माझा सायकल प्रवास….

नपा's picture
नपा in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 11:44 am

सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!!
का?...उगाच
अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले.
पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला?
फक्त एक मित्र तयार होता. सातव्या सेमिस्टर नंतर जायच ठरलं.
PL (प्रेपशन लिव्ह) सुरु झाली, सगळे जण कोषात गेल्यासारखे आपापल्या खोलीत अभ्यासाला लागले. एकमेकांना चहाच्या कट्ट्यावर, खानावळ (आणि पिण्यावळीत सुद्धा) किंवा अगदीच कुठे नाही तर गावातल्या किंवा शेजारच्या गावातल्या सिनेमागृहात भेटणे होत होते. तसे बऱ्याचदा एखाद्याच्या रूम वर गप्पांच्या मैफिली सुद्धा रंगायच्या.
PL संपली, परीक्षा सुरु झाली. हे सगळं सुरु असताना आम्हा दोघा मित्रांचं आमच्या सायकल सफरीवर चर्चा आणि तयारी सुद्धा सुरु होती. तयारी म्हणजे रोजचे थोडाफार सायकलिंग.
परीक्षा लवकर संपावी यासाठी आम्हाला इतरांपेक्षा एक कारण जास्त होत.
झालं...शेवटच्या पेपर चा दिवस उजाडला. मी प्रचंड उत्साहात होतो. त्या उत्साहात पेपर सुद्धा थोडा लवकरच लिहून मोकळा झालो. पण पर्यवेक्षकांनी माझा पेपर जमा केला नाही.. मी म्हंटलं "सर, जाऊ द्या ना माझं झालाय लिहून" ते म्हंटले नाही शेवटच्या 10 मिनिटात असा पेपर घेता येत नाही. म्हंटलं असो, ते दहा मिनिट मी आपला सायकल प्रवासाचे स्वप्न रंगवत बसून राहिलो.
रूम वर मी आधीच केलेली तयारी माझी वाट पाहत होती. पुन्हा एकदा सायकलच चेक अप झालं तिच्या फॅमिली डॉक्टर कडून. जय्यद तयारी (पाण्याची बाटली, बिस्किट्स व रिकामा थर्मास) करून नेहमीच्या ठिकाणी मित्राची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळात आमच्या कॉलेज च पब्लिक बस स्टॉप वर उगवू लागले आणि परतीच्या बसमध्ये मावळू लागलेत. कोणाला जवळ तर कोणाला दूर जायच, कोणी सोडायला आला तर कोणी उगाच टाइमपास करायला.
माझ्याकडे बघून काही मित्रांनी मान हलवली...मी त्याकडे दुर्लक्ष केला आणि निर्धाराने माझ्या मित्राची वाट पाहू लागलो. थर्मास मध्ये फर्मास चहा भरून घेतला. हिवाळ्याचे दिवस असल्याने जेवढा लवकर प्रवास सुरु करता येईल तेव्हडं चांगला असा आमचा विचार होता. पण हा पठ्या काही आला नव्हता म्हणून मला चुळबुळत बसाव लागलं. बस येत होत्या आणि जात होत्या.
मी उगाच चहा पी.....टपरी वर जाऊन येणाऱ्या जाणार्यांशी गप्पा मार...असले उद्योग करत होतो. तेव्हड्यात माझं लक्ष एका जाणाऱ्या खासगी बस वर गेलं कारण माझ्या मित्राची सायकल तिच्या पाठीला बांधलेली दिसली.
अर्रे...हा मुलगा सायकल का पुढे पाठवतोय? माझ्याबरोबर डबल सीट येणार आहे कि काय हा आता?
असले बावळट प्रश्न पडायच्या आत मला प्राप्त परिस्थितीची जाणीव झाली. या मुलाने सायकलला टांग मारण्याऐवजी मला टांग मारली होती.
सगळ्या खाजगी बसेस पुढे एक वळणावर थोडा वेळ थांबून अजून प्रवासी घेऊन (भरून) मग पुढे जायच्या, त्या ठिकाणी मी माझ्या मित्राला गाठायचं ठरवलं. एवढ्या उत्कटतेने त्याला भेटायची तेंव्हा इतकी इच्छा मला कधीच झाली नव्हती. थोडाफार प्रेमालाप करायचा माझा मानस होता. पण तो मानस मनातल्या मनात करावा लागला.. कारण नेमकी त्या वेळी ती बस तिथे थांबलीच नाही..... खिडकीतून माझ्या मित्राने मला हात हलून बाय केला आणि काहीतरी ओरडून सांगत होता.
मी बस चा पाठलाग करायचा क्षीण प्रयन्त केला आणि यथावकाश सोडून दिला. तो पर्यंत मी गावाची वेस ओलांडली होती. आता आपण एकटेच जायचे. तेंव्हा (17-18 वर्षपूर्वी) रस्ते, लाईट आणि 45 किलोमीटरच अंतर या सगळ्या गोष्टी गौण ठरवून मी एकटा निवांत कडेकडेने निघालो. मजल दरमजल करत, वाटेल तिथे थांबत, चहापान करत आणि सायकलिंग ची मजा लुटत माझा प्रवास सुरु झाला.
