शेजाऱ्याचा डामाडुमा - मास..अहारू... गारुनु.... - मालदीव भाग ३

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
7 Dec 2017 - 5:51 pm

मालदीव मालिकेतील आधीचे भाग येथे वाचता येतील :-
http://www.misalpav.com/node/41427
http://www.misalpav.com/node/41552

जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात. पुढील पिढ्यांसाठी असा विस्मृत ठेवा वेचण्याची ठिकाणे म्हणजे सामान्यतः देवळे - धार्मिक उपासनेच्या जागा, राज्यकर्त्यांचे किल्ले - महाल, थोरामोठ्यांची समाधीस्थळे वगैरे.

पण काही समाज आणि संस्कृती थोड्या वेगळ्या असतात - आपल्या शेजारच्या मालदीव बेटांवर नांदणारी प्राचीन संस्कृतीही अशीच - वेगळी आणि त्या सम तीच. (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) ह्या समाजाचे जीवनच वेगळे. अथांग समुद्रात ठिपक्याएवढी काही बेटे आणि त्यापैकी काही मोजक्या बेटांवर मानवी वस्ती. माणसे साधी. गरजा कमी. राज्यकर्ते म्हणावे तर तीही अगदी साधी माणसे - कोणत्याही बाह्य भपक्याशिवाय साधे सोपे जीवन व्यतीत करणारी. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, साधनांच्या दुर्लभतेमुळे आणि बिनभरवश्याच्या हवामानामुळे असेल कदाचित पण मोठे महाल-किल्ले नाहीत की भव्य समाधी स्थळे नाहीत.

खोल समुद्रात पिटुकल्या बेटांवर बिन-भरवशाचे, कमी गरजांचे आणि म्हणून स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कर्मकांडांचे महत्व नगण्य. त्यामुळे धर्माचे आखीव रेखीव नियम-कानू फारसे अपील न होणारे. त्यामुळेच की काय मोठी भव्य धर्मस्थळे पण नाहीत.


माले शहराच्या मधोमध असलेली प्राचीन हुकुरू मिस्की (जामी मस्जिद)

पूर्वापार सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. 'सारा समुंदर मेरे पास है - एक बूंद पानी मेरी प्यास है' अशी अवस्था. प्यायचे पाणी फक्त आकाशातून पडणारे, ते साठवायचे आणि वर्षभर वापरायचे. म्हणायला सोपे पण प्रवाळ बेटांवर ही साठवणूक कठीण. थोड्याफार गोड्या पाण्याच्या विहिरी, पण त्यातील पाणी संपायला किंवा खारट व्हायला फार काळ जावा लागत नाही. त्यामुळे लोकांनी मुक्काम सारखा ह्या बेटावरून त्या बेटावर हलवणेही नवे नाही. त्यामुळे आहे त्या साधनांत काही धर्मस्थळे-इमारती बांधल्या तरी पुढे त्यांचा वापर आणि जतन होईलच याची खात्री नाही.

* * *

मालदीवचे प्राचीन नाव 'माला-द्वीप'. मालदीवचे भारतीय मुख्य भूमीशी आणि श्रीलंकेशी संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. मालदीवच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या, म्हणजे पूर्व किंवा दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांना पश्चिमेच्या समुद्रमार्गानी कोठल्याही दुसऱ्या देशाकडे जहाजे हाकायची तर मालदीवची बेटे हाच मार्गातला पहिला थांबा. त्यामुळे ह्या भूमीचे महत्व अनन्यसाधारण होते (आजही आहे,पण त्याबद्दल नंतर). नेहमीचा व्यापारी मार्ग असल्यामुळे भेटीगाठी, व्यापारी देवाण देवाण, सांस्कृतिक संबंध वर्षानुवर्षे आहेत.

