न्यूरेम्बर्ग - भाग २

अफगाण जलेबी's picture
अफगाण जलेबी in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 10:41 pm

न्यूरेम्बर्ग - भाग १

न्यूरेम्बर्ग - भाग २

खटला सुरु होण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक होतं. मुख्य मुद्दा म्हणजे हा खटला चालणार कुठे? याचं सगळं कामकाज कसं होणार? कैद्यांना – ज्यांच्यातले काहीजण साक्षीदारही असणार होते – ठेवायचं कुठे? त्यांचं संरक्षण कसं करायचं? ज्या कोर्टरूममध्ये हा खटला चालणार होता ती कशी असेल? या सर्व कामकाजाची नोंद कशी ठेवायची? जगातल्या कुठल्याही देशात जेव्हा एखादा खटला भरला जातो आणि तिथे असे प्रश्न उद्भवतात, तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकांसमोर एक साधासरळ मार्ग असतो – याआधी अशाच परिस्थितीत काय झालेलं आहे ते पाहणं. पण इथे तोच तर प्रश्न होता. हा खटलाच अभूतपूर्व होता.

एक गोष्ट स्पष्ट होती. हा खटला जर्मनीमध्येच व्हायला हवा यावर सर्वांचं एकमत होतं. ज्या देशामध्ये या खटल्यातल्या आरोपींनी अनिर्बंध सत्ता उपभोगली आणि नाझी राजवटीच्या नावाने अनन्वित अत्याचार केले त्याच देशामध्ये हा खटला चालवला जाणं हे महत्वाचं होतं कारण न्याय केवळ मिळणं हे महत्वाचं नव्हतं, तर तो तसा मिळालेला दिसणं हेही महत्वाचं होतं – विशेषतः ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका इथल्या जनमताच्या दृष्टीने. त्यामुळेच आरोपींना एखाद्या विजेत्या देशाच्या राजधानीत आरोपांना सामोरं जावं लागणार नव्हतं, तर जिथे त्यांनी एकेकाळी राज्य केलं तिथेच त्यांचा न्यायनिवाडा होणार होता.

पण जर्मनीची राजधानी बर्लिन त्यावेळी अत्यंत वाईट अवस्थेत होती. बर्लिन शहराचा मोठा भाग रशियन सैन्याच्या ताब्यात होता आणि खटला तिथे चालायला त्यांची काहीही हरकत नव्हती. उलट त्यांचा तसा आग्रह होता. पण बर्लिनमध्ये एकही इमारत धड उभी नव्हती. शिवाय न्यायाधीश, वकील, पोलीस, पत्रकार या सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था बर्लिनमध्ये होणं जवळपास अशक्य होतं. दुसरीकडे कुठे राहून दररोज बर्लिनमध्ये येणं अव्यवहार्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होतं. अनेक कट्टर नाझी, विशेषतः एस्.एस्.चे सदस्य आपल्या नेत्यांना सोडवायचा किंवा त्यांच्यावर खटला भरणाऱ्यांना घातपात करून मारायचा प्रयत्न करण्याची पूर्ण शक्यता होती. अशावेळी एका अमेरिकन जनरलने न्यूरेम्बर्गचं नाव सुचवलं. नाझींच्या प्रचारामध्ये न्यूरेम्बर्गमधल्या भव्य मिरवणुका, हिटलरच्या सभा आणि महोत्सवांचा खूप मोठा वाटा होता, आणि युद्धाच्या उत्तरार्धात दोस्तराष्ट्रांच्या वायुदलांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांचा तेवढा परिणाम न्यूरेम्बर्गमधल्या इमारतींवर फारसा झाला नव्हता. तिथल्या न्यायालयाची इमारत, ज्याला न्यायप्रासाद किंवा the Palace of Justice असं नाव होतं, तोही व्यवस्थित उभा होता आणि त्याच्याच जवळ एक मोठा तुरुंगही चांगल्या अवस्थेत होता. या तुरुंगातून न्यायालयात सरळ येता येत होतं. अमेरिकनांच्या दृष्टीने सर्वात सुदैवाची गोष्ट म्हणजे न्यूरेम्बर्ग जर्मनीच्या ज्या भागात होतं, त्यावर त्यांचं नियंत्रण होतं.

