अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
8 Jan 2018 - 5:19 am

अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)
या आधीचे संबंधित लेखन

भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/node/33829
आणि
http://www.misalpav.com/node/41702
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण): http://www.misalpav.com/node/41733

या आधीच्या भागातील प्रतिसादांच्या अनुभवांमुळे "हरभट" आणि "नात" यांच्या आधी लिहिलेल्या विधानांबद्दल ("अन्नावाचून जीव जात असला तरी अशा घुगऱ्या घश्याखाली उतरल्या नसत्या" आणि " नाहीतर कशी खायची अशी गिळगिळीत भाजी?") सज्जड पुरावे हाती असल्याखेरीज पुढे कसं जायचं या यक्षप्रश्नापासून या भागाच्या लेखनाला सुरवात झाली. लिखाण वेगळ्या धाटणीने लिहिण्याचे ठरवले असले तरी प्रतिसाद बदलतील असे गृहित कसें धरावें ? मग विचार केला की साक्ष काढण्याचीच जर वेळ आली तर वसतिगृहात कांही काळ राहिलेला कोणीही, "हरभट" आणि "नात" यांचे म्हणणे - अपुरे शिजलेले, बेचव किंवा अप्रिय अन्न घशाखाली सहजासहजी उतरत नाही - त्रिकालाबाधित सत्य असल्याचे मान्य करील.

आता प्रश्नच म्हणायचे तर काहींना हाही प्रश्न पडेल - घुगऱ्या म्हणजे हो काय? पट्कन समजावे म्हणून या भागाच्या कक्षेबाहेर असले तरी उत्तर इथेच सांगतो - कांही वर्षांपूर्वीपर्यंत हा बारशाला आवश्यक असा पदार्थ असे आणि हल्लीच्या काळांत "चटपटे चणे" म्हटले जाणाऱ्या पदार्थाशी (कांदा, सॉस इ. वरून घातलेल्या गोष्टी वगळता) त्याचे बरेच साम्य आहे. हा पदार्थ आता बारशाला वगैरे देखील कालबाह्य मानला जात असला तरी सध्या सर्वांना समजेल अशा भाषेतला "चखणा" म्हटल्यासही चालेल असा चटकदार असे. असो, आपण विषयाकडे पुन्हा वळू.

ज्यांना कधी वसतिगृहात राहण्याची वेळ न आल्यानें अपुरे शिजलेले आणि बेचव अन्न घशाखाली ढकलावे लागले नाही ते कदाचित असेही म्हणतील - कुणा मूर्खाला अशा अन्नाचा विचार तरी कां करावासा वाटेल, प्रत्यक्ष खाणे तर दूरच राहिले? अशा अन्नाचा विचार कुणीच स्वतःच्या इच्छेने नक्कीच करणार नाही पण जे बंदी आणि गुलाम होते म्हणजेच "परवशता पाश दैवें ज्यांच्या गळा लागला" त्यांच्या नशिबी असेच अन्न असे.

जगाचा इतिहास युद्धे आणि त्यातून निर्मांण होणारे बंदी आणि गुलाम यांच्या वर्णनानें भरलेला आहे. त्यामुळे शीर्षकानुसार लिहायचे झाल्यास फारच मोठ्या काळाचा विचार करावा लागेल. म्हणून " जग (व)ण्यापुरते(च) अन्न" हा भाग जगाच्या इतिहासातील अनेक पाने वगळून फक्त सोळाव्या शतकात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा भाग असलेले कृष्णवर्णीय गुलाम आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काही महत्वपूर्ण भागातले युद्धबंदी आणि या सगळ्यांचे "खाद्यजीवन" या पुरताच मर्यादित ठेवला आहे. अर्थात विषयाच्या विवरणाकरता इतर अनुषंगिक वर्णन जरूरीप्रमाणे क्रमप्राप्त आहे.

जेत्यांना उगीचच गुलाम किंवा बंदी न पोसता त्यांचा पुरेपूर उपयोग - गुलामांकडून काम करवून घेणे तसेच इतर बंद्यांचे इतके हाल करणे की त्यामुळे त्यांनाच काय पण इतरांना देखील धडा मिळेल किंवा जरब बसेल - करून घ्यायचा असल्याने शक्यतो गुलामांना आणि बंदिवानांना जीव देण्याचेसुद्धा स्वातंत्र्य उपलब्ध नसे. त्याच वेळी अनिच्छेने का होईना पण गुलामांना आणि बंदिवानांना शक्य तेव्हढ्या कमी खर्चात जे जमेल ते खायला देऊन जगवत ठेवणेही जेत्यांनाअनिवार्य होत असे.

जेत्यांनी जित लोकांना (शिरकाण करून समूळ उच्छेद करायचा नसल्यास) गुलाम बनवणे आणि त्यांचा व्यापार करून युद्धाचा खर्च कांही प्रमाणात वसूल करणे ही पद्धत पुरातन आहे. त्याखेरीज अनेकविध कारणांमुळे - उदा. राजाला नावडणारी एखादी गोष्ट केल्याने, कर्जबाजारी झाल्यामुळे किंवा दुष्काळात अगर पुरानंतर पोट भरणे अशक्य झाल्याने अशा अनेकांच्या नशिबी गुलाम होणे (कधी कुटुंबीयांसकट) - यायचे. हे असे गुलाम घरकामापासून काबाडकष्ट आणि धोकादायक कामासाठी किंवा जेत्यांच्या जीवघेण्या करमणुकीकरता देखील वापरले जात उदा. रोमन लोक आपल्या साम्राज्यात सुमारे २० लाख गुलाम बाळगून होते. त्यांचा उपयोग करमणुकीकरता करताना अशा गुलामांच्या लढती वाघ-सिंहांच्या बरोबर किंवा इतर गुलामांबरोबर लावून त्या लढती बघताना त्यांच्यावर पैजाही लागत. युद्धात शत्रूची फळी तोडण्याकरता (ज्यावेळी सगळ्यात पुढे असणाऱ्या गुलामांचा खातमा करण्यात शत्रूला गुंतवल्याने मागच्या सैनिकांना आपला जीव वाचवत पुढे सरकून शत्रूवर हल्ला करण्याची संधी मिळे) किंवा युद्धनौका वल्हवणे (युद्धनौका बुडाली किंवा पेटली तर अशा गुलामांना जलसमाधी मिळत असे) अशासारख्या कामांत गुलामांचा उपयोग होई.

