काटा रुते कुणाला…..भाग ३

Jabberwocky's picture
Jabberwocky in जनातलं, मनातलं
7 Nov 2016 - 10:32 am

मी दार उघडून आतमध्ये गेलो, तोच आई समोर आली.
फ्रेश हो, जेवण वाढते, आई म्हणाली.
मी आत जात म्हणालो, नाही भूक नाहीये,आम्ही जेवलोय रुश्याच्या घरी.
खरं का? आई
मी म्हणालो खरच ग विचार त्याच्या आईला फोन करून. ती फोन करणार नाही हे मला माहित होत म्हणून मी थाप मारली.
माझं डोकं खूप दुखतंय, मी झोपतो. कुणी आलं तर सांग झोपलोय. मी म्हणालो
मी माझ्या रूम मध्ये गेलो ते थेट बिछान्यावर आडवा झालो.खूप थकून गेल्यासारखं वाटत होत. पण हा थकवा शरीराचा नव्हता, हा मनाचा थकवा होता. आयुष्यात सर्वात पहिल्यांदा लक्षात आलं की शरीराच्या थकव्यापेक्षाही मनाचा थकवा हा जास्त त्रासदायक असतो.
नको म्हंटल तरी मनात राहून राहून सारखा विचार येत होता की माझ्या स्वप्नपरीने माझी सगळी स्वप्न क्षणात धुळीला मिळवली होती. रेवा असं करूच कस शकते. तिला करायचंच होत लग्न तरी निदान तिने मला सांगायचं तरी. असं तिसर्याकडून मला हि बातमी कळावी इतका मी आता तिला परका झालो असं मला वाटायला लागलं. दुःखात माणूस अजिबात लॉजिकली विचार करत नाही, माझी तेच चालू होत. किती महत्वाची गोष्ट रेवाने मला सांगितली नाही, माझं तिच्या आयुष्यात कसलच अस्तित्व नाही, साध्या मित्राइतकही नाही. पण असं म्हणावं तरी ती रोज बोलतेचं की माझ्याशी. मला काहीच समजत नव्हतं. जितके विचार मनात येत होते तितकाच जास्त मानसिक त्रास मला जाणवत होता. एखाद्या वारुळातून लाखो मुंग्या एकदम बाहेर पडाव्यात तसे विचार मनातून बाहेर पडायला सुरुवात झाली. हे असलं होणं म्हणजे अगदी जीवघेणा प्रकार. थोड्याच वेळात मी वेडा होईल की काय असं मला वाटायला लागलं.

मला विचार करण थांबवायचं होत पण अशा वेळी ते शक्य नसत. झोप येन तर त्याहून अशक्य. मी अंथरुणावरून उठलो आणि माझी बॅकपॅक उघडली. रेवाने माझ्या मागच्याच महिन्यात झालेल्या वाढदिवसादिवशी दिलेलं ग्रीटिंग मी बाहेर काढलं. ते मी स्वतःजवळ नेहमी बाळगत असत. तिने दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खासच असायची, हे ग्रीटिंग तर मला खूप आवडायचं. मी ते आत्तापर्यंत हजारो वेळा वाचल असेल पण तरीही प्रत्येक वेळी ते माझ्या मनावरून मोरपीस फिरवून जायचं.
मी ते उघडलं, आत तिने आणखी तीन छोटे छोटे ग्रीटिंग चिटकवले होते. मी पहिलं उघडलं त्यातला मजकूर वाचायला लागलो.

नवीन वाढदिवस, नवीन वर्ष
नवे रंग, नवे संग
नवे मित्र, नव्या खोड्या
हव्या तितक्या करायच्या
नवीन क्षितिज, नवी आव्हानं
तितक्याच अलगद पेलायच्या
नवीन गर्दीत रमताना मात्र, एक लक्षात ठेवायचं
जुने मित्रही महत्वाचे, त्यांना नाही विसरायचं

"जुने मित्रही महत्वाचे, त्यांना नाही विसरायचं", हे वाक्य आजकाल माझ्या बोलण्यातून माझ्या नवीन मैत्रिणीचा उल्लेख वारंवार होऊ लागला होता, त्याचा हा परिणाम होता.

मी पुढचा आणखी एक ग्रीटिंग उघडलं, ते इंग्रजीत होत, मी वाचू लागलो आणि आता तिच्या अनावर आठवणीने माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळायला सुरुवात झाली.

Happy Birthday to a wonderful person, So special So rare
Who made this world a sunnier, happier, & more livelier place for “ME”.

