काटा वजनाचा --६

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Oct 2016 - 9:02 pm

काटा वजनाचा -१
काटा वजनाचा -२
काटा वजनाचा -३
काटा वजनाचा --४
काटा वजनाचा --५

अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ?
अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे. आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही. चखणा खाताना अवास्तव कॅलरी पोटात जातील म्हणून तुम्ही निघतानाच एक सॅलड म्हणून काकडी टोमॅटो असे खाऊन निघता. "पण" मेजवानी संपेस्तोवर आपण वाजवीपेक्षा "किती तरी जास्त" खाल्ले आहे हे आपल्या लक्षात आल्यामुळे आपण स्वतःवर फारच चिडलेले असता.
हि अशी परिस्थिती आपल्यापैकी ९० % लोकांनी अनुभवलेली असेल. पण यात केवळ आपलाच दोष आहे का? कि त्या वातावरणाचा? कि ती वेळच "तशी" होती.
समाजशास्त्रज्ञ आणि मानस शास्त्रज्ञ सभोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर किती परिणाम होतो याचे संशोधन करीत असताना त्यांना समोर आलेल्या निष्कर्षांचा सारांश येथे मी देत आहे.
आपण जरुरीपेक्षा जास्त केवळ भुकेसाठी खात नाही तर त्याला अनेक पैलू आहेत ज्यात चव आणि स्वाद हा एक महत्त्वाचा घटक आहेच परंतु सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे असे लक्षात आले आहे. आपल्या बरोबर असणारी मित्र मंडळी, आपली मानसिक स्थिती, सभोवतालचे धुंद वातावरण, आपण पीत असलेले मद्य असे अनेक घटक आपल्या गरजेपेक्षा जास्त खाण्याला कारणीभूत आहेत.
( पहा मी म्हणत नव्हतो मी काही दारुडा नाही. पण मित्रांनी जबरदस्तीने पाजली असेच काहीसे वाटले कि नाही?....
मुझे दुनिया वालो शराबी न समझो ..... )
परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर का आणि कशी जाते?
१) केवळ बाहेर / हॉटेलात जेवल्यामुळे असत खाल्ले जाते असे नव्हे तर आपण मित्र मंडळींबरोबर असला कि आपले जेवण जास्त वेळ रमत गमत चालते. म्हणजेच जितका जास्त वेळ आपण जेवाल तितके जास्त अन्न खाल्ले जाते. आपण दुसऱ्या व्यक्ती बरोबर असता तेंव्हा आपण २८ % जास्त जेवता आणि तेच एका ५-६ जणांच्या गटात असलात तर हेच ७५ % पर्यंत अधिक खाल्ले जाते.
लोकांचे असे म्हणणे असते कि आम्ही संगतीत जेवताना सावकाश / कमी वेगाने चवीचवीने जेवतो त्यामुळे अन्नाची मात्रा / प्रमाण कमी असते. पण वस्तुस्थिती अशी नाही. एकटे जेवण्यापेक्षा मित्रांच्या संगतीत आपण जेवणाला दीड पट वेळ घेता. पण आपल्या अन्न सेवन करण्याचा वेग मात्र तेवढाच असतो. म्हणजेच सरासरी मित्रांच्या संगतीत आपण दीड पट जेवता.
२) अनियंत्रण गृहीतक --म्हणजेच आपण इतरांच्या उपस्थितीत आपण किती खातो आहे यावर आपले बारकाईने लक्ष राहत नाही. आपले मन सारखे गप्पा आणि हास्य कल्लोळ सारख्या गोष्टीने विचलित होत असल्यामुळे प्रत्यक्ष आपण किती खातो आहोत याच्या कडे आपले लक्ष राहत नाही.
यात दुहेरी फास असा असतो कि आपले मित्र चांगले चाटून पुसून जेवतात आणि वर शेवटी काहीतरी स्वीट डिश/डेझर्ट मागवतात आणि आपण गतानुगतिक म्हणून त्यांच्यात सामील होतो..
अर्थात काही वेळेस याच्या उलट आढळते. म्हणजे आपण आपल्या वरिष्ठाच्या बरोबर जेवायला गेलो असता किंवा बायका लग्नाच्या अगोदर "डेट"वर गेल्या असता आपले वर्तन प्रसंगाला "साजेसे' असावे म्हणून कमी खातील
परंतु त्याच एकदा लग्न झाल्यावर मनावरील प्रतिबंध दूर झाल्याने "व्यवस्थित" जेवताना आढळतात.
कोणत्याही तर्हेची गोष्ट जर आपले लक्ष विचलित करणारी असेल तर त्याने आपले मनाचे पोट भरण्याच्या संवेदनेकडे दुर्लक्ष होते आणि आपण अनवधानाने जास्त खातो. यात टीव्ही पाहणे जेवताना मोबाईल वर व्हॉट्स अँप, चेपू वर गप्पा मारणे, पुस्तक वाचन या गोष्टी आपल्याला गरजेपेक्षा जास्त खाण्यास कारणीभूत होतात हे आढळून आलेले आहे. वाईट गोष्ट म्हणजे अर्धे जेवण झाल्यावर या गोष्टी बाजूला ठेवल्या तरीही माणसे परत जास्त खाताना आढळतात कारण आपण किती जेवलो आहोत याची त्यांच्या मनाने नोंदच घेतलेली नसते.
या नकळत होणाऱ्या गोष्टींमुळे माणसाना असहाय्य असल्यासारखे वाटते.
याला सोपा उपाय म्हणजे काय
१) बाहेर/ मित्र मंडळींबरोबर जेवताना आपण किती खात आहोत याचे भान असावे. लोक हे म्हणतील कि अहो डॉक्टर मित्रांबरोबर गप्पा मारताना असे भान कसे ठेवणार?
याला उत्तर एकच. घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा यात अवघड काहीच नाही
२) जेवताना जेवणाकडेच लक्ष द्या आणि प्रत्येक घास चवी चवीने तोंडात घोळवून खा.
३) मित्रांबरोबर बसलेले असताना चमचमीत गोष्टी येतात उदा चिकन/ पनीर टिक्का हे खाताना भान ठेवा आणि याच्या बरोबर येणारे सॅलड पण चवीने आणि सावकाश खा.
दिवाळी पूर्वी या गोष्टींचे भान ठेवून सर्व तर्हेची पक्वान्ने प्रमाणात खाऊनही आपला मिताहार चालू ठेवा पण दिवाळी नंतर आपले मन आपल्याला खात राहिल (guilt) असे खाऊ नका.
शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते.
आपल्या सर्वाना दिवाळी आनंदाची आणि वैभवाची आणि आरोग्यपूर्ण जावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सही रे सई's picture

