हरवलेलं विश्व (भाग ४)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 8:58 pm

हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920

भाग ४

"तर.... नासराच्या आग्रहामुळे केरोहला देखील वाटू लागले की आपणही आपले पिरॅमिड बनवून घेतले पाहिजे. त्याने जेसाला बोलावणे पाठवले. आणि आपला विचार तिला बोलून दाखवला. जितका मोठा राजा तितके त्याचे पिरामिड मोठे आणि वैविध्यपूर्ण असायचे. त्यात जेसाने याच विषयाचा अभ्यास केला होता. त्यामुळे जेसाला देखील कुठलाच संशय आला नाही. केरोहची इच्छा होती की उत्तम वास्तु अभ्यासक असणा-या जेसानेच त्याचे पिरॅमिड बनवावे. जेसाने देखील लगेच ते मान्य केले आणि मेहोफिसा गावाच्या पश्चिमेला एक जागा ठरवून तिथे कामाला सुरवात देखील केली. जेसा आपल्या प्रिय भावाच्या पर-जन्मातील प्रयाणासाठीच्या पिरामिडच्या कामात पूर्ण व्यग्र झाली. इथे यथावकाश नासरा बाळंतीण झाली आणि तिला पुत्र रत्न प्राप्त झाले. मुलगा झाल्यानंतर नासराने हळूहळू केरोहला अन्नातुन विष द्यायला सुरवात केली. केरोह अधुन मधून आजारी पड़त असे; आणि अलीकडे त्याची तब्बेत पटकन बरी होत नव्हती. अर्थात त्याला होणारा त्रास शरीराच्या आत होता. त्यामुळे ते कोणाच्याही लक्षात आले नाही. आणि कामाच्या व्यग्रतेमुळे केरोहदेखिल ही गोष्ट कोणाला सांगत नव्हता. रियोला देखील नासराच्या वाईट उद्धेशांची कल्पना आली नव्हती. खर तर रियोच मन अलीकडे जेसाकड़े ओढ़ घेत असे. तिच्या कामामुळे ती राजवाड्यात फारशी राहात नसे. त्यामुळे रियोला जेसाला भेटणेशक्य होत नसे. आणि त्यामुळे त्याचे देखील आजुबाजुला घडणा-या या चुकीच्या गोष्टींकडे लक्ष नव्हते.

इथे पिरॅमिड उभे राहु लागले आणि दुसरीकडे केरोहची तब्बेत पूर्ण खालावली. केरोह्ची तब्बेत चांगली नाही हे हळूहळू त्याच्या सरदारांच्या लक्षात येऊ लागले. केरोह आणि नासराचा मुलगा अजुन फ़क्त वर्षभराचा होता. त्यामुळे केरोहच्या ताब्बेतीच कारण पुढे करुन हळूहळू नासराने राजकारभार स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. आता मात्रर रियोला नासराचा संशय येऊ लागला. कारण आजवर रियोला राजवाड्यात कुठेही फिरण्यास बंदी नव्हती. परंतु अलीकडे केरोहला भेटायचा कितीही प्रयत्न केला तरी नासरा ही भेट घडू देत नव्हती.

शेवटी एक दिवस रियो जेसाला भेटायला तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्याने तिला राजवाड्यावर घडणा-या घटनांची कल्पना दिली. जेसाला भावाची काळजी वाटली आणि ती तशीच केरोहला भेटायला रियो बरोबर राजवाड्याकड़े निघाली. परंतु तोवर खरच फार उशीर झाला होता. नासराने हळूहळू केलेल्या विषप्रयोगाचा परीणाम केरोहवर पूर्ण झाला होता. त्यांना वाटेतच केरोहच्या अकस्मित निधनाची बातमी मिळाली. जेसाच मन सैरभैर झाल. तिने उभारलेल्या पिरॅमिडची गरज तिच्या भावाला इतक्या लवकर पडेल अस तिला स्वप्नातही कधी वाटल नव्हतं.

