प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
30 Nov 2015 - 2:03 pm

आधीच्या लेखांच्या लिंक्स -

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग १ - http://www.misalpav.com/node/33804

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग २ - http://www.misalpav.com/node/33845

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

लेखाच्या मागील भागात; प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबर आपण ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया असा प्रवास करत विएतनामपर्यंत येऊन पोहोचलो. आता आपल्याला सध्याच्या ज्ञात मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये प्रवास करायचा आहे.

या दोन्ही देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा उगम फार प्राचीन आहे आणि त्याचबरोबर दीर्घकालीन देखील आहे. या दोन देशांचा विचार करताना आपल्याला भारतातील तत्कालीन राजकीय घडामोडींचा सुद्धा विचार एकत्रितपणे करावा लागेल.
फार पुरातन कालापासून आपल्याला या देशांविषयी माहित होते. सुग्रीवाने आपली वानरसेना सीतेच्या शोधार्थ यवद्वीप म्हणजे जावा बेटापर्यंत धाडल्याचा रामायणात उल्लेख आहे.

ऑस्ट्रोनेशियन (तैवान आणि फिलीपाइन्स येथील वंश), अबर्जीनी, आणि पॉलिनेशियन वंशाच्या मानवसमूहांची या देशांत मूळ वस्ती असली तरी संस्कृती, धर्म आणि आधुनिक जीवनपद्धती यांची मूळे भारतीय लोकांनी येथे प्रस्थापित केली.

पहिल्या भागात वाचल्याप्रमाणे, ख्रिस्त पश्चात३०० पासून, म्हणजे भारतीय व्यापारी देवाणघेवाण संस्कृतीच्या सुवर्णकाळात, भारतीय व्यापारी व इतर वर्गाने मलाया (मलेशिया), यव द्वीप (जावा) आणि सुमात्रा येथे स्थलांतर केले होते. त्यांनी आपल्या व्यापारी कौशल्याच्या बळावर आणि भारतातील तत्कालीन राज्यकर्त्यांच्या आधाराने या समुद्री मार्गातील प्रदेशात छोटी छोटी व्यापारी शहरे वसविली होती.

या समुद्री मार्गावर मुख्यत्वेकरून दक्षिण भारतीय राज्यकर्त्यांचे प्रबळ वर्चस्व होते. या सुमारास दक्षिण भारतामध्ये चोल (चोलन, चोझन), पंड्या, आणि पल्लव असे प्रबळ आणि प्रभावी तमिळ राजवंश अस्तित्वात आले होते. सशक्त आणि सुसज्ज अशा नौदलाच्या जोरावर त्यांनी या प्राचीन "मसाल्याच्या मार्गावर" आपले प्रभुत्व स्थापन केले होते. आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचे अत्यंत प्रभावी कार्य या राजवंशांनी केले. तमिळ संस्कृती आणि तमिळ भाषा ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती व भाषा मानली जाते हे आपल्याला माहित असेलच.

रामायण, महाभारत, तसेच ऐतिहासिक काळातील चंद्रगुप्त, हर्षवर्धन, अशोक, विक्रमादित्य, शालिवाहन अशा सम्राटांबद्दल आपण आपल्या इतिहासाच्या पाठ्यक्रमात शिकलो आहे आणि वाचलेही असेल. परंतु या सम्राटांना तुल्यबळ (किंबहुना अधिक पराक्रमी) अशा राजराजा चोल, राजेंद्र चोल या राज्यकर्त्यांबद्दल आपण इतिहासात शिकलो आहे का? तमिळ भाषेतील पुरातन अशा ग्रंथसम्पदेबद्दल आपण वाचले आहे का?

