शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
3 Mar 2015 - 3:32 pm
गाभा: 

माझा एक मित्र नेहमीच विना कटकटीच्या,धोका नसलेल्या आणि फायद्याची शक्यता असलेल्या संधींच्या शोधांत असतो.असलेल्या नसलेल्या सर्व धोक्यांची 'काळजी' करण्याच्या त्याच्या सवयामुळे मी त्याला 'काळजीवाहु' हा दर्जा बहाल केला आहे. बजेटच्या संदर्भात मी त्याला 'ह्मखास फायद्याची' एक आयडिया सांगितली.

शुक्रवारी दुपारी मी त्याच्याकडुन 'IDBI Nifty Index Fund' मध्ये गुंतवण्यासाठी २ लाखाचा चेक मागितल्याबरोबर अपेक्षेप्रमाणेच त्याचे "अरे नको रे, मी नाही बाबा अशी रिस्क घेणार....' सुरु झाले.

"हे बघ, खास तुझ्यासाठी ही आयडिया आहे. आजच्या (शुक्रवारच्या)NAV ने युनिटस विकत घ्यायचे, उद्या बजेट, बाजार चालु, बॅंका बंद, हो ना ??.. मार्केटला आवडले आणि उद्या(शनिवारी) व सोमवारी बाजार वर गेला तर मिळालेले युनिट्स सोमवारच्या NAVला विकुन टाकयचे!!!" मी म्हटले. "अरे ते ठीक आहे पण 'गोविंदा' झाला तर?? झोपलो की"- काळजीवाहु "हे बघ बाजाराचा गोविंदा होईल किंवा अण्णु गोगट्या, आपल्याला काय करावचेय??..शेंडी तर आपल्याच हातात आहे. अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केला आणि बजेटची गडबड असल्याने त्याची प्रतिक्रिया पहायलाही न थांबता त्यच्याकडुन चेक घेवुन तेथुन निघालो.

झाले, आम्ही शुक्रवारी १६.६१ रुपयाने घेतलेले युनिटस काल १६.८२ पैशाला विकुन दोनच दिवसाच्या गुंतवणुकीवर १.२८% नफा मिळवला. ."बेस्ट!!याला म्हणतात डोकेलिटी,अशा आयडिया पाहिजेत,नो टेंशन,रिलॅक्स माईंड" -काळजीवाहु सरकारने विश्वासदर्शक मत पास करुन घ्यावे अशा चेहर्याने माझा मित्र म्हणाला.

"संदेश,तुला माहित आहे का रे टेस्ट क्रिकेटमध्ये भारताच्या कोणत्या बॅटसमन ची सरासरी सर्वात जास्त आहे??" मी चहाचा घोट घेत विचारले. "ह्म्म, तशी गावस्कर,द्रविड बाप माणसे आहेत, पण तरीही आपले मत तेंडल्यालाच..." अपरंपार सचिन भक्ती बोलती झाली. "साफ चुक' - मी..... "हा मान दीपक शोधन या फलंदाजाकडे जातो. काही अपरिहार्य कारणाने याची कारकिर्द फक्त ०३ सामन्यांचीच होती आणि सरासरी ६०+ आहे." मी म्हटले. "....आणि फक्त सरासरी बद्दल बोलायचे तर तुझ्या आवडत्या विनोद कांबळीची सरासरी या तिन्ही बापांपेक्षा सरस आहे हो.." मी जखमेवर जणु मीठच चोळले.

मित्रवर्याची यानंतरची काही वाक्ये शिमग्याला साजेल अशा भाषेत झाल्याने ती देण्यापेक्षा हे उदाहरण संदेशला देण्यामागची भुमिका साराशंरुपाने सांगतो.

काय आहे छोट्या कालावधीतील चमकदार कामगिरीपेक्षा मोठ्या कालावधीत केलेली कामगिरी अधिक महत्वाची ठरते हे साधे सोपे तत्व आहे. हेच सुत्र गुंतवणुक विषयासही लागु पडते. म्हणजे वर उल्लेखलेल्या उदाहरणांतील फायद्याचे दोन दिवसांत सव्वा टक्का, किंवा 'डीप आउट ओफ मनी' ऑपश्न्स विकुन शक्य असणारे १०/१२ दिवसांत एक/दीड टक्का ही प्रमाणे वरकरणी दिसावयास उत्तम दिसत असली तरी अशा उल्लेखलेल्या संधी षठीसामासी, क्वचितच असतात, त्या साधण्याने आपण किती जागरुक आहोत यावर नकीच शिक्कामोर्तब होते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असे अजिबातच नाही, परंतु केवळ अशा संधीच्याच शोधावर अवलंबुन राहिल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माणाचे, किंवा परंपरागत पर्यायांपेक्षा अधीक चांगला परतावा मिळ्वण्याचे, उद्दीष्ट साध्य होणे कठीण आहे. काही मर्यादित काळ वगळता उर्वरित काळामध्ये अशा संधी नसलेने पुर्ण वर्ष वा तत्सम कालावधीकरीता मिळणारा परतावा हा तितकासा आकर्षक असणार नाही. 'आर्बिट्राज किंवा हेजिंग' करणे, 'डीप आउट ओफ मनी' ऑपश्न्स विकणे वा वर दिलेल्यासारख्या 'संधीसाधु'पणांतुन वार्षिक १२ टक्क्यांपेक्षा अधीक परतावा क्वचितच मिळालेला दिसतो.

सहाजिकच एखाद्या वर्षासरख्या मध्यम काळांत गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवायचा असेल तर अधिक वारंवारतेने वापरता येणारी गुंतवणुक व्युहरचना,(ज्यात अनिश्चिततेचे प्रमाण कदाचित अधिक ठेवावेही लागेल) आवश्यक आहे ज्याविषयी येत्या काळांत लिहीन म्हणतो.- प्रसाद भागवत.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

3 Mar 2015 - 3:38 pm | मराठी_माणूस

.....ज्याविषयी येत्या काळांत लिहीन म्हणतो

जरुर लिहा , वाट पहातो

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 4:36 pm | टवाळ कार्टा

वाचतोय पुभाप्र :)

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 4:42 pm | प्रसाद१९७१

"हे बघ, खास तुझ्यासाठी ही आयडिया आहे. आजच्या (शुक्रवारच्या)NAV ने युनिटस विकत घ्यायचे, उद्या बजेट, बाजार चालु, बॅंका बंद, हो ना ??.. मार्केटला आवडले आणि उद्या(शनिवारी) व सोमवारी बाजार वर गेला तर मिळालेले युनिट्स सोमवारच्या NAVला विकुन टाकयचे!!!" मी म्हटले. "अरे ते ठीक आहे पण 'गोविंदा' झाला तर?? झोपलो की"- काळजीवाहु "हे बघ बाजाराचा गोविंदा होईल किंवा अण्णु गोगट्या, आपल्याला काय करावचेय??..शेंडी तर आपल्याच हातात आहे. अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केला आणि बजेटची गडबड असल्याने त्याची प्रतिक्रिया पहायलाही न थांबता त्यच्याकडुन चेक घेवुन तेथुन निघालो.

