मला आवडलेले संगीतकार :– 3 अनिल बिश्वास

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
15 Jun 2015 - 9:29 am

मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र

बंगालचे नाव आले की डोळ्यासमोर येतात दोन गोष्टी , एक म्हणजे बंगाली मिठाई आणि रबिन्द्र संगीत. बंगाली माणसाच्या स्वभावातच गोडवा आणि संगीत असते. अशा मातीतून आलेल्या अनेक संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. पण त्यात सर्वप्रथम नाव येते अनिल बिश्वास यांचेच. हिंदी चित्रपटाला रबिन्द्र संगीताची ओळख करून देणारे पहिले संगीतकार असे जर त्यांना म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यानंतर आलेल्या अनेक संगीतकारांनी त्यांचे अनुकरण करत संगीत सृष्टीवर आपला ठसा उमटवला.

स्वातंत्र्यलढ्यात काही काळ भाग घेऊन सुमारे चार महिने कारावास भोगून जेव्हा अनिल बिश्वास कलकत्यात आले तेव्हा ही त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागलेलाच होता. तो चुकवत असताना त्यांना एका वेश्यावस्तीत चार दिवस लपून राहावे लागले. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी कलकत्त्याला चित्रसृष्टीत प्रवेश करण्यासाठी धडपड सुरु केली. त्यांची आई सुध्दा एक चांगली गायिका होती त्यामुळे संगीताचे बाळकडू त्यांना जन्मापासूनच मिळालेले होते. बंगाली संगीताचा वारसा आणि काहीतरी करून दाखवायचेच ही जिद्द घेऊन ते मुंबईला आले.

इस्टर्न आर्ट सिंडीकेट मध्ये महिना अडीचशे रुपयांची त्यांना नोकरी मिळाली. पण त्यांचा पहिला गाजलेला पिक्चर “धरम की देवी” हा होता. दोन वर्षानी त्यांना सागर मुव्हीटोन ने कामाची संधी दिली. १९४२ साली बॉम्बे टोकीजशी ते जोडले गेले तिथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जवळपास सत्तर चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या अतिशय गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जागीरदार, वतन, एक ही रस्ता, औरत, किस्मत, परदेसी यांचा उल्लेख करता येईल.

हिंदी चित्रपटसंगीतामध्ये प्रयोगशीलतेचा मान पण त्यांनाच जातो. बंगाली, पंजाबी, काश्मिरी, असामी, मराठी, तमिळ लोकसंगीताचा सखोल अभ्यास करून वेळोवेळी त्यांचा आपल्या संगीतात त्यांनी वापर केला. प्रसंगी पाश्चिमात्य संगीताचाही त्यांनी वापर केला. त्यांच्या अनेक गाण्यांवर रबिन्द्र संगीत आणि शास्त्रीय संगीताचा प्रभाव आढळते. त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सौतेला भाई या चित्रपटात शास्त्रीय संगीतावर आधारित दोन सुरेख गाणी बनवली आहेत ती म्हणजे "लागी नाही छुटे" आणि "जा मै तोसे नाही बोलू".

परदेसी चित्रपटात "रिमिझिमी बरसे पानी आज मोरे अंगना" मधला मराठमोळा बाज कानाला जितका सुखावतो. तितकाच "ना दिड दिन तन दे रे ना" मधला शंकराभरणम हा दक्षिण भारतीय राग डोलायला लावतो. आणि "रसिया रे मन बसिया रे" हे तर रबिन्द्र संगीताची छाप असलेले गाणे ही तितकेच सुमधुर आहे. एकाच चित्रपटात लोकसंगीताचे अनेक प्रकार असणारा हा पहिलाच प्रयत्न होता. तसेच राही चित्रपटातील आसामी आणि काश्मिरी लोकसंगीतावर आधारित गाणी लोकांच्या पसंतीला उतरली होती. हमदर्द या चित्रपटातील "रुतु आये रुतु जाये" गाण्यात त्यांनी चार ऋतूचे प्रातिनिधिक चार रागांचा उपयोग केला आहे." दिल जलता है तो जलने दे" म्हणत पार्श्वगायनात प्रवेश करणाऱ्या मुकेशला अनिल बिश्वासांनीच पहिली संधी दिली. वास्तविक हे गाणे ते स्वत गाणार होते. पण त्यांनी ऐनवेळेला मुकेशकडून हे गाणे गाऊन घेतले आणि त्यानंतर मुकेश हे नाव सर्वतोमुखी झाले. "ए दिल मुझे ऐसी जगह ले चल" या गाण्यातून तलत मेहमूद नावाचे मखमली आवाजाचे रत्न त्यांनी पुढे आणले. परदेसी चित्रपटामुळे गाजलेल्या मीना कपूर या नवोदित गायिकेकडून अनिल दा नी खरे तर "मेरे लिये वो गम-ए-इंतजार छोड गये" या त्यांच्या अनोखा प्यार चित्रपटातील गाण्यात गाऊन घेतले. पण प्रत्यक्षात हे गाणे पडद्यावर आले लताबाईंच्या आवाजात. पुढे अनिल बिश्वास यांनी मीना कपूर यांच्याशी लग्न केले. गायिका सुधा मलहोत्राला सुद्धा अनिल बिश्वास यांनी पहिली संधी दिली होती.

