काटा वजनाचा --४

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
3 Feb 2016 - 1:08 am

काटा वजनाचा -३
काटा वजनाचा --४
आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली
काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन.
काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो. याचे प्रत्यक्ष अस्तित्व अजून मिळालेले नाही परंतु हा सिद्धांत असे सांगतो कि आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या HYPOTHALAMUS या मेंदूच्या भागात याचे अस्तित्व असते आणी हा एकदा एका वजनाला स्थिर(SET) झाला कि तो विशिष्ट मर्यादेत आपल्या शरीराचे वजन वाढू अथवा कमी होऊ देत नाही.
जर आपले वजन ६० किलो असेल आणी आपण त्याला आवश्यक अशा २१०० कॅलरी इतके अन्न खात असू तर आपले वजन स्थिर राहील परंतु आपण जर २४०० कॅलरी इतके अन्न खालले तर हा एडीपोस्टेट आपल्या वरच्या ३०० कॅलरी वेगवेगळ्या स्वरुपात खर्च करून वजन स्थिर ठेवतो. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) येथे मेंदू संकेत पाठवितो ज्यामुळे हि बरीचशी खाल्लेली अतिरिक्त चरबी (उर्जा) अक्षरशः जाळून टाकली जाते. याशिवाय आपली आतडी अतिरिक्त अन्न शोषण करण्या ऐवजी पुढे ढकलून देतात त्यामुळे स्थूल माणसे बरेच अन्न दुसर्या दिवशी अक्षरशः वाया घालवतात. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे.
साधारण पणे आपले शरीर जेंव्हा एक ग्राम चरबी जाळते तेंव्हा साडेचार कॅलरी उर्जा या ए टी पी(ATP) मध्ये साठवून ठेवली जाते जी तुमच्या चयापचयासाठी(METABOLISM) साठी वापरली जाते आणी उरलेल्या साडेचार कॅलरी उष्णतेच्या रुपात बाहेर पडतात.जेंव्हा आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) काम करू लागते तेंव्हा एक ग्राम चरबीतील बहुतांश उर्जा हि उष्णतेच्या स्वरुपात बाहेर पडते आणी फारच थोडी उर्जा साठविली जाते. थोडक्यात तेच काम करायला आपले शरीर जास्त उर्जा खर्च करते. आपले शरीर साधारणपणे ५० % उर्जा कार्यक्षमतेचे (EFFICIENCY) असते
आपण पाहिले असेल कि स्थूल माणसाना सदासर्वदा घाम येतो याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरावरील अतिरिक्त चरबीचा थर उष्णतारोधक असल्याने उर्जा बाहेर टाकत नाही आणी दुसरे कारण हि तपकिरी चरबी ( BROWN FAT) त्यांनी खाल्लेले "अतिरिक्त" अन्न जाळून वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते.
महत्त्वाचा मुद्दा -- आपले वजन जास्त असेल आणी आपलयाला थंड बसलेल असताना सुद्धा सतत घाम येत असेल तर त्याचा साधारण अर्थ असा आहे कि आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात आहात.

आता एखाद्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीने आपल्या गरजेच्या पेक्षा बरेच जास्त अन्न बरेच दिवस (८०-१०० दिवस) खाल्ले तर काय होते आपला एडीपोस्टेट (ADIPOSTAT ) वरच्या बिंदूवर स्थिर होतो. म्हणजे ६० ऐवजी ६३ किलो वर स्थिर होतो. आता या व्यक्तीला रोजचे कामकाज चालविण्यासाठी २१०० ऐवजी २३०० कॅलरी चे अन्न लागते. असे बरेच जास्त अन्न बरेच दिवस खाणे चालू राहिले तर त्या व्यक्तीचे वजन वाढतच जाते. म्हणून वर्षभरात लोकांचे १०-१२ किलोने वजन सहज वाढते.
केसरी ट्राव्हल्स सारख्या संस्थेत १५ दिवसांच्या सहलीला जाऊन आलेली माणसे ३-४ किलोने वजन वाढवून येतात कारण तेथे दिवसात ५ वेळेस मिळणारे सुग्रास जेवण आणि न्याहारी, नाश्ते. ते जवळजवळ ४५०० कॅलरी इतके असतात. आणि एकदा पैसे भरले आहेत तर का सोडा? खाउन घ्या अशी आपली वृत्ती.
जेंव्हा हि व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करते तेंव्हा हाच एडीपोस्टेट (ADIPOSTAT) आपले वजन कमी होऊ देत नाही. आपण कमी कॅलरी चा आहार घेतो तेंव्हा आपले शरीर जास्त कार्यक्षम होते आणी एक गरम चरबी जाळल्यावर सहा ते सात कॅलरी ए टी पी मध्ये साठवते. थोडक्यात तेवढेच काम करण्यासाठी आपल्या शरीराला कमी उर्जा खर्च करायला लागते. यामुळे मिताहार सुरु केला तरी वजन सहज सहजी कमी होत नाही याउलट त्याच व्यक्तीला थंडी वाजू लागते. थंडी वाजली किती व्यक्ती अंगावर अधिक कपडे चढवून घेते आणी उर्जेचा अपव्यय कमी होतो. थोडक्यात आपले वजन कमी होत नाही.
शिवाय आपली आतडी सुद्धा जास्त कार्यक्षम होतात आणी जास्त अन्न शोषून घेतात. म्हणजे जर पूर्वी ४०० ग्राम अन्नापैकी २०० ग्राम शोषले जात असे तर आता २४० ग्राम अन्न शोषले जाते. त्यामुळे आहार तुम्ही ४० ग्राम नि कमी केलात(१०%) तरी प्रत्यक्षात शोषलेले अन्न तेवढेच राहते (२०० ग्राम)
चरबी बरोबर शरीरात बरेच पाणीसुद्धा साठवलेले असते. त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणी व्यायाम केले असता सर्वात पहिल्यांदा हे पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे आपले वजन ५ ते ८ % कमी होते हि स्थिती पहिल्या ३-४ आठवड्यात होते. म्हणजेच एखादी व्यक्ती ८० किलोची असेल तर तिचे वजन ७२ ते ७५ किलो पहिल्या एक महिन्यात सहज होते. पण दुर्दैवाने हा वजन कमी होण्याचा दर लगेचच मंदावतो आणी पुढचे ५ टक्के कमी करण्यासाठी तुम्हाला भगीरथ प्रयत्न करायला लागतो.
बहुसंख्य लोक जे VLCC, तळवलकर सारख्या केंद्रात जातात तेथे पहिल्या एक महिन्यात दैदिप्यमान असा फरक वजनाच्या काट्यावर दिसतो. या नन्तर त्यांच्या व्यायामात खंड पडला कि हे ५-८% पाणी परत शोषले जाते आणी पुढच्या २-३ आठवड्यात वजन पुन्हा जैसे थे होते.
दुर्दैवाने या कमी झालेल्या वजनाच्या उत्साहात लोक हे सर्वाना सांगत सुटतात कि वजन काय आरामात कमी होईल. मी गेल्या महिन्यात ८ किलो कमी केले होते . आणी याची पुनरावृत्ती मग परत २ -३वर्षांनी होते. बर्याच लोकांनी असे पाच आकड्यात पैसे तीन चार वेळेस खर्च केलेले असतात आणी त्यानंतर ते वजन कधी कमी होत नाही. and then they lived happily ever after with their original weight. हि गोष्ट VLCC किंवा तळवलकर मध्ये कोणीही तुम्हाला सांगत नाही. हेच तर त्यांच्या यशाचे गमक आहे.
महत्त्वाचा मुद्दा -- एक महिन्यात ७-८ किलो वजन कमी करणे हा हेतू न ठेवता दर महिन्याला एक ते दीड किलो वजन कमी होईल या उद्देशाने आपण जायला हवे.म्हणजे वर्षभरात आपण १२-१५ किलो वजन कमी करू शकू.
वजन जर एकदम कमी केले तर हवा गेलेल्या फुग्यासारख्या आपल्या चेहर्याला किंवा शरीराला सुरकुत्या पडतात. (गरोदर स्त्रियाना प्रसुतीनंतर पोटाच्या त्वचेवर अशाच सुरकुत्या पडतात).
लक्षात ठेवा. एक ग्राम चरबी म्हणजे ९ कॅलरी ( KILOCALORIES) म्हणजे जर रोज आपण ५० ग्राम चरबी कमी करायची असेल तर आपल्याला ४५० कॅलरी व्यायामात किंवा आहारात कमी करून खर्च करायला पाहिजेत.