13 Oct 2016 - 9:56 pm | सही रे सई

सामाजिक दडपण हा फार मोठ्ठा घटक आहे वजन वाढण्याचा. या घटकामुळे मुली लग्नानंतर हमखास जाड होताना दिसतात. कारण लग्न झाल्यावर सासरच्या नातेवाईकांची खास जेवणासाठी दर आठवड्याला बोलावणी येतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला खास जेवणासाठी आमंत्रण असल्याकारणाने पदार्थांची पण रेलचेल असते. आणि सगळ्यांच लक्ष नव्या नवरी कडे जास्त असत. त्यामुळे तिने जर कमी किंवा तिच्या नेहमीच्या सवयीने जेवायचं ठरवलं तरी ही मंडळी आग्रह करणार कि हे काय एकच काय पोळी घेतलीस अजून एक घे किंवा अजून चार गुलाबजाम तरी खावेच लागतील. वरती अजून टोमणा मारतील कि डाएट वगैरे करतेस कि काय?
यावर काय उपाय करावा ते पण सांगा

जयन्त बा शिम्पि's picture

14 Oct 2016 - 3:02 am | जयन्त बा शिम्पि

शरीर आपले असते, खाणारे आपण असतो, कोणीही आपल्याला जबरदस्तीने खाऊ घालत नाही, मग आपला आपल्यावर ताबा नसावा? समजा कोणी म्हटले की डाएट करतोस कां ? त्यावर हो म्हटले की झाले ? त्यात काय कठीण आहे ? डाएट करणे म्हणजे काही शरमेची गोष्ट तर नाही ना ? फार झाले तर डॉक्टरांनी ' जरा जपून खाण्यास सांगितले आहे ' एव्हढे सांगितले तरी पुरेसे आहे. या ऊपरही फारच आग्रह व्हायला लागला तर सरळ " नाही म्हणायला शिका ". नुसता माझा स्वभाव ' भिडस्त ' आहे , असे म्हणून कसे चालेल ? मराठीत म्हण आहेच ' भीड भिकेची बहीण '.

मराठमोळा's picture

14 Oct 2016 - 10:08 am | मराठमोळा

लोकांना diet glassesचा उपयोग होऊ शकेल का?
लोक काय शोधून काढतील याचा काही नेम नाही. :)

नाखु's picture

14 Oct 2016 - 10:23 am | नाखु

दिलेली उपमा अगदी अचूक आहे.

वेगाचे भान हे असायलाच हवे पंगतीत खातानाही आणि रस्त्यात जातानाही..

लेख दिवाळीपुर्वी आल्याने भोजनभाऊंना उपयुक्त ठरेल असे वाटते.

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2016 - 10:24 am | टवाळ कार्टा

पहिली कट्ट्याची खादाडी बंद केली पाहिजे

राजाभाउ's picture

14 Oct 2016 - 10:26 am | राजाभाउ

नेहमीप्रमाणेच उत्तम व माहीतीपुर्ण लेख. "भान" असणे हेच सगळ्याचे सार !!

याला उत्तर एकच. घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा यात अवघड काहीच नाही

एक नंबर

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साहेब,

कुठेतरी वाचले होते की मेंदू ने दिलेला "आता पोट भरले आहे" हा सिग्नल स्लो प्रोसेस होतो म्हणून माणूस जास्त खातो असे काहीसे. ह्याला काही वैद्यकीय आधार आहे की हा इंटरनेटच्या लोणकढी समुद्रातील एक थेंब समजावा??

अस्वस्थामा's picture

15 Oct 2016 - 8:11 pm | अस्वस्थामा

कुठेतरी कशाला बापू, डॉक्टरांच्या या लेखमालिकेत चौथ्या भागात त्यांनीच लिहिलंय की सविस्तर. या इथे पहा.

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 12:28 pm | यशोधरा

लेख माहितीपूर्ण पण बायका, त्यांचा पदर हे उल्लेख टाळले तरी चालतील की टीआरपी मिळवण्याचा मार्ग म्हणून वापरले/? अत्यंत चीप वाटते वाटते वाचताना. असो.

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा

selective reading

नाही, लेख माहितीपुर्ण आहे हे आधीच म्हटलेय. असो.

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 1:07 pm | सुबोध खरे

बायका, त्यांचा पदर हे उल्लेख टाळले तरी चालतील
मान्य आहे.
मला सुद्धा पहिल्यांदा असेच वाटले होते परंतु दुसरी "समर्पक" उपमा सुचली नाही. ही माझ्या विचारशक्तीची मर्यादा समजा. टी आर पी साठी नक्की नाही. पटत असेल तर पहा.

डॉ. एक डॉक्टर ह्या नात्याने तुम्ही उपयुक्त माहिती देताहात, त्याला उपमा वगैरेची गरज नाही.
असल्या उपमांची अजिबातच नाही. आपणही पटत असेल तर पहावे.

