माझी ज्यूरी ड्युटी ८

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
30 Apr 2016 - 10:39 am

भाग ७

अनेक तपशिलांनी भरलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या लांबलचक साक्षी झाल्यावर काही किरकोळ साक्षी झाल्या. त्यात त्या ट्रकशी संबन्धित काही माहिती मिळाली. तो किती उंच आहे, आत सीट किती आहेत, कितपत जागा आहे. उंच मनुष्य, बुटका मनुष्य कितपत सहजपणे वावरू शकतो हे एका वाहन तज्ञाने सांगितले. फार काही नवे कळले नाही.

आता दुसरी महत्त्वाची साक्ष म्हणजे त्या आरोपीची. त्याची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. आरोपी साक्षीदाराच्या पिंजर्यात आला. तो व्यवस्थित इंग्रजी बोलत होता. ३० वर्षापूर्वी तो आर्जेन्टिना देशातून अमेरिकेत आला होता. बांधकाम व्यवसायात सुरवात करून तो आता एका कंपनीच्या मालकांपैकी एक बनला होता. आर्थिक दृष्ट्या सुखवस्तू असावा. घर, बायको, दोन मुले असे सगळे होते. त्याने असे सांगितले की त्याची त्या पीडित स्त्रीशी ओझरती ओळख होती. त्याच्या कंपनीच्या कर्मचार्यांच्या माध्यमातून ते एकदा त्या बारमध्ये भेटले होते. त्या दिवशी तो (आरोपी) एका सहकार्याबरोबर त्या बारमध्ये आला. शुक्रवार रात्र होती. त्यामुळे दुसर्या दिवशी कामावर जायचे नव्हते त्यामुळे सगळे खुशीत होते. भरपूर बियर प्यायले. नंतर तो सहकारी काही तरी काम निघाल्यामुळे निघून गेला. हा एकटाच उरला. त्या बारमध्ये एक ज्युक बॉक्स होता. त्यात नाणी घालून आपल्या आवडीची गाणी लावता येतात. बियर जास्त झाली असावी किंवा अन्य काही कारणाने असावे. त्याने त्यात नाणी घालून आपल्या आवडीची अर्जेनिटिनियन गाणी लावायचा सपाटा चालू केला. तिथे काही मेक्सिकन लोक होते. त्याना मेक्सिकन गाणी ऐकायची होती. पण ह्याने दाद दिली नाही. त्यांनी मग ह्याला शिविगाळ केली. ह्यानेही उलटी शिवीगाळ केली. बार बंद व्हायची वेळ झाली तेव्हा तो बाहेर पडू लागला तेव्हा त्या मेक्सिकन लोकांच्या गटाने ह्याला हटकले. पुन्हा बोलाचाली झाली. पण आता थोडी मारामारी सुरु होऊ लागली. आपण एकटेच आहोत हे पाहून आरोपीने आरडाओरडा करत पळ काढायचा प्रयत्न केला. ते ऐकून बारचे कर्मचारी बाहेर आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी संधीचा फायदा घेऊन आपल्या ट्रकमधे आला. त्यावेळी ती पीडिता त्याला भेटली. थोडीशी ओळख होतीच. मग तिने गप्पा मारायला सुरवात केली. आरोपीचे असे म्हणणे पडले की तो एक श्रीमंत माणूस आहे असा समज झाल्याने ती त्याच्याशी लगट करू पाहत होती. यथावकाश तिने "तो" विषय काढला. आरोपी त्याला तयार झाला. "पण मी जरा महाग आहे, तुला २०० डॉलर्स पडतील". मारामारीचे संकट टळल्यामुळे, बियरचा अंमल असल्यामुळे आणि एक आकर्षक स्त्री तयार असल्यामुळे तो लगेच तयार झाला. महिलेने आपले वाहन घेऊन आरोपीच्या ट्रकच्या मागे जायचे असे ठरले. पुरेशी रोख रक्कम नसल्यामुळे ते त्या ए टी एम ला गेले. तिथे त्याने पैसे काढले. त्याने चष्मा आणला नव्हता त्यामुळे पैसे काढायला जरा वेळ लागल. तेवढ्यात ती कारमधून उतरून त्याच्या जवळ आली. थोडी चेष्टामस्करी झाली. "भरपूर पैसे काढ! आपण खूप मजा करू", असे ती म्हणाली.
