसळलेल्या लेयर्स चा मला झेपेल इतपत धांडोळा घेतला.

विकास's picture

3 Nov 2008 - 10:54 pm | विकास

लेख आवडला आणि विचारांशी सहमत!

विशेष करून या वाक्याशी: "स्वतःच्या फावल्या वेळाचा उपयोग घरातली कामं करण्यासाठी करायचा का गाडीचं बॉनेट उघडून आतल्या यंत्रांचा अभ्यास करण्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घरातल्या मुख्य स्त्रिला मिळत नाही; किंबहुना ती घेतच नाही. "

आता मी नक्की माझ्या अर्धांगिनीस गाडीचे बॉनेट उघडून विरंगुळ्याचा नवीन प्रकार अनुभवण्यासाठी प्रोत्साहन देईन :-) (ह.घ्या.!)

खालील लिहीलेले - जे या विषयासंदर्भात वाटते ते, आपल्याला प्रतिक्रीया म्हणून नाही!

आपण म्हणत असलेल्या स्वातंत्र्याची मेख अशी असते की जेंव्हा विशिष्ठ विचारांचा समुदाय तयार होतो, त्यात आपण करतो (मग ते रुढीच्या बाजूने असो अथवा विरुद्ध), तेच खरे स्वातंत्र्य आणि इतरांचे चूक असे दाखवले जाते. हे अगदी बूश सारख्या राष्ट्राध्यक्षाच्या आणि अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या बाबतीतपण होते. - "ऑपरेशन एन्ड्युरींग फ्रीडम" म्हणत इराकवर हल्ला करायचा. तेच इतर वेळेस अनेक ठिकाणी...

स्वातंत्र्याची व्याख्या ही, "मी जे अनुभवतो ते स्वातंत्र्य आणि तसेच इतरांनी पण वागावे आणि भोगावे असे म्हणणे" अशी झाली आहे. थोडक्यात यातील दुसर्‍या भागात आपण इतरांना स्वातंत्र्य देत नसतो हेच समजत नाही.

उ.दा. : देवावर श्रद्धा असणारा पुर्वी अश्रद्धांना (देव न मानणारा या अर्थी - नास्तिक) नावे ठेवणार. अश्रद्ध/नास्तिक हा देव मानण्यारांना आपल्या कंपुत ओढणार. मंगळसूत्र न घालणारी बाईला घालणार्‍या बायका नावे ठेवणार तर स्त्री मुक्ती म्हणत तशी न समजून सुखात असणार्‍या बायकांना स्त्रीमुक्ती वादी मागे लागणार.

अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पण मूळ मुद्दा इतकाच की खरी स्वतंत्र असलेली व्यक्ती इतरांचे स्वातंत्र्य जसे आहे तसे मान्य करते. तसे जी व्यक्ती स्वतःच्या कळतनकळत करत नसते तीचे स्वातंत्र्य खरे म्हणजे कुठे तरी गहाण ठेवले असते असे वाटते.

लिखाळ's picture

3 Nov 2008 - 11:01 pm | लिखाळ

>पण मूळ मुद्दा इतकाच की खरी स्वतंत्र असलेली व्यक्ती इतरांचे स्वातंत्र्य जसे आहे तसे मान्य करते><
म्हणजे नक्की कसे?..मला समजले नाही.
--लिखाळ.

विकास's picture

4 Nov 2008 - 1:55 am | विकास

>पण मूळ मुद्दा इतकाच की खरी स्वतंत्र असलेली व्यक्ती इतरांचे स्वातंत्र्य जसे आहे तसे मान्य करते><
म्हणजे नक्की कसे?..मला समजले नाही.

थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे मान्य करणे. जर "अ" च्या देव देव करण्यामुळे "ब"चे अथवा इतरांचे नुकसान होत नसेल आणि तसेच "ब" ने देवळात अथवा इतर प्रार्थनालयात न जाण्याचे "अ" ला काही फरक नसेल; अथवा "क आणि ड" चे पारंपारीक पद्धतीने पती-पत्नी म्हणून सुखात चालले आहे तर "इ आणि फ"चे अधुनीक पद्धतीने सुखात... तर दोघांनी एकमेकांना आमचीच पद्धत कशी बरोबर हे न सांगता जसे आहेत तसे आपलेसे करणे...म्हणजेच एकमेकांचे स्वातंत्र्य मानणे. असे मला म्हणायचे आहे :-)

सहज's picture

4 Nov 2008 - 7:56 am | सहज

म्हणजे जो जे वांछील तो ते लाभो असेच ना?

विकास's picture

4 Nov 2008 - 8:08 am | विकास

साहेबाच्या भाषेत, "लिव्ह अँड लेट लिव्ह"

लिखाळ's picture

4 Nov 2008 - 3:44 pm | लिखाळ

समजलं... आभार.
--लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>पण मूळ मुद्दा इतकाच की खरी स्वतंत्र असलेली व्यक्ती इतरांचे स्वातंत्र्य जसे आहे तसे मान्य करते><
म्हणजे नक्की कसे?..मला समजले नाही.

विकासरावांसारखंच म्हणायचं झालं तर, मी देव मानत नाही पण इतरांच्या श्रद्धा असतील तर मला त्याने काही फरक पडत नाही. दुसरा देव मानत असेल आणि मला प्रसाद देत असेल तर मी तो खाते.
लग्न करण्या-न करण्याने मला फरक पडत नव्हता. म्हणूनच माझ्या बॉयफ्रेंडनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मी त्याला लगेचच "कुठे, कधी, कसं ते ठरवूया" असं म्हटलं. त्याला त्याचं स्वातंत्र्य होतं (आणि आता नवरा असताना आहे) आणि मला माझं.

प्राजु's picture

3 Nov 2008 - 11:03 pm | प्राजु

लग्न ठरवताना सुद्धा, "मुलगी दाखवायला घेऊन या" असंच ऐकवलं जातं. याचा इतका संताप येतो ना..
मी तर माझं लग्न ठरवायच्या वेळी सगळ्याना सांगायचे "मी मुलगा बघायला निघाले आहे"..
स्वातंत्र्य याचा अर्थ फार कमी लोकांना समजतो. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नक्कीच नव्हे.. हे समजून जे चौकट सोडतात ते खरेच आदर्श असतात.
उत्तम लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

3 Nov 2008 - 11:19 pm | भाग्यश्री

अदिती, मस्त लिहीलंस! खूपच सही.. विशेषत: असा विषय आल्यावर विचारांची दाटी होते अक्षरश: .. परंतू संयत लिहीलंयस..
आमच्या घरात निदान, घर आवरणं, अधुन मधुन स्वयपाक करणं इत्यादी कामं नवरा करतोच. घर दोघांचं आहे हा त्यामागचा विचार... बर्‍याचदा तो पाय पसरून ऑर्डरी सोडतही असेल.. पण तसे मीही करते. :))
मंगळसूत्र माझेही रोज घातले जात नाही. सणावाराला , ट्रॅडीशनल कपडे घातले की घातले जाते. याबाबतीत घरच्यांची तर अजिबात नाही, पण बाहेरच्यांचीच स्ट्राँग मतं असतात हे पाहीले आहे.
आजुबाजुला पाहते अशा खूप मुली. त्यांना नवरा-बायको हे नातं मित्रत्वाचं असू शकतं हेच कळत नसावं. त्यांनी स्वतःहून तसे विचार ओढवून घेतलेले असतात हे नक्की. कदाचित आजुबाजुच्या वातावरणाचा इ. प्रभाव असेल.

पण अजुनही तितकी समानता, स्वातंत्र्य निदान स्त्रियांच्या मनात नाहीए. त्यांनी मनात आणलं तरच त्या स्वतंत्र होतील. ते कुणी द्यावं लागत नाही, लागू नये.