गामा पैलवान's picture

14 Oct 2016 - 1:48 pm | गामा पैलवान

अहो बाई, एक स्त्री ह्या नात्याने तुम्ही उपयुक्त माहिती देताहात, त्याला स्त्रीमुक्ती वगैरेची गरज नाही.
असल्या स्त्रीवादी भूमिकेची अजिबातच नाही. आपणही पटत असेल तर पहावे.

आ.न.,
-गा.पै.

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 1:53 pm | यशोधरा

इथे स्त्री मुक्तीचा काही संबंध नाही गामा.

गामा पैलवान's picture

14 Oct 2016 - 10:53 pm | गामा पैलवान

इथे पदर ढळल्याचा काही संबंध नाही, यशोधरा!
आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 2:22 pm | सुबोध खरे

याला उत्तर एकच. घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा यात अवघड काहीच नाही
हे वाक्य गाळून बाकी वाचून पहा
उपमा देण्याची आवश्यकता का आहे ते समजेल.
बाकी चीप टीआर पी वगैरेबाजूला जाउ द्या

सस्नेह's picture

14 Oct 2016 - 2:25 pm | सस्नेह

हे वाक्य काढले तर चालेल का ?
किंवा असे लिहिले तर ?
'लोकलमध्ये गप्पा मारताना स्टेशन आल्याचे भान ठेवावेच लागते ना ?'

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 6:10 pm | सुबोध खरे

स्नेहा ताई
हि उपमा येथे लागू होत नाही असे वाटते. कारण आपण मध्ये उभे असलो तरीही खिडकी/ दारात असलेल्या "त्रयस्थ" माणसाला आपण आपले स्थानक आले कि सांगा असे सांगू शकतो. हि गोष्ट पदराबाबत किंवा आपल्या आहाराबाबत तिसऱ्या माणसाला सांगू शकत नाही.
पदराची उपमा देण्याचे मूळ कारण असे आहे कि स्त्रिया कोणत्याही वयात आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या पदराबाबत (aware) "भान" ठेवून असतात. अगदी ऐन्शी वर्षाच्या आजी जरी असल्या तरीही लग्नात वावरताना किंवा दुपारी दहा मिनिटे आडव्या झाल्या असल्या तरीही त्यांचे पदराबाबत भान असतेच. (याबाबत तिरपा अर्थ ज्यांनी काढला तो त्यांच्या मनाचा खेळ आहे.)
हीच परिस्थिती आपल्या आहाराबाबत आपली असली पाहिजे हे मला म्हणायचे होते. दिवसात तीन वेळेस कमीत कमी (अन्यथा आपण जितक्या वेळेस खात असता) तेंव्हा आपण याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे एवढेच.
ज्यांना याबद्दल ट्रोलिंग करायचे आहे किंवा धुळवड खेळायची आहे तो त्यांचा प्रश्न आहे.

सस्नेह's picture

15 Oct 2016 - 3:37 pm | सस्नेह

आपल्या मताचा आदर आहे. :)

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2016 - 4:10 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी चपखल! पदराच भान नसल्याचा टोमणा अनेक पोक्त स्त्रिया तरुण पिढीतील स्त्रियांच्या अजागळपणाविषयी बोलताना करतात. सिलेक्टिव रिडींग हे आपण राजकारणात भांडवल करताना पहात असतोच. लेखनाचा गाभा हा महत्वाचा.

गाळून वाचलेअ अहे म्हणूनच बाकी लेख माहितीपूर्ण आहे हे लिहिले आहे ना?

गंम्बा's picture

14 Oct 2016 - 2:51 pm | गंम्बा

अगदी सहमत.

डॉक्टरसाहेब, तुम्ही योग्य शास्त्रीय माहीती देत आहात, ती मनोरंजक करायची गरज नाही आणि अश्या उपमांनी तर नकोच.

-----
अश्या प्रकारच्या उपमा संझगिरी टाइप लेखक प्रत्येक २ वाक्यामागे लिहीत असतात. तुम्ही पातळीवर खाली उतरु नका.

मला सुद्धा तुम्ही दिलेली उपमा समर्पक वाटली.

माझ्या अल्पमतीनुसार डॉ.ना असं सुचवायचं असेल की एखादी बाई स्वतःचा पदर न ढळू देण्याबद्दल जेव्हढी शिस्तप्रिय व काटेकोर असते तेव्हढंच एखाद्यानं त्याच्या (जास्त) खाण्याबद्दल असायला हवं.

बाकी, डॉ, वर सोन्याबापू ह्यांनी विचारलेला प्रश्न मला देखील पडला आहे. कृपया त्यावर थोडा प्रकाश टाकावा.

लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
बरीच गॅप घेतली डॉक यावेळेस.

सूड's picture

14 Oct 2016 - 3:45 pm | सूड

माहितीपूर्ण लेख!!

शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते.

खाण्यावरचा सुटलेला ताबा आणि पदर ढळण्याची तुलना कळली नाही. पदर ढळल्यानंतर फार तर आंबटशौकीन लोकांचं लक्ष वेधलं जाईल आणि अशा आंबटशौकीन लोकांना शीळ/पौड/ सोमाटणे फाट्यावरदेखील मारता येऊ शकतं.

पण खाण्यावरचा सुटलेला ताबा आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच घातक ठरु शकतो. त्यामुळे तुलना गंडली आहे.

बाकी पदर ढळल्यामुळे काही किंमत चुकवावी लागल्याचा अनुभव असल्यास शब्द मागे घेतो.

पैसा's picture

14 Oct 2016 - 3:54 pm | पैसा

यावेळी जरा जास्त गॅप पडल्याने आधीचा लेख पचवायला जास्त वेळ मिळाला!

नाखु's picture

14 Oct 2016 - 4:02 pm | नाखु

त्यांनी ती उपमा सजग (सिक्स्थ सेन्स )जागा ठेवून रहावे असा असावा (दक्ष असा योग्य शब्द वापरणार होतो पण धागा संघाकडे वळून मुळ मुद्दा बासनात जाईल याची साधार भिती वाटली).