पार चौथ्या शतकापासून भारताच्या ओरिसा प्रातांतील व्यापारी ह्या मार्गावर व्यापारासाठी ये-जा करत असावेत. कलिंग सम्राटांच्या प्रदीर्घ राजवटीत भारतातून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्यापारी दले आधी श्रीलंका आणि मग मालदीवला पोचलीत. समुद्रमार्गे पूर्वेकडे येणारे आफ्रिकन आणि अरब व्यापारी मालदीवला एक थांबा घेत असल्यामुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांमध्ये परस्पर व्यापार आणि करार करण्यासाठी ही भूमी प्रसिद्ध झाली.

* * *

मालदीवच्या इतिहासात डोकावायचे म्हणावे तर मुख्य मुद्दा खात्रीशीर पुराव्यांच्या दुर्मिळतेचा आहे. मुळात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कमी आहेत. स्थानिक भाषेतील हस्तलिखिते किंवा उत्खननात सापडलेले पुरावे दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते बऱ्याच अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे लोकश्रुती, विदेशी प्रवाश्यांची प्रवासवर्णने, त्यांनी बनवलेले नकाशे आणि स्वतःच्या मायदेशी लिहिलेली पत्रे एव्हढाच ऐवज हाताशी उरतो. त्यावरून थोडेफार निष्कर्ष काढता येतात. सबळ पुराव्याअभावी हे निष्कर्ष विवादाला कारणही होतात :-)

मालदीवच्या उत्तरेला वर असलेल्या लक्षद्वीप बेटांचे रहिवासी मूळचे केरळ प्रांतातले दर्यावर्दी आहेत हे बऱ्यापैकी मान्य मत आहे. त्यामुळे भारतातील मल्याळी आणि तमिळ दर्यावर्दी आणि कोळी लोक हे बहुदा मालदीवचे आद्य रहिवासी असावेत. स्थानिक प्राचीन जमातींमध्ये काही प्रमाणात आढळून येणारी मातृसत्ताक कुटुंबे त्यांच्या मल्याळी पूर्वजांची साक्ष पटवतात. अरबस्तानातील आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांपैकी काही मंडळी वस्ती करती झाली असावीत असे आडाखे बांधता येतात.

पाचव्या शतकात पाली भाषेत लिहिलेल्या 'महावंश' ग्रंथात मालदीवच्या राज्यकर्त्यांबद्दल पहिला लेखी उल्लेख सापडतो. पूर्व भारतातून मगध राज्याचा परागंदा राजा / राजपुत्र 'विजय' आधी श्रीलंका आणि पुढे मालदीवला आपले नवे राज्य स्थापन करता झाला असे उल्लेख आहेत. पण लिहिणाऱ्यांनी हे 'असे मी ऐकून आहे' अश्या प्रस्तावनेसह लिहिले आहे, त्यामुळे नेमका कालखंड ठरवता येणं कठीण आहे.

१२ व्या शतकात इस्लामच्या आगमनापूर्वी जवळपास १३०० वर्षे बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता, हे मात्र बहुमान्य मत.

बुद्धकाळाच्या आधी स्थानिक लोक सूर्यपूजक होते, स्वतःला 'आदित्यकुलीन' म्हणवून घेत. मालदीवच्या राजाला 'राधून' (राजनचा अपभ्रंश वाटतोय ना?) आणि त्याच्या पत्नीला 'रानींन' (राणी?) किंवा रातीन संबोधतात. 'आदीत्ता' वंशीय सूर्योपासक राधून मालदीव बेटांवर शासन करतात. काही बेटांवर 'रानीन' म्हणजे स्त्री शासक आहेत - काही राधून 'होमा' (सोम?) वंशीय आहेत असे पुसट उल्लेख विदेशी व्यापाऱ्यांच्या पत्रात मिळतात. दामहार नावाची आदित्यकुलीन राणी माले येथे ठाणे करून मालदीव बेटांवर राज्य करते, तिला आम्ही प्रवासी कर आणि नजराणा देतो असा उल्लेख अरब व्यापाऱ्यांनी स्वतःच्या राज्यकर्त्याना पाठवलेल्या पत्रात आहे. पण या पत्रांवर तारीख नाही !