मग ते त्याच्या ऑफिसपाशी आले. त्याचा नेहमीचा किल्लीचा जुडगा त्याच्याकडे नव्हता. तो नेमकी डुप्लिकेट किल्ली घेऊन ट्रक चालवत होता. म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम ट्रकमधेच करायचे ठरवले. त्याप्रमाणे ती ट्रकमधे आली. कपडे काढले. प्रकरण रंगात आलेले असताना आरोपीला एका वाहनाच्या दिव्याचा झोत दिसला. पोलिस असला तर पंचाईत होईल, आपण एका वेश्येबरोबर पकडले गेलो तर काय होईल ह्या विचाराने तो घाबरूनच होता. त्या झोतामुळे दचकून "पोलीस" असे ओरडून तो खाली लपू लागला तेव्हा नेमकी ती "कुठे" असे म्हणत डोके वर करू लागली तेव्हा त्याचे डोके तिच्या नाकावर आपटून तिला दुखापत झाली. कुणाला दिसू नये म्हणून आरोपीने ट्रकमधील दिवेही बंदच ठेवले होते. त्यामुळेही हा अपघात झाला असावा. मग आरोपीने आपला ट्रकमध्ये असणारा एक टी शर्ट तिला दिला. तिने त्याला नाक पुसले.आता हा कार्यक्रम थांबवावा लागणार असे त्याला वाटले पण तिने नाक पुसून झाल्यावर पुन्हा सुरवात केली. कधीतरी आरोपीने शृंगारातील काही आणखी नवे प्रकार मागितले. तिने त्याला तयारी दाखवली पण त्याकरता जास्त पैसे मागितले. आरोपी तयार झाला. पण तो प्रकार काही त्यांना जमला नाही. सगळे झाल्यावर पैसे द्यायची वेळ झाली. आरोपी म्हणाला आपण एका फास्ट फूडच्या दुकानात जाऊन खाऊ पिऊ मग मी बेंकेत जाऊन तुझे पैसे देईन. मग त्याच्या ट्रकमधे बसून दोघे निघाले. फ़ास्ट फूड व ती बेंक जवळ येताच आरोपीने आपले रंग दाखवायला सुरवात केली. जास्तीच्या पैशांच्या बदल्यात ठरलेला प्रकार पूर्ण न झाल्यामुळे त्याचे पैसे मिळणार नाहीत. एवढेच काय, आधी ठरलेले पैसेही द्यायला आरोपीने नकार दिला. त्याने चक्क यू टर्न घेतला. ती महिला चिडली. तिने पैसे हवेच असा आग्रह केला. आरोपीने धुडकावले. मग तिने आरडाओरडा, किंचाळणे, शिवीगाळ सुरु केली. ती त्याच्या अंगावर धावून आली. तो ट्रक चालवता चालवता प्रतिकार करू लागला. तिने त्याच्यावर पुन्हा पुन्हा हल्ला केला. आरोपी ट्रकवरचा ताबा सुटेल म्हणून घाबरला. त्यानेही प्रतिकार केला. अंधार, नवा ट्रक, चष्मा नाही हे सगळे असताना असला हल्ला झाल्यामुळे आरोपी चांगलाच घाबरला. एका हाताने स्टियरिंग व्हील पकडून दुसर्या हाताने तिला थांबवत होता. अनेक हल्ल्यामध्ये कधीतरी तिने स्टियरिंग पकडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिची मान पकडली. आणि त्या झटापटीत तिचा गळा दाबला गेला. तिचा प्रतिकार काही काळ ढिला पडला. हे सगळे १-२ मिनिटात घडले. लवकरच ते पुन्हा त्याच्या ऑफिसजवळ आले. आरोपीने खाली उतरून दुसर्या बाजूचे दार उघडले. रागाने त्या बाईचे केस पकडून तिला बाहेर ओढून काढले. ट्रकच्या उंचीमुळे ती बाई तेव्हा ट्रकमधून खाली पडली. तिला गुढग्याला खरचटले. एव्हाना पैसे मिळणार नाहीत हे तिला कळून चुकले होते. ती चुपचाप आपल्या कारमध्ये आली. आरोपीने आपला ट्रक काढला मागोमाग ही बाई. आणि दोघे आपापल्या मार्गाने गेले. वाटेत त्या बाईने ९११ नंबर लावला आणि पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. काही तासात पोलिस आरोपीच्या घरी पोचले आणि त्याला अटक केली.

