सिंहलव्दीपाची सहल : ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Nov 2015 - 3:59 pm

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

पाचूच्या बेटाच्या हिरव्यागार वनराईतून प्रवास करत आम्ही प्राचीन श्रीलंकेची राजधानी अनुराधापुराकडे कूच केले.

अनुराधापुरा : प्राचीन लंकेची राजधानी

कोलंबोच्या २५० किमी पूर्वेस असलेल्या या जागेवर इ स पूर्व दहाव्या शतकापासून मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे, हे स्थान जगातली सर्वात पुरातन काळापासून मानववस्ती असलेल्या जागांपैकी एक समजले जाते. इ स पूर्व ७०० ते ६०० या कालात या जागेवरची वस्ती ५० हेक्टर (१२० एकर) इतक्या क्षेत्रफळावर पसरली होती. सम्राट अशोकाची पुत्री संघमित्ता (संघमित्रा) हिने बरोबर आणलेल्या बोधगयेतल्या महाबोधी वृक्षाच्या फांदीपासून बनलेला श्रीलंकेतला बोधीवृक्ष याच नगरीत अजूनही जोमाने वाढत आहे.

महावंश या लिखित इतिहासाप्रमाणे सिंहला वंश स्थापन करणार्‍या राजपुत्र विजयसिंह याच्या अनुराधा नावाच्या एका अनुयायाने या जागेवर अनुराधापूरा नावाची नगरी वसवली. तशी ही नगरी प्राचीन श्रीलंकेची सर्वात पहिली राजधानी नाही. पण भव्य रेखीव नगररचना आणि तिच्यातील आजपर्यंत वापरात असलेली अनेक भव्य स्थापत्ये व इतर अनेक स्थापत्यांचे बर्‍याच अंशी उरलेले अवशेष यामुळे ती जगप्रसिध्द आहे. पहिल्या तंबापन्नी व दुसर्‍या उपतिस्सा नुवारा राजघराण्यांनंतरच्या आलेल्या तिसर्‍या राजरता राजघराण्याच्या पांडूकभय नावाच्या राजाने या नगरीला आपली राजधानी बनवली. तेव्हापासून पुढे सुमारे सलग १३०० वर्षे हे नगर श्रीलंकेतील सर्वोच्च धार्मिक व राजकीय केंद्र होते, ते अगदी इ स ९९३ पर्यंत. भारतातिल चोल साम्राज्याने या शहराला ९९३ मध्ये पादाक्रांत केल्यावर ते अनावस्थेत गेले. घनटाट जंगलाने वेढून टाकलेल्या या शहराचा जिर्णोध्दार करून त्यातील राजमहाल, बुध्दमदिरे आणि इतर महत्वाच्या वास्तूंचे अवशेष पर्यटकांसाठी खुले केले गेले आहेत. अनुराधापुरा परिसराला युनेस्कोप्रणित जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला आहे.

महावंश या ग्रंथातील वर्णनापणे चार उपनगरे असलेले हे शहर शहररचनेचा आदर्श होते. पांडूकभयाच्या मूळ नगरातील स्थापत्यामध्ये नंतर आलेले अनेक राजे अधिकाधिक भर घालत गेले. अनेक महाप्रवेश्व्दारे असलेल्या या शहरात केवळ मोठे स्तुप व महालच नव्हते तर रुग्णांलये, प्रवाश्यांसाठी धर्मशाळा, (कमीत कमी) एक जैन मंदिर, बागबागिचे, मोठे हवनघर (the house of the Great Sacrifice) आणि समाजातल्या विविध स्तरांतील लोकांसाठी स्मशानभूमी होत्या. विविध पंथांच्या व स्तरांच्या बुध्दभिक्कूंसाठी, गांधारातून (आधुनिक अफगाणिस्तानमधून) आलेल्या यवन (योन) बौध्द धर्मियांसाठी, हिंदूंसाठी, व्यापार्‍यांसाठी आणि इतर लोकांसाठी वेगवेगळे निवासी विभाग होते. तेथे अनेक धर्मशाळा आणि रुग्णालयेही होती. अनेक मानवनिर्मित पाण्याचे तलाव निर्माण करून त्यातून शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा करणारी प्रगत प्रणाली बनवलेली होती. त्यापैकी पूर्वी राजाचे नाव दिलेला एक तलाव बसवक्कुलम या बदललेल्या नावने आजही आस्तित्वात आहे. पांडूकभयाच्या काळात या नगरीचा आकार एक चौरस किमी इतका मोठा होता. अर्थातच तो उत्तरोत्तर वाढत गेला.

