लव्हगुरू

बोबो's picture
बोबो in जनातलं, मनातलं
29 Jan 2018 - 12:13 pm

कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?"
"क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक."
"अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?"
क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं.
"अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे."
"असं असेल तर पूजा, प्लिज. मला खरंच मदत कर. खूप गरज आहे मला टिप्सची."
पूजा सरसावून बसली.
"हे बघ महत्वाची टीप नंबर वन म्हणजे तू नेहमी ती काय म्हणते ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं. तू तिच्या बोलण्याकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाहीस."
"मान्य,"अमितने संमतीदर्शक मान हलवली.
"दुसरं म्हणजे छोट्याछोट्या गोष्टी तिला आवडतील अशा करायच्या उदा. सहज तिला अधूनमधून फुलं द्यायची. तिच्या दिसण्यावरून. विचारांवरून तिला कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या."
"वा. या टिप्स खरंच कामाच्या आहेत."
"पण मला एक शंका आहे."
"कोणती?"
"तिला प्रपोज कसं करू?"
"हं. तेसुद्धा महत्वाचं आहे. तिला ते अगदी स्पेशल वाटलं पाहिजे."
"त्यासाठी काय करता येईल?"
"प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते. पण तरी तिच्या एखाद्या आवडत्या स्थळी घेऊन जा."
"उदाहरणार्थ?"
"उदाहरणार्थ आमच्या घराकडे जाताना वाटेत छोटासा तलाव लागतो. तसं एखादं रोमँटिक ठिकाण."
"आणखी काही?"
"तिच्यासाठी तिला हमखास आवडेल असं काहीतरी गिफ्ट घे."
"उदाहरणार्थ?"
"कॅडबरीज सिल्क वगैरे. मुलींना चॉकलेट हमखास आवडतं."
"क्या बात है!!"
"आणि प्रत्यक्ष प्रपोज करताना असं कर की तिला ते खूप विशेष आणि मनापासून करतो आहेस असं वाटलं पाहिजे."
"मस्तच,"रिया म्हणाली,"बघ तुला सांगितलं ना पूजा म्हणजे लव्हगुरू आहे. तिच्या टिप्सने तुला मुलगी नक्कीच होकार देईल."
"हो खरंय."
पूजा हसली. तेवढ्यात रियाचा स्टॉप आला आणि ती उतरली.
"अमित तू नाही उतरलास?" पूजाने विचारलं.
"अगं, तुमच्या एरियात एक मित्र आहे त्याच्याकडे चाललो आहे."
"अच्छा. बे द वे मी काय सांगत होते, हं टिप्स"
पुढचा स्टॉप आला. पूजा आणि अमित उतरले.
चालता चालता वाटेत तलाव लागला.
"हाच का तो तुझा आवडता तलाव?"
"हो. किती मस्त ठिकाण आहे ना?"
"तू इथं आलीस की काय करतेस?"
"त्या शेजारच्या हॉटेलातला चहाचा कप घेते.चहाचे घोट घेत हॉटेलच्या या बाकड्यांवर बसून तलावाकडे पाहत बसते.खूप बरं वाटतं."
"एक मिनिट आलोच मी,"अमित म्हणाला. पूजा तलावाकडे पाहत राहिली.
थोड्या वेळाने चाहूल लागली म्हणून तिने बाजूला पाहिलं.
अमित चहाचे दोन कप घेऊन उभा होता. तिने हसून एक कप हातात घेतला. चहाचा एक घुटका घेतला आणि तिला फ्रेश वाटलं.
तेवढ्यात अमितने समोरच्या टेबलावरील फुलदाणीत फुल काढून घेतलं. ते कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागली.
अमित एक गुढघा जमिनीवर टेकवून पूजाच्या समोर बसला. हातातलं फुल तिच्यापुढे केलं आणि मनापासून म्हणाला,"आय लव्ह यु पूजा."
पूजा थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिली.
दोन सेकंद तसे गेले असतील, त्याबरोबर अमितने खिशात हात घातला आणि तो म्हणाला,"प्लिज पूजा नाही म्हणू नकोस. मी कॅडबरीज सिल्कसुद्धा आणलंय."
पुजाला हसू आवरलं नाही. तिने हसतच त्याच्या हातातलं फुल घेतलं तसा अमितचा चेहरा खुलला.
"तो मी ये रिश्ता पक्का समझू?" अमितने शोलेमधल्या अमिताभची नक्कल करत विचारलं.
"हो रे बाबा."
"बाबा व्हायला मला अजून अवकाश आहे. अर्थात तुला घाई असेल तर.. "
पुढच्याच क्षणी चार प्रेमळ बुक्क्या त्याच्या पाठीत बसल्या.
"महान आहेस. माझ्याच टिप्स माझ्यावर वापरतोस. हे म्हणजे परीक्षेचा पेपर फोडल्यासारखं झालं."
"तुला काय वाटलं, इंजिनियरिंग कसा पास झालो मी."
ते ऐकून पूजाचे डोळे आश्चर्याने विस्फारले.
"अगं बाई, मस्करी करत होतो," तो म्हणाला.
तिच्या चेहऱ्यावरचं हसू परतलं आणि ती आनंदाने त्याला बिलगली.
****
अमितने ही घटना त्याच्या मित्रांना सांगितली, तेव्हा त्यांनी आश्चर्याने आ वासला, तो मिटायला काही मिनिटं लागली.
"धन्य आहे. खरा लव्हगुरू तू निघालास. गुरूची विद्या गुरूला दिलीस."
अमित निघाला तसा पूजाने रियाला फोन लावला.
"काय झालं?"पलीकडून रियाने विचारलं,"काम फत्ते?"
"१०० टक्के फत्ते,"पूजा हसून म्हणाली,"त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे हे तुझं निरीक्षण अगदी बरोबर निघालं. पुढचं सगळं आपण केलेल्या प्लानप्रमाणेच घडलं. मी त्याला टिप्सच्या नावाखाली मला आवडणाऱ्या गोष्टी सांगत गेले. मला कायकाय आवडतं, हे कळल्याबरोबर तो सगळंसगळं तसच करत गेला. शेवटी तर त्याने पिक्चरमध्ये हिरो हिरोईनला करतो, तस्सच प्रपोज केलं."
"वॉव. हाऊ रोमांटिक. तुझ्यासारख्या लव्हगुरूने टिप्स दिल्यावर तो प्रपोज न करून सांगतो कुणाला," रिया म्हणाली.
"लव्हगुरू मी कसली?"पूजा हसून म्हणाली,"हा सगळा तुझा प्लान. त्यामुळे खरी लव्हगुरू तूच."

