Skip to main content

शेअर बाजार – काही IPO कथा

लेखक प्रसाद भागवत यांनी रविवार, 22/11/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक माल्कम ग्लॅड्वेल यांनी आपल्या 'Outliers' नावाच्या पुस्तकांत '10,000 hours rule' अशी एक संकल्पना मांडली, ज्यानुसार एखाद्याने कोणत्याही गोष्टीकरिता आपले 10,000 तास खर्च केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत प्राविण्य मिळत नाही.....या न्यायाने तर मी एव्हाना बाजाराविषयक सर्वज्ञच असावयास हवे, पण ..... मात्र एवढे खरे, की कोणास ज्ञान देणे वा 'यशोकथा' सांगणे नाही, पण उपयुक्त ठरावे असे काही अनुभव सांगण्याची माझी पात्रता असावी असे मी मानतो, आणि प्रसंग व्यक्तीगत स्वरुपाचे आहेत हे मान्य करुनही, त्यातील तर्क महत्वाचे व आजही लागु असल्याने येथे ते देण्याचे धाडस करतो आहे सन 1991 मधे महाविद्यालयीन शिक्षणाचे निमित्ताने मुंबईत गेल्यावर माझा या जादुई अर्थविश्वाशी संबंध आला. बाजारांत दररोज उलाढाली करणारा सकाळच्या 9.01 च्या फास्ट गोरेगांव लोकल मधील एक समवयस्क गुजराथी तरुणांचा ग्रुप...त्यांच्या मुळे खरे तर मी या वाटेकडे आकर्षित झालो. अर्थात वातावणांत हर्षद मेहता नावाची तगडी चुंबकीय शक्तीही होतीच. मनाचा हिय्या करुन एके दिवशी जीजीभॉय टॉवर्सच्या लिफ्ट्मध्ये शिरलो तेंव्हा 13व्या मजल्याच्या क्रमांकाऐवजी फक्त '--'असे लिहिलेले, ही त्या गर्दीमध्येही मनांत नोंदली गेलेली पहिली गोष्ट.!! पुढे प्रामुख्याने BSES(आत्ताची रिलायन्स इन्फ्रा),SBI, बिनानी झिंक अशा शेअर्सच्या नवीन इश्शुज मधुन फायदा मिळवला. मात्र ह्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणुन पहायला लागलो ते पुण्याला सुदर्शन केमिकल्स लि. मध्ये नोकरीला लागल्यावरच. सुरवातीस तेथेही निवडक IPO मध्ये सहकार्यांना अर्ज करायला लावणे, हाच माझा प्राधान्यक्रम होता. 1999 मध्ये पुण्याच्याच ‘KPIT Infosystems Ltd’ ने 90 रु. किंमतीने IPO जाहीर केला. मी ही एक चांगली संधी आहे याची खात्री असल्याने सुदर्शन मधील माझ्या वरिष्ठांकडुन अर्ज भरुन घ्यावे या विचारात होतो. दुपारीच आमच्या कंपनीतील 5/6 मॅनेजर्स कॉफी मशीनजवळ गप्पा मारताना मला दिसले. कंपनीतील वातावरण तसे खेळीमेळीचे व अगदी अनौपचारिक असे, मी ही संधी साधुन तेथे पोहोचलो आणि हळुच विषय काढला. आमच्या EDP विभागाचे प्रमुख आणि तीव्र बौद्धिक क्षमता असलेले एक व्यवस्थापकही तेथे होते. त्यांनी मला प्रश्न विचारला "साहेब(?)..आपल्याला काय माहिती आहे या कंपनीचे कामकाज आणि त्याच्या दर्जा बद्दल??" मी चाचरत काहीतरी पुटपुटलो. तो जमानाच असा होता की Information Technology वा Computer याबद्दल मलाच काय, माझ्या वरिष्ठांनाही क्वचितच माहिती होती. झाले..