असेच दुसर्या टोकाला असलेले बारीक लोक -- बारा महिने बत्तीस काळ हे लोक वाटेल ते खात असतात पण त्यातील बराच भाग शरीर शोषुनच घेत नाही त्यामुळे कितीही खाल्ले तरी "अंगी" लागत नाही. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. शिवाय जे अन्न खातात त्यातील बरेचसे अन्न तपकिरी चरबी ( BROWN FAT) जाळण्यास मदत करते यामुळे हे लोक काही अंगी लावून घेत नाहीत आणी बर्याच वजनदार लोकांच्या हेव्याचे मानकरी होतात.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

3 Feb 2016 - 3:52 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

अर्धवटराव's picture

3 Feb 2016 - 4:40 am | अर्धवटराव

एव्हढं सगळं रामायण घडतं होय...
डॉ. साहेबांचा तर आपण पंखा आहोच... आता अजुनच स्पीड पकडली आहे.

अर्धवटराव's picture

3 Feb 2016 - 4:43 am | अर्धवटराव

वजन कंट्रोल करण्याची हि जे थेरोटीकल यंत्रणा आहे ति केवळ वजनावर चेक ठेवते कि त्या अनुषंगाने चयापचयाचा पाठपुरावा देखील करते? म्हणजे जर त्या यंत्रणेला कळलं कि वजन कमि होत आहे तर ति केवळ अतिरिक्त चरबी जळु देणे वगैरे होऊ देते कि शरीरातील इतर यंत्रणांवर जास्तीचा भार द्यायला लागते?

सुबोध खरे's picture

3 Feb 2016 - 12:18 pm | सुबोध खरे

या यंत्रणेत वजन कमी होत आहे असे कळले तर वजन कायम टिकवण्यासाठी सर्व शरीरातील इतर प्रणाल्या सुद्धा कामाला लावल्या जातात. म्हणजे आतड्यात अन्न जास्त शोषले जाते आपले इंजिन जास्त कार्यक्षम होते (५० टक्क्याऐवजी ७० % पर्यंत), आपल्याला थंडी वाजू लागते कारण शरीरात कॅलरी जाळून जी उर्जा तयार होते ती कमी केली जाते. भूक लवकर आणि जास्त लागते. हि यंत्रणा आदिमानवाच्या काळापासून कार्यरत आहे जेंव्हा अन्नधान्य मुबलक नव्हतंच. तेंव्हा पुढचे अन्न मिळेपर्यंत असलेले अन्न जास्त योग्य प्रमाणात वापरले जावे हा त्यातील मूळ हेतू.
गेल्या ४०-४५ वर्षात अन्नाचा पुरवठा मुबलक असला तरीही तुमच्या गुणसूत्रात किंवा जीन मध्ये बदल घडवून यायला हा कालावधी सूक्ष्म आहे. यामुळे अन्न भरपूर मिळते आहे तोवर वजन वाढत जाते. आणि आपणही दाबून खातोच आहोत. मग वाढलेले वजन कमी करायचा प्रसंग येतो तेंव्हा आपण मिताहार घेतो आणि पाचव्या दिवशी पार्टी करतो. मग चार दिवस शरीर या (conserve) अक्षय प्रणालीत गेलेले असते ते एकदम मिळालेले अन्न जास्तीत जास्त शोषून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या मिताहाराचा फज्जा उडतो. पण लक्षात कोण घेतो. हि गोष्ट बहुसंख्य आहार तज्ञ लक्षात घेत नाहीत किंवा लक्षात घेतले तरीही आपल्या ग्राहकाला नाराज का करा? त्यामुळे लोक वजन कमी करण्याच्या VLCC, तळवलकर, गोल्ड जिम आणी विविध आहार तज्ञ, मेदारी, आयुरस्लिम, न्युट्रलाईट(एमवे) आणी तत्सम आयुर्वेदिक गोळ्या कॅपसुल, पंचकर्म, वमन विरेचन, डी टोक्स ई. च्या वार्या करीत असतात
AND THEN THEY LIVED HAPPILY EVER AFTER WITH THEIR WEIGHT असे चालू राहते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Feb 2016 - 10:28 am | अनिरुद्ध.वैद्य