१००% विश्वासार्ह नसला तरी आरोपीचा जबाब बराच तर्कसंगत होता. जे काही वैद्यकीय पुरावे होते, व्हिडियो होता त्याच्याशी सुसंगत होता. गुन्ह्याच्या वेळेस घडलेले सर्व बोलणे हे स्पॅनिशमधे होते. पण आरोपीने त्याचे वर्णन करताना इंग्रजीत सांगितले होते.

ह्या माणसाने त्या महिलेचे ठरलेले पैसे बुडवून खरे तर फसवणुकीचा गुन्हाच केला होता. पण त्याच्यावरील आरोपात फसवणुकीचा आरोपच नव्हता त्यामुळे त्याची शिक्षा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्या महिलेने पैशाच्या व्यवहाराबाबत काहीच सांगितले नव्हते.

सरकारी वकिलाने उलटतपासणीत काही मुद्दे उपस्थित केले. "ट्रकमधील मारामारी टाळता आली नसती का? ट्रक थांबवून तिला खाली का नाही उतरवलेस?", "जर ती इतका सर्वशक्तीने हल्ला करत होती तर तिच्या जखमा आणि तुझ्या ह्यात इतकी तफावत का?" आरोपीवर निदान मारहाणीचा (assault) आरोप तरी सिद्ध व्हावा अशी तिची धडपड होती. आरोपीने त्याच्या परीने उत्तरे दिली. तो जास्त उंच ताकदवान होता त्यामुळे तो हल्ला परतवू शकला. ट्रक थांबवायचे त्याला सुचले नाही कारण गोष्टी वेगात घडल्या. सरकारी वकिलाने ह्याचीही नोंद घेतली की आरोपीने महिलेला एक पैसाही दिलेला नाही. तेव्हा हे वेश्या व्यवसाय प्रकरण कितपत खरे मानायचे?
पण आरोपीने आधीचीच कहाणी सांगितली की मारामारी, भांडण झाल्यामुळे त्याने पैसे द्यायचे नाहीत असे ठरवले होते.

ह्यानंतर एक म्हटला तर लहानसा पुरावा सादर केला गेला. आरोपीने आपल्या बायकोला तुरुंगातून फोन केला होता. तुरुंगातून केलेले फोन tap होतात. त्यातील एक संभाषण असे होते की "बाकी आरोपातून मी नक्की सुटेन पण मी नको इतक्या जोरात तिला बाहेर काढले (आय टुक हर आउट) त्याबद्दल मला बहुतेक शिक्षा होणार." दोन्ही वकिलांनी हा पुरावा मान्य केला त्यामुळे हा पुरावा स्टिप्युलेशन ह्या प्रकारचा होता. पण हे मूळचे स्पॅनिश संभाषण आणि त्याचा इंग्रजी अनुवाद हे थोडे संदिग्ध होते. ज्युरर लोकांच्या चर्चेविषयी लिहिताना तो तपशील येईलच. पण हा पुरावाही इथे सादर झाला.

ह्यानंतर बारमध्ये काम करणारी एक महिला जी पीडितेची मैत्रीण होती ती, आणि आरोपीच्या कंपनीत काम करणारे काही नोकर ह्यांच्या साक्षी झाल्या. पण त्यांनी विशेष नवे काही सांगितले नाही. उलटतपासणीही तशी सपकच होती.

यथावकाश सगळे पुरावे व जबान्या संपल्या. आता न्यायाधीश निर्णय कसा करायचा ह्याची मार्गदर्शक तत्वे समजावणार आणि मग ज्यूरर मंडळी आपला निर्णय घेण्याकरता चर्चेस बसणार असे कळले. एक वैचारिक दडपण (मला तरी) आले की एका व्यक्तीचे भविष्य आपल्या हातात आहे. जर चुकीचा निर्णय घेतला तर ती व्यक्ती आयुष्यातून उठू शकते. बलात्कार प्रकरणी असे वाटते तर खून वगैरे प्रकारात ज्यूरीवर कितीतरी दडपण येत असेल असा एक विचार मनात आला.
पुढच्या भागात निर्णय घेण्याची प्रक्रिया येईल.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

हाही भाग रोचक! पुभाप्र.

