गूढ अंधारातील जग -३

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
19 Nov 2017 - 11:45 pm

गूढ अंधारातील जग -३
पाणबुडीतील आयुष्य
पाणबुडीत आयुष्य फार खडतर असतं. ते म्हणेज अक्षरशः तुम्ही एखाद्या यंत्राच्या आत मध्ये राहण्यासारखे असते जेथे हवा पाणी आणि जागा या तिन्ही गोष्टी दुर्मीळ असतात. कारण पाणबुडीचा आकार जितका लहान करता येईल तितका चांगला (तिला लपणे तितके जास्त सोपे होते) आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त अस्त्रे संवेदक(sensors) बॅटरी भरता येतील तितके भरले जाते. त्यातून या खडतर जागेत काम करताना लोकांच्या हातून काम बिनचूक होणे अत्यावश्यक असते अन्यथा सर्वच्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे पाणबुडीत काम करणाऱ्या लोकांची एकमेकांशी नाती अतिशय घट्ट होतात आणि ती बहुधा आयुष्यभर टिकून राहतात.
पाणबुडीत दिवस आणि रात्र असा प्रकार नसतोच कारण कुठेच खिडकी नसते. त्यामुळे तेथे घड्याळाकडे पाहूनच दिवस आहे कि रात्र हे ठरवावे लागते. नौसैनिकांच्या मेंदूमध्ये दिवस रात्र या चक्रात गडबड होऊ नये म्हणून दिवसा पांढरे दिवे लावले जातात आणी रात्री अतिशय कमी प्रकाशाचे असे लाल दिवे लावले जातात. तेथील दिवस हा १८ तासांचा असतो. म्हणजे सहा तासाच्या तीन पाळ्या असतात. जागा अतिशय कमी असल्याने तीन जणाना मिळून दोन बिस्तर असतात. आणि हे सुद्धा जिथे जागा मिळेल तिथे टाकलेले असतात. कित्येक वेळेस सैनिकांना ५५ सेमी व्यासाच्या( पावणे दोन फूट) टॉर्पेडो ट्यूब( पाणतीर नलिका) मध्ये झोपावे लागते.
प्रत्यक्ष पाणबुडी जेंव्हा डिझेलवर चालत असते तेंव्हा त्याच्या इन्जिन , जनरेटर , पम्प यांचा सर्वांचा भयानक आवाज येत असतो. कारण आतला आवाज बाहेरच्या जहाजाला येऊ नये म्हणून पाणबुडीच्या बाहेरच्या कवचावर आवाजरोधी रबराचा एक जाड थर लावलेला असतो. त्यामुळे हा आतला आवाज पण बाहेर जात नाही. आपल्याला रिकाम्या वेळात संगीत ऐकायचे ते एखाद्या पिठाच्या चक्की वर बसून कसे ऐकायला येईल तसा पार्श्वभागावर आवाज चालू असतो. आपला बंक पण हादरत असतो.
आपण एकदा पाण्याखाली गेलो कि बाह्य जगाशी कोणताच संपर्क राहत नाही. त्यामुले ताज्या बातम्या जगात काय चाललं आहे याचा सैनिकाचा काहीही संबंध राहत नाही. ( अनुभव म्हणून हे थोडे दिवस ठीक असेल पण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ फुकट गेला अशीच भावना माझ्या मनात कायम येत असे)
पाणबुडी पाण्याखाली असताना त्यात पाणी हे अतिशय मूल्यवान असते त्यामुळे कपडे धुणे सारख्या कामाना पाणी नसतेच. सैनिक फिकट निळ्या रंगाचे ढगळ असे सुती कपडे घालतात आणि दर तीन दिवसांनी हे कपडे टाकून दिले जातात.(disposable)
मी विक्रांत वर असताना आमचे कॅप्टन रवींद्रनाथ गणेश हे भारताची पहिली अणू पाणबुडी "चक्र"चे कॅप्टन म्हणून काम करून विक्रांतवर कमांड करायला आले होते. एक दिवस विभागप्रमुखांच्या सभेत ते अधिष्ठासी अधिकाऱ्याला(executive officer) सांगत होते कि माझ्या बाथरूम मध्ये फक्त "अर्धी" बालदी पाणी होते त्यात अंघोळ करणे कठीण गेले त्यावर आमचे कमांडर एअर त्यांना म्हणाले सर आता तुम्ही पाणबुडीत नसून एका बलाढ्य अशा विमानवाहू नौकेवर आहात तुमच्या साठी वेगळे न्हाणी घर असून तेथे कमांडिंग अधिकारी याची खास सोय(privilege) म्हणून तुम्हाला २४ तास गरम आणि गार असे आणि पाहिजे तेवढे पाणी उपलब्ध आहे. त्यांना चक्र सारख्या "अणू पाणबुडीचे" कमांडिंग अधिकारी म्हणून (privilege)"विशेष सोय" म्हणून एक बालदी पाणी मिळत असे.