डॉक्टरसाहेब,

ह्या अवस्थेची बरीच रिपिटेशन्स झालीत. मिताहारात एकाही दिवसाची सुट झाली तर वजन वाढतांना अक्षरशः अनुभवलंय आणि नंतर परत तीच सायकल.
तर जर एडीपोस्टेट वर सेट व्हायला ८०-१०० दिवस घेत असेल तर खाली यायला पुन्हा तितकेच दिवस घेतो का?

जर तसे असेल तर जवळ जवळ ३ ३ महिन्यांच्या ३ ४ सायकलस मध्ये वजन कमी कराव लागेल अस वाटतय!!!

सुबोध खरे's picture

4 Feb 2016 - 10:47 am | सुबोध खरे

वैद्य साहेब
असे चक्राकार गतीने वजन कमी न करता सरळ वर्ष भर आणि त्यानंतर "कायम" आपले आहारावर "नियंत्रण" ठेवणे आवश्यक आहे.
मी असे म्हटले कि लोक लगेच नकारात्मक भूमिकेत जातात आणि म्हणतात कि म्हणजे आम्ही आता काही खायचेच नाही का?
मी स्वतः सगळ्या चरबीयुक्त गोष्टी खातो परंतु एका बैठकीत नाही.किंवा जर लग्नाला गेलो तर मी तेथे असलेल्या सर्व भाज्या किंवा भजी, कोथिम्बिर वडी पापड इ सर्व गोष्टी खातो परंतु रोटी, चपाती साधा भात मसाले भात इ काहीच खात नाही. आणि शेवटी रसमलाई, आईस्क्रीम इ गोष्टी आवर्जून खातो.परंतु "जरा" जरी पोट जास्त भरेल असे वाटले तेंव्हा थांबतो. सांगण्याचा उद्देश हा कि आपल्या कॅलरी मोजून मापून खाणे आवश्यक आहे. माझ्याकडे पाहणारे लोक मला सांगतात कि तुम्ही तर सर्व गोष्टी खाता आहात. मी त्यांना एकच सांगतो तुम्ही ५-६ पुर्या/ ३ रोट्या खाऊन वर साधा भात, जीरा राइस कशासाठी खाता? या वर त्यांचे उत्तर नसते.
काही लोक पार्टीत मिळतात म्हणून चिकन मटण सारखे जड पदार्थ स्टार्टर म्हणून दाबून खातात मग "व्यवस्थित" जेवण वर शेवटी मिठाई आणि आईस्क्रीम. मला यांना सांगावेसे वाटते कि फुकट मिळतात म्हणून तुम्ही इतके खाता आणि शेवटी VLCC किंवा तळवलकर मध्ये ३०-३५ हजार रुपये मोजून वजन कमी करायचा प्रयत्न करता या ऐवजी पार्टीत अर्ध पोट भरेल एवढेच खा आणि याच पैशाचे हेच पदार्थ इतर वेळेस बाहेर मुद्दाम विकत आणून जेवण ऐवजी खा.
हीच परिस्थिती सगळ्या जणांची आहे. पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही या वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही.
शॉर्ट कट काम करीत नाही.

VLCC किंवा तळवलकर मध्ये ३०-३५ हजार रुपये मोजून वजन कमी करायचा प्रयत्न करता या ऐवजी पार्टीत अर्ध पोट भरेल एवढेच खा आणि याच पैशाचे हेच पदार्थ इतर वेळेस बाहेर मुद्दाम विकत आणून जेवण ऐवजी खा.

_/\_

याला म्हणतात विजन...

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Feb 2016 - 2:27 pm | अनिरुद्ध.वैद्य

पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही या वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही.
>>

हे भरपूरदा वजन कमी करून शिकलोय ;) त्यामुळे आता वजन कमी झाल्यावरच समाधान मानायचं ठरवलंय!

ते चक्राकार गतीने म्हणजे मला दर तीनेक महिन्यांनी एडीपोस्टेट कमी आल्यावर आहार व्यायाम तीव्रता बदलून वजन कमी कराव लागेल अश्या उद्देशाने लिहायचं होत.

तर तस खरच होईल का?

पर्ल्स अॉफ विज्डम म्हणतात ते हेच. अत्यंत उपयोगी विवेचन. धन्यवाद डॉक्टरसाहेब.

नंदन's picture

3 Feb 2016 - 5:59 am | नंदन

लेख आवडला. विज्ञान लेखमालेत शोभून दिसावा, असा लेख!

प्रचेतस's picture

3 Feb 2016 - 8:45 am | प्रचेतस

लेख आवडला.

ब़जरबट्टू's picture

3 Feb 2016 - 9:11 am | ब़जरबट्टू

छान लेख.. महत्वाची माहिती मिळतेय..
एकंदरीत माझा एडीपोस्टेट जोशात आहे तर.. :(

नाखु's picture

3 Feb 2016 - 9:11 am | नाखु

लेख आवडला . तपशीलवार मांडणी आणि सोप्या भाषेत विवेचन.

रोज किमान किती चालले पाहिजे(चाळीशी पार मनुष्याने) आणि साधारण स्थूल व्य्क्तीने दोरीवरील उड्या हा व्यायाम करावा काय.?

