रिकामी घंटा, लोलक गायब

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 11:13 am

वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती टिपणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण....

रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो.

नाटक सुरु झाले, कादंबरी कदमने स्टेजचा ताबा घेतला. हळुहळू नाटक पुढे जात राहिले तसे नाटकाचे नेपथ्य कल्पक व छान आहे हे जाणवले. पण तो आनंद जास्त टिकला नाही कारण नाटकातली भाषा! आजकाल, गंभीर प्रसंगातही शक्य तेवढे, 'हंशा आणि टाळ्या' मिळवलेच पाहिजेत, अशी बहुधा दिग्दर्शकांची अपेक्षा असावी. त्यानुसार सर्व अनुभवी व नवीन कलाकारही वावरत होते. प्रत्येक पीजेला आमच्या मागचा ग्रुप सातमजली हंसून आपली अभिरुची दाखवून देत होता.

स्वाती, आतिषा आणि संजय यांना वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेला एकटेपणा, आणि त्यावर त्यांनी शोधून काढलेले उपाय, या सर्वांचे निरीक्षण करत असलेली नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून कादंबरी कदम आणि जोडीला तिचा प्रियकर, त्यांचे प्लान्स, त्यातील एकटेपणाचा संभाव्य धोका या मुद्द्यांभोवती नाटक फिरते. पण,

मॉडर्न आर्टने तयार केलेल्या पॉट ला पॉटी म्हणणे आणि उगाचच येताजाता मॉडर्न आर्टवर घसरणे

प्रत्येक पात्राच्या तोंडी,' रिकामी घंटा, गायब लोलक' हे वाक्य पुन्हा पुन्हा घालणे

मी आता पागे बाई (पाळी गेलेली बाई) झालीये असे म्हणणे

फेसबुकवरच्या LOL चा, 'तू तिथे लोळ मी इथे लोळते' असा अर्थ काढणे

असे अनेक पीजे संवादात पेरले आहेत आणि असल्याच विनोदांना सरावलेले प्रेक्षक ते डोक्यावर घेतात.

नाटकाचा गोषवारा, लेखकाच्याच भाषेत सांगायचा म्हणजे, बर्वेबाई(स्वाती) आणि आरती(आतिषा} यांनी, आपण रिकाम्या घंटा आहोत हे जाहीर केलेले असते. त्यातील बर्वेबाईंच्या लोलकाने अनेक घंटांबरोबर घंटानादाचा आनंद घेऊन, फोटोत जाऊन बसण्याचा पर्याय निवडलेला असतो, तर आरतीचा लोलक हा मॅन्युफॅक्चरिंग मधे डिफेक्ट असल्याने, पण चांगल्या स्वभावाचा असल्याने, स्वतःहूनच तिच्यापासून दूर गेलेला असतो. ससाण्यांची(संजय) घंटा पण फोटोत जाऊन बसल्याने तो एकाकी लोलक झालेला असतो. विनयाचा(कादंबरी) लोलक महत्त्वाकांक्षी असल्याने, ज्या घंटेशी हिशोब जुळेल तिचाच घंटानाद करायचे ठरवतो. सर्वात ज्युनिअर विनयाच शेवटी सगळ्यांना 'ताईचे सल्ले' देते आणि मार्ग दाखवते. वडिलांनी त्या महत्त्वाकांक्षी तरुणाबरोबर लग्न करु मोकळी हो, असा पारंपारिक सल्ला दिल्याने तिच्यातला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार उसळी मारुन वर येतो आणि ती सहजपणे आपल्या प्रियकराला(लोलकाला) मोकळे करते. आणि सगळीकडे कसा आनंदीआनंद होतो.

आम्ही, कोल्हटकरी नाटकांपासून बाळ कोल्हटकरी नाटकांपर्यंत आणि कानेटकरी नाटकांपासून तेंडुलकरी, एलकुंचवारी नाटके आत्मीयतेने बघितली आहेत. मराठी नाटकाने अनेक वेळा कात टाकलेली बघून, त्या कात टाकलेल्या नागाच्या नावीन्यपूर्ण सळसळीने वेडावलो आहोत. पण या सगळ्या प्रवासांत भाषेचा अभिजातपणा मात्र तसाच टिकून राहिलेला अनुभवला आहे. हल्लीची अनेक उठवळ नाटके आणि प्रस्तुत नाटक बघितल्यावर मात्र, 'कात रिकामी, नाग गायब' असे काहीसे मनांत आले.

नाट्यमुक्तकभाषाप्रतिक्रियामतविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

13 Jul 2015 - 11:23 am | आदूबाळ

घंटेच्या टोल्याला "लोलक" कधीपासून म्हणायला लागले? लोलक म्हणजे प्रिझम ना?

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 11:29 am | टवाळ कार्टा

भौतेक त्येन्ला लंबक म्हणायचे असेल...जौदे

तिमा's picture

13 Jul 2015 - 11:32 am | तिमा

लंबक बरोबर शब्द आहे, पण नाटकांत वापरलेला नाही.

नाखु's picture

13 Jul 2015 - 11:37 am | नाखु

असेल तर या लंबकापासून लांबलेलेच बरे!!!

एस's picture

13 Jul 2015 - 11:57 am | एस

+१

खटपट्या's picture

13 Jul 2015 - 11:55 am | खटपट्या

बघाय पायजे नाटक !! क्रांतीकारक हाये असे दिसतेय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोक तशी नाटके... शेवटी नाटकामागे जेवढी कला असते तेवढेच (किंवा बहुदा त्यापेक्षा जास्तच) अर्थकारणही असते ! :)

संदीप डांगे's picture

13 Jul 2015 - 12:05 pm | संदीप डांगे

लंबक जरा जास्तच वास्तवाच्या जवळ गेले असते असं लेखकाला वाटले असेल...?

पैसा's picture

13 Jul 2015 - 2:01 pm | पैसा

एकूण वाचल्यावर या नाटकाला जावे असे वाटत नाही. गंभीर विषयाची वाट लावलेली दिसते आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2015 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

कोणी फुकट दाखवत असेल तरच बघा टाइमपास म्हणून दिडक्या खर्च करण्याची अजिबात गरज नाही.
संजय मोने ने चांगले काम केले आहे ( ते काय तो करतोच.) तेवढ्यासाठी उठून नाटक बघायला जायची गरज नाही.
(पैसे घालवून वाळक्या शेंगा बघून आलेला) पैजारबुवा,