दिवस जात होते. चित्रपटसंगीतात एक नवीन पिढी उदयाला येत होती. संगीताचा बाज बदलत चालला होता. हा बदल अनिल बिश्वास यांना रुचला नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला आणि आपले बस्तान दिल्लीला हलवले. तिथे त्यांनी ऑल इंडिया रेडीओमध्ये काही काळ काम केले. आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यात काही काळ व्यतीत केला. 2003 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.

अफसोस अजल ले चली मैखानेसे
बन जायेंगे कुछ देरमे अफसानेसे
हम रिंद-ए-बलानोश गर याद आ जाए
छलका देना थोडीसी पैमानेसे !

मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन

कलासंगीतचित्रपट

प्रतिक्रिया

hitesh's picture

15 Jun 2015 - 10:25 am | hitesh

छान

मुक्त विहारि's picture

15 Jun 2015 - 10:38 am | मुक्त विहारि

लेखमाला छान सुरु आहे.

एस's picture

15 Jun 2015 - 12:46 pm | एस

छान लिहिलेय!

अनंत छंदी's picture

15 Jun 2015 - 9:53 pm | अनंत छंदी

छान लिहिताय! एक विनंती आहे या संगीतकारांची जी गाजलेली गाणी आहेत त्यांची एक यादी लेखाच्या शेवटी द्यावी.

प्रसाद१९७१'s picture

16 Jun 2015 - 9:57 am | प्रसाद१९७१

हे अवांतर आहे तरी पण लिहण्याचा मोह आवरत नाही.

जनरली हिंदी सिनेमा संगिता वर जी लोक लेख, पुस्तके वगैरे लिहीतात ते ज्या संगीतकारांनी शेकड्यांनी उत्तम उत्तम गाणी दिली ( जसे शंकर्-जयकिशन, एसडी, नौशाद, ओपी, कल्याणजी आनंदजी आणि हो एलपी पण. ) त्यांना इग्नोर करुन एकदम अनिल बिश्वास, किंवा सज्जाद हुसेन ह्यांना नंबर १, २ वर कसे बसवतात ते कळत नाही. रोशन ( आणि रवि ) ला पण विसरले जाते.

माझा प्रश्न असा होता की, प्रचंड प्रसिद्धी आणि यश मिळाले असले की दर्जाशी तडजोड केली आहे असेच गृहीत असते की की हा "ह्हुच्चभ्रू" प्रकार आहे.

प्रदीप's picture

16 Jun 2015 - 6:27 pm | प्रदीप

प्रश्न आवडला. लेखकाने त्याला आवडलेल्या संगीतकारांविषयी लेखमाला लिहीण्याचे ठरवलेले असल्याने, वास्तविक अमुकच संगीतकार का, तमुक का नाही असा प्रश्न गैरलागू आहे. तरीही प्रश्न उरतोच! त्याविषयी मी माझे काही निरीक्षण नोंदवतो.