सैनिक जेंव्हा गस्तीवर जातात तेंव्हा आपल्या घरून अत्यंत कमीत कमी सामान घेऊन येतात कारण प्रत्येक माणसाला फार तर एक सुटकेस ठेवता येईल एवढीच जागा दिलेली असते.

सर्वच्या सर्व नौसैनिकांना दर तीन महिन्यांनी याच टॉर्पेडो (पाणतीर) नलिकेतून अंधाऱ्या रात्री पाणबुडीच्या बाहेर पडण्याचा (escape) आणि पोहून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सराव करावा लागतो. ज्यांनी अंधाऱ्या रात्री समुद्रात पोहण्याचा अनुभव घेतला आहे त्यांना हे किती भयाण आहे त्याचा अनुभव येऊ शकतो.

पाणबुडीच्या लपून राहण्याचे मुख्य कारण ती अजिबात आवाज करत नाही. हा आवाज होऊ नये म्हणून प्रत्येक नट बोल्ट ला रबरी वॉशर लावलेला असतो. डिझेलच्या
इंजिन, जनरेटर, पम्प पाईप या सर्वांच्या हादऱ्यांमुळे हे नट आणि बोल्ट सारखे ढिले होऊ नयेत म्हणून ते सारखे घट्ट करत राहायला लागते.

पाणबुडीची डिझेल इंजिने हि जनरेटर चालवतात या जनरेटर वर तयार होणाऱ्या विजेनेच पाणबुडीचा पंखा चालतो आणि याच विजेने त्यातील बॅटरी चार्ज होत असते. हि बॅटरी कायम उत्तम स्थितीत ठेवावी लागते त्यातील सल्फ्युरिक आम्ल पाणी याची पातळी कायम ठेवावी लागते. त्यात तयार होणारी सल्फ्युरिक आम्लाची वाफ बाहेर कुठेही जाऊ शकत नसल्याने पाणबुडीतील हवेचा दर्जा खालावू नये म्हणून त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो.

