सिंहलव्दीपाची सहल : ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
30 Nov 2015 - 2:10 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

चार तासात अनुराधापुरा बघणे म्हणजे प्रचंड धावपळ होते यात संशय नाही. पण ठराविक वेळात आपली धावती भेट संपवून पुढच्या आकर्षणाकडे पळणे भाग होते. पुढचे आकर्षण होते मिहिन्ताले... अशोकपुत्र महिंदा (महेंद्र) आणि राजा देवनामपिया पहिल्या भेटीचे ठिकाण... जेथून श्रीलंकेत बौद्धधर्माला सुरुवात झाली.

मिहिन्ताले अनुराधापुरापासून १२ किमी दूर आहे. गाडीत आरामात बसल्यावर जरा बरे वाटले. रात्रीचा विमानप्रवास केल्यावर दिवसभराची धावपळ करवून घेणार्‍या आमच्या टूर कंपनीच्या नियोजनाचा मनातल्या मनात उद्धार करून झाला. त्यातही दिलेला मार्गदर्शक-कम-ड्रायव्हर खरोखरच "मार्गदर्शक कम और ड्रायव्हर जादा होता." त्यामुळे, अगोदर संशोधन-वाचन करून जाण्याच्या सवयीचा या सहलीत पुरेपूर फायदा झाला. प्रवासाच्या आराखड्यातील प्रत्येक ठिकाण दाखविण्याच्या बाबतीत त्याच्याशी तडजोड शक्य नव्हती. पण, त्याच्याकडून मोघम माहितीपेक्षा जास्त काही कळण्याची शक्यता फार कमी आहे हे कळून चुकले होतो. एक मात्र खरे की, कमिशन देणार्‍या दुकानात जाण्याचा आग्रह न करता व मध्ये उगाच वेळ न दवडता एका आकर्षणांकडून दुसरीकडे गाडी पळविण्याचे काम तो कुशलतेने करत होता. त्यामुळे आमचे सौदार्ह्य कायम राहिले. मात्र, या सहलीने दिल्लीतील (आणि सर्वसाधारणपणे भारतातील) सहलकंपन्यांच्या 'पर्यटकांच्या वैयक्तिक गरजांप्रमाणे बेतलेल्या (कस्टमाईझ्ड)' सहलींचे नियोजन करण्याच्या पात्रतेबद्दल माझ्या मनात मोठे प्रश्नचिन्ह उभे केले ते आजतागायत कायम आहे. हल्ली म्हणजे २०१४ पासून काही कंपन्यांनी या खास पर्यटनप्रणालीत रस घेतलेला दिसतो. पण त्याचा मला अजून प्रत्यक्ष अनुभव नाही. असो.

मिहिन्ताले

ही श्रीलंकेतल्या सोळा पवित्र स्थानांपैकी (सोलोस्मास्थान) एक असलेली जागा आहे. येथील पवित्र मिस्साका पब्बता (Missaka Pabbata, मिस्साका पर्वत) या टेकडीवर अरहत महिंदा थेरा आणि राजा देवनामपिया तिस्सा यांची पहिली भेट झाली.

या भेटीबाबत अशी कहाणी सांगितली जाते. महिंदा आपल्या अनुयायांसह अनुराधापुरा नगरीत जाण्यासाठी येथून जात असताना, घनदाट जंगलातील मिस्साका पर्वतावरील एका मोठ्या शीळेवर चढून मार्गाचा अंदाज घेत असताना, त्यांना खाली कोणीतरी हरिणाची शिकार करताना दिसले. महिंदांने त्याला ओरडून हरिणाची शिकार करू नको असे सांगितले आणि 'तिस्सा कोठे आहे ?' अशी राजाबद्दल एकेरी शब्दांत विचारणा केली. खालच्या जंगलातला शिकारी खुद्द राजा देवनामपिया तिस्सा होता. एक संन्यासी आपल्याबद्दल असे अरेतुरे करत विचारणा करत विचारत आहे हे पाहून राजाने रागाने "मीच राजा तिस्सा आहे. तू कोण आहेस?" असे विचारले. त्यावर महिंदाने त्याला "मी अशोकपुत्र महिंदा. तुलाच भेटायला आलोय." असे सांगितल्यावर मात्र राजाचा सगळा गर्व नाहीसा होऊन त्याने महिंदाला खाली येण्याची विनंती करून स्वागत केले. या शीळेजवळच असलेल्या जागेवर महिंदाने तिस्साला उपदेश करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि श्रीलंकेत बौध्दधर्माचा प्रारंभ झाला व सुरुवातीलाच राजाश्रय मिळाल्याने त्याचा वेगाने प्रसार झाला. त्यानंतर अनेक चढउतार पाहत पाहत आजच्या घडीला तो श्रीलंकेतील बहुसंख्याक धर्म आहे. आजच्या श्रीलंकेतील ७०% जनता बौद्धधर्मीय आहे. पाली व सिंहला भाषेतले बरेच पुरातन बौद्ध साहित्य श्रीलंकेत आजतागायत सांभाळून ठेवलेले आहे.