शंकायन पालक नाखु

राजाभाउ's picture

3 Feb 2016 - 9:57 am | राजाभाउ

हां असे होते होय. पण म्हणजे बर्याच दिवसांपर्यंत योग्य व्यायाम व डायट केले तर हा एडीपोस्टेट खालच्या बिंदुवर येउन स्थिर होत असेल ना ?

ब़जरबट्टू's picture

3 Feb 2016 - 1:01 pm | ब़जरबट्टू

शरीराचे काम एकंदरीत बरेच किचकट आहे. खुप आहारतज्ञ एका विशिष्ट लयेत शरीराला पुरवठा करू नका असे सांगतात. शरीर या बाबतीत नेहमी Confuse रहावे असे म्हणतात. एकाच प्रकारचा व्यायाम किंवा कमी डायट केल्याने Body Plateaus होऊ शकतो. म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर तुम्ही केलेल्या प्रयत्नांना काहीसुध्दा फ़रक दाखवत नाही.. व हा Body फ्लतेऔस तो तोडण्यासाठी प्रसंगी दणकून खावे लागते.. :) लय गम्मत आहे राव...

- हवा खाउन वजन वाढलेला.. :(

राजाभाउ's picture

3 Feb 2016 - 4:36 pm | राजाभाउ

हो या Body Plateaus बद्द्ल पुर्वी पण वाचले होते. आहारतज्ञ व व्यायाम तज्ञ यासाठी मग व्यायाम व आहार याचा pattern बदलतात. पण मग या बदलाचा एक नविन pattern नाही का तयार होणार ? :)

ब़जरबट्टू's picture

5 Feb 2016 - 12:19 pm | ब़जरबट्टू

सहसा Pattern रिपीट होणार नाही असे सुचवल्या जातात. सहसा सुरवातीला एका दिवस कार्डियो, एक दिवस पुर्ण शरीर, मग हळुहळु अप्पर, लोवर, मग एका एका मसल्स ला पिळल्या जाते, अजून त्यात वजनाचे टप्पे वाढवणे, कधी झुम्बा, कधी डान्स हे सर्व आहेच. शरीराला कोणत्या मसल्सचा आज बळी जाणार के कळू न देणे हे याचे टार्गेट असावे. आणि शरीर वर्षभराचे Pattern लक्षात ठेवता नसावे, फ़ारतर महिना.. आता मी आजवर महिन्याच्या वर जिमलाच गेलो नाही त्यामुळे माझा पास.. :) डा. खरे व खरे अनुभवी जे आहेत ते सांगतीलच...

सुबोध खरे's picture

5 Feb 2016 - 12:30 pm | सुबोध खरे

आता मी आजवर महिन्याच्या वर जिमलाच गेलो नाही
हि तर नेहमीचीच गोष्ट आहे आणि हे सर्व जिम वाल्यांना माहित असते.
म्हणून एक महिन्याची फी तीन महिन्यांच्या फी सारखी असते. म्हणजे ज्याची मुळात मानसिक तयारी झालेली नाही त्याच्याकडून तीन महिन्याची फी वसूल केली जाते. आणि इतरांसाठी वर्षाची फी "स्वस्तात" दिल्यासारखी दाखवली जाते म्हणून लोक एक वर्षाचे पैसे भरतात. आणि साधारण तीन महिन्याच्या पुढे कोणी नियमित पणे जात नाही. कारण खालीलपैकी कोणतेही असू शकते.
१) नाईट शिफ्ट आहे
२) पावसाळा, उन्हाळा / हिवाळा सुरु झाला
३) टूर वर/ ऑन साईट गेलो आणि परत आल्यावर जमले नाही
४) मुलांच्या परीक्षा होत्या.
५) ताप आला, आजारी पडलो,
६) पायाला/ हाताला फ्राक्चर झालं.
७) खास काही कारण नाही/ आलास/ कंटाळा आला
राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे.
नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते.

प्रसाद१९७१'s picture

5 Feb 2016 - 2:06 pm | प्रसाद१९७१

राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे.

डॉक्टर साहेब - यनावालांनी हे वाक्य वाचले तर ते चिडतील. ज्यांना प्रार्थना करणेच मान्य नाही त्यांनी काय करायचे? ( ह.घ्या. हे.वे.सां.न. )

राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे.
नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते.

हे बाकी बरोबर आहे, बर्याच दिवसांनतर पुन्हा जिम सुरु केले आहे. आहारा बद्दलच्या आपल्या सुचना अंमलात आणण्याचा प्रयत्न चालु आहे. योगसनांचा या बाबतीत (वजन कमी करणे) काही लाभ होतो का ?
मनापासुन धन्यावाद.

"नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते." व्यक्तीदिठ प्रमाण कसे ओळखायचे
खरे साहेब तुम्ही पुढच्या भागात सांगालच हे माहिती आहे तरी रहावले नाही म्हणुन विचारले.

राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या

नास्तिकांनी आता व्यायाम केला नाही तर ह्याचा दोष तुम्हांलाच हो आता डॉ.! =))