समुद्रात खोल गेल्यावर पाण्याचे तापमान ४ अंश सेल्सियस असते त्यामुळे पाणबुडीचे तापमान सुद्धा वर आणावे लागते आणि किनाऱ्यावर आले कि तापमान २४ ते ३८ अंश से असते ते पण नियन्त्रित करावे लागते.
पाणबुडीतील स्वयंपाक घर हेही अतिशय लहान असते आणि तेथील सर्व स्वयंपाक हा विजेच्या शेगडीवरच करावा लागतो. त्यामुळे भारतीय पद्धतीचा स्वयंपाक विशेषतः फोडणी सारख्या गोष्टी जरा जपुनच कराव्या लागतात त्यामुळे तेथे मिळणारे अन्न हे जास्त करून अगोदरच तयार केलेलं असते. तरीही अशा बंद जागेत इतर फारशी कोणतीही सुखसोयी नसल्यामुळे सैनिक जेवणाबाबत जास्त काटेकोर असतात. यामुळे त्यांना नुसतेच चविष्ट नव्हे तर पौष्टिक अन्नहि मिळेल अशी व्यवस्था करावी लागते.
पाणबुडी जेंव्हा गस्तीवर निघते तेंव्हा ती किती दिवस जाणार आहे आणि कुठे जाणार आहे हे त्या पाणबुडीच्या कॅप्ट्नलाही माहित नसते. त्याला हि आज्ञा बंद लिफाफ्यामध्ये बंदर सोडताना दिली जाते. साधारण शिधा आणि रेशन किती दिवसाचे भरले आहे यावरून सैनिक अंदाज करत असतात. पण आपल्या मागे आपल्या कुटुंबाला काही गरज लागली तर काय करायचे याची सर्व तजवीज सैनिकाला करून ठेवावी लागते. घरचे कोणी आजारी असेल काही महत्त्वाचे काम असेल तर काय करायचे याची काळजी सुद्धा मागे ठेवूनच सैनिकाला निघावे लागते.
बाकी युद्धाचा सराव सारख्या गोष्टी तर होतच राहतात. सैनिकांना तंदुरुस्त राहण्यासाठी छोटेखानी व्यायामशाळा पण असते.
पाणबुडी हि साधारण २०० ते ४०० मीटर इतक्या खोलीपर्यंत डुबकी मारून जाते तेथे तिच्यावर असणारा पाण्याचा दाब हा सदर १० मीटर ला १ atm किंवा १ kg
/ sq cm असतो म्हणजेच १०० मित्र खोली वर हा दाब ११ atm किंवा साधारण ११ मग / sq cm असतो. आपल्या कारच्या टायर मध्ये २. ५ kg/ sq cm इतका दबाव असतो
तेथे ४० जणांना मिळून एक किंवा दोन संडास असतात आणि त्याचा मैला पाण्याखाली असताना बाहेर टाकण्यासाठी दाब देऊन बाहेर टाकणारी पम्पावर चालणारी प्रणाली असते त्यात पहिल्यांदा मैल एका पाईप मध्ये घेऊन वरील झडप बंद करावी लागते बाहेरील झडप उघडावी लागते आणि मगच पम्प चालू करावा लागतो यात काही चूक झाली तर याच संडासात मेल्याचे कारंजे उडते. हा अनुभव जवळ जवळ १००% सैनिकांनी घेतलेला असतो.
प्रत्येक ठिकाणी असे डोळ्यात तेल ठेवून काम करावे लागते.
सैनिकांना शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्या पण खंबीर असावे लागते. कारण महिनोन्महिने कुटुंबापासून दूर अंधाऱ्या जगात जेथे अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मूलभूत गरजा सुद्धा नीट पूर्ण होत नाहीत.
मानाची म्हणून समजली जाणारी नोकरी प्रत्यक्ष काय असते याची सामान्य माणसाला साधी जाणीव ही नसावि याची खंतही काही वेळेस आढळून येते. हे सर्व मागे टाकून हि माणसे काय मानसिकतेने तेथे नोकरी करत असतात याचे मला राहून राहून फार आश्चर्य आणि कौतुक वाटते. अशा नाही चिरा नाही पणती म्हणून जगणाऱ्या माणसांना माझ्या तर्फे हि एक दंडवत.
प्रत्यक्ष पाणबुडीत काम कसे चालते हे पाहण्यासाठी आपण रॉकी आणि मयूर यांच्या हायवे ऑन माय प्लेट या कार्यक्रमाचे हे दोन व्हिडीओ जरूर पहा.
https://www.youtube.com/watch?v=aCSa0xglJNc
https://www.youtube.com/watch?v=MEO9l5jq_iM
क्रमशः

प्रकटनमुक्तक

प्रतिक्रिया

एस's picture

20 Nov 2017 - 12:00 am | एस

_/\_

पाणबुडी नौसैनिकांबद्दल एव्हढी माहिती पहिल्यांदाच मिळाली.

