(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. )
काय सांगू तुम्हाला! अशी एकेक विचित्र माणसं असतात ना. परवाचीच गोष्ट. आमच्या ह्यांच्या एका स्नेह्यांकडं गेलो होतो, आमच्या बंटीला घेऊन. बंटी? अहो आमचा सुपुत्र! वय वर्षे साडेतीन. पण इतका हुश्शार म्हणून सांगू, भाssरी चौकस! हं, तर त्यांच्या शोकेसमध्ये इतक्या वस्तू होत्या ना! स्वित्झर्लंडची घंटा, हॉलंडची पवनचक्की, युरोपातल्या काचेचा पेला, काय अन काय! आता लहान मूल म्हटल्यावर जिज्ञासा की काय म्हणतात ते असणारच नाही का? आणि आमच्या बंटीला तर भारीच बाई उत्सुकता! आणि आपणच मुलांच्या या गुणाला प्रोत्साहन द्यायला नको का? कारण अशा जिज्ञासू मुलांमधूनच मोठे मोठे शास्त्रज्ञ जन्माला येतात. कुठच्याही वस्तूला हात लावल्याशिवाय, उचलल्याशिवाय का त्याचा रंग, पोत, वजन ई. ई. चं ज्ञान मिळणाराय? आणि वाजवल्याशिवाय का त्या घंटेचा आवाज कळणारेय? बंटीनं साहजिकच कपाट उघडलं. त्या लेलीण बाईंच थोबाड बघायला हवं होतं. इतकं टेन्शन तिच्या तोंडावर की आम्ही काय बोलतोय तिथं तिचं लक्षच नव्हतं. मी म्हटलं सुद्धा, "साडेतीन वर्षाचं पोर ते, आत्ताच तर शिकायचं वय आहे. आणि नेहमीच तो तोडफोड करतो असं नाही काही." पण तिच्या कपाळावरची आठी हटायचं नाव नाही. मला असा राग आला म्हणून सांगू, मुलांचं एवढं पण कौतुक नाही तर बोलावतात कशाला घरी? आणि समजा, चुकून काही मोडलं, फुटलं तर आभाळ थोडंच कोसळतं? वस्तू पुन्हा आणता येते पण दुखावलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद?
हे लोक आजकालचे पेपर वगैरे वाचतच नसावेत बहुतेक. वाचन संस्कृतीचा अगदी लोप होत चाललाय तो अस्सा. पण मी मात्र सतत वाचत असते, बाल संगोपनाबाबत तर सारंच. शनिवार रविवारच्या पुरवण्यामध्ये पालकांसाठी कित्ती म्हणून लेख, सदरे( articles हो!) येत असतात. "मुलांशी प्रेमाने वागावे, त्यांना रागावू नये. मुले प्रेमामुळे किंवा लाडामुळे नाही तर शिस्तीमुळे बिघडतात." अहो किती मोलाचे आणि उपयोगी सल्ले असतात एकेक. मी सगळे वाचून एका फाईल मध्ये नीट व्यवस्थित लावून ठेवते. सहा फायल्या भरल्यात आत्तापर्यंत. तर सांगायचं असं की आम्ही मुलांना अज्जिबात म्हणजे अज्जिबात रागवत नाही. गोडच बोलतो.
परवाचीच गोष्ट. मी पालकाची भाजी केली होती. बंटीच्या नावडीची. पण काय करणार डॉक्टरांनी सांगितलंय तो स्ट्राँग व्हावा असं वाटत असेल तर हिरव्या भाज्या करत जा म्हणून. बंटी पण लब्बाड असा की त्यानं ताट भिरकावून दिलं. पण मी मुळ्ळी चिडले नाही. मी त्याला दुसरं ताट दिलं, पुन्हा भाजी वाढून. त्यानं पुन्हा फेकलं. पण मीही काही हटले नाही. असं इतक्या वेळा झालं. शेवटी भाजी संपली. पण मी मुळीच चिडले नाही, मी पुन्हा मॉलमध्ये जाऊन पालकाची जुडी घेऊन आले. त्याला पराठे करून दिले आणि शेवटी त्याला पालक खायला घातलाच.
