वॅली ऑफ फ्लॉवर्स : ५ : हेमकुंड साहिब

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
22 Jan 2016 - 3:34 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

आदल्या दिवशी वॅलीमध्ये पोहचायला आम्हाला उशीर झाला. मग उशिरामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप कमी वेळ वॅलीचा आनंद लुटता आला. आज वॅलीसाठी ठेवलेला दुसरा (जादा) आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे आम्ही आज काहीही करून लवकर पोहचुन जास्तीत जास्त वेळ वॅलीमध्ये काढण्याचं ठरवलं होतं. पण निसर्गाच्या मनात तसं काही नव्हतं.

मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं. आम्ही खाऊन झालं कि पुढे निघतोय असं सांगुन निघालो. बाकीच्यांना अजून वेळ होता. त्यांच्यावर लवकर आवरायला दबावसुद्धा टाकायचा होता, आणि कोणी उशीर केलाच तर आज थांबुन वेळसुद्धा घालवायचा नव्हता.

आम्ही नाश्त्याला जाऊन बसलो. एक एक जण येऊ लागले. भरपूर धुकं आणि ढग होते. थेंब थेंब पाऊस सुरु झाला होता. आमचं खाणं चालू असताना जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही डोक्यावर हात मारून बसलो. घ्या आता लवकर निघुन काय फायदा? सगळे येउन बसले, खाऊन झालं तरी पाउस थांबला नाही.

आम्ही बराच वेळ थांबलो. मग आमचे मॅनेजर देवकांत यांनी एक पर्याय सुचवला. कि तुम्ही आज हेमकुंडला जाऊन या. तिकडे जायला पावसामुळे काही बिघडत नाही, आणि उलट उन्हाऐवजी ढग आणि पाउस असेल तर चांगलंच. आम्हाला ते पटलं.

काही जणांनी दुपारच्या जेवण्यासाठी अंडी असलेले कॉम्बो बांधून घेतले होते. ते बदलून पूर्ण शाकाहारी गोष्टी घेतल्या. तसे हेमकुंडला जाताना लंच सोबत न्यायची गरज नसते, तिकडे गुरुद्वारेच्या लंगरमधेच जेवणे होतात. पण आज हेमकुंडचा दिवस नसल्यामुळे लंच तयार होता. आमची इच्छा होती कि अनावश्यक ओझं वाढू नये. पण देवकांत नि त्यांची टिपिकल लाइन मारलीच. "ले लो यार, मेरे पैसे तो लग गये है इसमे. गिन के बनाते है ये लोग. आप नही लोगे तो ये होटलवाला तो फेक देगा इसको. इससे अच्छा आप ले जाओ. रस्ते मे काही खा लेना."

आम्ही पुन्हा रूमवर गेलो. लवकर आवरायचं म्हणून आम्ही अंघोळीवर पाणी सोडलं होतं. आता हेमकुंड गुरुद्वाऱ्यात जायचं म्हणजे तसं कसं चालेल? पुन्हा आवरून निघण्यात वेळ गेला. मी आज कॅमेरा घेतलाच नाही. हेमकुंडला जाताना खूप उंची आणि विरळ ऑक्सिजनमुळे खूप जणांना त्रास होतो असं विकीपेडिया, आणि नेटवर वाचलं होतं आणि ऐकलंही होतं. त्यामुळे फोटोपायी त्रास वाढवुन घेण्याऐवजी मी त्या दिवसापुरतं फोन आणि बाकी लोकांच्या फोटोग्राफीवर विसंबून राहायचं ठरवलं.

आवरून निघेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला आणि थेंब थेंब सुरु होता. घांगरीयातून वॅली आणि हेमकुंडकडे जाण्याचा रस्ता एकच आहे, पुढे एका धबधब्यापाशी ते रस्ते वेगळे होतात. तिथे पोहचेपर्यंत पाउस पूर्ण थांबला. आता इकडे जावे कि तिकडे जावे असा प्रश्न होता. पण आम्ही हेमकुंडला जाणार म्हणून सगळे गाईड पुढे गेले होते. उशीर तर झालेलाच होता. कालपेक्षा कमी वेळ मिळाला असता. आणि वॅलीमध्ये दुसऱ्या दिवशी तर आम्हाला अजून लांब जायचं होत. आम्ही आता हेमकुंडलाच जाण्याचं ठरवलं.

वर जाईपर्यंत पूर्ण आभाळ मोकळं झालं आणि कडक उन पडलं. वॅलीचे डोंगर दिसत होते, तिकडे काही वेळ ढग दिसत होते. आम्ही आमची समजूत काढत होतो, कि ठीके तिकडे ढग आहेत अजून. नसतं दिसलं काही. पण तिकडे पण आभाळ साफ झालं आणि आमची फजिती झाली यावर शिक्कामोर्तब झालं.

घांगरीया ते हेमकुंड हे अंतर ६ किमी आहे. हेमकुंडची पायवाट जवळपास पूर्ण रस्त्यावर मोठी आणि प्रशस्त आहे. चालत जायचं बस. चिंचोळ्या रस्त्यावरची चढाई नाही. पण जी चढण आहे ती खूप तीव्र नसली तरी सतावत राहते. रस्ता मोठा आहे. सपाटीवरचं अंतर आणि चढाईवरचं यात हाच फरक आहे. चढताना तेच अंतर दुप्पट वाटतं.