असे खडतर आयुष्य जगून देशाची सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांना सलाम.

पाण्याखाली डिझेल इंजिनाला प्राणवायूचा पुरवठा कसा होतो? आणि एक्झॉस्ट गॅसचा निचरा कसा करतात? त्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होत नाहीत का?

विसू : काही ठिकाणी प्रूफरिडींगच्या कमतरतेमुळे रसभंग होतो त्याकडे कृपया लक्ष द्यावे.

सुबोध खरे's picture

29 Dec 2017 - 12:27 pm | सुबोध खरे

पाण्याखाली डिझेल इंजिनाला प्राणवायूचा पुरवठा कसा होतो? आणि एक्झॉस्ट गॅसचा निचरा कसा करतात? त्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होत नाहीत का?
पाणबुडीच्या पेरिस्कोपची उंची ६० फुटापर्यंत असू शकते या पेरिस्कोपमध्ये दोन नळकांडी असतात. एकातून डिझेल इंजिनाला लागणारी हवा खेचली जाते आणि दुसऱ्या नळकांड्यातून इंजिनाचा धूर बाहेर सोडला जातो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली ६० फुटापर्यंत राहून पाणबुडीला आपले इंजिन चालवून आपल्या बॅटऱ्या चार्ज करता येतात. साधारणपणे हे काम रात्रीच केले जाते त्यामुळे उपग्रह किंवा विमाने यांच्या नजरेस न येत पाणबुडीला आपल्या बॅटऱ्या चार्ज करता येतात. याच नळकांड्यातून शुद्ध हवा सुद्धा आत खेचता येते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2017 - 2:17 am | डॉ सुहास म्हात्रे

पाणबुडीतील जीवनाच्या खडतरपणाची कल्पना येत आहे. सर्वसामान्य माणसे, हातात बदूक घेऊन नेत्यांना संरक्षण देत असलेल्या उत्तम गणवेशात असलेल्या संरक्षकांवरून सैनिकांच्या जीवनाची (क्या रोब है भाय !) कल्पना करतात. त्यांना, अशा मालिकेवरून, सैनिकांच्या खर्‍या जीवनातील खडतरपणाची जाणीव झाली तरी, माझ्या मते, या मालिकेचा पुरेपूर फायदा झाला असे होईल.

मालिका अधिकाधिक रोचक बनत आहे. पुभाप्र.

निशाचर's picture

20 Nov 2017 - 4:37 am | निशाचर

_/\_

पुभाप्र

मध्यंतरात गाझी ऍटॅक नावाचा "१९७१ भारत पाक " युद्धातील एका थरारक सत्य घटनेवर आधारित चित्रपट पाहण्यात आला होता,छान भूमिका केल्या होत्या मात्र त्यातील काही गोष्टी अतिरंजित वाटल्या (पूर्णपणे बंद पडलेली पाणबुडी समुद्रतळाशी जाऊन ही इंधनाशिवाय केवळ अर्धंक्षमतेवर चालणाऱ्या बॅटरीवर परत वर खेचली जाणे)
उच्चतम तंत्रज्ञान आणि अतुलनीय शौर्य यांचा संगम म्हणजे पाणबुडी व नौसैनिक ; तुमच्या या मालिकेमुळे बऱ्याच गोष्टींची जवळून ओळख होईल.
पुभाप्र

