सिंहलव्दीपाची सहल : १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Dec 2015 - 11:37 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

येथून पुढचा प्रवास सुरू झाल्यावर एकदम वेगळ्याच परिसरात आल्यासारखे वाटू लागले. आतापर्यंत पाहिलेला श्रीलंकेचा सर्वच भाग सुंदर हिरव्यागार जंगलाने भरलेला होता. इथून पुढे त्याच्यावर वरताण करणारे सौंदर्य दिसू लागले. या डोंगराळ भागात, गाडी जसजशी अधिकाधिक उंचीवर जाऊ लागली, तसतशी भोवतालच्या पर्वतराजीचे व त्यावरच्या वृक्षराजीचे स्वरूप बदलू लागले. निसर्गसौंदर्य अधिकाधिक सुंदर होऊ लागले... जणू या भागाला "लिट्ल इंग्लंड" का म्हणतात याचे पुरावे आता निसर्ग देऊ लागला होता ! अर्थातच, या भागातले सर्वात मोठे आणि सर्वात सुंदर नुवारा एलिया हे शहर पाहण्याचे वेध लागले होते.

इथून पुढचा प्रवास हाच एक सुंदर अनुभव होता. हिरव्यागार डोंगरदर्‍यानी भरलेल्या मनोहारी निसर्गातून घाटाच्या वळणावळणाच्या वाटेने जाताना...


नुवारा एलियाकडे ०१

कधी एखादा धबधबा दिसत होता...


नुवारा एलियाकडे ०२

तर कधी डोंगर उतारावर एखादी छोटीशीच पण टुमदार वस्ती आणि तिच्या शेजारची हिरव्या रंगाचा तोचतोचपणा दूर करून चकीत करणारी निसर्गाच्या रंगांची उधळण दिसत होती...


नुवारा एलियाकडे ०३

जसजशी परिसराची उंची वाढू लागली तशी झाडांची उंचीही वाढत होती आणि काहीशी सूचिपर्णी वाटणारी झाडे दिसायला सुरुवात झाली...


नुवारा एलियाकडे ०४

नुवारा एलियाच्या पहिल्या वस्तीचे दर्शन झाले आणि या शहराला व परिसराला लिट्ल इंग्लंड का म्हणतात याची पहिली झलक दिसली...


नुवारा एलियाकडे ०५ : पहिली झलक

***************

नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड

समुद्रसपाटीपासून १८६८ मीटर उंचीवर असलेले हे शहर चारी बाजूंनी चहांच्या मळ्यांनी वेढलेले आहे. ते श्रीलंकेतले चहाच्या व्यापाराचे मुख्य ठिकाण आणि मुख्य पर्वतीय पर्यटक आकर्षण आहे.

या जागेचे भारताशी पौराणिक नाते आहे. श्रीलंकन लोकांच्या मताप्रमाणे ही जागा रावणाच्या राजधानीचे ठिकाण होते. त्याने सीतेला येथून जवळच असलेल्या सीता एलिया (सीता पठार, अशोकवन) या जागी बंदी करून ठेवले होते. हा परिसर डोंगराळ असूनही इथल्या मातीचा सर्वात वरचा थर काळा आहे आणि तो रंग मारुतीरायाने जाळलेल्या रावणाच्या राजधानीच्या राखेमुळे आहे असे म्हणतात.

येथून जवळच असलेल्या कोतमाले दरीत अनुराधापुरा कालखंडापासून (सुमारे इ स पूर्व चवथे शतक) वस्ती असल्याचे पुरावे आहेत. जीवनदायी जलौघांचे जनक असलेल्या या परिसराचे श्रीलंकन राजांनी एखाद्या खजिन्यासारखे संरक्षण केले आणि त्याची हानी होऊ नये यासाठी येथे महाल अथवा वस्ती निर्माण करण्याचे प्रयत्न कटाक्षाने टाळले. याबाबत त्यांचा साधा सरळ हिशेब असा होता : "निसर्गाचा खजिन्याचे संरक्षण केले तर पाण्याच्या खजिन्याचे संरक्षण होते आणि पाण्याच्या खजिन्याचे संरक्षण केले तर भातशेतीचे संरक्षण होते".