हे काही कळले नाही. एक तर हे कसे करता आले हे कळले नाही. त्यात अशी आपली विकत घेण्याची कमीटमेंट कँसल करणे बेकायदेशीर किंवा अनैतिक नाही का?

आणि ही गोष्ट जर शक्य असेल तर मग हाच प्रकार रोज का करु नये. मार्केट रोज च खाली वर होत असते ( अगदी बजेट इतके नाही पण ०.५ ते १ % ). २४० कामकाजाच्या दिवसातले १०० दिवस जरी मार्कॅट वर गेले आणि त्यात अगदी ०.२५% जरी मिळाले तरी वर्षाला २५% नाही का होणार?

प्रसाद भागवत's picture

3 Mar 2015 - 6:17 pm | प्रसाद भागवत

नैतिक/अनैतिकतेच्या सोवळ्याओवळ्यांत मी गुरफटु ईच्छित नाही, त्याच्या व्याख्या व्यक्तीनिहाय वेगवेगळ्या आहेत. मी घेतलेल्या गुंतवणुक निर्णयाचा पुनर्विचार करायला जर मला नियमांच्या चौकटीत राहुन संधी मिळाली तर मी तो का करु नये ?? हा माझा साधा विचार आहे.

हे अशा रितीने चेक थांबवणे हे बेकायदेशीर ही नाही. कारण हा धनादेश कोणाचे देणे देण्यापोटी दिलेला धनादेश नाही.(not issued in discharge, in whole or in part, of any debt or other liability).

अन्य वेळी तशी संधी मिळत नाही कारण बाजार आणि म्युचुअल फंड्स समातर पद्ध्तीने चालु असतात व उद्या काय होईल याची हमी देता येत नाही. यावेळी तसे नव्हते, बाजार चालु आणि बॅका/ म्यु. फंडांचे व्यवहार बंद होते. या पार्श्वभुमीवर असे करावयाचे संधी मिळाली.

प्रसाद भागवत's picture

3 Mar 2015 - 7:00 pm | प्रसाद भागवत

कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत असेल तर माझे काहीच म्हणणे नाही. खुलासा एवढाच की एखाद्या म्युचुअल फंडाकडुन (तांत्रिक भाषेत Asset Management Company) जेंव्हा तुम्ही युनिट्स घेता तेंव्हा ती तुम्ही तुमचे पैसे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांभाळावे अशी व्यक्त केलेली 'ईच्छा' असते. Commitment नव्हे. तुम्ही एखाद्या गॅरेज्मध्ये आपली चारचाकी दुरुस्तीला म्हणुन गेवुन गेलात आणि लगेचच काही कारणाने ती दुसरीकडे हलवलीत, वा रिपेअर नाही करावयाची म्हणुन घरी आणलीत, तर हे कितपत अनैतीक आहे?? याच न्यायाने कदाचित एकदा लिहिलेला चेक खोडणेही नैतिक अनैतिकतेच्या वादाचा विषय होवु शकेल.

या उलट बाजारातुन एखाद्या व्यक्तीकडुन शेअर्स घेणे ही मात्र आपल्याला अपेक्षीत असलेली Commitment आहे.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 8:35 pm | आजानुकर्ण

. कारण हा धनादेश कोणाचे देणे देण्यापोटी दिलेला धनादेश नाही.(not issued in discharge, in whole or in part, of any debt or other liability).

म्युच्युअल फंड कंपनीने तुम्हाला युनिट दिल्यानंतर तुम्ही त्या कंपनीला देणे लागत नाही का? जर देणे लागत नसाल तर आधीच चेक कशासाठी दिला? other liabilityची तुमची व्याख्या काय आहे?

गुंतवणुक निर्णयाचा पुनर्विचार करायला जर मला नियमांच्या चौकटीत राहुन संधी मिळाली

युनिट खात्यात जमा झाल्यानंतर पुनर्विचार करण्यासाठी युनिट विकणे हा पर्याय असतो. मिळालेल्या युनिटचे आम्ही पैसे देणार नाही अशी भूमिका घेणे कायदेशीर पर्याय आहे असे सांगून तुम्ही ग्राहकाची फसवणूक करत आहात.

सहमत. अगदी टोटल अनैतिक आहे.

प्रसाद भागवत's picture

3 Mar 2015 - 6:55 pm | प्रसाद भागवत

कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत असेल तर माझे काहीच म्हणणे नाही. खुलासा एवढाच की एखाद्या म्युचुअल फंडाकडुन (तांत्रिक भाषेत Asset Management Company) जेंव्हा तुम्ही युनिट्स घेता तेंव्हा ती तुम्ही तुमचे पैसे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांभाळावे अशी व्यक्त केलेली 'ईच्छा' असते. Commitment नव्हे. तुम्ही एखाद्या गॅरेज्मध्ये आपली चारचाकी दुरुस्तीला म्हणुन गेवुन गेलात आणि लगेचच काही कारणाने ती दुसरीकडे हलवलीत, वा रिपेअर नाही करावयाची म्हणुन घरी आणलीत, तर हे कितपत अनैतीक आहे?? कदाचित एकदा लिहिलेला चेक खोडणेही नैतिक अनैतिकतेच्या वादाचा विषय होवु शकेल.

या उलट बाजारातुन एखाद्या व्यक्तीकडुन शेअर्स घेणे ही मात्र आपल्याला अपेक्षीत असलेली Commitment आहे.

आदूबाळ's picture

3 Mar 2015 - 7:19 pm | आदूबाळ

?

सेबी म्हणतं की युनिट म्हणजे मालकी.

(z) "unit" means the interest of the unitholders in a scheme, which consists of each unit representing one undivided share in the assets of a scheme;

सेबी म्युचुअल फंड रेग्युलेशन्स

आणि मालकी म्हणजे कमिटमेंट.