सुबोध खरे's picture

20 Nov 2017 - 9:43 am | सुबोध खरे

हा सिनेमा मी पूर्ण पाहिलेला नाही. परंतु जर बॅटरीमध्ये अर्धाच काय अगदी तुरळक चार्ज असेल तरीही पाणबुडीला वर येण्यात काहीच कष्ट होऊ नयेत कारण पाणबुडीच्या ballast टँक्स मध्ये दाबाखाली असलेल्या हवेच्या (pressurized air) टाक्यातून हवा सोडली कि पाणबुडीचे वजन कमी होऊन ती पृष्ठभागावर तरंगू लागते.
(मला तरी असे वाटते कि बॅटरी पूर्ण डेड झाली तरी या टाक्यातील हवा ballast टँक्समध्ये प्रत्यक्ष हाताने सोडण्याची व्यवस्था(वाल्व्ह) असणारच. कारण यावरच सगळ्या नैसिनिकांचे आयुष्य अवलंबून असते) पण हि गोष्ट मी माझ्या मित्रांकडून खात्री करून घेईन.
मी सुरुवातीला पाणबुडीची बांधणी आणि तंत्रज्ञान यावर लिहिणार होतो ते यासाठीच. पण लोकांच्या आग्रहामुळे आतील राहणी वर लेख अगोदर लिहिला.
असो यावर पुढच्या लेखात सविस्तरपणे येईलच.

रश्मिन's picture

21 Nov 2017 - 2:50 pm | रश्मिन

जरूर
वाट बघतोय.. ही मालिका देखील उत्तरोत्तर रोचक होत जाणार आहे !

अभिजीत अवलिया's picture

20 Nov 2017 - 9:28 am | अभिजीत अवलिया

चांगली माहिती मिळतेय.

संग्राम's picture

20 Nov 2017 - 9:31 am | संग्राम

एक प्रश्न ... मानव रहीत दुरनियंत्रीत पाणबुडी असते का ?

सुबोध खरे's picture

20 Nov 2017 - 10:14 am | सुबोध खरे

https://www.youtube.com/watch?v=shQa-N22NKw
आणखी एक व्हिडीओ पाणबुडीतील आयुष्य दाखवणारा

गोंधळी's picture

20 Nov 2017 - 10:47 am | गोंधळी

अंतराळातील वायुयानात काम करण्यापेक्षा पाणबुडीत काम करणे खडतर वाटते आहे.

पुभाप्र.

डॉक. तुमच्या या लेख माझे एक ज्येष्ठ सहकारी श्री. पाटील यांचेसोबत शेअर करत आहे, ते भारतीय आरमारात पाणबुडी विभागात बरीच वर्षे कार्यरत होते, त्यांनी भारतीय, रशियन आणि जर्मन पाणबुड्यांमध्ये काम केलेलं आहे, अगदी युद्धकाळात देखिल.

लाल टोपी's picture

20 Nov 2017 - 11:23 am | लाल टोपी

>>पाणबुडी जेंव्हा गस्तीवर निघते तेंव्हा ती किती दिवस जाणार आहे आणि कुठे जाणार आहे हे त्या पाणबुडीच्या कॅप्ट्नलाही माहित नसते. त्याला हि आज्ञा बंद लिफाफ्यामध्ये बंदर सोडताना दिली जाते>>
याचे कारण काय असावे डॉक्टर साहेब? सुरक्षेसाठी गोपनीयता नसावे कारण संचलनाचे सर्व निर्णय कॅप्टनलाच घ्यायचे असतात ना?

सुबोध खरे's picture

22 Nov 2017 - 12:00 am | सुबोध खरे

चुकूनसुद्धा ती गोष्ट बाहेर कुणाला कळू नये यासाठी हा खटाटोप असावा. पाणबुडी प्रत्यक्ष कुठे जाणार आहे याचा निर्णय फक्त वॉर रुम मधील वरिष्ठ सेनाधिकार्यांना माहीत असतो.

सुबोध खरे's picture

22 Nov 2017 - 12:01 am | सुबोध खरे

चुकूनसुद्धा ती गोष्ट बाहेर कुणाला कळू नये यासाठी हा खटाटोप असावा. पाणबुडी प्रत्यक्ष कुठे जाणार आहे याचा निर्णय फक्त वॉर रुम मधील वरिष्ठ सेनाधिकार्यांना माहीत असतो.

दीपक११७७'s picture

20 Nov 2017 - 11:53 am | दीपक११७७

जबरदस्त!

