सेकंड लाईफ - भाग ४

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
13 Aug 2016 - 7:37 pm

पुर्वीचे भाग :

सेकंड लाईफ

सेकंड लाईफ - भाग २

सेकंड लाईफ - भाग ३

--------------------------------------------------------------------

देहाने मुंबईला आलो होतो मात्र मन वडगावमधेच होतं. पुढच्या शनिवार चे वेध लागले होते.
माझं असचं आहे. अगदी त्या 'हा छंद जीवाला लावी पिसे' गाण्यासारखे. एख्याद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर मला रात्रंदिन तेच आठवत राहते. अगदी स्वप्नदेखील त्याच गोष्टीची पडतात. पण मला जपायला हवे होते. ऑफीसमधे तर कोणाच्या लक्षात येणार नव्हते. कारण ज्याला त्याला आपापली पडलेली होती. त्यातच सोमवार असल्याने दोन दिवस सुट्टीवरुन आलेल्या स्टाफची त्यांच्या त्यांच्या बॉसने हजेरी घेतलेली होती. त्यामुळे जो तो वैतागलेला होताच. शिवाय शुक्रवारी काम अर्धवट ठेऊन वीकेंड साजरा करायला गेल्यामुळे आमच्या टीमचेही बरेच कॉल्स पेंडींग होते. त्यामुळे आमची सकाळपासून लागलेलीच होती. त्यामुळे माझे हरवलेपण बघायला ऑफीसमधे कोणाकडे वेळ आणि उत्साह नव्हता. मात्र हरवलेपणा मुळे मला कामात काही व्यत्यय नव्हता. यांत्रिक काम यांत्रिक पद्धतीनेच चालले होते.
खरा प्रश्न होता तो रात्रीचा ! तेव्हा तृप्ती जवळ असणार होती आणि तिच्यापासून काही लपविणे म्हणजे मरणाचे अवघड काम होते. शिवाय अंथरुणावर पडल्यापासून ते झोपी जाणे या दरम्यानचा कालावधी मोठा अवघड असणार होता. या वेळातच शहरातले नवरा बायको एकमेकाला निवांत वेळ देऊ शकतात. त्यामुळे दिवसभराच्या घडामोडींचा आढावा घेण्याचे बेडरुम हे एक महत्त्वाचे स्थळ आहे असे म्हटले तर तर वावगे ठरु नये. माझ्या सुदैवाने तृप्ती देखील आज फार थकलेली असल्यामुळे ती लवकरच झोपून गेली. मी मात्र टक्क जागाच होतो. आता शनिवार रविवार कसे वागायचे, काय करायचे, कसल्या कसल्या चाली खेळायच्या याचाच विचार करत होतो. मात्र एकेक चाल रचताना समोरच्याची काय प्रतिक्रिया असेल ? आपली चोरी पकडली जाईल काय याचा देखील विचार करावा लागायचा आणि विचारांती एक एक चाल अर्ध्यावरच सोडून द्यावी लागायची. शेवटी पहाटे चार पर्यंत काहीच नीट न सुचल्याने शेवटी बळे बळे झोपी गेलो.
सकाळी उठलो तर झोपेअभावी चेहेरा कोमेजलेला. तृप्ती खोदून खोदून विचारले मात्र मी काही कळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 'अगं ऑफीसात एक सर्वरचा प्रॉब्लेम काही केल्या सॉल्व होत नाहिये त्याच विचाराने झोप नाही आली रात्रभर !" अशी थाप मारली पण तिला ती तितकीशी रुचली नाहि. मात्र सकाळची वेळ म्हणजे नोकरीवर जाणार्‍यांसाठी युद्धावर जाण्याची वेळ ! त्यामुळे प्रश्नाला अजुन जास्त फाटे फुटले नाही. मात्र होम डिपार्टमेंटकडून रात्री याची नक्कीच चौकशी होणार याची देखील अगदी खात्री होती.