प्रसाद भागवत's picture

3 Mar 2015 - 8:16 pm | प्रसाद भागवत

ही व्याख्या युनिट विकत घेतलेल्या धारकांसाठी आहे. विकत घेण्यासाठी केलेल्या अर्जाचा पुनर्विचार करायला प्रतिबंध नाही. असावयाचे कारण ही नाही. मी दिलेले चारचाकीचे उदाहरण सर्व काही स्पष्ट करते.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 11:10 pm | आजानुकर्ण

ही व्याख्या युनिट विकत घेतलेल्या धारकांसाठी आहे. विकत घेण्यासाठी केलेल्या अर्जाचा पुनर्विचार करायला प्रतिबंध नाही. असावयाचे कारण ही नाही

आता तुमचे धोरण बदललेले दिसते आहे.

तुमचे आधीचे गौप्यस्फोटाचे वाक्य पुन्हा वाचा.

अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केला

मिळालेले युनिट रद्द करुन घ्यावयाचे म्हणजे काय?

आता नंतर तुम्ही म्हणता आहात की विकत घेण्यासाठीच्या अर्जाचा पुनर्विचार करायचाय. जर अर्जासाठीचा पुनर्विचार करायचाय तर तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला रीतसर कॉल किंवा इमेल करुन सांगू शकता की.

आदूबाळ's picture

4 Mar 2015 - 12:23 pm | आदूबाळ

+१

जबरी कन्फ्यूजन आहे. करार करणे (entering into a contract) आणि त्याची किंमत चुकती करणे (चेक/रोख/वस्तुरूपाने) (consideration) या दोन वेगवेगळ्या घटना आहेत.

चेकमार्फत पेमेंट करणे यामध्ये "युनिट्स विकत घेतली आहेत" हे अध्याहृत आहे.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 7:21 pm | आजानुकर्ण

एकदा चेक दिल्यानंतर तो वटणे हे चेकदात्यावर ऑब्लिगेटरी असते. जर समोरच्या व्यक्तीने फ्रॉड केला नसेल तर जाणूनबुजून चेक कँसल करणे हा फौजदारी गुन्हा आहे. इथं तुम्ही काहीही सल्ला देताय असं वाटतंय.

म्युच्युअल फंडाचे युनिट घेतल्यानंतर पैशाची निकड निर्माण झाली तर ते विकण्याचा सोपा मार्ग उपलब्ध आहे.

प्रसाद भागवत's picture

3 Mar 2015 - 8:11 pm | प्रसाद भागवत

आपली माहिती पुन्हा एकदा तपासुन पहा. मी वापरलेली ईंग्लीश शब्दरचना निगो. इन्स्ट्र. ॲक्ट मधे कोठे मिळते का ते पहा.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 8:22 pm | आजानुकर्ण

पैसे देणार हे मान्य करुन, युनिट्स खात्यावर जमा झाल्यानंतर ते रद्द करण्यासाठी चेक कँसल करणे हा जाणूनबुजून केलेला अप्रामाणिकपणा आहे. अर्थात दहावीस हजारांच्या ग्राहकासाठी कोणतीही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी पोलीस तक्रार वगैरे भानगडीत पडणार नाही. त्यामुळे खपून जाईल.

मात्र तुम्हाला कमिशन मिळते म्हणून ग्राहक मिळवण्यासाठी असे संशयास्पद लूपहोल तुम्ही सांगताय की काय याची शंका आता यायला लागली आहे. ग्राहकाच्या दृष्टीने तर हा अत्यंत तोट्याचा व्यवहार आहे. स्टॉप पेमेंट केलेल्या चेकचा दंड ग्राहकालाच भरावा लागणार आहे. तुम्ही त्यातून एक पैसाही खर्च न होता नामानिराळे राहणार.

हे पाहा. अर्थात तुम्ही त्यातून सोयीस्कर निष्कर्ष काढण्यास स्वतंत्र आहात.

Section 138 of the Negotiable Instruments Act is a penal provision wherein if a person draws a cheque on an account maintained by him with a banker for payment of any amount of money to another person from out of that account for the discharge, in whole or in part of any debt or other liability, is returned by the bank unpaid, on the ground either because of the amount of money standing to the credit of that account is insufficient to honour the cheque or that it exceeds the amount arranged to be paid from that account by an agreement made with that bank, such person shall be deemed to have committed an offence. However with regard to "Payment stopped by the drawer" this section does not mention anything specifically.
It is seen that there are manifold reasons for the dishonor of cheques by banks but there is statutory mandate upon the payee under Section 13 (b) of Negotiable Instruments Act for giving a notice demanding the payment of the amount of said cheque, within 15 days from the date of the information as to bouncing of the said cheque from the drawer of the cheque and upon failure to make payment of the amount by the drawer within 15 days, offence under section 138 is deemed to have been committed. Moreover the decision of the Supreme Court in Electronics Trade & Technology Development Corporation Ltd is explicit and has decided all sorts of controversies in relation to bouncing of the cheque due to payment stopped by the drawer. It has expressly held that if on issuance of the notice by the payee or the holder in due course after dishonour, to the drawer demanding payment within 15 days from the date of the receipt of such a notice, if he does not pay the same, the statutory presumption of dishonest intention, subject to any other liability, stands satisfied.

आज बर्‍याच दिवसांनी पुन्हा एकदा लंबकर्णाशी पूर्णपणे सहमत आहे ! अनैतिक व्यवहार करु नये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे

आकाश कंदील's picture

3 Mar 2015 - 4:46 pm | आकाश कंदील

मला तुमचे लिखाण पटते. तुमच्या लेखाची नेहमीच वाट पाहतो.

मार्मिक गोडसे's picture

3 Mar 2015 - 5:11 pm | मार्मिक गोडसे

त्यात अशी आपली विकत घेण्याची कमीटमेंट कँसल करणे बेकायदेशीर किंवा अनैतिक नाही का?

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 8:38 pm | आजानुकर्ण

आम्ही शुक्रवारी १६.६१ रुपयाने घेतलेले युनिटस काल १६.८२ पैशाला विकुन दोनच दिवसाच्या गुंतवणुकीवर १.२८% नफा मिळवला.

आणि कालचे युनिट लगेच आज विकल्यानंतर १ टक्के एक्झिट लोड भरावा लागला ते का नाही सांगितले?

जेपी's picture

3 Mar 2015 - 10:00 pm | जेपी

भागवत साहेब,
लेखाचा रोख चुकलाय का ?
तुम्ही लॉंगटर्म हे शॉर्टटर्म पेक्षा लाभदायक आहे हे सांगण्याच्या नादात लुपहोप सांगुन टाकले.

खेडूत's picture

3 Mar 2015 - 10:24 pm | खेडूत

माझी ब्यांक MF घेतल्यावर माझ्या खात्यावर T +३ दिवसांनी NAV दाखवते. हा काय प्रकार असतो?
जे आपल्याला मिळालेच नाही ते आधीच कसे विकता येते ही शंका आहे !

