माझी ज्यूरी ड्यूटी ४

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 9:10 pm

आधीचा भाग

बचावपक्षाच्या वकिलाने निवड प्रक्रियेत असा एक प्रश्न विचारला होता की "ह्या खटल्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित मुद्दे उपस्थित होऊ शकतात. हा व्यवसाय राज्यात बेकायदा मानला जातो. तुम्हापैकी कुणाला धर्म वा अन्य श्रद्धेमुळे ह्या व्यवसायाविरुद्ध काही आक्षेप असतील तर सांगा". इथे कुणी आक्षेप घेतला नाही. पण खटल्यात काय होणार ह्याची एक अंधुक कल्पना आली.

सकाळी कोर्टात हजर झालो.पहिले काही दिवस कोर्ट कधीही वेळेवर सुरु झाले नाही. कधी १५ मिनिटे उशीर तर कधी अर्धा तास. आता आम्ही पुढच्या भागात येऊन बसलो. प्रेक्षकांकरता असणारा कक्ष बराचसा रिकामा. पण काही दोन चार लोक कायम दिसायचे. ते बहुधा आरोपीचे नातेवाईक असावेत असा अंदाज केला. अर्थात आम्हाला कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी बोलण्याची परवानगी नव्हती. अगदी वकील वा त्यांचे सहकारी ह्यांच्याशीही बोलायला अनुमती नव्हती. मात्र ज्युरी रुममध्ये वाट बघत असताना ज्युरी मंडळी आपापसात भरपूर गप्पा मारत. आमचे ज्युरर कोंडाळे हे सगळ्यात जास्त बडबड करणारे असावे असे वाटत होते. ज्युरी रूम बहुतेक वेळा तशी रिकामी असे. जेव्हा ज्युरीची निवड असे तेव्हा गर्दी असे. आम्हा ज्युरी लोकांमध्ये १२ पैकी ४ पुरुष व १० बायका. राखीव ४ पैकी ३ पुरुष व १ बाई. कामधंदा म्हणायचा तर एक शिक्षिका होती. एक Apple मध्ये काम करणारा, एक Microsoft. आणखी चार पाच लोक हायटेक उद्योगात होते.

पहिला कार्यक्रम हा दोन्ही वकिलांच्या प्रस्तावनेचा (ओपनिंग स्टेटमेंट्स).
पहिली पाळी सरकारी वकिलीणबाईंची. तिने तिची बाजू प्रस्तुत केली. चाळीशीतला आरोपी आणि ३० वर्षीय पीडित महिला हे एका बारमध्ये शुक्रवारी रात्री भेटले. आरोपीने तिला धमकावले आणि जबरदस्तीने तिला तिच्या कारने त्याच्या ट्रकच्या मागे यायला भाग पाडले. आरोपी हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचे ऑफिस बारपासून १-२ मैलावर आहे. तिथे त्याने तिला नेले. मध्यरात्रीची वेळ. ऑफिसमध्ये कुणीच नव्हते. ह्याने पुन्हा तिला धमकावले. तिच्यावर बलात्कार केला. तिने पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मारहाण केली. गळा दाबला. त्यावेळेस ती काही मिनिटे बेशुद्ध पडली. इतके अत्याचार केल्यावर तिला सोडून दिले. मग तिने ९११ (अमेरिकेतील आणीबाणीचा फोन नंबर) वापरून पोलिसांना कळवले. मग पोलिसांनी आरोपीला पकडले. एका श्रीमंत व्यावसायिकाने एका गरीब अशिक्षित बाईला अशा प्रकारे पिडले आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे असे त्या वकिलाने आवाहन केले.