शेवटी रशियनांनीही न्यूरेम्बर्गला मान्यता दिली. पण त्यांच्या आग्रहाला मान देऊन बर्लिनमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय असेल, पण प्रत्यक्ष खटला न्यूरेम्बर्गला चालेल असं जाहीर करण्यात आलं.

न्यायालयाने आपलं काम अधिकृतरीत्या १८ ऑक्टोबर १९४५ या दिवशी सुरु केलं. या दिवशी वेगवेगळ्या आरोपांमुळे न्यायालयासमोर उभ्या राहणाऱ्या नाझी आरोपींवर आरोपनिश्चिती (indictment) हे काम पूर्ण करण्यात आलं आणि खटला चालू होण्याची तारीखही. २० नोव्हेंबर १९४५.

आता सगळे आरोपी न्यूरेम्बर्गच्या तुरुंगात आणले गेले होते. इथला मुख्य अधिकारी होता अमेरिकन सैन्यातला कर्नल बर्टन अँड्रस. त्याच्या देखरेखीखाली या सर्व आरोपींना १९ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांची प्रत देण्यात आली. आता न्यायालयाच्या नियमानुसार या सर्व आरोपींना आपापले वकील निवडायचे होते. एकटा डोनित्झ सोडला तर कोणीही याचा विचार केला नव्हता. डोनित्झने जर्मन नौदलातल्या क्रांझब्युहलर नावाच्या वकील आणि अधिकाऱ्याला स्वतःचा वकील म्हणून निवडला, पण आरोपपत्र मिळून एक आठवडा उलटला तरीही बाकी आरोपींनी त्यांचे वकील ठरवले नव्हते. गोअरिंग आणि हेस यांची सुरुवातीला स्वतःसाठी वकील घेण्याची तयारी नव्हती. पण न्यायालयापुढे त्यांचं काही चाललं नाही. जर्मन वकिलांना जर्मनीच्या एकेकाळच्या राज्यकर्त्यांसाठी न्यायालयात उभं राहावं लागेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही असं गोअरिंगने म्हटलं होतं. पण फ्रित्झ स्टाहमर नावाच्या एका माजी न्यायाधीशाने त्याचा वकील म्हणून उभं राहायचं मान्य केल्यावर त्याला आनंदही झाला होता. स्टाहमरनेही लगेचच वर्तमानपत्रांत मुलाखत दिली आणि त्यात “ गोअरिंगवर ठेवलेले आरोप चुकीचे असून तो निर्दोष असल्याची आपली खात्री झाल्यामुळेच मी त्याचं वकीलपत्र स्वीकारत आहे,” असं सनसनाटी विधान केलं.

पण ही तर केवळ सुरुवात होती. न्यायालयाचा पुढे अशा अनेक वकिलांशी सामना होणार होता. या वकिलांपैकी अनेकजण पूर्वाश्रमीचे नाझी, किमान नाझी पक्षाचे सदस्य असणार आहेत याचीही न्यायालयाला जाणीव होती, कारण नाझी जर्मनीमध्ये कुठलाही व्यवसाय यशस्वीपणे करण्यासाठी त्या माणसाचं ज्यू नसणं आणि नाझी पक्षाचा सदस्य असणं या आवश्यक गोष्टी होत्या. पण त्याला इलाज नव्हता. अनेक परदेशी वकिलांनीही नाझी नेत्यांचं वकीलपत्र घेण्यासाठी अर्ज केला होता, पण भाषा हा एक मुद्दा आणि आपल्या वकिलाशी नीट संवाद साधता न आल्यामुळे त्याने आपलं प्रतिनिधित्व योग्य प्रकारे केलं नाही असा आरोप कुणी करावा अशी न्यायालयाची इच्छा नसणं हा दुसरा मुद्दा असल्यामुळे त्यांनी परदेशी वकिलांना नकार दिला आणि आरोपींनी ठरवलेले वकील मान्य केले. फक्त एका ठिकाणी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. आल्फ्रेड रोझेनबर्गने त्याचा सहआरोपी हान्स फ्रँक हा आपला वकील असेल असं सांगितलं पण फ्रँक एकाच वेळी आरोपी आणि दुसऱ्या आरोपीचा वकील असू शकत नाही असं न्यायालयाने ठामपणे सांगितल्यामुळे रोझेनबर्गला दुसऱ्या वकिलाचा शोध घ्यायला लागला.