रियो आणि जेसला नासराचा संशय आला. ते दोघे राजवाड्यावर पोहोचले. केरोहचे पार्थिव बघुन जेसाला भरून आले. परंतु त्याचे शरीर पूर्ण हिरवे पडले होते. ते पाहुन जेसाला आश्चर्य वाटले. तिने राजवैद्यांना याचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी तिला माहिती दिली की गेले कित्येक दिवस राणी नासराने वैद्यांनाही केरोहला भेटण्यास बंदी केली होती.प्रत्येकवेळी तिने हेच कारण सांगितले होते की केरोहला एकटे राहण्याची इच्छा आहे. हे समजताच जेसाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने उपस्थित सर्व आमिर-उम्रावांच्या समोरच नासराला प्रश्न विचारला. "सांग नासरा, माझ्या भावाची तब्बेत चांगली नव्हती तर त्याची बहिण म्हणून तू मला याची कल्पना का दिली नाहीस? मी आणि केरोह लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत. आम्हाला अजून कोणीही नातेवाईक नसल्याने आम्ही एकमेकांच मन चांगल ओळखत होतो. जर मी त्याला भेटले असते तर मी नक्की त्याच्या आजाराच कारण शोधून काढल असत. तू स्वतःला माझही मैत्रिण म्हणवतेस ना? मग तूला अस एकदाही वाटल नाही की मला याविषयी कळवावं? राजविद्याना भेटायला देखील माझा भाऊ तयार नव्हता यावर तर माझा विश्वासच बसत नाही. त्याच या सुंदर जीवनावर खूप प्रेम होत. आणि त्याहूनही जास्त त्याच्या लोकांवर आणि या राज्यावर! खूप मोठी स्वप्न बघितली होती आम्ही दोघांनी या राज्यासाठी. बोल नासरा! उत्तर दे!" नासराला याची अपेक्षा नव्हती. पण मग परिस्थिती बघुन तिने दुःख्खाने बेशुध पडण्याचे नाटक केले आणि वेळ मारून नेली.

आता मात्र जेसा आणि रियोला नासराच्या दुष्ट उद्धेशांची पूर्ण कल्पना आली. जेसाने नासराला अद्दल घडवायची शपथ घेतली. तिने केरोहच्या पिरामिडमद्दे नासराच्या चिरनिद्रेची सोयही केली होतीच्. मग तिने संपूर्ण गावाला एकत्र करुन केरोहच्या प्रेमाखातर नासरानेही महाप्रयाण केले पाहिजे हे पटवले. परंतु नासरा जेसाहून जास्त हुशार होती. तिने लहानग्या राजकुमाराचे कारण पुढे केले. त्याकाळात अशी प्रथा होती की जर फरोह काही कारणाने लवकर मृत्यु पावला आणि त्यावेळी राजकुमार लहान असेल तर राजकुमार तिन वर्षाचा होईपर्यंत राणीने महाप्रयाण करू नये. त्यामुळे जेसाला हार पत्करुन गप्प बसावे लागले.

केरोहच्या महाप्रयाणानंतर नासराने राजकारभाराची सर्व सूत्र हातात घेतली होती. रियोला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगून जेसाने स्वतःला मात्र सर्वांपासून दूर ठेवल होत. कारण ती 'ओसिरिस' चे मंदिर उभारण्यात मग्न झाली होती. त्याकाळी 'ओसिरिस' ही देवता मृतांची न्यायाधीश किंवा मृत्युची देवता मानली जायची....

काळ पुढे सरकत होता. भावाच्या दुःखात असलेली जेसा राजकुमार तिन वर्षांचा होण्याची वाट पाहात होती. राजकुमार तिन वर्षांचा होण्यास एक महीना असताना नासराने तिचे पुढचे फासे फेकले. तिने रियोपुढे तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्याच्या बदल्यात राज्य कारभार रियोच्या हाती सुपुर्द करण्याचे आमिष रियोला दिले. रियोला नासराच्या उद्देशाची पूर्ण कल्पना आली. कारण जर नासराने परत लग्न केले तर तिचे केरोहची विधवा हे स्थान न राहाता रियोची पत्नी हे स्थान झाले असते आणि मग तिच्या महाप्रयाणाची वेळच आली नसती.