बाकी चालू द्या (नेहमी प्रमाणे)

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 4:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला काका तुम्ही स्वतः धागा वळवताय राव :/

(स्पष्टवक्तेपणाबद्दल माफी असावी पण जे दिसले ते बोललो, आमचा तेवढा तरी हक्क आपणावर असावा अशी माफक अपेक्षा)

स्नेही बाप्या

नाखु's picture

14 Oct 2016 - 4:09 pm | नाखु

तुमचा हक्क आहेच त्यामुळे माफी वगैरे मागू नका.

कायम स्नेही नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 4:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

मायला त्या पदराच्या नादात आमचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला, असो!
पदराच्या जागी धोतराचा सोगा असा बदल करावा, म्हणजे बघा "सुसाट वारा सुटला की आपण सोग्याला धरून ठेवतोच न तसे" वगैरे. =))

पैसा's picture

14 Oct 2016 - 4:24 pm | पैसा

किती लोक धोतर नेसतात आणि किती बाया साड्या नेसतात याचा विदा आणा. म्हणजे प्रश्नावर अजून संशोधन करता येईल. बादवे हल्ली शिवलेली धोतरे साड्या मिळतात तसेच साड्याना बर्‍याच पिना लावलेल्या असतात त्यामुळे हा सोगा पकडणे किंवा पदर ढळू न देणे हा प्रश्न बराच निकालात निघालेला असावा. ह. निजामुद्दिनला गोवा एक्सप्रेसमधे चढताना जी तुफान गर्दी उडाली त्यात पदराला पिना लावल्याने माझ्या एका मैत्रिणीला गळफास लागण्याची वेळ आली होती त्याची आठवण झाली. =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 4:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

किती लोक धोतर नेसतात आणि किती बाया साड्या नेसतात याचा विदा आणा.

सॉरी शक्तिमान! इतके पालथे धंदे करणे होणार नाही =)), लोकांच्या कापडं वाळवायच्या तारा अन दांड्याच पहायच्या असत्या तर त्या जागी ज्वारीच्या हंगामात पाखरं हुलत बसलो असतो तरी ते productive ठरले असते ताय =))

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 6:31 pm | सुबोध खरे

माझ्या २५ वर्षाच्या सोनोग्राफीच्या कारकिर्दीत मी अक्षरशः हजारो स्त्रिया पाहिल्या आहेत. रोज सरासरी २० रुग्ण पाहिले त्यात १० स्त्रिया आहेत हे गृहीत धरले तर वर्षात ३००० आणि २५ वर्षात ७५,००० हजार स्त्रिया माझ्याकडे सोनोग्राफीसाठी येऊन गेल्या असे म्हणायला हरकत नाही. या सर्व स्त्रियांची सोनोग्राफी साठी आडव्या झोपवूनच केली जाते तेंव्हा स्त्रिया आपल्या पदराबद्दल किती सावध असतात हि गोष्ट मी रोज पाहत असतो. यात दुर्दैवाने स्तनाच्या कर्करोग झाल्याने दोन्ही स्तन काढलेल्या स्त्रियाही अनेक होत्या या स्त्रिया तर आपल्या पदराबद्दल जास्तच सावध असतात.
स्त्री १८ ते ८१ कोणत्याही वयाची असो आपल्या पदराबद्दल त्यांचे "भान" असतेच.
या विषयावर "इतकेच"पुरे.

किती लोक धोतर नेसतात आणि किती बाया साड्या नेसतात याचा विदा आणा. म्हणजे प्रश्नावर अजून संशोधन करता येईल.

सहमत. बाकी धोतराचं म्हणाल तर हापिसात सांस्कृतिक दिवस किंवा कोल्हापूरात अभिषेकाला गेलं की धोतर नेसत असतो. काय सोगा बिगा उडत नाही हो.

मोहनराव's picture

14 Oct 2016 - 4:54 pm | मोहनराव

सर्व लेख छान आहेत.
एक प्रश्न:- अल्कोहोलबद्दल तुम्ही लिहीले आहेच. तरीपण एक विचारावेसे वाटते.
साधारणतः लगेच चढत नाही म्हणुन बियर जास्त पिली जाते. कारण अल्कोहोल प्रमाण कमी असते.
फक्त बियर पिल्याने (चकणा जास्त न खाता)पोटाची चरबी वाढते का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 6:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाटत नाही तसे, बिअर मध्ये ९२%, ९४% ते ९६% पाणीच असते हो (बिअर माईल्ड आहे का स्ट्रॉंग का स्टोट आहे त्यावर अवलंबून) आपण बिअर सोबत करत असलेले कॉम्बो वाईट, तंदुरी चिकन, पनीर टिक्के आर द कल्परिट्स

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 6:03 pm | सुबोध खरे

बिअर ढेरी बद्दल सविस्तर लेख आहे वाचून पहा.
http://www.webmd.com/diet/features/the-truth-about-beer-and-your-belly#1

मोहनराव's picture

18 Oct 2016 - 3:25 pm | मोहनराव

धन्यवाद

गंम्बा's picture

14 Oct 2016 - 5:02 pm | गंम्बा

डॉक्टरसाहेब,

मायबोलीवर खालील धागा वाचला

http://www.maayboli.com/node/60322

लेखिकेने स्वताच, ती डॉक्टर किंवा मेडीकल शिक्षण नसलेली आहे असे सांगितले आहे. तरी दिलेली माहीती लॉजिकल आणि चांगली वाटली.

तुम्ही काही जास्त माहीती पुरवु शकाल का ह्या संबंधात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Oct 2016 - 7:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

ऑ बहुदा डॉक्टरांनी आम्हाला फाट्यावर मारले आहे. कठीण आहे एकंदरीत. असो.