बर्टन अँड्रसने या सगळ्या कैद्यांचा दिनक्रम अगदी काटेकोरपणे आखला होता. आपल्या वकिलांशी चर्चेचा वेळ आणि दररोज अर्धा तास व्यायाम – जिथे ते इतर कैद्यांना भेटू शकत – हे सोडलं, तर ते आपल्या कोठडीमध्ये पूर्णपणे एकटे असायचे. कोठडीमध्येही पुस्तकं वाचणं आणि पत्रं लिहिणं याशिवाय दुसरं कोणतंही काम ते करत नव्हते. “ या लोकांपैकी काही जणांच्या डोक्यात जे भरलेलं आहे त्याचा विचार केला तर कोठडीत एकटं बसून ते वेडे कसे होत नाहीत असा विचार माझ्या मनात येतो ” असं अँड्रसने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. रॉबर्ट लीच्या आत्महत्येनंतर तुरुंगातला पहारा आणि कैद्यांचा दिनक्रम हे अजून कडक झाले होते. अजून एकही आत्महत्या होता कामा नये यावर अँड्रसचा कटाक्ष होता.

या वातावरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी मानसोपचार तज्ञांच्या भेटी आयोजित केल्या. तसंही नाझींचं मन समजून घेण्यात त्यांना रस होताच. अमेरिकन सैन्यातला आणि आता या कैद्यांसाठी नियुक्त करण्यात आलेला मानसोपचारतज्ञ गुस्ताव्ह गिल्बर्ट याने या आरोपींसाठी काही मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या आणि त्यांची चक्क परीक्षा घेतली. गोअरिंग या चाचण्यांमध्ये त्याला मिळालेले गुण बघून एखाद्या हुशार आणि अहंमन्य शाळकरी मुलासारखा खुश झाल्याचं गिल्बर्टने लिहून ठेवलेलं आहे. पण जेव्हा त्याला कळलं की त्याच्यापेक्षा जास्त गुण शाख्त, सेस-इन्क्वार्ट आणि श्पीअर यांना मिळालेले आहेत तेव्हा त्याच्या उत्साहाचा फुगा फुटला. सर्व आरोपींनी जे गुण मिळवले त्यावरून प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा वरची होती हे तर सिद्ध झालंच. तरी सॉकेल, कालटेनब्रूनेर आणि स्ट्रायचर यांना या चाचण्यांमध्ये सर्वात कमी गुण मिळाले.

एकीकडे या चाचण्या चालू असताना गिल्बर्टच्या सहकारी मानसशास्त्रज्ञांना आरोपींच्या त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांवर ज्या प्रतिक्रिया मिळाल्या, त्यांच्यावरून त्यांच्या मानसिकतेचा अंदाज त्यांना बांधता आला. स्ट्रायचर अजूनही त्याच्या आभासी जगातून बाहेर आलेला नव्हता. “ हा संपूर्ण खटला म्हणजे या जगातल्या ज्यू कारस्थानाचा विजय आहे ” अशी त्याची प्रतिक्रिया होती. गोअरिंग तर या संपूर्ण खटल्याच्या बाबतीत अत्यंत थंडपणे प्रतिक्रिया देत होता - “ जे युद्धात जिंकले ते नेहमीच न्यायाधीशाच्या भूमिकेत असतील आणि जे हरले ते नेहमीच आरोपी असतील.” त्याच्या मते हा संपूर्ण खटला हे एक नाटक होतं, आणि त्यात काय होणार आहे, हे आधीच ठरलेलं होतं. हेसने आपल्याला पूर्वीचं काहीही आठवत नसल्याची सावध प्रतिक्रिया दिली. आरोपींमधल्या सैनिकांच्या प्रतिक्रियाही अगदी साच्यातल्या होत्या. आम्हाला जे आदेश दिले गेले ते आम्ही कुठलाही प्रश्न न विचारता आणि कुठलीही शंका न घेता पाळले, असं करणं हे एक सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला या भीषण गुन्ह्यांविषयी काहीही माहित नाही. ते करण्यात आमचा कुठल्याही प्रकारे सहभाग नाही – अशी कायटेल, जोड्ल, डोनित्झ या तिघांचीही प्रतिक्रिया होती.

