बौद्धधर्मप्रसारक... भाग-४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Sep 2016 - 8:46 am

‘‘ फो ’’

बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१
बौद्धधर्मप्रसारक... भाग-२
बौद्धधर्मप्रसारक... भाग-३

काश्मिरमधून या काळात जे काही पंडीत चीनमधे गेले त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१ बुद्धयास २ धर्मयास ३ धर्मक्षेम ४ बुद्धाजिवा आणि ५ धर्ममित्र.

बुद्धयासाने आकाशगर्भबोधिसत्व, दीर्घ आगाम व धर्मगुप्त विनयाचे सूत्राचे भाषांतर केले. ज्या चिनी इतिहासात या सर्व बौद्ध पंडितांचा उल्लेख किंवा व्यवस्थित नोंद केलेली आढळते. याचे नाव फो-थो-ये-शो असे आहे.

याच्या मागोमाग काश्मिरमधून आला पंडित धर्मयास. साधारणत: ४०७ साली. याने आठ वर्षात सव्याकरण सूत्र व सारिपुत्ताअभिमधर्म सूत्रांचे भाषांतर केले. ही सगळी त्रिपिटकात सामावलेली आहेत.

४१४ साली धर्मक्षेमाने चीनमधे पाऊल ठेवले. जरी तो काश्मिरातील पंडितांबरोबर चीनमधे आला असला तरी तो कश्मिरी नव्हता. तो होता मध्य भारतातील. चीनी सम्राटाने (सम्राट त्सू-खू-मान-सून्, उत्तर लिॲन घराणे) याला बौद्ध ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी खास आमंत्रण दिले होते म्हणजे हा किती ज्ञानी असेल याची कल्पना येते. त्यानेही भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. थोड्याच काळात त्याची किर्ती दूरवर पसरली आणि त्याला वी घराण्याच्या राजाकडून बोलाविणे आले. त्याने त्याला बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिले. पहिल्या राजानी परवानगी नाकारल्यावर या दोन सम्राटांमधे जी हाणामारी झाली त्यात बिचाऱ्या धर्मक्षेमास आपले प्राण गमवावे लागले. तो वीच्या राज्यात जात असताना त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले व त्याला ठार मारले गेले. त्याने भाषांतर केलेल्या अनेक ग्रंथांपैकी बारा शिल्लक आहेत. त्यातील काही महत्वाचे असे –
१ महविपूल सूत्र २ महाविपूलमहासानिपत्त सूत्र ३ महापरिनिर्वाण सूत्र

काश्मिरमधून अजुन एक पंडीत आला ज्याचे नाव होते बुद्धजिवा. हा साधारणत: ४२३ साली आला असावा. त्यानेही दोन महत्चाचे ग्रंथ चीनी भाषेत आणले ते म्हणजे महाशासक विनय आणि प्रतिमोक्ष महिशासक.

यानंतर या काळात काश्मिरमधून आलेला शेवटचा पंडीत होता धर्ममित्र. हा आला साधारणत: त्याच काळामधे. त्याने ४२३ ते ४४१ या काळात बरेच काम केले त्यातील महत्वाचे होते आकाशगर्भबोधीसत्वधारिणी सूत्र. हा वयाच्या ८२व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला.

आता आपण एका महत्वाच्या व लोकप्रिय पंडीताकडे वळूया.

काश्मिर ज्याला त्या काळात चिनी भाषेत कि-पिन असे नाव होते ( आत्ता आहे का हे माहीत नाही ) त्याने एक अत्यंत अनुभवी धर्मप्रसारक चीनमधे पाठविला. तो म्हणजे गुणवर्मन. हा धर्मप्रसाराच्या कामात अत्यंत वाकबगार होता. असे म्हणतात त्याने चीनला जाण्याआधी आख्खी जावा बेटे बौद्ध केली होती. जावा बेटात त्याने शुन्यापासून सुरुवात केली होती त्यामानाने चीनमधील काम सोपे होते. चीनमधील धर्मप्रसाराचे काम तसे सुरळीत चालले होते फक्त मधून मधून ताओ व कनफुशियसचा अनुयायी असणारा एखादा राजा गादीवर आला की बौद्धांवर अत्याचार व्हायचे. पण त्याच काळात बौद्धांची संख्या वाढली होती हेही नाकारता येत नाही. या कामास बुद्धाच्या भूमीवरुन सतत मदत मिळत होती हेही खर्ं. अशा काळात गुणवर्मनसारखा पंडीत चीन येथे आल्यावर बौद्धधर्मप्रसारकांची ताकद अजुन वाढली.