राजेंद्र चोल पहिला(चोलन, चोझन) या महापराक्रमी राजाने गंगेपासून ते ब्रह्मदेश, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि इंडोनेशिया या सर्व देशांवर एकछत्री अंमल स्थापन केला होता याबद्दल आपल्याला माहिती आहे का? यासाठी त्याला तत्कालीन तमिळ कवींनी गन्गाईकोंड (गंगेवर राज्य करणारा) आणि कडारमकोंड (मलेशियातील [सध्याच्या] कडाह प्रांतावर राज्य करणारा) अशा पदव्यांनी विभूषित केले होते हे आपण वाचले आहे का? चोलापुरम या त्याच्या राजधानीत त्याने जगातील सर्वप्रथम सोळा मैल लांब व तीन मैल रुंद असा विस्तीर्ण मानवनिर्मित जलाशय बांधला होता हे आपल्याला माहित आहे का?

राजराजा चोल

चोल कालीन नाणी

आधुनिक भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात; म्हणजे उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेल्या काळात; दाक्षिणात्य (मुख्यत्वेकरून तमिळ) संस्कृती आणि वैभवशाली इतिहास यांची नेहमीच घोर अवहेलना झाल्याची; बहुतांश प्रमाणात रास्त भावना दक्षिणात्य भारतीयांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच हिंदी भाषा आणि उत्तर भारतीय संस्कृती यांना दक्षिण भारतामध्ये कडवा विरोध होतो. असो.

आपण आता परत आपल्या प्रवासात परतुया.

ख्रिस्त पश्चात दुसऱ्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत (म्हणजे राजेंद्र चोल याच्या आक्रमणापर्यंत) मलेशियामध्ये गंगानगर आणि लंकासुख अशी राज्ये अस्तित्वात होती. ही राज्ये भारतीय हिंदू धर्म आणि संस्कृतीवर आधारित होती.
यामधील सध्याच्या कडाह प्रांतात गंगानगर हे राज्य तमिळ व्यापाऱ्यांनी स्थापिले होते आणि तत्कालीन तमिळ राज्यकर्त्यांचा त्यांच्यावर वरदहस्त होता असा एक मतप्रवाह असून, कंबोडियाच्या पल्लव घराण्यातील राजांनी हे राज्य स्थापिले होते असा दुसरा मतप्रवाह आहे. परंतु दोन्ही मतांनुसार हे हिंदू राज्य होते हे नि:संशय. आपल्या समुद्रामार्गी व्यापाराच्या बळावर हे राज्य भरभराटीला आले होते.

लंका सुख राज्य

तसेच काहीसे लंकासुख या राज्याबद्दल. सध्याच्या मलेशियातील कलान्तान प्रांतापासून ते थायलंडच्या दक्षिण सीमेपर्यंत हे राज्य तमिळ व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारी कौशल्याच्या बळावर संपन्न बनविले होते. तर ब्रह्मदेशातून आलेल्या हिंदू 'मोन' वंशाच्या लोकांनी स्थापलेले हे राज्य होते हा दुसरा मतप्रवाह.

या त्यांच्या राज्यांमध्ये त्यांनी अनेक मंदिरांचे बांधकाम केले. ब्रिटीश राजवटीच्या काळात या सर्व ठिकाणी उत्खननाचे आणि इतिहास लेखनाचे महत्वाचे कार्य देखील चालू होते. परंतु मलेशियाला स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र नवीन मलेशियन राज्यकर्त्यांनी स्वतःची पूर्व संस्कृती विसरून मुस्लिम धर्माच्या प्रभावाखाली घाईघाईने ही सर्व उत्खनन स्थळे बंद करून सर्व संशोधित दस्त ऐवज सरकारी कुलपात कायमचा बंद करण्याचे "धर्मकार्य" केले. आता हा सर्व इतिहास दडपून नागरिकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा 'सरकारी' खटाटोप चालू आहे असे मलेशियामधले सध्याचे चित्र आहे. तरीही मलय भाषेतील संस्कृत आणि तमिळ शब्दांचे वर्चस्व कमी करणे कुणालाही शक्य नाही.