रच्याकने, बरेचसे वाचनीय लेख हे शनिवार-रविवारी टाकले जातात. त्यामुळे या दिवशीं मिपावर आल्याचे सार्थक होते! :-)

असंका's picture

30 Apr 2016 - 3:43 pm | असंका

+१

सस्नेह's picture

30 Apr 2016 - 1:22 pm | सस्नेह

उत्सुकता अजुनी कायम !
पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

30 Apr 2016 - 1:38 pm | उगा काहितरीच

+१

विवेक ठाकूर's picture

30 Apr 2016 - 2:08 pm | विवेक ठाकूर

बचावपक्षाच्या वकिलाने निवड प्रक्रियेत असा एक प्रश्न विचारला होता की "ह्या खटल्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित मुद्दे उपस्थित होऊ शकतात. हा व्यवसाय राज्यात बेकायदा मानला जातो.

त्यामुळे आरोपीनं फक्त, ती स्त्री वेश्याव्यावसाय करते इतकं सिद्ध केलं की झालं . शिवाय ती स्त्री सतत त्याच्या बरोबर आणि मागोमाग गेलीये त्यामुळे बलात्काराच्या आरोपात तथ्य उरत नाही.

तरी निर्णय काय झाला याची उत्सुकता आहेच.

मुक्त विहारि's picture

30 Apr 2016 - 3:50 pm | मुक्त विहारि

पुभालटा.

माहितगार's picture

30 Apr 2016 - 4:44 pm | माहितगार

ह्या माणसाने त्या महिलेचे ठरलेले पैसे बुडवून खरे तर फसवणुकीचा गुन्हाच केला होता. पण त्याच्यावरील आरोपात फसवणुकीचा आरोपच नव्हता त्यामुळे त्याची शिक्षा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्या महिलेने पैशाच्या व्यवहाराबाबत काहीच सांगितले नव्हते.

मला आमेरीकेतील कायद्यांची कल्पना नाही, तरी सुद्धा प्रथमदर्शनी तर्कातील कायदे विषयक गल्लत होत असण्याची साशंकता वाटते. तार्कीक दृष्ट्या विचार केल्यास असे आर्थीक व्यवहार 'अवैध करार' (व्हॉईड काँट्रॅक्ट) या प्रकारात मोडल्याने 'जो आर्थीक व्यवहार त्या राज्यातील कायद्यानुसार बेकायदेशीर आहे त्याचे पैसे मागितले जाणे सहसा शक्य होणार नाही'.

आपली लेख मालिका प्रत्यक्ष अनुभवाधारीत असल्यामुळे आणि लेखन शैलीमुळे उल्लेखनीय झाली आहे. ज्युरी पद्धतीच्या साधक बाधकते विषयी अधिक चर्चा स्वतंत्र धाग्याच्या माध्यमातून व्हावी असे वाटते. असो.

विवेक ठाकूर's picture

30 Apr 2016 - 6:47 pm | विवेक ठाकूर

कशाचे ठरलेले पैसे ? जर वेश्याव्यावसाय बेकायदेशीर आहे तर पैशाचा मुद्याच बाद होतो. शिवाय ती स्री पुरुषामागे गेल्यानं तो स्वेच्छेचा निर्णय आहे , तिथे बलात्कार सिद्ध होत नाही .

वेश्याव्यवसाय हा जगातील सगळ्यात जुना पेशा आहे असे म्हटले जाते. त्याला बेकायदा ठरवणे हेच मला मान्य नाही. तो बेकायदा ठरवल्यामुळेच असले गैरप्रकार होत आहेत. फार पूर्वी अमेरिकेत दारुबंदी आणली होती. चर्च व पुराणमतवादी लोकांच्या दबावामुळे. ह्याचा परिणाम म्हणून लोकांनी दारू पिणे थांबवले नाही उलट माफिया फोफावला, गुन्हेगारी वाढली. जो पैसे कराच्या रुपात सरकारला मिळे तो गुन्हेगारी, लाच ह्याकरता वापरला जाऊ लागला. यथावकाश ही बंदी उठवली गेली. तीच गोष्ट वेश्याव्यवसायाबाबत होत आहे.