पुढचे 10/15 मिनिटे झाडाझडती होवुन ही कंपनी कशी दुय्यम आणि सुमार दर्जाची कामे करते हे विस्ताराने सांगितले गेले. मी व्दिधा मनाने माझ्या टेबलाशी आलो. मात्र संध्याकाळी सकाळचा प्रसंग आणि माझ्या मनातील घालमेल माझ्या व्यवसायांतील एक जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीला सांगितली आणि 'अर्ज करु की नको??" असा सल्ला विचारला. ते हसले आणि म्हणाले "XX सर या विषयांत 'Last word' आहेत या बद्दल वाद नाही, सबब ते म्हणतात हे खरेच असले पाहिजे..पण तुला एक सांगतो, या शेअरला भाव किती मिळायला हवा हे सरांसारखे विद्वान नाही तर तु, मी, तुझे मित्र यांच्यासारखे सामान्य लोक ठरवणार आहेत..जसे हे बघ ना..मी येथे प्रभात रोडला रहातो, अगदी लिज्जत पापड बनविणार्या कारखान्यासमोर, सहाजिकच 'अतिपरिचयामुळे' म्हणा, किंवा तोच तोच गंध सतत आल्याने म्हणा... आम्ही ते पापड कधीही खात नाही. पण म्हणुन कंपनीचा खप कमी झालाय का??..तेंव्हा खुशाल अर्ज कर"..मी आश्वस्त होवुन अर्ज केले. त्यातही नशीबाचा भाग म्हणजे या इश्शुला 40 पट अधिक प्रतिसाद मिळुनही मला हे शेअर्स मिळाले आणि 90 रु. ला मिळालेले शेअर्स 200 रु. च्या पलिकडे विकुन मी घरांतील फर्निचर केले. 2003 मध्ये जेंव्हा 'मारुति लि' चा पब्लीक इश्शु बाजारांत आला तेंव्हा आलेला अनुभव मात्र एकदम उलटा होता. ह्या इश्शुचे फॉर्म्स घेवुन मी काही निवडक क्लायंट्स कडे जायचो आणि 'बघा...चांगली कंपनी आहे' वगैरे पोपट्पंची करायला सुरवात करायचो, तोच ज्या कोणा साहेबांकडे मारुतीची गाडी असायची, ते मलाच उलट ती गाडी किती चांगली चालते, रिलाएबल कशी आहे, कोणताही त्रास नाही ई. गोष्टी सागायचे, '......अर्ज करायलाच हवा' असे म्हणुन फॉर्म भरायचे. हा प्रकार पाहुन मीही ओढुन ताणुन चंद्रबळ आणले आणि चक्क ओव्हरड्राफ्ट वापरुन मोठ्या रकमेचा अर्ज भरला. सांगावयास आनंद वाटतो की मारुति 800 नव्हे पण एखादी उत्तम टु व्हीलर घेता येइल एवढा फायदा महिनाभरांतच झाला. (केवळ माहितीसाठी - त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास प्रत्येकाला मारुतिचे शेअर्स फक्त रु 125 मध्ये मिळाले होते. मध्यंतरीचा भाव रु. 4700+ होता.) IPO पुराणामधीलच मला हटकून आठवणारी आणखी एक गोष्ट सांगतो..... 29 जुलै हा उद्योगक्षेत्रांतील ध्रुवतारा भारतरत्न श्री. जे. आर. डी टाटांचा जन्मदिवस,आणि माझ्या कन्येचाही... सन 2004 मध्ये हा मुहुर्त साधून टाटा समुहातील सर्वात मोठी कंपनी TCS ने आपला बहुचर्चित पब्लिक इश्शु बाजारंत आणला. मी माझी, कुटुंबातील सदस्यांचे वाढ्दिवशी खरेदी करावयाची, पद्धत म्हणुन TCS साठी दोन वेगळे अर्ज भरले. त्याच बरोबर व्यवसायाचा एक भाग म्हणुन पुण्यांतील एक यशस्वी व्यावसयिक म्हणुन नामांकित असलेल्या माझ्या 'एक्स-बॉस'कडेही पोहोचलो. "या...प्रसाद या, इकडे कसे काय?? कसे काय चाललेय??".. सरांनी मिठ्ठासपणे चौकशी केली.(सर कधीच कोणाचाही उल्लेख एकेरीने करित नसत, अगदी ज्युनियरचाही) मी लगेच TCS च्या फॉर्म्सचे भेंडोळे काढुन त्यांना अर्ज करण्याची विनंती केली. थोडेसे विचारमग्न झाल्याचे दाखवत साहेबांनी विचारले..' किती रुपयाला आहे हो एक शेअर??'..'900ला सर" - मी..."10रु.चा एक शेअर 900 घ्यायचा.??"