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 11:04 pm | आजानुकर्ण

तुम्ही दुपारी ३.३० पूर्वी एमएफ विकत घेतले तर त्या दिवशीच्या एनएवीने खरेदी होते व दुसऱ्या दिवशी युनिट्स खात्यात जमा होतात. ३.३० नंतर दुसऱ्या दिवशीची एनएवी मिळते व तिसऱ्या दिवशी युनिट्स जमा होतात.

जे आपल्याला मिळालेच नाही ते आधीच कसे विकता येते ही शंका आहे !

एमएफ युनिट्स मिळाल्यानंतरच विकता येतात. शेअर्सच्या बाबतीत तुम्ही शॉर्ट करु शकता.

ब़जरबट्टू's picture

4 Mar 2015 - 10:00 am | ब़जरबट्टू

अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे...

हे प्रकरण काही समजले नाही राव.

काळा पहाड's picture

4 Mar 2015 - 11:09 am | काळा पहाड

अहो म्हणजे पुलंच्या भाषेत, ते चावरा कुत्रा पाळणारे लोक असतात ना पुण्य नगरीत, त्यांच्याकडे सामाजिक संस्थांकडून देणगी मागायला आलेल्या लोकांना पाठवायचं, ते फार दानशूर आहेत असं सांगून, तसं. आधी चेक द्यायचा, आणि बँकेला सांगायचं वटवू नका म्हणून. यात असं अध्यारूत आहे की तो म्युच्युअल फंड किंवा ब्रोकर गाढव आहे. असं नसतं ते वेगळं. ते एकदोन वेळा सहन करतील आणि मग तुम्हाला ब्लॅकलिस्ट करतील. बर हा सल्ला कुणाला? तर ग्राहकाला. म्हणजे काय होईल ते ग्राहकाचं होईल.

प्रसाद भागवत's picture

4 Mar 2015 - 3:13 pm | प्रसाद भागवत

आजानुकर्ण साहेब, (१)मिळालेले युनिट रद्द करुन घ्यावयाचे म्हणजे काय?-----खरे तर म्युचुअल फंड्सनी युनिटस धनादेश वटल्यावरच देणे अपेक्षीत आहे. रु.०२ लाखापेक्षा जास्त रकमेसाठी हीच पद्धती अवलंबली जाते व खेडुत म्हणतात तशी नंतरच्या, चेक वटल्या दिवसाची, NAV मिळते. म्हणुनच येथे जाणिवपुर्वक रक्कम ०२ लाख ठेवली आहे. अशी तात्काळ युनिटस देण्याची सवलत ही म्युचुअल फंडसचा छोट्या गुंतवणुक दारांना आकर्षित करण्याचा एक भाग आहे. आणि AMCs अशी सवलत उपकार म्हणुन नव्हे तर धंदा मिळविण्यासाठी देतात. मला एखादी व्यावसायिक संस्था देवु करत असलेली सवलत अधिकाधिक फायदेशीरपणे वापरण्याचा मला पुर्ण हक्क आहे. मला 'मिळालेले' म्हणजे मी 'विकत घेतलेले' नव्हे. तेंव्हा माझा म्युचुअल फंड्स विकत घेण्याचा निर्णय रद्द करण्याचा मला पुर्ण हक्क आहे. ते युनिट्स व्यावसायिक हेतुने कोणी माझा चेक वटण्याच्या आधीच माझ्या खात्यात जमा केले, एवढ्यावरुन मी माझा पुर्नविचाराचा हक्क गमवावा असे बिलकुलच नाही. एवढेच कशाला, व्यवस्थेतील फटी( लूपहोल्स) कायदेशीरपणे आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा ग्राहकास पुर्ण हक्क आहे असे न्यायलयीन निवाडेही आहेत.

(२)तुम्हाला कमिशन मिळते म्हणून ग्राहक मिळवण्यासाठी असे संशयास्पद लूपहोल तुम्ही सांगताय..... कोणास मिळणारा थोडाही आर्थिक फायदा पाहुन पोटशुळ उठणे हा विकार अनेकांना असतो. आपणास ही तो आहे काय ??, पण वस्तुस्थिती ही आहे की मी ( पुन्हा एकदा जाणिवपुर्वक) निवडलेला फंड हा 'ईंडेक्स फंड' आहे, त्यातही तो 'एक्झीट लोड' नसलेला (घ्या तुमच्या १ टक्के एक्झिट लोड भरावा लागला ते का नाही सांगितले? या शंकेलाही पुर्णविराम मिळाला) फंड आहे आणि अशा प्रकारच्या फंडस मधे अतिशय मामुली, जवळपास नाही बरोबर, कमिशन मिळते हे कोठेही तपासुन पहाता येणे सहज शक्य आहे.... तेंव्हा भलेही मतभेद असतील, कोणतीही खातरजमा करण्याअगोदर एखाद्याच्या व्यावसायिक सचोटीवर 'दुगाण्या' झाडण्याचे टाळलेत तर बरे होईल. बाकी तपशीलातील अन्य झाल्या चुकीबद्दल दिलगिरी वगैरे नैतिकतेत बसते की नाही कोणास ठावुक..

(३)तुम्ही त्यातून सोयीस्कर निष्कर्ष काढण्यास स्वतंत्र आहात-. 'आपण एखादे देणे लागत नसताना त्याला दिलेला धनादेश न वटणे हा फौजदारी गुन्हा होवु शकत नाही' ही भुमिका न्यायलयाने ही मान्य केली असल्याचा दुजोरा मला एका वकील मित्रानेही दिला आहे. या संदर्भात व 'एक्झीट लोड' सारख्या मुद्द्यांची महिती आंतर्जालावर उपलब्ध असतानाही ती न तपासता बेलगाम विधाने करुन सोयीस्कर निष्कर्ष आपण काढत आहात हे स्पष्ट आहे.. गंमतीचा भाग म्हणजे आपण जी माहिती आपल्या युक्तीवादाकरिता देता, ती वाचण्याचे कष्ट ही आपण बहुधा घेत नसावात. अन्यथा आपल्या अभ्यासुपणाचा परिपाक म्हणुन दिलेल्या अवतरणांतील However with regard to "Payment stopped by the drawer" this section does not mention anything specifically. हे वाक्य आपणास दिसले असते.

@जेपी साहेब,- नाही हो, अशा अनेक गोष्टी मी नेहमीच शेअर करत आलो आहे. गेली २० वर्षे मी माझा व्यवसाय अत्यंत प्रामाणिक व पारदर्शीपणे करतो. क्लायंटला स्वतःच्या स्वार्थापोटी चुकीचा सल्ला दिल्याचे एकही प्रसंग नसावा.

