गूढ अंधारातील जग -८

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
9 Feb 2018 - 9:08 pm

गूढ अंधारातील जग -८

खोल समुद्रातील जीव सृष्टी

आपण समुद्रात खोल गेलो कि दर १० मीटरला १ बार(१४ psi pound per square inch) या दराने दाब वाढत जातो. तर साधारण १००० मीटर खोलीवर हा दाब १४००० psi. तुमच्या कारचे टायर प्रेशर ३० psi च्या आसपास असते. हा दाब म्हणजे एका चौरस इंचावर ८ टन किन्वा तुमच्या डोक्यावर १०० हत्ती उभे केले तर होईल तितका दाब आहे.
महासागरातील सर्वात खोल मरियाना घळीची खोली १०००० मीटर असली तरी महासागराची सरासरी खोली ४००० मीटर असते. आणि बरेचसे जीव हे १००० मीटर पेक्षा खोल जात नाहीत.
मग एवढा दाब काही सजीव कसे सहन करतात. पहिली गोष्ट म्हणजे जलचरांच्या शरीरात हवा नसते.माणूस किंवा भूपृष्ठावरील जीव हे फुप्फुसात हवा घेऊन श्वसन करतात. त्यामुळे फुप्फुसातील दाब हा १ बार(१४ psi) इतकाच असतो. पण खोल पाण्यात १००० पट दाबाने आपली फुप्फुसे पार चेपली जातील.
पण माशांच्या शरीरात हवा नसतेच कारण ते श्वसन "गिल"च्या साहाय्याने करतात. म्हणजेच पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन हा गिलवरून जाताना माशाच्या रक्तात शोषला जातो. त्यामुळे माशाच्या शरीरात आतील दाब आणि बाहेरील दाब हा एकाच पातळीवर असतो आणि घन आणि द्रव पदार्थ हे noncompressible ( संक्षिप्त न होणारे) असतात.
शिवाय या प्रचंड दबावाचा परिणाम सजीवांच्या शरीरातील प्रथिनांवर होऊ नये म्हणून हे जलचर आपल्या पेशींच्या पृष्ठ भागावर पिझोलाईटस (piezolytes) (PEIZO --PRESSURE ) नावाचे छोटे सेंद्रीय पदार्थ(small organic molecules) जमवून ठेवतात, यातील एक पदार्थ म्हणजे TMAO Trimethylamine oxide. या पदार्थामुळे माशांना माशांचा "खास" वास येतो. (किंवा मासळीबाजारात येणार विशिष्ट वास). या पिझोलाईट्स मुळे जलचरांच्या पेशी बाहेरील प्रचंड दबाव सहन करू शकतात. हा "TMAO" खोल पाण्यातील माशांमध्ये जास्त असल्याने खोल पाण्यातील माशांना उथळ पाण्यातील किंवा नदीतील माशांपेक्षा "माशांचा" जास्त वास येतो

अर्थात समुद्र तळाशी केवळ प्रचंड दबाव असतो असे नाही तर तापमान पण उणे १ ते ४ अंश सेल्सियस इतके कमी असते. याचा अर्थ डिप फ्रीझर मध्ये चिरडले गेल्याची स्थिती असते. असे होऊ नये म्हणून पिझोलाईट्स असतात आणि थंडी सहन व्हावी म्हणून जलचरांच्या शरीरावर चरबीचा थर असतो. पण एवढ्या कमी तापमानाला हि चरबी डीप फ्रिझर मध्ये ठेवलेल्या अमूल बटर /तुपासारखी घट्ट/ कडक होऊ नये(ज्यात संतृप्त मेदपदार्थ जास्त असतात) म्हणून त्या चरबी मध्ये UNSATURATED FATS जास्त असतात. या असंतृप्त मेद पदार्थामुळे (UNSATURATED FATS) मासे खाणे किंवा माशाचे तेल खाणे हे हृदयविकाराचा उपयुक्त असते असे आढळून आले आहे.

समुद्रतळाशी राहणारे अजून अनेक तर्हेचे जीव आहेत ज्यात जिवाणू आणि एकपेशीय प्राणी पण आहेत.
फोरॅमिनीफेरा नावाचे एकपेशीय जलचर ( कोरल गटातील )-- उथळ पाण्यातील जलचरसाधारण खोलीवर स्वतःभोवती कडक कॅल्शियम कार्बोनेटचे घर तयार करतात. पण इतक्या प्रचंड खोलीवर असे कडक कॅल्शियम कार्बोनेटचे घर प्रचंड दबावामुळे चरडून नष्ट होईल म्हणून हे जीव स्वतःभोवती चामड्यासारखे चिवट थर तयार करतात.
येथे एकंदर प्रकाश फार कमी पोचणार असल्याने तेथे वावरणाऱ्या जीवानी तेथील वातावरणाप्रमाणे आपल्या शरीर रचनेत बदल केलेले आहेत. त्यामध्ये काही सजीवानी आपल्या डोळ्याचा आकार मोठा केला आहे काहींनी आपले शरीरच पारदर्शक केले आहे ज्यामुळे जेथून कुठून प्रकाशाचा किरण कवडसा येईल त्याचा संपूर्ण उपयोग होऊ शकेल

