प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग २

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 11:57 am

पहिल्या भागात आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसाराला कशी सुरवात झाली आणि भारतीय शास्त्राध्यापक तिबेटपर्यंत कसे पोहोचले ते पाहिले.

या भागात आपण चीन आणि इतर आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला ते पाहुया.

हान राजघराण्यातील 'मिंग ती' या सम्राटाच्या आमंत्रणानुसार इ. स. ६७ मध्ये 'कश्यप मार्तंग' आणि 'धर्मरक्षित' हे दोन भारतीय विद्वान चीनमध्ये गेले आणि त्यानंतर नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला आणि ओदान्तपुरी येथील अनेक विद्वान तेथे पोहोचले.

ख्रिस्त पश्चात चौथ्या शतकात 'वी' राजघराण्यातील सम्राटाने बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून घोषित केला. त्यावेळी तिथे असलेले 'आचार्य कुमारजीव' यांना सम्राटाने संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत अनुवाद करण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद केला असे सांगितले जाते.
अत्यंत प्रसिद्धी पावलेले आणखी एक विद्वान योगी म्हणजे 'बोधिधर्म' किंवा चीनी भाषेमध्ये 'दा मो' (ख्रिस्त पश्चात ५ वे ते ६वे शतक)

- 'शाओ लीन' या प्रसिद्ध बौद्ध मठाचे मठाधिपती, 'शाओ लीन कुंग फू' या जगप्रसिद्ध स्वसंरक्षण युद्धकलेचे जनक, आणि 'चान' (प्रत्यक्षात 'ध्यान') किंवा जपानीमध्ये 'झेन' या बौद्ध धर्माच्या शाखेचे संस्थापक म्हणून ते विद्वान जगतामध्ये तसेच जनसामान्यांमध्येही तितकेच प्रसिद्ध आहेत.
बोधिधर्म यांच्या जीवनावर अलीकडेच एक भारतीय चित्रपटही येऊन गेला.
ख्रिस्त पश्चात तिसऱ्या शतकात भारतीय बौद्ध विद्वान चीन देशालगतच्या कोरिया मध्येही जाऊन पोहोचले. प्रथम बौद्ध महंत 'सुन्दो' हे इ. स. ३५२ मध्ये बुद्ध प्रतिमा आणि बौद्ध सुत्रांसहित येथे पोहोचले. त्यानंतर आचार्य मल्लानंद आणि अनेक बौद्ध विद्वान येथे येऊन पोहोचले. त्यांनी 'प्योंग यांग' येथे दोन बौद्ध मठांची स्थापना केली, त्याचबरोबर भारतीय तत्वज्ञान, शिल्पकला, चित्रकला, धातूविज्ञान व धातूकला यांचा प्रसार केला.

त्यानंतर अनेक कोरियन विद्वान देखील भारतात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. भारतीय विद्यापिठांतून त्यांनी खगोल शास्त्र, फलज्योतिष, वैद्यक आणि इतर शाखांमधून अभ्यास केला.

'चान' (ध्यान योग) ख्रिस्त पश्चात आठव्या ते नवव्या शतकात कोरिया मध्ये येउन पोहोचला. कोरियन राजे, राण्या, मंत्री आणि योद्धेदेखील ध्यान योगाचा अभ्यास करित असत.

बौद्ध धर्माचा आणि त्यायोगे भारतीय संस्कृतीचा प्रवेश जपान मध्ये इ.स. ५५२ मध्ये झाला असे मानले जाते. त्या काळच्या कोरियन सम्राटाने जपानच्या सम्राटाला बुद्ध मूर्ती, बौद्ध सूत्रे, पुजेची साधने, कलाकार, चित्रकार आणि स्थापत्यविशारद इ. भेट म्हणून पाठवले आणि त्यातून जपान मध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला असे म्हंटले जाते.

त्या आधीही संस्कृत भाषा जपानमध्ये पवित्र भाषा मानली जात होती. अनेक जपानी विद्यार्थी संस्कृतचे शिक्षण घेत होते. ज्या जपानी लिपीमध्ये सूत्रे लिहिलीजात असत, त्याला 'शित्तन' म्हंटले जाते. या शब्दाचा उगम 'सिद्धम' या शब्दापासून झाला असे मानले जाते.

सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला पाठविले हे तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील प्रमुख धर्म आहे हेही आपल्याला माहित आहे.

ख्रिस्त पश्चात पहिल्या शतकापासून भारतीय व्यापारी, ब्राह्मण वर्ग (शिक्षक आणि उपाध्याय), कारागीर आणि कलाकार म्यानमार (ब्रह्म देश) येथे स्थायिक व्हायला सुरवात झाली. म्यानमार किंवा ब्रह्म देश हा चीनच्या सागरी मार्गावरील पहिला देश असल्यामुळे भारतीय बंदर शहरांमधील लोक, म्हणजे अमरावती, ताम्रालीप्ती इत्यादी शहरांमधील लोक ब्रह्म देशात स्थलांतरित झाले. नजीकच्या काळापर्यंत ब्रह्म देशात दरबारी अधिकारी वर्गात पंडित (पोन्ना) म्हणजे मणिपूरमधून स्थलांतरित झालेल्या ब्राह्मण वर्गाचा भरणा असे. अकराव्या शतकापासून म्यानमारमध्ये बौद्ध धर्माचे प्राबल्य निर्माण झाले.

