कथुकल्या १४ ( अंतिम भाग )

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
2 Jul 2017 - 11:03 pm

१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष

1

2

3

4

5

---------------------------------------------

२ .सोशल नेटवर्किंग

सेतूचा सदस्यनोंदणी फॉर्म शब्दार्थने मोबाईलवर उघडला. पण काय करावं यावर त्याचा अजूनही निर्णय होत नव्हता. तो विचारांत असतानाच पॅम्प्लेट वाटणारा मुलगा त्याच्या समोरून गेला. मोबाईलमधील Unknown Pamplet ऑप्शन ON असल्यामुळे पुढच्याच क्षणी ते पॅम्प्लेट स्क्रीनवर होतं.

----------------------------------------
सावधान ! सेतूसारख्या ऑफलाइन वेबशॉप्स पासून सावधान !!

अन्न, वस्त्र, निवारा आणि आंतरजाल ह्या मानवाचा चार मूलभूत गरजा आहेत. आंतरजालाने आपलं विश्व पुर्णपणे बदलून टाकलंय. शाळा, कॉलेज, ऑफिसेस इ. मध्ये जाण्याचा त्रास वाचलाय. घरबसल्या आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आभासी विश्वात आपण तासंतास रममाण होतो, हजारो लोकांशी एकाचवेळी संवाद साधू शकतो. या वरदानामुळे समाज जवळ आलाय, मानवी जीवनाला अर्थ प्राप्त झालाय.
पण सेतू सारख्या काही विघ्नसंतोषी कंपन्या जन्माला येत आहेत त्याचा आपण निषेध करायला पाहिजे. मनुष्य आदिमानव काळात परत जावा असाच त्यांचा हेतू दिसतो. आजची संवादमाध्यमे ते बदलू पाहत आहेत. प्रत्यक्ष संवादात सुरक्षा नाही, फायरवाल तिथे काम करत नाही. त्यामुळे समाजात फूट पडू शकते, परिस्थिती विकोपाला जाऊ शकते.

म्हणूनच सुज्ञ समाजाच्या नागरिकांना, आभासी विश्वाच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करत आहोत की भूलथापांना बळी पडू नका.

आपला,
जैविक डोईफोडे,
अध्यक्ष, 0101 संघटना
आंतरजाल समाज-संघटक,
( सही )
-----------------------------------

पॅम्प्लेट वाचून शब्दार्थचा गोंधळ अजूनच वाढला. त्याच्या समोरच सेतूची चकचकीत इमारत दिमाखात उभी होती. त्रिमितीय वेबसाईटसारखी दिसणारी त्याची बांधणी होती. ‘सेतू : ऑफलाईन समाजबांधणी वेबमंडळ’ असा मोठ्ठा डिजिटल बोर्ड झळकत होता. काही लोक इमारतीजवळ घुटमळत होते, काही दरवाजासमोरील रोबोशी बोलून बिनधास्त आत जात होते. तो एकटक बघत होता, टिपत होता लोकांचे हावभाव.
“सर, भरणार आहात फॉर्म की खिडकी बंद करू ?” मोबाईलमधून आवाज आला.

“थोडं थांब, भरतोय.”

त्याने ‘एकदा जाऊन तर पाहू’ या इराद्याने फॉर्म भरला. लागोलाग पासवर्ड मिळाला.

इमारतीजवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे दरवाजावर रोबोट नव्हे तर जिवंत माणूस पहारा देत होता !
“सर, तुमचा मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इथेच जमा करा.” पहारेकरी अदबीने म्हणाला. शब्दार्थने नियमाचं पालन केलं.
“कृपया तुमचा पासवर्ड सांगा.”
पासवर्ड सांगताच समोरचं ‘लॉगिन गेट’ उघडलं. शब्दार्थने जरा चाचपडतच आत पाऊल ठेवलं.

आत शुभ्रमंद उजेडात उजळून उजळून निघालेला मोठा हॉल होता. वेगवेगळ्या रंगांच्या खुर्च्या, सोफासेट्स कलात्मकरित्या मांडलेले होते. पार्श्वभूमीला बासरीची प्रसन्न सुरावट ऐकू येत होती. हॉलला जोडून अजून काही खोल्या होत्या. त्यावर कॅरम, टेबलटेनिस, बॅडमिंटन अशा पाट्या लिहलेल्या होत्या.

हॉलमधले काही लोक त्याच्यासारखेच गोंधळलेले होते तर काही वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखे गप्पा मारत होते.

“हॅल्लो एव्हरीबडी. सेतू वेबमंडळात तुमचे स्वागत आहे.”
शब्दार्थने आवाजाच्या दिशेने पाहिलं. स्टेजवर उभा असलेला एक व्यक्ती बोलत होता… “ इथलं वातावरण पाहून नवीन मेँबर्सचा गोंधळ उडणे साहजिक आहे. कारण प्रत्यक्ष संवाद साधण्याची सवय कित्येक पिढ्यांपासून तुटली आहे. तुमचं काम मी सोपं करतो… सध्या याला ऑनलाईन सोशल नेटवर्किंग वेबसाईट समजा. तिथे जसं तुम्ही चॅटींग करता तसंच इथे बोला, गप्पा मारा. फरक एवढाच की तिकडे तुमचे डिजिटल अवतार असतात, इथे तुम्ही स्वतः आहात.
ज्यांना ऑनलाईन गेमिंगची सवय असेल त्यांना इथले खरेखुरे इनडोअर गेम्स नक्कीच आवडतील. त्यानिमित्ताने तुमचा व्यायामही होईल. या स्टेजला आपण ‘पोस्ट टाकण्याची जागा’ असं म्हणू. तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता, आपल्या मनातील विचार मांडू शकता, कला सादर करू शकता. “
त्याने प्रतिसाद आजमावण्यासाठी समोर पाहिलं
“चला तर मग… कोण आहे तयार ?”