या ही लेखात खरेतर एक विचार मांडण्याचा प्रयत्न आहे ज्यावर विचार मंथन होणे अपेक्षित होते. मात्र एका तांत्रिक मुद्यावरुन कसलीही शहानिशा न करता हेत्वारोप केल्याने तो हेतु भरकटला. कोणीसे म्हटले आहे की मुत्सद्दी म्हणजे अशी असामी जी 'धड लढुही शकत नाही आणी धड पळुही शकत नाही'... नैतीकतेच्या पाईकांबद्द्लसुद्धा मला असेच काही म्हणावयाचे आहे..

@ काळा पहाड - हा व्यावसायिकपणाचा एक भाग आहे. विकत घ्या...आवडले नाही तर परत करा, पुर्ण पैसे परतीही हमी.. अशा सांगणार्या कंपन्या काय गाढव असतात की बावळट? म्युच्युअल फंडस चे कामकाज अगदी आतुन पाहिल्याने मी खात्रीने सांगतो की अशी ब्लॅकलिस्ट किमान गेल्या २० वर्शांत तरी बनलेली नाही. मात्र हां, कोणी असे युनिट्स 'मिळवुन' आयकर सवलत मिळवली( ते सुरवातीचे स्टेट्मेंट कार्यालयात सादर करुन पगारातुन कापावयाचा आयकर टाळला) तर मात्र या आयकर योजनेत प्रथम गुंतवणुक करुन मग धनादेश थांबविणारांची नावे आयकर विभागाला नक्की नकी कळविण्यात येतात.

असो, मी आपणा सर्वांना धन्यवाद देवुन तुर्तास रजा घेतो.

म्युच्युअल फंड कंपनीला तुम्ही देणे लागत नाही तर धनादेश कशासाठी दिलाय या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अजूनही दिलेले नाही.
एखादे वाक्य सुटे काढून त्याचा पूर्ण अर्थ लागत नाही. संपूर्ण परिच्छेद In its spirit वाचला तर मला काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल.

शेवटी, माफ करा पण तुम्हाला प्रामाणिक अर्थव्यवहार कशाला म्हणतात याची कल्पना आहे की नाही याबाबत आता शंका येते आहे. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करुन, त्याचा धनादेश दिल्यानंतर, दुकानदाराने तुमच्या पतक्षमतेवर विश्वास ठेवून त्याच्या स्वखर्चाने त्या वस्तूची डिलीवरी तुमच्या घरी केली. आणि आता तुम्हाला ती वस्तू आवडली नाही म्हणून तुम्ही धनादेश रद्द करुन घेतला व कायदेशीर त्रास नको म्हणून दुकानदाराने पुन्हा ती वस्तू त्याच्या स्वखर्चाने दुकानात नेऊन ठेवली. या सर्व व्यवहारात दुकानदाराला झालेल्या खर्चाबाबत आणि त्रासाबाबत तुम्हाला काहीही देणेघेणे दिसत नाही. आणि तुम्ही सचोटीच्या गप्पा मारता आहात हे आश्चर्यकारक आहे. तुमच्या चारआठ आणे कमिशनवरुन माझ्या पोटात दुखायचे काहीच कारण नाही. मात्र एकंदर अर्थनिरक्षर जनतेला तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी सरळसरळ अनैतिक वागण्याचे सल्ले देताय हे पाहून नवल वाटते.
युनिट विकत घेण्यासाठी तुम्ही दिलेल्या अर्जाचे प्रोसेसिंग, अॅक्चुअल खरेदीत म्युच्युअल फंड कंपनीने भरलेले ब्रोकरेज, नंतर भरलेला सेक्युरिटी ट्रान्सॅक्शन टॅक्स, युनिट विकत घेतल्यानंतर तुमच्या खात्यात ते जमा करणे व स्टेटमेंट वगैरे तयार करणे यातला अॅडमिनिस्ट्रेटिव खर्च, अॅक्चुअल स्टॉक सिलेक्शन, खरेदी-विक्री याचा अभ्यास या सगळ्यात त्या म्युच्युअल फंड कंपनीला होणाऱ्या त्रासाची तुम्हाला अजिबात कदर नाही. अत्यंत मामुली (तुमचाच शब्द) कमिशनसाठी सध्या या सर्व प्रोसेसमध्ये गुंतवणूकदारावर ठेवल्या जाणाऱ्या विश्वासाला तडा देण्याचे मात्र तुम्ही काम करत आहात.

हर्षद मेहता किंवा केतन पारेख जे काही करत होते ते असेच तथाकथित लूपहोल शोधून सिस्टमला उल्लू बनवायचे प्रयत्न करत होते. तुमचा प्रयत्न त्याच स्वरुपाचा परंतु छोट्या स्केलवरचा दिसतोय.

hitesh's picture

5 Mar 2015 - 8:34 pm | hitesh

सहमत

प्रसाद भागवत's picture

6 Mar 2015 - 4:29 pm | प्रसाद भागवत

खरे तर आता या पोस्टरील हा मुद्दा माझ्ह्यापुरता संपला असे ठरवले होते. परंतु तरी देखील एक शेवटचा पोस्ट.

मी म्युचुअल फंडाला दिलेला धनादेश हा मला सेबी व ॲम्फी या दोन संस्थामधील विसंवादामुळे एक छोटा गुंतवणुकदार म्हणुन हमखास फायदा मिळविण्याची एक छोटीशी संधी मिळाली त्या करिता दिला आहे. हे खुपदा स्पष्ट केलेच आहे, त्यात नवे काय आहे ?? ह्या दोन्ही संस्था व्यावसयिक आहेत, मी त्यांचा एक ग्राहक आहे आणि मला असा फायदा मिळविण्याचा पुर्ण हक्क आहे हे ही मी लिहिले आहे. त्याच्यातील विसंवादाला मी जबाबदार नाही वा मी कोणतीही सवलत मुद्दाम मागितलेली नाही.

समजा एक व्यक्ती एखा दुकानांत जावुन मिठाई घ्यायची आहे असे सांगुन नमुना म्हणुन मिठाईचा तुकडा खाते. दुकानदार खोक्यांत मिठाई भरुन तुम्हाला देवुन काउंटरवर पैसे द्या असे सांगितल्यावर तुम्हाला आठवते की आज शेजारील मॉलमध्ये सेल लागला असुन काही जीवनावश्य्क गोष्टी अधिक सवलतीने मिळत आहेत. तुम्ही दुकानदाराला सांगुन तो खोका विकत न घेता परत करता. किंवा मॉलमध्येही अनेकदा अगदी शेवटच्या क्षणी ट्रॉलीतुन आपल्याला नको त्या वस्तु शेजारीच काढुन ठेवल्या जातात. हे कितपत नैतीक/ अनैतिक आहे ?? या उदाहरणांत आपणास अपेक्षित असे कोणतेही खर्च येत नाहीत का... त्रास होत नाहीत का??