इतकी पार्श्वभूमी माहीत करून घेतल्यावर, चला आता अनुराधापुरामध्ये फेरफटका मारायला. या स्थानावर धार्मिक-ऐतिहासिक महत्व असलेल्या इतक्या जागा व गोष्टी आहेत की त्या सर्व धावत्या भेटीत पाहणे शक्य नाही. परंतू, त्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तूंना व अवशेषांना मात्र आपण जरूर भेट देऊ...


प्राचीन अनुराधापुरा शहरातील महत्वाच्या वास्तूंच्या व अवशेषांच्या जागा दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)

.

रुवानवेलिसाया (Ruwanwelisaya) दागोबा

सिंहली भाषेत बौध्द स्तुपाला दागोबा असे म्हणतात. परत सुस्थितीत आणलेला भव्य आकाराचा रुवानवेलिसाया स्तुप त्याच्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे जितका जगभरच्या बौध्द भाविकांसाठी पवित्र तिर्थस्थान आहे, तितकाच तो इतर पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षण आहे.

राजा दातुगेमुनु (Dutugemunu) याने इ स १४० मध्ये चोल राजा एलाराचा पराभव करून परत सर्व लंकेवर सत्ता स्थापन केल्यावर या 'दुधाच्या थेंबाच्या आकाराच्या' स्तुपाची उभारणी सुरू केली. दुर्दैवाने बांधकाम चालू असतानाच त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजा सध्दातिस्साच्या कारकिर्दीत हा स्तुप बांधून पुरा झाला. १०३ मीटर उंची (आजच्या साधारण ३५ मजली इमारतीची उंची) आणि २९० मीटर परिघ असलेला हा स्तुप प्राचीन स्थापत्यशास्त्रातले एक महाकाय आश्चर्य आणि त्याकाळच्या जगतातील अतीऊंच इमारतींपैकी एक मानला जातो.

महावंश या ग्रंथातील नोंदीप्रमाणे, राजा मेनांदर या ग्रेको-बॅक्ट्रियन राजाच्या राज्यातील (सद्याच्या अफगाणिस्तानमधील काबूलच्या १५० किमी उत्तरेस असलेल्या) अलासान्ड्रा शहरातील यवन मुख्य भिक्कू (Yona Head Monk) आपल्या ३०,००० अनुयायांसह या स्तुपाच्या उद्घाटनसमारंभाला आला होता.

जगभरच्या बौध्दधर्मियांमध्ये पवित्र समजला जाणारा हा स्तुप श्रीलंकेतील १६ पवित्र स्थानांपैकी (सोलोस्मास्थान) आणि अनुराधापुरामधील ८ पवित्र स्थानांपैकी (अतामास्थान) एक समजला जातो. हा स्तुप महाथुपा (महास्तुप), स्वर्णमाली चैत्य, स्वर्णमाली महासेती व रत्नमाली दागोबा या नावांनीही ओळखला जातो.

अनुराधापुराच्या जवळपास गाडी आल्यावर ऊंचच उंच वृक्षांच्याही शेंड्यांच्या खूप वर दिसणारा रुवानवेलिसाया स्तुपाचा कळस सर्वप्रथम आपल्या डोळ्यात भरतो.


रुवानवेलिसाया ०१ : दुरून होणारे कळसाचे प्रथमदर्शन

दुरून दिसणार्‍या कळसामुळे त्याच्या उंचीची काहीशी कल्पना येत असली तरी, या स्तुपाची खरी भव्यता गाडीतून खाली उतरून बरेच अंतर चालून त्याच्या बर्‍यापैकी जवळपास आल्यावरच घ्यानात येऊ लागते. दोन हजार वर्षांपूर्वी इतके प्रचंड स्थापत्यकाम केले गेले हे केवळ आश्चर्यकारक आहे !...