माझा मुद्दा नैतिक आहे. कायदा असे म्हणतो की वेश्याव्यवसायातील वेश्या व गिर्‍हाईक दोघे दोषी आहेत. पण माझ्या मते वयाने प्रगल्भ असणारे लोक याबाबतीत जे करु इच्छितात त्याकरता त्यांना मोकळिक असावी. जर आरोपीने जी काही सेवा घेतली त्याकरता पैसे देणे कबूल केले असेल तर ते द्यायला हवे होते. पण पीडित स्त्रीची कहाणी फारच वेगळी होती त्यामुळे ते शक्य नव्हते.

माझा मुद्दा नैतिक आहे. कायदा असे म्हणतो की वेश्याव्यवसायातील वेश्या व गिर्‍हाईक दोघे दोषी आहेत

तिथे वेश्याव्यावसाय बेकायदा असेल तर हे तिथल्या कायद्याप्रमाणे बरोबर आहे.

पण माझ्या मते वयाने प्रगल्भ असणारे लोक याबाबतीत जे करु इच्छितात त्याकरता त्यांना मोकळिक असावी. जर आरोपीने जी काही सेवा घेतली त्याकरता पैसे देणे कबूल केले असेल तर ते द्यायला हवे होते.

माझ्या मते आपल्याला योग्य वाटणार्‍या बदलासाठी कायदा बदलायला हवा कारण न्यायालयीन निर्णय कायद्याप्रमाणे होणार.

पण पीडित स्त्रीची कहाणी फारच वेगळी होती त्यामुळे ते शक्य नव्हते.

हे काही कळलं नाही. अर्थात, ज्युरीजना स्पष्टीकरण देण्याची जरुरी नसते असं वाचलंय.

शेंडेनक्षत्र's picture

30 Apr 2016 - 8:04 pm | शेंडेनक्षत्र

ज्यूरीला कायदा हा मार्गदर्शक म्हणून वापरायचा असतो. परंतु नैतिकता, भावना ह्यावर आधारित ज्युरीचे सदस्य निर्णय ठरवू शकतात. एखाद्या वकिलाच्या भावनेला आवाहन करणार्‍या भाषणामुळे एखादा आरोपी निर्दोष ठरवला गेला तर जज असे विचारू शकत नाही की कुठल्या कायद्याच्या आधारे ज्युरीने हे ठरवले. त्यामुळे निव्वळ कायदा काय म्हणतो यावर ज्यूरी चालत नाही. वेश्याव्यवसायात फसवणूक असे थेट न म्हणता आर्थिक फसवणूक असा एखादा आरोप असता तर मी तो नक्कीच मान्य केला असता. माझ्या अन्य ज्युरर मित्रांनीही तसे केले असते असे वाटते.

>>पण पीडित स्त्रीची कहाणी फारच वेगळी होती त्यामुळे ते शक्य नव्हते.
>>हे काही कळलं नाही. अर्थात, ज्युरीजना स्पष्टीकरण देण्याची जरुरी नसते असं वाचलंय.

त्या स्त्रीने आपल्यावर बलात्कार, जबरदस्ती, अपहरण झाल्याचे सांगितले होते. त्यात आमचा व्यवहार ठरला होता असे कुठेच नव्हते त्यामुळे आर्थिक फसवणूकीचा मुद्दा येणे शक्य नव्हते.

त्यामुळे तुमचं म्हणणं आणि निर्णय प्रमाण आहेत.

ज्यूरीला कायदा हा मार्गदर्शक म्हणून वापरायचा असतो. परंतु नैतिकता, भावना ह्यावर आधारित ज्युरीचे सदस्य निर्णय ठरवू शकतात. एखाद्या वकिलाच्या भावनेला आवाहन करणार्‍या भाषणामुळे एखादा आरोपी निर्दोष ठरवला गेला तर जज असे विचारू शकत नाही की कुठल्या कायद्याच्या आधारे ज्युरीने हे ठरवले. त्यामुळे निव्वळ कायदा काय म्हणतो यावर ज्यूरी चालत नाही.