सुबोध खरे's picture

5 Feb 2016 - 8:49 pm | सुबोध खरे

यशोधरा ताई
असंही डॉक्टर शिव्या खातोच. कारण सांगितलेला आहार आणि व्यायाम नियमितपणे करणारे लोक शंभरात दोन पेक्षा जास्त नाहीत. अमुक तमुक डॉक्टर कडे मी वजन कमी करण्यासाठी इलाज करतो आहे हे मात्र उत्साहाने सांगितले जाते. परंतु पाच सहा महिन्यांनी वजन जैसे थे असल्यावर डॉक्टरची उपचार पद्धती चुकीची आहे हा शिक्का बसतोच. आणि हे ९८ लोक आम्ही "काहीच" खात नाही हे मात्र आवर्जून सांगतात. म्हणून मी कुणाही माणसाचं वजन कमी करण्यासाठी इलाज करायला जात नाही.
आजच सकाळी माझ्याकडे एक जैन बाई आल्या होत्या वय ३२, उंची ५ फूट ३ इंच, वजन ११० किलो. त्यांच्याच शब्दात मी एक फुलका खाल्ला तरी माझं पोट भरून जातं आणि आमचा फुलका किती लहान असतो? पण हे वजन गेल्या ५-६ महिन्यातच वाढलं आहे. अगोदर मी तशी बारीक होते. तेंव्हा वजन फक्त ८७ किलो होतं. मी थंडपणे सांगितलं तुमच्या फ्यामिली डॉक्टर ना हा रिपोर्ट घेऊन जा आणि सांगा.
वजन कमी करायला असा "जाता जाता" सल्ला देणं म्हणजे नाक्यावर सिगारेट प्यायला उभ्या राहिलेल्या ओळखीच्या माणसाने शेअर बाजारातील "टिप"देण्यासारखं असतं.
या लेखाचा मूळ हेतू या विषयाबद्दल जागृती निर्माण करणं हा आहे. वैयक्तिक प्रश्नांसाठी आपल्या जवळच्या डॉक्टर/आहार तज्ञाला भेटणे आवश्यक आहे

अहो डॉ, मी गंम्मत केली होती! चिलॅक्स!

सहसा Pattern रिपीट होणार नाही असे सुचवल्या जातात. सहसा सुरवातीला एका दिवस कार्डियो, एक दिवस पुर्ण शरीर, मग हळुहळु अप्पर, लोवर, मग एका एका मसल्स ला पिळल्या जाते, अजून त्यात वजनाचे टप्पे वाढवणे

फार थोड्या जिम्स मध्ये हे पाळलं जातं. बर्‍याचशा जिम मध्ये ट्रेनर्स मख्ख बसून असतात कारण तुम्ही पर्सनल ट्रेनिंगसाठी अ‍ॅडमिशन घेतलेलं नसतं. अशा वेळी साधारण तीनेक महिन्यांनी आपण ट्रेनर लोकांना आठवण करुन द्यावी लागते की शेड्युल बदलून द्या.

सुबोध खरे's picture

5 Feb 2016 - 8:55 pm | सुबोध खरे

सूड राव
जिमचे ट्रेनर तुम्हाला "असाच" सल्ला द्यायला लागले तर त्यांना पर्सनल ट्रेनर म्हणून कोण पैसा देईल?
सरकारी बाबू जर काम करायला लागले तर त्यांना कामासाठी "पैसा" कोण देईल

पाषाणभेद's picture

3 Feb 2016 - 11:03 am | पाषाणभेद

डॉ. वजन, उंची आणि कॅलरी या तिघांच्या संबंधीत काही तक्ता वैगेरे आहे काय हो?
बाकी लेख छानच. वजन कमी करणार्‍यांचे दुकाने बसतील असा.

मन१'s picture

3 Feb 2016 - 11:18 am | मन१

लिहित रहा.

उगा काहितरीच's picture

3 Feb 2016 - 11:23 am | उगा काहितरीच

छान लेख! क्लिष्ट माहिती सोप्या अन् रंजक पद्धतीने सांगीतल्याबद्द्ल धन्यवाद .

मोदक's picture

3 Feb 2016 - 12:02 pm | मोदक

वाचतोय वाचतोय..

हे सगळे भाग संपल्यानंतर एक सहज सोपा सल्ले देणारा पण एक लेख लिहा.काय खाणे टाळावे, त्याऐवजी काय खावे?

उदा. चिकन मटण बंद करून मासे खावेत किंवा ३ आईसक्रीमच्या संडे ऐवजी एकच अंजीर स्कूप खाणे वैग्रै वैग्रै. ;)

नाखु's picture

3 Feb 2016 - 12:05 pm | नाखु

सायकलवर बसून हे सारं कसं खाणार याचं ज्याम कुतुहल आहे मला.!!!

पळालेला नाखु

मोदक's picture

3 Feb 2016 - 12:07 pm | मोदक

:p

असंका's picture

5 Feb 2016 - 1:54 pm | असंका

-))

सुबोध खरे's picture

3 Feb 2016 - 12:23 pm | सुबोध खरे

मोदक राव
वजन कमी करणे हे इतके सहज सोपे असते तर वर लिहिल्याप्रमाणे पंचकर्म VLCC, तळवलकर, गोल्ड जिम आणी विविध आहार तज्ञ, मेदारी, आयुरस्लिम, न्युट्रलाईट(एमवे) यांची दुकाने केंव्हाच बंद झाली असती.
जितके शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी आणी नफा कसा मिळवावा सोपे आहे हे तितकेच सहज सोपे आहे.
वजन कमी करणे हे सरकारी रुग्णालय किंवा रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्य़ा सारखे आहे. त्यावर कायम काम करीत रहावे लागते. दोन गोळ्या घेऊन होणारे नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2016 - 2:20 pm | प्रकाश घाटपांडे

वजन कमी करणे हे सरकारी रुग्णालय किंवा रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्य़ा सारखे आहे. त्यावर कायम काम करीत रहावे लागते.

+१

डोके.डी.डी.'s picture

3 Feb 2016 - 12:23 pm | डोके.डी.डी.

खूपच अप्रतिम लेख. माझे पण वजन हल्ली खूप जास्त झाले आहे. वय २७ उंची १७८ सेमी आणि वजन ११० किलो ...... उपाय असेल तर सुचवा .

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2016 - 12:43 pm | पिलीयन रायडर

मला तर ताणच आला हा लेख वाचुन..

काका.. अहो वजन कमी न व्हायला शरीरच एवढे प्रयत्न करणार असेल तर कसं हो व्हायचं माझं!!!

मी मुदलात काहीच प्रयत्न करणं सोडुन दिलंय ती गोष्ट वेगळी ;)

लेख आवडला.. किमान शरीरात काय घडतय ते तरी समजलं.. उगाच निराश होण्यात अर्थ नाही. प्रयत्न करत रहावे हेच बरे..

माझ्या कामाचे तर काहीच नाही यात , शेवटचा प्यारा वाचला फक्त ;)

पैसा's picture

3 Feb 2016 - 1:38 pm | पैसा

वाचत आहे. नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत छान समजून देत आहात.