नंतर बचाव पक्षाचा वकील उभा राहिला. त्याने प्रस्तावनेत असे सांगितले की आरोपी व पीडित महिला ह्यांच्यात काही जबरदस्ती झाली नाही. त्या बारमध्ये ते भेटले. ही बाई वेश्या आहे. रोजच्या कामात पुरेसे पैसे मिळत नाहीत म्हणून ती स्वतःहून वेश्याव्यवसाय करते. तिने त्या बारमधे आपणहून आरोपीशी गप्पा मारणे सुरु केले. दोघांच्या संमतीने शरीरविक्रयाचा व्यवहार ठरला. २०० डोलरमध्ये सौदा पक्का झाला. महिला स्वखुशीने आरोपीच्या मागे गेली. मग इथे वकिलाने हुकुमाचा एक्का खेळला. आरोपी आपला ट्रक (आपल्या मालवाहतूकीच्या ट्रकपेक्षा हा दिसायला वेगळा असतो. साधारण एस यू व्ही सारखा पण मागे सामान ठेवायला जागा हे चित्र पहा) घेऊन त्याचे खाते असणार्या बेंकेच्या ए टी एम ला गेला. तिथे त्याने पैसे काढले. मागे ही महिला तिच्या कारमधे होतीच. ह्या ब्यांकेच्या सुरक्षेसाठी चौफेर क्यामेरे लावले होते. त्यातल्या योग्य त्या क्यामेर्याचे, योग्य त्या वेळेचे चित्रण वकिलाने हस्तगत केले होते. ते त्याने प्रोजेक्टरद्वारे आम्हाला दाखवले. त्यात तो ट्रक एटीएम मध्ये शिरताना दिसला. एक माणूस बाहेर पडताना दिसला. मागे ह्या बाईंची कार होती. दोन्ही कार थांबल्या. काही वेळाने ती बाई बाहेर आली. आरोपी पैसे काढत असताना त्याच्या जवळ गेली. त्यांच्या काहितरी गप्पा झाल्या. (टेपमध्ये आवाज नव्हता). मग ती बाई आपल्या कारपाशी आली. कंबरेत झुकून तिने सलाम केल्यासारखे काहितरी केले. आणि कारमध्ये बसून दोन्ही कार बाहेर पडताना दिसल्या. वकिलाने असा दावा केला की इथे कुठेही अपहरण, जबरदस्ती चालु आहे असे दिसत नाही. मलाही ह्यात काही काळेबेरे दिसले नाही. सगळा राजीखुशीचा मामला वाटत होता. प्रत्यक्ष पुरावा म्हणता येईल असा केवळ हाच होता. आणि त्याचा अनेकदा उल्लेख झाला. ह्यानंतर दोघे त्या ऑफिसमध्ये गेले. आरोपी नेमका ऑफिसची किल्ली विसरला. मग त्यांनी आरोपीच्या ट्रकमधेच आपले कार्यक्रम सुरु केले. मध्ये कधितरी आरोपीचे डोके महिलेच्या नाकावर आपटून तिचे नाक फुटले. तेव्हा रक्तपात झाला. आरोपीने ट्रकमधील टीशर्ट काढून तिला दिला. तिने नाक पुसले आणि कार्यक्रम पुढे चालू केला. आरोपीने अन्य काही जास्तीच्या क्रियांची मागणी केली. महिला म्हणाली चालेल पण त्याकरता जास्त पैसे लागतील. आरोपीने ते मान्य केले. पण प्रत्यक्षात त्या क्रिया त्याना जमल्या नाहीत. आरोपीने ठरलेले जास्तीचे पैसे द्यायला नकार दिला कारण "तो प्रकार" त्याने केलाच नाही. ह्यातून संघर्ष झाला आणि महिलेणे प्रथम तोंडी आणि मग शारिरिक हाणामारी सुरु केली आणि मग आरोपीनेही प्रतिकार केला आणि त्यात ती महिला जखमी झाली. त्यामुळे बलात्कार, अपहरण मारहाण वगैरे गुन्हे साफ गैरलागू आहेत. आरोपी स्वत:चा बचाव करत होता. आमच्या राज्याच्या कायद्यानुसार कोणी असा हल्ला केला तर सर्व शक्तीनिशी प्रतिकार करण्याचा त्या व्यक्तीला अधिकार आहे. पळून जाणे बंधनकारक नाही (ह्याला होल्ड युवर ग्राउण्ड लॉ असे म्हणतात).

(ही टेप जर मिळाली नसती तर केवळ आरोपीचे म्हणणे आणि पिडितेचे म्हणणे ह्यावरच निर्णय ठरला असता. महिलेला सहानुभूती असल्यामुळे तिला संशयाचा फायदा मिळाला असता. आरोपीचे सुदैव हे की त्या बँकेचे कॅमेरे चालू होते आणि त्यांनी ती टेप उपलब्ध करुन दिली. )

एखादा हिंसक, अपहरण करणारा माणूस जिचे अपहरण करायचे तिला तिच्या कारने मागे यायला भाग पाडेल, आणि थेट गंतव्य स्थळी न जाता एटीएमला गाडी नेईल हे मला कधीही पटले नाही. त्यामुळे ह्यातल्या मोठ्या आरोपात काही तथ्य नाही असेच लोकांचे मत बनले. अर्थात सगळे पुरावे येईपर्यंत ह्यावर आपापसात चर्चा करायला बंदी होती.

तर आता ह्या केसबद्दल कल्पना आली. ह्यानंतर पुरावे सादर होणार होते. ते पुढल्या भागात.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

5 Apr 2016 - 9:34 pm | विवेक ठाकूर

.

