धुकं फार पडलयं. झाडांचे शेंडे त्यातून वरती डोकावतायत. गर्द हिरव्या डोंगरावर हे पांढरट धुकं अधुन मधून पसरलेलं. मी डोंगराच्या माथ्यावर ऊभा आहे. अगदी ऊंच. खाली पसरत गेलेल्या दऱ्याखोऱ्या मी निरखून बघतो. लांबवर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातील धबधबे पाहून मी हरवून जातो. एखादी वाऱ्याची झुळुक अंगावर शहारे ऊमटवून जाते.हा डोंगर चढताना माझी फारशी दमछाम झालेली नसते. या आल्हादायक वातावरणात मी एका दगडामागे लपतो. आणि दूर एखाद्या पायथ्याशी झाडांची हालचाल नजरेने टिपतो. माझ्या हातात रायफल असते. आणि तिचा निशाणा त्या हालचालींवर असतो. एक डोळा बारीक करुन मी नेम धरतो. मला फारसं काही दिसत नाही. ईथे एखादी चांगली दुर्बिन हवी. चित्र अगदी स्पष्ट दिसायला हवं. मी अंदाजानेच ट्रिगर दाबतो. समोरच्या झाडीत अचानक हालचाल वाढते आणि क्षणात स्थिर होते. माझ्याबरोबर माझे साथीदारही असतात. ते ही गोळ्यांचा अंधाधुंद वर्षाव करतात. मी विजयी मुद्रेने त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्यातले एक दोघेजण खाली गडाबडा लोळत गेलेले असतात. मन विषण्ण होते. सगळ्या परीसरात एक खिन्न शांतता भरुन राहते. कोणीही काहीही बोलत नाही. तरीही आमची फौज पुढच्या चढाईला सज्ज होते. मग पुन्हा एकदा तसाच एक ऊंच डोंगर. पुन्हा एकदा तसेच आल्हादायक वातावरण. आणि पुन्हा एकदा समोरच्या झाडीत तसाच एक निशाणा.
असली स्वप्ने मला नेहमी पडतात. हा म्हणजे अगदी ठरवून पडल्यासारखी. सकाळी जेव्हा मी जागा होतो तेव्हा पुसटशी आठवतात. म्हणजे रात्री झोपतानाच मी कधी कधी स्वप्नांना विषय देतो. माझ्या आवडत्या विषयावर मी चिंतन करतच झोपतो. आणि तशाच प्रकारची स्वप्नं मला पडतात. पण कधी कधी फारच विचित्र पडतात.
म्हणजे मी अमेरिकेला जाणार असतो. बहुतेक कंपनीच्या कामासाठी. आणि आवराआवरीसाठी माझी प्रचंड घाई चाललेली असते. पासपोर्ट, व्हिसा वगैरे सगळाच गोंधळ. हातात एक बॅग घेऊन मी दादरच्या प्लॅटफॉर्मवर घाईघाईत चढतो. आणि तसाच चालत जात न्यूयॉर्क इंटरनेशनल एयरपोर्टवर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाने ऊतरतो. मधला विमानप्रवास काहीकेल्या आठवत नाही. मग मी लगेजच्या पट्ट्यावर बसून एका प्रशस्त फार्महाऊसवर पोहोचतो. फार्महाऊसच्या आत खूप साऱ्या गायी आणि म्हशी. आणि मी त्यांच्यातून चालत जातो. कितीही चाललो तरी तो प्रशस्त गोठा संपतच नाही. मग पुन्हा पुढे ते लगेजचे बेल्ट लागतात. मी त्याच्यावर बसून पुन्हा विमानतळावर येतो. विमानातून जेव्हा मी परतीचा प्रवास करत असतो तेव्हा दहा बारा गाई म्हशी सोबत आणल्याच मला स्पष्ट आठवतं.
तर ही अशी काही विचित्र पडतात. म्हणजे कशाचाच कशाला संबंध नाही. कधीकधी मात्रं भयानक पडतात.
म्हणजे मी झोपलेलो असतो. गाढ. तोंडावर पांघरुन घेऊन. आणि मला श्वास घ्यायला अडचण होते. मला माहीत असते की त्या तोंडावरच्या चादरीमुळे मला श्वास घेता येत नाही. मग मी चादर बाजूला करायचा प्रयत्न करतो. पण माझे हात हलतच नाहीत. कितीही प्रयत्न केला तरी शरीर लाकडाचं असल्यासारखं स्थिर राहतं. मी घाबरतो. मला डोळेही उघडता येत नाहीत. आणि विशेष म्हणजे मी त्यावेळी टक्क जागा असतो. मला समजतं कि नक्की काय चालू आहे. पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीकेल्या सापडत नाही. अचानक माझ्या मानेजवळ मुंगी किंवा डास चावत सुटतो. त्याला रोखण्यास मी असमर्थ आहे. ती मुंगी किंवा डास असाच चावत आपल्या शरीरात तर घुसणार नाही ना या भितीने मला घाम फुटतो. हे सगळ चालू असतानाच अचानक माझ्या छताडावर कोणीतरी बसल्याची जाणीव होते. आणि मी ताडदिशी ऊठून बसतो. मी अचानक वास्तवात येतो. ते स्वप्नं होतं हे जाणवून मला हायसं वाटतं. मानेजवळ कुठेच काय चावलेलं नसतं. जास्त वेळ न घालवता मी ब्रश करतो. रुमची साफसफाई करुन मी आंघोळही करतो. मग बॅग भरुन मी कॉलेजला जायची तयारी करतो. आणि पुन्हा एकदा मी ताडदिशी झोपेतून जागा होतो. म्हणजे मी मगाशी ऊठून आंघोळ, ब्रश केला तो स्वप्नातच? यावेळी मला खरंच भिती वाटते. म्हणजे मी यावेळी ऊठलोय ते खरंच कि स्वप्नातच? कधीकधी तीन तीन वेळा ऊठून आंघोळ ब्रश केल्याची स्वप्नंही मला पडलीत. आणि तो अनुभव खरंच खूप भयानक होता.