हे लक्षात आल्यावर रियो जेसाला याची कल्पना देण्यासाठी गेला. जेसाला नासरा परत काही खेळी करेल याची कल्पना होती. तिने रियोला नासराला हो म्हणण्यास सांगितले. रियोला मोठा धक्का बसला. त्याने त्याचे ह्रदय कधीच जेसाला दिले होते. परंतु जेसाला याची बिलकुल कल्पना नव्हती. जेसाला आपण आपल्या मनातले भाव सांगितलेले नाहीत म्हणून ती आपल्याला अस करायला सांगते आहे अस रियोच्या मनात आल. म्हणून शेवटी रियोने त्याचे मन जेसाकडे मोकळे केले. त्याने तिला तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आणि नासराचा हा प्रस्ताव तो नाकारणार आहे हे देखील जेसाला सांगितले. रियोच्या भावना ऐकून जेसा क्षणभर गप्प झाली. परंतु नंतर मात्र तिच्या मनाने त्याच्या प्रेमाची तिला ग्वाही दिली. जेसाच मनही रियोकडे ओढले जाऊ लागले. परंतु जेसाला तिच्या भावावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण जास्त महत्वाच वाटत होत. त्यामुळे त्यावेळी जेसाने तिच्या मनातला विचार रियोला सांगितला......."

सांगता सांगता योगान काही क्षण थांबला. त्याच्या लक्षात आले की जयुची तंद्री लागली आहे आपली गोष्ट ऐकताना. का कोणजाणे पण त्याला तिला भानावर आणायची इच्छा झाली आणि तो जयुला म्हणाला;"हे तेच ओसिरिसच मंदिर बर का ज्याचा उल्लेख आपल्या माननीय राजेश साहेबांनी मगाशी केला होता." असे म्हणून योगानने राजेशकडे बघुन तोंड वेंगाडले. अचानक गोष्ट सांगण्याचे थांबवून योगानने हे अस काहीतरी बोललेलं एकूण जयुची तंद्री देखील मोडली. त्याच्या त्या नाटकी आविर्भावामुळे तिला हसु आले. राजेशमात्र आवेशात म्हणाला;"बघा! मी म्हणालो नव्हतो का मॅडम तुम्हाला? आता हादेखिल कबूल करतो आहे की ते मृत्युच्या देवतेच् मंदिर आहे." जयु त्याचा आवेश बघुन हसली आणि म्हणाली;"खरच की. आहे ते मंदिर मृत्युच्या देवतेच्. बर मग?"

"मग... गाडी वळवू का परतीसाठी?" राजेशने एकदम विचारले आणि जयु गोंधळली. "का? परत मागे का फिरवायची गाडी?" तिने राजेशला विचारले.

"मॅडम अहो अस काय करता? आज पूर्ण चंद्रमाची रात्र आहे. आज ओसिरिसची हक्काची रात्र आणि आपण त्याच ठिकाणी ते मंदिर पहायला जातो आहोत. न जाणो काही कमी जास्त झाल तर?" राजेशने प्रांजळपणे त्याची काळजी बोलून दाखवली.

यावर मात्र जयु खळखळून हसली. "अरे राजेश कुठल्या जमान्यात राहतोस बाबा? अरे मृतांची देवता... तिची रात्र.... हे सगळ पार 2650-C2575 BCE काळातील आहे रे. ज्या काळात पिरॅमिड्स बांधली जात होती न; त्याकाळातल्या या कल्पना आहेत. अरे त्यावेळी अस देखील मानायचे न की या पिरॅमिड्समद्दे ज्या ममिज् ठेवल्या जातात त्या म्हणजे परलोकातील प्रवासाला निघालेल्या आत्म्याला स्वतःचे शरीर सहज सापडावे म्हणून करुन ठेवलेली सोय. अरे पण आता आपण अस करतो का? मृत्यु नंतर परत याजगातील आयुष्य नसते हे आपल्याला माहीत आहे न? ज्या प्रमाणे पिरॅमिड ही त्याकाळातील विश्वास असलेली गोष्ट होती तसच काहिस ओसिरिसच्या बाबतितली कल्पना किंवा विश्वास त्या काळात होता. म्हणून आजही या जेट युगात आपण अशा कल्पनांवर विश्वास ठेवून कस चालेल? " जयु म्हणाली.

यावर राजेश काहीच बोलला नाही. त्याने एक कटाक्ष योगानकडे टाकला आणि बोलण्यासाठी उघडलेल तोंड मिटुन घेतल. काही क्षण शांततेत गेले. न राहावुन राजेश मग एवढेच म्हणाला;"मॅडम तुम्हाला बघायचे आहे न ते मंदिर? मग मी तुम्हाला नक्की नेतो तिथे. तुमच्या बरोबर मी शेवटपर्यंत आहे."

जयु त्याच्या भाबड़ेपणावर हसली.