माझ्यासारख्या सामान्याच्या मते व्यवसाय करावयाचा म्हणजे या गोष्टींची तयारी व्यावसायिकाला दाखवावीच लागते (आणि यशस्वी व्यावसायिक ती दाखवताही). त्यांची याबाबत काहीच तक्रार नाही.मात्र आपल्यासारख्या नैतिकतेच्या पाईकाने अशी नमुना मिठाई वा फळे खाल्यावर त्या वस्तु विकत घ्यायलाच हव्या, नाहीतर ते कमालीचे अनैतिक वर्तन ठरेल नाहीतर किमान पक्षी त्या नमुन्याची किंमत तरी चुकती करायलाच ह्वी आपण असे करता का ?? एखाद्या विशिष्ट वर्गाला दिलेल्या सवलतीचा फायदा( येथे छोट्या गुंतवणुक्दारांना आधीच दिलेले युनिटस) स्विकारणे म्हणजे अनैतिकता असेल तर आपण सबसीडीने मिळालेले गॅस सिलेंडर नाकारले असतीलच. त्याबाबतचा काही पुरावा येथे जाहिर केल्यास बरे पडेल.

उगीच अनेक प्रकारच्या खर्चांच्य याद्या लावल्या म्हणजे काही होत नाही. व्यवसायात पदोपदी खर्च असतात हे उघडच आहे मात्र एकुण व्यवसायांत त्यांचे प्रमाण किती हे पहाणे आवश्यक आहे. मीही खरे म्हणजे अशा संधी अत्यंत मर्यादित येतात व त्यांच्या मागे धावण्यात अर्थ नाही हेच सांगितले आहे.

बाकी आपल्या आधीच्या पोस्ट्मधील एक्झीट लोड, कमिशन, फौजदारी, चुकीची अवतरणे अशा चुकीच्या विधाने (उर्फ दुगाण्या) खुलासा केलाच आहे. त्याबाबत आपण धरलेली मिठाची गुळणीच वस्तुस्थिती स्पष्ट करणारी आहे

आजानुकर्ण's picture

6 Mar 2015 - 9:24 pm | आजानुकर्ण

तुम्ही जितकं स्पष्टीकरण देत आहात तितकी तुमची भूमिका अधिकाधिक केविलवाणी वाटत आहे. शेवटचा प्रतिसाद वगैरे म्हणून तुम्ही पलायन करायचा प्रयत्न केला तरी या एकंदर धोरणाची अनैतिकता दाखवून देणे आवश्यक आहे. सेबी, अँफी वगैरेंचा विसंवाद याचा यात काहीही संबंध नाही. तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली - आणि त्याचा धनादेश दिला तर त्याचे पेमेंट करणे ऑब्लिगेटरी आहे. जर तुमचा विचार बदलला तर तुम्ही मूळ विक्रेत्याशी चर्चा करुन उत्तर शोधायला हवे. मला नुकसान होते आहे म्हणून मी आधी प्रॉमिस केलेल्या चेकचे पेमेंट थांबवणार, विक्रेता गेला खड्ड्यात - विशेषतः विक्रेत्याचा त्यात काहीही दोष नसताना - ही भूमिका अप्रामाणिक आणि अनैतिक आहे.

युनिट आधी जमा होतात आणि धनादेशाचे पैसे बँकेतून नंतर जातात यात सामान्य गुंतवणूकदारांना सवलत किंवा आकर्षित करणे वगैरे काहीही बंडल मारु नका. बँकांच्या व्यवहाराचे ज्याला प्राथमिक ज्ञान आहे त्या व्यक्तीलाही स्थानिक किंवा आऊटस्टेशन चेकचे क्लिअरिंग व्हायला (चेकच्या स्वरुपानुसार) ३ ते ५ दिवस लागतात हे माहीत आहे. ज्या दिवशी म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी केली त्यादिवशीच्या भावाप्रमाणे ते गुंतवणूकदारांना देणे बंधनकारक आहे. यात सवलत आणि आकर्षित करण्याचा भाग नसून घेतलेल्या बाजारभावाप्रमाणे ते देणे हा साधा नियम आहे.

मी गुळणी धरली होती ही खरेच आहे. ती सोडून आता दुसरा प्रश्न विचारतो. म्युच्युअल फंड हे इनस्ट्रुमेंट ट्रेडिंगसाठी बनवलेले नाही. सामान्य गुंतवणूकदारांमध्ये 'शेअर बाजार' हा जुगाराचा प्रकार आहे हा जो गैरसमज प्रचलित आहे, त्याचेच एक एक्स्टेंशन म्हणजे तुमची भूमिका आहे. तुम्ही व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार आहात. ग्राहकांना योग्य सल्ला देणे तुमचे कर्तव्य आहे. मात्र गुंतवणुकीचे किमान-नगण्य ज्ञान असलेल्या तुमच्या ग्राहकाला - ट्रेडिंगसाठी इतर अनेक साधने उपलब्ध असताना - म्युच्युअल फंडासारख्या इनस्ट्रुमेंटचा वापर ट्रेडिंग-सट्टेबाजीसाठी करण्याचा सल्ला देणे हे तुमच्या 'गुंतवणुकीच्या' कोणत्या निकषात बसते हेही एकदा समजावून सांगा.

यावरुन दोन गंभीर गोष्टी समोर येतात
१. तुम्हाला म्युच्युअल फंडांचा उद्देश पुरेसा समजलेला नाही व त्याबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात
२. म्युच्युअल फंडांचा उद्देश तुम्हाला माहीत आहे मात्र काही विशिष्ट कारणासाठी (उदा. कमिशन) तुम्ही तो चुकीच्या प्रकारे वापरण्याचा सल्ला ग्राहकांना देत आहात.

या दोन्ही गोष्टी तुमचा सल्ला घेणाऱ्या संभाव्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत हानीकारक आहेत. जेव्हा मला अर्थव्यवहारांचे ज्ञान नव्हते तेव्हा एका इन्शुरन्स एजंटने टर्म लाईफ इन्शुरन्स ऐवजी मला क्याशब्याक पॉलिसी विकली होती हा स्वानुभव आहे. टर्म इन्शुरन्स हा क्याशब्याकपेक्षा चांगला पर्याय आहे हे एक तर त्या एजंटला माहिती नसावे किंवा माहिती असूनही त्याने त्याच्या कमिशनसाठी चुकीचे प्रॉडक्ट विकले. त्याला मिळालेल्या कमिशनमुळे माझे पोट दुखण्याचे कारण नाही. मात्र आता त्याच्या सल्ल्यानुसार पैसे भरुनही मी अंडरइन्शुअर्ड आहे. तुमचे धोरण मला त्याच स्वरुपाचे वाटते.

आजानुकर्णांच्या प्रतिसादांशी सहमत आहे. लूप होल्स पकडून किंवा एखाद्याला कात्रीत पकडून फायदा उकळणं अनैतिक आहे.

उपाशी बोका's picture

6 Mar 2015 - 9:26 pm | उपाशी बोका

तुम्ही अनैतिक (immoral) विरुद्ध बेकायदेशीर (illegal) याबद्दल वाद घालताय, असे दिसत आहे, आणि तुमच्या मते ही गोष्ट अनैतिक (immoral) असली तरी बेकायदेशीर (illegal) नाही आणि त्यामुळे ती योग्य आहे, असा तुमचा दावा आहे.

ठीक आहे. काही गोष्टी लक्षात घ्या.
१. स्टॉप पेमेंटसाठी बँक ग्राहकाकडून ५०-१०० रुपये वसूल करू शकते, म्हणजे तेव्हडा ग्राहकाचा फायदा कमी होणार.
२. इतकी खटपट करून २ लाखावर फायदा जेमतेम २५०० रुपये होणार. माझ्या वैयक्तिक मते हा फुटकळ आहे, पण तुमचे मत वेगळे असू शकते.
३. ट्रांझॅक्शन पूर्ण झाले नाही, त्यामुळे कंपनी तुम्हाला कमिशन नाकारू शकते. म्हणजे तुमचा काहीच फायदा झाला नाही.
४. भारतात म्युचुअल फंड ब्रोकरकडून घ्यावे लागतात की नाही, ते मला माहीत नाही. पण मला ते ब्रोकरकडून घ्यावे लागतात and securities are held in the street name. अशा वेळी तुमचे आणि ब्रोकरचे अ‍ॅग्रीमेंट नीट वाचून बघा. बहुतेक ब्रोकर असा प्रकार बेकायदेशीर (illegal) ठरवतात. असे प्रकार बर्‍याचदा झाले की कंपन्या नियम बदलतात (उदा. रिस्टॉकिंग फी), ज्यामुळे प्रामाणिक लोकांचापण तोटा होतो.
५. माझ्या मित्राचे वडील वकील आहेत, त्यांच्याशी बोललो. त्यांच्या मते कायदेशीर सल्ला असा आहे.
If you have sufficient funds in the bank, you can request the bank to stop the payment. Then it is legal.
If you do not have sufficient funds then it is illegal and can not stop payment legally. When once you have stopped the payment (provided you have sufficient funds) you have to issue notice to the payee informing him the reasons for stopping the payment, otherwise, the payee can file a complaint u/s 482 CrPC for dishonor of cheque in a criminal court.

शेवटी मुद्दा आहे अनैतिकचा. याबाबतीत मी वॉरन बफे (ज्यांनी अनेकदा केवळ हस्तांदोलन करून डील्स केले आहेत), यांचे मत मांडतो.
“Somebody once said that in looking for people to hire, you look for three qualities: integrity, intelligence, and energy. And if you don’t have the first, the other two will kill you. You think about it; it’s true. If you hire somebody without [integrity], you really want them to be dumb and lazy.”
त्यामुळे व्यक्तिशः मी तरी असा सल्ला देणारा सल्लागार जवळ करणार नाही मग तो सल्ला बेकायदेशीर (illegal) नसला तरीही.

५. माझ्या मित्राचे वडील वकील आहेत, त्यांच्याशी बोललो. त्यांच्या मते कायदेशीर सल्ला असा आहे.
If you have sufficient funds in the bank, you can request the bank to stop the payment. Then it is legal.
If you do not have sufficient funds then it is illegal and can not stop payment legally. When once you have stopped the payment (provided you have sufficient funds) you have to issue notice to the payee informing him the reasons for stopping the payment, otherwise, the payee can file a complaint u/s 482 CrPC for dishonor of cheque in a criminal court.

हे माहीत नव्हतं. लॉजिकल आहे. धन्यवाद.

आजानुकर्ण's picture

6 Mar 2015 - 9:47 pm | आजानुकर्ण

उत्तम प्रतिसाद.

खालील परिच्छेद अगदी पटण्यासारखा आहे. चेकचे पेमेंट थांबवणे हा किती गंभीर गुन्हा आहे याची अनेकांना कल्पना नसते. एकवेळ कमी पैशामुळे तो बाऊन्स झाला तर ब्यालन्समुळे दुर्लक्ष झाले असे सांगून वेळ मारून नेण्याची अगदी पुसटशी संधी कदाचित मिळु शकते. प्रॉमिस केलेले पेमेंट जाणूनबुजून थांबवणे हा willful criminal misconduct आहे.

If you have sufficient funds in the bank, you can request the bank to stop the payment. Then it is legal.
If you do not have sufficient funds then it is illegal and can not stop payment legally. When once you have stopped the payment (provided you have sufficient funds) you have to issue notice to the payee informing him the reasons for stopping the payment, otherwise, the payee can file a complaint u/s 482 CrPC for dishonor of cheque in a criminal court.

तुमचे लिखाण नेहमीच आवडते. मोबाईल नंबर घेतला आहे. लवकरच भेटायला येईल.
बाकी होम लोन घेतल्यापासून नैतिक - अनैतिक फंदात पडत नाही !*smile* :-) :) +) =) :smile:

सांगलीचा भडंग's picture

4 Mar 2015 - 6:37 pm | सांगलीचा भडंग

चांगली माहिती मिळाली लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही मधून

लंबूटांग's picture

4 Mar 2015 - 6:41 pm | लंबूटांग

तुम्ही वर बर्‍याचदा जे "विकत घ्या...आवडले नाही तर परत करा, पुर्ण पैसे परतीही हमी." अशा आशयाचे उदाहरण दिले आहे. यात विक्रेता तुम्हाला त्या वस्तूच्या खरेदीच्या वेळेस ही एक सवलत देतो आहे. सर्वच विक्रेते ही सवलत देतात असे नाही. तुम्ही जे केले आहे त्यात असे दिसते आहे की तुमचा विक्रेता (ज्या कोणाकडून तुम्ही हे शेअर्स विकत घेता ती संस्था) अशी सवलत तुम्हाला देत नाही आहे. मग तुम्ही लूपहोल चा वापर करून घेत नाहीस का परत मग थांब माझ्याकडे इतरही मार्ग आहेत माझे पैसे मिळवण्याचे असे करून आपले पैसे विकत मिळवत आहात. आता हे शेअर्स रद्द करण्याची सुविधा विक्रेत्याला असल्या कारणाने त्याला त्याचे मुद्दल तरी परत मिळते आहे.