पुढे जेव्हा मी यावर विचार केला तेव्हा सापडलेले अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे अपचन. म्हणजे त्यावेळी मी अकरावी बारावीला शिकायला बाहेरच होतो. आणि जेवण मेसचे. म्हणजे आठवड्यातून एकदा जेव्हा फिस्ट असे तेव्हा मी खूप जेवायचो. श्रीखंड वगैरे खूप वरपायचो. आणि सोबतीला कधी कधी मटणही असायचे. म्हणजे हे दुपारी. संध्याकाळी जेव्हा मेसला सुट्टी असायची तेव्हा पैसे वाचवायचे म्हणून मी ऊपाशीच झोपायचो. कधी कधी मेसवाली गावाला जायची तीन तीन दिवस. मग मी राईसप्लेटवर पैसे खर्च करण्याऐवजी ऊकडलेली अंडी, भुर्जीपाव, तळलेले मासे वगैरे खाऊन चैन करायचो. आणि त्याच दिवसांत मला अशी स्वप्ने पडायची. सध्या खाण्यापिण्यावर बरंच नियंत्रण आणलयं. आता अशी स्वप्ने पडायची बंदच झालयं. तशीही हलकीफुलकी स्वप्ने पडतच असतात.
तर अशी ही आमची स्वप्नगाथा!
तुम्हालाही अशी काही चित्रविचित्र स्वप्नं पडत असतील तर जरुर सांगा.
आपला नम्र
जव्हेरगंज
प्रतिक्रिया
2 Dec 2015 - 7:27 pm | जेपी
मला आजकाल मिपा संपादक झाल्याची स्वप्न पडतात..
अवांतर- स्वप्न सुप्त मेंदुचे खेळ आहेत..
3 Dec 2015 - 12:35 pm | उगा काहितरीच
अगदी कालच स्वप्न पडलं की फ्रान्सला चाललो सेटल व्हायला ..सगळीकडे कौतुक वगैरे होत आहे पण माझा पासपोर्टच नाहीये .
तसे माझे स्वप्न भलतेच विचित्र असतात ... शाळेत असतानाचे एक स्वप्न आठवते त्यात जॉर्ज बुश मामुच्या* जागी रिक्षा चालवत मला शाळेत सोडतात .
*मामु म्हणजे माझा रिक्षेवाला... तिनचाकी सायकल रिक्षा!
3 Dec 2015 - 12:45 pm | मृत्युन्जय
मला सगळीच स्वप्ने काही आठवत नाहित. पण बर्याच आठवत असलेल्या स्वप्नात हे असेच घडते.
एक स्वप्न मला अजुनही पडते की मी पेपर लिहितो आहे (परीक्षा) आणि मला काही आठवतच नाही आहे किंवा माझा अभ्यासच झालेला नाही आहे. किंवा कधी कधी स्वप्नात चकवा येतो म्हणजे एखादे काम असते त्यावर गोलगोल त्याच गोष्टींवर स्वप्नात विचार होतो पण उत्तर काही सापडत नाही.
कधीकधी मी स्वप्नातच पळत असतो. काहिही कारण असते. कधीकधी कोणीतरी माझ्या मागे लागलेले असते. गंमत म्हणजे मी कितीही हळु पळत असलो तरी तो माणूस काही मला पकडु शकत नाही. मी पळातच असतो आणि तो मागेच असतो. मी सुरक्षित ठिकाणी पोचु शकत नाही आणि तो मला पकडु शकत नाही.
एकदा तर स्वप्न पडले की युकेला जायचे आहे. मी सगळी तयारी केली. पासपोर्ट घेतला आणी मग विमानतळावर पोचल्यावर लक्षात आले की माझ्याकडे युकेचा विसाच नाही.
3 Dec 2015 - 11:25 pm | जव्हेरगंज
सेम हिअर!
पण काही स्वप्नं बघताना किती छान वाटतं ना! म्हणजे झोपेतून ऊठल्यावर ऊगाच भ्रमनिरास झाल्यासारखे वाटते.
जेव्हा पहिल्यांदा प्रेमात(!) पडलो तेव्हा 'सुंदर' स्वप्नं पडायची. म्हणजे तिच्याबरोबर हिंडतोय, फिरतोय वगैरे. आणि अचानक जाग येते तेव्हा, अर्रर लिंकच तुटते! त्या स्वप्नांच्या दुनियेतच राहु वाटायचं.
:)