सामान्य गुलाम मरेपर्यंत कसेतरी रखडत जीवन जगत असे. ग्रीक गुलाम इसाप (इ.स.पू. ६वे शतक, अनेक बोधप्रद गोष्टींकरता प्रसिद्ध) किंवा आणखी नंतरच्या कालातील मलिक काफूर (इ. स. १४वे शतक, ज्याने अल्लाउद्दीन खिलजीकरता देवगिरीचे यादव साम्राज्य उध्वस्त केले ), मलिकंबर (इ. स. १६वे शतक, ज्याने अहमदनगरची निजामशाही मुगल आणि इतरांच्या आक्रमणांना तोंड देत बरीच वर्षे जिवंत ठेवली) यांच्यासारखे कांही गुलाम, अपवाद म्हणूनच आपल्या कर्तबगारीने बरेच नांव कमाऊ शकले.

जे जित राबवण्याकरतासुद्धा चार भिंतींच्या बाहेर असणे धोकादायक ठरेल - उदा. चार भिंतींबाहेर असल्याने कुठल्याही तऱ्हेने संघटित होऊन उठाव करण्याची संधी मिळणे - अशाना बंदिवास भोगावा लागे. अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारदेखील तुरुंगात वेगवेगळ्या काळाकरता आणि वेगवेगळ्या दर्जाच्या सुरक्षेत बंद असणे हा प्रकार देखील अनेक शतकांपासून चालत आलेला आहे.

"गुलाम जमवणे आणि विकणे" हा फार जुन्या काळापासून साधारणतः प्रत्येक लहान-मोठ्या युद्धानंतर होणारा प्रकारअसल्याने गुलामांच्या व्यापाराचे वर्णनच "जित वंशाचा सर्वतोपरीने होणाऱ्या छळाचा एक भाग" असे सर्व साधारणपणे करता येईल. गुलामांचा व्यापार बऱ्याच काळापासून चालत आलेला आहे परंतु सतराव्या शतकाच्या मध्यापासूनच्या सुमारे दोन-अडीचशे वर्षे विविध कारणांमुळे "गुलाम जमवणे आणि विकणे" हा व्यापार इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला की तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अतिशय मोठा आणि महत्वाचा भाग ठरला.

सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी जास्त वेगाने चालणारी आणि जास्त वजन वाहू शकणारी जहाजे तसेच कमी वाऱ्यातही जहाजाला गती देणारी शिडे बनवण्यात बरीच प्रगती केली. या तसेच नौकानयनातील प्रगतीमुळे जहाजांचा पल्ला आणि क्षमता दोन्हीमध्ये वाढ झाली आणि अटलांटिक महासागरांत होणारी व्यापारी वाहतूक वाढू आणि बदलू लागली. युरोपातून जहाजे आफ्रिका खंडाचा पश्चिम आणि पूर्व किनारा तसेच अमेरिका खंडातले, उत्तर तसेच दक्षिण अमेरिकेतले वेगवेगळे देश इथे जाऊ लागल्याने जास्ती लांब पल्ल्याच्या सफरी सुरू झाल्या. युरोपिअन देशाना चहा, तंबाकू, रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ आणि साखर अशा चैनीच्या वस्तूंची सवय झाल्याने या वस्तू परदेशातून आणता येण्याकरता आपल्या देशातून परदेशांत विकता येईल असे पदार्थ सतत शोधत राहण्याची गरज निर्माण झाली. युरोपातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि धर्म/पंथ/विचार स्वातंत्र्य शोधणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड या देशांतून लोक उत्तर अमेरिकेत जाऊन लहान-मोठ्या जमावाने राहू लागले. स्पेनने (काही प्रमाणात पोर्तुगालनेसुद्धा) मध्य/दक्षिण अमेरिका या भागांत आपल्या पाठिंब्याने सशस्त्र जहाजे पाठवून स्थानिक लोकांना पकडून/पळवून लावून आपली ठाणी वसवली आणि तिथून लुटलेल्या चांदी-सोन्याच्या वाहतुकीकरता कॅरिबिअन समुद्रातल्या काही बेटांचा ताबाही मिळवला. इतर युरोपिअन देशातल्या साहसी लोकांनी कॅरिबिअन समुद्रातल्या इतर काही बेटांचा ऊस उत्पादन आणि साखर निर्मिती करता उपयोग सुरू केला. या सगळ्याच हालचालींचा परिणाम म्हणून युरोपांतील देशांमध्ये युरोपबाहेर स्वतःच्या वसाहती आणि वखारी वाढवण्याकरता तसेच युरोपाबाहेरच्या इतर देशांशी व्यापार वाढवण्याची स्पर्धा सुरू झाली.

अशा समुद्रमंथनातून सतराव्या शतकात गुलामांच्या व्यापाराचे हलाहल बाहेर आले. त्याचे असें झालें ......