इकडे इंडोनेशियामध्ये ख्रिस्त पश्चात दुसऱ्या शतकापासून भारतीय राज्य स्थापनेला सुरवात झाली. पल्लव घराण्यातील देववर्मन याने दुसऱ्या शतकात जावा बेटावरील राजकन्येशी विवाह करून जावा बेटावर 'शलाकानगर' (आजचे पान्देग्लांग) येथे आपले राज्य स्थापन केले. पुढे पल्लव राजवंशातीलच जयसिंहवर्मन याने ख्रिस्त पश्चात ३५८ च्या सुमारास स्थापन केलेले जावा बेटावरील तरुम (तारुम) नदीच्या काठावरील 'तारुमनगर' हे राज्य त्याच्याच वंशातील पुर्णवर्मन या त्याच्या पणतूने उत्कर्षाच्या कळसाला पोहोचविले. भारतीय धरणशास्त्राचा वापर करून त्याने तरुम नदीचा प्रवाह बदलून शेत जमिनीला पाणी मिळण्याची व्यवस्था केली. पुढे सहाव्या शतकात या राज्याचे सुन्दा आणि गालू असे दोन भाग पडले.

तारूम नगर

आसाम, मगध आणि बंगालवर राज्य करणाऱ्या पाल घराण्यातील जयानास (जयांश?) या राजाने सहाव्या शतकात बलाढ्य आरमार आणि सैन्यासह इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर स्वारी करून 'श्री-विजय' साम्राज्याची स्थापना केली. पाल राजवंशाने महायान बुद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याने साहजिकच "श्री-विजय" हे बौद्ध धर्मी राज्य स्थापन केले. त्याने सुमात्रा बेटावरील छोटी छोटी राज्ये तसेच जावा बेटावरील तरुमनगर, सुन्दा तसेच गालू ही राज्ये जिंकली. तसेच गंगानगर, पट्टणी (लंकासुख) या राज्यांना मांडलिक बनविले आणि संपूर्ण मलेशिया आणि इंडोनेशिया येथील सामुद्रधुनी आपल्या अधिपत्याखाली आणली.

याच वेळी सहाव्या आणि सातव्या शतकात सुमात्रा आणि बोर्निओ येथील ऑस्ट्रो-नेशियन (तैवान आणि फिलीपाइन्स येथील वंश) आणि हिंदू भारतीय अशा मिश्र 'चाम' वंशाच्या संपन्न व्यापारी राज्यकर्त्यांनी दक्षिण विएतनाममध्ये आपले 'चंपा' हे वसाहतवजा राज्य स्थापन केले. त्याचा इतिहास आपण मागील भागात बघितलाच.

दक्षिणमध्य जावा बेटावर त्याचवेळी 'शैलेंद्र' हे बलशाली राज्य उदयास आले होते. इतिहासकारांच्या मते भारतीय कलिंग राजवंशातील राजांनी या राज्याची स्थापना केली होती आणि ते देखील महायान बौद्ध धर्माचेच अनुयायी होते. श्री विजय आणि शैलेंद्र साम्राज्यांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार आणि वैवाहिक संबंध स्थापित केले होते. शैलेंद्र राजांच्या काळात ख्रिस्त पश्चात आठव्या शतकात जावामधील 'बोरोबुदूर' या जगप्रसिद्ध बौद्ध स्तुपसमुहाचे निर्माण झाले.

बोरोबुदूर बौद्धस्तूप समूह

बोरोबुदूर येथील बुद्ध मूर्ती

भारत, मलेशियन आणि इंडोनेशियन द्वीपांवर निर्माण होणारे मसाले, सोने ,रत्ने, शेत माल आणि चीन मधून निर्यात होणारे रेशीम, इतर वस्तू, तसेच चीन, जपान, कोरिया आणि भारत, अरब देश, इजिप्त आणि रोमन साम्राज्य यामध्ये होणारी समुद्री व्यापारी देवाण-घेवाण हा या सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता.

शैलेंद्र साम्राज्याने कंबोडियावर स्वारी करून काही काळ कंबोडियावर सुद्धा राज्य केले.

पूर्व आणि दक्षिण जावा, बाली इत्यादी बेटांवर त्यावेळी काही हिंदू राज्यांचे अधिपत्य होते. नवव्या शतकात शैलेंद्र साम्राज्य काहीसे दुबळे झाल्यावर संजय राजवंशाच्या 'मातरम' या साम्राज्याने मध्य जावा आणि बाली बेटे यावर आपले वर्चस्व निर्माण केले.