हा स्वत: काश्मिरच्या राजघराण्यातील होता. (काही जणांचे म्हणणे तो गांधारातील होता असेही आहे) दुर्दैवाने जरी यांचे घराणे काश्मिरवर अनेक वर्षे राज्य करीत असले तरी याचा जन्म झाल तेव्हा याच्या आजोबांना (हरिभद्र) त्यांच्या उपद्रवी मुल्यांमुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याकाळात राजेशाही असली तरी कशा प्रकारची होती हे या उदाहरणावरुन समजून यावे. प्रत्यक्ष राजाला हद्दपार करण्याची क्षमता त्या काळात मंत्रीगण व जनता बाळगून होते. मला वाटते पाचशे राजकर्त्यांना हाकलून देण्यापेक्षा हे सोपे असावे. त्यामुळे याचा जन्म जंगलातच झाला. गुणवर्मनाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला एक कोंबडा मारायला सांगितला. त्याने हे धम्माविरुद्ध आहे हे सांगितल्यावर साहजिकच त्याच्या आईला राग आला. ती म्हणाली,

‘‘ तू मार त्याला. जे काही पाप लागेल ते मी माझ्या शिरावर घेते. व त्यासाठी काही शिक्षा असेल तर तीही मी भोगेन.’’ दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर असेल, गुणवर्मनाचे बोट दिव्यावर भाजले. त्याने आईकडे धाव घेतली.

‘‘ माझ्या हाताची आगाआग होती आहे. या वेदना जरा तू घेतेस का ?’’

‘‘अरे हे तुझे शारीरिक दुखणे आहे. ते मी कसे घेऊ शकेन ?’’
हे ऐकल्यावर गुणवर्मनाने तिला तिच्या बोलण्याची आठवण करुन दिली.

असे म्हणतात जेव्हा गुणवर्मन १८ वर्षाचा झाला तेव्हा कोणीतरी भविष्यवाणी केली की तो लवकरच राजाधिपती होईल. नंतर दक्षिणेकडे जाईल व एक सन्यासी होईल. आणि खरोखरच ही भविष्यवाणी खरी ठरली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व तो श्रमण झाला. विसाव्या वर्षी त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला. लोक त्याल त्रिपिटकावरील अधिकारी पुरुष मानू लागले. तो तीस वर्षांचा असताना काश्मिरच्या राजाचा मृत्यु झाला. त्याच्या मंत्रीमंडळाने गुणवर्मन हा राजघराण्यातीलच असल्यामुळे त्यालाच राज्याभिषेक करायचे ठरविले. अर्थातच गुणवर्मनाने त्या मागणीला नम्रतापूर्वक नकार दिला व काश्मिर सोडले. तेथून तो श्रीलंकेला गेला. तेथे धम्माच्या कामाला त्याने वाहून घेतले व जावा बेटांवर पोहोचला. त्या काळात चीनी भाषेत जावा बेटांना चो-पो असे म्हणत. फा-ईनने थोडे आधी या बेटाना भेट दिली होती. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे की या बेटांवर हिंदू धर्माची पताका फडकत होती. गुणवर्मनाने मोठ्या कल्पकतेने व कष्टाने बौद्ध धर्माचा प्रचार केला व हिंदू धर्माचे प्राबल्य जवळजवळ नष्ट केले. जावामधे कलिंगाच्या राजांनी राज्यविस्तार केला होता. ( जावाच्या एका लोककथेत गुजराथमधील एका राजाने येथे सत्ता प्रस्थापित केली असाही उल्लेख आहे. ७५ साली. जेव्हा जावाबेटांवर न्यायपाल किंवा नायपाल नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा तेथे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते ज्याचे वर्णन अनेक चीनी बौद्ध धर्मगुरुंनी केले आहे. ते होते सुवर्णद्विप नावाच्या बेटावर. नालंदा विद्यापिठात प्रवेश करण्याआधी या संस्थेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागत असे. हे बहुदा गुणवर्मनने स्थापन केले असावे. खात्री नाही...)