नाहीतर आम्ही लहान असताना! बापरे! जे पानात वाढलं जाईल ते खायचंच असा दंडक असायचा. आई म्हणायची, "उद्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी कुठं बाहेर जायची वेळ आली तर प्रत्येकवेळी आवडीचं मिळेलच असं नाही. म्हणून सगळ्याची सवय पाहिजे." हे वाक्य कायमचं ऐकत आलो. मला आठवतं एकदा मी कारल्याची भाजी अशीच रागानं फेकून दिली. (माझ्यावरच गेलाय ना बंटी ?) आणि बाबा जे जाम रागावले म्हणून सांगू, होती त्याच्या दुप्पट भाजी वाढली आणि ती खाल्ल्याशिवाय जेवण मिळणार नाही म्हणून सांगितलं. मी रडले रडले. शेवटी इतकी भूक लागली की चुपचाप भाजी खावी लागली. काय करणार? आता वाटतं, केव्हढा हा दुष्टपणा? मुलांच्या कोवळ्या मनावर किती ओरखडे उठत असतील याचा कधी त्या पिढीनं विचारच केला नाही.
त्यावेळी अशी बाल संगोपन, बालमानसशास्त्र यावरची पुस्तकं, लेख वगैरे नव्हते ना. अहो लहान मुलं ती, त्यांना असली अमानुष शिस्त लावायची? आणि आजकाल देश विदेशात सगळीकडं मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट वगैरे असतात. त्यामुळं शिक्षणासाठी वा इतर कशाहीसाठी कुठही जायची वेळ आली तरी काहीही अडणार नाही या पिढीचं. आणि आजकाल या सार्या ठिकाणी हेल्थ फूड सुद्धा मिळतं.
ह्या शिस्तवाल्या पिढीचं आणखी एक पालुपद म्हणजे वस्तू जपून वापराव्यात. तोडफोड करू नये. पण खेळताना तोडफोड होणारच नाही का? अहो खेळणं आपटल्याशिवाय का त्याचा आवाज, फील कळणाराय? पुस्तकाचं पान चुरगळल्यावर असा काही सुंदर चुरचुर असा आवाज येतो म्हणून सांगू? चुरगळल्याचा वेगळा, फाडल्याचा वेगळा, फुटण्याचा वेगळा (यातही काच, मेटल, प्लास्टिक ई. चे वेगळे वेगळे आवाज असतात.) पेचण्याचा वेगळा, भिंतीवर गिरगटण्याचा वेगळा, फर्निचर जोरजोरात सरकवण्याचा वेगळा. अहो द्रव पदार्थांचे पण वेगवेगळे आवाज असतात, चहा उशीवर सांडण्याचा , पुस्तकावर सांडण्याचा, जमिनीवर सांडण्याचा! अशा या आवाजाच्या विश्वाची दारे त्यांना खुली व्हायला नको का?
परवा माझ्या मैत्रिणीकडं गेले तर तिथं तिच्या आजीचं जपून ठेवलेलं पहिलीचं पुस्तक होतं, आता आमच्या नकळत बंटीनं ते टर्र्कन फाडलं. तर माझी मैत्रीण चक्क रागावली त्याच्यावर. बंटी रडायलाच लागला. लहान आहे म्हणून काय झालं? त्याचा असा अपमान मी नाही सहन करणार कधी. मी तिथून सरळ निघूनच आले. मुलांचा आत्मसन्मान आपणच नाही का जपायचा?
त्या फाटक आजी म्हणे बंटी येणार म्हणून कळलं की सगळ्या कपाटाना कुलूपं लावून ठेवतात. सगळी चांगली चांगली खेळणी कपाटात आणि वेल्वेटचा बॉल, मोडकी पेनं अशा वस्तू बाहेर ठेवतात. आणि त्या कपाटांच्या किल्ल्या त्यांना कधीच वेळेवर सापडत नाहीत. फोन वगैरे सुद्धा अगदी उंचावर ठेवलेला असतो. मी काय मूर्ख आहे कारण न समजायला? मीही आजकाल त्यांच्याकडे जात नाही.