आता मी शेवटचं छोटंसं ग्रीटिंग उघडलं, हे माझ्यासाठी खूपच स्पेशल होत, त्या ग्रीटिंगच्या एका बाजूला एक लाल गुलाबाच्या टपोऱ्या फुलाचं एक छान चित्र होत, आणि दुसऱ्या कोऱ्या असलेल्या बाजूवर रेवाने तिच्या सुंदर अक्षरात लिहिलं होत, “THANKS FOR EVERYTHING – Reva”

मला तिला कधी विचारावंस वाटलं नाही कि तिने THANKS FOR EVERYTHING असं का लिहिलं, कारण मला वाटत की माणसं अशीच एखाद्या विशेष प्रसंगाच्या क्षणी स्वतःच्या भावना व्यक्त करतात, तसाच तिनेही केलं असावं. पण आता मला वाटायला लागलं की तिला नक्कीच माहित होत की येत्या महिनाभरात तीच लग्न ठरणार आहे आणि म्हणूनच जणू काही तिने हे लिहिले असणार. समारोपाचे शद्ब नक्कीच, आपण एखाद्या व्यक्तीला पुन्हा भेटणार नाही आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण अशाच प्रकारे आपल्या भावना व्यक्त करून त्या व्यक्तीला कायमचा निरोप देतो किंवा त्या व्यक्तीचा निरोप घेतो.
हे इतकं साधं गणित मला तेंव्हा कस काय लक्षात आलं नाही, मी खरतर तिला विचारायला हवं होत त्याबद्दल, पण जाऊदे आता काय उपयोग.
आता मला माझा वाढदिवस आठवत होता. त्या दिवशी संध्याकाळी रेवा माझ्या वाढदिवसासाठी आली होती पण तरीही तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी बारा वाजलेले मला स्पष्ट दिसत होते. ती तशी माझ्या कॉलनीमधल्या सगळ्या मित्रांना ओळखायची आणि क्वचितप्रसंगी भेट झाली तर त्यांच्याशी बोलायची देखील, वाढदिवसामुळे माझे मित्र देखील घरी आले होते पण त्या दिवशी मात्र ती कोणाशीच फारसं बोलत नव्हती. काही विचारलं कुणी तर फक्त उत्तर देत होती,आणि मुख्य म्हणजे ती माझी नजर टाळत होती.मला टाळता येन तेवढं सोपं नाही म्हणून तिने स्वतःला आईसोबत किचन मध्ये बिझी ठेवलं. अधून मधून मी हि किचन मध्ये चक्कर मारत होतो तिला पाहायला, माझ्या कडे पाहून मग हसत होती पण ते हसन किती खोटं होत ते मी समजून गेलो होतो.
हे रेवाचं वेगळं रूप, इमोशनल झाल्यावरच. तीच हे रूप मी चांगलंच ओळखून होतो. काहीतरी बिनसलंय हे मला जाणवलं, पण सर्वांसमोर विचारातही येत नव्हतं. जेवण करत असताना मी खुणेनेच तिला विचारलं तर तिने डोळे बंद करून काही नाही असा इशारा केला. एखाद्या मुलीचा मुड ऑफ असताना तुम्ही काय झालं म्हणून विचाराल आणि ती काही नाही म्हणेल तेंव्हा समजून जायचं कि बरच काही आहे, काळजी करण्यासारखं.
संध्याकाळी नऊ च्या आसपास सगळे आपआपल्या घरी निघाले. सगळे गेल्यानंतर रेवा घरी जायला निघाली, निघताना तिने मला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि माझ्यासाठी आणलेलं ग्रीटिंग कार्ड माझ्या हातात ठेवलं. मी ते उघडणार तेवढ्यात म्हणाली आत्ता नको नंतर निवांतपने बघ. असं म्हणून ती लगेच पुन्हा आईकडे गेली किचन मध्ये तिला ती निघते आहे म्हणून सांगायला.
ती बाहेर आली आणि तिच्या पाठोपाठ आई पण बाहेर आली. ती मला काही न बोलताच घराच्या बाहेर पडायला लागली, तेवढ्यात आई म्हणाली थांब रेवा सागर तुला घरी सोडून येईल. तर ती म्हणाली नको काकू, मी जाते जवळच तर आहे घर. माझ्यासाठी हे अनपेक्षित होत ती कधीच असं करत नसे, ती माझ्याकडे आली कि मी तिला सोडायला जायचंच हा तिनेच घालून दिलेला अलिखित नियम होता आणि तीच तो मोडत होती. ती मला अव्हॉइड करत होती मुद्दाम. आईलाही ते लक्षात आलं असावं तिने मला खुणेनेच जा तिच्यासोबत असा इशारा केला तसा मी तिच्या मागोमाग घराबाहेर पडलो.
घराबाहेरच्या लॉन वर येताच मी तिचा हात धरून तिला थांबवलं.

ए राणी थांब जरा, काय झाल तू अशी नाराज नाराज का आहेस आज? मी तिला म्हणालो
काही नाही रे.
माझ्यावर नाराज आहेस का? मी
नाही रे.
मग काय झालं सांग बघू. मी
अरे असच. आज पप्पांची आठवण येतीय खूप म्हणून थोडासा मूड ऑफ आहे.