ऑफीसात गेल्यावर आज जरा सहकारी निवांत असल्यामुळे एकमेकाची विचारपुस करत होते. त्यातच विरेंद्र भेटला. माझा सुजलेला चेहेरा पाहून हसत म्हणाला, "काय रे ? झोपला नाहीस काय रात्री ? डबलशिफट करु नकोस जास्त. नंतर ऑफीस आणि घरी दोन्हीकडे स्टॅमिना कमी पडेल". मी क्षणभर गांगरलो. पण मग लगेच खुशीत आलो. चला यानेच आपल्याला एक कारण सुचविले. आता अजुन काही गोष्ट बनवून सांगायला नको. हसत त्याच्या पाठीवर थाप मारुन आम्ही कॅन्टीनकडे कॉफी प्यायला गेलो. कॉफी पिता पिताच अकाऊंटसच्या चीफचा निरोप आला की मेल चालत नाहीये. मग माझा विषय आणि कॉफी संपवून मी लगेच कॉल अटेंड करायला निघून गेलो.

रात्री घरी आलो तो तृप्ती चा मावस भाऊ घरी आलेला. त्याची उद्या कोठेतरी मुलाखत होती आणि मुंबईत जवळचे कोण तर आम्ही म्हणून मग रात्रीपुरता आमच्याकडे उतरला होता. गप्पा टप्पा होता होता बरीच रात्र झाली. अर्थात बायकोच्या माहेरच्या गप्पा म्हणजे नवर्‍याकडे केवळ श्रोत्याची भुमिकाच असते आणि मी ती आनंदाने पार पाडली. मधून मधून आपले 'हां', 'हुं', 'अच्च्छा', 'काय सांगतोस ?' 'बापरे' एवढे छोटे छोटे शब्द वापरले की आपल्या अ‍ॅक्टीव हजेरीची नोंद होते.
शेवटी 'उठ बाबा ! तुला उद्या मुलाखतीला जायचे आहे, फ्रेश दिसणे आवश्यक आहे' असे म्हणून त्याला झोपायला पाठविले. एकंदरीत आजची रात्र चांगली आहे असे बघून तृप्तीकडे विषय काढला. "अगं ऐक ना, मी मागच्या शनिवार-रविवारी जिकडे गेलो होतो ना तिकडे परत जावे लागणार आहे ह्या वीकेंडला. शिवाय सोमवार देखील तिकडेच काढावा लागेल". हे ऐकताच तृप्ती नाराज झाली. मग तीची समजुत काढण्यासाठी तिला मिठित घेतले. "तुला जर हवे असेल तर तुझा भावाबरोबर ३-४ दिवस गावी जाऊन ये. मी आई बाबांशी बोलतो हवे तर. माहेरचे नाव काढताच कळी खुलली.

आजची सकाळ प्रसन्न होती. आज आवडीच्या पोह्यांचा नाष्टा करुन मी व मावस मेव्हणा (राजू) बरोबरच बाहेर पडलो. त्याला योग्य त्या ठिकाणी पोहोचवून मी पुढे ऑफीसला गेलो. आज ऑफीसमधे जास्त काम नसल्यामुळे दिवसभर टाईमपास केला. संध्याकाळी लवकरच घरी जायला निघालो. जाता जाता आठवणीने मोगर्‍याचा गजरा घेतला. संध्याकाळी आई बाबांना पटवून तृप्ती ला गावी पाठवण्याची तयारी केली. आज लवकर जेवण केले. राजूची मुलाखत देखील चांगली झाल्यामुळे तो देखील खुशीत होता. मात्र त्याला उद्या दुसर्‍या राऊंडला बोलावले असल्यामुळे त्याचा मुक्काम अजून एक दिवस वाढला होता.

शेवटी गुरुवारी रात्री तृप्ती व राजूला रातराणीमधे बसवून दिले आणि मग घरी आलो. आई बाबा झोपी गेले होते. आता रात्र माझीच होती. रात्रभर विचार करुन शेवटी एक प्लान फायनल केला. आता अजून एक रात्र हाताशी होती. प्लॉन वर शेवटचा हात फिरविण्यासाठी.

शुक्रवारी ऑफीसात पाट्या टाकून रात्री लवकर घरी आलो. जेवण करुन प्लान मधले बारकावे पुन्हा एकदा तपासले आणि झोपण्याचा प्रयत्न करु लागलो पण झोप येईना. प्लान बनविणे व तो अंमलात आणणे यात आता काही तासांचेच अंतर होते.

आता उद्या सकाळी परत वडगावं !

कथा

प्रतिक्रिया

nanaba's picture

16 Aug 2016 - 2:34 pm | nanaba

interesting...