अदृष्य हात

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
17 Jun 2017 - 7:56 am

चाले कशी काय ही अर्थव्यवस्था चाले कशी काय?
अदृष्य हाताची ही सारी सारवासारव नव्हे काय?

पैसा म्हणजे काय, सांगा पैसा म्हणजे काय?
मानवनिर्मित मूल्यवाचक, म्हणजे पैसा नव्हे काय?
पैसा करतो काय, सांगा पैसा करतो काय?
ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे माप तो भरे नव्हे काय?

कर्म म्हणजे काय सांगा, कर्म म्हणजे काय?
भांडवल जमीन वापरून श्रमदान म्हणजे कर्म नव्हे काय?
कर्म करते काय सांगा, कर्म करते काय?
वस्तू आणि सेवा कर्मच निर्माण करी नव्हे काय?

त्याला मिळते काय, सांगा कर्मचाऱ्याला मिळते काय?
मालक फेकेल तेवढा तुकडा, त्याचाच नव्हे काय?
श्रेष्ठ नव्हे काय, त्याचे योगदान श्रेष्ठ नव्हे काय?
योग्यतेने नव्हे, श्रेष्ठता पैशाने ठरे नव्हे काय?

ह्यांचे करायचे काय, सांगा वस्तू सेवांचे करायचे काय?
बाजारात जाऊन त्यांचे मूल्य वाजवून घ्यायचे नव्हे काय?
मूल्य किती आणि काय, सांगा मूल्य किती आणि काय?
बाजारातील मागणी पुरवठा, हे ठरवी नव्हे काय?

मूलभूत गरजा काय, सांगा मूलभूत गरजा काय?
अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा नसती काय?
त्यांचा पुरवठा मागणीप्रमाणे असतो काय, सांगा असतो काय?
मागणी भरपूर, पण पैशाचा पुरवठा कमी पडतो त्याचे काय?

अन्न वस्त्र निवारा मिळे काय, सांगा सर्वाना मिळे काय?
असेल पैसा कमवायची कुवत, त्यालाच मिळे नव्हे काय?
कुवत नसेल तर काय, सांगा कुवत नसेल तर काय?
तुमचं ठीक चाललंय ना, तुम्हाला इतरांशी देणेघेणे काय?

कुवत असेल तर काय, सांगा कुवत असेल तर काय?
पैशाकडे पैसा, हेच अंतिम सत्य नव्हे काय?
पैशाने करायचे काय सांगा, पैशाने करायचे काय?
ऐपत आणि मर्जीप्रमाणे, सुख ओरबाडायचे नव्हे काय?

सुख म्हणजे काय सांगा सुख म्हणजे काय?
हवी तेंव्हा हवी तेवढी चैन, म्हणजे सुख नव्हे काय?
सुखाने मिळते काय, सांगा सुखाने मिळते काय?
दुसऱ्याचे दु:ख दिसत नाही, आणखी हवे काय?

चैन म्हणजे काय, सांगा चैन म्हणजे काय?
बिनगरजेच्या वस्तूंची भर, म्हणजे चैन नव्हे काय?
सांगा होते काय, चैन केल्याने सांगा होते काय?
आयुष्याचे सार्थक आणखी वेगळे सांगा काय?

काव्य शास्त्र विनोदाला काय, सांगा चैनीत स्थान काय?
श्रीमंत पैसा फेकून, कलावंताना जगवती नव्हे काय?
खऱ्या रसिकाचे काय, सांगा खऱ्या रसिकाचे काय?
कलावंताना पडली नाही, तुम्हाला नसती उठाठेव काय?

कर्म जास्त केल्याने, सांगा पैसा जास्त मिळतो काय?
थोडा सचोटीने, बक्कळ लबाडीने तो जमे नव्हे काय?
चालतो कसा काय, लबाडीचा पैसा चालतो कसा काय?
अहो, खुळे का अज्ञानी तुम्ही? विचारा धावतो कसा काय?

अदृष्य हाताचे काय, सांगा त्या अदृष्य हाताचे काय?
अहो देवासारखाच तो, फक्त नावापुरता, समजले काय?
... संदीप लेले

अनर्थशास्त्रकवितासमाजजीवनमानअर्थकारण