इंग्लिश लोकांनी अटलांटिक समुद्र पार करून उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर (मॅसॅच्युसेट्स, व्हर्जिनिया इ. इ. ) पाय रोवत, स्थानिक मूळ लोकांशी झगडत, शेती, मासेमारी आणि व्यापार वाढवत १७व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्वतःच्या गरजा पुरवून झाल्यानंतर राहिलेले धान्य, मासे इ.इ. कॅरिबियन बेटांवर -जिथे साखरेकरता ऊस उगवण्यासाठी जास्तीत जास्त जमीन वापरल्यामुळे ऊसमळ्यांत काम करणाऱ्या मजुरांकरता अन्न उत्पादन कठीण झाले होते - पाठवायला सुरवात केली. इंग्लिश नाविक कॅप्टन जॉन हॉकिन्स याने १५६२ सालीच पश्चिम आफ्रिकेच्या समुद्र किनाऱ्यावरील सिएरा लिओन या देशामधून गुलाम मिळवता येतात हा "शोध" लावला होता (ज्याने पुढे चांचेगिरी, स्पॅनिश चांदी-सोन्याची वाहतूक करणारी जहाजे लुटणे इत्यादी "उद्योग" केले आणि "सर" फ्रान्सिस ड्रेक या असेच "उद्योग" करणाऱ्या आणि म्हणून इंग्रज राणीच्या मर्जीतल्या - कारण अनायासे स्पॅनिश आरमार खच्ची झाल्याने इंग्रजांचा प्रभाव वाढला - "सह-व्यवसायिका"बरोबर स्पॅनिश जहाजाना इतके सतावून सोडले की ज्याबद्दल त्यालाही इंग्लिश राणीने "सर"की बहाल करून टाकली). पण या अतिशय फायदेशीर व्यवसायात स्पॅनिश सरकारने कर लावल्यामुळे जोपर्यंत कॅरिबियन बेटांवर स्पॅनिश वर्चस्व होते तोपर्यंत स्पॅनिश जहाजांखेरीज इतरांना फारसा वाव मिळाला नाहीं. १७व्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी स्पॅनिश आरमाराचे आणि स्पॅनिश वर्चस्वाखालच्या कॅरिबियनमधल्या बेटांचे लचके तोडत आपल्या जहाजांकरता आणि आपल्या ऊस उत्पादन/साखर कारखान्यांकरता अनेक कॅरिबियन बेटांवर प्रभुत्व मिळवले. १७व्या शतकाच्या मध्यानंतर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या वसाहतींना हे लक्षांत येऊ लागले की जरी आपल्याला स्थानिक लोकांना हाकलून जमीन जरी मिळवता आली तरी आणखी कामगार जर मिळत राहिले तरच आपले लागवडीचे क्षेत्र वाढवता येईल आणि असे मजूर "जरा सस्त्यातच" मिळाले तर आजूबाजूच्या रहिवाशांकरताच नव्हे तर कॅरिबिअन बेटांवर तसेच युरोपातही पाठवण्याकरता अन्न धान्यच नव्हे तर तंबाकू, कापूस, तेलबिया, मांस तसेच लाकूड यासारख्या इतर अनेक जरूरी पदार्थांचा वाढता व्यापार करणेही शक्य आहे. असे "जरा सस्त्यातच" असणारे कामगार पश्चिम आफ्रिकेतून हवे तेव्हढे पळवता/मिळवता येतात हे कॅप्टन जॉन हॉकिन्स यांच्या अनुयायांना काही काळ माहीत असलेले "ज्ञान" जेव्हा इतरांनाही आठवले तेव्हा पश्चिम आफ्रिकेतल्या लोकांना आणखीनंच वाईट दिवस आले.

आता युरोपातून निघणारी जहाजांचे मालक आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कापड, दारू, विविध अवजारे आणि शस्त्रे इ.इ. युरोपात तयार होणारा माल विकून तेथील स्थानिक राजे आणि व्यापारी यांनी आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागातून युद्धात "मिळवलेले" किंवा पळवून आणलेले गुलाम विकत घेत आणि त्यांना उत्तर अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स, व्हर्जिनिया इ. इ. भागांत गुलाम म्हणून (मुख्यतः पोटावारी राबणारे शेतमजूर) विकत. जहाजांची साफ-सफाई, दुरुस्ती वगैरे आटोपून ही जहाजे पुन्हा युरोपकडे परतायला तयार होत. उत्तर अमेरिकेतील बंदरांतून अन्न-धान्य, खारवलेले मासे आणि मांस तसेच खाद्यतेलें, कापूस, तंबाकू इ. इ. कॅरिबियनमधल्या बेटांपर्यंत वाहून आणल्यावर काही माल विकल्यावर परत युरोपात विकण्याकरता देखील तेथील साखर (आणि रम) या जहाजांवर चढवण्याकरता तयारच असे. असा या पूर्ण प्रवासांत प्रत्येक वेळी वाहून न्यायला मिळालेला माल या जहाजांच्या मालकांना अमाप फायदा मिळवून द्यायचा. हा अमाप फायदा देणारा व्यापार चक्रमेनिक्रम चालू राखण्याकरता अडीचशे वर्षें अटलांटिक महासागरांत आणि पश्चिम आफ्रिकेत राजरोसपणे काळ्या गुलामांची पारध सुरूच राहिली. असाच काहीसा व्यापार-विनिमय अंगोलातल्या तसेच मोझाम्बिकमधल्या (ज्या पोर्तुगीज वसाहती होत्या) काळ्या लोकांना पकडून, आफ्रिकेतल्या इतर लोकांसोबत गुलाम म्हणून ब्राझील (एक पोर्तुगीज वसाहत) मध्ये विकताना व्हायचा. म्हणजे अशा " चक्री व्यापारात" (जिथून सुरवात केली तेथे परत पोचणे ) त्या काळातल्या शिडांच्या जहाजाना ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वाऱ्याची दिशा, प्यायचे पाणी व इतर जरूरी सामानाचा साठा मिळवणे आणि जहाजांची देखभाल अशा कारणांकरता दर दोन-चार महिन्यांनी थांबण्याची जरूरी भासे अशा प्रत्येक ठिकाणाहून वाहून नेण्याकरता फायदेशीर "माल" मिळण्याची देखील सोय होऊ लागली आणि मग तो "व्यापार" काही शतके जोरात चालू राहिला.