( यावरून आठवले : मायबोलीवर अज्जुकाचा, ' ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी ' हा लेख व त्यावरील चर्चा उत्तम होती. जरूर वाचण्यासारखी. )

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2008 - 11:26 pm | प्रभाकर पेठकर

प्रत्येकाच्या स्वातंत्र्याच्या, जबाबदारीच्या, परंपरांच्या कल्पना वेगवेगळ्या, स्वतःच्या बौद्धिक कुवतीला, संस्कारांना साजेशा असतात.
घरकामात हातभार लावला म्हणजे स्त्री स्वातंत्र्य मनाने स्विकारले असे होते का? घरात मदत करणारा पुरूष पत्नीच्या माहेरी जाण्याला गोड बोलून मोडता घालतो, 'तिच्या शिवाय मी जगू शकत नाही' अशी उथळ कारणं पुढे करतो. तिला मनाप्रमाणे घरातली खरेदी करू देतो पण ती फोनवर मैत्रीणीशी बोलत असेल तर काही न काही कारणाने तिला फोन बंद करायला लावतो ह्याला स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का?
नोकरी व्यतिरिक्त घराबाहेर असणार्‍या नवर्‍याला बायको वरचेवर फोन करून घरी कधी येणार? कुठे आहेस? लवकर ये मी जेवायची थांबले आहे, असे सांगत असेल तर त्या नवर्‍याला आयुष्यात स्वातंत्र्य आहे का? हा काय शर्ट घातलाय? हे काय सत्यनारायणाच्या पुजेला जीन्स घालून जातात का? असे अनेक प्रश्न नवर्‍यालाही स्वातंत्र्य नाकारतात.
'स्वातंत्र्य' म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे काय? तडजोड म्हणजे काय? परस्परांना समजून धेणं म्हणजे काय? सर्वच परंपरा वाईट असतात का? सर्वच आधुनिक गोष्टी चांगल्याच असतात का? दोघेही स्व-तंत्राने चालणारे आणि एकमेकात संवाद नसेल, विचारांची देवाण-घेवाण नसेल तर त्या दोघांना यशस्वी सहचरी मानायचे का?

मला वाटतं 'स्वातंत्र्य' ह्या शब्दाची व्याख्या व्यक्तिंच्या बाबतीत वेगळी आणि कुटुंबाच्या बावतीत वेगळी असते. तसेच ती दोन व्यक्तीत सारखी नसते आणि दोन कुटुंबांमध्येही समान नसते. दोन वयातही समान नसते, वयानुरुप बदलत जाते, अधिक परिपक्व होत जाते/होत जावी. दोन भिन्न परिस्थितींमध्येही ती समान नसते. आर्थिक पाठबळ असेल तर दर आठवड्याला मित्र-मैत्रीणींना जमवून पार्टीचा जल्लोष करता येतो, आर्थिक पाठबळ नसेल तर वर्षातून एक दिवाळीही मोजक्या वस्तूंनीच साजरी करावी लागते. आरोग्यावरही अवलंबून असते. मधूमेही रुग्णाला दिवाळीच्या सर्व फराळाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचं स्वातंत्र्य नसतं, मुळव्याधी रुग्णाला 'मामलेदार मिसळ' खाण्याचं सातंत्र्य नसतं. सामाजिक नियमांवरही अवलंबून असतं. काही देशात शस्त्रास्त्र बाळगण्यास मुभा असते भारतात परवान्याशिवाय ते स्वातंत्र्य नाही.
थोडक्यात, 'स्वातंत्र्य' हा शब्द बहुआयामी आहे. लवचिक आहे. भावनिक आहे. त्याचे कुठलेही समीकरण मांडता येत नाही.
पती-पत्नीत 'तुला सुखी पाहण्यातच मला सुख आहे' हे तत्व दोघांनीही तंतोतंत पाळले तर खुपशा समस्या उद्भवू नयेत.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

भिंगरि's picture

4 Nov 2008 - 12:42 am | भिंगरि

अदिति,

लेख खुप आवडला. अतिशय मुद्देसुद आणि संयमित लिखाण. किति दुर्दैवाचि गोष्ट आहे कि ज्या महाराष्ट्रात आपण फुले, रानडे, गोखले, आगरकर अशि सुधारकांचि परंपरा सांगतो तिथेच अजुन हुंडा, लग्नानंतर मुलिंनि नाव बदलणे, अपत्याला पित्याचे नाव लावणे, सुनेने सासरि समरस व्हाव हि अपेक्षा (माहेर विसरुन)तिथे आपण अश्या कितितरि मुद्यांवर अजुन तसुभरहि पुढे सरकलो नाहि. तु म्हणतेस तस सगळे बदल पोषाखातले किंवा त्याच पातळिवर.