रुवानवेलिसाया ०२ : जवळपास आल्यावर होणारे प्रथमदर्शन

जसजसे आपण त्याच्या जवळ जवळ जाऊ लागतो तसतसा तो अजूनच भव्य होत जातो ! त्याला कॅमेर्‍याचा एका फ्रेममध्ये बसवण्याची धडपड व्यर्थ आहे, त्यासाठी परत बरेच अंतर मागे जावे लागेल, हे एक दोन प्रयत्नानंतर ध्यानात येते...


रुवानवेलिसाया ०३

एका उंच चौथर्‍यावर बांधलेल्या या स्तुपाच्या भोवती चारी बाजूला हत्तींच्या मूर्तींनी सजवलेल्या भिंती आहेत. हा स्तुप भगवान बुध्दाची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन बांधलेला आहे. त्याचा विशाल घुमट बुध्दधर्माच्या विश्वव्यापी सिध्दांताचे रुपक आहे. कळसाच्या तळाच्या चार बाजू 'चार पवित्र सत्ये' (मानवी जीवनातील व्यथा, त्यांची कारणे, त्यांचा अंत होऊ शकतो हे ज्ञान आणि त्यांचा अंत करण्याचा मार्ग) दर्शवितात, कळसाची गोलाकार नक्षी आर्याष्टांगमार्ग (सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्म, सम्यक जीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधि) दर्शवितात आणि कळसाच्या टोकावरचा स्फटिक त्या मार्गांचे अंतीम गंतव्यस्थान (बौध्दतत्वज्ञानातले अंतिम ध्येय) "ज्ञानप्राप्ती अथवा मोक्षप्राप्ती" दर्शवितो. या स्तुपात भगवान बुध्दाच्या शरीराचे अवशेष ठेवलेले आहेत.

स्तुपाच्या आवारात पादत्राणे घालणे अर्थातच निषिध्द आहे. चौथरा चढून वर गेलो तेव्हा उन रणरणू लागले होते. पायाला चटके बसत असले तरी विशालकाय दागोबाला प्रदक्षिणा घालून त्याच्या चारी बाजू पाहण्याचा मोह आवरला नाही. इतर श्रध्दाळूंच्या घोळक्यात सामील होऊन आई-उई करत एक प्रदक्षिणा पुरी केलीच !...


रुवानवेलिसाया ०४ : चौथर्‍यावरचा प्रदक्षिणामार्ग

चौथर्‍यावर दागोबाच्या आजूबाजूला असलेल्या अनेक स्थानांपैकी काहींची प्रकाशचित्रे...


रुवानवेलिसाया ०५ : प्रदक्षिणामार्गावरचे शिल्प ०१

.


रुवानवेलिसाया ०६ : प्रदक्षिणामार्गावरचे शिल्प ०२

.

लोवमहापाया (Lovamahapaya, brazen palace)

रुवानवेलिसाया स्तुपाच्या बाजूला लोवामाहापाया किंवा लोहप्रासादाया नावाच्या इमारतीचे अवशेष आहेत. याचे हे नाव तेथे पूर्वी असलेल्या काश्याच्या (bronze) छपराच्या इमारतीमुळे दिले गेले आहे. (खरे पहायला गेले तर, कासे या मिश्रधातूत लोह नसते तर मुख्यतः तांबे, १२% कथिल आणि अगदी कमी प्रमाणात इतर काही धातू व अधातू असतात. पण तरीही या वास्तूला हे नाव पडले आहे.)

रुवानवेलिसाया स्तुपाचे काम ज्याने सुरू केले त्याच दातुगेमुनु राजाने इथली मूळ इमारत बांधली होती. मूळ स्वरूपात १२० मीटर लांब असलेल्या या इमारतीला नऊ मजले होते आणि ती ४० दगडी खांबांच्या ४० रांगावर उभी होती. ती बांधायला सहा वर्षे लागली होती. इमारतीतील अनेक दालने, दर पौर्णिमेला (पोया) बौध्दसंघाचे सुत्रपठण, उपासना, सार्वजनिक भोजनालय, इत्यादी अनेक कामांसाठी वापरली जात असत. दातुगेमुनुनंतर सत्तेवर आलेल्या राजा सध्दातिस्साच्या कालखंडात ही इमारत कोसळली व तिच्या जागेवर मूळ इमारतीपेक्षा खूप लहान उपासनागृह बांधले गेले. खालच्या चित्रात दिसणारे दगडी खांब या उपासनागृहाचे अवशेष आहेत...