राघवेंद्र's picture

5 Apr 2016 - 10:30 pm | राघवेंद्र

+१

तर्राट जोकर's picture

5 Apr 2016 - 10:20 pm | तर्राट जोकर

खरंच ह्यात काही टर्निंग प्वाइण्ट आहे का? जानने के लिये देखिये....

कपिलमुनी's picture

5 Apr 2016 - 10:31 pm | कपिलमुनी

हे सर्व इथे लिहीणे कायदेशीर आहे का?

शेंडेनक्षत्र's picture

6 Apr 2016 - 11:07 am | शेंडेनक्षत्र

केस संपल्यावर जजसाहेबांनी स्वतः सांगितले की आपण सगळे ज्युरर ह्या केसबद्दल काहीही बोलायला मोकळे आहात.

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2016 - 10:38 pm | अत्रन्गि पाउस

मला (आणि कदाचित माझ्या सारख्या काही जणांना) "आपण काय निर्णय दिला असता किंवा काय विचार केला असता " असा exercise करावासा वाटतोय त्यामुळे दोन भागांमध्ये थोडासा क्ल्यू देऊन थांबलात तर बरे होईल ...

एस's picture

5 Apr 2016 - 10:51 pm | एस

पुभाप्र.

सुरेख चालू आहे लेखमाला. गेस वर्क करायला ही आवडेल. पुभालटा..

बोका-ए-आझम's picture

5 Apr 2016 - 11:50 pm | बोका-ए-आझम

मस्तच. पण असं सरधोपट आटपू नका हो.

अभ्या..'s picture

6 Apr 2016 - 12:00 am | अभ्या..

मस्त मस्त. अशा दोन्ही साइडच्या कथा असल्या की इंटरेस्ट वाढतो. ;)

उगा काहितरीच's picture

5 Apr 2016 - 11:58 pm | उगा काहितरीच

वाचतोय .... एक शंका :- केस अशी पब्लिक फोरमवर टाकणे हे लिगल आहे का ?

फेरफटका's picture

6 Apr 2016 - 1:19 am | फेरफटका

जर केस चा निकाल लागला असेल तर केस चे डिटेल्स हे पब्लिक रेकॉर्ड असतात.

जुइ's picture

6 Apr 2016 - 2:35 am | जुइ

पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.

तात्पर्य : वेश्ये बरोबर देवाण घेवाण करताना केमेरा जवळ ठेवावा. ह्यातून बलात्काराच्या आरोपातून जरी माणूस वाचला तरी वेश्या गमनाच्या आरोपा खाली आणि बेटरी खाली जेल मध्ये नक्की जाईल असे वाटते.

फार छान लिहिले आहे.

उगा काहितरीच's picture

6 Apr 2016 - 10:26 am | उगा काहितरीच

वेश्या गमनाच्या आरोपा खाली

वेश्यागमन हा आरोप आहे ? (भारतात /भारताबाहेर ?)
टीप : प्रश्न केवळ उत्सुकतेपोटी विचारलेला आहे . नोंद घ्यावी. धन्यवाद !

हुप्प्या's picture

6 Apr 2016 - 10:09 pm | हुप्प्या

अमेरिकेतील बहुतेक राज्यात वेश्याव्यवसाय बेकायदा आहे. पण दोन सजाण नागरिक आपापसात स्वेच्छेने काहीही करायला स्वतंत्र आहेत. आणि दोन सजाण नागरिक एकमेकांना पैसे, भेटवस्तू देऊ शकतात. त्यामुळे इथेही अनधिकृतरित्या वेश्याव्यवसाय चालतोच. त्यावर कायदेशीर कारवाई करणे तितके सोपे नसते. कारण व्यवसाय करणारे कायद्यातील त्रुटी ओळखून असतात. असो.

अनुप ढेरे's picture

6 Apr 2016 - 10:22 am | अनुप ढेरे

रोचक आहे केस!

उगा काहीतरीच,

माझ्या मते भारतात वेश्याव्यवसाय अनधिकृत नाही. सहाजिकंच वेश्यागमन देखील गुन्हा नसावा. मात्र वेश्यादलाली करणे गुन्हा आहे.

आ.न.,
-गा.पै.

अजया's picture

6 Apr 2016 - 4:55 pm | अजया

पुभाप्र

शंतनु _०३१'s picture

6 Apr 2016 - 5:13 pm | शंतनु _०३१
शंतनु _०३१'s picture

6 Apr 2016 - 5:13 pm | शंतनु _०३१

नविन माहिती,उत्कंठावर्धक मालिका. पु ले शुभेच्छा