========= समाप्त =========

कथाविनोदkathaaलेख

प्रतिक्रिया

बोबो's picture

29 Jan 2018 - 12:19 pm | बोबो

.

मराठी कथालेखक's picture

29 Jan 2018 - 5:56 pm | मराठी कथालेखक

इथे सगळेच लव्हगुरु दिसतायत.. ऑफिसमध्ये दुसरं काही कामच नसेल :)

बोबो's picture

30 Jan 2018 - 8:56 am | बोबो

हाS हाS निष्कर्ष भारीये

अरे वा! छोटीशी प्रेमकहाणी आवडली. गुड वन! :-)

बोबो's picture

30 Jan 2018 - 8:57 am | बोबो

अभिप्रायाबद्दल धन्यवाद एस :)

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2018 - 7:14 pm | श्रीगुरुजी

मस्त! कथा आवडली.

बोबो's picture

30 Jan 2018 - 8:57 am | बोबो

धन्यवाद श्रीगुरुजी :)

प्रचेतस's picture

30 Jan 2018 - 8:38 am | प्रचेतस

मस्त कथा

बोबो's picture

30 Jan 2018 - 8:58 am | बोबो

अभिप्रायाबद्दल धन्यवाद प्रचेतस :)

पैसा's picture

30 Jan 2018 - 10:59 am | पैसा

:)

ज्योति अळवणी's picture

30 Jan 2018 - 3:44 pm | ज्योति अळवणी

प्रेमळ कथुकली आवडली

सिरुसेरि's picture

30 Jan 2018 - 7:18 pm | सिरुसेरि

छान . एकसे बढकर एक .

सुखीमाणूस's picture

30 Jan 2018 - 10:26 pm | सुखीमाणूस

आवडली.

बोबो's picture

31 Jan 2018 - 5:30 am | बोबो

अभिप्रायाबद्दल मनापासून आभार पैसाताई, ज्योति अलवनि, सिरुसेरि, सुखीमाणूस :-)

मनिमौ's picture

31 Jan 2018 - 5:50 am | मनिमौ

आहे. एकदम खुशखुशीत

अभिप्रायाबद्दल धन्यवाद मनिमौ :-)