लोवमहापाया अवशेष

.

जय श्री महा बोधी वृक्ष व मंदिर

थोडे पुढे गेले की महामेवना बाग लागते. या बागेची स्थापना एका विशिष्ट पवित्र धार्मिक प्रसंगाने केली गेली आहे.

अनुराधापुरातील राणी अनुला आणि इतर अनेक स्त्रियांची बौध्दधर्माची दिक्षा घेऊन महत्वाची पदे भूषवायची इच्छा होती. त्यासाठी राजाचा पुतण्या अरित्था याने अरहत महिंदाच्या सहमतीने एक खास दूत पाठवून सम्राट अशोकाला याबाबत मदतीची विनंती केली. अशोकाने इ स २४९ मध्ये बौध्दसंघात महत्वाचे पद भूषविणारी आपली मुलगी संघमित्ता (संघमित्रा) हिला श्रीलंकेत पाठविले व तिने तेथे स्त्री बौध्द धर्माधिकार्‍यांची सुरुवात केली. बौध्दधर्माच्या दक्षिण दिशेला होणार्‍या प्रगतीने आनंदीत होऊन अशोकाने संघमित्ताबरोबर बोधगयेतल्या महाबोधी वृक्षाची दक्षिण दिशेची एक फांदी पाठवली. राजा देवनामपिया तिस्सा याने ६.५ मीटर उंच पार बाधून त्यावर त्या फांदीचे रोपण केले. तोच हा जय श्री महा बोधी वृक्ष. अर्थातच, त्याचे जगभरातल्या बौध्दसमाजात फार मोठे महत्व आहे. हा वृक्ष, लागवडीच्या लिखीत दिनांकाप्रमाणे, मानवाने रोपित केलेला जगातील सर्वात जुना वृक्ष आहे असे म्हणतात.

नंतर आलेल्या अनेक राजांनी वेळोवेळी मूळ जागेचा विकास केला. त्यात वृक्षाभोवती सोन्याचे कुंपण, वृक्षाशेजारचे मंदिर, वृक्षासाठी पाण्याचे कालवे व इतर धार्मिक बांधकामांचा समावेश आहे. इ स १९०७ आणि १९११ मध्ये आलेल्या वादळात या वृक्षाची एक-एक फांदी तुटून पडली. १९२९ मध्ये एका व्यक्तीने त्याची एक फांदी तोडली. लांबवर पसरलेल्या फांद्या तुटू नयेत यासाठी त्यांना लाकडी आणि धातूच्या खांबांचे आधार दिलेले आहेत. तसेच भाविकांनी वृक्षाच्या जवळ जाऊन फांद्या तोडू नयेत व त्याला इतर हानी पोहोचू नये यासाठी त्याच्या सभोवती संरक्षक कुंपण उभारलेले आहे. त्यामुळे आता त्या वृक्षाचे दर्शन दुरूनच घ्यावे लागते...


जय श्री महा बोधी वृक्ष

.


जय श्री महा बोधी वृक्ष मंदिर

अभयगिरी विहार (Abhayagiri Dagoba)

इ स पूर्व पहिल्या शतकात राजा वत्तागामानी अभयने बांधलेला हा स्तुप अनुराधापुरातील पाच महत्वाच्या स्तुपांपैकी सर्वात मोठा आहे. हा स्तुप इ स पूर्व पहिल्या शतकापासून थेरवाद आणि महायान बौध्द पंथाच्या धर्मपीठाचे जागतिक स्तराचे स्थान झाले होते. तरीही येथे जगभरातील बौध्द धर्मातल्या सर्व पंथातील अधिकारी आकर्षित होत असत. यामुळे या स्तुपाचा जगातील अनेक बौध्द धर्मकेंद्रांवर प्रभाव पडला आहे. विशाल भिंतींने वेढलेल्या आणि त्याच्या आतील कलाकुसरीने सजलेल्या गजांच्या कुंपणाने सजलेल्या या स्तुपाभोवती बौध्दधर्मात पवित्र समजल्या जाणार्‍या अनेक कसबी कलाकारांनी कोरलेल्या चंद्रशिला (Sandakada pahana, moon stone) व स्नानकुंडे होती. अनुराधापुराच्या उत्तरेला असल्याने याला उत्तर विहार या नावानेही ओळखले जाते.

