मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात. कदाचित चाळीशी उलटल्याचा हा परिणाम असावा किंवा हल्ली म्हातारचळ लवकर सुरु होत असावा.
ॠषीमुनींनी कोहम् या प्रश्नाचं उत्तर सोहम् असं देऊन ठेवलंय. पण ऋषीमुनींना वाटलं होतं तेवढा मी सोहम् म्हणण्याएवढा वरच्या दर्जाचा पोचलेला माणूस नाही असं हल्ली मला प्रामाणिकपणे वाटू लागलंय. तुमच्या समोर हे कबूल करण्यात कसली आली आहे लाज!
माझे पाय मातीचे असून उगाच बेडकासारख्या टणाटण उड्या मारत बसून आपण काय साधतोय याचा शोध आता नाही घ्यायचा तर मग कधी घ्यायचा? साठी उलटून गेल्यावर शोधून काय उपयोग? सुनिता विल्यम्स ने म्हटलं होतं की अंतराळात गेल्यावर माझ्या लक्षात आलं की संपूर्ण विश्वात पृथ्वी एवढी छोटी आहे की त्यातल्या आपल्या वैयक्तिक समस्या, दुःखे तर अगदीच नगण्य आहेत आणि आपण उगाचच बाऊ करत होतो त्याचा! कॉर्पोरेट विश्वात ३६० डिग्री रिव्ह्यू नावाचा एक आपली गुणवत्ता तपासण्याचा प्रकार असतो. मला वाटतं त्याचा खरा अर्थ हा आहे की आपण किती छोटे आहोत ते लक्षात घ्या आणि ते लक्षात आल्यावर ३६० डिग्री वर्तुळाप्रमाणे तुमचं डोकं गरागरा फिरायला लागेल.
जसजसं वय वाढत जातंय तसं सगळंच भ्रामक असल्याचं मला अचानक वाटायला लागलंय. म्हणजे प्रॉब्लेम नक्की माझ्यात आहे की बाहेर हे न कळण्याइतपत वेगाने हा बदल चाललेला मला दिसतोय. कित्येक माणसे मला अगदी कुळाचार असल्यागत वेगवेगळे सुविचार, तात्त्विक विचार रोजच्या रोज व्हॉट्सअॅप वर पाठवत असतात. बहुधा मला त्याची फारच गरज असावी असं त्यांना मनापासून वाटत असावं. आणि खरोखर गरज असेलही कदाचित. पण आताशा माझ्या लक्षात आलंय की खुद्द सुविचार पाठवणाय्रा माणसाची वागणूक आणि त्याने पाठवलेला सुविचार यांचा देखील फारसा काही संबंध नसतो. असं वाटतं की त्याला सांगावे, अरे भल्या माणसा हे मला पाठवायच्या आधी स्वतः वापरून बघितलं असतस तर फार छान झालं असतं. पण मग वाटतं जाऊंदे कारण हे सांगितल्यावर त्याने मला त्यावर आणखी एक सुविचार पाठवला तर जास्तच पंचाईत व्हायची माझी. म्हणजे थोडक्यात माणसं भ्रामक अन् त्यांची वागणूक भ्रामक. एकाच गोष्टीवर शंभर वेळा काथ्याकूट करून त्याचा कीस पाडणाऱ्या माणसांची देखील एक वेगळी जमात आहे. मला कमाल वाटते त्यांची. कमाल अशाकरता की ते माझा विचारच करत नाहीत. इतक्या वेळा एकच गोष्ट मला सांगितल्यामुळे कदाचित मी वेडा होईन ही माझ्याबद्दल त्यांना काळजी कशी वाटत नाही याचंच नवल वाटतं. किंवा मी अगोदरच वेडा असून आता आणखी परिस्थिती बिघडण्याचा काही धोका नाही असं तरी त्यांना वाटत असावं. बरं हल्ली कोणाकडून कसल्याही अपेक्षा ठेवणं हे देखील धोकादायक झालंय. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या दुःखांमध्येच इतका आकंठ बुडालेला असतो की त्याला काही मी काम सांगितलं तर मी जगातला एकमेव बेरोजगार माणूस असूनही आणि तो इतका बिझी असूनही मी त्याला काम कसं काय सांगितलं असे भाव मला त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि मग उगाचच अपराध्यासारखं वाटायला लागतं आणि मग त्याचीच काही कामं माझ्या पदरात पडतात आणि त्यानंतर एखाद्या परोपकारी सज्जनासारखा मी विजयी मुद्रेने तिथून निघून येतो. यथावकाश कळतं की आपण बाळगत असलेल्या अपेक्षाही भ्रामक. ही अशी एकाएकी उपरती व्हायला लागल्यावर जग मिथ्या आहे की मीच भ्रमिष्ट झालो आहे अशी हळूच भीती देखील वाटू लागते.