मालदीवच्या इतिहासाचे जे थोडेफार संशोधन झाले आहे आणि उत्खननात जे पुरावे मिळाले आहेत त्याआधारे साधारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेप्रमाणे मालदीवमध्येही बौद्ध धर्म रुजला आणि पुढे अनेक शतकांपर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता हे ठरवता येते. त्याकाळचे काही राज्यकर्ते स्वतःला ‘सिंहपुत्र’ म्हणवत - बहुदा श्रीलंकेच्या सिंहली राज्यांच्या प्रभावामुळे.

नव्याने झालेल्या उत्खननात बुद्धमताचा प्रभाव दाखवणाऱ्या खाणाखुणा सापडतात. बुद्धधर्माच्या अहिंसक शिकवणीमुळे बहुतेक प्राचीन धर्मस्थळे जमिनीखाली पुरली आहेत, तोडफोड करून पूर्णतः नष्ट केलेली नाहीत. (पण आता हे बदलतंय - २०१२ मध्ये काही स्थानिक माथेफिरूंनी मालेच्या राष्ट्रीय संग्रहालयात घुसून तिथे जतन केलेला ६ ते १२ व्या शतकातील दुर्मिळ बौद्ध अवशेषांचा अमूल्य ठेवा ठेचून नष्ट केला - मूर्तिपूजा इस्लामला मंजूर नाही म्हणून !)

काही उत्खननात मंडलाकार बुद्ध मंदिरांचे - स्तूपांचे जोते असावेत अश्या खुणा सापडतात.

एक मात्र आहे, मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध असलेल्या इस्लाम धर्माचा पूर्ण स्वीकार केल्यानंतर अनेक शतकं उलटली तरी आजही मालदीवचे लोक कुठल्याही मूर्तीला किंवा शिल्पाला 'बुधू'च म्हणतात.

* * *

मालदीवची प्रमुख भाषा 'धिवेही'. भाषा-अभ्यासकांच्या मते ही इंडो-आर्यन गटातील एक प्राचीन भाषा. लिपी वेगळी असली तरी व्याकरण, शब्द, शब्दांचे उच्चार, वाक्यरचनेची पद्धत सगळेच श्रीलंकेच्या सिंहली भाषेला जवळीक साधणारे. त्यामुळे माझ्या श्रीलंकन मित्रांना धिवेही बोलायला आले नाही तरी ऐकलेले बरेचसे समजते पण वाचता येत नाही कारण वेगळी लिपी ! परत धिवही भाषा अरेबिक प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यामुळेही थोडा संभ्रम.

धिवेही भाषेची झलक.

इराणच्या बसरा खाडीत मिळणारे नैसर्गिक मोती म्हणजे जगभरातल्या राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारत, चीन, बर्मा आणि थायलंड ह्या मोत्यांची फार मोठी बाजारपेठ. त्यामुळे अरब व्यापारी अगदी दहाव्या शतकाच्या पूर्वीपासून इराणच्या खाडीतून हे मोती घेऊन मोठ्या प्रमाणावर श्रीलंका, भारत आणि पलीकडे आग्नेय आशियात जात. त्यांचा पहिला थांबा हूवधू, माले किंवा गान बेटावर असे. त्यामुळे की काय इस्लामिक सत्ता स्थापन होण्याच्या बरेच आधी मालदीवमध्ये व्यापाराची अधिकृत भाषा अरेबिक होती. पर्शियन किंवा उर्दू सारख्या भारतीय उपखंडात स्थिरावलेल्या भाषांचा फारसा वावर ह्या भागात दिसून येत नाही. धिवेही भाषा अरेबिक लिपीत लिहिल्या जाण्याचे हे ही एक कारण असू शकेल.

'लोमाफानू' - धिवेही भाषेत लिहिलेले ताम्रपट्टिकांचे पुस्तक. - १२ वे शतक.

सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.

* * *
थोडे अवांतर:

त्यांच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही...
कवडीमोल भावाने विकावा लागला सगळा ऐवज ...
फुटकी कवडी नाही खिश्यात...
कौडी-कौडी जमा कर के ये मकान खरिदा पिताजी ने...