त्याचप्रमाणे थायलंड (पूर्वीचे सयाम, सुवर्णभूमी) येथेही भारतीय व्यापारी, ब्राह्मण आणि इतर कामे करणारे लोक ख्रिस्त पश्चात पहिल्या शतकापासून स्थलांतरित झाले. यामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्मागुरुंचाही समावेश होता. त्यामुळे येथील समाजजीवनावर हिंदू संस्कृतीचा, रामायण, महाभारत इत्यादींचा मोठा पगडा होता. थायलंडमध्ये तिसऱ्या व चौथ्या शतकात हिंदू आणि बौद्ध मंदिरांचे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. तेथील शहरांची नावेही भारतीय (आता अपभ्रंशीत) आहेत - कांचनबुरी (कांचनपुरी), राजबुरी (राजपुरी), लोबुरी (लवपुरी), प्राचीनबुरी (प्राचीनपुरी), सिंघाबुरी (सिंहपुरी), अयुथ्थिया (अयोध्या) इत्यादी.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

जिज्ञासूंसाठी लिंक्स पेस्टत आहे -
जपान आणि संस्कृत -http://www.onmarkproductions.com/html/before-buddhism-hindu.html
चीन आणि भारतीय ज्ञान प्रसार - https://books.google.com/books?id=mjFfqpq7HhkC&pg=PA602&lpg=PA602&dq=min...

बोधीधर्म - http://www.usashaolintemple.org/chanbuddhism-history/
संस्कृत आणि जपान २ - http://www.in.emb-japan.go.jp/Friendship_Year2007/Lecture-July.html

जिज्ञासूंसाठी -

थायलंड आणि भारतीय संस्कृती - https://www.youtube.com/playlist?list=PLylB5dSQ8xssj5xLDi7x0SRWS3gdOSK_W

http://www.oxfordbibliographies.com/view/document/obo-9780195393521/obo-...

मणिपुरी पोन्ना ब्राह्मण आणि म्यानमार - https://joshuaproject.net/people_groups/13513/BM

http://www.sermonindex.net/modules/newbb/viewtopic.php?topic_id=51911&fo...

माहितगार's picture

24 Nov 2015 - 1:36 pm | माहितगार

लेख आवडला, संदर्भ नमुद करण्यासाठी आभार.

धन्यवाद....

अर्धवटराव's picture

24 Nov 2015 - 1:01 pm | अर्धवटराव

आपली अत्यंत महान संस्कृती खरच महान होती कि काय ??

माहितगार's picture

24 Nov 2015 - 1:39 pm | माहितगार

किमान या लेखात -लेखन ससंदर्भ आहे- आत्मस्तुतीपर विशेषणांचा ठोकळेबाज बडेजाव दिसत नाही.

अर्धवटराव's picture

24 Nov 2015 - 11:51 pm | अर्धवटराव

तसंही असेल. बाकी कौतुक आहेच.

राही's picture

24 Nov 2015 - 1:11 pm | राही

भारतीय संस्कृती पूर्वी कशी आणि किती महान होती हे बहुधा सर्वांना माहीत आणि पटलेले आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की तिचा र्‍हास का व कसा झाला.
र्‍हास झालाच नाही असे म्हणणे असेल तरीही सपशेल मान्यच.

वाचतोय. भारतीय संस्कृतीचा र्‍हास झाला असे म्हणता येणार नाही. भारताबाहेर पोहोचलेल्या भारतीय संस्कृतीचा विकास आणि त्यात आलेली स्थित्यंतरे ही मूळ भूमीत समांतरपणे घडत असणार्‍या स्थित्यंतरांपेक्षा स्वाभाविकपणे वेगळ्या प्रकारे होत गेली. जर भारतीय संस्कृतीचा र्‍हास कुठे झाला असेल तर तो भारतभूतच झाला असेच मी हा वरील धागा पकडून म्हणेन.

पुभाप्र.

व भारतीय संस्कृतीचा र्‍हास झाला असे हिंदु विद्वान ओरडत असतात. मग चीन व जपान ही बौद्ध असुनही कशी टिकली ?

विनोदाचा भाग हा आहे की हा आरोप करणार्‍या सावरकराना जिथे ठेवले होते ते अंदमानदेखील बौद्ध जपान्यानी इंग्रजांशी लढुन स्वतंत्र केले.

माहितगार's picture

24 Nov 2015 - 1:46 pm | माहितगार

मग चीन व जपान ही बौद्ध असुनही...

ह्या उदाहरणांच्या चपखलते बद्दल साशंक आहे आपण जे म्हणू इच्छिता त्यासाठी ब्रह्मदेश (म्यानमार) हे कदाचीत अधिक चपखल उदाहरण असावे.

माहितगार's picture

24 Nov 2015 - 1:43 pm | माहितगार

त्यामुळे येथील समाजजीवनावर हिंदू संस्कृतीचा, रामायण, महाभारत इत्यादींचा मोठा पगडा होता.

@ भानिम या वाक्यातील 'मोठा' हे विशेषण टाळण्या जोगे आहे किंवा कसे आपण विशेषणे जोडण्यापेक्षा लेखनातील ससंदर्भ माहितीतून वाचकास आपोआप तसे वाटलेले उत्तम ठरू शकेल का याचा विचार व्हावा असे वाटते. बाकी लेखन उत्तम. पु. भा. प्र.

सूचना स्वागतार्ह… नोंद घेतली आहे… आभार

धन्यवाद एस… 'परस्परे प्रत्ययो' आणल्याबद्दल…
लेखमालेचे प्रयोजन भारतीय संस्कृती महान होती किंवा कशी व का महान होती हे विशद करण्याचे नाहीये.
भारताबाहेर भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला, आणि त्याचे विविध आयाम यांचे वस्तुनिष्ठ आणि नि:पक्षपाती सिंहावलोकन करणे आणि विशद करणे हा हेतू आहे.