या सगळ्या व्यापाराची गरज म्हणून पकडून आणलेल्या गुलामांचा (पश्चिम आफ्रिकेत विकत घेऊन जहाजावर चढवल्यानंतर उत्तर अमेरिकेत विकेपर्यंत, साधारण २-३ महिने) "चांगला सांभाळ" करण्याची जरूरी असली तरी त्यांतही (विक्रेत्यांच्या दृष्टीनें) अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. जहाजावरील जागेचा अधिकतम उपयोग होण्यासाठी या "मालाला" जर निर्जीव मालासारखेच सदैव हालचालीविना ठेवून दिले तर हा (किंमती ) "माल, लौकर खराब होऊन, विकण्यास अयोग्य" होण्याची भीती होती. थोडे मोकळे सोडले तर हे लोक एकत्र होऊन सगळे जहाजच आपल्या ताब्यात घेऊन परत आफ्रिकेकरता हाकारतील ही देखील भीती होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणाहून जमवलेले गुलाम, त्यांच्या देशातून मार-पीट करत एखाद्या बंदराजवळ एकत्र जमवून पुन्हा जहाजावर चढवताना शक्यतो एका जथ्यात वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले आणि त्यामुळे एकमेकांशी बोलूही न शकणारे असेच असतील ही खात्री करून मगच जहाजावर चढवले जात. जहाजावरच्या मूठभर खलाशाना या जथ्यातील लोकांना ( २००-३०० तगडे तरुण आणि १००-१५० बायका मुले) ताब्यात ठेवता यावे म्हणून दोरखंड, साखळदंड आणि बेड्या यांचा सर्रास उपयोग करून या गुलामांना जेमतेम हलता येईल इतपतच स्वातंत्र्य मिळे. या सगळ्या चालत्या बोलत्या पण जेरबंद जमावाला थोडीशी हवा खाता यावी म्हणून दिवसातले काही तास तरी जहाजाच्या पोटातून बाहेर काढून वर येऊ दिले जात असले तरी त्यांचे समुद्रप्रवासातल्या काही महिन्यातले राहणे बहुशः जहाजातल्या माल भरण्याच्या अंधार कोठडीतलेच असायचे. त्यांचा प्राण कितीही तळमळला आणि त्यांनी सागराची मातृभूमीला परत नेण्याबद्दल कितीही प्रार्थना केली तरी त्यांच्या नशिबीआलेले, मातृभूमीतून कुठल्यातरी अनोळखी लोकांच्या सहवासात कुठे तरी दूरदेशी हाल अपेष्टा सहन करण्याकरता रवानगी केली जाणे, हे अटळ राही. अशा या कुबट, दमट, अंधाऱ्या, ओकाऱ्या आणि मल-मूत्राच्या वासाने भरलेल्या (किंवा त्याहीपेक्षा वाईट, ओकाऱ्या आणि मल-मूत्र साफ न करता आल्याने/करण्याची तसदी न घेतल्याने घाणीनें लडबडलेल्या) "निवासस्थानात" अनोळखी लोकांच्यात राहाणाऱ्याना त्यांच्या जेवणाची काय चव आणि काय पर्वा असणार?

जहाजावर आधीच सगळ्याच दृष्टीने मर्यादित असलेली जागा, त्यातच जेव्हढे भरता येतील तेव्हढे लोक कोंबून भरलेले, जर जमल्यास इतर विकाऊ माल देखील बरोबर वाहून नेता आला तर पहावा ही जहाज मालकांची मनोवृत्ती आणि जे अन्न तयार करायचे त्याकरता लागणारा कच्चा माल काही महिने तरी समुद्रप्रवासांतदेखील विनासायास टिकणारा असायला हवा अशा सगळ्या गोष्टी विचारांत घेता उकडलेला मका, उकडलेले रताळी किंवा तत्सम कंद, भात, शिजवलेले ओट्स आणि त्यात कधीतरी पडणारी खारी सुकी मासळी किंवा कडधान्ये (या सगळ्यातल्या किडे आणि अळ्यांसकट) असा या गुलामांचा आहार असे.

बहुतेक गुलामांना धाकात ठेवण्याकरता सदैव मारहाणीचा खुराक चालूच असे. त्याखेरीज बरेच आफ्रिकन लोक, गोऱ्या लोकांच्या आणि जहाजावरच्या अनोळखी वातावरणांत घाबरल्याने, समुद्री लाटांमुळे जहाज लागल्याने, कुठे आणि कशाकरता नेले जात आहे याची कल्पना न आल्याने, भाषेच्या अडचणींने कुणालाही काहीही विचारता न आल्याने आणि एकूणच वर लिहिल्याप्रमाणे दाटीवाटीमुळे आपल्या आयुष्याबद्दलच निराशेच्या गर्तेत सापडलेले असत. समुद्रात उडी मारून सुटकेचा प्रयत्न करणे त्यांना जखडून, बंदिस्त करून आणि जहाजाच्या कडेने जाळी बांधून अशक्य केलेले असे. त्यामुळे अनेक जण अन्नत्याग करून आपले आयुष्यच संपवण्याचा प्रयत्न करीत. अशा जगण्यास पूर्णपणे कंटाळलेल्या "हट्टी" लोकांचा "हट्ट" जर चालूच राहू दिला तर हा माल फक्त समुद्रांत झटपट फेकून देण्यासारखा राहील या भीतीने या "हट्टी" लोकांची मिटलेली तोंडे बळजबरीने उचकण्याकरता आणि त्यांत अन्न कोंबण्याकरता लोखंडी आणि लाकडी आयुधे वापरली जात.

जहाजावर नेहमीच पिण्याच्या पाण्याची आणि ताज्या (जीवनसत्वयुक्त) फळांची आणि भाज्यांची कमतरता असे. खलाशी लोक देखील "स्कर्व्ही" (ज्यामुळे हिरड्यातून किंवा त्वचेतून रक्तस्राव होत राहून अशक्तपणा येतो आणि ज्यावर ताजी फळे किंवा भाज्या खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे) किंवा खरूज (त्वचेच्या अस्वच्छतेमुळे होणारा आजार) अशासारख्या आजारांनी ग्रस्त असत मग गुलामांची कोण पत्रास ठेवणार? आधीच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रस्त असलेले गुलामदेखील अपुऱ्या आणि निरस खाण्यामुळे तसेच अस्वच्छतेने होणाऱ्या - खेचून भरलेल्या जागेत सहज संसर्ग होणाऱ्या अतिसार किंवा अमांश अशासारख्या आजारासह- रोगांनी आणखीनच खचत.

जहाजावरच्या या कांही महिन्याच्या प्रवासानंतर जगून वाचून उत्तर अमेरिकेतल्या बंदरांत पोचणाऱ्या गुलामांना मात्र चांगले साफ करून, त्यांच्या जखमांना मलमपट्टी करून, त्यांना लिलावांत चांगला भाव मिळावा म्हणून शक्य तेव्हढे गोंडस करण्याचे शक्य तेव्हढे प्रयत्न करून बाजारांत विकले जाई आणि मग या जहाजांचे कप्तान पुन्हा युरोपच्या दिशेने, वाटेत कॅरिबिअन समुद्रातल्या बंदरात थांबून पुढे जाण्याच्या इराद्याने तयारी करू लागत. उत्तर अमेरिकेत न विकले गेलेले आणि जरा तापट, कटकट करतील असे गुलाम अमेरिकेऐवजी कॅरिबिअन समुद्रातल्या बंदरात विकण्याकरता पाठवले जात कारण तिथले जास्त उष्ण हवामान आणि जास्त कठीण जीवन अशा लोकांना जास्त लौकर "वठणीवर" आणू शकत असे. उत्तर अमेरिकेत युद्धात हाती लागलेले स्थानिक (Red Indians) देखील "तडीपार" म्हणून कॅरिबिअन समुद्रातल्या बंदरात विकले जात.