सुबोध खरे's picture

16 Oct 2016 - 11:22 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
पोट भरले आहे हे संदेश देणारे संवेदक (STRETCH RECEPTORS) सुद्धा जठरात असतात. दुर्दैवाने आवडीचे अन्न दिसले कि आपले पोट भरले आहे या संदेशाकडे माणूस दुर्लक्ष करत राहतो आणी मग काही काळाने हे संवेदक नीट काम करेनासे होतात किंवा मेंदू त्यांच्याकडे "दुर्लक्ष" करायला शिकतो. एकदा माणूस या दुष्टचक्रात शिरला कि जठराचे स्नायू पण ताणले जातात आणी हे ताणाची जाणीव करणारे संवेदक वरच्या पट्टीत काम करू लागतात. यामुळे जास्त अन्न खाल्ले नाही तर पोट "भरल्यासारखे" वाटतच नाही.

याच लेखमालेच्या तिसऱ्या भागात मी असे लिहिलेले आहे.
या प्रमाणेच एखादी व्यक्ती अतिलठ्ठ झाली कि लोक तिच्याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे त्या व्यकितमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. अशा वेळेस आपला आनंद परत मिळण्याचा १०० % खात्रीचा उपाय काय तर सुग्रास अन्न खाणे. कारण उत्तम खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे येणारी गोड गुंगी/ किक हि अशा नैराश्यावर रामबाण उपाय असतो. दुर्दैवाने हा परिणाम काही वेळात कमी होतो आणि नैराश्य त्यांना परत घेरू लागते मग यतिन सुटका होण्यासाठी असे लोक परत काही तरी खायला पाहतात आणि हे दुष्टचक्र चालू होते.
दारुड्या माणसाची हीच स्थिती असते. लोक आपल्याला घालून पाडून बोलतात म्हणून तो माणूस नै राश्याच्या आहारी जातो आणि त्यातून सुटका मिळवण्या साठी अजून दारू पितो आणि दुष्टचक्रात अडकतो.
हे टोकाचे उदाहरण लठ्ठपणा च्या मानसिक उत्पत्तीच्या बद्दल आहे पण हे आपल्याला आपल्या मेंदूकमध्ये होणाऱ्या प्रक्रियेबद्दल थोडी कल्पना येण्यासाठी देत आहे.
माणसे एकदा सुग्रास खाण्याच्या मोहात पडली कि तात्पुरत्या आनंदासाठी( temporary gratification) परत परत खात राहतात
आणि मग "प्राण जाई पार वजन न जाई" अशी स्थिती येते. अर्थात हि स्थिती गेल्या ५० वर्षात च अली आहे कारण जग भरात मुबलक अन्नधान्य उत्पादन होत आहे आणि रूचकर अन्न सहज सर्वत्र उपलब्ध झाले आहे हीही वस्तुस्थिती.
गेले काही दिवस हार धावपळीचे गेले त्यामुळे आपल्याला प्रतिसाद देता आला नाही . आपल्याला फाट्यावर मारण्याचे काहीच कारण नाही.
गैरसमज नसावा. --/\--

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

Ok sirji,

माहिती करता अत्यंत आभारी आहे, तुमचा शेवटचा संदेश वाचूनही बरे वाटले,

कारण उत्तम खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे येणारी गोड गुंगी/ किक हि अशा नैराश्यावर रामबाण उपाय असतो. दुर्दैवाने हा परिणाम काही वेळात कमी होतो आणि नैराश्य त्यांना परत घेरू लागते मग यतिन सुटका होण्यासाठी असे लोक परत काही तरी खायला पाहतात आणि हे दुष्टचक्र चालू होते.

बुलेमीया म्हणतात तो हाच का?

सुबोध खरे's picture

17 Oct 2016 - 8:42 pm | सुबोध खरे

नाही नाही.
ब्युलिमिया हा एक मानसिक आजाराचा प्रकार आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Bulimia_nervosa

झेन's picture

14 Oct 2016 - 7:57 pm | झेन

सहसा आपण दुर्लक्ष करतो असा अति खाण्याचा पैलू उलगडून सांगितला आहे. बाकी काही जणांना साडी किंवा पदर संभाळणे 'आऊटडेटेड' वाटत असेल, जनरेषन गँप मुळे रीलेट होत नसेल पण त्यासाठी डाँक्टरांना इतक्या तत्परतेने टी आर पी/ चीप वगैरे म्हणणे अनावश्यक/गैरलागू वाटते.

चित्रगुप्त's picture

14 Oct 2016 - 11:55 pm | चित्रगुप्त

उत्तम माहितीपूर्ण लेख. गरजेपेक्षा जास्त खाणे टाळणे, यासाठी दक्ष राहून तसे करणे एवढा एकच उपाय वजन आटोक्यात ठेवायला पुरेसा असावा, हे सध्या प्रत्यक्ष अनुभवतो आहे.
मला वर्षानुवर्षे साधारणतः संध्याकाळी सहा-सात वाजता जेवण्याची सवय आहे, त्यामुळे त्या वेळी मी एकटाच जेवत असे, आणि बेताचे खात असे. सध्या मुलगा आल्यावर रात्री नऊचे सुमारास सर्वांबरोबर गप्पा करत जेवताना दुप्पट खाल्ले जाते, त्यामुळे आठवडाभरातच वजन वाढू लागले आहे.
..... डॉक्टर आणि चित्रकार-मूर्तीकार यांचा मानवी देहाकडे बघण्याचा दृष्टीकोण अन्य लोकांपेक्षा वेगळा असतो, हे पदर- आख्यानाच्या संदर्भात नमूद करू इच्छितो. (आम्ही वयाच्या विसाव्या वर्षीसुद्धा आर्टस्कुलात नग्न मॉडेलवरून तासनतास एकाग्रतेने रेखाटनाचा सराव करायचो...त्यामुळे नग्न देह हा सुद्धा एकादे झाड, खडक, घर, ढग, बरणी इ.इ. प्रमाणे सूक्ष्मावलोकन करून त्यातील आकार, छाया-प्रकाश, रंग वगैरे दृश्य घटक समजून घेण्याचा घेण्याचा वाटत असतो)
.

