पुस्तक परिचय : कोसळेपर्यंत

निमीत्त मात्र's picture
निमीत्त मात्र in जनातलं, मनातलं
2 Nov 2008 - 10:06 pm

निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला
प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे. ही संपूर्ण कविताच मुळी दुष्काळाला कवेत घेऊन मातीचे मरण न सोसल्याने ओसाड झालेल्या गावाची वेदना व्यक्त करते. त्याच्याच पाठोपाठ आलेली "पाखरांचे थवे अन्‌ झाडे' ही कविताही अशीच व्यथित करणारी आहे. "हल्ली हल्ली तर पोरेही चित्रे काढता काढता विसरून चालली आहेत झाडे' हे अर्धनागरी शहरातील मुलांचे भावविश्‍व किती कोरडे झाले आहे. इंटरनेट व वाहिन्यांच्या जंजाळात अडकलेल्या नव्या पिढीचे उद्‌ध्वस्त भविष्य रेखताना ही कविता सुन्न करून जाते.
"कावळे' ही अभंग छंदातील कविताही अशीच आर्त आहे. पिंडासाठी भाव ठरवावा, असे त्यांच्या मनात घोळते, ही रूपकात्मक कविता सध्याच्या राजकारणावर भाष्य करून जाते. कोकिळांचे म्हणजेच सज्जनांचे गळे कापून हे कावळे आता थकले आहेत, असे कवीला वाटते. या संग्रहातील "गुरुजी', "गाव' अशा वैयक्तिक अनुभवाला सार्वत्रिक रूप देणाऱ्या कविताही यात आहेत.
संग्रहाच्या शीर्षकाची "कोसळेपर्यंत' ही कविताही दुरावलेल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या व भुईच्या आशा आकांक्षा कशा मरून गेल्या आहेत, याकडे वाचकांचे लक्ष वेधते. कवी म्हणतो, "आभाळातला पाऊस आभाळातच आटून गेला तशी पानगळ सुरू झाली आयुष्याची' अख्खं आयुष्य पावसाच्या आशेवर आसेवर काढणाऱ्या कोरडवाहू जमीन वागविणाऱ्या शेतकऱ्यांची ही व्यथा डोळ्यांच्या डोहातलं पाणीही रखरखत्या उन्हानं कसं गिळून टाकलं ही करुणकहाणी कविता रेखाटते. "परका' ही कवितादेखील अशीच आशावादी आहे. आभाळ कवेत घेणाऱ्यांचे पाय जमिनीवरच असायला हवेत असा आग्रह धरणारा हा कवी झाड व्हा! असा सल्ला नव्या पिढीला देत आहे. दुसऱ्याच्या सावलीसाठी झाड व्हा, असा आग्रह धरतो.
एकीकडे रुसलेला पाऊस व दुसरीकडे अतोनात सुरू असलेली जंगलतोड यामुळे झाडदेखील सावलीच्या शोधात निघाले आहे, तुमच्या कुऱ्हाडीच्या झपाट्यातून वाचलो तर वाऱ्यावर डोलण्याची फिनिक्‍सची जिद्द बाळगणारे झाड राहील, असा आशावाद "सावली' ही कविता व्यक्त करते. बालकवी हे प्रा. दास यांचे आवडते कवी. यापूर्वीच्या संग्रहात तसेच कोसळेपर्यंतमध्येदेखील त्यांनी बालकवींवर "मृत्युपत्र' व "ऊनभर' याबरोबर मर्ढेकरी कवितेविषयीचीही कविता यात आहे.

कोसळेपर्यंत
प्रा. राजेंद्र दास
प्रकाशक - सुविद्या प्रकाशन,
३७४ उत्तर कसबा, सोलापूर - ४१३००७
पृष्ठे ८७, मूल्य ७० रुपये

वाङ्मयसंदर्भशिफारसमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 11:52 pm | विसोबा खेचर

एकीकडे रुसलेला पाऊस व दुसरीकडे अतोनात सुरू असलेली जंगलतोड यामुळे झाडदेखील सावलीच्या शोधात निघाले आहे, तुमच्या कुऱ्हाडीच्या झपाट्यातून वाचलो तर वाऱ्यावर डोलण्याची फिनिक्‍सची जिद्द बाळगणारे झाड राहील, असा आशावाद "सावली' ही कविता व्यक्त करते. बालकवी हे प्रा. दास यांचे आवडते कवी. यापूर्वीच्या संग्रहात तसेच कोसळेपर्यंतमध्येदेखील त्यांनी बालकवींवर "मृत्युपत्र' व "ऊनभर' याबरोबर मर्ढेकरी कवितेविषयीचीही कविता यात आहे.

धन्यवाद जालसर्वज्ञसाहेब,

'कोसळेपर्यंत' नक्की वाचेन..

तात्या.