उत्तर अमेरिकेतल्या वसाहतींचा व्याप जसा वाढला तशी त्यांच्या ताब्यातील जमीन वाढत राहिली तसेच उत्तर अमेरिकेतून विकत घेण्याच्या वस्तूंमध्ये कापूस, तंबाकू इ. इ. अशा चैनीच्या गोष्टींकरता युरोपातून मागणी वाढली. वाढत्या शेतीकरिता युरोपातून स्थलांतर करणारे लोक अपुरे तर होतेच पण त्यांना शेतावरच्या कामाची संवयही नव्हती आणि त्यामुळे लागणाऱ्या वाढत्या प्रमाणांतली गुलामांची जरूर युरोपातील "व्यापारी" पुरवत राहिले. आफ्रिकेतून पळवले जाणारे गुलाम तसेच त्यांना वाहून आणणारी जहाजे यांची संख्या आणि त्यांची क्षमता वाढवत आणि अमेरिकेतील वाढता शेतमाल तसेच इतर उपयोगी वस्तू इतर देशाना पुरवत हा "आंतरराष्ट्रीय व्यवसाय" सुमारे अडीचशे वर्षे भरभराटीत राहिला.

या कांही महिन्याच्या प्रवासाचे ऐतिहासिक महत्व समजण्याकरता थोडी आकडेमोड करणे जरूर आहे. उत्तर अमेरिकेत आफ्रिकेतून आणलेले सुमारे १.२ कोटी ते १.५ कोटी गुलाम विकले गेले. त्याखेरीज कॅरिबिअन समुद्रातल्या बंदरात तसेच ब्राझीलमध्ये विकले गेलेले गुलाम आणखी ४० लाख ते ५० लाख असावेत असे गृहीत धरले तर आफ्रिकेतून पळवले गेलेल्यातले एकूण १.६ कोटी ते २ कोटी लोक विकले गेले (ज्यांचा फारसा चांगला हिशोब ठेवला गेला नाही). ऐतिहासिक माहितीवरून असे दिसते की आफ्रिकेतून गोळा केलेल्या गुलामांतून सरासरी तीनांतला एकतरी पळवला गेल्यानंतर, जहाज प्रवासांत किंवा त्यांचे जहाजच नष्ट झाल्याने मरत असे. याचा अर्थ खाण्यापिण्याची आबाळ तसेच मारहाण, आजार आणि अशाच सर्व कारणांनी सुमारे ८० लाख ते १ कोटी आफ्रिकन लोक गुलामांच्या व्यापारात (ज्यांत पळवलेल्या ठिकाणांहून जहाजात चढवण्यापूर्वीचे मृत्यू देखील समाविष्ट) बळी गेले. थोड्या वेगळ्या दृष्टीनेही या आकडेवारीचा विचार करता येईल. जेव्हा उत्तर अमेरिकेतील यादवी युद्ध इ.स. १८६१ साली सुरू झाले तेव्हा जिथे शेती हा अर्थसंस्थेचा प्रमुख भाग असल्याने (आणि म्हणून गुलाम बाळगण्याकरता प्रचंड मोठी गुंतवणूक झालेली होती) ज्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेवली जायला हवी होती अशा (Confederate) राज्यांच्या एकूण ९० लाख लोकसंख्येतील ४० लाख लोक कृष्णवर्णीय गुलाम होते (ज्यांचे पूर्वज कधीतरी आफ्रिकेतून आणले गेले होते). या यादवी युद्धात ६२०,००० सैनिक मारले गेले आणि हा जगातील सगळ्याच युद्धातील बराच मोठा मानव संहार मानला जातो. याचाच अर्थ या जागतिक दृष्ट्या "युद्धातील भयानक मोठ्या मानव संहारा" च्या किमान दसपट किंवा जे कृष्णवर्णीय गुलाम Confederate राज्यांमधून "मुक्त" झाले त्यांच्या दुप्पट कृष्णवर्णीय लोक आफ्रिकेतून पळवले गेल्यानंतर इतरत्र पोचवताना मरण पावले.

या व्यापाराचा आणखी एक पैलू - इ.स. १६५० ते इ.स. १७७० या काळात उत्तर अमेरिकेतले राष्ट्रीय उत्पादन २५ पटीने वाढले की जे वाढवण्यात या पोटावरी राबणाऱ्या कृष्णवर्णीय गुलामांचा बराच मोठा हातभार होता.

उत्तर अमेरिकेत विकले गेलेले गुलाम मुख्यतः शेतकामाकरता वापरले जात. त्यांचा वापर कसा करावा, त्यांना रोज किती वेळ काम करायला लावावे किंवा काय जेवू खाऊ घालावे याबद्दल त्यांच्या मालकांवर काहीही बंधने नसत. विकले गेलेले गुलाम (पुरुष किंवा स्त्रिया) ही सर्व तऱ्हेने त्यांना विकत घेणाऱ्या लोकांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाई. त्यांची मुले (औरस तसेच अनौरस, मुख्यतः मालकांनी केलेल्या अत्याचारांतून जन्मलेली) इतरत्र विकली देखील जात. अशा गुलामांना जे मालक देईल तेच वापरायला, खायला, ल्यायला आणि स्वतः जवळ ठेवायला मिळे. त्यांना एकूणच जनावराप्रमाणेच वागवले जाई आणि मालकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल काहीही तक्रार किंवा विरोध करायला वाव नसे. या सगळ्याला कंटाळून पळून गेलेला गुलाम, त्याच्या हाती काहीच साधने नसल्याने फारसा यशस्वी होत नसे आणि अशा साहसातून वाचलाच तर पकडला जाऊन पुन्हा मालकाकडे सुपूर्द होण्यापलीकडे त्याच्या कुठल्याही खटाटोपातून फारसे काही निष्पन्न होत नसे.