सुबोध खरे's picture

16 Oct 2016 - 11:33 pm | सुबोध खरे

चित्रगुप्त साहेब
वयाच्या विसाव्या ववर्षी तुम्हाला तास अन तास एका "मॉडेल"कडे पाहून चित्र काढायला लागत असे. मी तुम्हाला नशीबवान समजतो.
विसाव्या वर्षी पहिल्यांदा प्रसूतिगृहात गेलो असताना तेथे असलेला "पसारा" ( याचे वर्णन बीभत्स रागातच होऊ शकते यासाठी लिहीत नाही) पाहून पुढचे दोन दिवस अन्नावरील वासना उडाली होती आणि पुढचे पंधरा दिवस स्त्री देहाबद्दल "किळस' सोडली तर दुसरी भावना होत नव्हती. आकर्षण तर लांबच राहते. साधारण पंधरा वीस दिवसांनी तुमची नजर "मरते' आणि नंतर तुम्ही रुग्ण म्हणून आलेल्या स्त्रीकडे "मादी" म्हणून नव्हे तर "रुग्ण" म्हणून पाहायला शिकता. त्यामुळे रुग्ण पाहताना समोर स्त्री आहे कि पुरुष आहे याचा डॉक्टर वर परिणाम होत नाही.
डॉक्टर आणि चित्रकार-मूर्तीकार यांचा मानवी देहाकडे बघण्याचा दृष्टीकोण अन्य लोकांपेक्षा वेगळा असतो, हे पदर- आख्यानाच्या संदर्भात नमूद करू इच्छितो.>याला बाडीस

तरी तुमच्या सगळ्या उपमा आणि तथाकथित मॉरल पुलिसिंग चे धागे बायकांवर च का असतात देव जाणे? हे सुद्धा बोलताना तुम्ही सीमारेषेवर अपमानास्पद (ऑफेम्डिंग अर्थाने , इन्सल्टिंग नाही) . प्रयोजन काय आहे या सगळ्याचं किंवा या तपशीलांचं? एक वैद्यकिय विषय म्हणुन तुम्ही बघत असाल स्त्रियांकडे तर इथे मुळात च स्त्रियांनी वजन कमी कसे करावे हा धाग्याचा विषय नसून एकंदर वजन कसे आटोक्यात ठेवावे हा आहे. वैद्यकिय शिक्षण च असं असतं की स्त्री पुरुष शरीराबद्दल " अवघड" वाटणं बंद होतं अशा आशयाचा एक प्रतिसाद दिला जाऊ शकतो , जर चित्रगुप्त काकांना प्रतिसाद द्यायचा असेल तर. पण हे जे तपशील तुम्ही नाही नाही म्हणताना भरले आहेत ते जरा अतिच आहेत. आणि स्त्रियांना ऑफेन्सिव आहेत.

तुमच्या धाग्यांमध्ये स्त्रियां बद्दल चे हे जे काही ताशेरे असतात ते एका डॉ कडुन यावेत याचं वैषम्य वाटतं. बाकी तथाकथित फेमिनिझम चा माझ्यावर कसला म्हणजे कसला ही पगडा नाही त्यामुळे उगाचच तलवार काढुन मी आलेली नाही. त्या झेन साहेबांने तर काय प्रतिसाद दिलाय त्यांचं त्यांनाच माहिती. आणि हे प्रतिसाद, असले तिरकस अर्थ , हे असे विपर्यास नेहमी अशा विषयांवरुन होतात, नव्हे तुम्ही विषय देता असं माझं सखेद मत झालंय.

वेल्लाभट's picture

17 Oct 2016 - 10:16 pm | वेल्लाभट

घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना?

हे रुपक अप्रस्तुत आणि अनुचित वाटलं.

शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते.

म्हणजे काय होतं नक्की?

असो. विनोदनिर्मितीचा दुबळा प्रयत्न म्हणतो याला.
आत्तापर्यंतचे पाच भाग अतिशय भारी होते. हा मात्र जमला नाही तितकासा.

चित्रगुप्त's picture

18 Oct 2016 - 2:29 am | चित्रगुप्त

धागा वजनावरून पदरावर घसरलाच आहे तर मीही चार ओळी लिहीतो.
डॉक्टर साहेबांचे क्लिनिक महराष्ट्रात असल्याने सोनोग्राफीसाठी येणार्‍या स्त्रियांच्या सन्दर्भात त्यांनी जे निरीक्षण नोंदवले आहे, तसे सगळीकडेच असते असे नाही, हे मी दिल्लीत पस्तीस वर्षे राहून सांगू शकतो. मी जेंव्हा दिल्लीत प्रथम रहायला आलो, तेंव्हा मोबाईल, मॉल्स, चोविस तासाचे टीव्ही मनोरंजन वगैरे नव्हते. घरोघर मोटारी नसल्याने शॉपिंगसाठी भटकंती, किट्टी पार्ट्या, वरचेवर सिनेमाला जाणे वगैरे काहीच नव्हते. तात्पर्य म्हणजे अधिकांश स्त्रिया दिवसभर घरीच असत, आणि टाईमपाससाठी सरकारी क्वार्टर्सच्या सार्वजनिक अंगणात घोळक्या-घोळक्याने खाटांवर हाताच्या पंखांनी वारा घेत पहुडलेल्या - टिपिकल पंजाबी भारदस्त लठ्ठ स्त्रिया जिकडे तिकडे दिसत. रात्रीही बहुतांश लोक उघड्यावरच खाटा टाकून झोपत, तेंव्हाही हेच दृश्य दिसायचे. याचा या धाग्याशी संबंध असा, की या स्त्रिया हमखास खुशाल पदर पाडून बसलेल्या वा लोळलेल्या असत (उकाड्यामुळे असणार नक्कीच) आणि कोणीही तिकडून येत जात असले तरी त्याची तमा त्यांना नसे. माझ्यासारखे बॅचेलर्सच उलट लाजेने खाली मान घालून तिकडून सटकत. सलवार-कमीज घालणार्‍या स्त्रियांची चुन्नी तर कधीच जागेवर नसते, हे तर मी अजूनही बघतो. आता परिस्थिती बदलली आहे, आता घरोघरी एसी, चोवीस तास गळणारा टीव्ही, मोबईल, मोटारी यामुळे असे उघड्यावर वावरणे बंद झालेले आहे. मुळात साड्या नेसणेच दुर्मिळ झाल्याने पदराचा प्रश्नच येत नाही.
मी पहिल्यांदा धागा वाचला, तेंव्हा मलाही पदराची उपमा अप्रस्तुत/कालबाह्य वाटली होती. साहित्यिक दृष्ट्या मात्र तशी ती चपखल वाटते, त्यामुळे डॉक्टर साहेबांना त्यांचे निरिक्षणातून ती सुचावी, हे स्वाभाविकच.

