सेकंड लाईफ - भाग ६

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
15 Sep 2016 - 8:01 pm

पुर्वीचे भाग :
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
सेकंड लाईफ - भाग ५
-----------------------------------------------------------------------------------

सोमवारी सकाळी वडगांवहुन निघालो तो थेट ऑफीसला गेलो. पोहोचता पोहोचता दुपार झाली होती. जवळची बॅग गेटवर वॉचमेनकडे ठेऊन आवश्यक ते साहित्य घेऊन ऑफीसमधे पोहोचलो. नेहमीप्रमाणे सोमवारचा दिवस असल्यामुळे आयटीवाल्यांची सुगी चालू होती. घेशील किती दोन कराने अशा अवस्थेत असल्यामुळे कोणाचही लक्ष काम सोडून दुसरीकडे असणं कठीणचं होतं. बॅग जागेवर ठेवतो न ठेवतो तोच विरेंद्र एक कॉल संपवून आला. जेवणाची वेळ टळून गेलेली असल्यामुळे तो वैतागला होता. आता कॅन्टीनमधे काही मिळणं कठीण होतं त्यामुळे सरळ यादव च्या टपरीवर जायचं ठरलं. तिथं जाऊन मी दोन चणे शेंगदाण्याची पाकीटं आणी एक थम्स अप घेतले. विरेंद्र ने दोन भजी पाव, एक थम्स अप घेतली आणी म्हणाला, "काय रे ! तु घेत तर नाही मग चकणा कसा काय खातोस ?" मी म्हटले बाबा, लहानपणापासूनची सवय आहे ही. चणेशेंगदाणेच खायला परवडायचे तेव्हा. त्यामुळे सवय लागून गेली. आता हे कोल्ड्रींक्सची सवय सोडायची आहे. पण भुक मारायला बरे पडते. नाहीतर मी जास्तकरुन दुध नाहितर लस्सीच पितो".
विरेंद्र हसला आणि म्हणाला, "गाढवा, लग्न झालं ना ? आता दुध पिणारी पोरं येऊदे घरात. किती दिवस दुध एकटाच दुध पिणार ?"

नाश्ता करुन परत डेस्कवर आलो. सिस्टीममधे उरलेले कॉल्स बघीतले आणि अटेंड करायला पळालो. आज पंकज सरांचा कॉल माझ्या वाट्याला आला होता. लॅपटॉप हँग होत होता. बरेच प्रयत्न केले शेवटी फॉरमॅट करण्याचा निर्णय घेतला. फॉरमॅट मारणे हा हार्डवेअरवाल्यांचा आवडता छंद आहे. काहीही प्रॉब्लेम झाला की मार फॉरमॅट ! कधी कधी समोरचा युजरच आम्हाला फोन केल्यावर म्हणायचा अरे जरा येऊन जा ना, मशीन फॉरमॅट मारायची आहे. पण मी मात्र याला अपवाद होतो. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करतो. नाहीच झालं तर मग फॉरमॅट आहेच की. पण यात जाम वेळ जातो. समोरच्याला घाई असेल तर तो वैतागून जातो.

मात्र हे सगळे शिकता शिकता बर्‍याच युक्त्या गवसल्या त्यामुळे बर्‍याच वेळा माझे काम सोपे आणि जलद होते. मात्र आज पंकज सरांचा मुड ठिकठाक दिसत होता. त्यामुळे त्यांनी लॅपटॉप माझ्या हाती सोपवून ते गप्पा मारायला निघून गेले. फॉरमॅटींग म्हणजे २-३ तासांची निवांत सुट्टी. बर्‍याच वेळा मी हा फॉरमॅटींगचा वेळ पुस्तके वाचण्यात घालवतो मात्र आज पुस्तक देखील नव्हते आणि सेकंड लाईफच्या पुढच्या योजना डोक्यात घोळत असल्यामुळे वाचनाचा मुड देखील नव्हता. संध्याकाळी ऑफीसमधे उशीरापर्यंत थांबून नव्या जन्माची कागदपत्रे तयार करण्याचा विचार डोक्यात घोळत होता. त्यादृष्टीने विचार करत होतो. साधारण ५.३०-६.०० वाजता फॉरमॅटींग आणि सॉफ्टवेअर टाकून, इमेल, प्रिंटर वगैरे कॉन्फीगर करुन सरांचा लॅपटॉप वापरण्यासाठी तयार झाला. नव्या दमाचा लॅपटॉप पाहून सर खुश झाले. कॅन्टीनमधे फोन करुन चहा आणि बिस्कीटे मागविली. साहेब लोकांचा आणि आमचा चहा एकच असे पण, साहेबांच्या केबीनमधे एसीमधे बसून च्या मारी खाण्यातला आनंद काही वेगळाच होता. असे साहेब लोकांबरोबर चहा पिऊन पिऊन कॅन्टीनच्या लोकांबरोबर पण चांगली जानपहचान झाली होती. शिवाय कॅन्टीनच्याच एका कर्मचार्‍याच्या मुलाला ज्युनियर ट्रेनी म्हणून चिकटवून दिल्यामुळे तो एक प्लस पॉईंट होता. वेळीअवेळी चहा मागीतला तरी मला नकार मिळत नसे. कधी कधी तर गपचुप बोलावून बळे बळेच चहा, बिस्कीटे देत. अशा वेळी मला कानकोंडे व्हायचे. आपण आपल्या अधिकाराव्यतीरीक्त जास्त घेतोय असे वाटायचे. पण चालायचेच. प्रेमाचा अधिकार काही वेगळाच असतो. मी प्रथम पासून शिपाई असो की साहेब, प्रत्येकाला आदरानेच बोलायचो. म्हणजे साहेबाला सर म्हणणे ही मजबूरी असतेच पण शिपायाला साहेब / मालिक म्हणणे हा दिलदार पणाच आहे. यात थोडा स्वतःची लाल करण्याचा भाग आहे पण आहे ते आहे बुवा ! असो.