दोन अगदी तरुण पंजाबी पोरं आमच्या पुढेमागे वर निघाली होती. त्यातल्या एकाकडे सामान होतं आणि एकाकडे गॉगल. गॉगलवाला भरपूर स्टाईल मारत होता. सामान घेऊन मागे येणाऱ्यावर लवकर चल म्हणुन दमदाटी करत होता. थोड्याच वेळात त्यांचा दम निघाला, आणि त्यांनी वाटेत भेटलेली पोनी ठरवली आणि त्यावर बसून गेले.

जसं जसं आम्ही वर गेलो तसं तसं उन भरपुर वाढलं. आणि त्यामुळे खुप त्रास होऊ लागला. भरपुर घाम येउन डीहायड्रेशन झालं. आणि शरीरातलं त्राण कमी होऊ लागलं. थांबत थांबत जाऊ लागलो. सुरुवातीला सगळे एकमेकांसाठी थांबत थांबत जात होते. पण असं खुपदा केलं कि सगळ्यांनाच थकवा येतो. आमचा बाकीचा ग्रुप आणि मी आणि निखिल यातलं अंतर वाढत गेलं. आणि नंतर तर ते दिसेनासेच झाले. त्यालासुद्धा तसाच त्रास होत होता.

आम्ही दोघं एकमेकांपासून काही पावलांच्या अंतरावर सावकाश चाललो होतो. निखिल ला खूपच त्रास होत होता. काही पावलं चालुन काठीच्या आधाराने उभ्याउभ्याच किंवा जागा मिळाली तर कुठेतरी बसुन विश्रांती घेत होता. मी आता मुद्दाम ठरवून बिलकुल बसत नव्हतो. तसं केलं कि जास्त थकवा येतो असं वाटत होतं.

आता दुपार झाली होती आणि तिकडून लोक परत येत होते आणि आम्ही पोहोचलोसुद्धा नव्हतो. आमच्या चेहऱ्यावरूनसुद्धा आमची हालत दिसत असावी. वरून परत जाणारे शीख भक्त लोक आम्हाला धीर देत होते. "कोई नई जी, पोहोच गये बस. वो उधर रहा उपर. १० मिनट मे पोहोच जाओगे." ते १० मिनिट काही संपता संपत नव्हते.

चल थोडंच राहिलं आता असं एकमेकांना म्हणत आम्ही वर पोहोचलो शेवटी. पूर्ण शरीराची वाट लागली होती. बाकी जणांचं दर्शन झालं होतं. गुरुद्वारेचा दरवाजा पण बंद झाला होता. आम्हाला वाटलं इतकं रखडत वर येउन काही फायदा नाही, पण हरप्रीत आला. त्याने तिथल्या लोकांना पंजाबीमध्ये काहीतरी बोलून विनंती केली. त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.

i1

आम्ही आत गेलो आणि एकदम शांत वाटलं. वेगळंच समाधान.

गुरु गोविंदसिंग पूर्वीच्या जन्मात इथे तप करत होते असा शिखांच्या धर्मग्रंथात उल्लेख आहे. तसंच लक्ष्मणानेसुद्धा इथे तप केले असल्याचे वाचले. त्यामुळे त्यांचा पूर्व जन्मीचा किंवा काही तरी संबंध आहे अशी मान्यता आहे. नेमका मला कळाला नाही. तिकडे काही चित्रांमध्ये गुरु गोविंद सिंग आणि लक्ष्मण असे दोन्ही दाखवले आहेत.

i2

त्यामुळे हि जागा हिंदू आणि शीख दोन्हींसाठी पवित्र आहे. इथे लक्ष्मणाचे मंदिरसुद्धा आहे. काही वर्षांपूर्वी इथे गुरुद्वारा बांधला गेला. त्याची रचना पाहून मला सिडनी ओपेरा हाउसची आठवण आली.

खुप वर्षांपूर्वी नांदेडच्या गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो होतो त्यानंतर आजच. माझ्या शहरात, औरंगाबादलासुद्धा एक छान गुरुद्वारा आहे. सगळीकडेच जी स्वच्छता असते, तिथल्या सेवकांचा नम्रपणा, शांतपणे होणारं प्रसाद वाटप, लंगर मधली शिस्त, ते पाहुन आल्याचं समाधान वाटतं. नांदेड, औरंगाबाद, हेमकुंड तिन्ही ठिकाणी माझा अनुभव असाच होता.

