वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
3 Feb 2016 - 3:26 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५

वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे.

वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता. पण त्यादिवशी सुद्धा सकाळी पाउस पडल्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून हेमकुंडला गेलो आणि नंतर कडक उन पडून आमची फजिती झाली.

आता आज खरोखरीच शेवटचा दिवस होता. आज पाऊस पडो कि न पडो, धुकं असो वा नसो आम्हाला वॅलीमधेच जाणे भाग होते. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घांगरीयामधून पुन्हा गोविंदघाटकडे निघायचे होते.

आमचे मॅनेजर देवकांत यांनी सांगितलेच होते, कि एकदा वॅलीमध्ये जाऊन आल्यावर सहसा लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यात आळशीपणा करतात, आणि हेमकुंडला जाऊन येउन आराम करतात, किंवा हेमकुंडला जाण्याआधी एक दिवस घांगरीयामधेच जवळपास वेळ घालवतात.

सकाळी आमच्या ग्रुपमधूनसुद्धा थोडी गळती होईल अशी चिन्हे दिसत होती. आदल्या दिवशी हेमकुंडला जाऊन आल्यामुळे सगळ्यांना थोडा थकवा तर आलाच होता. पण शेवटी एकमेकांच्या उत्साहाचा सगळ्यांवर परिणाम झाला आणि सगळेच जण निघाले.

असे म्हणतात कि जे होते ते चांगल्यासाठीच ते खरे वाटावे असा त्या दिवशीचा अनुभव होता. सकाळपासुन थोडं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वॅलीमध्ये पोहचेपर्यंत तिथे फिरून येईपर्यंत धाकधुक चालू होती. पण पाऊस पडला नाही.

मध्ये चढताना काही वेळ उन पडून गेले, थोडासा त्रासही झाला. पण पुन्हा गेले आणि वातावरण जरा सुखद झाले. माझी आणि निखिलची पुन्हा वेगळी गम्मत झाली. आम्ही चढताना थोडे मागेच होतो. काही वेळ मी सगळ्यात मागे होतो. आणि माझ्या थोडं पुढे निखिल. उन्हामुळे त्राण कमी होऊन माझा वेग खूपच मंदावला होता. पण मी आज ठरवलं होतं कि कितीही वेग कमी असला तरी चालत राहायचं. उभ्या उभ्या थांबून लगेच निघायचं. निखिल काल सारखाच पुन्हा पुन्हा थांबत होता. पण मी त्याच्या जवळ पोचलो कि तडक पुढे जात होता. रस्ता चिंचोळा होता म्हणून ओव्हरटेक करता येत नव्हतं. आणि मलाही खूप वेगात पुढे जायचं नव्हतं म्हणुन मी त्याच्या मागेच चालत होतो. पण मला मजा वाटत होती.

थोड्यावेळाने आम्ही एका झऱ्यापाशी पाणी प्यायला थांबलो. बाकी काहीजण पण होते. तिथुन रस्तापण जरा मोठा होता. आणि वॅलीपण जवळ आली होती. मी पाणी पिउन ताजातवाना झालो आणि मग जवळपास न थांबताच पुढे गेलो.

आज ग्रुपमधल्या लोकांमध्ये तसं खूप जास्त अंतर नव्हतं. निखिल जेव्हा पोचला तेव्हा त्याने सांगितलं कि काल जसे आम्ही दोघंच मागे राहिलो होतो, तसं होईल असं त्याला वाटत होतं. पण माझी परिस्थिती कालपेक्षा बरी होती म्हणून मी पुढे गेलो तर तो एकटाच राहिला असता आणि त्याला मग पुढे यायचा उत्साह कमी झाला असता, म्हणून तो मला येऊ देत नव्हता. :D. पण आज उन तुलनेने कमी असल्यामुळे, आणि बाकीचे खूप पुढे नसल्यामुळे काल इतकी वाईट परिस्थिती नाही झाली.

घांगरीया हे छोटेसे गाव आहे. तिकडे फक्त पावसाळ्यात लोक जाऊन दुकाने हॉटेल्स चालवतात. त्यामुळे तिथली क्षमता मर्यादित आहे. म्हणून टूर कंपन्या गट करून साधारण एकाच वेळापत्रकानुसार लोकांना तेथे आणत असाव्यात.