पण काही जणांनी याविरुद्ध मतही व्यक्त केलं. फॉन शिराकने “ हे सगळं वंश आणि वंशाधारित राजकारण यामुळे घडलेलं आहे ” अशी कबुली दिली. श्पीअरची प्रतिक्रिया सर्वात प्रांजळ म्हणावी लागेल – “हा खटला अत्यंत गरजेचा आहे. जरी राजवट हुकुमशाही स्वरुपाची असली, तरी ज्या स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत, त्यासाठी एक सामायिक जबाबदारी ही असलीच पाहिजे.”

ही सामायिक जबाबदारी सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न न्यायालयाच्या निर्मितीपासून चालू झाले होते. उरलेला ऑक्टोबर महिना आणि अर्ध्या नोव्हेंबर महिन्यात न्यूरेम्बर्गमध्ये न्यायाधीश आणि सरकारी वकील यांची वर्दळ चालू होती. त्यांच्यासाठी निवासस्थानं, कार्यालय आणि त्यांच्या कागदपत्रांसाठी जागा शोधणं हे एक अवाढव्य काम होतं. ही कागदपत्रं वेगवेगळ्या भाषांमध्ये होती. त्यांचं भाषांतर ही एक किचकट जबाबदारी होती. काही शेवटच्या क्षणी उद्भवलेले कायदेशीर प्रश्न होते आणि त्यांची विल्हेवाट लावणं हेही आवश्यक होतं. हेस आणि स्ट्रायचर यांची वागणूक दिवसेंदिवस जास्तच तऱ्हेवाईक होत चालली होती. ते दोघेही त्यांच्यावर खटला चालवण्याएवढे मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत का हा प्रश्न होता. फ्रेंच आणि रशियन सरकारांची हा खटला अजून काही महिन्यांनी सुरु व्हावा अशी इच्छा होती.
पण शेवटी या सगळ्या आयत्या वेळी आणि शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या अडचणींवर कशीबशी मात करण्यात आली आणि २० नोव्हेंबर १९४५ या ठरलेल्या दिवशी सकाळी १०.०० वाजता हा खटला सुरु झाला.

क्रमशः

संदर्भ –
१. Nazi War Trials – Andrew Walker
२. A Train of Powder – Rebecca West
३. Spandau: The Secret Diaries – Albert Speer
४. Reaching Judgment at Nuremberg – Bradley Smith
५. The Rise and the fall of the Third Reich – William Shirer.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

काहीसा उशिरा आलाय हा भाग. पण वाचनीय. पुढील भाग लवकर टाका.

माझीही शॅम्पेन's picture

10 Apr 2017 - 12:52 pm | माझीही शॅम्पेन

दोन्ही भाग छान आहेत _/\_, जरा पटापट टाकले तर लिंक तुटणार नाही

छान झालाय हा ही भाग. तुरुंगात असतानाच्या त्यांच्या प्रतिक्रिया फारच चकित करणार्‍या आहेत !

संजय क्षीरसागर's picture

3 May 2017 - 1:21 am | संजय क्षीरसागर

तुमच्या लेखनाला.

रुपी's picture

4 May 2017 - 5:03 am | रुपी

फारच छान आहे हा भागही.

एवढा मोठा खटला चालवायला खर्चही अवाढव्य झाला असणार. त्याची सोय कशी झाली याबद्दल काही माहिती मिळेल का?