उपेक्षित's picture

20 Nov 2017 - 12:45 pm | उपेक्षित

रंजक माहिती...

अपरिचित जग आणि त्यातील खडतरपणा समोर आणल्याबद्दल धन्यवाद डॉक.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2017 - 12:49 pm | टवाळ कार्टा

_/\_

दुर्गविहारी's picture

20 Nov 2017 - 1:06 pm | दुर्गविहारी

कहर!!! ____________/\_________________________ असे काही आयुष्य पाणबुडीत असेल असे वाटले नव्हते. पु.भा.प्र.

Nitin Palkar's picture

20 Nov 2017 - 7:36 pm | Nitin Palkar

____/\____ ____/\_____

माहितीपूर्ण मालिका सुरु आहे. लेखन आवडले पण असे जीवन किती अवघड आहे हे वर्णन वाचून व दोन्ही चित्रफिती पाहून समजले. गाझी अ‍टॅक हा सिनेमा पाहताना अशी खिळून राहिले होते तसेच लेख वाचताना वाटते.

लोनली प्लॅनेट's picture

22 Nov 2017 - 10:58 am | लोनली प्लॅनेट

साध्या बस च्या प्रवासाने आपली किती चिडचिड होते आणि हे लोकं तर किती गैरसोय सहन करतात

पाणबुडीतील सैनिकांच्या आयुष्याबद्दल वाचून फक्त स्वतःचे खिसे भरणाऱ्या क्षुद्र स्वार्थी राजकारण्यांची आणखीनच चीड आली

सुबोध खरे's picture

22 Nov 2017 - 11:25 am | सुबोध खरे

लष्करातील( भूदल वायुदल आणि नौदल) कमांडो आणि पाणबुडीतील सैनिक हे अतिशय समर्पित(dedicated) भावाने काम करत असतात. पाणबुडीतील नौसैनिक हे सुरुवातीला काही तरी रोमांचक करायचे म्हणून भरती होतात परंतु त्यांच्या प्रशिक्षणानंतर अतिशय खडतर आयुष्य असले तरी फारसे कोणी सोडून जात नाही( वैद्यकीय कारणामुळे बाहेर काढावे लागलेले सोडून). अगोदर त्यांना यासाठी मिळणारा भत्ता फक्त १२०० रुपये होता. या तुटपुंझ्या पैशासाठी कधीच कोणी पाणबुडी जॉईन करत नव्हते.
हा भत्ता ६ व्या वेतन आयोगाने १०,०००/- केला आणि आता ७ व्या वेतन आयोगात तो २०,०००/- केला आहे असे ऐकतो. हे निदान काही तरी सन्मान्य(RESPECTABLE) आहे
पण अशा "भत्त्यासाठी" आयुष्यभर अंधारात काढणे हे फारच जास्त आहे.

मराठी कथालेखक's picture

27 Nov 2017 - 4:16 pm | मराठी कथालेखक

पण मला वाटतंय आता काळ बदलतोय. बदलणारी जीवनशैली, मूल्ये, सभोवताली -तसेच कुटूंबातही वाढणारे पैशांचे आणि भौतिक सुखांचे महत्व केवळ समर्पित वृत्तीने खडतर आयुष्य जगण्यास तयार होणार्‍या तरुणांची कमतरता भासेल ..तेव्हा अशा खडतर कामासाठी भरपूर वेतन देणे आणि मनुष्यबळाची गरजच मुळात कमी करणे (रोबोट्स वापरुन) ही काळाची गरज ठरते आहे.

