काटा रुते कुणाला…..भाग ६

Jabberwocky's picture
Jabberwocky in जनातलं, मनातलं
11 Nov 2016 - 11:24 am

काटा रुते कुणाला…..भाग ५ http://www.misalpav.com/node/37966

सागरने फोन ठेवला, ठेवला कसला मधेच कट केला. तो माझ्याशी असं कधीच बोलला नव्हता.
मी पुन्हा फोन ट्राय केला पण त्याने कदाचित रिसिव्हर बाजूला काढून ठेवला असणार, फोन लागला नाही. तशी मी तिथून गच्चीवर गेले. आजूबाजूला सगळीकडे शांतता होती, आभाळाकडे पाहत मी स्वतःच्या विचारांमध्ये गढून गेले. सागरला जे मनापासून सांगावस वाटत होत ते मी माझ्याशीच माझ्या मनात बोलू लागले.

सागर.....किती विलक्षण आहे हा मुलगा. हा केंव्हा माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य होऊन गेला माझं मलाच कळलं नाही. आज खूप रडावसं वाटत आहे तुझ्या कुशीत डोकं घालून, मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही रे राजा, पण माझं नशीब मला तुझ्यापासून खूप लांब घेऊन चाललं आहे.
तू सोबत असताना मला दुसर काहीच आठवायचं नाही. तू सोबत असताना मला माझ्या आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटायचं. तू असाच नेहमी माझ्यासोबत असावा हेच मी देवाकडे मागायचे.
तू माझ्याशी खूपच तुटक बोललास, इतक्या वर्षांची मैत्री तू एका क्षणात मातीमोल ठरवली. पण मला तुझा राग येत नाही, परिस्थिपुढे आज माझ्याप्रमाणे तू देखील हतबल झालास.
खरतर तुझ्या अचानक अशा वागण्याचं कारण विचारण्याची तशी मला गरज नव्हती, मला पूर्ण खात्री होती कि तुला माझ्या लग्नाची बातमी नक्की कळाली असणार. पण मन वेड असत, त्याला अजूनही वाटत होत कि कदाचित तुला अजून कळालं नसेल, आणि काही वेगळं कारणही असेल. पण तशी शक्यता फारच कमी होती.

जर तुला माझ्या लग्नाची बातमी कळाली असेल तर आता तू माझ्याबद्दल काय विचार करत असशील. खरतर हि गोष्ट मी स्वतःच तुला सांगायला हवी होती, मी तसा विचारही केला होता पण तू समोर आलास की अंगातलं सगळं अवसान नाहीस व्हायचं. तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे मला माहित आहे. तस तू कधी सांगितलं नाहीस पण जेंव्हा दोन मन जुळतात तेंव्हा शब्दांची गरज असते कुठे. मला ठाऊक आहे की तुला या सगळ्याचा किती मनस्ताप होत असेल ते, कारण गेले कित्येक दिवस मी स्वतः हा त्रास भोगत आहे. माझी अजिबात इच्छा नव्हती कि तुलाही हा त्रास व्हावा. म्हणूनच मी तुला हे सांगितलं नव्हतं आजपर्यंत.

जीव तुटतो तुझ्यासाठी, ज्या निखार्यांवर आज मी चालते त्यावर तुला चालावं लागू नये म्हणूनच मी तुला आजवर या वास्तवाची जाणीव करून दिली नाही. पण मला हे हि माहित होत की एक ना एक दिवस या विस्तवावर तुला देखील चालावं लागणारच फरक फक्त इतकाच कि मी तुझ्यापेक्षा थोडी पुढे निघून गेली असेन कारण माझा प्रवास तुझ्या आधी सुरु झालाय ना.

