क्षमा नावाच्या भूमातेस

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
22 Apr 2015 - 10:33 pm

अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई

आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने
लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही
तू क्षमा केलीस
आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही
असंख्य नांगरांचे फाळ
तू क्षमा केलीस
आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन
बुलडोझरने कापून टाकले आम्ही
तू क्षमा केलीस
आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल
जहरिले वीष कालवले आम्ही
तू क्षमा केलीस

आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध
तू पोटात घातलास
कृतघ्न उपजलो आम्ही
उन्मत्त झालो आम्ही
निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही
आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही

आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र
या पापी हातांनी फेडले आम्ही
तुझ्या अंगावर असंख्य वार
हसत कृरपणाने केले आम्ही
तुझ्या मांसाचे लचके तोडतोय
तुझे रक्त घटाघटा पितोय आम्ही

आम्हाला क्षमा करु नकोस आ‌ई
आता तरी या लेकरांना शिक्षा कर

- देवदत्त परुळेकर
(२२ एप्रिल - वसुंधरा दिवस)

भावकविताकरुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Apr 2015 - 8:09 pm | पैसा

कविता आवडली. वसुंधरेचे हाल करणार्‍या माणसाला निसर्ग वेगवेगळ्या मार्गानी शिक्षा करतोच.