योगान शांतपणे जयु आणि राजेशच बोलण एकत होता. त्याने अचानक म्हंटले;"रियोने जेव्हा असेच जेसाला म्हंटले होते तेव्हा जेसादेखिल अशीच हसली होती."

जयूने भुवया उंचावत योगानकडे बघितले आणि विचारले;"काय म्हंटले होते रियोने? का हसली होती जेसा?"

त्यावर योगान राजेशकडे बघत म्हणाला;"या साहेबां च्या अतिरंजित अंधविश्वासू गोष्टी संपल्या असतील तर सांगतो."

यावर राजेश काही बोलणार तेवढ्यात त्याला गप्प करत जयु म्हणाली;"योगान तू बोल. आता तो मधे बोलणार नाही. त्यांच्याकडून मी शब्द देते."

तिच्या बोलण्याने योगानचे समाधान झाले आणि त्याने पुढे सांगायला सुरवात केली.

"नासराचा उद्देश् खुप स्वछ होता. रियोशी पुनर्विवाह करायचा आणि स्वतःचा मृत्यु टाळायचा. परंतु आता जेसाने तिचे फासे उलटे फिरवायचे ठरवले होते. त्यामुळे तिने रियोला नासराचा प्रस्ताव मान्य करण्यास सांगितला होता. जेसाच्या सांगण्यावरून रियोने नासराचा प्रस्ताव स्वीकारला. त्याबरोबर नासराने जेसाला आणि संपूर्ण मोहफिसाला बोलावून तिच्या आणि रियोच्या लग्नाची बातमी दिली.

नासराला वाटले होते की जेसा या विवाहाला कडाडून विरोध करेल. त्यामुळे नासराने स्वतःच्या सफाईची देखील पूर्ण तयारी केली होती. परंतु जेसाने या बातमीचे हसत-हसत स्वागत केले. जेसा सर्वांसमोर म्हणाली,"नासरा माझा भाऊ तर गेला. पण अजून राजपुत्र लहान आहे. जर रियोची हरकत नसेल तर माझ काहीच म्हणण नाही." मात्र तिने नासराला एकांतात भेटून आठवण करुन दिली की नवीन लग्न बंधनात गुंतण्या अगोदर प्रथे प्रमाणे नासराला ओसिरिस देवतेच्या मंदिरात पूर्ण चंद्रमाच्या रात्रि जाऊन स्वतःचे शुद्धिकरण करुन घ्यावे लागेल. जेसाने नासराला ही कल्पना देखील दिली की तिने ओसिरीसच्या मंदिरात जाण्याची इच्छा स्वतःहून लोकांना सांगावी. मात्र जर तिने यासाठी नकार दिला तर जेसा तिच्या हक्कासाठी नासरासमोर उभी राहील. नासराला याची कल्पना होती की जर जेसाने राजमुगुटाची इच्छा व्यक्त केली तर संपूर्ण सरदार मंडळ आणि मोह्फिसा तिच्या बाजूने उभे राहील. त्यामुळे तिने जेसाचा प्रस्ताव मान्य केला. आणि स्वतःच त्याची घोषणादेखील केली.

"आता हे कुठले शुद्धिकरण योगान?" जयूने आश्चर्य वाटून योगानला अचानक विचारले. योगान थोड़ा दचकला. कारण आता तो जणुकाही त्या काळात नासरा आणि जेसा जिथे चर्चा करत होत्या तिथे जाऊन पोहोचला होता. भानावर येत त्याने जयुकडे वळून बघितले आणि म्हणाला,"त्याचे असे आहे की जर एखादी स्त्री किंवा पुरुष एकदा विवाहित असेल आणि त्या बंधनातून बाहेर पडून दुस-या विवाह बंधनाची इच्छा असेल तर ओसिरिस देवतेला पूर्ण चंद्रमाच्या रात्रि सांकड घालाव लागायच. तिच्या परवानगी नंतरच असा विवाह होत असे. पती किंवा पत्नी निवर्तलेले असले तरी आणि जिवंत असले तरीही. अर्थात ही प्रथा सर्व पाळतच अस नाही. कारण या राजेशप्रमाणे त्या काळातही या देवतेबद्दल गैरसमज होते. ती मृत्यूची देवता आहे... त्यामुळे तिच्या मनात नसेल तर आपण मरू अस वाटत असे सर्वांना. त्याकाळातील राजे तर अनेक पत्नी करत असत. ते कधीच ही प्रथा मानत नसत. म्हणून तर आज या प्रथेचा उल्लेख खूप कमी पुस्तकातून पाहायला मिळतो. त्यामुळेच तर ओसिरीस देवतेबद्दल अनेक गैरसमज त्या काळात होते आणि आजही आहेत. ओसिरीस मृत्युच्या न्यायाची देवता आहे! मृतांची नाही. तुम्ही कसे यमाला देव मानता... काहीसे तसेच. पण हे कोणाला पटवणार?"