रवी. माझा होणार नवरा. तो कोण आहे हे सांगितलं तर तुला मी न सांगताही समजेल कि मी या लग्नाला का तयार झाले. माझ्या ताईचा दीर आहे तो. तुला माहीतच आहे पप्पा गेल्यानंतर ताई आणि जीजू दोघांनीही आम्हाला किती आधार दिला. मी ते दिवस विसरू शकत नाही, आम्ही पुन्हा उभे राहिलो ते त्यांच्या मदतीने. आणि आता जेंव्हा जीजुनी हे स्थळ आणलं तेंव्हा आम्ही कुणी काही बोलूच शकलो नाही. अर्थात ते त्यांनी आमच्यावर लादलं नाही आणि मला हवा तो निर्णय मी घेऊ शकते म्हणून सांगितलं. पण तरीही आता नाही म्हणणं हे खूपच गुंतागुंतीचं झालं असत. आणि तसाही त्याला नाही म्हणायला माझ्यापाशी कोणतच कारण नव्हतं. आणि जे कारण आहे ते मी कुणालाही सांगू शकत नव्हते. आणि घरातले सगळेच या आलेल्या स्थळामुळे खुश होते. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे, वेल सेटल्ड आहे, नाही म्हणायला वाव नाही. मी नाही म्हणाले असते तर याचा परिणाम सगळ्या नात्यांवर झाला असता. नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.
माझी एंगेजमेंट झाली त्यादिवशी घरचे सगळे खूप आनंदात होते फक्त मी आणि आपली छोटी श्रेया सोडून. ती पाच सहा वर्षांची चिमुरडी, तिला कुणीतरी सांगितलं की आता रेवा आत्या आपल्याला सोडून तिच्या नवर्याच्या घरी जाणार कायमची. तिचा चेहरा रडवेला झाला, आम्ही सगळे बसलो होतो एंगेजमेंट झाल्यावर अगदी सगळेच होतो माझ्या घरातले आणि माझ्या होणाऱ्या नवर्याच्या घरातले आणि तो सुद्धा माझ्या बाजूलाच बसलेला होता. श्रेया आली आणि मला बिलगून रडायला लागली म्हणाली आत्या तू जाऊ नको कुठेच मला सोडून. तू सोडून गेलीस तर माझ्याशी कोण खेळणार? माझे लाड कोण करणार? तू नको ना करुस या दादाशी लग्न. सगळ्यांना हसू फुटलं मी सोडून. नकळत माझ्याहि डोळ्यात अश्रू जमा झाले. मी ते आवरत तिला म्हणाले, मी कुठेही जाणार नाही ह बाळ तुला सोडून. तुझ्याच जवळ राहीन मी.
रवी देखील पुढे आला, तो हि तिला म्हणाला मी नाही घेऊन जाणार तुझ्या आत्याला त्यापेक्षा आपण असं करूयात की लग्न झालं की मी पण तुझ्या आत्यासोबत तुझ्याच जवळ राहीन. मग तर झालं ना?
हे ऐकून श्रेया एक्दम उसळलीच, तिने रवीचा हात झटकला आणि म्हणाली काही नको, मला तू नाही आवडत. मला माझा सागर दादा आवडतो. आत्या तू कर ना सागर दादाशी लग्न मग आपण सगळे सोबत राहू. तू याच्या घरी गेलीस की मग सागर दादा पण मला भेटायला नाही येणार आपल्या घरी.
लहान पोर ती तिला काय कळणार तिने तिच्या मनात आलं ते बोलून दाखवलं पण त्यामुळे एकदमच सगळे शांत झाले, ताईने पटकन श्रेयाला जवळ घेतलं.
श्रेया लहान असल्याने कोणी फारसं मनावर घेतलं नाही पण ह सागर कोण हे विचारायला सासरची मंडळी विसरली नाहीत. ताई सोडून बाकीचे तुला ओळखत नव्हते म्हणून दादाने तुझी सर्वाना ओळख सांगितली की सागर म्हणजे आमच्या रेवाचा लहानपणापासूनचा वर्गमित्र, आणि हो त्याने हे हि सांगितलं की रेवासारखाच सागरदेखील आमचा सर्वांचा खूप लाडका आहे आणि या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे आणि श्रेयाचा तर सर्वात आवडता. दादाच सांगून झाल्यावर रवी म्हणाला मग आज सागर नाही आला का? तुम्ही त्याची इतकी छान ओळख सांगितलीत की त्याला भेटण्याची इच्छा झालीय. आज नाही आला का तो?

दादाने माझ्याकडे पाहून विचारलं, रेवा कुठे राहिलाय सागर तू त्याला बोलावलं होतास ना?
मला काही क्षण समजेचना की आता काय उत्तर देऊ, मी खोटं बोलले, मी म्हणाले हो सांगितलंय पण त्याची झोनल मॅच होती आज क्रिकेटची मुंबईला, तो तिकडे गेलाय आणि तुला तर माहित आहे त्याच क्रिकेटच वेड. माझी थाप सगळ्यांना पचली. पण रवीचा चेहरा थोडा उतरल्यासारखा वाटला.

सागर मीच काय पण माझ्या घरातली चिमुरडी सुद्धा तुझ्यावर जीव ओवाळून टाकते, इतका का रे चांगला आहेस की तू नसल्याच्या जाणिवेने सुद्धा जगन अवघड व्हावं.