स्वतःच्या योजनेनुसार, किंवा तंबूमध्ये सामानसुमान घेऊन येणाऱ्या गटांबद्दल मी बोलत नाही. किंवा हेमकुंडच्या दिशेने जाणाऱ्या शीख यात्रेकरू यांच्याबद्दलसुद्धा नाही. त्यांना गोविंदघाट, आणि घांगरीया या दोन्ही ठिकाणी अजून गुरुद्वारा आहेत, तिथे आसरा, मदत मिळते.

पण जसा आमचा मुळात आदला दिवस वॅलीसाठी होता तसाच बाकी अनेक जणांचा सुद्धा होता. आम्हाला वॅली पावसाशिवाय पाहण्याची अति हौस असल्यामुळे फक्त आम्ही तो दिवस टाळून हेमकुंडला गेलो. पण बाकी सगळे जण थांबले किंवा वॅलीमध्येच गेले.

i1

त्यामुळे आज फक्त आम्ही वॅलीमध्ये गेलो. बाकी एखाद दुसरे एकटे फिरणारे परदेशी लोक सोडता वॅलीमध्ये कोणीही नव्हते. वॅली आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखी वाटत होती.

भरपूर भटकलो आम्ही. खूप दूरपर्यंत जाऊन आलो. पहिल्या दिवशी आम्ही घांगरीयापासून साधारण ६ किमीपर्यंत आलो होतो. आज १० किमी आलो. म्हणजे आजची पूर्ण पदयात्रा २० किमीची होती.

i2

पाउस नसल्यामुळे दूरपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं. आधी एवढा स्पष्ट व्ह्यू मिळालाच नव्हता.

i3

भरपूर प्रकारची फुलं असली तरी वॅली नेटवर पाहिलेल्या फोटो सारखी फुलांनी गच्च भरलेली नव्हती. हिमालय मूलतःच इतका सुंदर आहे, त्यामुळे आमच्या समोरची दृश्ये छानच होती.

पण फुलांमुळे थोडा अपेक्षाभंग झाला. गाईडकडून याचं कारण समजलं ते असं. ह्या भागात दर वर्षी पूर्ण बर्फ जमतो आणि तो उन्हाळ्यात वितळल्यावर फुले यायला सुरुवात होते. आणि मग तापमान, पाउस, यावर प्रत्येक फुलाच्या जातीचा एक हंगाम असतो. साधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त फुलं असतात. त्यामुळे आमची वेळ निश्चितच बरोबर होती. पण या वर्षी बर्फच जरा उशिरा वितळला होता. म्हणुन अजून म्हणावी तितकी फुले नव्हती.

i4 i5 i6

आम्ही थोड्या मनातल्या मनात अन थोड्या उघडपणे शिव्या दिल्या. कि हे आधी सांगता येत नव्हतं का? १-२ आठवडे सुट्टी काढुन, दूरचा प्रवास करून आपण इतक्या वर येउन पोहोचल्यावर, जेव्हा थोडा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्याचं शास्त्रीय कारण ऐकून काही समाधान होत नाही. त्याच वर्षी १० जणांच्या सुट्या पुढे मागे ढकलणं अवघड आहे. पण आम्ही पुढच्या वर्षी आलो असतो.

मुद्दा असा कि, पुन्हा येणं अशक्य जरी नसलं तरी असे मोठे बेत सहजासहजी होत नाहीत. एवढ्या दूरची जागा एकदा पाहिली असेल तर आपण बेत आखताना दुसऱ्या जागांना साहजिकच जास्त प्राधान्य देतो.

पण ते शेवटी व्यावसायिक लोक. म्हणावी तितकी फुलं आली नाहीत म्हणून घेतलेली आगाऊ रक्कम परत करून आरक्षण त्यांनी स्वतःहून रद्द करणे तर अशक्यच. त्यापेक्षा आम्ही ठरवलेल्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, गाईड देतो, फिरवून आणतो, फुलं कमी कि जास्त ते आमच्या हातात नाही म्हणून हात वर करणे हेच सोपं आहे.

