१० एप्रिल आणि खलील जिब्रान

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
10 Apr 2015 - 12:24 am

१० एप्रिल आणि खलील जिब्रान
‘You are my brother and I love you. I love you when you bow in your mosque, and kneel in your church and pray in your synagogue. You and I are sons of one faith – the Spirit.’
असे सहृद विश्वबंधुत्व साध्यासोप्या शब्दांत मांडणाऱ्या खलिल जिब्रानचा १० एप्रिल हा स्मृतिदिन! शाळकरी वयात कुठल्यातरी रूपक कथेतून समोर आलेला हा कलावंत, जन्मभराचा सोबती झाला. साधारण पाऊणेकशे वर्षांपूर्वी लिहिलेले त्याचे अभिजात लेखन जगभरात आजही वाचले जाते. स्मरले जाते. त्याच्या रूपककथा प्रसंगा नुसार उद्धृत केल्या जातात, त्याच्या काव्यपंक्ती सुभाषितांप्रमाणे वापरल्या जातात, यातच त्याच्या लिखाणाचे ‘अक्षरत्व’ आहे!
लेबनॉन मध्ये जन्मलेल्या या मुलाचे नाव जिब्रान खलील जिब्रान! [अरब रिवाजा नुसार, मुलाच्या नावाबरोबर वडलांचे नाव आपोआप पुढे चालू राहते! पण जिब्रानच्या बाबतीत जरा निराळे घडले! पुढे अमेरिकेत अरब निर्वासितांच्या शाळेत शिकताना, हे लांबलचक नाव तोडून शाळेतल्या बाईनी ते, ‘खलील जिब्रान’ असे सुटसुटीत केले. ते कायमचे राहिले!] वडील उग्रतापट असल्याने छोटा खलील त्यांच्यापासून दूर रहायचा. त्या भीती आणि दडपणाची छाया त्याच्या लिखाणात वेगवेगळ्या रुपात दिसते. तथापि, प्रौढपणी जाणता खलील आपल्या पित्याविषयी लिहितो,
‘I admired him for his power – his honesty and integrity….. If a hundred were about him, he could command them with a word!’
याउलट कमिला, त्याच्या आईचा प्रभाव मात्र त्याच्यावर खूप खोलवर होता. धर्मपरायण, फ्रेंच व अरेबिक भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेल्या, संगीत व गाणं जाणणाऱ्या , उपजत शहाणपण आणि तरल बुद्धिमत्ता लाभलेल्या या आईने खलीलला लेबनीज लोककथा, बायबलकुराणातील गोष्टी तर सांगितल्याच, पण लेबनॉनच्या दऱ्याखोऱ्यातून मनसोक्त भटकंतीही घडवून आणली. नंतर या मुलाने आपल्या आईविषयी जे लिहिलेय, ते आपोआप वैश्विक होऊन गेले. तो लिहितो,
‘The most beautiful word on the lips of mankind is the word “Mother” and the most beautiful call is the call of “My Mother”. It is a word full of hope and love, a sweet and kind word coming from the depths of the heart. The mother is everything – she is our consolation in sorrow, our hope in misery, and our strength in weakness. She is the source of love, mercy, sympathy and forgiveness.’
वयाच्या ६व्या ७व्या वर्षीच घरात, आजूबाजूला, जिथे जागा मिळेल तिथे, चित्रं काढण्याचा त्याचा उद्योग सुरु झाला. घरच्या ओढगस्तीमुळे तितके कागदपेन्सिल्स मिळायचे नाहीत! पण एकदा त्याच्या आईने कुठूनतरी कागद मिळवून दिले, तर या मुलाने ते दोनचार कागद जमिनीत लावले! का, तर पुढच्या मौसमात या कागदाला आणखी कागद लागतील आणि चित्रं काढायला भरपूर कागद मिळतील,या आशेने! [मुलांची कल्पनाशक्ती अभावात किती तल्लख होऊ शकते!]