गुणवर्मन येण्याआधी म्हणे जावाच्या राजाच्या आईला स्वप्न पडले होते की कोणी थोर महंत उद्या जावाच्या किनाऱ्यावर लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुणवर्मनची बोट तेथे लागली. तिच्या आग्रहाखातर राजा गुणवर्मनच्या स्वागतासाठी किबाऱ्यावर गेला आणि तिच्याच आग्रहाखातर त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. त्याने राजाज्ञा केली की
१ बौद्ध महंताचा अनादर कोणी करु नये.
२ कुठल्याही प्राण्याची हिंसा करु नये.
३ गरिबांना दानधर्म करावा.

यानंतर काहीच काळानंतर सारे जावा बौद्धधर्मीय झाले. जावामधील या यशानंतर गुणवर्मनाची किर्ती बौद्धजगतात पसरली. अर्थात चीनी श्रमणांच्या कानावर त्याची किर्ती पडली असणारच. ४२४ साली चीनी बौद्धजन आणि महंत वेन सम्राटाकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली की त्यांनी गुणवर्मनाला साँग प्रदेशात बौद्धधर्माच्या प्रसारासाठी बोलावून घ्यावे. त्याने त्याच्या त्या प्रदेशातील सरदारांना तशी आज्ञा केली. गुणवर्मन कसा नानकिंगला पोहोचला याची माहीती चीनी ग्रंथातून दिली गेली आहे. तो हिंदू-नंदी नावाच्या जहाजातून चीनच्या दिशेने रवाना झाला. त्याचे जहाज भरकटून दुसरीकडेच कुठेतरी लागले असे म्हणतात. आता ही व यासारखी सविस्तर माहिती चीनमधील कुठल्या ग्रंथातून मिळते हे पहाणे वावगे ठरणार नाही. खाली त्या ग्रंथांची नावे व काळ दिला आहे.

१ चू सानत्संग ची ची : लेखक : सेंग् यू, काळ : ५१५
२ शेन सेंग चुआन : लेखक : अज्ञात, काळ : १४१७
३ फा युआन चू लिन: लेखक : ताऊ शिह, काळ: ६६८
४ कू यिन ई चिंग तूची: लेखक: शिंग माई, काळ: ६६४
५ काय युआन चे चियाओ लू : लेखक : त्शे चिंग, काळ: ७३० ( याच काळात अनेक भाषांतरे नष्ट झाली आहेत.
६ चेंग युआन सिन तिंग चे चियाओ मूलू : लेखक: युआन चाओ, काळ: ७००
७ लि ताय सानपाओची : लेखक: फेईचँगफँग, काळ: ५९७
८ ता टँग नी तिएन लू : लेखक : ताऊ हुआन, काळ‘ ७००
९ फॅन-ई-मिंग-ई-ची : लेखक : फायुन, काळ : १२००
१० फुत्झूतुंग ची : लेखक : ची, पान काळ: १३००
११ चिशेन चाऊ सानपाओ कान तुंग लू : लेखक अज्ञात, काळ : १३००

म्हणजे चीनी दरबारातून या सर्व बौद्ध महंतांची चरित्रे लिहून ठेवण्यात आली. आहेत. मला वाटते आपल्याकडे ही लिहिलेली असावीत व बरिचशी नालंदाला लावलेल्या आगीत नष्ट झाली असवीत. अर्थात सगळ्यात जुने जे पुस्तक आहे त्यातीलच बरीचशी माहिती नंतरच्या पुस्तकात आढळते. असो.

चीनी सम्राटाला गुणवर्मन चीनच्या किनाऱ्याला लागल्याची खबर मिळताच त्याने त्याच्या सरदारांना त्याला कसलाही त्रस होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली व त्याला त्वरित राजधानीस पाठविण्यास सांगितले. त्याचा हा रस्ता चे-हिंग नावाच्या राज्यातून जात होता. येथे गुणवर्मन एक वर्षभर राहिला. या प्रदेशाचा राजा/सरदार मरायला टेकला होता. गुणवर्मनाने त्याला धम्म सांगून त्याचे चित्त थाऱ्यावर आणले असे म्हणतात.