आम्ही आठवीमध्ये असतानाच तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. आणि तेंव्हापासून तिच्या मर्जीविरुद्ध काहीही घडलं तर तिला नेहमी वाटायचं कि आज जर पप्पा असते तर तिला तिच्या मर्जीविरुद्ध कधी वागव लागलं नसत. तिचे वडील गेल्यानंतर ती फारच भावुक झाली होती, आणि का नाही होणार इतक्या लहान वयात तिने हा आघात सहन केला होता. तिचे सगळे लाड पुरवणारे तिचे वडील तिच्यासोबत नव्हते आणि तीच हे दुःख कमी होण्यासारखाही नव्हतं. कदाचित ज्यांनी हे नियतीचे असले आघात सोलले असतील तेच तिच्या या दुःखाची कल्पना करू शकतील. मी जरी तीच हे दुःख समजू शकत नव्हतो तरी मला त्याची जाणं नक्कीच होती. आणि तीच मनोधैर्य खचू नये यासाठी मी स्वतःहून कधी तिला दुखवत नसे. माझ्या असं वागण्याचं कारण देखील तस होत कारण तिचे वडील गेल्यांनतर मी तिच्या आयुष्यात आलो होतो आणि आमच्या दोघाच्याही नकळत तिच्यासाठी मी म्हणजे तिला मनसोक्तपने तीच मन मोकळं करू शकणारी एक हक्काची जागा झालो होतो. आता तिच्या आयुष्यात तिच्या आईनंतर मी हि एक महत्वाची जागा घेतली होती. अर्थात हे काही ठरवून झालं नव्हतं.
तिला एक मोठी बहीणही होती, ती देखील तिला खूप जवळची होती, पण तीच लग्न झाल्यामुळे ती तिला फारसा वेळ देऊ शकत नसे. तिची बहीण देखील आमच्याच कॉलनीमध्ये राहायला असल्यामुळे माझी चांगली ओळख होतीच त्यांच्या कुटुंबाशी. अर्थात रेवासोबत मी अनेकवेळा तिच्या बहिणीच्या घरी जायचो. रेवाचे आणखी दोन मोठे भाऊ होते, पण कामाच्या व्यापामुळे ते त्यांच्या लाडक्या लहान बहिणीला इच्छा असूनही वेळ देऊ शकत नसायचे. त्यामुळे राहता राहिली आई, पण वयात आल्यावर मुलींना किंवा मुलांनादेखील त्यांच्या सर्वच भावना किंवा सगळे विचार आपल्या आईशी वडिलांशी नाहीत ना शेयर करता येत. त्यामुळेच कदाचित तिच्या आयुषयात आता माझंही एक महत्वाचं स्थान निर्माण झालं असावं.
आमच्या वेळेस असं मुलगा आणि मुलगी एकमेकांचे मित्र असणे, त्यांची सतत उठबस असणे या गोष्टी सर्वमान्य नव्हत्या. पण कदाचित आम्ही तेंव्हा लहान असू म्हणून तिच्या आणि माझ्या घरच्यांना आमच्या या मैत्रीबद्दल काही आक्षेप नसावा आणि जसे आम्ही मोठे होत गेलो तसे एकमेकांच्या घरच्या लोकांशीही आमचे चांगले बंध तयार होत गेले आणि आमच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसत गेला. आम्हाला कधीही एकमेकांच्या घरी वावरताना संकोच वाटला नाही. अर्थात लहान असताना संकोच वाटण शक्यच नव्हतं आणि आता मोठे झालो तरी आम्ही आमच्या नजरेत मोठे झालो होतो. घरच्यांच्या नजरेत आम्ही अजूनही तेच लहान सागर आणि रेवा होतो.

तुला कसलं टेन्शन वगैरे आलाय का? काही झालाय का रेवा तुझ्या मनाविरुद्ध? मी विचारलं कारण मी तिला तिच्यापेक्षाही जास्त ओळखू शकत होतो.

नाही रे आणि जाऊदे मला तुझा वाढदिवस खराब नाही करायचा. रेवा
तुझ्यापेक्षा वाढदिवस महत्वाचा आहे मला असं वाटत का तुला? मी
जाऊदे ना रे, होईल माझा मूड ठीक. चल घरो सोड मला. आणि आम्ही चालायला लागलो.
तीच घर माझ्या घरापासून अगदी 7-8 मिनिटांच्या अंतरावर होत. आम्ही पोचलो तेंव्हा रेवाची आई बाहेरच होती. मला पाहताच त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आत ये म्हणाल्या. मी नको म्हणालो उशीर झालाय उद्या येईन.
रेवा सरळ घरात निघाली. तिने माझ्याकडे नेहमीप्रमाणे धड वळूनही पाहिलं नाही. आत जात जात ती मला Good Bye! तेवढं म्हणाली.
असं ती कधीच करायची नाही. पण ती डिस्टर्ब होती म्हणून मी काहीच बोललो नाही आणि घरी परत आलो.