म्हणजे ट्रायल जजच्या निकालापेक्षा ज्युरीज निर्णायक असतात का ?

वेश्याव्यवसायात फसवणूक असे थेट न म्हणता आर्थिक फसवणूक असा एखादा आरोप असता तर मी तो नक्कीच मान्य केला असता. माझ्या अन्य ज्युरर मित्रांनीही तसे केले असते असे वाटते.

वेश्याव्यावसायाखेरिज आर्थिक फसवणूक होण्याचा त्या केसमधे संबंध कुठे आहे ? अर्थात, हे तुम्हालाही मान्य आहे (असं तुम्ही प्रतिसादातल्या पुढच्या भागात लिहीलंय).

त्या स्त्रीने आपल्यावर बलात्कार, जबरदस्ती, अपहरण झाल्याचे सांगितले होते. त्यात आमचा व्यवहार ठरला होता असे कुठेच नव्हते त्यामुळे आर्थिक फसवणूकीचा मुद्दा येणे शक्य नव्हते.

पण ती स्री स्वेच्छेनं त्या पुरुषाबरोबर गेली आहे ना ? मग जबरदस्तीचा आरोप कसा सिद्ध होईल ?

ज्यूरीला कायदा हा मार्गदर्शक म्हणून वापरायचा असतो. परंतु नैतिकता, भावना ह्यावर आधारित ज्युरीचे सदस्य निर्णय ठरवू शकतात...

कायद्यात बसत नसेल तरी, ज्युरी नैतिकता, भावना या तत्वांवर एखाद्याला दोषी ठरवू शकते ? क्षमा असावी मला या बद्दल माहित नाही म्हणूनच प्रश्न विचारत आहे.

अवांतर १
'अनेक दोषी सुटले तरी चालतील एक निर्दोषास शिक्षा होऊ नये' या आधूनिक न्यायालयीन तत्वाच्या हे विरुद्ध जात नाही का अशी एक शंका मनास चाटून गेली

अवांतर २: अशा साध्या सोप्या तत्वांवर भोपाळगॅस केसवाला आमेरीकन अथवा राजस्थानातली जमीन कमी किमतीत मिळवणारे जावई, आदर्शमध्ये हितसंघर्ष असलेली मंडळी चटचट निकाल देता येऊ शकतील, असे होणे नाही पण किमान विचार केल्यासे समाधान. ;)

विवेक ठाकूर's picture

30 Apr 2016 - 8:26 pm | विवेक ठाकूर

अनेक दोषी सुटले तरी चालतील एक निर्दोषास शिक्षा होऊ नये'

हे फार जुनं तत्त्व आहे.

शेंडेनक्षत्र's picture

30 Apr 2016 - 8:39 pm | शेंडेनक्षत्र

खटला सुरू झाला की न्यायालयाची प्रक्रिया अशी असते (ह्या खटल्याच्या अनुभवावरून सांगत आहे)
१. वकिलांची प्रास्ताविके (ओपनिंग स्टेटमेंट्स)
२. पुरावे सादर होणार
३. साक्षीदार, उलटतपासणी
४. वकिलांना समारोपाचे बोलण्याची संधी. (क्लोजिंग स्टेटमेंट्स)
५. न्यायाधीश ज्युरीला सूचना देणार.
६. ज्युरी आपला निर्णय करायला त्यांच्या कक्षात जाणार.
७. ज्युरी आपला निर्णय सांगणार.
८. न्यायाधीश शिक्षा सांगणार.
वरील ६ व ७ च्या दरम्यान काय होते आहे हे जज वा अन्य कुणी ऐकू वा पाहू शकत नाही. ते निव्वळ ज्यूरर मंडळीच करतात. ह्या प्रक्रियेवर कुणाचाही दबाव, प्रभाव असणार नाही ह्याकरता काटेकोर दक्षता घेतली जाते. क्र. ७ च्या पायरीवर जेव्हा निर्णय सांगितला जातो तेव्हा तो निर्णय काय आहे एवढेच विचारले जाते. तुम्ही तसे कसे ठरवलेत, का ठरवलेत वगैरे विचारायचा हक्क ना वकिलाला असतो ना न्यायाधीशाला.