"काहीसे तसे आणि काहीसे असेही की ही देवता जागृत आहे. त्यावेळी असे ही मानत की असा दुसरा विवाह ओसिरिसला मान्य नसेल तर ती त्या व्यक्तीला गिळंकृत करित असे.तसे तिच्याबद्दलच्या अजूनही अनेक कथा तेव्हाही आणि आजही प्रचलित आहेत." राजेशने लग्गेच् स्वतःचे मत मांडले.

त्याला अजुन बोलू न देता जयु म्हणाली;"अरे कथाच ना? अस काहीस गूढ़... कल्पनेतल अस काहिस ... अस निर्मित करण्याची मनुष्याला सवयच आहे.योगान तू सांग पुढे. आता उत्सुकता खूप वाढली आहे. आता मी..... आम्ही.... तुला अजिबात थांबवणार नाही." जयूने राजेश आणि तिच्यावतीने सांगून टाकले.

"नासराची अजिबात इच्छा नव्हती ओसिरिसच्या मंदिरात जाण्याची. परंतु तिनेच सर्व गावाला गोळा केले असल्याने आणि जेसाने मोकळ्या मनाने तिच्या प्रस्तावाचे स्वागत सर्वांसमोर केले असल्याने नासराला आता नकार देणे शक्य नव्हते. तीनच दिवसांनंतर पूर्ण चंद्राची रात्र होती. ती संपूर्ण रात्र नासराने ओसिरिसच्या मंदिरात व्यतित करावी आणि मग दुस-याच दिवशी रियोचा आणि तिचा विवाह करावा असे एकमताने ठरले.

तीन दिवसानंतरच्या रात्रि चंद्रमा उगावतीच्या वेळेला संपूर्ण जामानिमा करुन ढोल-ताशांच्या गजरात नासराने मंदिरात प्रवेश केला. संपूर्ण काळी वस्त्रे ल्यायलेल्या नासराच्या चेहे-यावर भितीचे भाव होते. जेसा तिच्या शेजारुन चालत होती आणि तिने स्वतः उभारल्या मंदिराची पलित्यांच्या उजेडाच्या मदतीने माहिती करून देत होती. प्रत्यक्ष मंदिरात त्यांच्या बरोबर गावाचे वृद्ध मुखिया आणि रियो देखिल होते. बाकी सर्व सरदार आणि जमलेले लोकं मंदिराच्या आवारातच थांबले होते. मंदिराच्या गाभा-याच्या दिशेने पडणा-या प्रत्येक पावलागणिक नासराच्या चेहे-यावरची भिती गडद होत होती आणि तिची पावले मंदावत होती. ही गोष्ट मुखियांच्या लक्षात आली. त्यांच्या दृष्टीने नासरा ही अगोदर गावाची मुलगी मग त्यांच्या फरोह केरोहची पत्नी आणि त्याच्या पश्चातली शासन कर्ति होती. त्यामुळे गाभारा जवळ येताच त्यांनी नासराला आपुलकीने विचारले;"बेटा तुला कसली भिती वाटते आहे का?" जणुकाही या प्रश्नाची वाटच बघत असलेली नासरा डोळ्यातले अश्रु पुसत म्हणाली;"नाही मुखियाजी.या मंदिरात येण्याचा निर्णय माझा आहे. मला लोकांसमोर जाताना त्यांच्या मनात माझ्याबद्दल कोणताही किंतु नसावा अस वाटत. पण जर ओसिरिसने मला केरोहला भेटायला पाठवले तर माझ्या लहानग्याच कस व्हायच या काळजीने माझ मन दुःखी होत आहे. त्यात हे मंदिर अगदीच नविन आहे. त्यामुळे मला याची काहीच माहिती नाही; त्यामुळे मी असा विचार करत होते की मी पुढल्या चंद्रमाच्या रात्रि इथे आले तर? जेणे करून तोवर मी हे मंदिर समजून घेईन."