सर्वसाधारणपणे जुने (म्हणजे १९९० च्या अगोदरचे) हिंदी चित्रपटसंगीत आवडणार्‍यांचे अगदी ढोबळमानाने दोन वर्ग पडतात. पहिला, त्यांतील लोकप्रिय संगीतकारांची गाणी आवडणारा, सामान्यजन. ह्यांना शंकर जयकिशन, ओ. पी., चित्रगुप्त, लक्ष्मी- प्यारे, नौशाद, एन. दत्ता, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन ह्यांची गाणी प्रामुख्याने आवडतात, त्याचबरोबर मदन मोहन, जयदेव, रोशन ह्यांचीही. ह्या वर्गातील श्रोत्यांची आवड लोकप्रिय गाण्यांच्या भोवती फिरत असते. मी ह्या वर्गात मोडतो. तेव्हा उदा. शंकर जयकिशन म्हटले, की माझ्या कानांत आवारा, बसंत बहार, अनाडी, दिल तेरा दिवाना, असली नकली, प्रोफेसर, कठपुतली, दिल अपना और प्रीत पराई, छोटी बहेन, आशिक, एक दिल और सओ अफसाने, संगम... इत्यादी गुंजू लागतात.

पण श्रोत्यांचा दुसरा वर्ग 'रसिकां'चा. ह्यांना एकतर असले लोकप्रिय काही आवडत नसते, ते त्यांना हिन दर्जाचे वाटत असते. त्यतील काही त्यांनी आवडलेले आहे असे म्हटले तरी ते इतके कोपर्‍यातले असते, की ज्याचे नाव ते! हे शंकर- जयकिशनचा उल्लेख बहुधा फक्त 'काली घटा' च्या संदर्भात करणार. ते संगीत चांगले होते हे कबूल, पण ते काही त्यांचा ठसा असलेले संगीत नव्हते, असे माझ्यासारख्या 'सामान्याचे'मत. ह्यांचे कान तिमीर बर्मन, हंसराज बहेल, सज्जाद हुसैन, वसंत देसाई, अनिल बिश्वास, बुलो सी. रानी अशा 'दिग्गजां'च्या संगीतात डुबलेले असतात. त्यातही थोडी गोची अशी, की, उदा. हंसराज बहेल म्हटले की मला त्याची लताची दोन झणझणीत अशी 'हाये जिया रोये' व 'जब रात नही ढलती' अशीच (व इतकीच) गाणी आठवतात. असे म्हटल्यावर हे दुसर्‍या वर्गातील दिग्गज आपणांस त्याची कुठलीतरी तिसरीच कोपर्‍यात पडलेली गाणी आपल्या तोंडावर फेकतात. सुधीर फडके म्हटले की (हिंदी चित्रपट संगीताच्या संदर्भात)माझ्यासारख्या पहिल्या वर्गातील व्यक्तिस 'लौ लगाती' व 'ज्योति कलश झलके' आठवावे. मग ही दुसर्‍या वर्गातील मंडळी आपल्याकडे मेलेल्या झुरळाकडे पाहात, 'अरे तू, मालती माधवमधील 'बांध प्रीति फुलडोर' चा गजर करतात! वास्तविक मला हे गाणे अत्यंत सामान्य वाटते. तीच बाब हंसराज बहेलच्या अनेक इतर गीतांची! ती मी अगदीच ऐकली नाहीत असे नव्हे, पण ती सामान्य वाटली व म्हणूनच ती लोकप्रिय झाली नाहीत असे वाटत राहिले.

आता इथेच पहा. सी. रामचंद्रांच्या लेखात 'आझाद' च्या एकही (माझ्या मते भन्नाट) गीताचा उल्लेख नाही, नवरंग नाही, लालाभाउंची अजरामर ढोलकी वाजलेल्या, 'अमरदीप' मधील 'मेरे मन का बावरा पंछी' चा उल्लेख नाही. बहुरानीतील लताच्या दोन्ही गीतांचा ('बलम अनाडी मन भाये', 'मै जागू सारी रैन') नाही. ही सगळी लोकप्रिय गाणी होती, तेव्हा ती लोकांच्या नजरेसमोर होती, तेव्हा त्यांना वगळून कोपर्‍यातील कुठच्यातरी गाण्यांचा उल्लेख जरूर आहे! तीच गोष्ट अनिल बिश्वासवरील लेखाची. तिथे 'तराना' च्या एकाही गीताचा उल्लेख नाही, 'इंतजार और अभी' चा नाही!