जंगलात असलेल्या या डोंगराळ जागेवर अनेक टेकड्या, मोठ्या शिला आणि गुहा विखुरलेल्या आहेत. ३०० मीटर उंचीच्या मिस्साका पब्बतावर जाण्यासाठी १८४० दगडी पायर्‍या चढून जावे लागते...


मिस्साका पब्बतावर जाण्यासाठी असलेल्या दगडी पायर्‍या (मागे महा स्तूपाचा काही भाग दिसत आहे) (जालावरून साभार)

दगडी पायर्‍यांचा पहिला टप्पा चढून गेले की आपण एका सपाटीवर पोहोचतो. या जागेवर पूर्वी एक रुग्णालय, वैद्यकीय स्नानगृहे (मेडिकल बाथ), भोजनालय, भिक्कूंच्या स्नानासाठी असलेले सिंहमुखी स्नानगृह आणि बौद्ध भिक्कूंसाठी राहण्याची सोय होती. या जागेतल्या उत्खननात अनेक प्राचीन शिलालेख मिळालेले आहेत. हाईन्झ म्युल्लर-डिएट्झ या जर्मन डॉक्टरने लिहिलेल्या "हिस्टोरिया हॉस्पिटॅलियम" या रुग्णालयांच्या इतिहासावरील पुस्तकात मिहिन्तालेचे रुग्णालय जगातले सर्वात पहिले रुग्णालय असल्याचा दावा केला आहे.

मात्र, आता तेथे रुग्णालय, सिंहमुखातून पाणी येणारे स्नानगृह, भोजनगृह, इत्यादींचे काही मोजकेच अवशेष शिल्लक आहेत...


मिस्साका पब्बताच्या पायथ्याजवळ असलेले अवशेष ०१ : भोजनगृह

.


मिस्साका पब्बताच्या पायथ्याजवळ असलेले अवशेष ०२

.

येथून थोड्या दूरवर एक दुरवस्थेत असलेला कंटका स्तूप दिसतो. १३० मीटर व्यासाच्या या स्तूपात अनेक कोरीवकामे आहेत असे वाचले होते. पण त्याची पडझडीची अवस्था आणि जाण्यासाठी सुलभ वाट नसल्यामुळे तेथे जाणे धोक्याचे आहे असे मार्गदर्शकाने सांगितले. थोड्या विचारानंतर त्याचे म्हणणे मान्य करणे योग्य वाटले...


मिस्साका पब्बताच्या पायथ्याजवळ असलेले अवशेष ०३ : दूरच्या टेकडीवर कंटका चैत्य दिसत आहे

.

पायर्‍यांचा दुसरा टप्पा चढून गेल्यावर आपण टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या पठारावर येतो. मिहिन्ताले या शब्दाचा सिंहलीमधला अर्थ "मिहिन थाले उर्फ मिहिंदाचे पठार" असा आहे.

आराधना गला

पठारावर पोहोचल्यावर एका उंच शीळेकडे निर्देश करून मार्गदर्शक म्हणाला, "आराधना गला". आराधना गलाच्या माथ्यावर जाऊन तिच्यासंबंधाने ऐकलेली कथा कशी घडली असेल याचा अंदाज बांधण्याचा मोह होतोच !

याच शिलेच्या माथ्यावर उभे अरहत महिंदाने राजा तिसाला हाक मारली होती. झिजलेल्या दगडी पायर्‍या व दुरावस्थेत असलेल्या धातूच्या सळयांच्या रेलिंगचा आधार घेत या शीळेवर चढाई करावी लागते. हे गिर्यारोहण किंचित धोकादायक असले तरी टोकावर पोहोचल्यावर दिसणार्‍या नजार्‍याने आपण ते विसरून जातो !


आराधना गला

शिलेच्या माथ्यावरून मिस्साका पब्बतावर असलेल्या अनेक आकर्षणांचे आणि आजूबाजूच्या निसर्गाचे विहंगम दर्शन होते. सर्वप्रथम, जवळच्या टेकडीवर असलेली विशाल बुद्धमूर्ती आपले लक्ष वेधून घेते...


आराधना गलावरून दिसणारी बुद्धमूर्ती

.

दुसरीकडे राजा महादाथिका महानागाने (इ स ७ ते १९) बांधलेला आणि आता जीर्णोद्धार करून पूर्वरूपात आणला गेलेला ४१ मीटर व्यासाचा महा स्तूपा उर्फ महा सेया दिसतो...