- साहेब, "नाही सर, शेअर 10 रु चा नाही,...01 रु.चा आहे"… मी मध्येच त्यांचा गैरसमज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला (खरे तर मार्केटिंग कसे करु नये याचा उत्तम नमुनाच सादर केला !!!) "अहो, काय सांगताय काय?? इथे आम्ही नेहमीपेक्षा 2/5रु जास्त नफा घ्यायला गेलो तर बाजारांत कोलाहल होतो आणि कोण घेणार हो 01 रु. चा शेअर 900ला ??..असे सल्ले देताना नीट अभ्यास केला आहे् ना तुम्ही?? लक्षांत ठेवा, नवीनच आहात तुमच्या व्यवसायांत अजुन.. एवढ्या महाग किंमतीला या शेअरसाठी अर्ज करण्याचा माझा बिलकुल विचार नाही. आणि तुम्हीही जरा सावधपणेच करा..." "साहेबांनी माझ्याबद्दलच्या काळजीपोटीच सल्ला दिला. अर्थात मी 'बाबा वाक्यं..बॉसं वाक्य प्रमाणम..' विचारसरणी मानणारा नसल्याने 02 अर्ज केलेच आणि मला 35 शेअर्सही मिळाले. 850 रु ला मिळालेल्या या शेअरने पहिल्याच दिवशी बाजारांत जवळपास 1200 रु चा भाव दाखवला. नंतर मिळालेला एकास एक बोनस लक्षांत घेता 2004 साली गुंतविलेल्या उण्यापुर्या 30,000 रुपयांचे कालचे बाजारमुल्य रु 3,50,000 पेक्षा अधिक आहे. आणखी एक सांगावयाची गोष्ट म्हणजे गेल्या 05 वर्षांत या कंपनीने कधीही 2000% पेक्षा कमी (होय 2000% च) डिव्हीडंड दिलेला नाही. अर्थात केवळ IPO च्याच माध्यमातुन फायदा मिळवता येतो असे मात्र बिलकुलच नाही. किंबहुना 'वाट पाहीन पण IPO नेच कमवीन" असे असण्याचे अजिबात कारण नाही.... मध्यंतरी सोशल मिडियात विप्रो कंपनीचे 1980 साली घेतलेले 100 शेअर्स बोनस व स्प्लिट्स मुळे 96,00,000 एवढे वाढुन मुळ 10,000 रु. गुंतवणुकीचे मुल्य 30 वर्षात(2010 साली) 455 कोटी झाले असा एक पोस्ट फिरत होता…… आणि ही अन्य अनेक पोस्टप्रमाणे अफवा वा अतिशयोक्ती नव्हती तर वस्तुस्थिती होती. !! कॅस्ट्रॉल या (आता डीलिस्ट झालेल्या) कंपनीने 1990-2012 दरम्यान तब्बल 10 वेळा बोनस दिले, 'मदरसन सुमी लि.' ही अशीच एक कंपनी...जिने 1997-2015 या काळांत 07 वेळा बोनस शेअर्स वाटले. ईन्फोसिसनेही बोनसवाटपाची अशीच चमकदार कामगिरी आजपर्यत 07 वेळा केली आहे. ITC ने 1978 पासुन 07 वेळा तर कोलगेट(ई)ने 1982 पासुन 06 वेळा बोनस शेअरची भेट दिली, आणी या प्रत्येकाने याशिवाय दरवर्षीच्या घसघसीत लाभांश दिलाच आहे. जाता जाता....'एशियन पेंटस'च्या ताज्या वार्षिक अहवालात लिहिल्याप्रमाणे 1983 साली घेतलेल्या एका शेअरचे आता 184 शेअर्स झाले आहेत. आणि या कालांत गुतवलेल्या 1000 रु.चे मुल्य 31 मार्च 2015 रोजी रुपये 65,00,000 च्या आसपास आहे……. यादी खुप मोठी आहे विस्तारभयास्तव आटोपतो. ….एकदा एका भल्या पहाटे एक निरिश्वरवादी तरुण गौतम बुद्धांची भेट घ्यायला आला. त्याला पहाताक्षणीच बुद्धांनी तो काय विचारणार हे ओळखलेच होते, त्याने बुद्धांना 'तो' नेहमीचा प्रश्न विचारलाच ‘..ईश्वर खरेच आहे का?" "होय,आहे"..उपासनामग्न बुद्ध शांतपणे उत्तरले. तो निघुन गेला. नंतर एके दिवशी एक पापभिरु सज्जन बुद्धांना नेमका हाच प्रश्न विचारते झाले 'खरेच ईश्वर आहे का?" यावेळी मात्र बुद्धांनी तितक्याच तटस्थपणे उत्तर दिले - "नाही" .....