सुबोध खरे's picture

18 Oct 2016 - 1:44 pm | सुबोध खरे

बायका, त्यांचा पदर हे उल्लेख टाळले तरी चालतील
मान्य आहे.
मला सुद्धा पहिल्यांदा असेच वाटले होते परंतु दुसरी "समर्पक" उपमा सुचली नाही. ही माझ्या विचारशक्तीची मर्यादा समजा

हा माझा पहिला प्रतिसाद स्पष्ट आहे. स्त्रिया आपल्या पदराविषयी जशा "जागरूक" असतात . तसेच लठ्ठ माणसांनी आपल्या आहाराविषयी सदा सर्वदा जागरूक राहायला पाहिजे इतका साधा अर्थ होता त्यावर लोकांनी टी आर पी, चीप, ऑफेन्सिव्ह, मॉरल पुलिसिंग, विनोदनिर्मितीचा दुबळा प्रयत्न इ विविध विशेषणांची राळ उडवली. कुणीही दुसरी समर्पक उपमा मात्र सुचवली नाही.
मला मी दिलेली उपमा चुकली आहे असे अजिबात वाटलेले नाही. लोकांनी त्याचच विपर्यस्त अर्थ घेतला तो त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे.
असो.
साधा एक समोसा जास्त खाल्ला तर तितक्या कॅलरी जाळण्यासाठी चार ते पाच तास "वेगाने" चालावे लागते आणि जो माणूस रोज १८०० च्या ऐवजी १४०० कॅलरीचा आहार घेतो आहे त्याच्या दृष्टीने एक समोसा खाणे म्हणजे एका दिवसाचा मिताहार फुकट गेल्यासारखा आहे.
किंवा एक साधे ६० ग्रॅमचे चॉकलेट खाल्ले तर ३१५ कॅलरी आपल्या पोटात जातात त्या जाळण्यासाठी २ तास वेगाने चालावे लागेल.
http://www.idiva.com/news-health/what-does-300-calories-look-like/1883
याच साठी आपण "जाता जाता काय तोंडात टाकतो" आहोत याचे सदा सर्वकाळ "भान" असणे आवश्यक आहे इतका साधा अर्थ त्या उपमेत आहे.

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 2:25 pm | वेल्लाभट

चालताना समोर बघण्याचं भान असतं
पाणी पिताना ग्लास नाकाकडे जात नाही याचं भान असतं
पैसे देताना एक नोट जास्त देत नाही याचं भान असतं
स्कूटरवर बसताना तोल जात नाही याचं भान असतं
हज्जार गोष्टींचं भान असतं, तसंच तब्येतीचंही असावं.
तुम्हाला दुसरी उपमा सुचली नाही तुमचा प्रश्न आहे. पण म्हणून जी सुचली ती कशी योग्यच्च होती हे पटवण्याचा प्रयत्नही दुबळा वाटला. नाही तर नाही ब्वा सुचली करावं कबूल व्हावं मोकळं. कॅलरीज थोडीच जातायत त्याने पोटात? असो.

मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा. मग कॅलरीज ची गणितं बसवावी लागत नाहीत. शरीराचं विज्ञान बरोब्बर आरोग्याचं रसायन तयार करतं.

गामा पैलवान's picture

18 Oct 2016 - 6:55 pm | गामा पैलवान

वेल्लाभट,

तुमच्याशी असहमत.

चालताना समोर नाय बघितलं तर धाडकन पडायला होतं.

पाणी पिताना ग्लास नाकाकडे गेला तर नाकात पाणी जाऊन जीव कासावीस होईल.

पैसे देताना एक नोट जास्त गेली तर आपलंच नुकसान आहे.

स्कूटरवर बसताना तोल गेला तर कपाळमोक्ष ठरलेलाच आहे.

मात्र पदर ढळला वा चार घास जास्त खाल्ले तर लगेच परिणाम दिसून येत नाही. म्हणून पदराचं भान आणि उपरोक्त चार गोष्टींचं भान वेगळे आहेत.

आ.न.,
-गा.पै.

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 11:18 pm | वेल्लाभट

मात्र पदर ढळला वा चार घास जास्त खाल्ले तर लगेच परिणाम दिसून येत नाही

रियली, गा.पै? आय सजेस्ट यू थिंक ओवर इट वन्स मोअर.

गामा पैलवान's picture

19 Oct 2016 - 11:49 am | गामा पैलवान

वेल्लाभट,

दुष्परिणाम लगेच दिसले नाही तरी थोड्या थोड्या मात्रेने वाढंत राहतात. जेव्हा ध्यानात येतं तेव्हा वेळ बहुधा निसटून गेलेली असते.

आ.न.,
-गा.पै.

वेल्लाभट's picture

19 Oct 2016 - 12:08 pm | वेल्लाभट

माझा पास.