आदिमानव जेव्हा जन्माला आला तेव्हा एकट्याने रहायचा. नंतर कुटुंब संस्था अस्तित्वात आली. नंतर सामाजिक बांधिलकी वाढीला लागली आणि कुटुंबाच्या बाहेरच्यांचा देखील विचार होऊ लागला. पण life takes a full circle many a times. चंगळवादी अशा आजच्या जगात माणसं पुन्हा कोषात जाऊ लागली. समाजाला विसरली. समाज सोडा, आपला शेजारी कोण हे सुद्धा हल्ली माहीत नसतं आपल्याला. कुटुंबांमध्ये कलह माजण्याचं प्रमाण आता वाढत चाललंय कारण प्रत्येकाला स्वतःची ‘space’ हवी आहे. मोबाईल मध्ये जशी ८ जीबी नंतर १६, १६ नंतर ३२ जीबी space असलेला फोन घ्यावासा वाटतो तशीच आपल्या आयुष्यात आपल्याला हवी असलेली space वाढत चालली आहे. कालांतराने माणूस पुन्हा आदिमानवासारखा एकेकटा राहू लागेल. फरक एवढाच असेल की त्या वेळच्या आदिमानवाच्या अंगावर कपडे नसायचे. आता पूर्ण कपड्यांत, सुटाबुटात माणूस एकटा राहायला लागेल. बरोबर स्मार्टफोन आणि फेसबुक असलं म्हणजे झालं. अहो पाहिजेच ते कारण आजूबाजूच्या समदुःखी आदिमानवांशी ‘व्हर्चुअल’ संपर्क नको का ठेवायला?
वाल्या कोळी ला एका क्षणी कळलं की आपल्या पापांमध्ये वाटेकरु व्हायला कोणी तयार नाही आणि त्या नंतर त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. मला सुद्धा हल्ली वाटायला लागलंय की आपली जगण्यासाठी जी धडपड चालू आहे ती बहुधा माझी एकट्यासाठीच चाललेली धावपळ आहे. फक्त वाल्मिकी ऋषी व्हायचं तर मनाचा निर्धार पाहिजे. तो कुठून आणणार?
आणि जो पर्यंत हा निर्धार होत नाही तो पर्यंत स्वतःला विचारत राहायचं, कोहम्? आणि त्याचं उत्तर सोहम् असं न मिळता नोहम् म्हणजे ‘मी कुणीच नाही’ असंच मिळत रहाणार... त्याला ईलाज नाही.
प्रतिक्रिया
7 May 2018 - 1:06 pm | प्रकाश घाटपांडे
लेख आवडला. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच आयुष्य निघून जाणार आहे.बेडकाच आयुष्य डबक्यात आहे असे जरी मानले तरी ते त्याच्यासाठी असलेले विश्व आहे. बाहेरच विश्व कितीही अफाट असले तरी त्याचा याला काही उपयोग नसतो. आपलही तसच आहे.
7 May 2018 - 5:13 pm | कुमार१
सहमत.