सम्राट गुणवर्मनला भेटण्यास अतिशय आतुर झाल्यामुळे त्याने त्याला ताबडतोब नानकिंगला येण्याची विनंती केली. ४३१ मधे (महिना माहीत नाही) गुणवर्मन नानजिंगला पोहोचला. वेन घराण्याच्या सम्राटाने स्वत: पुढे जाऊन त्याचे स्वागत केले. भेटल्यावर सम्राटाने त्याला काही प्रश्र्न विचारले. त्यातील एक असा होता,

‘‘ बुद्धाच्या शिकवणीनुसार मी अहिंसेचे पालन करतो पण काही वेळा मला त्याचे पालन करता येत नाही. अशा वेळी काय करावे हे मला कळत नाही. कुपया याबाबत मार्गदर्शन करावे.’’

त्याने त्याचे काय प्रबोधन केले ते मला माहीत नाही परंतू राजाचे समाधान झाले असावे कारण लगेचच गुणवर्मन यांची राहण्याची सोय जेतवन विहारात केली. या येथे राहून गुणवर्मन यांनी लगेचच बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. प्रथम त्यांनी विहारामधे सद्धर्म पुंडरिक सूत्र व दक्षाभूमी सूत्रावर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याच्याच एका शिष्याने त्यांना ती प्रवचने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे सुचविल्यावर त्यांनी एकूण तीस भागात ती लिहिली व प्रसिद्ध केली. त्यातील दोन त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली आहेत. त्याच काळात त्या विहारात एक इश्र्वर नावाचा महंत शा-सिन नावाचा एक ग्रंथ लिहित होता पण काही अडचणींमुळे त्याने ते काम अर्धवट सोडले होते. गुणवर्मन यांनी ते काम पूर्ण करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे शेवटचे १३ भाग त्यांनी पूर्ण केले असे म्हणतात.

गुणवर्मन यांच्या काळात बौद्ध भिक्षुणींचा एक प्रश्र्न सोडविण्यात आला. त्याची हकिकत अशी :
जेव्हा गुणवर्मन नानजिंगला पोहोचला तेव्हा ज्या विहारात त्यांची सोय करण्यात आली होती तेथे एका बांबूच्या बेटापाशी त्याचे मन अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तेथेच आपली दिक्षाभूमी उभारली. या दिक्षाभूमीवर ते चीनी जनतेला बौद्धधर्माची दिक्षा देत असत. (चीनी महंतांनी गुणवर्मन या नावाचा अर्थ लावला तो असा : ज्याने गुणांचे चिलखत परिधान केले आहे असा. या माणसाने खरोखरीच गुणांचे चिलखत परिधान केले होते. सम्राटाच्या एवढ्या जवळ असून त्याच्या हातून कधीही काहीही वावगे घडले नाही.) ४२९ साली आठ भिक्षुणी श्रीलंकेवरुन एका जहाजातून नानजिंगला अवतरल्या. त्यांनी यिंगफू नावाच्या मठात आश्रय घेतला. तीन वर्षे त्या तेथेच होत्या. त्या काळात त्यांनी चीनी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले. त्यांनी स्थानिक भिक्षुणींना विचारले,

‘‘ येथे पूर्वी कधी भिक्षुणी आल्या होत्या का ?’’

‘‘ श्रमण व भिक्षू आले होते पण भिक्षुणी प्रथमच आल्या आहेत’’

हे उत्तर ऐकल्यावर त्या भिक्षुणी चमकल्या. कारण स्त्रियांना दिक्षा देण्यासाठी भिक्षुणी आणि महंत दोन्हीची गरज असते.

‘‘जर तुमच्या गुरुंना पूर्वी दिक्षा मिळाली असेल तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे होते.’’