बरेच गुलामांचे मालक त्यांना आठवड्याचा मोजका शिधा देऊन त्यातून आपले अन्न शिजवायला लावत. नेमलेले काम पुरे न झाल्यास शिक्षा म्हणून शिध्यात कपात होत असे. बऱ्याच कामसू आणि मवाळ गुलामांना त्यांच्या मालकांकडून एखाद्या जमिनीच्या तुकड्यावर स्वतः करता काहीतरी उगवून आपल्या पोटाची सोय करण्याचीही परवानगी मिळत असे. असे गुलाम त्यांना आफ्रिकेत माहिती असलेले धान्य (मका, तांदूळ), भाज्या (भेंडी, वेगवेगळ्या शेंगा, पालेभाज्या) आणि कडधान्ये (चवळी, हरभरा) तसेच रताळी, सुरण, भुईमूग, तीळ उगवून त्यांचा आपल्या जेवणात वापर करत. अशा शेतमालावर डुकरे किंवा कोंबड्या पाळून या गुलामांना - असे प्राणी स्वतःच्या खाण्यात वापरून किंवा विकून - थोडी "चैन" देखील करता येई. बरेच कृष्णवर्णीय गुलाम त्यांनी पाळलेल्या प्राण्याचे चांगली किंमत देणारे भाग (जसे - तंगडी) इतरांना विकून इतरांना विकायला कठीण असे भाग (उदा. आतडी) वापरून केलेले पदार्थ स्वतः खात. असे पदार्थ किंवा मका व कडधान्यापासून केलेले आणि एकेकाळी कृष्णवर्णी गुलामांच्या रोजच्या जेवणाचा भाग असलेले (आणि गोऱ्या लोकांना त्या काळांत माहितीही नसलेले) पदार्थ आता इतर स्तरातही बरेच वापरात येतात. उदाहरणार्थ लुईझिआना राज्यातल्या गुलामांनी लोकप्रिय केलेला गंबो हा पदार्थ भेंडीबरोबर वेगवेगळ्या तऱ्हेचे मांस, पालेभाज्या, कडधान्ये (विशेषतः चवळी) इत्यादी एकत्र शिजवून त्यात मसाले वापरून "गिळगिळीत" लगद्यासारखा पण चटकदार बनवला जातो आणि अमेरिकेतल्या बऱ्याच भागात समाजाच्या सगळ्याच थरात - बहुशः भाताबरोबर - खाल्ला जातो.

जरी इ.स. १८०८ सालापासून उत्तर अमेरिकेत गुलामांची आयात बंद करण्याचा कायदा झाला तरी छुपी आयात चालूच राहिली आणि इ.स. १८६८ साली यादवी युद्धानंतर/युद्धामुळेच गुलामगिरी बंद झाली. त्यानंतर देखील सुमारे १०० वर्षे कृष्णवर्णीय लोकांना उत्तर अमेरिकेत दुय्यम दर्जाचे मानून (जे "मुक्त" असले तरी कधीकाळच्या गुलामांचे वंशज होते) अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाई. सर्व तऱ्हेच्या - वैयक्तिक, सांघिक, शांततापूर्ण, सशस्त्र - चळवळीनंतरच कृष्णवर्णीय लोकांना जरा बरी वागणूक मिळू लागली. अशा संघर्षानंतरही अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचे अनेक लोक खेळ (उदा. सेरेना व व्हीनस विल्यम्स, मायकेल जॉर्डन, मुहम्मद अली), मनोरंजन (उदा. मायकेल जॅक्सन, ओप्रा विन्फ्रे), राजकारण (उदा. बराक ओबामा, कोलीन पॉवेल), संशोधन (उदा. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर) अशा अनेक क्षेत्रांत जागतिक स्तरावर यशस्वी झाले आहेत.

उत्तर अमेरिकेखेरीज इतरत्र देखील जरी - उदा. ऑटोमान सुलतानांच्या राज्यात - गुलाम वापरले जात असले तरी इतक्या घाऊक प्रमाणात त्यांची आयात झाली नाही आणि असे गुलाम मूळ लोकांत जास्त मिसळले गेले. उत्तर अमेरिकेतील कॅनडामध्ये देखील अठराव्या शतकापर्यंत गुलाम आयात होत पण नंतर कायद्याने ही प्रथा थांबवले गेली. युरोपातील देश जरी उत्तर अमेरिकेला गुलाम पुरवण्यात आघाडीवर होते तरी त्यांच्या स्वतःकरता - पुरेशी रिकामी जमीन नसल्यामुळे - उत्तर अमेरिकेतल्या इतके गुलाम लागत नसत आणि उत्तर अमेरिकेच्या बऱ्याच आधी तेथील गुलामगिरी कायद्याने बंद होत गेली. अशा पार्श्वभूमीवर या भागात फक्त उत्तर अमेरिकेचाच उल्लेख केलेला आहे. या भागात "उत्तर अमेरिका" असे जरी सर्वत्र म्हटले असले तरी या शब्दाची व्याप्ती समजून घेताना अनेक गोष्टींचा विचार होणे जरूर आहे. आफ्रिकेतून आणलेल्या कृष्णवर्णीय गुलामांचा वापर करणारे उत्तर अमेरिकेचे भाग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या राजकीय स्वरूपांतून गेलेले आहे. इंग्रजानी इ.स. १६२० पासून ज्या वस्त्या सुरू केल्या त्यांना "राज्ये" म्हणण्याइतपत महत्व किंवा स्वरूप येण्यास आणखी ३०-४० वर्षे लागली. त्या काळांत इंग्रजांखेरीज इतर युरोपियनही उत्तर अमेरिकेत पोचून आपापल्या प्रभावाखालील वस्त्या वसवत होतेच (आणि आपल्या वाढत्या शेतीकरता गुलाम विकत घेत होते). सध्याचा United States of America हा देश इ.स. १७७६ साली जेव्हा ब्रिटिशांपासून "स्वतंत्र" झाला तेव्हा फक्त १३ राज्ये एकत्र येऊन हा देश बनला होता. या देशातील सध्याची इतर राज्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मार्गाने या देशात सामील झाली - जसे सध्याचे लुईझियाना राज्य हे इ.स. १८०३ पर्यंत फ्रेंच लोकांच्या ताब्यात होते, तर सध्याचे टेक्सस राज्य इ.स. १८४५ साली United States of America मध्ये सामील होण्याआधी एकेकाळी मेक्सिको देशाचा भाग होते तर काहीकाळ एक स्वतंत्र देश म्हणूनच अस्तित्वात होते. अशा या सगळ्याच भूभागांत (ते United States of America या देशाचा भाग नसताना सुद्धा) आफ्रिकेतून आणलेले गुलाम वापरले जात असत. "उत्तर अमेरिका" या शब्दांत या सगळ्याच मोठ्या प्रमाणांत गुलाम वापरणाऱ्या भूभागांचा समावेश आहे असा विस्तृत अर्थ घ्यायचा आहे.