18-20 किलोमीटर नंतर पुढच्या चाकाने मोठा सुस्कारा सोडला.. नशिबाने एक छोट गाव जवळच होता. मग मी माझ्या सायकल बरोबर थोडा walk घेतला, तिची योग्यती समजूत घालत तिचा डॉक्टर शोधला. टाकलेल्या सुस्काऱ्याचा बंदोबस्त व पुन्हा सुस्कारा न सोडण्याच वचन घेऊन प्रवासाला लागलो. याआधी डॉक्टरसाहेबांनी मला प्रश्न विचारून आणि सल्ले देऊन भंडावून सोडलं. अनेक मोलाचे सल्ले जसे “आता सायकल एका ट्रक मध्ये टाक आणि जा तुझ्या गावाला”, “ अंधार पडू लागला आहे तेंव्हा तू पण इथेच कुठेतरी पडून राहा आणि उजाडल्यावर निघ”. मी जास्त चर्चा न करता तिकडून सटकलो आणि पुन्हा एकदा प्रवासाला लागलो.
आता उजेड बराच कमी वाटत होता आणि मुख्य रस्त्याला आल्यावर तर एकाकी रस्ता, आजूबाजूची झाडी, अपुरा प्रकाश या वातावरणाचा परिणाम जाणवायला लागला. माझ्या जय्यद तयारी मध्ये बॅटरी हा प्रकार नव्हताच आणि त्याबद्दल आता मला माझाच राग येत होता. जावे कि न जावे पुढे? दोलायमान विचारात सायकल चालवत राहिलो. मग डोळे त्या कमी प्रकाशाला सरावले, मला जरा धीर आला. नंतर येणाऱ्या अन जाणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशाच्या मदती ने मी मार्गक्रमण करत राहिलो. एक दोन वेळा घोटाळा झाला पण फारशी काही अडचण न येता माझा प्रवास सुरु राहिला.
आता 10-12 किमी अंतर तेवढे राहिले होते. पुन्हा बऱ्यापैकी लोकवस्ती असलेला गाव आलं.
सायकलच्या चाकांमध्ये सुद्धा बहुदा जुळ्यांचे दुखणे असावे. कारण पुढच्या चाकाच्या मागच्या सुस्काऱ्याला बऱ्याच वेळाने मागच्या चाकाने मोठया उत्साहाने उत्तर दिले. आता हे दिलेला उत्तर एवढ्या मोठ्या आवाजात होता कि मला कळलंच नाही काय झालाय ते. आधी वाटलं कि आजूबालाच कसलातरी आवाज झालाय. मी आपला निवांत.
खड्डखड्ड .... नेमका काय झालाय त्याचा परीक्षण करू लागलो, सोबतीला जवळपास ची गावकरी पण आले. मागचा टायर फाटल होत आणि मधली ट्यूब त्यातून बाहेर डोकावत होती. आता मात्र मला घाम फुटला, गावकरी मंडळी होतीच अजून घाबरवायला...ट्यूब टायर बदलावी लागेल एवढ्या रात्री (7.15 -7.30 सां.) कुठे मिळेल ट्यूब अन टायर? इत्यादी..
कसाबसा त्यांच्याकडून सायकलवाल्याचा चा पत्ता घेतला आणि गेलो. मालक दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. कुठून आलो आणि कुठे जातोय एवढ्या चौकशीनंतर माझ्याकडे विचित्र कटाक्ष टाकला पण लगेचच माझी सायकल ऑपरेशन टेबल वर घेतली.
मला खरोखर माझ्या सायकलच कौतुक वाटत होत. बघाना...प्रसंगावधान ते किती तिचं, दोन्ही वेळा गाव जवळ आलाय असा बघून फुस्स केले, नाहीतर माझी काही धडगत नव्हती.
या वेळी मात्र मला कोणतेही सल्ले न देता फक्त माझी सायकल दुरुस्त करून देण्यात आली. त्यांचे आभार मानून मी निघालो. येताना वाटेत भेटलेले गावकरी आपापल्या घरी निघून गेले होते त्यामुळे जास्त वेळ न गमावता माझा प्रवास सुरु झाला. या रस्त्यावर बऱ्यापैकी रहदारी असल्यामुळे आणि दोन्ही चाकांच्या संयमाने, सहकार्याने माझा उर्वरित प्रवास चांगला झाला. तब्बल 7 तासांच्या सायकलिंग नंतर मी घरी पोहचलो.
मी प्रचंड थकलो होतो पण खूप छान वाटत होता...काहीतरी ठरवून पूर्ण केल्याचा आनंद होता. कधी कधी अनावधानाने निर्णय घेतले जातात तेच नंतर समाधान देतात. नाहीतर analysis paralysis होत, म्हणजे खूप चिकित्सा करत बसलं तर काम सुरु करण्या आधीच अपंग होत. अर्थात हे सगळीकडेच लागू होत अस नाही.
मी त्या बस मागे लागलो आणि पुढे पुढे जात राहिलो....माझं घर येई पर्यंत.