तुम्हाला उदाहरणच

हे सर्व मला येथे अमेरिकेत बरेच लोक वर्ल्डकपच्या वेळी मोठाले टीव्ही आणि रिक्लाइनिंग काउचेस वगैरे घेतात आणि ९० दिवसात परत करता येतात म्हणून वापरून परत देतात तसला प्रकार वाटतो.

असो.

पुतळाचैतन्याचा's picture

4 Mar 2015 - 10:26 pm | पुतळाचैतन्याचा

यात काहीच चुकीचे वाटत नाही. अगदी शेअर्स घेतो तेव्हा डेलीवारी २-३ दिवसांनी होते आणि पैसे द्यायला ३ दिवस वेळ अनेक ब्रोकर देतात. शेअर वाढला तर अनेक लोक पूर्ण पैसे भरायच्या ऐवजी तो विकून फक्त फायदा घरी नेतात. अथवा पडला तरी शेअर विकून फक्त नुकसानीची बेलन्स रक्कम भरतात ...शेअर बाजार आणि नैतिकता यांची सांगड घालत बसू नये ...म्हणून तर "ते" लोक बाजारावर राज्य करतात. बाजारात अनेक लूप होल असतातच..जो ती शोधतो तोच कमावतो ....अगदी इन्सायडर न्यूज वर हे उद्योग सर्रास चालतात...पटलं तर कमवा नाहीतर नैतिकता वगेरे वगेरे प्रश्न पडतात.

नैतिकता/अनैतिकता हा वैयक्तिक प्रश्न असला तरी इन्सायडर ट्रेडिंग हा गुन्हा आहे.

अन्या दातार's picture

5 Mar 2015 - 6:08 am | अन्या दातार

अगदी शेअर्स घेतो तेव्हा डेलीवारी २-३ दिवसांनी होते

च्यायला, मी फोन करुन अमुक अमुक शेअर घे अशी ब्रोकरला सूचना दिली की चौथ्या मिनटाला मोबाईलवर एसेमेस येतो की हो माझ्या. दिवस एका मिनिटात संपतो का काय?? बर, माझ्या क्रेडिट लिमिटमध्ये असेल तरच डिलीव्हरी घेता येते. क्रेडिट अथवा बॅलन्स नसेल तर शक्य होत नाही.

hitesh's picture

6 Mar 2015 - 3:33 pm | hitesh

खरेदी ताबडतोब होते... पण प्रत्यक्षात शेअर टी प्लस टु नियमाने तिसर्‍या दिवशी जमा होतो.

प्रसाद१९७१'s picture

5 Mar 2015 - 12:07 pm | प्रसाद१९७१

शेअर विकून फक्त नुकसानीची बेलन्स रक्कम भरतात

साहेब, इथे नुकसान होइल वाटले तर स्टॉप पेमेंट करायचे असा सल्ला आहे. तुम्ही जो सिनारिओ सांगता आहात तो वेगळा आहे. त्यात तुम्ही नुकसान पण सहन करायला तयार आहात.

पेट थेरपी's picture

5 Mar 2015 - 10:03 am | पेट थेरपी

आजानुकर्ण ह्यांच्या सर्व पोस्टीना अनुमोदन. मी वॅल्युरीसर्च ऑन लाइन ह्या साइट व मॅगेझिन मध्ये धिरेंद्र कुमार आहेत ते म्युचुअल फंड विषयाती ल बॉस आहेत त्यांच्या लेखां चा अभ्यास करते व इन्वेस्ट करते. पण वरील प्रकार काही बरोबर वाटला ना ही. मला एक शंका आहे दोन लाख वर १.२८% म्हणजे रु. २५६०.०० ह्या रकमेत थोर लोकांचे वीकांताचे लंच किंवा चारचाकीचे एका वेळचे पेट्रोलही येत नाही तर इ तका त्रास इतक्या कमी रकमे करिता का घ्यायचा? त्यापेक्षा नैतिकतेच्या राजमार्गावरून चाललेले बरे.

आजा तुम्ही आजकाल लिहीत नाही का?

तिता's picture

6 Mar 2015 - 5:18 pm | तिता

असे अनेकदा करायचे

स्थितप्रज्ञ's picture

9 May 2016 - 12:25 pm | स्थितप्रज्ञ

डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स जर मी सुरुवातीला विकले आणि ते expiry पर्यंत at/in the money झालेच नाहीत तर ते परत विकत घ्यावेच लागत नाहीत? यात अजून काही catch आहे का?

प्रसाद भागवत's picture

9 May 2016 - 12:56 pm | प्रसाद भागवत

No.. they are treated as expired... I don’t think there is any catch apart form The rate of brokerage, which is different for such expiry is different than the regular squere off.

प्रसाद भागवत's picture

9 May 2016 - 1:01 pm | प्रसाद भागवत

No.. they are treated as expired... I don’t think there is any catch apart form The rate of brokerage, which is different for such expiry is different than the regular squere off.

प्रसाद१९७१'s picture

9 May 2016 - 2:20 pm | प्रसाद१९७१

डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स जर मी सुरुवातीला विकले आणि ते expiry पर्यंत at/in the money झालेच नाहीत तर ते परत विकत घ्यावेच लागत नाहीत? यात अजून काही catch आहे का?

ते परत विकत घ्यावे लागत नाहीत. आपोआप एक्स्पायर होतात.

परत विकत घ्यावे लागत नसल्यामुळे ब्रोकरेज पण वाचते.

कळकळीचा सल्ला - ऑप्शन विकणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. नक्की ज्ञान असले तरच करा.

स्थितप्रज्ञ's picture

14 May 2016 - 9:31 am | स्थितप्रज्ञ

लक्षात ठेवीन....आभार्स!

भंकस बाबा's picture

9 May 2016 - 5:02 pm | भंकस बाबा

लेख जरा उशिरा वाचनात आला.
भागवत साहेबानि मांडलेले विचार योग्य वाटत आहेत.
बाजारात असलेल्या अनेक ब्रोकरेज फर्म नैतिकता खुंटयाला टांगुण धंदा करतात. या बोटाची थूकी त्या बोटावर कशी करायची ,ते सुद्धा कायद्याच्या कचाट्यात न सापड़ता हे त्याना बरोबर माहीत असते. भागवत साहेब कायद्याच्या कक्षेत् राहून जर मार्ग दाखवत असतील तर त्याला फाटे फोड़ने योग्य नाही.