थोडक्यात असे लेख, अशा रसिकांबरोबरील चर्चा आमच्यासारख्या वर उल्लेखिलेल्या 'प्रथम वर्गातील' सर्वसामान्यांसाठी नव्हेतच! ते तसे 'रसिक' होण्याचे भाग्य आमच्या नशिबी नाही, काय करायचे?

अभिजित - १'s picture

17 Jun 2015 - 7:48 pm | अभिजित - १

प्रचंड सहमत. सज्जाद ला ज्याम डोक्यावर उचलून घेतला आहे असे वाटते. सगळे जुने लेखक १५ / २० वर्ष पूर्वी वाचताना सज्जाद ला ज्याम उचलून धरायचे. त्याचे " माजंदरान " म्हणून एक तलत ने गायलेले गाणे आहे त्याला एकदम प्रचंड उचलून असे गाणे इतर कोणी हि संगीतकार करूच शकले नसते असे वाचले. मी ते गाणे ऐकले. एकदम वेगळे संगीत आहे. ठीक आहे. नंतर एकदा टर्किश airlines ने प्रवास करताना सहज हेड फोन चढवले कानावर .. ऐकतो तर सगळी गाणी माजंदरान चीच चक्क कॉपी !!

प्रसाद१९७१'s picture

16 Jun 2015 - 9:59 am | प्रसाद१९७१

चित्रपटसंगीतात एक नवीन पिढी उदयाला येत होती. संगीताचा बाज बदलत चालला होता. हा बदल अनिल बिश्वास यांना रुचला नाही.

हे वाक्य कोणी विस्कटुन सांगणार का? अनिलबिश्वास ह्यांना काम मिळणे बंद झाले तेंव्हा नौशाद, एस्डी, शं-ज, ओपी पूर्ण जोमाने काम करत होते. ह्यांच्या संगीताच्या बाजात न रुचण्यासारखे काय होते हे कोणी सांगेल का?

अनिल बिश्वास ह्यांच्या बद्दल आदरच आहे, पण असे काहीतरी लिहीताना दुसर्‍यांवर प्रश्नचिन्ह लादले जाते, ते नको

प्रदीप's picture

16 Jun 2015 - 7:31 pm | प्रदीप

ह्या वाक्याचा सरळ अर्थ हा की बदलत्या काळाशी सदर संगीतकार जुळवून घेऊ शकला नाही. त्याचे संगीत (एकेकाळी खरोखरीच प्रगल्भ व थोर होते) पूर्वी होते तिथेच राहिले, सांचलेल्या डबक्यासारखे. संगीतातील नवीन प्रवाह त्याच्यापर्यंत आले नाहीत. ज्यांनी ते जाणाले व जोपासले, ते पूर्वीइतकेच कार्यरत राहीले (नव्या दमाचे गुणी संगीतकार आता पटलावर आले, तरीही). ज्यांना हे जमले नाही, ते बाजूला फेकले गेले.

पण होते काय, हे असे 'सेल-बाय' डेट झालेले संगीतकार स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग बाळगून असतात, ते त्या चाहत्यांसमोर मग असली काही वक्तव्ये करतात, त्यात मग ते इतरांनाही दोष देतात. हे त्यांचे भक्तगण ते उचलून धरतात, त्यातून असली वाक्ये आपणांसमोर येतात.

असेच अजून एक भंपक विधान (जे अनिल बिस्वास ह्यांच्या संदर्भात नव्हे, पण इतर काही संगीतकारांच्य संदर्भात) केले जाते ते म्हणजे 'त्यांना वाद्यांचा गोंगाट आव्डत नसे, तेव्हा ते निवडल दोन अथवा तीन वाद्ये घेऊनच त्यांची गाणी रचत'. हिंदी चित्रपट संगीताच्या संदर्भात (जिथे रेकॉर्डिंगसाठी पैसा बर्‍यापैकी उपलब्ध असायचा), ह्याचा सरळ अर्थ, सदर संगीतकाराकडे गुणी माणासे गोळा करून त्यांच्याकडून काम करून घेण्ञाची कुवत नव्हती. ती ज्यांच्यात होती, त्या अनेक गुणी संगीतकारांनी अनेकविध वाद्यांच्या साथीने नटलेले संगीत आपणंस बहाल केले. ही माणसे institutions होती. ह्याउलट हे 'दोन अथवा तीन' वाद्ये घेऊन 'गोंगाट न करणार संगीत देणारे' ह्याबाबतीत अपुरे होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2015 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिल बिश्वास यांची ओळख आवडली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