"संजय" राजवंश हिंदुधर्मीय असल्यामूळे त्यांनी या सर्व प्रांतात हिंदू धर्माची स्थापना केली आणि मोठ्या प्रमाणावर शिव, विष्णू, गणेश आणि इतर हिंदू देवदेवतांच्या मंदिरांचे निर्माण केले. त्यामध्ये योग्यकर्ता येथील 'प्रम्बानान' या जगप्रसिद्ध मंदिर समूहाचा समावेश आहे. राजा लोकपाल,बातीलुंग महा संभू आणि दक्ष या राजांनी २४० प्रम्बानान मंदिरांचे निर्माण केले. त्यासाठी ओपाक नदीचा प्रवाह सुद्धा वळविण्यात आला.

प्रम्बानान मंदिरे

पुढे श्री-विजय साम्राज्याने पुन्हा एकदा आक्रमण करून हे मातरम साम्राज्य स्वत:च्या अधिपत्याखाली आणले.

त्याच वेळी भारतात चोल वंशाचा पराक्रमी सम्राट 'राजराजा चोल' (चोलन, चोझन) याने चालुक्य (आंध्र आणि कर्नाटक), पंड्या (दक्षिण तामिळनाडू), कलिंग( ओडिशा), चेर (केरळ) या सर्व राज्यांचा पराभव करून दक्षिण व पूर्व भारतावर आपली सार्वभौम सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेच्या सिंहल साम्राज्याचाही पराभव केला.

याच वेळेला, समुद्री मार्गावरील सत्ता, व्यापारावरील कर वसुली, तमिळ व्यापारी जहाजांचे विशेष अधिकार या विषयांवरून सुमात्राचे श्री-विजय साम्राज्य, कंबोडीयाचे साम्राज्य, थायलंडचा राजा या सर्वांशी चोल साम्राज्याचे गंभीर मतभेद होत होते.

राजराजा चोल याचा पुत्र महापराक्रमी सम्राट राजेंद्र चोल (पहिला) याने अकराव्या शतकात पूर्वेकडील बलाढ्य अशा पाल साम्राज्यावर आक्रमण करून राजा महिपाल याचा पराभव केला आणि मगध (बिहार), बंगाल, आसाम, पूर्व महाराष्ट्रासहित छत्तीसगढ, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश (काशी), ब्रह्मपुत्रेचे खोरे या सहित सर्व पूर्व आणि दक्षिण भारतावर निरंकुश सत्ता मिळविली.

भारताच्या तथाकथित आधुनिक शालेय पुस्तकी इतिहासात या दोन्ही महापराक्रमी सम्राटांची फारशी वाच्यता देखील नसणे ही अतिशय खेदकारक गोष्ट आहे असे माझे मत आहे.

असा महापराक्रमी सम्राट राजेंद्र चोल (पहिला) याच्या विश्व-दिग्विजयाची कहाणी आपण पुढील भागात पाहुयात.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Dec 2015 - 4:19 pm | प्रचेतस

भन्नाट माहिती आहे ही. चोलांच्या आरमारी प्रभुत्वाबद्दल माहिती होतेच. पण आता अधिक माहिती मिळाली.
पुभाप्र.

बाकी शालिवाहन हा सम्राट नसून ते कुलनाम आहे अशी दुरुस्ती सुचवतो.

भानिम's picture

1 Dec 2015 - 4:57 pm | भानिम

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे प्रचेतस. शालिवाहन वंशनाम आहे. लिहिण्याच्या ओघात थोडासा ढोबळपणा केला आहे.

भानिम's picture

1 Dec 2015 - 5:00 pm | भानिम

याच ओघात असं विचारायचं होतं की एकदा प्रकाशित केलेल्या लेखनात दुरुस्ती करायची झाल्यास कशी करायची? एडिट करायची काही सोय आहे का?

नीलकांत किंवा प्रशांत ह्या आयडींना व्यनी करा. ते दुरुस्ती करून देतील.