विवेक ठाकूर's picture

30 Apr 2016 - 9:06 pm | विवेक ठाकूर

.

माहितगार's picture

1 May 2016 - 2:44 pm | माहितगार

ओह ओके, मग भारतीय ज्युरी नसणारी सिस्टीम स्लो असली तरी कायद्याचा किस अधिक व्यवस्थीतपाडून निर्णय देताना अधिक न्याय्य वाटते.

विवेक ठाकूर's picture

1 May 2016 - 3:57 pm | विवेक ठाकूर

आणि निर्णय फास्ट होतो.

गामा पैलवान's picture

1 May 2016 - 10:29 pm | गामा पैलवान

माहितगार,

माझ्या माहितीप्रमाणे पंचांची खटल्यातली भूमिका केवळ वस्तुस्थिती समजावून घेऊन आरोपी दोषी आहे की नाही एव्हढेच सांगण्याची असते. प्रत्यक्ष शिक्षा न्यायाधीश ठरवतात.

आरोपी दोषी आहे अथवा नाही हे दाखल झालेल्या खटल्यापुरतेच मर्यादित असते. म्हणजे खटल्यात समाविष्ट नसलेल्या गुन्ह्याबद्दल आरोपी दोषी असला तरी सदर खटल्यात तो निर्दोष असू शकतो. प्रसंगी पंचांचा निर्णय न्यायाधीश फिरवूही शकतात.

खटलाबाह्य गुन्ह्यासाठी वेगळा खटला दाखल करावा लागतो. कधीकधी सगळे खटले एकत्रित करून आरोपांची यादी सर्वसमावेशक केली जाते. अर्थात न्यायालयाच्या अनुमतीनेच हे होऊ शकते.

आ.न.,
-गा.पै.

शिक्षाही ज्यूरींद्वारे पारित केली जाते. अर्थात सुनावणारे न्यायाधीशच असतात.

बोका-ए-आझम's picture

1 May 2016 - 11:14 pm | बोका-ए-आझम

वेश्याव्यवसाय जर राज्यात बेकायदेशीर आहे, तर शिक्षा त्या महिलेला व्हायला पाहिजे. पण खटला तिच्यावर भरलेला नसल्यामुळे शिक्षा तिला होणार नाही. त्यासाठी तिच्यावर खटला भरण्याची शिफारस त्या न्यायाधीशाने करायला हवी. Solicitation as a crime starts when the proposal is offered. Reciprocating is not necessary.
साधारण निकाल काय लागेल याचा अंदाज आलेला आहे, पण उत्सुकता कायम आहे आणि याचं श्रेय तुमच्या लेखनशैलीलाच द्यायला पाहिजे.

शेंडेनक्षत्र's picture

1 May 2016 - 11:56 pm | शेंडेनक्षत्र

इंग्रजीत व्हिक्टिमलेस क्राईम म्हणजे ज्या गुन्ह्यात कुणालाही त्रास झालेला नाही असा गुन्हा. वेश्याव्यवसाय, जुगार, अमली पदार्थांचे सेवन हे सगळे बहुतांश ह्या जातकुळीतले गुन्हे आहेत (गुन्हा करणारे प्रगल्भ आहेत असे समजू) . खून, मारहाण, चोरी-दरोडा, अपहरण हे तसे नाहीत. वेश्याव्यवसायात स्त्रीपुरुष दोघे प्रगल्भ असतील आणि त्या उद्योगात राजीखुशीने सहभागी होत असतील तर तिथे बळी कोण समजायचा?
मला वाटते गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात अशा न्यायाधीश जाणीवपूर्वक काणाडोळा करत असावेत. तसेही हे गुन्हे सिद्ध करणे अवघड असते. कधी ना कधी हे व्हिक्टिमलेस क्राईम कालबाह्य समजून ते कायदे रद्द होतील असे मला वाटते. हॉलंडसारख्या देशाने हे पाऊल आधीच उचलले आहे आणि तिथे त्यामुळे प्रचंड गुन्हेगारी फोफावत आहे असे चित्र दिसत नाही. असो.