या स्तुपाच्या बांधकामामागे रोचक इतिहास आहे. बौध्दधर्माच्या लंकेतील वाढत्या प्रभावामुळे चिडून तिया / तिस्सा (Tiya / Tissa) नावाच्या एका बाम्हण युवकाने राजा वत्तगामानी अभय विरुध्द युध्द छेडले. तियाला लंकेतील व भारतातील सरदारांचा पाठींबा मिळाल्यामुळे त्याचे पारडे भारी होते. त्याच सुमारास सात तामीळ सरदार मोठे सैन्य घेऊन लंकेवर अधिपत्य स्थापित करण्यासाठी लंकेच्या किनार्‍यावर उतरले होते. राजाने चलाखी करून तियाला निरोप पाठवला की जर त्याने तमीळ सरदारांचा पराभव केला तर तो त्याचे राज्य तियाच्या स्वाधीन करेल. तियाने ही अट मान्य केली. बलवान तमीळ सरदारांनी तियाचा पराभव केला. त्यानंतर त्या सरदारांनी राजाचाही पाडाव केला. पराजीत राजा अनुराधापुरा सोडून वनात पळून जात असताना त्या शहराच्या उत्तर व्दाराजवळ राजा पांडूकभयाने बांधलेल्या जैनमंदिराच्या पुरोहिताने त्याचा "महान काळा सिंहला पलायन करत आहे" असे जोराने ओरडून त्याचा अपमान केला. ते ऐकून राजाने "मी माझे राज्य परत जिंकले तर या जागेवर बौध्द स्तुप बांधेन" अशी प्रतिज्ञा केली. त्यावेळेपासून चवदा वर्षे राजा वनवासी जीवन जगत सैन्याची जमवा जमव करत राहीला. इ स ८९ मध्ये त्याने अनुराधापुरावर आक्रमण करून तमीळ राजा भातिया (Bhatiya) याचा पराभव केला व परत सिंहला वंशाचे राज्य स्थापन केले. नंतर राजाने जैनमंदिराच्या जागी आपल्या नावाचा 'अभयगिरी विहार' बांधून आपली प्रतिज्ञा पुरी केली. वत्तागामानी अभयच्या विजयानंतर श्रीलंकेत हिंदू व जैन धर्माच्या प्रभावाला उतरती कळा लागली आणि अभयगिरी विहार केवळ धार्मिक केंद्रच नव्हे तर सिंहला राष्ट्रिय अस्मितेचे केंद्र बनले. चवथ्या शतकात अनुराधापुरात आणलेला भगवान बुध्दाचा अवशेष (दात) ठेवण्यासाठी अभयगिरीची निवड केली गेली.


अभयगिरी दागोबा

.

कोट्ट्म पोकुना उर्फ जुळी स्नानकुंडे (Kuttam Pokuna / Twin Baths)

उंच भिंतीच्या आवारामध्ये बांधलेली ही जुळी स्नानकुंडे प्राचीन श्रीलंकेच्या स्थापत्याचा व जलप्रणालीचा उत्तम अविष्कार समजली जातात. ४०.२ X १५.६ X ५.५ मीटर आणि २७.७ X १५.६ X ४.३ मीटर आकाराची ही दोन कुंडे एकमेकापासून ५.६ मीटर दूर आहेत. या मधल्या भागाचा उपयोग सुंदर बाग फुलवण्यासाठी केला जात असे. उत्तम तासलेला ग्रॅनाईट वापरून बांधलेल्या या कुंडांत उतरण्यासाठी केलेल्या पायर्‍यांच्या बाजूंवर दगडी पुंकालांची (समृध्दीचे घट) सजावट आहे. बुध्दभिक्कूंना बसून गडू अथवा तत्सम भांडी वापरून स्नान करता यावे अशी कुंडांची रचना आहे. भूमीगत नळ्यांनी येणारे पाणी अगोदर गाळले जाऊन मग कुंडांत यावे अशी प्रणाली आहे. या कुंडांचा जिर्णोध्दार करून त्यांची जलप्रणाली पूर्ववत सुरू केली आहे. जीर्णोध्दाराचे काम करताना मासे, शंख, खेकडे आणि नृत्यांगनांची अनेक शिल्पे सापडली आहेत. म्हणजे, प्राचीनकाळात, बाग व अनेक शिल्पकृतींनी सजलेली ही कुंडे, आज दिसतात त्यापेक्षा अनेक पटींनी सुंदर दिसत असणार यात वाद नाही.