सुबोध खरे's picture

18 Oct 2016 - 7:00 pm | सुबोध खरे

मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा. मग कॅलरीज ची गणितं बसवावी लागत नाहीत. शरीराचं विज्ञान बरोब्बर आरोग्याचं रसायन तयार करतं.
एवढं सोपं असतं काय ?
अरेरे उगाच एवढे सहा भाग लिहायचा खटाटोप केला.
वेल्लाभट तुम्ही लिहा कि डिटेलवारीने याबद्दल. आम्ही थांबतो.

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 11:32 pm | वेल्लाभट

लिहू की. आमच्या आगोदरही अनेकांनी लिहिलंय याबद्दल. अगदी भारताच्या लाडक्या डैटिशन रुजुता ताई पण हेच म्हणतात वारंवार; तिथे आमची काय पोच त्यांच्यापुढे.

बाकी तुम्ही मात्र तलवार उपसूनच असता नेहमी डॉक.

चित्रगुप्त's picture

18 Oct 2016 - 7:35 pm | चित्रगुप्त

मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा.

कित्येकांना लठ्ठपणामुळे, वाढत्या वयामुळे, गुडघेदुखी, गाऊट, फ्लॅट फूट वा तत्सम त्रासामुळे व्यायाम करणे शक्य वा हितावह नसते (... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...) त्यामुळे आहाराबद्दल नेहमी जागरूक रहाणे आवश्यक आहे. जिभेच्या 'चोचल्यां'पायी वाटेल तेंव्हा, वाटेल ते, वाटेल तितके खाऊन मग न झेपणारा व्यायाम करण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणे योग्य. योगाची पतंजलीनी केलेली व्याख्याच मुळात 'योगश्चित्तवृत्ति निरोधः अर्थात चित्त्वृत्तींवर ताबा ठेवणे अशी आहे. जगातील अनेक वैयक्तिक आणि सामाजिक समस्या, अनारोग्य, अन्याय, जुलूम, क्रौर्य यांचे मुळाशी मोकाट सुटलेल्या मानवी वृत्ती आहेत, असे दिसून येते.
दुसरे म्हणजे हल्ली कित्येकांना व्यायाम म्हणजे एकदम महागड्या जिममधे जाऊन बघता बघता सलम्या किंवा जॉन इब्राहिम वगैरेंसारखी बॉडी बनवायची असते... मग जिम सुरू करणे लांबणीवर पडत जाते, किंवा सुरू केले तरी लवकरच ते कंटाळून जाणे सोडतात, त्यातून आलेल्या नैराश्यापायी घरी कोणत्याच प्रकारचा व्यायाम न करता खाणे मात्र तसेच चालू ठेवतात. खाण्यावर ताबा ठेवला, तर जिम वा मेहनतीचे व्यायाम करण्याऐवजी घरच्या घरी हलकाफुलका व्यायाम, आसने, नृत्य किंवा गेलाबाजार नुसते बसून वा लोळत राहण्याऐवजी नेहमी काही ना काही शारीरिक हालचाल करत रहाणे, एवढेही पुरेसे असते.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2016 - 8:05 pm | टवाळ कार्टा

(... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)

रोजचे १० तास ऑफिसात (वेळेवर निघणे सणासुदीलाच असते), ३ तास प्रवासात, झोपेचे ८ तास, सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास = २३.५ तास...उरलेला ०.५ तास व्यायाम?

सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास

यातला वेळ कमी करता येतो का ते बघ. किंवा या तब्बल अडीच तासातला वेळ वाचव आणि किमान एक तास सायकल चालव.

खटपट्या's picture

18 Oct 2016 - 9:48 pm | खटपट्या

हाफीसात जेव्हा वेळ मिळतो,मीटींग नसतात कींवा कामाचा बोजा नसतो तेव्हा आवारात चालून यावे. हाफीसात जीम असेल तर त्यावर व्यायाम करुन यावा. काहीच जमत नसेल तर उभे राहून काम करावे.(यासाठी वेगळ्या डेस्कची गरज असते हे खरे). शनिवार, रवीवार कमीतकमी एक तास वेगाने चालावे. त्याहून जास्त चालले तरी बरे. दोन महीन्यात परीणाम दीसतील. आणि डाक्टरांनी सांगीतल्याप्रमाणे आहारावर नियंत्रण तर हवेच.
जौदे जरा जास्तच उपदेश झाला.

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 11:31 pm | वेल्लाभट

"वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)

सहमत. सद्ध्या याचसाठी स्वतःशी भांडण चालू आहे. कामामुळे, प्रवासामुळे प्रामाणिकपणे वेळ्/उत्साह उरत नाही व्यायामाचा. इच्छा खूप असते, आणि तत्व हेच सांगतं... की वेळ काढावा लागतो इत्यादी. पण बॉडी डिमांड्स स्लीप. इट गिव्ह्स अप अ‍ॅट द एंड ऑफ द डे. असो. यातूनही वेळ काढीन असा निश्चय आहेच.

आणि जिम, व्यायाम याबद्दल एकंदरच जे खत्तरनाक गैरसमज लोकांमधे बघायला मिळतात ना, ते कमाल असतात. आणि मग उगाच कुठल्यातरी अतर्क्य थियरीवर विश्वास ठेवणे, चालल्यानेच सर्वात अधिक फायदा होतो, किंवा साखर सोड बघ एक महिन्यात काय फरक होतो ते, किंवा मग चहा सोडून ग्रीन टी इत्यादी सोयीस्कर आणि ईझी ऑप्शन्स लोकं निवडतात. स्वतःला फसवत बसतात. फिटनेस सोडून वजन या एका डिराइव्हड नंबरवर लक्ष केंद्रित करून वेळ, पैसा, आणि उमेद सगळं वाया घालवतात. व्हेरी फ्यू अंडरस्टँड फिटनेस. द रेस्ट आर बिझी कंपेरिंग देमसेल्व्ह्ज विथ अदर्स.