मी, बसले असताना नवर्‍याला पाणि मागितल किंवा त्याने एखाद काम केल नाहि म्हणुन नापसंति दर्शवलि तर ज्येष्ठ मंडळिंच्या कपाळावरच्या आठ्या न चुकता मोजल्या आहेत. स्वातंत्र्य हि गोष्ट अजुन किति दुर आहे हे अश्या प्रसंगि लक्षात येत. बदल स्विकारायला आधि स्वतःचा विरोध मोडुन काढावा लागतो हे तुझ म्हणण अगदि १००% पटल. हा बदल स्विकारायला बहुतांश मंडळिंचि तयारि नसते मग त्यात स्त्री आणि पुरुष दोघहि येतात. कधि कधि यात सोय पण बघितलि जाते, म्हणजे मुलिसाठि एक आणि सुनेसाठि दुसरा कायदा अश्या प्रकारे.

असो, ह्याबद्दलचे तुझे विचार आमच्याशि शेअर केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

धनंजय's picture

4 Nov 2008 - 3:37 am | धनंजय

आवडले. अभिनिवेश नाही, अशा प्रकारे, पटेल असे लिहिले आहे.

बेसनलाडू's picture

4 Nov 2008 - 3:34 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

लेख आवडला. प्रतिसादही.

आदितीच्या आजवरच्या लेखनातील मला जास्त आवडलेला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2008 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. प्रतिसादही.

अदितीच्या आजवरच्या लेखनातील मला जास्त आवडलेला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिजीत's picture

4 Nov 2008 - 9:03 am | अभिजीत

आपले विचार आणि सगळे प्रतिसाद आवडले.

माणसाचं अवकाशातील एका बिंदूसारखं अस्तित्व असणं हे दुरापास्तच आहे.
मानवी जीव जन्माला येण्याआधीच त्याचे नाते-संबंध निर्माण झालेले असतात. त्याबरोबरच संस्कार, चालीरितीची चौकट येते. जोपर्यंत त्या चौकटीचे फायदे होतात तोवर ती आदर्श असते, सुखदायक असते. माणसाच्या संबंधांचा परिघ कुटुंब, समाज, देश असा वाढत जातो तशातशा चौकटीही मोठ्या होउ लागतात. यातुन सुटका करुन घेणे ही एक 'स्वातंत्र्याची' व्याख्या होउ शकेल.

पण या चौकटी नक्कीच गरजेच्या आहेत. त्यातले जाचक असणारे, नसणारे कोपरे बरेचसे व्यक्तिसापेक्ष आहेत. हिशोब करणं अवघड आहे.

- अभिजीत

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2008 - 11:27 am | प्रकाश घाटपांडे

अभिजित चे विचार पटले
प्रकाश घाटपांडे

नीधप's picture

4 Nov 2008 - 9:25 am | नीधप

आदिती,
लेख चांगला लिहिलायस. अगदी अगदी असं कैक वेळेला म्हणाले.
शेवटी स्वातंत्र्य ही पण एक मानसिक अवस्था आहे. आणि ज्याने ती कधी अनुभवलीच नाही त्याला अचानक स्वतंत्र झाल्यावर प्रचंड असुरक्षित वाटणारच. तसेच अनेकांचा कम्फर्ट झोन बिघडणार त्यानेही ते असुरक्षित होणार. अजून असुरक्षिततेची फेज संपली नाहीये इतकंच.