आपल्या बोलण्या-लिहिण्यात येणारे हे 'कवडी' प्रकरण बरेच रोचक आहे. चलन म्हणून प्राचीन भारत, ब्रम्हदेश आणि श्रीलंकेत कवड्या वापरल्या जात. कवड्या चलन म्हणून वापरण्याचा फार मोठा कालखंड भारत आणि शेजारी देशांनी अनुभवला आहे.

साधारण हिशेब : -
३ फुटक्या कवड्या = १ कवडी
१० कवड्या = १ दमडी
२ दमडी = १ धेला
१.५ पाई = १ धेला
३ पाई = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया

स्थानिक चलनांची नावे वेगळी असली तरी थोड्याफार फरकाने आजूबाजूच्या देशांमध्ये प्रमाण असेच होते. (जुन्या लोकांकडून 'पै-न-पै' ची वसुली, 'आणेवारी', 'दीड-दमडी' ची ऐपत, 'पाई-पाई' चुका दूंगा असे डायलॉग सुद्धा ऐकले असतील तुमच्यापैकी काहींनी)

मालदीव हा हा देश भारतीयांना माहित असण्याचे आणि तेथे आपल्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांची विशेष ये-जा असण्याचे एक खास कारण होते - ते म्हणजे तेथे असलेला कवड्यांच्या प्रचंड साठा ! चलन म्हणून आपल्याकडे ज्या कवड्या वापरल्या जात, त्या कवड्या मालदीवमध्ये अगदी 'कवडीमोलाने' मिळत. होडीभर अन्नधान्याच्या बदल्यात होडीभर कवड्या असा साधा सोपा हिशेब. त्यामुळे ही पाचूची बेटे भारतीय व्यापाऱ्यांसाठी अगदी सोन्याची खाण होती.

क्रमश:

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

वाचतोय! खूप भारी लिहीत आहात. पुभाप्र!

अनिंद्य's picture

12 Dec 2017 - 1:16 pm | अनिंद्य

@ आदूबाळ,
पहिल्या प्रतिसादाबद्दल आभार !

अनिंद्य's picture

7 Dec 2017 - 7:41 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

हा भागही कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

राघवेंद्र's picture

7 Dec 2017 - 7:47 pm | राघवेंद्र

वाचत आहे. कवडीमोल किंमतीत खूप माहिती मिळत आहे.
खूप धन्यवाद !!!

अनिंद्य's picture

12 Dec 2017 - 1:18 pm | अनिंद्य

@ राघवेंद्र,

कवडीमोल किंमतीत ? म्हणजे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2017 - 12:15 am | डॉ सुहास म्हात्रे

माहितीने आणि सुंदर चित्रांनी भरलेला लेख खूपच आवडला !

आपला शेजारी असलेला आणि तरीही अत्यंत अनोळखी असलेल्या या देशाबद्दल बरीच नवीन माहिती मिळत आहे. पुभाप्र.

रुपी's picture

8 Dec 2017 - 4:25 am | रुपी

मस्तच!
प्रत्येक भागावर तुम्ही भरपूर मेहनत घेत आहात. धन्यवाद!

अभिजीत अवलिया's picture

8 Dec 2017 - 6:19 am | अभिजीत अवलिया

मस्तच लिहीताय.

फारच सुंदर माहिती आणि फोटो .. धन्यवाद !!

अतिशय सुरेख लिहीत आहात. पुभाप्र.

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 6:53 pm | सिरुसेरि

उत्तम लेखमाला आणी फोटो

अमितदादा's picture

9 Dec 2017 - 2:11 am | अमितदादा

तिन्ही लेख उत्तम झालेत. नुकतीच घडलेली ही घटना आपण वाचली असेलच असे वाटते.
FTA

अनिंद्य's picture

12 Dec 2017 - 4:42 pm | अनिंद्य

@ अमितदादा,

आभार !