प्रवासमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मी प्रचंड थकलो होतो पण खूप छान वाटत होता...काहीतरी ठरवून पूर्ण केल्याचा आनंद होता. कधी कधी अनावधानाने निर्णय घेतले जातात तेच नंतर समाधान देतात.

हे बरोबर बोललात...

प्रवास आणखी खुलवून लिहा.. कशी तयारी केली.. कुठून कुठे गेला.. वगैरे..

पुढील लेखासाठी शुभेच्छा..

एस's picture

18 Aug 2016 - 12:36 pm | एस

वॉव, वॉव, वॉव!... भारी!

मस्त प्रवास. असा शेवटच्या क्षणी टांग देणार्‍या मित्रांचा अणुभव आहे. :)

ज्योति अळवणी's picture

19 Aug 2016 - 12:20 am | ज्योति अळवणी

छान लिहिलंय

जव्हेरगंज's picture

19 Aug 2016 - 12:36 am | जव्हेरगंज

गुड वन!

निमिष ध.'s picture

19 Aug 2016 - 1:31 am | निमिष ध.

चांगला आहे लेख. अजुन थोडा खुलवता आला असता.

यावरून मला आम्ही पल्सर वर ४ असेच अभियांत्रिकीच्या सुटीत गावी गेलो होतो तो दिवस आठवला. मित्राची गाडी होती ती चालवत नेली घरी पण मग घरी जाऊन खुप ओरडा खाल्ला ;)

पक्षी's picture

19 Aug 2016 - 10:28 am | पक्षी

छान लेखन आणि प्रवास.PL चे दिवस आठवले, PL मध्ये प्लॅन बनवणं आणि नंतर ते बारगळणं हे अतिशय कॉमन आहे.

इरसाल's picture

19 Aug 2016 - 10:47 am | इरसाल

कुठुन कुठे वगैरे डिटेल्स दिले असतेस तर अजुन रिलेट करता आले असते.

केडी's picture

19 Aug 2016 - 11:55 am | केडी

मग सध्या सायकलिंग सुरु आहे की नाही? सुरु ठेवा आणि लिहीत राहा.

अभिजीत अवलिया's picture

20 Aug 2016 - 2:37 am | अभिजीत अवलिया

त्या उत्साहात पेपर सुद्धा थोडा लवकरच लिहून मोकळा झालो. .... मी म्हंटलं "सर, जाऊ द्या ना माझं झालाय लिहून" ते म्हंटले नाही शेवटच्या 10 मिनिटात असा पेपर घेता येत नाही.

सायकलिंग प्रमाणेच ह्या गोष्टीचे विशेष कौतुक वाटतेय. पेपर वेळे आधी लिहून मी गप्प बसलोय असा प्रसंग माझ्या उभ्या आयुष्यात कधी घडला नाही.