त्या भिक्षुणींना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांना त्यांची दिक्षा वैध नाही कळल्यावर अतोनात दु:ख झाले. त्यांनी गुणवर्मन यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गुणवर्मन यांनी त्या स्त्रियांना दिक्षा देण्याची तयारी दाखविली व नंदी जहाजाच्या नाखव्याला श्रीलंकेतून अजून भिक्षुणींना घेऊन येण्याची विनंती केली. तसेच या ज्या श्रीलंकेवरुन आठ जणी आल्या होत्या त्यांना चीनी भाषेचा अभ्यास करण्यास सांगितले म्हणजे त्यांनी चीनी स्त्रियांशी बोलून त्या दिक्षा घेण्यास सक्षम आहेत का हे कळेल. असे म्हणतात नंदी जहाज दहा वर्षांनंतर अजून दहा भिक्षुणींना घेऊन नानजिंगला परतलं आणि आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तिनशे चीनी स्त्रियांना दिक्षा देण्यात आली. अशा रितीने चीनी भिक्षुणींचा संघ अस्तित्वात आला. आता या संघासाठी नियम करणे आले. यिंग-फाऊ मठाच्या भिक्षुणी गुणवर्मन यांच्याकडे आल्या आणि त्यांनी प्रर्थना केली. आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तेही काम पूर्ण करण्यात आले. (या गोष्टीमधे काळाचा जरा गोंधळ झाला आहे असे मला वाटते)

जेव्हा गुणवर्मन प्रवचनांमधे ताओ आणि कनफ्युशियस यांच्या तत्वज्ञानातील उदाहरणे देत असे तेव्हा काही श्रमणांनी त्यांना विचारले, ‘‘ हे कसे काय ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘ चीनी सामान्यजनांना ज्या भाषेत कळते तीच भाषा वापरायला पाहिजे नाहीतर बहिऱ्यांसमोर पाच स्वर आळविल्यासारखे किंवा आंधळ्यांसमोर पाच रंगाचे वर्णण केल्यासारखे होईल.’’

याने भाषांतर केलेल्या ग्रंथाची संख्या जास्त नसली तरी त्याच्या कनवाळूपणामुळे तो सामान्यजनात फार लोकप्रिय होता. नानजिंगला असताना तो महायान पंथातील दोन सूत्रांवर प्रवचने देत असे. एक होते अवात्माशकसूत्र आणि दुसरे दशभूमिकासूत्र.

एक दिवस प्रवचने देऊन झाल्यावर हा ज्ञानी पंडीत आपल्या निवासस्थानी परत गेला. त्याच्या मागे त्याचे शिष्य काही शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी गेले असता गुणवर्मन त्यांना मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या समोर एक ३० श्लोकांचे सूत्र पडले होते ज्यात ‘‘ हे सूत्र माझ्या निधनानंतर भारतात व चीनमधे प्रसिद्ध करावे अशी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी यांचे वय होते सदुसष्ठ....

....त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा अंत्यविधी दिक्षाभूमीवर भारतीय पद्धतीने करण्यात आला. नाहीतर तो सामान्यपणे दिक्षाभूमीपुढे करण्यात येतो...

यानंतरच्या काळातही बरेच महत्वाचे महंत चीनमधे आले...उदा. गुणभद्र, धर्मजात यास, खिऊ-ना-फी-ती व चाऊ फा कियू.... त्यांच्याबद्दल पुढील भागात...
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
या भागासाठी श्री बोस यांच्या लिखाणाचा व इतर रिसर्च पेपर्सचा आधार घेण्यात आला आहे.

धर्मइतिहासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 8:59 am | यशोधरा

लेख अतिशय आवडला.

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 10:33 am | प्रचेतस

उत्कृष्ठ लेख.

वा. प्रचंड कष्ट घेऊन लिहिलेला लेख. पुभाप्र.

कपिलमुनी's picture

5 Sep 2016 - 5:49 pm | कपिलमुनी

अशा माहितीपूर्ण लेखांसाठी खूप धन्यवाद !

अमितदादा's picture

5 Sep 2016 - 11:59 pm | अमितदादा

उत्तम लेख...बुद्ध धर्माचा वारसा असणारा कालचा काश्मीर आणि आज जिहादच्या आगीत होरपळत असणारा काश्मीर बगून दुःख आणि आश्चर्य होत.

जयंत कुलकर्णी's picture

6 Sep 2016 - 1:50 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

पैसा's picture

28 Sep 2016 - 5:00 pm | पैसा

त्या काळात काश्मिरहून श्रीलंका, तिथून जावा आणि शेवट चीन! केवढा प्रवास एका ध्येयासाठी. त्यानंतर त्याना चिनी भाषा शिकावी लागली असेल. आणि भाषांतर करण्याएवढी चांगली शिकावी लागली असेल! केवढे मोठे काम आहे हे!