मुखिया अत्यंत सरळ मनाचे होते. त्यांनी जेसाकडे अपेक्षेने पाहिले. जेसाला हे लक्षात आले की जर नासरा आज इथे न थांबता बाहेर पडली तर तिला परत अद्दल घडवणे अशक्य आहे. त्यामुळे तिने मुखियाजींकड़े विचार करण्यासाठी थोड़ा वेळ मागितला आणि रियोला एका बाजूस येण्याची खुण केली.

"रियो आज जर आपण हिला इथून जाऊ दिले तर ती आपल्या हातात कधीच लागणार नाही. गेले काही दिवस केरोह माझ्या स्वप्नात येतो आहे. तो काही बोलत नाही परंतु त्याची मुद्रा दुःखी असते. माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे." जेसाने आपले म्हणणे रियोला सांगितले.

"पण मग यावर उपाय काय आहे?" रियो जेसाकडे पहात म्हणाला. काही क्षण विचार करुन जेसाने निर्णय घेतला. "रियो मी नासरा बरोबर गाभा-यात जाणार." तिच्या या निर्णयाने रियो हबकला. परंतु त्याला शांत करत जेसा म्हणाली;"रियो हे मंदिर मी बांधून घेतल आहे. त्यामुळे याची खडान् खड़ा माहिती मला आहे. मी नासरा बरोबर आत जाईन. मी माझ्या बरोबर जालिम औषध घेतले आहे. तिच्या नकळत ते तिला देईन आणि बाहेर येइन. आत केरोह तिला भेटण्यासाठी थांबला असेल याची मला खात्री आहे. आणि सर्वात महत्वाच् म्हणजे या मंदिराच्या गाभ्याचा दरवाजा आतुनच उघड़तो; बाहेरून नाही. हे फ़क्त मलाच माहीत आहे. त्यामुळे केरोहने माफ़ केल्यामुळे जर नासरा वाचलीच; तरी ती उद्या मंदिरातून बाहेर येऊ शकणार नाही. कारण लोकं तिने दरवाजा उघडून बाहेर येण्याची वाट बघणार आहेत आणि मी तिला जे औषध देणार आहे त्यामुळे पुढील दोन दिवस नासरा आपणहून हलू देखील शकणार नाही आहे. लोक तर तिची वाट फक्त उद्या सूर्यास्त होईपर्यंत बघणार आहेत. ती तोपर्यंत स्वतःहून काहीच करू शकणार नाही. मग आपण सर्वाना पटवून देऊ शकु की ओसिरिसच्या मनात तुझा आणि नासराचा विवाह होणे नव्हते. मात्र मी आतून बाहेर येई पर्यंत तू माझ्यासाठी इथेच दाराजवळ थांब." आणि मग क्षणभर थांबून तिने विचारले,"थांबशील ना माझ्यासाठी?"

रियोने आयुष्यात पहिल्यांदाच जेसाचा हात आपल्या हातात घेतला आणि स्वतःच्या हृदयावर तो ठेवत म्हणाला;"उद्याच् का जेसा मी तुझ्या सोबत कायम आहे; अगदी जगाच्या अंतापर्यंत आणि त्यानंतरही. तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे."

त्याच्याकडे बघत जेसाने समाधानाने मंद स्मित केले आणि ती मुखियांकडे येत म्हणाली,"मुखियाजी नासराची काळजी रास्त आहे. परंतु आज आपल्या राज्यकर्तीला देवीकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी या मंदिरात अख्खा गाव लोटला आहे. त्यांची समजूत पटवणे अवघड आहे. तेव्हा आपण अस करु की मी देखील नासराच्या बरोबर गाभा-यात प्रवेश करते. तिला आतिल सर्व भाग दाखवून समजावते आणि मग बाहेर येते. एकदा आतल्या वास्तुची माहिती झाली की नासराची भिती कमी होईल आणि मग आपसुकच काळजी देखील कमी होईल. त्यानंतर तिला फक्त काही तास तिथे थांबायचे आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही."

मुखियाजीना हां प्रस्ताव पटला आणि मग नासराचे कुठलेही म्हणणे न एकता नासरा आणि जेसा दोघी आत जातील असे त्यांनी जाहिर केले. त्यानंतर काही वेळातच जेसा बाहेर येईल आणि नासरा आतच थांबेल असेही त्यांनी सांगितले.