याच दरम्यान, घरातील ओढगस्त आणखी वाढू लागली.वडलांचा दारूजुगार, वाढत चाललेली खाणारी तोंडे, आजूबाजूला गरिबीलाचारी माजवणारे राजकीय-धार्मिक अराजक, कर्जबाजारी झाल्याने घरावर आलेली जप्ती...... पण या सगळ्याला धैर्याने तोंड देणाऱ्या कमिलाने मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. नवर्याला मागे सोडून खलीलसहित चार मुलाना घेऊन तिने, त्याकाळात अमेरिका गाठली. अरब निर्वासितांच्या बोस्टन मधील settlement मध्ये शिवणकाम करता करता, मुलांच्या सुखी भविष्याची स्वप्ने विणू लागली. आणि, इथे पहिल्यांदा, खलील , वयाच्या बाराव्या वर्षी, शाळेची पायरी चढला. सगळे काही सुखावह नव्हतेच, पण संधी आणि आशेला वाव होता. खलीलचे शिक्षण चालू राहावे म्हणून त्याच्या दोन भावंडांनी आईबरोबर काम करायला स्वतः होऊन सुरुवात केली. पुढे जेव्हा जेव्हा खलीलने बंधुत्वाबद्दल सुंदर भाष्य केले, तेव्हा तेव्हा त्यात आपल्या या दोन भावंडांविषयी [त्यातील एक सावत्र होता!] कृतज्ञता, प्रेम खोलवर उमटत गेले.
परंतु थोड्याच वर्षांत त्याच्या आईला तीव्रतेने वाटू लागले, कि अमेरिकेत राहून मुलाला आपल्या देशभाषासंस्कृतीचा विसर पडू नये! म्हणून त्या करारी बाईने सगळी जुळवाजुळव करून किशोरवयीन खलीलला काही वर्षांसाठी परत लेबनॉनला पाठविले. तिथे तो उत्तम अरेबिक, इस्लाम, सुफी पंथाचा अभ्यास करू लागला. याच वाढत्या वयात आजूबाजूचे अराजक, युद्धजन्यस्थिती,गरिबी, अज्ञान इ नी तो प्रचंड अस्वस्थ होत असे, तर दुसरीकडे सभोवती पसरलेल्या प्रचंड डोंगरदऱ्यांच्या आश्रयाला जाऊन मन:शांती शोधीत असे. हा एकांतवास, अर्थपूर्ण मौन, स्वत:शी झालेला संवाद, मनावरचे खोल सुफी संस्कार या सगळ्याचा परिपाक म्हणजे खलीलचा mysticism कडे वाढलेला ओढा! या आत्ममग्न स्थितीत त्याला जे जे म्हणून गवसले ते ते पुढे त्याच्या ‘The Prophet’ या जगप्रसिद्ध छोटेखानी पुस्तकात उतरले.
लेबनॉनमधील शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी तो अमेरिकेत घरी परतला. पण पुढच्या वर्षभरातच त्याच्या प्रिय आईचा आणि दोन भावंडांचा मृत्यू झाला. तो प्रचंड आघात आणि उरल्यासुरल्या घराची जबाबदारी, अशा स्थितीत त्याचा एकांत आणि लेखनचित्र प्रवास चालू राहिला.
दरम्यान, मेरी हेस्केल या त्याच्याहून वयाने १० वर्षांनी मोठ्या असलेल्या मुख्याधिपिकेशी त्याची ओळख झाली. त्याला लेखक, चित्रकार म्हणून पुढे आणणाऱ्या, त्याच्या अनेक अरेबिक हस्तलिखितांचे रसाळ इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या, मनाने त्याची सावली बनून राहिलेल्या त्याच्या या दीर्घकालीन मैत्रिणीला त्याने लिहिलेली सातेकशे पत्रे आजही लेबनॉनच्या त्याच्या संग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. हि मैत्री प्रेमापर्यंत पोहचली, परंतु तत्कालीन रूढीपरंपरा आणि समाजसंकेतांचे भान ठेवून, मेरीने समाजमान्य पद्धतीने एका लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केला. पण आर्थिक टेकू आणि मनाची सोबत मात्र खलीलसोबतच राहिली.... अगदी तो मरेपर्यंत. नव्हे त्याच्या मृत्यनंतरही! त्याच्या मृत्यूनंतर लेबनॉन मध्ये त्याचे स्मृतीसंग्रहालय उभारण्यात तिने मोठा पुढाकार घेतला. पण अशा प्रेमाची परिणती, तरुणपणी सोबत राहण्यात [लग्नात] न झाल्याने, अपूर्णतेतील तगमग त्याच्या आयुष्याला पुरून उरली. म्हणून प्रेमाविषयी लिहिताना, तो असंच अनिर्णीत लिहून जातो,
‘If you love somebody, let them go. If they return, they were always yours, but if they don’t, they never were!’
मला त्याचे विशेष यासाठी वाटते, लहानपणापासून ते अगदी मरेपर्यंत वेगवेगळ्या यातनावंचना सहन करणाऱ्या या कवीमनाच्या माणसाने आपल्या लेखणीतून कधीही कडवटपणा, तिरस्कार, द्वेष उमटू दिला नाही. उलट , उमटले ते केवळ असीम प्रेम, शहाणपण , नर्म विनोद, सद्भावना, बंधुत्व आणि माणुसकीवरची अपार श्रद्धा! नकळत वाटून जाते, आळंदीतल्या ज्ञानेश्वरांनी लेबनॉनमध्ये पुनर्जन्म घेतला! शेवटी या द्रष्ट्या कवीसाठी कविताच ....