हे सज्जनही विचारमग्न होवुन निघुन गेले. पुढे काही दिवसांनी आणखी एक भाविक बुद्धांना म्हणाला "महात्मन, मी गोंधळुन गेलो आहे, अनेक जण असे मानतात की परमेश्वर नाहीच मुळी, उलट बरेच लोक परमेश्वरावरच प्रगाढ विश्वास ठेवतात. आपल्याला काय वाटते ?? तो आहे की नाही?? कृपया मला मार्गदर्शन करावे."....यावर भगवान बुद्धांनी आपल्या अर्धोन्मेलित डोळ्यांतुन त्या साधकाकडे पहात एक प्रसन्न मंद्स्मित केले, आशिर्वाद दिला आणि काहीही न बोलता ते दुसर्या भिक्षुकडे वळले...बुद्धांनी उच्चारलेला शब्द-नी-शब्द लक्षपुर्वक ऐकणार्या त्यांचा एका पट्टशिष्याला मात्र रहावले नाही आणि सावकाशीने ह्या तीनही प्रसंगांची आठवण बुद्धांना देत त्याने विचारले "भगवान, तीन साधकांना तीन वेगळी उत्तरे?? आपण असे का केलेत ??".....यावर हसुन भगवान म्हणाले "अरे, मी काहीही वेगळे केलेले नाही. उत्तरांचे बाह्य स्वरुप वेगळे असेलही पण हेतु एकच आहे, प्रत्येकाला त्यांच्या कोषांतुन बाहेर काढुन विचा्र करण्यास प्रवृत्त करणे, जेणे करुन ते माझ्यासारख्या त्रयस्थाऐवजी स्वतःच सत्याचा अनुभव घेवु शकतील.. सांगावयाचा मुद्दा हा, तुम्ही भगवान बुद्ध असा की माझ्यासारखा सामान्य पामर, काही प्रश्नच असे असतात की जे तुम्हाला वारंवार विचारले जातात..रोज प्रातःसमयी अतिव प्रेमाने विचारला जाणार्या "ईतका वेळ त्या पेपरांत डोळे खुपसुन काय वाचतोयस ?? अशा केवळ दुर्लक्षिण्यायोग्य प्रश्नांबरोबरच व्यवसायानिमित्ताने "शेअर बाजारातुन चांगले रिटर्न्स मिळतील का?? 'बाजारांत गुंतवणुक करावी का?? असे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्वचिंतक नसल्याने कधी हसुन तर कधी वैतागुन उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे तर एक आणि एकच. ते म्हणजे……….. "होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!!!' अर्थात पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला गुंतवणुक क्षेत्रातील तज्ञ वगैरे अजिबातच समजत नाही मात्र माझ्यापुरत्या आखलेल्या भविष्यदिशा थोड्क्यांत पुढीलप्रमाणे सांगता येतील. - (१) Will not Invest for Short Term. Will not Save for Long Term...(२) बाजारांत नियमितपणाने गुंतवणुक करेन (३) शेअरबाजारांत गुंतवणुकीची सुरवात करणेपुर्वी किमान 06 महिने पुरेल एवढा आणिबाणी निधी बाजुला ठेवेन (४) केवळ पुर्ण माहितीवर आधारित निर्णयच घेइन, भावनावश होवुन वा घाई गडबडीने व्यवहार करणार नाही (५) उपलब्ध पर्यांयांची सखोल माहिती घेइन. उदा. फिक्स डीपॉझिट ऐवजी लिक्विड फंड्स वा टॅक्स वाचविण्याकरिता ELSS.... चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की ‘It is NOT the strongest of the species that survives, NOR the most intelligent, but the ones most responsive to change …’ तेंव्हा बद्ल घडविणे अपरिहार्य्च आहे तर उशीर कशाला?? चला, येत्या नव्या संवतापासुनच बदलाला सामोरे जावुया !!!