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 9:25 pm | विवेक ठाकूर

इंग्रजीत व्हिक्टिमलेस क्राईम म्हणजे ज्या गुन्ह्यात कुणालाही त्रास झालेला नाही असा गुन्हा. वेश्याव्यवसाय, जुगार, अमली पदार्थांचे सेवन हे सगळे बहुतांश ह्या जातकुळीतले गुन्हे आहेत

बरोबर कारण तिथे कुणीकुणावर बळजबरी करत नाही.

वेश्याव्यवसायात स्त्रीपुरुष दोघे प्रगल्भ असतील आणि त्या उद्योगात राजीखुशीने सहभागी होत असतील तर तिथे बळी कोण समजायचा?

सहमत. म्हणजे तुमच्या मते आरोपीनं झालेल्या कामाचे पैसे स्त्रीला (आता तीला पिडीत म्हणणं योग्य नाही), द्यायला हवे होते. पण तिथे वेश्याव्यावसाय गुन्हा असल्यानं तिला ते कायद्यानं मागता येत नाहीत. तस्मात, तीनं बलात्काराची केस दाखल करुन राजीखुशीनं झालेला सौदा, गुन्हेगारीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला.

अर्थात, पैशाच्या बाबतीत फिसकटलं की राजीखुशीनं चाललेल्या कामात बलात्काराचा आरोप होतो ही भानगड जागतिक आहे.

त्यामुळे आरोपीला बलात्काराबद्दल शिक्षा झाली तरी स्त्रीला फक्त मानसिक समाधान, पैसे गेलेच. आणि बलात्कार सिद्ध होत नाही कारण ती त्याच्या मागे गेलीये !

आता बघू काय होतं ते.

बोका-ए-आझम's picture

2 May 2016 - 12:12 am | बोका-ए-आझम

अापण नमूद केलेल्या तिन्ही व्यवसायात victims हे असतातच. वेश्याव्यवसायात ती वेश्या किंवा तो पुरुष जर जबरदस्तीने त्या व्यवसायात ढकलले गेले असतील तर ते victims आहेत असंच म्हणावं लागेल. जुगारातही victims असतातच. प्रत्येक हरणारा हा victim असतोच. अंमली पदार्थ सेवनाच्या बाबतीत तो व्यसनी माणूस हा बळीच असतो. मुळात या तिन्ही व्यवसायात Mafia किंवा ज्याला organized crime म्हणतात त्यांचं वर्चस्व आहे आणि शेवटी हे तिन्ही व्यवसाय कुणाचं ना कुणाचंतरी शोषण करतातच. वेश्याव्यवसायामध्ये victim is at the service end आणि अंमली पदार्थ आणि जुगार यांच्या बाबतीत victim is at the receiving end. मुळात victimless crime हा oxymoron किंवा वदतोव्याघात आहे. कुठल्याही गुन्ह्यात समाज हा शेवटी victim असतोच कारण गुन्हा हा सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असतो.

वाचतेय. लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचनीय आहेत या भागात.
पुभाप्र

हा भागदेखील अतिशय आवडला.. पुभाप्र

उत्सुकता ताणली गेली अाहे. या निमित्ताने एक माहिती जाणून घ्यायला अावडेल: समजा पंचांनी काही भावनिक कारणांनी किंवा अारोपीचा वकील प्रभावीपणे युक्तीवाद करू शकल्यामुळे एखाद्या अारोपीस निर्दोष ठरवले, तर न्यायधीश ते अमान्य करून सजा देऊ शकतात का? किंवा याऊलट होऊ शकते का? थोडक्यात न्यायधीशाचे काम दोषी/ निर्दोषी न ठरवता, फक्त दोषी ठरल्यास योग्य ती सजा देणे इतकेच अाहे का?

नमकिन's picture

3 May 2016 - 6:52 am | नमकिन

नियती व दुर्लक्ष असे २ पैलू असतील व त्यात पुढे कळूनही प्रगल्भ मनुष्य वाहवत जात असेल तर तो बळी/पीड़ित व्यक्ति ठरता कामा नये.
नियतिच्या बाबतीत नियंत्रणा पलिकडच्या गोष्टी, प्रकरणात गोवले जावून भोग नशिबात येणे हे बळी/बिचारे पणास पात्र ठरेल.