हे फार घिसाडघाईनी झाले असे वाटत असले तरी चीनचा प्रयत्न आणि मालदिवशी बोलणी २०११ पासून चालू होती. दोन देशांमध्ये असे करार करण्यापूर्वीच्या वाटाघाटी ४-५ वर्षे सहज चालतात. मला सगळ्यात गंमत वाटली ती मालदीवच्या मजलिसने (संसदेने) हजार पानाचा हा करार - वाचून - चर्चा करून - संसदीय उच्चाधिकार समितीत खल करून - मंजूर करण्यासाठी घेतलेल्या कालावधीची - फक्त १३ मिनिटे !!

अनिंद्य

अमितदादा's picture

15 Dec 2017 - 8:08 pm | अमितदादा

नक्कीच ज्या पद्धतीने हा करार मालदीव च्या संसदेत मंजूर झाला ही एक दडपशाही च होती. भारताबरोबरच FTA करार थंडया बसत्यात ठेवण्यात आला आहे, तसेच मालदीव च्या अध्यक्षांचे चीन चा करार भारताच्या करारापेक्षा अनेक पटीने उजवा आहे अश्या पद्धतीचे स्टेटमेंट मी वाचले होते जे पूर्णतः चीन धार्जिणे होते. नुकतेच विरोधी पार्टीच्या काही स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि नगरसेवक यांना विना परवाना भारतीय उच्चायुक्त यांना भेटल्याबद्दल निलंबित केलं आहे. पूर्ण सार्क देशात मालदीव हा एकमेव देश आहे ज्याला मोदी नि भेट दिली नाही यावरून भारत आणि मालदीव च्या ढासळत्या संबंधाची चुणूक येतेय. सध्याचे अध्यक्ष येमिन यांचा भारत विरोध आणि पूर्वीचे अध्यक्ष नशीद यांचं भारत प्रेम यावर आपण पुढच्या भागात प्रकाश टाकाल अशी आशा आहे.

अनिंद्य's picture

24 Dec 2017 - 6:32 pm | अनिंद्य

तुम्ही स्थानिक प्रश्नांचा बराच अभ्यास केलेला दिसत आहे.

आनंदयात्री's picture

22 Dec 2017 - 10:05 pm | आनंदयात्री

>> संसदीय उच्चाधिकार समितीत खल करून - मंजूर करण्यासाठी घेतलेल्या कालावधीची - फक्त १३ मिनिटे !!

हंबन-टोटा प्रकरणावरून काहीच शिकवण घेतलेली दिसत नाही.

अनिंद्य's picture

24 Dec 2017 - 6:31 pm | अनिंद्य

:-(

Nitin Palkar's picture

9 Dec 2017 - 10:26 pm | Nitin Palkar

सुंदर सोपी बहासा! प्रकाश चित्रे नेहमीप्रमाणेच सुंदर !!

अनिंद्य's picture

15 Dec 2017 - 2:00 pm | अनिंद्य

@ Nitin Palkar,
बहासा :-)
आभार !

एक तर प्रवासवर्णन हा विषयच इंट्रेस्टींग. वर मालदीव सारखं हेवनली डेस्टीनेशन. सोनेपे डबल सुहागा म्हणजे तुमची लेखन स्टाईल.
ऑस्सम.

अनिंद्य's picture

15 Dec 2017 - 2:24 pm | अनिंद्य

@ अर्धवटराव,

लेखन आवडल्याचे आवर्जून सांगितले, आभारी आहे.

पण शेजाऱ्याचा डामाडुमा ही मालिका प्रवासवर्णनात्मक नाही, शेजाऱ्यांचा थोडा जवळून परिचय व्हावा असा माझा उद्देश आहे.

तुमच्या सूचना आणि प्रतिसादांचे स्वागतच असेल.

babu b's picture

10 Dec 2017 - 9:00 pm | babu b

६ महिने काढले आहेत मालदीवात. छान लेख

अनिंद्य's picture

12 Dec 2017 - 4:48 pm | अनिंद्य

@ babu b,

आभार !