शब्दार्थ खूप चांगलं गायचा. स्वरचित गाणी रेकॉर्ड करून वेबसाईट्सवर पोस्टायचा. तिथे त्याला खूप प्रतिसाद आणि लाइक्स मिळायचे. इतक्या लोकांसमोर तो कधी गायला नव्हता, पण त्याने हिंमत करायचं ठरवलं.
“मी तयार आहे.” त्याने हात उंचावला.

“दॅट्स माय बॉय. पुट युअर हॅण्ड्स टुगेदर फॉर धिस यंग मॅन.”

बऱ्याचजणांना याचा अर्थ लक्षात आला नाही.

“दोन्ही तळहात जवळ आणायचे आणि अशा टाळ्या वाजवायच्या .” अॅंकरने प्रात्यक्षिक करून दाखवलं. सर्वांनी त्याचं अनुकरण केलं.

शब्दार्थ स्टेजवर पोहोचला अन त्याने समोर नजर टाकली. सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. हा अनुभव खूपच वेगळा होता. तो जरा घाबरला.

“कमॉन यू कॅन डू इट.”
“घाबरू नकोस मित्रा.”
प्रेक्षकांमधून प्रोत्साहनपर आवाज उमटू लागले. त्याने डोळे मिटले. जगाचं भान विसरून तो बराचवेळ गात राहिला. गाणं संपलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की टाळ्यांचा कडकडाट होतोय, वन्स मोअरची उत्स्फूर्त मागणी होतेय. आतापर्यंत त्याला भरपूर लाइक्स मिळाल्या होत्या पण आजचा प्रतिसाद अनोखा होता, अनुभूती वेगळी होती… जगावेगळी.

तो दुसरं गाणं गायला, तिसरंसुद्धा. त्याचं अनुकरण करत अजून काही लोक समोर आले, कुणी बोललं, कुणी गाणं म्हटलं, कुणी नाचलं.
शब्दार्थ बराचवेळ त्या वेबसाईट- सदृश्य इमारतीत रममाण झाला.

‘लॉगआउट’ दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने सेतूविरोधी सगळे पॅम्प्लेट्स आणि जाहिराती डिलीट करून टाकल्या.

-------------------------------------------

कथाशब्दक्रीडाkathaaप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

2 Jul 2017 - 11:13 pm | भिंगरी

हम्म्म्म!!!
कधीतरी अशी वेळ येणारच आहे.

तुमचा आधीचा इतिहास पाहता, थोडी वाट पाहतो!

*मूळ कल्पना तुमची असेल तर, खरोखर मनापासून आवडली आहे.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

3 Jul 2017 - 12:45 am | अॅस्ट्रोनाट विनय

पहिल्या कथेतील चित्र दिसत नाहीयेत का ? Syntax आणि url तर बरोबर आहे.

ज्योति अळवणी's picture

3 Jul 2017 - 7:57 am | ज्योति अळवणी

पहिली कथाच दिसत नाही. दुसरी आवडली. आपल्या पतवंडांचं भविष्य?!

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2017 - 10:30 am | प्राची अश्विनी

पहिली दिसली नाही पण दुसरी आवडली.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

3 Jul 2017 - 10:50 am | अॅस्ट्रोनाट विनय

पहिल्या कथेत पाच चित्र आहेत ( प्रायोगिक कथा ) पण ते दिसत नाहीयेत. Editing ची सुविधा असती तर code परत एकदा तपासता आला असता.

Admin साहेब, चित्र अवतरित करता येतील का.

नीलमोहर's picture

4 Jul 2017 - 8:01 pm | नीलमोहर

बरोबर आहेत का तपासून घ्याल.
कथा कळत आहे असे वाटता वाटता कन्फ्यूजन झाले,
चंद्रभान घोरपडे आणि चंद्रशील घोरपडे... परत कन्फ्यूजन.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

5 Jul 2017 - 4:48 pm | अॅस्ट्रोनाट विनय

धन्यवाद सर _/\_ चित्रे दिसत आहेत सगळी.
शेवटच्या चित्रात ( बातमीत )typo झालाय. चंद्रशील ऐवजी चंद्रभान पाहिजे होतं.

प्रियाभि..'s picture

7 Jul 2017 - 5:31 pm | प्रियाभि..

मामानेच स्वतःच्या भाच्याचा खून केला असं तर नाहीय ना?

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jul 2017 - 8:13 pm | अॅस्ट्रोनाट विनय

नाही.
दिलेल्या पुराव्यांमधून काय घडलं असेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल.

i) चंद्रशील ऐवजी चंद्रभान असे वाचावे
ii) मुलाने लिहलेली चिठ्ठी कधीच कुणाला सापडली नाही.

प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:22 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:23 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:23 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:23 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:23 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2017 - 6:23 am | प्रियाभि..

तुमची कल्पना आणि हा लेखनप्रकारही जबराट वाटला राव! नविन प्रकार असल्याने वाचनात थोडी गडबड झाली पण नीट वाचल्यावर उलगडा होतोय आणि आनंदही मिळतोय..

अॅस्ट्रोनाट विनय's picture

13 Jul 2017 - 12:17 am | अॅस्ट्रोनाट विनय

_/\_