एकंदरीत कायमचं वजन कमी करणं जवळजवळ अशक्य आहे असं या वर्णनातून दिसतं आहे. भरपूर जास्त वजन असलेल्यांपुढे, म्हणजे त्याच्यासहित हॅपिली एव्हरआफ्टर राहणं शक्य नसलेल्यांपुढे फक्त सर्जरी हाच त्यातल्यात्यात हमखास मार्ग आहे का?

सुबोध खरे's picture

3 Feb 2016 - 7:34 pm | सुबोध खरे

ग वि साहेब
and then they lived happily ever after असे कधी प्रत्यक्षात असतं का? तसाच कोणीही स्थूल व्यक्ती आपल्या वजनाबद्दल समाधानी नसतं. परंतु त्यासाठी घ्यायला लागणाऱ्या कष्टांची बर्याच लोकांची तयारी नसते. म्हणून हा प्रश्न असतो. सर्जरी हा सोपा उपाय तर नाहीच नाही. खरं तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच सर्जरी करावी. सर्जरीचे आपले मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आहेत.
U-LIPO किंवा LIPOSUCTION या सुद्धा गोष्टी तितक्या सोप्या नाहीत.
निराश होण्याची गरज नाही परंतु चट मंगनी पट शादी किंवा QUICKFIX उपाय आज तरी नाहीत.
या सर्वांबद्दल पुढे येईलच

पद्मावति's picture

5 Feb 2016 - 10:25 pm | पद्मावति

माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीतल्या मुलीने टमी टक सर्जरी ( यालाच बहुतेक liposuction म्हणतात)केली. तिला वाटले की ती आता काहीही न करता आपण बारीक दिसणार. पण डॉक्टरांनी तिला सर्जरी च्या आधी चार पाच महिने व्यायाम, चांगला आहाराच्या मदतीने वजन कमी करायला लावले. त्यांनी सांगितले की तिचं आधी नैसर्गिक उपायांनी पोट फ्लॅट झाल्याशिवाय ऑपरेशन करता येणार नाही. नंतर ऑपरेशन झाल्यानंतर सुध्धा तीला सांगितलं की आता तिचं वजन किंचीत पण वाढायला नको कारण नाहीतर त्या झालेल्या सर्जरी चा काही उपयोग नाही. त्यामुळे सर्जरी जरी केली तरीही व्यायाम आणि योग्य आहाराला पर्याय नाही. त्यापेक्षा सर्जरी टाळणेच योग्य.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2016 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्लिष्ट शास्त्रीय माहिती मूळ गाभ्याला धक्का न लावता एकदम सोप्या शब्दात लिहिली आहे ! हे कसबाचे काम आहे !

सूड's picture

3 Feb 2016 - 2:35 pm | सूड

वाचतोय, पुभाप्र!!

खुपच सुंदर व माहितीपूर्ण लेख .
पु.भा .प्र.

असा मी असामी's picture

3 Feb 2016 - 5:04 pm | असा मी असामी

आता कळायला लागले आहे की रोज अर्धा ते एक तास चालुन सुध्धा वजनात फरक का पडत नाहि ते.महत्वाची माहिती मिळतेय.. आणि वाचतोय...

सुबोध खरे's picture

3 Feb 2016 - 7:35 pm | सुबोध खरे

साहेब
अर्धा तास मोटार सायकल फिरवली आणी त्यात दोन लिटर पेट्रोल टाकले तर टाकी रिकामी कशी होणार?

असा मी असामी's picture

4 Feb 2016 - 11:19 am | असा मी असामी

हा हा...खरे आहे. सध्या पेट्रोल कमी जात आहे पण आधीचा साठा भरपुर आहे. :)
भरपुर शंका आहेत, पुढच्या लेखांमध्ये त्यावर उत्तर मिळेल अशी आशा आहे. नाही मिळाले तर विचारतो.

सुबोध खरे's picture

5 Feb 2016 - 10:28 am | सुबोध खरे

सध्या पेट्रोल कमी जात आहे पण आधीचा साठा भरपुर आहे.
बस, थोडा धीर धरा

रंगासेठ's picture

3 Feb 2016 - 5:35 pm | रंगासेठ

हाही भाग नेहेमीप्रमाणेच मस्त झालाय.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2016 - 10:49 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

वेल्लाभट's picture

4 Feb 2016 - 10:57 am | वेल्लाभट

अत्त्तिशय समजेल अशा भाषेत समजवलंयत डॉक....
बेस्ट!
वाह....
जियो!

डॉक VLCC वर ज्याम्म खार खाऊन आहेत असे दिसते ;)

सुबोध खरे's picture

4 Feb 2016 - 12:01 pm | सुबोध खरे

स्पा
VLCC काळं का गोरं पाहिलेलं नाही( त्याची गरजच पडलेली नाही). (आम्ही चौघं ११११ आहोत ०००० नाही)
परंतु त्यांच्या कडे जाऊन वजन कायमचं कमी झालेला एकही माणूस( किंवा बाई) मी आजतागायत पाहिलेली नाही. भुसा भरलेली बिस्किटं त्यांच्याच कडून विकत घ्यायची आणी खायची ती सुद्धा ४० रुपयाला १०० ग्रॅम. असे सगळे प्रकार आहेत. त्यांच्या जाहिरातीतच २३ पेक्षा कमी BMI वाले OVERWEIGHT म्हटलेले आहे. म्हणजे येणारा प्रत्येक माणूस OVERWEIGHT च असेल. तुझ्या माझ्या सारखी माणसं १ टक्का पण निघणार नाहीत. आहे कि नाही IDEA? http://www.vlccwellness.com/India/weight-management/bmi-calculator/
साडेपाच फुट उंच माणूस ६५ किलो च्या वर OVERWEIGHT
पाच फुट दोन इंच उंच बाई ५७ किलोच्या वर OVERWEIGHT
दुनिया झुकती ही "झुकाने वाला" चाहिये

स्पा's picture

4 Feb 2016 - 12:36 pm | स्पा

येप

सहमत

वेल्लाभट's picture

4 Feb 2016 - 12:59 pm | वेल्लाभट

हे डाएट आणि असल्या एक महिन्यात अमके किलोच्या जाहिरातींमागे धावणारे ______ लोक बघितले ना; की डिस्गस्टयुक्त हसू येतं चेहर्‍यावर ब्वा.