सहा महिने.... म्हणजे तुम्हाला 'नो न्युज नो शूज' पेक्षा वेगळा मालदीव अनुभवायला मिळाला तर :-)

दीपक११७७'s picture

11 Dec 2017 - 11:36 am | दीपक११७७

नेहमी प्रमाणे अप्रतिम! धन्यवाद!

पुंबा's picture

12 Dec 2017 - 1:15 pm | पुंबा

मस्त लेख आवडला.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

अनिंद्य's picture

15 Dec 2017 - 9:28 am | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,
@ रुपी,

मी मालदीवची लेखमाला २-३ भागात आटोपण्याचे मनात ठरवले होते. नेपाळच्या मालिकेच्या शेवटी तुम्हां दोघांनी पुढच्या देशाबद्दल विस्तृत लिहा, शब्दसंख्येकडे दुर्लक्ष करा असा अभिप्राय दिला. त्या मताप्रमाणे 'आराम से' लिहायचे असे ठरवले आहे, फक्त हाताशी कमी असलेला मोकळा वेळ आणि भरपूर असलेला कंटाळा ह्या रिपुंवर मात केली की झाले :-)

इथे बरेचजण वाचताहेत आणि प्रतिसादही येताहेत, देन व्हाय नॉट ?

उत्साहवर्धनाबद्दल आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

15 Dec 2017 - 9:34 am | अनिंद्य

@ अभिजीत अवलिया
@ बांवरे
@ एस
@ सिरुसेरि
@ दीपक११७७
@ पुंबा,

तुमच्या प्रतिसादांमुळे लिहिण्याचा उत्साह टिकून रहातो,
अनेक आभार !
- अनिंद्य

रायनची आई's picture

18 Dec 2017 - 12:23 pm | रायनची आई

पटापट टाका पुढचे भाग..मालदीव मधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवतात? फक्त पावसावर अवलंबुन की सौदी अरेबिया प्रमाणे Desalination करून?

अनिंद्य's picture

19 Dec 2017 - 5:57 pm | अनिंद्य

दोन्ही पद्धत्तीने.

कपिलमुनी's picture

18 Dec 2017 - 6:17 pm | कपिलमुनी

या देशात इस्लाम प्रसार कसा झाला ?
इथे पण आक्रमक आले का ?

अनिंद्य's picture

19 Dec 2017 - 5:56 pm | अनिंद्य

@ कपिलमुनी
योगायोग बघा -
नुकताच मी पुढचा भाग लिहून संपवला आहे, त्याचे शीर्षक : - मालदीवचा 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४ असे आहे :-)

फक्त छायाचित्रांसाठी थांबलो होतो, ते मला जरा कठीण जाते अजून.

रंगीला रतन's picture

19 Dec 2017 - 10:26 am | रंगीला रतन

सुंदर माहिती. फक्त (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) 'भारताच्या ताब्यातील' हा शब्द्प्रयोग खटकला.

रंगीला रतन's picture

19 Dec 2017 - 10:27 am | रंगीला रतन

'भारताच्या ताब्यातील' हे भारताच्या ताब्यातला असे वाचावे.

अनिंद्य's picture

20 Dec 2017 - 5:05 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

आजच मालिकेतील पुढील भाग प्रकाशित केला आहे, कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

21 Dec 2017 - 4:06 pm | अनिंद्य

@ रंगीला रतन,

प्रतिसादाबद्दल आभार!

. (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची)
मला भारताच्या 'ताब्यातल्या' असे लिहायचे होते. :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Dec 2017 - 4:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक त्यांना, "भारताच्या लक्षद्वीप बेटावरच्या संस्कृतिची", असे अपेक्षित असावे... जो शब्दप्रयोग जास्त योग्य आहे असे वाटते.

पैसा's picture

18 Jan 2018 - 9:46 pm | पैसा

खूपच इंटरेस्टिंग माहिती!

अनिंद्य's picture

19 Jan 2018 - 9:20 am | अनिंद्य

@ पैसा,
आभार !