आराधना गलावरून दिसणारा महा स्तूपा

.

तर अजून एका दिशेला पायथ्याशी शिकार करणारा राजा तिस्सा अरहत महिंदाच्या दृष्टीला कसा पडला असेल याचा अंदाज बांधता येतो...


आराधना गलावरून अरहत महिंदाने हाक मारली तेव्हा राजा तिस्सा उभा असलेली जागा

.

या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणून पाचूचे बेट चारी बाजूला असंख्य हिरव्या छटांचे निसर्गसौंदर्य उधळत आपल्या नजरेला गारवा देत असते...


आराधना गलावरून दिसणारे वनसौंदर्य

.

अंबस्थला दागोबा

शिलेवरून खाली आल्यावर जवळच असलेल्या अंबस्थला दागोबा या छोट्या स्तूपाकडे गेलो. अरहत महिंदा आणि राजा तिस्सा यांच्या पहिल्या भेटीच्या जागेवर हा स्तूप बांधलेला आहे. राजाच्या विनंतीवरून काही काळ अनुराधापुरामध्ये धार्मिक प्रवचनांसाठी जात असले तरी अरहत महिंदांनी बहुतेक सर्व वेळ मिस्साका पब्बातावरच व्यतीत केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष या स्तूपात जतन केलेले आहेत. हा स्तूप प्राचीन काळी एका इमारतीमध्ये बंदिस्त होता. आता त्या इमारतीचे केवळ दगडी खांब स्तूपाच्या सभोवती शिल्लक उरले आहेत...


आराधना गलाच्या पार्श्वभूमीवर अंबस्थला दागोबा आणि भोवतालच्या प्राचीन इमारतीचे दगडी खांबांच्या रूपाने उरलेले अवशेष

.


अंबस्थला दागोबातिल महिंदाचे अवशेष जतन करणारे मंदिर

.


अंबस्थला दागोबाशेजारील राजा तिस्साचा पुतळा

.

मंदिराच्या भिक्कूंशी थोडी बातचीत करून टेकडी उतरायला सुरुवात केली.


अंबस्थला दागोबा मंदिरातील भिक्कूबरोबर

.

मिस्साका पब्बत उतरून खाली आलो तेव्हा काल रात्रीच्या विमानप्रवासात झालेले जागरण, आजचा झालेला पाचेक तासांचा (२००-२२५ किमी) चारचाकी प्रवास, तीन आकर्षणे पाहण्यात झालेली धावपळ (ज्यात मिस्साका पब्बत चढून उतरणेही सामील होते) या सगळ्याचा थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे जेव्हा मार्गदर्शक म्हणाला की आता सरळ पोलोन्नारुवामधिल हॉटेलवर जाऊ तेव्हा जरासे हायसेच वाटले !

गाडी परत पाचूच्या महिरपीतून धावू लागली आणि त्या दोनेक तासांच्या प्रवासात मी मागच्या आसनावर ऐसपैस बसून कधी बाहेरचे निसर्गसौंदर्य पहा तर कधी मस्त डुलकी घे असा कार्यक्रम चालू ठेवला.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

30 Nov 2015 - 2:17 pm | बॅटमॅन

हाही भाग एक नंबर. तिस्सा आणि महिंदाच्या भेटीचे स्थळ एकदम जबराट आहे. एकूणच लंका म्हणजे स्तूपदेश असेच म्हणावेसे वाटते. अफाट.

बाबा योगिराज's picture

30 Nov 2015 - 2:28 pm | बाबा योगिराज

मस्त लिहिलय वो डॉक्टर साह्येब.. मस्त सफर घडवलित आपल्या शेजाऱ्याची... आवड्यास.

जातवेद's picture

30 Nov 2015 - 2:42 pm | जातवेद

क्रमशः नाही आहे, सफर संपली का?

भानिम's picture

30 Nov 2015 - 2:51 pm | भानिम

सुंदर वर्णन आणि सुंदर फोटो डॉ. साहेब!

मस्त सफर. केवळ प्रवासवर्णनच नव्हे, तर तेथल्या भूराजकीय इतिहासाचीही ओळख करवून देण्याच्या आपल्या शैलीने नेहमीच भुरळ घातली आहे. फारच छान लेखमाला.

फारच रोचक माहिती आणि फोटो ! प्रथमपासून अतिशय उत्सुकतेने वाचत आहे.
एक्काकाकांच्या सफारी या नेहमी वाचल्या नाही, तर अनुभवल्या जातात.

विलासराव's picture

30 Nov 2015 - 4:27 pm | विलासराव

चालली आहे यात्रा.