भाग्यश्री, माझ्या लेखाचा संदर्भ दिल्याबद्दल आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

झकासराव's picture

4 Nov 2008 - 9:56 am | झकासराव

मस्त प्रकटन.
लेख आणि आलेल्या प्रतिक्रिया विचार करण्याजोग्या आहेत.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अवलिया's picture

4 Nov 2008 - 11:48 am | अवलिया

सर्वप्रथम एक चांगला लेख लिहुन मनातील विचार योग्य रितीने मांडल्याबद्दल संहिताजींचे मनःपुर्वक अभिनंदन तसेच पुढील लेख लिहितांना त्यांच्यावर असलेल्या मोठ्या जबाबदारीची हलकीशी आठवण.

चौकटीत समाज जीवन बंदिस्त आहे आणि जोपर्यत आपण या ना त्या रुपाने समाजरुपाने जीवन व्यतित करणार आहोत, तोपर्यंत चौकटी कायम रहाणार आहेत. चौकटींचे संदर्भ बदलतील, नव्या चौकटी तयार होतील. वाहतुकीचे, कार्यालयीन कामकाजाचे, सामाजिक वर्तणुकीचे नियम चौकटीतच मोडतात. ते पाळणारा सुजाण नागरीक ठरतो. घरगुती किंवा धार्मिक चौकट मोडणारा बंडखोर. चौकटीशिवाय कोणतेही कामकाज होणार नाही. पण चौकटी मोडुन फारसे काही साध्य होणार पण नाही. कारण चौकटी मोडणारा परत नवीन चौकट तयार करतो. आपल्याला अनुयायी मिळावेत अशी अपेक्षा करतो. किमानपक्षी मान्यता मिळावी असाच त्याचा आग्रह असतो. हेच या लेखाचे पण प्रयोजन असेच मी समजतो.

तर्काची तलवार पाजळीत कारणमिमांसेच्या वारुवर स्वार होवुन तथाकथित स्वातंत्र्यासाठी केलेली लढाई स्वकियांचाच पराभव करते अन परिचितांना दुर पिटाळुन लावते. अपरिचितांचा संबंधच नसतो. एकाकि योद्धा रणभुमीवर एकटा उरतो. तलवारीचे डाग पुसण्यासाठी मोडलेल्या चौकटी घासुन नवीन चौकट उभी करतो. दग्ध शोकांतिका आयुष्य वैराण करते अन प्रवास सुरु होतो स्वतःला शोधण्याचा. तेव्हा लक्षात येते की चौकट मोडण्यापेक्षा दरवाजा योग्य दिशेने उघडला असता तरी काम झाले असते. पण गेलेली वेळ अन निघालेला शब्द परत घेता येत नाही. चौकटी मोडतांना अन बदल करतांना इतके जरी ध्यानात ठेवले तरी पुरेसे असे मी मानतो.

मला आवडणारी पण कुटूंबियांना न आवडणारी गोष्ट करणे म्हणजे स्वातंत्र्य असे मी मानत नाही. कुणाच्या मानसिक समाधानासाठी माझे मत बाजुला ठेवुन कधी न पटणारी गोष्ट करावी लागणे हे मी पारतंत्र्य मानत नाही. समाज म्हणुन वावरतांना काही बंधने पाळणे गरजेचे असते. हे कदाचित काही जणांना त्यांच्या विशेष देणगीस्वरुप असलेल्या बुद्धिमतेच्या जोरावर फटकुन राहिले तरी चालु शकेल अशा भुमिकेला छेद देणारे वाटत असले तरी मी हे उर्वरीत ९९ टक्के लोकांबद्दल बोलत आहे, ज्यांना असे वागणे सहज साध्य नसते तसेच उपजिविकेसाठी समाजावरच अवलंबुन राहाणे गरजेचे असल्याने जमणारे नसते. त्याचप्रमाणे आपण कितीही अमान्य केले तरी प्रत्येक जण हा मागील तसेच पुढील पिढीला जोडणारा दुवा असल्याने कमजोर कडी बनणार नाही व निदान आपल्यापुरती तरी कुटुंबव्यवस्था संपणार नाही याची काळजी घेतो व इच्छा असो वा नसो त्याप्रमाणे आचरण करतो. या आचरणामुळे त्याच्या कथित स्वातंत्र्याचा बळी दिला गेला आहे असे मला वाटत नाही. कोणतीही व्यवस्था मानायचीच नाही व काही झाले तरी मी मला हवे तेच करणार अशी मनोभुमिका असलेल्यांना समाजाकडुन मान्यतेची तशीही गरज नसतेच त्यामुळे समाज अशा मनोवृत्तीकडे 'दुर्लक्ष' नामक अदृष्य ढाल वापरुन कानाडोळा करतच असतो. आणि हे पुर्वापार चालु आहे, याला या शतकातला पराक्रम म्हणुन पाहु नये. समाजात सर्व त-हेच्या प्रवृत्ती पुर्वापार नांदत आलेल्या आहेत आणि आजच समाज फार बिघडला आहे किंवा सुधारला आहे असे नाही. कारणे बदलली, पद्धती बदलल्या एवढाच काय तो तपशीलातला फरक.