भानिम's picture

1 Dec 2015 - 5:45 pm | भानिम

ओके. करतो....धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

1 Dec 2015 - 6:13 pm | चांदणे संदीप

सुरुवातीला ते भानिम यांचाच लेख आणि भानिम यांचेच पर्तिसाद अस चालल होत! ;-)

असो, मस्त माहितीपूर्ण लेख. नवनवीन वाचायला नेहमीच उत्सुक असतो त्यामुळे नवीन माहिती मिळाली की नवी उर्जा मिळाल्यासारखी होते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

@भानिम : याआधी कुठे प्रसिद्ध केल आहे का आपल लेखन? सफाईदार, वाचनीय असे लेखन आहे!

धन्यवाद,
Sandy

शब्दबम्बाळ's picture

1 Dec 2015 - 7:15 pm | शब्दबम्बाळ

मी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे पाठ्यपुस्तकात इतिहास किती कमी शिकवला जातो किंवा ठराविक शिकवला जातो यावर मत व्यक्त केल होत. चोल, चालुक्य, पाल या राज्यकर्त्यांची त्रोटक स्वरुपात सहावीच्या पुस्तकातून ओळख झाली पण फारशी माहिती नाही मिळाली.

आपण विस्तृतपणे लिखाण केल्याबद्दल धन्यवाद! सवडीने संदर्भ पाहता येतील...

पैसा's picture

1 Dec 2015 - 8:20 pm | पैसा

दक्षिण भारतीय राज्यकर्त्यांबद्दल फारसे वाचनात येत नाही. छान लिहिता आहात. यावेळी चित्रांमुळे मजा आली. लिंकवरचे लेख नक्की वाचेन.

पद्मावति's picture

1 Dec 2015 - 10:00 pm | पद्मावति

अतिशय सुंदर, माहितीपूर्ण लेखमाला. वाचतेय.

सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. @Sandy, सिंगापूरस्थित महाराष्ट्र मंडळाच्या 'ऋतुगंध' या इ-द्वैमासिकात मी लेखन करतो कमीअधिक नियमितपणे. प्रस्तुत लेखमाला सध्या ऋतुगंध मध्ये चालू आहे.

चांदणे संदीप's picture

2 Dec 2015 - 11:14 am | चांदणे संदीप

सहजच 'ऋतुगंध'चे अंक फ़ास्ट Forward मध्ये चाळून पाहिले... मस्त वाटले!

धन्यवाद,
Sandy

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 10:32 am | बिपिन कार्यकर्ते

संपूर्ण लेखमालेवर आत्ता नजर टाकली. उत्तम चालू आहे. लवकर लवकर पूर्ण करा.

खटपट्या's picture

2 Dec 2015 - 12:41 pm | खटपट्या

काही म्हणा तुम्ही फोटो खूप छान काढता.

हे मी काढलेले फोटो नाहीत हो! नेटमधून शेअर केलेले आहेत!:) :)

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2015 - 6:37 pm | सुमीत भातखंडे

छान महितीपूर्ण मालिका आहे.
आता सगळं वाचतो.

असंका's picture

2 Dec 2015 - 6:49 pm | असंका

सुरेख!!!

अनेक धन्यवाद!!

(यातलं जवळजवळ काहीच माहित नव्हतं...)

हा इतिहास थोदाफार माहित होता पण इतका छान प्रथमच वाचला.धन्यवाद!

स्वप्नांची राणी's picture

3 Dec 2015 - 3:32 pm | स्वप्नांची राणी

मस्त ओघवती लेखमाला..!!!

अंकोर वैट ही कोणाची निर्मिती..??? त्याचेही दक्षिण भारतीय मंदिर शैलीशी साधर्म्य आहे का???

भानिम's picture

3 Dec 2015 - 4:37 pm | भानिम

अंगकोर वाटचे निर्माण कंबोडियाचा पल्लव वंशातील राजा सूर्यवर्मन दुसरा याने बाराव्या शतकात केले. पल्लव वंश हा कांचीपुरम येथील वंश असल्याने साहजिकच अंगकोर वाटची स्थापत्यशैली ही द्रविड मंदिर शैलीशी मिळतीजुळती आहे.