वाचने 70444
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

तुमचे लेख नेहमीच आवडतात. पण मागेही लिहिल्याप्रमाणे अगदी सर्वसामान्यांसाठी, त्यांना समजेल अशा भाषेत, बुलेट पॉईंटमध्ये असा एक लेख लिहा की ज्यात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्राथमिक तयारी कशी करावी आणि मूलभूत संकल्पना काय असतात.

In reply to by एस

मला माझ्या एका मित्राने खालिल दुवा दिला होता. त्यामध्ये अतिशय सुंदरपणे अगदी मूलभूत संकल्पनांपासून स्पष्टीकरण दिलेले आहे. बघा आवडला तर. बाकी जाणकार मार्गदर्शन करतीलच. http://zerodha.com/varsity/module/introduction-to-stock-markets/ बाकी अजून जालावर सापडलेल्या जागा खालिलप्रमाणे http://www.sharemarketschool.com/category/beginnerslessons/ https://www.nseindia.com/education/content/module_ncfm.htm

In reply to by एस

नमस्कार, तुम्ही https://marketaanimi.com/ हा ब्लॉग वाचला आहे का? तुम्हाला जर सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर कदाचित मदत होईल. सुरेंद्र

मी स्वतः एक गुंतवणूकदार आहे. तुमचे लेख खरोखरच मार्गदर्शक आहेत. मिपावर तुमचे लेख मी शोधून शोधून वाचले आहेत. एक तक्रार आहे, तुम्ही फारच कमी लिहिता असे मला वाटते . जरा अजुन होऊन जाउदे.

"होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!!!'
त्रिकालाबाधित सत्य.....

In reply to by जेपी

जसे प्रत्येक रागाचा एक स्वभाव असतो आणि काही स्वर वर्जित असतात, मारव्या सारख्या करुणरस प्रधान रागांत यमनमधील प्रसन्नता आणणारे स्वर लावा म्हणणे विसंवादी ठरेल. तसेच लेखाचेही असु शकेल. बाजारांत आलेला प्रत्येक IPO यशकथाच असतो असे मी दुरान्व्यानेही सुचविलेले नाही मात्र अशी एखादी घट्ना वगळल्याने लेखातील दिलेल्या गोष्टींना बाधा येते असे नव्हे. नसलेल्या गोष्टींबाबत 'पिंगा' घालण्याच्या काळांत आपण एकढे मर्यादित लेखनस्वातंत्र्य मला द्याल अशी आशा आहे.

शेअर बाजराचे महत्वाचे अंग असणारे सर्वसामान्य गुंतवणुकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असणरे म्युच्युअल फंड, सिप याबद्दल जरुर लिहावे अशी विनंती आहे.