विलासराव's picture

30 Nov 2015 - 4:29 pm | विलासराव

चालली आहे यात्रा.

मस्त चाल्लीय मालिका, फक्त ते दागोबा सारखं एका प्रसिद्ध मिपासंबोधनाची आठवण करुन देत राहतं.

=))

हा हा हा, अगदी हेच म्हण्णार होतो. =))

रेवती's picture

30 Nov 2015 - 6:22 pm | रेवती

चित्रे व वर्णन आवडले.
राजा महेंद्र व तिस्सा यांची भेट डोळ्यासमोर आली.
आपल्याकडे जशी सगळीकडे देवळे असतात तसे त्यांच्याकडे दागोबे असल्यासारखे वाटतेय.

स्वाती दिनेश's picture

30 Nov 2015 - 7:19 pm | स्वाती दिनेश

वर्णन आणि फोटो आवडले, लंकेत जायला लावणार ही चित्रं आणि वर्णन..
स्वाती

लंकेत बौद्ध धर्माची एवढी तीर्थस्थळं प्रेक्षणीय आहेत याचा पत्ताच नव्हता.सर्व ठिकाणं नोटेड!

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2015 - 8:41 pm | टवाळ कार्टा

सफर मस्त चाल्लीये...पण तुम्च्या सग्ळ्या सफरींमध्ये ते निळे शर्ट आणि निळी जीन्सच दिस्ते याचे कारण कै? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2015 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या पोशाखांकडे इतके बारकाईने लक्ष ठेवल्याबद्दल ध्यण्यवाड ! ड्वाले भरून वेग्रे आले ;) =))

मला पिवळ्या, तांबड्या रंगाची जीन घालायला नाही, त्यामुळे तसं झालं असावं :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2015 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

*** ...जीन घालायला आवडत नाही...

स्रुजा's picture

10 Dec 2015 - 3:38 am | स्रुजा

हे म्हणजे त्या नानु सरंजाम्याच्या नाटकातल्या चटणी कलर च्या पडद्यांसारखं झालं :D

हा ही भाग सुरेख झालाय. लंका आता बकेट लिस्ट मध्ये बरंच वरच्या क्रमांकावर आलंय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2015 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे अनेक धन्यवाद !

प्रचेतस's picture

30 Nov 2015 - 9:29 pm | प्रचेतस

जबराट झालाय हा भाग.
श्रीलंकेत स्तूप आणि दागोबाच जास्त दिसताहेत. चैत्य मात्र त्यामानाने बरेच कमी.
दागोबा हा सिंहली शब्द असून 'धातुगर्भ' हे त्याचे संस्कृत स्वरूप. दागोबा म्हणजे बुद्धाचा दात, केस, एखादे हाड अशा अवशेषांवर उभारलेला स्तूप.

बाकी देवानामपिया हे संबोधन तिस्सा वापरत असावा की नाही ह्याबद्दल शंका वाटते. हे संबोधन अशोक स्वत:साठी वापरत असे. अशोकाचे जवळपास सर्वच लेख ' देवानामापिया पियदसी' ह्या संबोधनाने सुरु होतात. महेंद्राने तिस्सा ह्याला दीक्षा दिल्यानंतरच त्याने हे संबोधन वापरायला सुरु केले असावे असे वाटते. त्यापूर्वी मात्र तसे हे असंभवनीयच वाटते.

पद्मावति's picture

30 Nov 2015 - 9:59 pm | पद्मावति

सफर मस्तं चाललीय. हा भागही खूप आवडला. पु.भा.प्र.

सुधांशुनूलकर's picture

2 Dec 2015 - 11:54 am | सुधांशुनूलकर

नेहमीप्रमाणे हा भागही खूप आवडला.
नेहमीप्रमाणे यापूर्वीचेही सर्व भाग आवडले.
नेहमीप्रमाणे फोटोही सुंदर.
नेहमीप्रमाणे मस्त चाललीये सफर
नेहमीप्रमाणे पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2015 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद ! :)

तुमच्यासारख्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच लिहायला हुरूप येतो.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 3:50 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट हा भाग पण!

अंबस्थला दागोबा=गंडस्थला आगोबा!

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

पैसा's picture

9 Dec 2015 - 11:21 pm | पैसा

वाचायला आणि फोटो बघायला जाम मजा येते आहे!

सुमीत भातखंडे's picture

11 Dec 2015 - 3:02 pm | सुमीत भातखंडे

सगळेच भाग मस्त होताहेत...

सुरेख वर्णन, माहीती आणि फोटो..
धन्यवाद

कपिलमुनी's picture

15 Dec 2015 - 2:14 pm | कपिलमुनी

रंजक लिखाण `!