पण आज मला ते आठवल्यानंतर त्या Good Bye! मागच्या भावना जाणवायला लागल्या. म्हणजे तिला असं तर सुचवायचं नव्हतं ना कि आता सगळं संपलं. तू तुझ्या रस्त्याला आणि मी माझ्या असं तर नव्हतं ना म्हणायचं तिला. मी दुसऱ्या दिवशी तिला विचारलं देखील होत कि काल मला Good Bye! का म्हणालीस तर तिने विषय टाळला म्हणाली मला थोडा एकांत हवाय. म्हणजे माझं सारखं तिच्या आयुष्यात लुडबुड कारण तिला आता रुचेनास झालं होत कि काय. पण कस शक्य आहे, सागर शिवाय तीच पान हलत नसायचं आणि आता अचानक तिला काय झालं होत हे मला आजपर्यंत समजत नव्हतं. पण आज मला त्या सगळ्या घटनांचे संदर्भ चांगलेच समजले होते.
आता सगळं संपलं होत. रेवा चा चॅप्टर माझ्या आयुष्यात कदाचित इथवर च लिहिला होता. ही जाणीव मला आणखीनच अस्वथ करू लागली. मला आता खूप मोठ्यानं रडावसं वाटायला लागलं. पण तस मी करू शकत नव्हतो. कारण आई लगेच माझ्या रूम मध्ये आली असती. मी माझं तोड उशीवर दाबलं आणि माझ्या अश्रुना वाट मोकळी करून दिली. मला त्रास होत होता या सगळ्या विचारांचा आणि तिच्या दूर जाण्याच्या जाणिवेचा.
मी रूम मधला दिवा बंद केला. पडलेला अंधार आता बारा वाटू लागला. रेवा माझ्या आयुष्यात नसेल तर अंधारच सोबती होणार होता माझ्यासाठी. विचार काही केल्या थांबत नव्हते. माझ्या मनावर प्रचंड ताण मला जाणवत होता आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच.
माझ्या रूम मध्ये मला रेवा दिसायला लागली, तिच्या चेहऱ्यावर नेहमीच ते मोहक हसू मला दिसायला लागलं, आणि दुसऱ्याच क्षणी तिचा चेहरा निर्विकार दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटत होते. आता तिच्या चेहऱ्यावर दुःखाच्या वेदना मला जाणवायला लागल्या, कोणत्याही क्षणी तिच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळतील असं वाटत होत. ती माझ्याजवळ येऊन बसली, तिने माझा हात हाती घेतला आणि न जाणो कितीतरी वेळ जणू आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो, मनातलं मळभ वाढत होत. रेवा उठली आणि तिने तिचे ओठ माझ्या कानाजवळ आणले आणि म्हणाली खूपच अडकून गेले रे तुझ्या मध्ये, आता जायची वेळ झाली, मला जावं लागेल, आता पुन्हा भेट नाही रे माझ्या राजा. ती जायला वळाली आणि तिचा हात माझ्या हातातून सुटत चालला. मला तो घट्ट धरायचा होता तिला थांबवायचं होत, पण मला तिला थांबवता येईना. ती पाठमोरी झाली आणि तशीच पुढे चालू लागली मला उठायचं होत पण मला धड हलता सुद्धा येईना. मी जिवाच्या आकांताने उठायचा प्रयत्न केला पण मी जागेवरून हलू शकलो नाही. मग मी जोराने तिला हाक मारायचा प्रयत्न करू लागलो पण तोही निरर्थक माझ्या कंठातून आवाजही बाहेर पडेना. ती पुढे चालत चालत मला दिसेनाशी झाली. बऱ्याच वेळाने मला कसलातरी आवाज जनवायला लागला, खूपच दूरवरून येत असावा, आणि अचानक तो आवाज वाढला आणि माझी तंद्री भंग पावली. माझ्या रूम चा दरवाजा कुणीतरी वाजवत होत. म्हणजे हा सगळा भास होता. मी पटकन उठलो, दिवा लावला आणि टॉवेल ने तोंड पुसलं.

दरवाजा उघडला तर समोर आई उभी होती. ती आत येत रागावली, इतका वेळ दार वजवतेय काय करत होतास?
मी पुन्हा बिच्चन्यावर आडवा झालो तिची नजर चुकवायला आणि म्हणालो, अगं झोप लागली होती.

उठ झोपू नकोस परत, रेवाचा फोन आला आहे बाहेर जाऊन बोल तिच्याशी नाहीतर तिला जेवण जायचं नाही. आई म्हणाली.

कथा