विलासराव's picture

4 Feb 2016 - 6:24 pm | विलासराव

मी ९१ वरुन ७० वर आलो नर्मदा परिक्रमेनन्तर. ही गोष्ट् जून २०१२ ची.त्यानंतर वजन ७६_७७ च्या पुढे एकदाही गेले नाही. नॉनव्हेज सोडून सर्व खातो.स्वीट खातो. सकाळी नाश्ता, दुपारी घरचे साधे जेवण (२ चपाती ,थोडा भात), पाचला केलाच तर हलकासा नाश्ता. रात्री काहीही नाही.
सकाळ संध्याकाळ १_१ तास ध्यान.

स्पा's picture

4 Feb 2016 - 7:03 pm | स्पा

या विलासराव :)

खटपट्या's picture

6 Feb 2016 - 1:13 am | खटपट्या

साहेब, हाटील कसे चालू आहे

स्थितप्रज्ञ's picture

20 May 2016 - 6:51 pm | स्थितप्रज्ञ

नर्मदा परिक्रमेवर एक धागा काढून तुमचे अनुभव शेयर करा...

आनंदयात्री's picture

4 Feb 2016 - 7:34 pm | आनंदयात्री

अतिशय महत्वपुर्ण विवेचन. चया पचयाचे गणित असे उलगडून सांगितलेत तर माझ्यासारख्या कितीतरी लोकांना त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने नेता येतील.

-(बालपणापासून वजन उतवण्याच्या प्रयत्नात)

आनंदयात्री

अव्यक्त's picture

5 Feb 2016 - 1:44 pm | अव्यक्त

पोटाचा घेर कमी कसा करता येईल ह्यावर सविस्तर माहिती देवू शकाल का डॉक्टर… आपली व्यक्तिगत भेट घेण्यासाठी आपला पत्ता मिळू शकेल काय? डायट schedule काय ठेवावा जेणेकरून फिट राहता येईल…माझा diet खालीलप्रमाणे आहे… सकाळी नाश्ता ३ चपात्या भाजी किवा केळ-दुध, दुपारी ३ चपात्या, वाटीभर भात (आधी जास्त भात खात होतो. आता आठवड्याभरापूर्वी भात कटाक्षाने कमी केला…वरण-भात माझा weekpoint आहे.), रात्री ४ चपाती भाजी… मध्ये काही नाही… दुपारची शिफ्ट असते…रात्री घरी यायला २ वाजतात… दिनक्रमात काय बदल घडवणे अपेक्षित आहे…सुज्ञ आणि तज्ञ यांचे मार्गदर्शन अपेक्षित…

रुस्तम's picture

5 Feb 2016 - 6:23 pm | रुस्तम

तुमच्या जेवणात प्रोटीन खूपच कमी आहे. कर्बोदके जास्त आहेत. (सकाळी नाश्ता ३ चपात्या + दुपारी ३ चपात्या, वाटीभर भात + रात्री ४ चपाती भाजी) आणि सलाड आणि फळे कुठेच नाहीत

हा सल्ला नाही फक्त माहिती

हा एक प्रवास पहा
http://www.maayboli.com/node/48355

पद्मावति's picture

5 Feb 2016 - 6:44 pm | पद्मावति

निलापि यांच्याशी सहमत.
सकाळी ब्रेकफास्टला प्रोटीन( उदा. अंडं- उकडलेलं, ओम्लेट) वर जोर दिला की दिवसभर कार्ब्स खूप कमी खाल्ले जातात. जेवतांना सुध्डा वरण, उसळ, भाजी आणि कोशिंबीरीवर भर. पोळीचं प्रमाण किंचीत कमीही चालेल, भात शक्यतो नकोच. पोर्शन कंट्रोल महत्वाचा. भात खूपच खावासा वाटल्यास तो ताटात घेऊन खाण्यापेक्षा वेगळा छोट्याशा वाटीत घेऊन खावा म्हणजे कमी प्रमाणात खाल्या जातो. तोही लंच मधेच खावा. रात्रीच्या जेवणात तर कर्बोदके अगदी कमी खावी.
सकाळचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या मधे खूप गॅप होते त्यामुळे मधे चार पाच ला चहा किंवा कॉफी बरोबर दाणे, फुटाणे बदाम असे पदार्थ. आहारात कार्बसची जागा प्रोटीन आणि calcium ने भरून काढावी. उदा. भाताच्या जागी एक वाटी दही. चहा किंवा कॉफी प्यायची असल्यास ती पूर्ण दुधाची.

बापरे!! अगोदरचा आणि नंतरचा फोटो एकाच व्यक्तीचा आहे, हे सांगितलं तरच कळेल!! भलतंच यश मिळवलं गड्यानं!!

लिंकबद्दल धन्यवाद!

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2016 - 3:42 pm | मराठी कथालेखक

व्हिस्की/स्कॉचचा वजनावर कसा परिणाम होतो ?
(माझा समज : कधीतरी म्हणजे महिन्यातून एखाद वेळेस वगैरे घेण्याने तात्पुरते वजन वाढते व नियमित अगदी रोज वगैरे घेणार्‍याचे मात्र वजन घटते. हे खरे का ?)

पद्मावति's picture

5 Feb 2016 - 4:24 pm | पद्मावति

माहितीपूर्ण लेखमाला.
एडीपोस्टेट विषयी पहिल्यांदाच ऐकतेय.