त्या दिवशी ह्यांना बरं नव्हतं तर आम्ही डॉक्टरांकडं गेलो होतो. डॉक्टर ह्यांना तपासत होते आणि बंटीनं त्यांचा लॅपटॉप उचलला. आहे तीन वर्षाचा, पण मोबाइल, लॅपटॉप यात भारी बाई गती त्याला. पण आमचे डॉक्टर इतके चांगले ना, म्हणाले "फार हुशार दिसतो तुमचा बंटी." एवढंच नाही तर बंटीच्या हातून लॅपटॉप पडला तरी काही बोलले नाहीत त्याला. "असू द्या असू द्या" म्हणाले. बस! मी म्हटलं ह्यांना, आता आपण नेहमी याच डॉक्टरांकडं जायचं. पण का कोण जाणं आजकाल त्या डॉक्टरांची appointment मिळेनाशी झालीय. खूप बिझी झालेत ते.
असो. काहीतरी पडल्याचा आवाज आला वाटतं. बघते, बंटी काय नवीन शिकलाय ते. पण तुम्हाला पटतात ना माझे विचार?
प्रतिक्रिया
25 May 2016 - 1:11 pm | सुबोध खरे
याच बरोबर माझ्या मुलानासुद्धा पाहुण्यांच्या देखत (स्वतःच्या किंवा दुसर्याच्या घरी) ओरडण्यास मी लाजत नसे.
दुसर्याच्या घरी जाऊन तोडफोड केलेली मला चालणार नाही हे मुलांना लहानपणापासून निस्संदिग्धपणे सांगितलेले होते.
25 May 2016 - 2:02 pm | पिलीयन रायडर
येक्झॅक्टली..!
25 May 2016 - 5:11 pm | चिगो
खुसखुशीत, खुमासदार लेख.. पोरं आहेत. ते मस्ती करणार. आम्ही त्यांच्यावर बोंबलणार. तरी नाही ऐकलं तर कांडणार.
मुलांना चुकांसाठी न ओरडणे, त्यांना चुका करण्यापासून न थांबवणे आणि त्यांना 'अज्जिबात' शाब्दिक मार किंवा गरजेनुसार कानाखाली न देणे, हा शुद्ध चु*यापणा आहे, असे मी मानतो. धन्यवाद.
25 May 2016 - 6:26 pm | सुबोध खरे
+१००
25 May 2016 - 8:04 pm | खटपट्या
+१०००
आमची कारभारीण तर भारीच कडक. पाहुण्यांच्या मुलांना धोपटायला कमी करत नाही...
25 May 2016 - 8:36 pm | रमेश भिडे
लहान मुलांना कानाखाली मारु नये. 'विशेष' भागाचाच उपयोग करावा. कानाखाली मारल्याने कानाला इजा होण्याची शक्यता असते. विशेष भागावर सढळ हस्ते चोप दिला तरी फार त्रास नसतो.
26 May 2016 - 12:27 pm | अर्धवटराव
कपील शर्मा शो मधल्या खजूरपासुन प्रेरणा घेऊन आमच्या चिरंजीवांनी एकदोनदा बापाचा बाप बनायचा प्रयत्न केला. डोळे आणि आवाजाची विशिष्ट मात्रा देऊन मोजून साडेसात सेकंदात त्याला औषधी मात्रा दिली. तेंव्हापासुन प्रकरण एकदम ताळ्यावर आलं. आईबापाचा चारचौघांसमोर पाणऊतारा करणारे मुलं आणि त्यांचे केवीलवाणे हसणारे पालक बघुन विचित्र वाटतं.
27 May 2016 - 12:26 am | रेवती
मीही काल साडेसात सेकंदात खाली आणला व आज तसाच प्रसंग मुद्दम घडवून आणला व परिणाम पाहिला तर काल्चा डोस अजून काम करतोय हे लक्षात आले. ;)
25 May 2016 - 7:30 pm | बबन ताम्बे
एकदा मित्राच्या घरी गेलो होतो. आमच्या चिरंजीवांनी त्यांच्या किचनमधे घुसून लोणच्याची बरणीच फोडली. मित्राची बायको अशी काही खाऊ का गिळू नजरेने बघत होती. ही.. ही..ही... आघावच हे. आमचं पोरगं आहेच खुप मस्तीखोर. त्याला काय कळतंय का? ऐकत नाही त्याला काय करणार !