मग ढोल-ताशांचा गजर झाला आणि नासराचा हात धरून जेसाने गाभा-यात पाऊल ठेवले. आत जाताना तिने एकदा मागे वळून रियोकडे बघितले. त्याची आश्वासक नजर तिला दिलासा देऊन गेली.

काही मिनिटांचा अवधी गेला. सर्वजण कुजबुजत जेसाच्या परतण्याची वाट पहात होते; आणि अचानक अनपेक्षितपणे मोठ्ठा आवाज करत गाभा-याचा उंच, बळकट दगडी दरवाजा बंद झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे तिथे स्मशान शांतता पसरली. आणि मग अचानक ओरडत सर्वजण सैरा-वैरा पळत गावाच्या दिशेने पळत सुटले.

रियोला असे का झाले तेच समजले नाही. जेसा दरवाजा बंद करणार नव्हती. त्यामुळे तो गोंधळून गेला. ती संपूर्ण रात्र त्याने मंदिराच्या पाय-यांवर एकट्याने बसून काढली. पूर्वेला तांबड़ फुटल; दिवस उगवला आणि तसाच मावळतीला देखील लागला.... आणि मुखियाजी रियोकडे आले.

"बेटा रियो ही मृत्यूची देवता आहे. तिच्या मनात काय आणि का येईल ते आपल्यासारख्या साध्या लोकांना कस कळणार? चल बेटा. केरोहचा लहानगा राजवाड्यात एकटाच आहे. त्याची संपूर्ण जवाबदारी आता तुझ्यावर आहे." अस म्हणून सामजुत काढून मुखियाजींनी रियोला राजवाड्यात आणले.

त्यानंतर ते मंदिर सर्वानुमते पछाडलेले आहे असे घोषित करण्यात आले. कारण कधी त्यातून नासराच्या हाक मारण्याचा आवाज येई तर कधी जेसाच्या दुःखाने रडण्याचा. परंतु तरीही रोज रात्रि रियो त्या मंदिराच्या पाय-यांवर जाऊन बसु लागला. त्याला खात्री होती की एक ना एक दिवस जेसा त्या दरवाजातून बाहेर येईल. केरोहचा मुलगा मोठा झाला. त्याने एक दिवस रियोला त्याच्या तिथे बसण्याचे कारण विचारले. रियोने आडपड़दा न ठेवता सर्व माहिती दिली आणि त्याचा राज्यभिषेक करुन देऊन रियो कायमचा त्या मंदिरात निघुन गेला. तोवर त्या मंदिराबद्दल इतक्या वंदता निर्माण झाल्या होत्या की कोणीही कधीही रियोला शोधायला तिथे गेले नाही....."

क्रमशः

kathaa

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

10 Aug 2016 - 10:13 pm | पद्मावति

क्या बात है!!! अतिशय सुंदर लिहीत आहात.

योगेश कोकरे's picture

11 Aug 2016 - 1:45 pm | योगेश कोकरे

@ज्योती ...खूपच छान जमलाय लिहायला ...म्हणजे लेखन मधेच कुठे भरकटलंय असा अजिबात वाटत नाहीय. पुढच्या भागाची वाट पाहतोय आतुरतेने .....

खिळवून ठेवणारी रहस्यकथा. पुभाप्र.

सोनुली's picture

11 Aug 2016 - 3:46 pm | सोनुली

पुढचा भाग टाका लवकर

अमितदादा's picture

11 Aug 2016 - 4:03 pm | अमितदादा

छान

खूप सुंदर आणि रोचक भाग झालाय, पुलेशु

पुढचा भाग लवकर टाका रियो सारखी आम्हाला वाट बघायला लावू नका.

फार च बांधुन ठेवतायेत सगळेच भाग. लवकर टाका पुढचा भाग.

ज्योति अळवणी's picture

11 Aug 2016 - 10:41 pm | ज्योति अळवणी

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्ल धन्यवाद. पुढील भाग १-२ दिवसात टाकतेच

पैसा's picture

11 Aug 2016 - 10:45 pm | पैसा

उत्कंठावर्धक लिखाण होतं आहे.

रातराणी's picture

12 Aug 2016 - 10:43 am | रातराणी

भन्नाट!! पुभाप्र!