कोट्ट्म पोकुना ०१

.


कोट्ट्म पोकुना ०२

.

संदकादा पहाना, पाटिका किंवा चंद्रशिला (Sandakada pahana, मून स्टोन)

चंद्रशिला हे प्राचीन सिंहली स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ठ्य आहे. कसबी कलाकाराने कोरलेला हा अर्धगोलाकृती दगड प्रवेशव्दाराशी अथवा पायर्‍यांच्या तळाशी बसवत असत. उत्तर अनुराधापुरा काळात दिसायला सुरुवात झालेली ही कला पोलोन्नारुवा, गाम्पोला आणि कँडी कालात उत्तरोत्तर बहरत गेली. अर्धगोलाच्या व्यासाजवळ अर्धकमल कोरलेले असते. त्याच्याभोवती अर्धवर्तुळाच्या परिघाशी समांतर असलेले, केंद्राकडून बाहेर जाणारे, प्रतिकांच्या रांगांचे चार पट्टे असतात. अनुराधापुरा काळात हे चार पट्टे असे असत : (१) हंसमाला; (२) पर्णमाला; (३) हत्ती-सिंह-घोडा-बैल या प्राण्यांची माला; आणि (४) लवलवत्या ज्वालाची माला. काही इतिहासकारांच्या मते चंद्रशिलेच्या कोरीवकामातील प्रतिके बौध्दधर्मातील "पुनर्जन्माचे संसारचक्र" दर्शवितात. मात्र, या सर्व प्राणी-वनस्पती प्रतिकांच्या अर्थांसंबंधी तज्ञांमध्ये एकमत नाही.

काळाबरोबर पुढे या रचनेत अनेक फरक होत गेले. एका रांगेत असलेल्या सर्व प्राण्यांची रचना बदलून प्रत्येक प्राण्याला वेगवेगळी रांग मिळाली. बैल शिवाचे वाहन असल्यामुळे हिंदू चोल राज्यकालात त्याला या (पायर्‍यांकरिता वापरात असलेल्या) कलाकृतीतून वगळण्यात आले. सिंह राजघराण्याशी संबंधीत चिन्ह असल्याने त्यालाही काही कलाकृतींतून वगळले जाऊ लागले. शिलेचा अर्धगोलाकार आकारही कँडीकालापर्यंत बदलून बराच वेगळा, जवळ जवळ त्रिकोणी, झालेला दिसतो. सुरुवातीला फक्त विहार व मंदिरांच्या पायर्‍यांच्या वापरात असलेली चंद्रशिला नंतर इतर इमारतींच्या पायर्‍यांच्या बांधकामातही वापरात येऊ लागली.


चंद्रशिला (Sandakada pahana, Moon-stone) ०१

.


चंद्रशिला (Sandakada pahana, Moon-stone) ०२

.

जेतवनरामा स्तुप (Jetavanarama Dagoba)

हे अनुराधापुरातले अजून एक महास्थापत्य आहे. ५.६ हेक्टर जमिनीवर बांधलेल्या या स्तुपाची उंची १२२ मीटर (आजच्या साधारण ४५ मजली इमारतीची उंची) आहे तर बुंधा २३३,००० चौरस मीटर आहे. याच्या बांधणीला अंदाजे ९ कोटी ३३ लाख विटा लागल्या असाव्या. राजा महासेना (इ स २७३ ते ३०१) याने या स्तुपाचे बांधकाम सुरु केले, ते त्याचा मुलगा पहिला मघवन्नाने पुरे केले. या स्तुपात भगवान बुध्दाने वापरलेला कमरपट्टा किंवा कमरेला पट्ट्यासारखे बांधलेले वस्त्र ठेवले आहे असे म्हणतात.

हा स्तुप प्राचीन श्रीलंकेतील थेरवाद आणि महायान संप्रदायांतील संघर्षाची निशाणी आहे. पूर्वीच्या थेरवाद पंथाच्या महाविहाराला एक भिक्कू व एक मंत्री यांच्या संगनमतीने उध्वस्त करून त्याची लुटालूट केली गेली व त्यातल्या भिक्कूंना हद्दपारे केले गेले. महाविहार नष्ट करताना त्यातल्या मौल्यवान वस्तू अभयविहारात हलवल्या गेल्या. यामुळे दुसर्‍या एका मंत्र्याने राजाविरुध्द बंडाळी केली. नंतर राजाने स्तुपाच्या लुटण्याबद्दल माफी मागितल्यावर तह होऊन राजाने नवीन स्तुप बांधून भिक्कू तिस्सा याला त्याचे प्रमुखपद दिले. मात्र काही काळाने तिस्सावरचे नियमबाह्य कृती केल्याचे अनेक आरोप सिध्द होऊन त्याला पदावरून काढले गेले व राजाने दक्कीनगिरी भिक्कुंच्या हाती हा स्तुप सोपवला.


जेतवनरामा स्तुप

.


संपूर्णपणे जीर्णोध्दार केलेला लंकारामा स्तुप

.

चार तासात अनुराधापुरा बघणे म्हणजे प्रचंड धावपळ होते यात संशय नाही. पण ठराविक वेळात आपली धावती भेट संपवून पुढच्या आकर्षणाकडे पळणे भाग होते. पुढचे आकर्षण होते मिहिन्ताले... अशोकपुत्र अरहत महिंदा (महेंद्र) आणि राजा देवनामपियातिस्साच्या पहिल्या भेटीचे ठिकाण... जेथून श्रीलंकेत बौध्दधर्माला सुरुवात झाली.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

27 Nov 2015 - 4:38 pm | कपिलमुनी

मोठ्ठा आणि सुंदर भाग !
वर्णन आवडला

कीती शान्त अन सुन्दर ! मला ती कोट्ट्म पोकुना उर्फ जुळी स्नानकुंडे खुप्पच आवड्ली :)

स्वाती दिनेश's picture

27 Nov 2015 - 4:51 pm | स्वाती दिनेश

हा भाग फारच आवडला.
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

27 Nov 2015 - 5:03 pm | विशाल कुलकर्णी

वाह.. सुरेख लेख !

भानिम's picture

27 Nov 2015 - 5:24 pm | भानिम

छान वर्णन आणि सुंदर फोटो! पुभाप्र

हा भाग एकच नंबर. सगळे स्तूप पाहताना जेतवनारम्याचा उल्लेख कधी येतो त्याची वाटच पाहत होतो. अति उच्च. पण तुम्हांला वेळ मिळावयास पाहिजे होता, म्हणजे तुमच्या नेहमीच्या डीटेल शैलीत त्याचे वर्णन वाचायला अजून मजा आली असती.

अता या निमित्ताने अजूनेक प्रश्नः जेतवनारम्याची उंची खरेच ४०० फूट जाणवते का? ४०० फूट म्ह. जवळपास पिरॅमिडएवढी उंची झाली. फोटोत दिसताना तरी स्तूप कुतुबमिनारएवढा वाटतोय म्हणून आपला एक प्रश्न.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2015 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेतवनरामाया स्तुपाची उंची बरोबर आहे. त्याच्या कुंपणाच्या भिंतीच्या बाहेरून खूप अंतरावरून हा फोटो काढलेला असल्याने व त्याचा परीघ खूप मोठा असल्याने त्याची उंची कमी वाटते. (त्यातही त्याच्या कळसाचा वरचा भागही तुटलेला आहे.) त्याच्या बाजूला मानवाकृती नसल्याने त्याच्या छातीवर येणार्‍या उंचीचा प्रभाव या फोटोत नीट दिसत नाही.

धन्यवाद! परीघ जास्त असल्याने उंची न जाणवणे हे रैट्ट. ताजमहालाची उंचीही कुतुबमिनाराएवढीच आहे पण तसे वाटत नाही त्याचे कारणही हेच.

सूड's picture

27 Nov 2015 - 6:34 pm | सूड

वाचतोय.

यशोधरा's picture

27 Nov 2015 - 6:58 pm | यशोधरा

वाचते आहे.

त्याकाळातील दागोबांचे बांधकाम पाहून आश्चर्य वाटले. ज्याचा उल्लेख नुसता ऐकला होता तो बोधीवृक्ष पहायला मिळाला.