जरी आधी लिहिल्याप्रमाणे फक्त दुसऱ्या महायुद्धातल्या युद्धबंद्यांच्या खाण्यापिण्याबद्दल लिहायचे ठरवले असले तरी भारतांत माहिती असलेल्या अंदमानच्या बंद्यांच्या खाद्यजीवनाबद्दल थोडेसे. या बंद्याना जे काही मोजके कदान्न मिळे ते हिंदू आणि मुसलमानांकरता वेगवेगळे शिजवल्यानंतर- खातानादेखील वेगवेगळ्या पंक्ती असत - जर एखाद्या हिंदूच्या पानांत "चुकून" मुसलमानांचे अन्न किंवा उष्टे पडले तर असा हिंदू स्वा. सावरकरांच्या अंदमानातल्या प्रवेशापूर्वी पटकन बाटत असे आणि मग त्याला पुन्हा हिंदू मानले जात नसे. स्वा. सावरकरांच्या हे लक्षांत आल्यावर त्यांनी अशा झटपट बाटलेल्या हिंदू लोकांचे जोरदार "शुद्धीकरण" सुरू केल्याने हा प्रकार हळू हळू थांबला. या बंद्याना मिळणाऱ्या मोजक्या अन्नातूनच जर पहारेकऱ्याना कांही "हातावर" ठेवायचे असेल तर -उदा. कांही निरोप पोचवण्याबद्दल किंवा हलके काम देण्याबद्दल - त्यातीलच चांगला भाग (उदा. मिळणाऱ्या मोजक्या गव्हाच्या पोळ्या) पुढे करावा लागे. तुरुंगातले कष्टाचे काम - उदा. घाणीवर खोबऱ्याचे तेल काढणे - पुरे न झाल्यास शिक्षा म्हणून शिध्यात कपात होत असे.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीच्या काळात जेव्हा तोपर्यंत विजय मिळवणाऱ्या जर्मन सैन्याच्या हातात दोस्त राष्ट्रांचे सैनिक लागत तेव्हा निदान देखाव्यापुरते का होईना पण जिनेव्हा कराराचे पालन म्हणून त्यांना ठराविक दर्जाचे अन्न किंवा निवारा देणे बंधनकारक होते (जपानने जिनेव्हा करार मान्य केला नव्हता). युद्ध कैद्याना "रेड क्रॉस" सारख्या संस्थादेखील बिस्किटे वगैरे टिकाऊ खाद्य पदार्थ पाठवू शकत. प्रत्यक्षांत सगळीकडेच अन्नधान्याचा तुटवडा असल्याने जे दोस्त राष्ट्रांचे सैनिक जर्मन कैदेत होते त्यांना मुख्यतः बटाट्यावर (कारण देशात बरेच बटाटे पिकवले जात असल्याने जर्मनीला बटाटे आयात करावे लागत नसत) गुजराण करावी लागे तर जपानी आपल्या कैद्याना मुख्यतः तांदूळ (आशियातले मुख्यतः खाल्ली जाणारे धान्य असल्याने) खाऊ घालत. जर्मन कैदेतल्या युद्धकैद्याना उकडलेल्या बटाट्याशिवाय पाव, सॉसेजसारखे साठवलेले मांस आणि कोबी (जो इतर भाज्यांपेक्षा जास्त टिकू शकतो) हे देखील मिळे तर जपान्यांच्या कैदेतल्या युद्धकैद्याना भाताबरोबर काहीवेळा पालेभाज्या, वेगवेगळे कंद आणि सोयाबीनसारखी कडधान्ये (उकडून) मिळत.

दोन्हीकडच्या युद्धकैद्याना अपुरेच अन्न मिळत असले तरी त्यातही एक मोठा फरक होता. जर्मन लोकांच्या हातात सापडलेले जित आणि त्यांचे जेते यांचे खाणे साधारण सारखेच असे आणि त्या दोघांनाही रुचणारे अन्न युरोपात मिळत असल्याने युद्धकैद्यानाही मिळणारे अन्न त्यांच्या सवयीचे असे (फक्त अपुऱ्या प्रमाणात). जपानच्या ताब्यातील गोऱ्या युद्धकैद्यांच्या बाबतीत मात्र त्याना जे आशियामध्ये सामान्यतः वापरले जाणारे आणि मिळणारे अन्न दिले जाई त्याची या कैद्याना अजिबात सवय नव्हती. नुसता भात इतर काही कंदांबरोबर खात राहिल्यास पोटभरीची सोय जरी झाली तरी त्यातून जीवनसत्वे मिळत नसल्याने पोटदुखी, हगवण यासारखे अशक्तपणा आणणारे किंवा बेरीबेरीसारखे जीवघेणे आजार होत. चोरीमारी करून आपल्या अन्नात पालेभाज्या, कडधान्ये, फळे यांचा समावेश करता न आल्यामुळे मृत्यू येणे हे बऱ्याच गोऱ्या कैद्यांच्या नशिबी येई.