पण मी म्हटल्याप्रमाणे "थोडा"च अपेक्षाभंग. कारण आम्हाला अनुभवायला मिळालं ते सौंदर्यसुद्धा अप्रतिम. आणि ह्या ट्रीपमध्ये बेत आखताना, जाताना, येताना, फिरताना, सगळ्याच गोष्टीत आम्ही भरपूर आनंद लुटला होता.

i7

i8

काही ठिकाणी आनंद तिथल्या वैशिष्ट्यांमुळे येतो, काही ठिकाणी आपल्या सोबत असलेल्या लोकांमुळे. आणि कधी त्या दोन्हींमुळे.

i9

i10

i11

प्रेमकथांमध्ये त्या जोडप्याला कुठे तरी दूर दूर जाण्याची इच्छा असते असं दाखवतात. आणि संन्यासी लोकसुद्धा जगापासून वेगळे होण्यासाठी शांत जागी जातात. हि जागा तशीच होती. बाकी जगाचा काहीच संबंध नाही. एकदम शांत. सोबतचे लोक पुढे मागे झाले, किंवा फोटो काढण्यासाठी कुठे रेंगाळलो तर पूर्ण शांतता. आणि आजूबाजूला फक्त सुंदर दृश्य. वेड लावेल इतका सुंदर आहे हिमालय.

जर चाललं असतं तर तिथेच पडून राहून एक रात्र काढायची इच्छा होती. तिथे मावळणारा आणि उगवणारा सूर्य पहायची इच्छा होती. पण काय करणार?

i12

फिरत फिरत, फोटोज काढत, भरपूर पाण्याचे ओढे पार करून आम्ही गाईडच्या मते शेवटच्या टोकाला पोचलो.

i13

गाईडच्या मते यासाठी म्हटलं कि, त्या पुढेसुद्धा वॅली पसरलेलीच आहे. पण तिकडे कोणी जात नाही. तिकडून परत यायला इतका वेळ लागतो कि, आणि तिथे मुक्काम किंवा संध्याकाळपर्यंत फिरलेलं चालत नाही. आणि पुढे जास्त नवीन फुलेही नाहीत, आतापर्यंत पाहिलेलीच फुले इस्ततः विखुरलेली आणि कमी संख्येने दिसतात.

i14

मग आम्ही जर निवांत एका नदीकिनारी बसलो. सोबत आणलेले डबे काढुन जेवलो. चिक्कार सोलो आणि ग्रुप फोटो काढले.

i15

गाईड इथून लवकर परत जायला घाई करत होता. उन कमी होऊन आता पुन्हा ढग यायला लागले होते. जाताना पाऊस पडला तर रस्त्यात लागलेल्या कुठल्याही ओढ्यांचा प्रवाह वाढू शकतो असं त्याला वाटत होतं. आमच्यापैकी काही जण अजून किती पुढे जाता येईल ते बघत होते. त्याला आग्रह करून आम्ही काही जण अजून पुढे एका हिमखंडापर्यंत जाऊन आलो.

थोडासा पाउस पडला तरीही सुदैवाने गाईडला भीती होती तसं काही झालं नाही. आम्ही सावकाश, टाइमपास करत, ती इंद्राची बाग (वॅली) शेवटची डोळ्यात भरून घेत तिथून बाहेर पडलो.

---

ता. क. आज शेवटचा दिवस म्हणून प्राणी पक्षी यापैकी कसले तरी फोटो काढायचेच म्हणून परतीच्या वाटेवर जवळपास अर्धा तास खर्च करून काढलेले फोटो. खूप इकडे तिकडे पळुन हाती लागले फक्त लाल चिमणी

i16

आणि बिन शेपटीचा पहाडी चुहा. (म्हणतात ना, खोडा पहाड, निकला चुहा. :D)

i17

i18

क्रमशः

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

3 Feb 2016 - 3:31 pm | विजय पुरोहित

अप्रतिम!!! फोटो पाहूनच दिल खुष!!!

आकाश खोत's picture

4 Feb 2016 - 4:30 pm | आकाश खोत

धन्यवाद :)