चित्रगुप्त's picture

5 Feb 2016 - 7:35 pm | चित्रगुप्त

अतिशय माहितीपूर्ण आणी उपयोगी लेखमाला.
मी मागे रसाहाराचा जो प्रयोग केला (तो लेख इथे आहे) त्यातून वजन ७५ वरून ७० वर आले, ते आजतागायत ७० च आहे (याचे कारण हा लेख वाचल्यावर कळले) आता दररोज एक-दोनदा ताजा भाज्या-फळांचा रस नेहमी घेत असतो, पोळी ऐवजी भाकरी खातो (दिवसातून एक-दीड). संध्याकाळचे जेवण ८ च्या आत घेतो. साधरणतः एक तास पायी चालतो आणि अन्य हलके व्यायाम करतो. मात्र पोटाचा घेर अजून कमी करून अगदी सपाट करायचे आहे, आणि पूर्वी सहज जमणारी अर्धमत्स्येंद्रासन, हलासन, पश्चिमोत्तानासन वगैरे आसने पुन्हा करता येऊ लागवीत ही इच्छा आहे. आता काही प्रश्नः
१. आपण गरजेपेक्षा जास्त जे जे खातो त्यातील सर्वच अन्नघटकांचे चरबीत रुपांतर होते, की काही विशिष्ट पदार्थांचेच होते ? कोणत्या?
२. शरीरातल्या अन्नाच्या दीर्घ प्रवासात ' चरबी ' नेमक्या कोणत्या जागी बनते ? ती पोटावर जास्त प्रमाणात का साठते ?
३. 'सेल्युलाईट' हा नेमका प्रकार काय असतो? त्याची कारणे, आणि परिणाम काय असतात? हे हानीकारक असते का?

. सेल्युलाईट
४. 'सूज' कश्यामुळे येते ? त्यात कोणते द्रव्य असते ? सूज हानिकारक असते की उपयोगी?
५. आयुर्वेदात ज्याला 'आम' (आव ?) म्हणतात, ते काय असते ? कसे निर्माण होते? त्याचा शरिराला काय उपयोग असतो ? ती एक व्याधी आहे का?
६. चरबी 'जळते' म्हणजे नेमके काय होते ?
७. जास्तीचे अन्न शोषून घेतले न जाता विष्ठेवाटे बाहेर टाकले जात आहे, हे (घरच्याघरी) कसे ओळखायचे ?
८. कोलेस्टरॉल जास्त असेल त्यांनी तूप खाऊ नये असे सांगितले जाते, त्यात तथ्य आहे का?

हायवे, रंग रसिया, किक, जिस्म-२ अशा अनेक चित्रपटात दमदार कामगिरी करणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने अवघ्या २८ दिवसांत १८ किलो वजन कमी केले आहे. 

पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात येत असून या चित्रपटात सरबजित सिंगची भूमिका रणदीप हुड्डा साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत असून त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये सरबजितला चार बाय चारच्या खोलीत कैद करण्यात आले होते, त्यावेळी त्याठिकाणी त्याला उंदरांचा चावा सहन करावा लागत होता. यात त्यांची तब्येत खूप ढासाऴली होती. तसे आम्हाला शूट करायचे होते. मी रणदीपला भेटलो, त्यावेळी त्याला म्हणलो मला तुझ्या शरिरातील हाडांचे शूट करायचे आहे. त्यावर तो म्हणाला चल लेंगे, यावर माझ्यासहीत सगऴ्यांना धक्का बसला. त्यानंतर त्याने काही दिवस जेवण कमी केले आणि फक्त पाणी आणि कॉफीवर राहिला. आम्ही पालघरला शूट करत होते, त्यावेळी तो फक्त फळे खात असल्याचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सांगितले.  

पोटाचा घेर कमी कसा करता येईल ह्यावर सविस्तर माहिती देवू शकाल का डॉक्टर… आपली व्यक्तिगत भेट घेण्यासाठी आपला पत्ता मिळू शकेल काय? डायट schedule काय ठेवावा जेणेकरून फिट राहता येईल…माझा diet खालीलप्रमाणे आहे… सकाळी नाश्ता ३ चपात्या भाजी किवा केळ-दुध, दुपारी ३ चपात्या, वाटीभर भात (आधी जास्त भात खात होतो. आता आठवड्याभरापूर्वी भात कटाक्षाने कमी केला…वरण-भात माझा weekpoint आहे.), रात्री ४ चपाती भाजी… मध्ये काही नाही… दुपारची शिफ्ट असते…रात्री घरी यायला २ वाजतात… दिनक्रमात काय बदल घडवणे अपेक्षित आहे…सुज्ञ आणि तज्ञ यांचे मार्गदर्शन अपेक्षित…

पाषाणभेद's picture

7 Feb 2016 - 12:29 pm | पाषाणभेद

सहमत. हा लेख जास्तच तांत्रीक झालाय. कृपया आमच्यासारख्या सऊदरांना काही सोप्या भाषेत मार्गदर्शन करा.

Ranapratap's picture

15 Mar 2016 - 7:19 pm | Ranapratap

Dear sir,
2 month ago I was read a book effortless weightloss written by Dr. Jaganath dixit & Late Dr. Shrikant jichakar. In his book he state that u take your lunch & dinner in specified time. He mean if u take ur lunch at 9 AM then take your dinner at 9 PM. nothing to be eat during this two meals. he said hunger is psycological. If you hungry between two meals u can take buttermilk or orange juice without sugar. also he write u have to finish ur eating in 55 minuts. he advice protine food like chiken, mutton, fish, eags & soyabin. he also writes that if u eat no of time in a day more insulin creat by our body and this insulin causes increas in weight. To follow this he gave two conditions ur age is more than 25 & u r not suffer from diabetes. I am following this from last two months & I loss my weight 4 kg. He also advice that check ur fasting insulin & HB1C.
Pleas give ur opinion

स्थितप्रज्ञ's picture

20 May 2016 - 2:53 pm | स्थितप्रज्ञ

खूपच माहितीपूर्ण लेख लिहीलायात. विशेषतः ADIPOSTAT का काय ते माहीतच नव्हत. बारा झाल सांगितलात ते.
लेख माला अशीच चालू राहूद्या...मज येतेय वाचायला (आणि समजून पण घायला :x )