लेखाची सुरवात ज्या वाक्यांनी झाली आहे ती चिरपरिचित असुन असे वाक्य ऐकणारी लेखिका पहीली मानव नाही, हजारो वर्षांपासुन पिढ्यांमधला संघर्ष अजुनही तितक्याच ताकदीने पुढील पिढीत सरकुन नवनिर्मितीची प्रेरणा देत आहे. ज्यादिवशी असे वाद ऐकु येणार नाहीत, तो दिवस मानवाचे अस्तित्व एक सर्जनशील सजीव म्हणुन संपुष्टात आल्याची खुण असेल असे मी मानतो.

बाकी लेख सुंदर आहे. मनातले तरल विचार लेखणीद्वारे मांडण्याचे लेखिकेचे कौशल्य वादातीत आहे. त्यांच्या कुशल मंगलाची प्रार्थना आणि हीच प्रतिसाद सीमा.

नाना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 12:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला असं वाटतं काही ठिकाणी लेखाची लांबी खूप जास्त होईल या भीतीने कमी लिहिलं आहे, म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच.

कारण चौकटी मोडणारा परत नवीन चौकट तयार करतो. आपल्याला अनुयायी मिळावेत अशी अपेक्षा करतो. किमानपक्षी मान्यता मिळावी असाच त्याचा आग्रह असतो. हेच या लेखाचे पण प्रयोजन असेच मी समजतो.
अजिबात नाही. चौकटी मोडणारी मी, माझ्यापुरतीच ती मोडते. प्रत्येकानी माझ्यासारखंच असावं अशी अपेक्षा नाही, अजिबातच नाही. मान्यता मिळावी हा एक उद्देश आहेच. पण त्याहीपुढचा विचार आहे, की दुसरा जर वेगळा विचार करत असेल आणि माझ्यावर त्याची जबरदस्ती होणार नसेल तर मी ते अमान्य का करावं? प्रत्येकाला आपली चौकट आखण्याचं स्वातंत्र्य मिळावं, ज्याला ते नकोय त्याच्यासाठी रूढी आहेतच.

तर्काची तलवार पाजळीत कारणमिमांसेच्या वारुवर स्वार होवुन तथाकथित स्वातंत्र्यासाठी केलेली लढाई स्वकियांचाच पराभव करते अन परिचितांना दुर पिटाळुन लावते. ... एकाकि योद्धा रणभुमीवर एकटा उरतो. ... दग्ध शोकांतिका आयुष्य वैराण करते अन प्रवास सुरु होतो स्वतःला शोधण्याचा.
ज्यांची बदलांना सामोरं जाण्याची तयारी नसते त्यांच्याबरोबर फक्त कोणीतरी(च?) हवं या कारणासाठी संबंध ठेवण्यापेक्षा नसलेलेच बरे असतात; ज्यांच्या डोक्याला ते झेपतं तेच लोक या फंदात पडतात. आणि असे लेख लिहून समविचारी लोक भेटतातच. रक्ताचीच काय ती नाती बाकी सगळा उथळपणा असं नसतं. ठाण्यात गेल्यावर मी विप्रकाकांकडे जाते आणि रक्ताच्या नातेवाईकांना फोनही नाही करावासा वाटत. आणि कठीण प्रसंगी रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा समविचारी मित्रमंडळानी खूप जास्त मदत केली होती असं असताना एकाकी योद्धा, दग्ध शोकांतिका वगैरे मला फारच पुस्तकी वाटतंय. बाकी स्वकीय कोणाला म्हणायचं हाही एक प्रश्नच आहे ना!
सवयीप्रमाणे एक आगाऊ सल्ला: धर्मोपदेशक म्हणून शोभाल तुम्ही! वैराण आयुष्य इत्यादींची भीती दाखवायची आणि आपले विचार गळी उतरवायचे. ;-)