सुबोध खरे's picture

28 Nov 2017 - 1:30 pm | सुबोध खरे

पाण्याखालील पाणबुड्या किंवा पाणसुरूंग इ गोष्टी शोधून काढण्यासाठी अमेरिकी नौदल डॉल्फिनना प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर करत असे . भारतीय नौदलाने सुद्धा असे डॉल्फिन वापरायला सुरुवात केली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Dolphins-being-trained-to-...
डॉल्फिन हा एक अतिशय बुद्धिमान असा सस्तन प्राणी आहे आणि खाडीत किंवा नदीच्या मुखाशी किंवा बंदराच्या तोंडाशी लपून बसलेल्या पाणबुड्या किंवा पाणबुडे (divers) शोधून काढण्यासाठी आणि पाणसुरूंग शोधून काढण्यासाठी आणि त्यांचा स्फोट घडवून बंदर सुरक्षित करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अतिशय चिंचोळ्या जलमार्गात सुद्धा ते सहज वावरू शकतात हा एक फायदा आहेच. शिवाय हे प्राणी दिसायला माशांसारखे असल्याने पाणबुड्याना त्यांचा शोध लागत नाही किंवा संशय येत नाही. मानवापेक्षा पाण्यात घडणाऱ्या बदलांचा "वास" त्यांना पटकन आणि सहज लागतो. पोलीस किंवा लष्कर जसे अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे शोधून काढणाऱ्या शिक्षित कुत्र्यांचा वापर करतात तसेच हे डॉल्फिन वापरले जातात. धोकादायक ठिकाणी आणि पदार्थांबाबत या प्राण्यांच्या संवेदना(SENSES) जास्त चांगल्या काम करतात
अर्थात PETA सारख्या संसथानी याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.( त्यांचा कुत्र्यांचा असा वापर करण्यावरही विरोध आहेच.)

किल्लेदार's picture

10 Dec 2017 - 12:42 am | किल्लेदार

सहमत .....

नाखु's picture

22 Nov 2017 - 12:44 pm | नाखु

वरील _/\_

रुस्तम's picture

25 Nov 2017 - 10:15 am | रुस्तम

पुढील भाग लवकर टाका...

पैसा's picture

25 Nov 2017 - 11:16 am | पैसा

जबरदस्त लिहिताय!

सविता००१'s picture

25 Nov 2017 - 4:47 pm | सविता००१

आहे हे सगळंच. अजिबात माहित नसलेल्या या अंधारातल्या जगाची फार छान ओळख करून देत आहात.
या सार्‍याच नौसैनिकांना ___________/\___________दंडवत

पाषाणभेद's picture

25 Nov 2017 - 7:58 pm | पाषाणभेद

खडतर आयुष्य. मालिका चांगली चाललीय.

भटक्य आणि उनाड's picture

26 Nov 2017 - 11:50 pm | भटक्य आणि उनाड

मालिका चांगली चाललीय....

पिवळा डांबिस's picture

30 Nov 2017 - 2:58 am | पिवळा डांबिस

हे विचारण्यासाठी धागा वर काढत आहे. :)
दहा दिवस होऊन गेले भाग ३ लिहून!

सूड's picture

30 Nov 2017 - 6:54 pm | सूड

वाचतोय.

रुस्तम's picture

30 Nov 2017 - 10:23 pm | रुस्तम

पु भा प्र ल टा

सौन्दर्य's picture

1 Dec 2017 - 2:34 am | सौन्दर्य

डॉक्टर साहेब, फार सुंदर व माहितीपूर्ण लेखमालिका आहे ही. खूप नवीन माहिती कळली व सैनिकांच्या अतुलनीय त्यागाबद्दल त्यांच्या विषयीचा असलेला आदर द्विगुणीत झाला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

माबो वर अक्कलशून्य आणि इथे सिंथेटिक जिनिअस

रुस्तम's picture

1 Dec 2017 - 11:23 am | रुस्तम

चुकून प्रतिसाद इथे पडला. कृपया हा प्रतिसाद उडवावा...

अनिंद्य's picture

3 Dec 2017 - 10:17 am | अनिंद्य

नवीन विषयावरची माहिती.
पु भा प्र

Ranapratap's picture

10 Dec 2017 - 12:13 pm | Ranapratap

पुढचा भाग कधी?

हर्शरन्ग's picture

11 Dec 2017 - 6:30 pm | हर्शरन्ग

जबरदस्तच