तर काम संपवून परत डेस्कवर आलो. पंकज सरांचा कॉल मी अटेंड केला मात्र माझ्या बाकी सगळ्या सवंगड्यांची दिवसभर उदास झाली असल्यामुळे आज सगळेच ६ च्या ठोक्याला घरी पळाले होते. थोडा वेळ शांत बसलो, मग कागदपत्र बनवायला घेतली. सर्वप्रथम दहावी ची मार्कशीट बनवायला घेतली. माझीच मार्कशीट स्कॅन केलेली होती. मी अ‍ॅल्डस पेजमेकर ५.० आणि कोरलड्रॉमधे ६.० बर्‍यापैकी तरबेज होतो पण फोटोशॉप मधे यथातथाच होतो त्यामुळे या कामाला जरा वेळच लागणार होता. तेव्हा जमाना नुकताच डिजीटल होत होता आणि त्यामुळे बहुतांशी सरकारी कागदपत्रे, सर्टिफिकेटवर हमखास कुरीयर फाँट वापरुन छापलेलं असायचं. त्यामुळे कोणताही कागदपत्रे बनवायची तर एकतर कुरीयर, एरिअल आणि टाईम्स न्यु रोमन एवढ्या तीन फाँटस चे वेरीयेशन्स आणि साईज ओळखता आली की तेवढ पुरेसं होतं. तर तास दिड तास खपून मार्कशीट एडीट केली. मनासारखी जमल्यावर ती इमेज प्रिंट करायची पण फोटोशॉप केवळ जरुरीपुरतं वापरता येत असल्यामुळे इमेजची साईज मुळ कागदपत्राबरहुकुम येईलच याची खात्री वाटेना. शेवटी पेजमेकर मधे इमेज इंपोर्ट केली पण तरीही काम मनासारखं दिसेना. त्यामुळे मग कोरलचा सहारा घ्यायचं ठरवलं. कोरल ६.० वापरत होतो पण ऑफीसच्या पीसीमधे नुकतेच कोरल ८.० इन्स्टॉल केलेले असल्यामुळे पुन्हा मनासारखे काम करायला वेळ लागला.
आमच्या ऑफीसमधे डिझायनींग सॉफ्टवेअर्स वापरले जात नाहित. पण मीच वेगवेगळी सॉफ्टवेअर्स इथून तिथून गोळा करुन त्यावर आर अँड डी करत असतो. अर्थात आर अँड डी हे फार मोठं बिरुद झालं. प्रत्यक्षात ते किडेच असतात.

आता काम मनासारखे झालेले दिसत होते पण स्क्रीनवरचे काम आणि प्रत्यक्षात कागदावरचे प्रिंट यात कधी कधी अमिताभ बच्चन आणि त्याचा डमी इतका फरक येऊ शकतो. अर्थात हा फरक नवख्या माणसाला लगेच कळत नाही मात्र जाणकाराने नीट लक्ष दिले तर ओळखू शकतोच. त्यामुळे फ्लोअरवरच्या ब्लॅक अँड व्हाईट वर प्रिंट मारुन बघीतली. काम बरेचसं मनासारखं झालं होतं पण कलर प्रिंट मारल्याशिवाय फायनल रिझल्ट कळणार नव्हते. शाळेचा स्टँप नसता तर ब्लॅक अँड व्हाईट वर काम चालून जाणार होतं.
कलर प्रिंटर आख्या कंपनीत केवळ २-३ मोठ्या साहेबांच्या केबीनमधे होते आणि त्याला सर्वसामान्यांना अ‍ॅक्सेस नव्हता. अगदी दागिन्यांची काळजी घेतली जाते तशी कलर प्रिंटरची काळजी / सुरक्षा होती. मात्र हार्डवेअर वाले म्हणून आम्हाला बर्‍यापैकी मुभा होती. आता उद्या कुणाचा प्रिंटर उद्या बंड पाडता येईल याचा विचार रात्री झोपतांना करु असे म्हणून सगळे काम आवरुन, फाईल माझ्या पर्सनल फोल्डरमधे सेव्ह केली. फोल्डरचा पासवर्ड पुन्हा एकदा बदलला आणि मग घरी गेलो.

घरी गेलो तो तृप्ती माहेराहून परत आलेलीच होती. जेवण करुन तिच्याबरोबर थोड्याफार गप्पा मारुन झोपायला गेलो. अर्थात प्रिंटरचा विचार चालूच होता. बराच विचार केला पण काय करावे ते सुचेना . मग शेवटी कंटाळून झोपी गेलो.

kathaaविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

18 Sep 2016 - 5:37 pm | जव्हेरगंज

आज सगळे भाग वाचून काढले!

कथानक अतिशय जबरदस्त पद्धतिनं रंगलंय!!

वाचकांची ऊत्सुकता ताणून धरण्यात तुम्ही यशस्वी ठरलाय!!

जरा पटापटा येऊंद्या म्होरचे भाग!!!

२०१३ पासूनची स्टोरी म्हणजे....... ह्य ह्य ह्य. . .

स्मिता चौगुले's picture

21 Sep 2016 - 4:09 pm | स्मिता चौगुले

पुढचा भाग कधी ?

राजाभाउ's picture

23 Sep 2016 - 1:55 pm | राजाभाउ

२०१३ ला सुरु केलेली ष्टोरी अजुन लाउन धरल्या बद्दल तुमच्या चिकाटीला सलाम !!!
पण आता फुडचे भाग पटापट टाका, ऊत्सुकता जास्त ताणू नाका हो.