असं कौतुक ऐकलं तर का नाही टाळकं फिरणार ? :-)
25 May 2016 - 9:03 pm | नूतन सावंत
लेख आवडला.आजच्या आईवडिलांना बहुधा एकच 'बंटी' असतो.त्यामुळे त्याला दुखावणे पालकांना जमत नाही.शिवाय पूर्वीच्या पिढ्यांमध्ये मोठ्या भावंडाला चुकीची शिक्षा मिळाली की खालच्या भावंडांना आपसूकच धडा मिळत असे,तो आता मिळणे कठीण झाले आहे.
पिरा,मधुरा तुम्ही मुलांना मार खाऊन घरी यायचे नाही,दोन घेतले तर दोन दिलेही पाहिजे,हे शिकवण्याची वेळ आली आहे.
26 May 2016 - 6:37 am | डॉ सुहास म्हात्रे
=))
26 May 2016 - 7:42 am | सिरुसेरि
"मेरा बेटा मेरा गरुर है ... आप मेरे गरुरको ना ललकारिये" ..... असे कुठेतरी ऐकले आहे .
26 May 2016 - 12:53 pm | संजय पाटिल
शंभरी निमित्त जेपी याना बोलवून सत्कार करावा हि नम्र इनंती..
26 May 2016 - 1:01 pm | रमेश भिडे
शंभरी निमित्त चार काचेच्या बरण्या, दोन रिमोटवर चालणाऱ्या गाड्या, दोन स्मार्ट फोन आणि एक बाबा असा ऐवज बंटीच्या आईला देण्यात यावा असे सुचवतो.
26 May 2016 - 4:20 pm | प्राची अश्विनी
=)=)
27 May 2016 - 4:11 pm | ब़जरबट्टू
कार्टी वय ३..
प्रसंग एक :- पोरगी मोरीत जाउन पाण्याशी खेळत असते,
मी (न रागवणारा बाबा) - बाळ, असे करू नये, गुड गर्ल असे करत नाही. Bad गर्ल असे करतात. ऐकणार तू, कारण तू गुड गर्ल आहे.
- नाही, मी Bad गर्ल आहे. धिंगाणा पुढे सुरु.. बसा बोम्बलत..
प्रसंग दोन :- दोघेही नोकरीला असतो. त्यामुळे मुलगी दिवसभर पाळणाघरात, तिथे रमते, संध्याकाळी एकदम टुण्टुण उड्या मारत असते, आपण हवा सोडलेल्या फुग्यासारखे मलुल.. मनात असते तरी वागण्यात संथपणा असतो..
त्यात पोर जेवत नाही, मोजुन काही घास, फ़ोन दिला तर मोजणे बंद होऊन छान जेवते. पण फ़ोन देणे पटत नाही (मिपा वाचक, दुसरे काय ).. उपाय म्हणून पाचच मिनिट देणार हे सांगतो. अर्थात या पाच मिनिटाची वेळ ठरवणे तिच्याच हातात जास्त असते. कधीकधी प्रकरण दणके देण्यावर जातेच.
प्रसंग तीन :- पिरातै च्या पोरासारखी दोनचार गुणी पोर खाली खेळत असतात, हिला झुला वैगरे मिळाला नाही तर ओरबाडून मोकळी. ते रडताहेत. रागाऊन झाले, डांबून ठेवले. दोनचार दणके तर आम्हीच खातो. तेव्हापुरते परत नाही करणार चे गाणे, परत दुस-या दिवशी येरे माझ्या मागल्या..
अर्थात गरज पडल्यास दणके द्यायला मी मागेपुढे पाहत नाहीच. किंबहुना अश्या वेळी राग आटोक्यात ठेवू शकणा-या आईवडिलाबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण कुठेतरी मनाला पटत नाही राव धुणे असे...