कुणाच्या मानसिक समाधानासाठी माझे मत बाजुला ठेवुन कधी न पटणारी गोष्ट करावी लागणे हे मी पारतंत्र्य मानत नाही.
प्रश्न तिथेच येतो ना, माझी वेळ असताना मी दुसर्‍यासाठी न पटणारी गोष्ट करायची आणि मी मोठी झाल्यावर मी माझी मतं इतरांवर लादायची का? नेहेमीची वाक्यं, "म्हातार्‍यांचा विचार करुनतरी मंगळसूत्र घाल", पण मग माझ्या विचारांचा विचार तीच म्हातारी करतात का? कोणाचा जन्म फक्त माझ्या आधी झाला म्हणून मी त्यांच्या मताला प्रमाण मानावं का? आणि मग माझ्या डोक्यावरचे केस पांढरे झाले की मग मागची पिढीला मी एमोशनली ब्लॅकमेल करायचं का? आपली मतं आपल्यापुरती असं प्रत्येकाचं का होत नाही??

समाज म्हणुन वावरतांना काही बंधने पाळणे गरजेचे असते. हे कदाचित काही जणांना त्यांच्या विशेष देणगीस्वरुप असलेल्या बुद्धिमतेच्या जोरावर फटकुन राहिले तरी चालु शकेल अशा भुमिकेला छेद देणारे वाटत असले ...
समाजात वावरताना एक व्यक्ती म्हणून एखाद्या(/दी)ला स्वतःचं म्हणणं मांडूच द्यायचं नाही? उदा: कपडे हे लज्जारक्षणार्थ, हवेपासून काळजी घेण्यासाठी असतात तसेच ते स्वतःला व्यक्तही करतात. मग एका माणसानी काय कपडे घालायचे हेपण त्याला इतर लोकं का सांगतात (अगदी खांद्यापासून पायापर्यंत कातडी दिसली नाही तरीही)?
आणि फटकून का रहावं लागतं? नाही लागत फटकून रहायला! माझा स्वतःचा अनुभव, आई-वडिलांप्रमाणे सगळं करणारे माझे चारही पालक मला कधीही काहीही सांगत नाहीत. पण इतरांच्याच कमेंट्स ऐकून घ्यायला लागतात.

तरी मी हे उर्वरीत ९९ टक्के लोकांबद्दल बोलत आहे, ज्यांना असे वागणे सहज साध्य नसते तसेच उपजिविकेसाठी समाजावरच अवलंबुन राहाणे गरजेचे असल्याने जमणारे नसते.
माझी स्वातंत्र्याची कल्पना तीच आहे, ज्याला जे पटतं त्याने ते करावं. उपाशीपोटी, ओलेत्याने एखाद्या(/दी)ला सकाळी सकाळी थंडीत वडाभोवती प्रदक्षिणा घालायच्या असतील तर मी त्यांना नाही म्हणत नाही, ना त्यावर शेरे मारते. रोज सकाळी लवकर उठून रांगोळी घालणार्‍या शेजारच्या काकूंबद्दल मला जरा जास्तच कौतुक आहे, त्या एवढे कष्ट घेतात म्हणून! ज्याला रूढ चौकटीतच रहायचं आहे त्याने रहावं; ज्यांना विचार करायचा नाही आहे "का?" याचा, त्यांच्यासाठी सोय आहेच ना? पण म्हणून विचार करणार्‍यांना, वेगळं वागणार्‍यांना 'फटकून रहाणारे' वगैरे विशेषणं का?