आज त्या दिवसाला महिना होऊन गेला असेल, तुला जाणवतही असेलच की या गेल्या काही दिवसात मी तुला माझ्या घरी येऊ दिलंच नाही. तू येशील म्हणून त्या आधीच मी तुझ्याकडे येऊन जायचे. तू फोन करशील आणि कुणी दुसरं फोन घेईल आणि तुला सांगेल या भीतीने सतत घरात राहायचे आणि आलेला फोन मीच घायचे किंबहुना रोज सकाळ संध्याकाळ मीच तुला फोन करायचे. पण आता आजपासून मला हि तारेवरची कसरत नाही करावी लागणार. गेल्या महिनाभरापासून जे ओझं घेऊन मी जगतेय त्यात आता तुही माझा भागीदार झालास.
सागर तुला आठवत? मला कधी कुणी विचारलंच की तुला काय आवडत की मी चटकन म्हणायचे मला समुद्र आवडतो. खरचं मला समुद्र खूप आवडतो. त्याच्या किनाऱ्यावर बसून ते निळंशार पाणी तासन्तास पाहत राहावं आणि त्याच्या पोटात खोलवर काय काय असेल याचा अंदाज घेत बसावं. मला समुद्र का आवडतो माहितेय सागर कारण तो मला तुझ्यासारखाच गूढ वाटतो. वर वर त्याच्या लाटा बेफाम वाटत असतील पण हा तोच असतो जो स्वतःच्या आत त्याच्या हृदयात म्हण हवं तर पण तितक्याच प्रेमाने मोती जपून ठेवतो. जस तू तुझ्या हृदयात मला जपून ठेवलंय. पण कधीतरी कुणी येतो आणि त्या सागराच्या तळाशी उतरून तो मोती घेऊन जातो स्वतःच्या गळ्यात मिरवायला. सागर तुझाही मोती आता दुसरा कुणी त्याच्या गळ्यात घालून मिरवायला घेऊन जाणार.

रवी मुंबईला असतो, त्याच्या घराच्या बाल्कनी मधून समुद्र दिसतो म्हणे पण मी तो समुद्र आता कधीच नाही पाहणार. कारण माझा सागर तर मी खूप मागे सोडलेला असेल. मी तुला कधीच विसरू शकणार नाही सागर कारण माझा दिवसच सुरु होतो तो तुझ्या आठवणीने आणि मावळतोही तुझ्या आठवणीनेच. माझ्यातल्या तुला जर काढून घेतला तर बाकी काहीच उरणार नाही, एका जिवंत असून मेलेलं शरीर. आणि आता हे मला ओढायचंय तुझ्याशिवाय. येणाऱ्या पुढच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही येतीलच की, मी सुद्धा ते आनंदाने स्वीकारेन पण मी हसत असताना माझी नजर तुलाच शोधत असेल सागर.
तू कितीही म्हणालास की तू मला सहज विसरून जाऊ शकतोस तरीही मला माहित आहे तू मला एका क्षण देखील विसरू शकत नाहीस. प्रत्येक गोष्ट शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. तसंच तुझं माझं नातं. तू कितीही माझ्यावर रागवलास तरीही तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. तू माझ्यापासून दूर राहशीलही पण माझ्या आठवणींपासून तू कसा दूर जाशील? तू माझा रााग करशीलही पण त्या रागा आधी तुझं माझ्यावर असलेलं प्रेम तू कसा विसरू शकशील?

तू माझा मित्र नाहीस, तू माझा प्रियकरही नाहीस, तू माझा जम्नानुजन्माचा सखा आहेस. मी जिथे असेन तिथे तू येशीलच हे माझं मन मला नेहमी सांगत. आज आपली वाट वेगळी होत असली तरी ती या जन्मापुरतीच पुन्हा फिरून तुला मला यावंच लागेल नियतीला पडलेलं तुझं माझं गोडं स्वप्न पूर्ण करायला तोपर्यंत सागर माझं प्रेम तुझ्याकडे जपून ठेव अगदी घट्ट. या मर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशवंत असेलही पण विधात्याला माझं प्रेम पूर्ण करावंच लागेल, त्या परमपित्याला त्याच्या या मुलीचा हा हट्ट पुरवावा लागेल.
मला माहित आहे माझ्या कसल्याही सांत्वनाने तुझं आणि माझं दुःख कमी होणार नाही. वेळ जाईल तशी जखम बरी होते पण ही जखम बरी होणार नाही ही मी तशीच जपणार कारण ती मला सतत तुझ्याभोवती घुटमळत ठेवेल. माझं लग्न होईल तेंव्हा होईल पण तोपर्यंतच हे सगळे क्षण मला तुझ्यासोबत जगायचे आहेत, या क्षणांमध्ये मला माझं हे संपूर्ण आयुष्य पूर्ण करून घ्यायचं आहे. तू माझ्यावर रागावला आहेस, तू मला टाळशील, मला भेटणार नाहीस, भेटलास तरी नीट बोलणार नाहीस पण मी तयार आहे तुझा राग सहन करायला कारण मी तुझं प्रेम अनुभवलंय,स्वीकारलंय तसंच तुझा रागही मला स्वीकार आहे.

मधेच केंव्हातरी विचारांची साखळी तुटली, बरच उशीर झाला होता मी माझ्या खोलीमध्ये आले, उद्या सकाळी सागरला त्याच्या घरी जाऊन भेटायचा विचार नक्की करत मी त्याच्या आठवणींच्या कुशीत झोपी गेले.

कथा