महासागराच्या तळाशी प्रकाश तर पोचत नाही त्यामुळे तेथे वनस्पती किंवा शैवाल वाढू शकत नाही. मग हे जीव तेथे आपली उपजीविका कशी करतात. सागरतळाशी असलेले जिवाणू (बॅक्टरीया) सागर तळाशी असलेल्या खनिज उत्सर्जनातून बाहेर पडलेले गंधकाची संयुगे मिथेन आणि कार्बन डायऑकसाईड या पदार्थातून ऊर्जा मिळवतात असे दिसून आले आहे.
अशी परिस्थिती पृथ्वीच्या जन्माच्या वेळेस होती त्यावेळेस अशा निरिंद्रिय(inorganic) पदार्थातून आपली उपजीविका करणारे जीव जन्मास आले होते त्यामुळे या जीवनाचा अभ्यास केल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उगमाबद्दल बरीच माहिती मिळू शकेल असे त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाना वाटते आहे.
शिवाय सागरी पृष्ठभागावर मृत पावलेल्या सजीवांची कलेवर खाली पोहोचतात त्यावर अनेक जीव आपला उदरनिर्वाह चालवतात.

जेम्स कॅमरून हा फिल्म मेकर नॅशनल जिओग्राफिक्स च्या तर्फे मरियाना घळीत गेला होता आणि त्याने अनेक चित्रफिती आणि नमुने हि गोळा केले.

असेच अनेक नमुने मानवरहित पाणबुडी सदृश्य वाहनांनी गोळा केले आहेत त्यांच्या पृथक्करणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण चालू आहे.

या सुरस आणि चमत्कारिक जीवनाबद्दल माहिती खालील दुव्यावर मिळू शकेल. जालावर खोदकाम केल्यास असे असंख्य दुवे मिळतात

https://animals.howstuffworks.com/marine-life/10-weird-creatures-from-ma...
http://earthsky.org/earth/new-video-shows-life-in-the-deepest-ocean

प्रकटनमुक्तक

प्रतिक्रिया

माहितीपुर्ण भाग. आवडला.

कपिलमुनी's picture

9 Feb 2018 - 11:58 pm | कपिलमुनी

गूढ अंधारातले जग आवडले .
पुढील लेखास शुभेच्छा !!
काही चित्रफिती , फोटो असते तर आवडले असते.

सुबोध खरे's picture

10 Feb 2018 - 9:32 am | सुबोध खरे

खाली दोन दुवे दिलें आहेत ते पाहून घ्या. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ जालावर उपलब्ध आहेत. बँड विड्थ उगाच का फुकट घालवा.

एस's picture

10 Feb 2018 - 12:06 am | एस

Deception Point या कादंबरीत मारियाना ट्रेंचच्या तळाशी असलेल्या प्रचंड दाबाचा वापर करून एक फसवे रहस्य कसे तयार केले जाते हे दाखवले आहे. ही कादंबरी मुळातच वाचनीय आहे. डॅन ब्राऊनची कादंबरी आहे.

प्रमोद देर्देकर's picture

10 Feb 2018 - 7:58 am | प्रमोद देर्देकर

धन्यवाद डॉ.

मला अगदी हीच माहिती हवी होती. मुलगा समुद्राविषयी सारखे काही ना प्रश्न विचारत असतो. अजून येवू दे.

पाणबुड्यांच्या निमित्ताने समुद्री जीवसृष्टीची छान माहिती मिळाली, हा भागही आवडला.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2018 - 5:28 pm | अमरेंद्र बाहुबली

आधीचे आणि हा सर्व भाग आवडले. लिहीत राहा सर

निशाचर's picture

14 Feb 2018 - 7:58 pm | निशाचर

छान माहिती, भाग आवडला.
एक शंका, unsaturated ला मराठीत असंपृक्त म्हणतात ना?

सुबोध खरे's picture

14 Feb 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

unsaturated ला मराठीत असंपृक्त म्हणतात ना?
होय
तसेच आज काळ असंतृप्तहि म्हणतात.
याची व्युत्पत्ती माहिती नाही.

अच्छा! शाळेत असताना संपृक्त/असंपृक्त मेदाम्ल असं ऐकलेलं आठवत होतं म्हणून विचारलं.

यसवायजी's picture

14 Feb 2018 - 9:38 pm | यसवायजी

सगळे भाग वाचले. खूप चांगली माहिती दिलीत डॉक्टर.

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 6:48 pm | manguu@mail.com

छान.

सुधीर कांदळकर's picture

21 Feb 2018 - 8:24 am | सुधीर कांदळकर

वेधक, अर्थगर्भ, प्रवाही आणि एकंदरीतच अफलातून. ही संपूर्ण मालिका पुस्तकरूपाने छापल्यास कळवावे. मझ्या एका मित्राने आताच मागणी नोंदवली आहे.

धन्यवाद.

सगळे भाग वाचले. खूप चांगली माहिती दिलीत डॉक्टर.

अनन्त अवधुत's picture

22 Feb 2018 - 2:50 pm | अनन्त अवधुत

छान सुरु आहे मालिका.