स्वच्छ आणि शांत धार्मिक स्थळे पहिली कि मला थोडं छान वाटतं, थोडा हेवा वाटतो, आणि थोडा आपल्या मंदिरांचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या, राग येतो. अंगावर येणारे दुकानदार, उद्धट पुजारी, ढकलाढकली करणारे रक्षक, रांगेत मधूनच घुसणारे लोक इ. इ. गर्दीची जागृत देवस्थाने टाळून, जवळपासची शांत, कमी लोकप्रिय मंदिरात जाण्याचा हल्ली माझा कल असतो. असो. मंदिरांचा विषय निघाला कि नेहमीच असं भरकटायला होतं.

i3

बाहेर आलो आणि तिथल्या कुंडाकडे गेलो. ह्या कुंडामुळेच ह्या जागेचं नाव हेमकुंड आहे. हेम (संस्कृत) म्हणजे बर्फ. ७ बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे कुंड. हिवाळ्यात पूर्ण गोठलेलं. आम्ही गेलो तेव्हा वितळुन पाणी तर होतं पण अतिथंड. त्या कुंडात डुबक्या मारायचं आम्ही ठरवलं होतं.

आमचे मॅनेजर देवकांत यांना आम्ही जेव्हा सांगितलं कि आम्ही डुबकी मारणार आहोत. तेव्हा ते म्हणाले "बेस्ट लक. मै इतनी बार गया हु वहा लेकिन बस २००८ मे एक हि बार मैने डुबकी लगायी. एक बंदे को केमरा पकडा दि फोटो निकालने. अंदर गया और तुरंत वापस. फोटो तो आयी हि नही. मैने कहा भाडमे जाये फोटो, एक बार का पुण्य बस हो गया."

i4

आम्ही हिम्मत करून डुबकी मारली. भयानक थंड होतं पाणी. सगळे मोठमोठ्याने ओरडत होते. त्या थंड वातावरणातसुद्धा पाण्याबाहेर आलो कि लगेच गरम वाटलं इतकं ते पाणी थंड होतं. मग फोटोसाठी पुन्हा. मग मी विषम आकडा करावा म्हणुन अजून एकदा उतरलो. असं प्रत्येकाने १, २, ३ अशा वेगवेगळ्या वेळा डुबक्या मारल्या. मस्त हुडहुडी भरली मग.

अंग घासून कोरडं केलं, कपडे बदलले. आणि लक्ष्मणाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. मग थोडे फोटो काढले.

i5

इथलं पाणी खूप पवित्र समजतात म्हणून सगळ्यांसाठी कॅन आणल्या. त्यात पाणी भरून घेतलं.

i6

आता उन पूर्ण गेलं आणि धुकं गडद होऊ लागलं. थंड वारे वाहू लागले. पाहता पाहता समोर स्पष्ट दिसत असलेलं कुंड धुक्यात हरवू लागलं.

i7

लंगरमध्ये पटकन जेवून खाली निघणं भाग होतं. येण्यात खूप उशीर झाला होता त्यामुळे आता फक्त आमचा ग्रुप वर उरला होता. बाकी सगळे खाली निघाले होते.

जेवण झालं कि पुन्हा मी आणि निखिल मागे राहायला नको म्हणून आम्ही तडक पुढे निघालो. त्या घाईत आमचा हलवा खाण्याचा राहिला. त्या थंडीमध्ये गरम गरम हलवा खाउन मजा आली असती, पण ते राहूनच गेलं.

येताना उन पूर्ण जाऊन त्याजागी गडद धुकं आलं होतं. उन नसल्यामुळे खाली जाताना काही त्रास झाला नाही. आरामात थांबत थांबत आलो. हळू हळू बाकी लोक पण पुढे आले.

आणि जगातलं सर्वात उंच ठिकाणी असलेलं गुरुद्वारा पाहून, हेमकुंडात स्नान करण्याच (काही असलंच तर ते) पुण्य पदरात घालुन आम्ही घांगरीयाला रूममध्ये परतलो. आणि दाबून जेवण करून बिछान्यावर कलंडलो.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

काही कारणांमुळे हि मालिका लिहिण्यात खूप खंड पडत आहे. ज्यांनी आधीचे भाग वाचले आहेत त्यांचा उशिरामुळे थोडा रसभंग झाला असेल. त्याबद्दल क्षमस्व. इथून पुढचे भाग लवकरात लवकर लिहून प्रकाशित करण्याचा मानस आहे.

पैसा's picture

22 Jan 2016 - 4:20 pm | पैसा

छान लिहिलंय आणि फोटोही छान!

अजया's picture

22 Jan 2016 - 4:21 pm | अजया

छान वर्णन.पुभाप्र

पद्मावति's picture

22 Jan 2016 - 6:09 pm | पद्मावति

सुंदर वर्णन आणि फोटो.

स्पा's picture

22 Jan 2016 - 7:30 pm | स्पा

मस्त लिहिताय

आम्ही हिम्मत करून डुबकी मारली. भयानक थंड होतं पाणी. सगळे मोठमोठ्याने ओरडत होते.
बापरे ! इतक्या गार पाण्यात कशी काय डुबकी मारली ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas

हा स्वाक्षरी काय प्रकार असतो तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये?

आकाश खोत's picture

25 Jan 2016 - 1:32 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

नाखु's picture

25 Jan 2016 - 2:04 pm | नाखु

आणी प्रचि..

वाचक नाखु

मस्त वर्णन करताय. वाचक स्वतःच फिरतोय असे वाटते. प्रत्ययदर्शी.