प्रिय खलील जिब्रान,
आजही जग तुझ्या ‘The Prophet’ ला डोक्यावर घेऊन मिरवते!
पण दूरदूर दऱ्याखोऱ्यात एकाकी फुलाप्रमाणे,
अंत: करणात जीवघेणी कळ उमटवणारी
‘मार्था’ पण तुझीच!
सर्व पुस्तकांची कवाडे बंद होतात,
तेव्हा तुझीच एखादी इवलीशी कथा
आमच्या कोऱ्या कागदावर मर्मरेषा उमटवते!
तुझ्या अमूर्तगूढ गावामध्ये
आमच्या संवेदना अजून गप्पा मारतात!
थटून जातात शब्द सगळे
तिथे तुझी विवस्त्र चित्रे बोलू लागतात!
तू माशाचेही दु:ख सांगितलेस
तेव्हा आमच्या मनाची खोली गपकन किती खोल गेली!
अन तुझा प्रेषित,
‘तुमची मुले तुमची नसतात’ असे बोलू लागला,
तेव्हा आम्ही रस्त्या कडेला उभे राहून
स्वत: सहित गर्दीकडे पहायला शिकलो !
आता एकच व्हावे,
तुझ्या लेबनॉन मधील अल-बशेर कडे येईपर्यंत
आमच्या चपलीचे अंगठे शाबूत रहावेत,
अन निरर्थाचे उरले धडे
आम्ही तिथेच वाळूवर गिरवावेत!
----- शिवकन्या
[हा लेख मुद्दाम त्याच्या पूर्वायुष्यातील घडणी पुरताच मर्यादित ठेवला आहे.मिपा वर त्याच्या फक्त काहीच गोष्टी अनुवाद रूपाने आणता आल्या. रूपक कथा उलगडण्यात अनेक हुश्शार मिपाकार सरसावले, त्या सर्वांचे आभार!]

वाङ्मयसाहित्यिकलेख

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

10 Apr 2015 - 5:43 am | अनन्त अवधुत

छान लिहिले आहे.

छान माहिती सांगितलीत आपण... :)
खलील जिब्रान यांचा मला आवडणारा Quote :- Life without love is like a tree without blossoms or fruit.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)

बोका-ए-आझम's picture

10 Apr 2015 - 9:07 am | बोका-ए-आझम

छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

विशाखा पाटील's picture

10 Apr 2015 - 9:14 am | विशाखा पाटील

आवडलं. खलील जिब्रानने आपल्या लेखणी आणि कुंचल्यातून मानवतावाद चित्रीत केला. दुर्दैवाने त्याच्या जन्मभूमीला मात्र शांतता लाभली नाही.

उगा काहितरीच's picture

10 Apr 2015 - 10:00 am | उगा काहितरीच

वा ! आवडला लेख .

प्राची अश्विनी's picture

10 Apr 2015 - 9:03 pm | प्राची अश्विनी

वा! छान लिहिले आहे.
खलिल जिब्रान आणि रुमी हे माझे अतिशय आवड्ते आहेत .
रुमीचे देखिल भाषांतर/ अनुवाद वाचायला आवडेल .

रुस्तम's picture

10 Apr 2015 - 9:48 pm | रुस्तम

लेख आवडला.

शिव कन्या's picture

10 Apr 2015 - 10:02 pm | शिव कन्या

धन्यवाद प्राची ....सवड मिळेल अन् मूड लागेल तसा प्रयत्न करेन.

शिव कन्या's picture

10 Apr 2015 - 10:13 pm | शिव कन्या

होय विशाखा!

चाणक्य's picture

10 Apr 2015 - 10:41 pm | चाणक्य

आवडला