इ स १८१८ मध्ये डॉ जॉन डेव्ही याला शिकार करताना ही जागा दिसली. त्याने ब्रिटिश गव्हर्नर बार्नेसला दिलेल्या माहितीत तेथे असलेले "अनेक अशोक वृक्ष", हत्ती, वन्यप्राणी आणि किमती दगडांचा (रत्ने) उल्लेख होता. डेव्ही या जागेच्या प्रेमात पडला व त्याने तेथे एक आरोग्यधाम (health resort) स्थापन केले. हे आरोग्यधाम थोड्याच काळात जगप्रसिद्ध झाले. खुद्द गव्हर्नर बार्नेसने ८,००० पौंड खर्चून स्वतःसाठी बांधलेले "बार्नेस हॉल" नावाचे विसावास्थान (holiday home) बांधले. ते आजही येथे १५० खोल्यांच्या ग्रँड हॉटेलच्या रूपाने अस्तित्वात आहे. इंग्लिश इंजिनियर सॅम्युएल बेकर याने या शहराची रचना व्हिक्टोरियन इंग्लिश गावे डोळ्यासमोर ठेवून केली. येथल्या स्थापत्यामध्ये आजवर हीच प्रथा कायम ठेवलेली आहे. हे विशेष या परिसराचे "लिट्ल इंग्लंड" हे नाव सार्थ करते. या शहराची मुख्य भरभराट, वसाहतवादाच्या काळात, युरोपियन (मुख्यतः ब्रिटिश) चहाच्या व्यापार्‍यांचे "व्यापार आणि आराम (बिझनेस आणि प्लेझर)" करण्याचे ठिकाण म्हणून झाली.

अश्या या श्रीलंकेतल्या लिट्ल इंग्लंडची काही क्षणचित्रे...


नुवारा एलिया ०१

.


नुवारा एलिया ०२

.


नुवारा एलिया ०३

.


नुवारा एलिया ०४

.


नुवारा एलिया ०५

.


नुवारा एलिया ०६

.


नुवारा एलिया ०७ : ग्रँड हॉटेलचा एक भाग

.

श्रीलंकेत इतर सर्व ठिकाणांवर जेवढ्या प्रकारची फुले मी पाहिली त्यापेक्षा जास्त एकट्या नुवारा एलियात पाहिली. हे त्यातल्या काही फुलांचे फोटो...


नुवारा एलिया ०८ : फुलांचे भांडार

.

सूर्यदेव ढगाआडून मध्ये मध्येच दर्शन देत होते. त्यामुळे, थंडीत कुडकुडत का होईना पण अर्धा दिवसभर गावात भरपूर भटकून घेतले. जसे सूर्यदेव क्षितिजाजवळ पोचले तशी थंडी खूपच वाढली आणि पाय आपोआप हॉटेलकडे वळले. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. जेवणाच्या कक्षाकडे जाताना नुवारा एलियाला उशीरा भेट दिल्याबद्दल वरूणराजाचे आभार मानले. भरल्या पोटाने, आज डोळे भरून पाहिलेल्या निसर्गसौंदर्याचा चित्रपट मिटलेल्या डोळ्यांनी परत एकदा पाहत पाहत झोपी गेलो.

***************

सहलीचा पाचवा दिवस उजाडला. पावसाचा जोर कमी झाला होता, पण रिपरिप चालूच होती. हवेत सुखद गारवा होता. कावकाव करणार्‍या पोटातल्या कावळ्यांचे पुरेपूर समाधान करून मोहीम पुढे चालू केली...


नुवारा एलिया ०९

.


नुवारा एलिया १०

.

आजच्या सहलीच्या पहिल्या भागात रावणाने सीतामाईला जेथे बंदी करून ठेवले होते त्या अशोकवनातून प्रवास करायचा होता.

.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
   
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
    १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

नैसर्गिक हिरव्या रंगाने डोळे निवले.
ग्रँड हॉटेल पाहून तशीच इमारत कोठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय.
पहिले गुलाबी व दुसरे पिवळे अशी दोन फुले सोडता बाकी सगळी पाहण्यात आहेत.
येथेपर्यंत प्रवास छान झालाय. आता शितामाईचे दर्शन होईल अशी आशा.

एस's picture

28 Dec 2015 - 6:00 am | एस

सुंदर भाग.

सुंदर फुलं.छान गाव.पुभाप्र.

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 12:56 pm | प्रचेतस

अगदी टुमदार गाव आहे. प्रचंड सुंदर आणि हिरवाईने नटलेले.

दिपक.कुवेत's picture

28 Dec 2015 - 1:17 pm | दिपक.कुवेत

शांत वाटलं हिरवाई बघून. सफर छान चालली आहे. प्रत्येक भागात प्रतिसाद द्यायला जमत नसलं तरी वाचतो आहे हिच पोचपावती.

पद्मावति's picture

28 Dec 2015 - 3:49 pm | पद्मावति

सुंदर!

सुधीर कांदळकर's picture

28 Dec 2015 - 7:07 pm | सुधीर कांदळकर

चित्र क. १० झकासच.

मदनबाण's picture

28 Dec 2015 - 7:51 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2015 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !