'श्रीमानयोगी'

अक्षया's picture
अक्षया in जनातलं, मनातलं
9 Dec 2015 - 12:41 pm

एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं,
मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं.

आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली. आणि हाच तो टर्निंग पॉइंट ठरला, आणि मनात विचार पक्का झाला. 'श्रीमानयोगी' सारख्या परिपूर्ण कादंबरीवर आधारित एका भव्य ऐतिहासिक आणि दर्जेदार नाटकाची निर्मिती करायची आणि कादंबरीतील मौलिक, बौद्धिक प्रसंग टिपून प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करायचे. आजवर नुसताच 'शूरवीर' असलेला शिवाजी राजा राजकारणातही किती तरबेज होता हे त्यातून दाखवायचं असं ठरलं.

झालं तर मग, लगीन घाई सुरू झाली. उठता-बसता सतत नाटक कसं उभं करायचं याची तयारी सुरू झाली. त्यासाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट, पटकथा, 'कास्टिंग', ड्रेपरी, सेट, संगीत, संवादलेखन या सगळ्यासाठी लागणारा पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटकाचे प्रयोग मिळवणे, हे सगळं सगळं सुरू झालं. जिद्द, अमाप कष्ट घेण्याची तयारी आणि या सगळ्या मागे शिवरायांवरील प्रेम आणि श्रद्धा.

मनातील एक श्रद्धेचं स्थान माणसाला किती ध्येयवेडा करून सोडतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा माणूस! एका नोकरदार माणसाला हे सगळं करताना किती अडचणी आल्या असतील हे सुज्ञास सांगणे नं लगे. बँकेकडून कर्ज मिळविण्या साठीची धडपड,'कास्टिंग', 'ड्रेपरी', रंगीत तालमी, मार्केटिंग तसेच एक टीम तयार करून संगीत व गीतरचनेवर काम करून घेणे, ३५ लोकांचा ताफा घेऊन महाराष्ट्रभर नाटकाच्या प्रयोगासाठी फिरणे हे एक मोठे आव्हान होते. हा काळ होता साधारण १९८७-१९८८ चा. आजकालच्या 'कॉम्पुटर', 'इंटरनेट' व 'मोबाईल' सारख्या सुविधा त्या काळी विकसित नव्हत्या, त्यामुळे वेळोवेळी प्रवास करून स्क्रिप्ट पूर्ण करावे लागले. उत्तम स्क्रिप्ट हीच एक उत्तम जाहिरात होती.

कोल्हापूरला जाऊन कादंबरीकार 'रणजीत देसाई' यांच्या घरी जाऊन सलग ३ महिने त्या कादंबरीतले हवे ते प्रसंग उतरवून घेतले ते देखील प्रत्यक्ष रणजीत देसाई यांच्या हातून, तसंच भास्कर चंदावरकर यांना पूर्ण पटकथा दाखवून या भव्य-दिव्य कलाकृतीला साजेसे संगीत तयार झाले. श्रीकांत पारगावकर व अनुराधा मराठे यांच्या सारख्या गायकांच्या आवाजात सुमधुर गाणी रेकॉर्ड झाली देखील. मुंबईच्या खास कलाकारांकडून पूर्णपणे फिरता रंगमंच तयार करून घेतला. लिरिक्स व् डायलॉग श्रीराम रानडे यांनी लिहिली तर श्रीपाद गोखले यांच्या सारख्या अनुभवी नेपथ्यकाराकडून दिग्दर्शन करून घेण्यात आले. हे सर्व करताना हा 'नोकरदार' माणूस किती कसलेला 'व्यवस्थापक' होता याचीही प्रचीती आली. बॅक स्टेज पासून डायरेक्टर पर्यंत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि १९८८ साली 'रंगमंदार' पुणे ह्या संस्थेचं एक अप्रतिम दर्जेदार असं भव्य नाटक 'श्रीमानयोगी' रंगमंचावर उभं राहिलं.

रणजीत देसाई यांच्यासह

आता खरी आव्हाने पुढे होती. पुढची धडपड सुरू झाली ती नाटकाचे प्रयोग मिळवण्यासाठी. हा माणूस अपॉइंटमेंट घेऊन, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटला. त्यांना पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवले, "शिवाजी काय होते, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, बाळासाहेब!" हे वाक्य ऐकून बाळासाहेब भारावून गेले व पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. पोलिस वेलफेयर साठी चे अनेक प्रयोग यातून पुढे मिळत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रयोग होऊ लागले, म्हणता म्हणता 'श्रीमानयोगी' नावाची एक कलाकृती प्रसिद्धीस येऊ लागली. या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कधी झाले हे कळले देखील नाही. दूरदर्शनवर नाट्यावलोकन मध्ये त्यांची मुलाखतही झाली.

एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, मालेगांवला नुकतीच जातीय दंगल झाली होती, तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या नाटकाचा प्रयोग करायचे ठरले, परंतु नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे, नाटक करू नका असे लोकांनी सुचवले. पण या माणसाने धाडसाने उत्तर दिले, "महाराष्ट्रात शिवाजी सादर नाही करायचा तर कुठे करायचा? हा प्रयोग होणारच" असा पवित्रा घेऊन नाटक धैर्याने सादर केले. हा प्रयोग अतिशय शांततेमध्ये पार पडला, या धाडसाचे कौतुक म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी या निर्मात्याचे फोनवर अभिनंदन केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासह

एकदा तर 'वैराग' या गावात नाटकाचा प्रयोग सुरू झाला अन् दुसऱ्याच अंकात मुसळधार पाऊस सुरू झाला. शाळेच्या पटांगणात प्रयोग असल्याने सर्व सेट व कलाकार चिंब भिजले. तरीही, 'शो मस्ट गो ऑन' या म्हणीची प्रचीती देत नाटक सुरू राहिलं. येवढ्या पावसातही सगळे प्रेक्षक रममाण होऊन तसेच बसुन नाटक बघत होते. हे पाहुन खुप आश्चर्य वाटले. नुकसान बरंच झालं होतं, सेट पूर्णपणे खराब झाला, कॉस्ट्यूम खराब झाले. पण, न खचता या माणसाने परत तो भव्य सेट उभा केला. बँकेच्या वाऱ्या अन् सेट परत उभा करतानाची फरफट काय झाली असेल हे शब्दात सांगणे शक्य नाही.

नव्या उमेदीने नाटक परत मंचावर उभे राहिले. नाटकात आग्र्यापासून सुटका, कविकलश, रामदास स्वामींनी राज्याभिषेक करून घ्या हे सांगणे, शिवरायांनी शिवथर घळ येथे जाऊन रामदासस्वांमींची भेट घेतली. त्यांना रामदास स्वामींनी दिलेल्या दासबोध रुपी आशीर्वादाचा प्रसंग तर खुपच छान होता. "दिनांच्या दयेला आणि दुबळ्यांचा अहिंसेला फारसे महत्व नसते हे दोन्ही गुण सिद्ध होण्यासाठी प्रथम सामर्थ्यवान असावे लागते." ह्या व या सारख्या अनेक वाक्यांना प्रक्षकांची भरभरुन दाद मिळायची.

राज्याभिषेक घडणे, कोवाडला जिजाऊ चे जाणे, घरभेदी तसेच प्रेमळ स्त्रिया, संभाजीराजांवर टाकलेली जबाबदारी व शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ भंगणे व जगाला दिलेला निरोप असे भावपूर्ण, बौद्धिक आणि विचार करायला लावणारे प्रसंग या नाटकात उभारले होते. 'अनंतराव कुलकर्णी' यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका अप्रतिम रित्या साकारली होती. पुतळा, सोयरा, जिजाऊ, रामदास स्वामी, संभाजी, प्रतापराव, मोरोपंत, हंबिरराव, बाळाजी आवजी, कविकलश, गागाभट्ट, अश्या अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा या नाटकात सादर केल्या गेल्या.

.

या नाटकाचे १०० च्या वर प्रयोग केले. अनेक प्रकारची माणसं भेटली. कोणी शेवटपर्यंत साथ देणारी तर कोणी दगा देणारी, कोणी निःस्वार्थ सेवा देणारी तर कोणी त्या माणसाच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेणारी, पण जेव्हा ध्येय सात्विकतेची साथ धरून असते तेव्हा देवाचा आशीर्वाद सतत लाभतो. या माणसाच्या बायकोचे प्रचंड सहकार्य त्यांना मिळाले. सर्व घेतलेली कर्ज परत फेडून, सर्व कलाकारांना समाधानी ठेवून, थोरा मोठ्यांचे आभार मानून हां माणूस आज ताठ मानेने आपल्या आयुष्यातील या सोनेरी क्षणांना आठवत आणि उजाळा देत जगत आहे..

१०० वा नाट्य प्रयोग

या थोर माणसाला म्हणजेच माझे वडील श्री. खंडेराव कुलकर्णी व त्यांना प्रचंड साथ देणारी माझी आई, सौ. उमा खंडेराव कुलकर्णी यांना माझा दंडवत.

त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्ष पुर्ण केली त्या निमित्ताने लिहावेसे वाटले आणि तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावेसे वाटले.

धन्यवाद.

कलानाट्यइतिहासप्रकटनलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Dec 2015 - 12:55 pm | यशोधरा

लिखाण आवडले.

आपल्या वडिलांना अमृत महोत्सवी हार्दिक शुभेच्छा!

एस's picture

9 Dec 2015 - 1:59 pm | एस

jabaradast!

छान ओळख.वडिलांना शुभेच्छा.

एक नंबर ओळख! तुमच्या वडिलांना शुभेच्छा!

जातवेद's picture

9 Dec 2015 - 2:46 pm | जातवेद

तुमच्या आई-वडिलांना शुभेच्छा!

पद्मावति's picture

9 Dec 2015 - 3:49 pm | पद्मावति

सुंदर ओळख आणि लेख. तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या सादर शुभकामना आणि प्रणाम.

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2015 - 4:39 pm | दिपक.कुवेत

आई-वडिलांना दिर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा. खुपच छान अनुभव.

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 4:45 pm | प्रचेतस

उत्तम ओळख. आपल्या वडिलांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

बाकी श्रीमानयोगीत देसाईंनी बरेच लेखनस्वातंत्र्य घेऊन इतिहासाची बरीच मोडतोड केलीय असे वैयक्तिक मत आहे.

बोका-ए-आझम's picture

10 Dec 2015 - 2:20 am | बोका-ए-आझम

प्रचेतसभौ!

वरील दोन्ही ओळींशी सहमत.
श्रीमान योगी या कादंबरीपेक्षा तिला श्री. नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावनाच जास्त वाचनीय आहे...

आपल्या आईवडीलांना शुभेच्छा..

पैसा's picture

9 Dec 2015 - 5:26 pm | पैसा

तुझ्या वडिलांना शतकापूर्ती व्हावी यासाठी खूप शुभेच्छा!

उगा काहितरीच's picture

9 Dec 2015 - 5:54 pm | उगा काहितरीच

अभिनंदन व शुभेच्छा !
ओळख आवडली हेवेसांनलगे .

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 6:04 pm | आदिजोशी

आपल्या वडिलांना धन्यवाद आणि उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

9 Dec 2015 - 6:12 pm | संदीप डांगे

वेडी माणसेच इतिहास घडवतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले पिताश्री. त्यांच्या ध्यासाला व जिद्दिला प्रणाम. उदंड आयुष्य लाभो त्यांना....!

स्वाती दिनेश's picture

9 Dec 2015 - 6:31 pm | स्वाती दिनेश

परिचय आवडला. तुमच्या आईवडिलांना उत्तम आयुरारोग्य लाभो.
स्वाती

लेखन आवडले. प्रेरणादायी आहे.
आपल्या आई व वडिलांना दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

कवितानागेश's picture

9 Dec 2015 - 9:33 pm | कवितानागेश

प्रेरणादायी

नि३सोलपुरकर's picture

9 Dec 2015 - 6:50 pm | नि३सोलपुरकर

आपल्या आईवडिलांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा.

श्रीरंग_जोशी's picture

9 Dec 2015 - 9:42 pm | श्रीरंग_जोशी

दुर्दम्य इच्छाशक्ती व परिश्रमांच्या जोरावर नाट्यक्षेत्राशी थेट संबंधीत नसूनही श्रीमान योगी सारखे नाटक रंगमंचावर आणणे व महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग करणे हे फारच प्रेरणादायी कार्य आहे.

तुमच्या वडिलांना व त्यांना मोलाची साथ देणार्‍या तुमच्या मातेला दंडवत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2015 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ओळख !

आपल्या वडिलांना अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे यासाठीही शुभेच्छा !

चाणक्य's picture

9 Dec 2015 - 10:47 pm | चाणक्य

एक कडक मुजरा तुमच्या वडीलांना.

स्रुजा's picture

9 Dec 2015 - 10:50 pm | स्रुजा

वाह ! लेखन आवडले. वडिलांना खुप शुभेच्छा !

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 10:59 pm | बाबा योगिराज

निशब्द.

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 10:59 pm | बाबा योगिराज

निशब्द.

बोका-ए-आझम's picture

10 Dec 2015 - 2:19 am | बोका-ए-आझम

साष्टांग नमस्कार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा! महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवरील नाटकाचे प्रयोग नाही होणार तर मग कुठे होणार?
अगदी खरं आहे!

चतुरंग's picture

10 Dec 2015 - 4:40 am | चतुरंग

लेखन अतिशय प्रेरणादायी आहे. तुमच्या वडिलांची जिद्द आणि प्रयत्नवाद अनुकरणीय आहे.
तुमच्या वडिलांना आणि मातोश्रींना दीर्घायुरारोग्य लाभो!

ट्रेड मार्क's picture

11 Dec 2015 - 1:39 am | ट्रेड मार्क

निवृत्तीनंतर असे काही करणे ते पण नोकरदार माणसाने हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम.

अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा!

विशाखा पाटील's picture

11 Dec 2015 - 6:22 am | विशाखा पाटील

छान ओळख. काल दुपारी हा लेख धावता वाचला, आणि संध्याकाळी या नाटकाचे संवाद आणि गाणी लिहिणारे श्रीराम रानडे यांची भेट झाली. तुम्ही लिहिलेल्या या आठवणीबद्दल सांगताच त्यांना गहिवरून आले. २० वर्षांपूर्वी आपण असे काम केले होते, हे ते मधल्या काळात विसरले होते. इतक्या वर्षांनी आपले नाव पुन्हा आले, याचा त्यांना खूप आनंद झाला. धन्यवाद!

अक्षया's picture

11 Dec 2015 - 10:52 am | अक्षया

रानडे काका भेटले हे ऐकुन खुप छान वाटले..
सगळेच कलाकार आणि 'श्रीमानयोगी' टीम मधे काम करणारे सगळे जण आमचा कुटुंबाचा एक भाग होते. :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2015 - 6:59 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

भिंगरी's picture

11 Dec 2015 - 7:18 am | भिंगरी

उत्तम परिचय!
त्यांच्या अपार कष्टाला सलाम.

अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा!

वा...उत्तम परिचय!! तुमच्या वडिलांना हार्दिक शुभेच्छा.

पण जेव्हा ध्येय सात्विकतेची साथ धरून असते तेव्हा देवाचा आशीर्वाद सतत लाभतो.

सुंदर..

तुम्हीही ह्या नाटकामध्ये भूमिका केली होती ना?

काही प्रयोगात केली होती.. :)

राही's picture

11 Dec 2015 - 10:14 am | राही

अशी वेडी माणसंच शहाण्यांचे आदर्श बनतात.
आईवडिलांना नमस्कार सांगा.

एक सामान्य मानव's picture

11 Dec 2015 - 10:35 am | एक सामान्य मानव

आपल्या वडीलांना अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा!
हे वाचुन कालच "कसं काय" वर सध्या फिरणारी व वाचनीय पोस्ट आठवली. भारतरत्न महर्षी अण्णा कर्वे यांच्याविषयी "तें" नी लिहलेला छोटासा प्रसंग. बहुदा सगळ्यांनी वाचला असेल पण त्याचं सार महत्वाचं.
"कितीही महान परोपकारी गोष्ट केली तरी तिचा बाऊ न करणं कारण ती गोष्ट करणं हे काही विशेष नसून ते आपलं कामच आहे आणि ते केलं" ह्या विचारांनी काम करत राहणारी अशी माणसे आता कुठे आहेत?

सर्वांना मनापासुन धन्यवाद.!

___/\___

मूकवाचक's picture

11 Dec 2015 - 3:07 pm | मूकवाचक

__/\__

नाखु's picture

11 Dec 2015 - 3:12 pm | नाखु

अश्याच ध्येयाने झपाटलेलं व्यक्तीमत्व म्हण्जे सुधीर फड़के (सिनेमा सावरकर)

तुमच्या वडिलांना आणि मातोश्रींना दीर्घायुरारोग्य लाभो!

सस्नेह's picture

11 Dec 2015 - 3:28 pm | सस्नेह

तुझ्या वडिलांना जन्मदिनानिमित्त आणि १०० व्या प्रयोगानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

अक्षया's picture

11 Dec 2015 - 3:39 pm | अक्षया

धन्यवाद !
__/\__

मी-सौरभ's picture

11 Dec 2015 - 6:08 pm | मी-सौरभ

तुमच्या पालकांना सा. न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2015 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

__/\__

-दिलीप बिरुटे

अक्षया's picture

16 Dec 2015 - 11:47 am | अक्षया

धन्यवाद !

तुडतुडी's picture

23 Dec 2015 - 2:22 pm | तुडतुडी

'श्रीमानयोगी'. बस . नामहि काफी है

जय२७८१'s picture

23 Dec 2015 - 3:43 pm | जय२७८१

आपल्या वडीलांना अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा....!