कोणतीही व्यवस्था मानायचीच नाही व काही झाले तरी मी मला हवे तेच करणार अशी मनोभुमिका असलेल्यांना समाजाकडुन मान्यतेची तशीही गरज नसतेच त्यामुळे समाज अशा मनोवृत्तीकडे 'दुर्लक्ष' नामक अदृष्य ढाल वापरुन कानाडोळा करतच असतो.
नाही ना, दुर्लक्ष करत असते तर नाव का नाही बदललं, मंगळसूत्र कुठे आहे, नवर्‍याला गुंडाळून ठेवलं असणार तू असले प्रश्न-शेरे का आले असते! तेवढीच एक माफक अपेक्षा आहे ना माझी, इतरांसाठी असलेला प्रसाद मी मिठाई समजून खाते तसंच इतर "आहे थोडी यडी/वेगळी" असं काही म्हणून दुर्लक्ष का नाही करत? आणि प्रसाच पेढे म्हणून खाल्ला काय किंवा काय काय, कुटुंबव्यवस्था एवढीही ढिसाळ नाही आहे की ती मोडेल. माझी चौकट मी मोडली तरीही विप्र काकाच झाले.

मी कोणी पहिली आहे असं मला अजिबातच म्हणायचं नाही आहे, मला तसं वाटतही नाही. पण कधीकधी चौकटीतल्या लोकांचं वागणं पाहून संशय येतो आपण एकट्याच आहोत का, आणि मग शोधावेसे वाटतात आपल्यासारखाच विचार करणारी लोकं; त्यांच्याशी बोलून आपण एकाकी योद्धे नाहीत तर एक सामान्य माणूस आहोत याची एक सुखद जाणीव होते. तात्यांनी मिपाचा मंच उपलच्ध करून दिलेला आहेच, म्हणून वापरला; बाकी काही नाही.

अवलिया's picture

4 Nov 2008 - 12:47 pm | अवलिया

दुर्देवाने तुम्हाला माझा प्रतिसाद नीट कळलाच नाही. असो.

नाना.

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 11:59 am | विनायक प्रभू

अहो नाना प्रतिसादाचा लेख झाला. आणि तो सुद्धा लेखाच्या तोडीचा. लेख म्हणुन टाकायचा की. सगळ्यानी वाचला असता.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2008 - 12:10 pm | प्रकाश घाटपांडे


कोणतीही व्यवस्था मानायचीच नाही व काही झाले तरी मी मला हवे तेच करणार अशी मनोभुमिका असलेल्यांना समाजाकडुन मान्यतेची तशीही गरज नसतेच त्यामुळे समाज अशा मनोवृत्तीकडे 'दुर्लक्ष' नामक अदृष्य ढाल वापरुन कानाडोळा करतच असतो. आणि हे पुर्वापार चालु आहे, याला या शतकातला पराक्रम म्हणुन पाहु नये. समाजात सर्व त-हेच्या प्रवृत्ती पुर्वापार नांदत आलेल्या आहेत आणि आजच समाज फार बिघडला आहे किंवा सुधारला आहे असे नाही. कारणे बदलली, पद्धती बदलल्या एवढाच काय तो तपशीलातला फरक.


नाना चा प्रतिसाद कधीच चेंगट नसतो. एक वेळ आमच्या वाचनात चेंगटपणा असेल.
प्रकाश घाटपांडे

मनस्वी's picture

4 Nov 2008 - 1:56 pm | मनस्वी

अदिती, उत्तम लिहिलं आहेस. असे अनुभव पावलोपावली येतात. अगदी मनात आलेले जसेच्या तसे उतरवल्यासारखे वाटतेय.

अनिरुध्द's picture

5 Nov 2008 - 5:22 pm | अनिरुध्द

छान लिहिलंय. आवडंलं.