खूप छान झालाय हाही भाग.ही नावं लिहिणं कसरतच आहे!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2015 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सिंहली नावे बोलण्या-लिहिण्यात कमालीची कसरत करावी लागते. त्यातही, माझा गाईड-कम-ड्रायव्हर सिंहला वंशाचा नसलेला पण सिंहला ढबीचे इंग्लिश बोलणारा ख्रिश्चन होता. आता बोला !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2015 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांसाठी व वाचकांसाठी धन्यवाद !

पद्मावति's picture

27 Nov 2015 - 10:28 pm | पद्मावति

हा भाग तर फारच सुंदर झाला आहे. अतिशय रोचक.

विलासराव's picture

27 Nov 2015 - 10:54 pm | विलासराव

खुपच छान झालाय हा भाग.
बोधगयेच्या बोधिवृक्षाची फांदी तिकडे नेली होती. मागच्या वर्षी त्याच अनुराधापुरच्या बोधिवृक्षाची फांदी बोरिवलीच्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा जवळ आणून लावण्यात आली आहे.
ह्या भागाबद्दल विशेष धन्यवाद डॉक्टर.

प्रचेतस's picture

28 Nov 2015 - 8:51 am | प्रचेतस

अफ़ाटच झालाय हां भाग.
एकापेक्षा एक अजस्त्र स्तूप, त्यांचे वर्णनही तितकेच भारी.

जेपी's picture

28 Nov 2015 - 10:34 am | जेपी

+१११११११११

शेखरमोघे's picture

28 Nov 2015 - 2:00 pm | शेखरमोघे

सुन्दर वर्णन - एखादे प्रेक्षणीय स्थळ पहाणे, त्याची चित्रे खेचणे, त्याबद्दलची माहिती सान्गितली जात असताना त्याची टिप्पणे घेत रहाणे आणि काय राहून गेले याचाही मागोवा ठेवणे हे सगळे काही तास एकसमयावच्छेदेकरून करत रहाणे, सगळेच कठीण ते आपण लीलया आणि उत्तम केले आहे.

जातवेद's picture

28 Nov 2015 - 3:41 pm | जातवेद

वाचतोय.

सुधीर कांदळकर's picture

29 Nov 2015 - 6:25 am | सुधीर कांदळकर

प्रवासवर्णन. माझी हुकलेली ठिकाणे तुमच्या चष्म्यातून पाहायला मिळताहेत - धन्यवाद.

दोनतीन दिवसापूर्वी पहिला भाग वाचला. खूष झालो. मेजवानी मिळणार. अडखळत्या जालसेवेमुळे दोनतीन दिवस काहीच वाचता आले नाही. आज तिन्ही भाग वाचले. अपेक्षेप्रमाणे मेजवानी मिळाली. धन्यवाद. सिगिरिया पण पाहायचे राहून गेले आहे. तुमच्या नजरेतून पाहायची वाट पाहतोय. आणि तो प्राचीन दगडी आरसा देखील. मेजवानीतल्या पुढील पदार्थांंच्या प्रतीक्षेत.

नंदन's picture

29 Nov 2015 - 10:44 am | नंदन

खास एक्कासाहेबांच्या शैलीतले प्रवासवर्णन आवडले - विशेषतः जेतवनरामायाची माहिती. (हे 'ज्येष्ठवनरम्या'चे तद्भव रुप असावे काय?)

पुढील भागांच्या प्रतीक्षेत - खास करून तिथल्या स्थानिक खाद्य-पेय-पदार्थांबद्दल वाचायला उत्सुक आहे.

बोका-ए-आझम's picture

29 Nov 2015 - 12:19 pm | बोका-ए-आझम

वाखुसाआ! फोटो तर अफलातून आहेत.

दिपक.कुवेत's picture

30 Nov 2015 - 1:17 pm | दिपक.कुवेत

वाचतोय.

एस's picture

30 Nov 2015 - 3:50 pm | एस

अप्रतिम भाग!

सुमीत भातखंडे's picture

30 Nov 2015 - 5:21 pm | सुमीत भातखंडे

हा भाग पण मस्त.

पैसा's picture

30 Nov 2015 - 10:40 pm | पैसा

सगळे वाचता, पहाताना थक्क व्हायला होते!

वेल्लाभट's picture

30 Nov 2015 - 11:17 pm | वेल्लाभट

वा वावा !
जबरदस्त
सहल घडवताय ब्वा ! क्लास.