जपानी सैन्याचा आशियांतील देशांवर कब्जा मिळवण्याचा मुख्य उद्देश युद्धसामग्री करता लागणारे सामान (विशेषतः रबर आणि खनिज तेल), अन्न धान्ये आणि युद्धकार्याकरता मजूर मिळवणे हा होता. युद्धकैदी आणि (जबरदस्तीने वेठीवर) काम करणारे मजूर या सगळ्याच "उपऱ्याना" अतिशय निर्दयपणे मारीत झोडीत आणि प्रसंगी जीवे मारत वागवले जाई. फिलिपाईन्समधल्या बतान बेटावर शरण आलेल्या सुमारे ८०,००० युद्धकैद्याना त्यांच्या छावणीपर्यंत चालवत आणि आगगाडीने नेताना (सुमारे १४० किलोमीटर अंतर) अन्न पाणी तर अपुरे दिले गेलेच पण कडक उन्हात बसवणे/चालवणे, थकलेल्याना कुबलून किंवा संगिनीने भोसकून रस्त्याकडेला मरण्याकरता फेकून देणे अशा वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांचा छळही केला गेला. या बळजबरीच्या ५-१० दिवसांच्या (युद्धकैदी वेगवेगळ्या ठिकाणाहून निघून, प्रवासात एकत्र केले जात) प्रवासाच्या शेवटी फक्त ५४,००० लोक उरले. इंडोनेशियातील सुमारे ३००,००० मजुरांना देखील ३-४ वर्षे अशीच वागणूक मिळाल्यावर युद्धाअखेरीपर्यंत त्यातले २५% लोकच शिल्लक राहिले.

आशियातल्या युद्धकैद्यांचे स्वतःच्या खाण्यापिण्याबद्दलचे अनुभव नंतरच्या काळात इतरांनाही अनेक पद्धतीने उपयोगी पडले. आशियातील बऱ्याच देशात युद्धकैद्यांच्या शिध्यात दिले जाणारे सोयाबीन (तसेच इतर धान्यही) शिजवण्याकरता इंधनाचा तुटवडा असे. अर्धेकच्चे आणि पोटाला न रुचणारे सोयाबीन खाण्याऐवजी हाँग काँग, सिंगापूर आणि इंडोनेशियातील युद्धकैद्यांनी एकमेकांकडून माहिती मिळवत स्थानिक लोकांप्रमाणे सोयाबीन आंबवून वापरायला सुरवात केल्यावर त्यांना ते पोटाला मानवू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड व हॉलंडमध्ये झालेल्या संशोधनावरून सोयाबीन आंबवल्याने पचवण्यास जास्त सोपे होऊन त्याचे अन्नमूल्य वाढते हे सिद्ध केले आणि त्यामुळे असे पदार्थ जगभरात वापरात येऊ लागले. सोयाबीन आंबवून केलेला "टेम्पे" हा पदार्थ दक्षिणपूर्व आशियात दुसऱ्या महायुद्धाच्याही अनेक दशके पूर्वीपासून आणि हल्ली सुद्धा - मुख्यतः गरिबांचे प्रथिन म्हणून वापरला जातो - की ज्याची उपयुक्तता आता जगभरात कळू लागली आहे.

एकूणच जग(व)ण्यापुरते(च) अन्न जिथे मिळत राहिले तिथे जर त्याचबरोबर जगण्याची आशा आणि इच्छा यांचा अभाव असला तर असे जग(व)ण्यापुरते(च) अन्न फार काळ जग(व)ण्यात यशस्वी राहू शकले नाही.

जास्त माहिती हवी असल्यास पहा:

https://www.gilderlehrman.org/history-by-era/slavery-and-anti-slavery/re...

https://en.wikipedia.org/wiki/Atlantic_slave_trade

http://www.historyworld.net/wrldhis/PlainTextHistories.asp?groupid=235&H...

http://www.historyworld.net/wrldhis/PlainTextHistories.asp?groupid=235&H...

https://www.encyclopediavirginia.org/Slave_Ships_and_the_Middle_Passage

http://4thebest4e.tripod.com/id15.html

https://www.shmoop.com/american-revolution/economy.html

https://en.wikipedia.org/wiki/Economic_history_of_the_United_States

http://www.pbs.org/wgbh/aia/part1/1narr4.html

https://www.spicesinc.com/p-4254-where-did-gumbo-really-come-from.aspx

https://www.nps.gov/bowa/learn/historyculture/upload/the-final-slave-die...

http://mgafrica.com/article/2015-03-10-13-fascinating-facts-about-slaver...

https://www.civilwar.org/learn/articles/brief-overview-american-civil-war

http://www.lindavdahl.com/FrontPage_Links/pows_of_the_japanese.htm

https://news.nationalgeographic.com/news/2014/03/140301-african-american...

https://en.wikipedia.org/wiki/Slave_health_on_plantations_in_the_United_...

https://books.google.com/books?id=45DGqA47fUwC&pg=PA10&lpg=PA10&dq=diet+...

https://www.historyonthenet.com/world-war-two-japanese-prisoner-of-war-c...

http://www.mofga.org/Publications/MaineOrganicFarmerGardener/Fall2010/Po...

http://www.encyclopedia.com/social-sciences-and-law/political-science-an...

http://www.solobackpacker.com/2017/01/17/living-memories-of-the-black-wa...

http://www.indianetzone.com/30/inmates_cellular_jail_andaman_nicobar_isl...

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख. जगाची भर भरभराट ही व्यापारउदीमातून होते. पण त्यामागे बरेचदा शोषणाचा आणि अत्याचारांचा काळाकुट्ट इतिहास असतो, हे अधोरेखित करणारा लेख.

फिलिपाईन्सच्या युद्धकैद्यांच्या त्या प्रवासाबद्दल जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेला एक लेख यानिमित्ताने आठवला.

अभिजीत अवलिया's picture

8 Jan 2018 - 9:12 am | अभिजीत अवलिया

माहितीपूर्ण लेख.

अँड. हरिदास उंबरकर's picture

8 Jan 2018 - 9:22 am | अँड. हरिदास उंबरकर

शोषणाची व्यवस्था मांडणारा लेख ..

अनिंद्य's picture

8 Jan 2018 - 11:54 am | अनिंद्य

@ शेखरमोघे,

उत्तम लेख आणि एका वेगळ्या विषयाचा आटोपशीर आढावा. सध्या पोर्तुगिझांच्या सागरी इतिहासावर वाचत आहे, त्यामुळे लेखातील विषयांचा संदर्भ चटकन लागला, लेख विशेष भावला.

पूर्ण लेखमाला वाचली नव्हती, आता वाचणार.

पु भा प्र,

अनिंद्य

छान लिहित आहात. हा भाग थोडा मूळ विषयाला सोडून असल्यासारखा वाटला.. पण तरीही माहिती म्हणून छानच आहे.