16 Jun 2015 - 10:55 am | तिमा

बंगाली माणसाच्या स्वभावातच गोडवा आणि संगीत असते.
आम्ही गेली ६० वर्षे मुंबईत काढली आहेत आणि कायम कॉस्मॉपॉलिटन भागात राहून आमचा सर्व प्रांतीय लोकांशी संबंध आला आहे. त्यामुळे वरील वाक्याशी मी अजिबात सहमत नाही. सगळे बंगाली वाईट असे विधान मी करणार नाही पण बंगाली जमीनदारीची मग्रुरी अनेकांमधे अनुभवली आहे. तसेच रविंद्र संगीत, हेच काय ते खरे संगीत आणि तुमचे सगळे तुच्छ, यापासून लता न आवडणारेही बघितले आहेत. थोडक्यांत, कुठल्याच प्रांताचे असे जनरलायझेशन करता येत नाही. बाकी चालू द्या.
अनिल विश्वास हे माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकारांपैकी एक आहेत.

"बंगाल्यांचा सांस्कृतिक इतिहास सुरू होतो रविंद्र संगितापासूनच. जेमतेम शंभर-सवाशे वर्षांचा इतिहास तो! त्यापूर्वीचे काय आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखे? आमच्याकडे कलिंग साम्राज्यापासूनचा लढवय्या इतिहास आहे, ओडिसी नृत्यशैलीसारखी स्वतंत्र नृत्यशैली आहे. ते सांस्कृतीकदृष्ट्या दरिद्री लोक आहेत!"

- वरील मते माझ्या एका ओडिसी मित्राची.

मला आवडलेले आणि फारसे ऐकायला मिळत नसलेले हे गीत अनिल बिश्वास यांनी संगीत दिलेले.

आ मोहोबत्त की बस्ती बसायेंगे हमः-

प्रदीप's picture

16 Jun 2015 - 8:24 pm | प्रदीप

.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

17 Jun 2015 - 9:38 pm | मनोज श्रीनिवास जोशी

अनिल विश्वास हे आवडणाऱ्या संगीतकारांमध्ये - लेखमाला वाचतो आहे.
<जयदेव वर लिहावे ही. वि.

चौकटराजा's picture

18 Jun 2015 - 8:40 am | चौकटराजा

श्री प्रदीप यानी वर्णन केलेला 'अति जुने ते सोने" अनवट ते सोने " हा एक रोग आहे असे मला वाटते. हा रोग चेपू वर तर फारच पसरलेला आहे. कुठलेतरी कोपर्‍यातले गाणे काढायचे व " अरे हे आपल्याला माहित नाही ? " असे दुसर्‍याला विचारून त्याला पार अजाण बालक ठरवायचे असा तो रोग आहे. असो त्याना तो लखलाभ. अनिल विश्वास व मी यांचा सम्बम्ध काय तर तो असा की अनिल विश्वासचा मी काही पंखा नाही. पण त्यांची अनेक गीते ही त्यांची आहेत हे मला माहित नसताना माझ्या मनात ठसली आहेत. उदा " याद रखना चांद तारो> हे लताबाईनी गायलेले. वा राही मतवाले - तलत सुरय्या . व अशी अनेक आहेत.मी याच मालिकेतील प्रतिसादात हे म्हटले होते की चाली चोरण्याचीही एक प्रतिभा असते.ती शंकर जय, ओपी व आर डी यांच्यात चांगलीच फोफावलेली होती. दीर्घकाळ टिकण्यासाठी असे काहीतरी करावेच लागते.ते या तिघानी काय अनेकानी केले आहे. व त्याचे सर्व तपशील आंजावर आहेत ही. काही असो अनिल विश्वास यानी काही अप्रतिम गाणी दिलीयत यात शंका नसावी .

पैसा's picture

18 Jun 2015 - 10:31 am | पैसा

जुनी अनेक गाणी परत आठवत आहेत. लेख चांगला आहे. या निमित्ताने प्रदीपदा लिहीत आहेत तेही उत्तम! अजून असे बरेच काही वाचायला हवे आहे!