Of 178 firms that have listed on the markets since 2008, the shares of 112 have given negative returns http://www.livemint.com/Money/Lul6ew94YKoaRj0MHslT4N/Most-IPOs-in-last-… दोन तृतीयांश IPO नि मार खाल्ला आहे तेंव्हा सावधान तेंव्हा आय पी ओ मध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर त्याची संपूर्ण चौकशी करा. माझे म्हणणे एकच आहे -- आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना आपण जशी सखोल चौकशी करता किंवा "विश्वासू" व्यक्ती कडून माहिती काढता तशीच चौकशी आपल्या घामाच्या पैशाची गुंतवणूक करताना करावी. सगळीच स्थळे प्रथम दर्शनी दिसतात तशी उत्तम असत नाहीत. या बाबत "विश्वासू" अर्थसल्लागाराचा सल्ला हा मोलाचा ठरतो. सर्व सामान्य माणसाची वृत्ती असे पैसे देण्यापेक्षा कुणीतरी दिलेल्या "टीप"वर गुंतवणूक करण्याची आहे आणि यामुळे बहुसंख्य लोक हात पोळून घेतात. या "टीप्स" व्हॉटस अप वरील ढकलपत्रासारख्या(forwards) निरुपयोगी किंवा कुणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी पसरवलेल्या असतात.

In reply to by सुबोध खरे

तेंव्हा आय पी ओ मध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर त्याची संपूर्ण चौकशी करा.
खरे साहेब - ह्यातल्या बर्‍यासश्या कंपन्या चांगल्या असतात, प्रश्न येतो ते कीती किंमत द्यायची हा. कोणी तुम्हाला सोने ३५००० रुपये तोळे विकत असेल तर तुम्ही काय करणार? सोने तर चोख आहे, पण किंमत गंडली आहे ना. ह्या नविन कंपन्यांच्या बद्दल किंमत ठरवणे हेच अवघड होते. त्यात सर्वसाधारण पणे हे इश्यु मार्केट जोरात असताना येतात ....

फँटॅस्टिक लिहिलंयत भौ ! मस्तच... गुंतवणूक, शेअर्स किंवा इक्विटी, म्युच्युअल फंड हे विषय जाणायला, बोलायला आवडतात. मुरलेलो नाही त्यात, पण चाचपडून गोष्टी करतो अधेमधे. ग्रेट. लिहीत रहा अजून या विषयावर. मस्त!

भागवत साहेब, तुमची उदाहरणे एकदम योग्य जरी असली तरी ते असे काहीतरी लिहीतात ना म्युच्युअल फंडाच्या जहीरातीत की "पास्ट पर्फॉर्मन्स डज नॉट गॅरेंटी फ्युचर रीटर्न्स" तसे काहीतरी आहे. पूर्वी प्रमोटर इश्यु ची किंमत ठरवताना थोडी तरी जनाची/मनाची लाज ठेवत. पण गेल्या ७-८ वर्षात ( किंवा ) ५ वर्षात इशुंची कींमत प्रमोटर आणि त्यांचे बँकर वाटेल ती ठेवत असतात. एकुणच बाजारात पैसा खुप असल्यामुळे तेव्हडे पैसे जमतात. तुम्ही गेल्या ५ वर्षातली काही उदाहरणे देऊ शकलात तर बघा. चुकुन एखाद्या इश्यु ची किंमत रीजनेबल असेल तर त्याला ५० पट सब्स्क्रीप्श्न होते म्हणजे आपल्या हाती काही फार लागत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसादराव मी अर्ज करण्यास आपात्र असा ठरवेलेला 'ईंडीगो', केळकर ..ही कालचीच उदाहरणे आहेत. VRL Logistic...मी 900 शेअर्सकरिता अर्ज केला, मात्र मिळाले नाहीत. ज्युबीलंट फुड्सही एक अशीच चुकलेली संधी.... खुप ताण दिल्यास अशी आणखीही ४/५ उदाहरणे देवु शकेन..मात्र आपल्या भावनेशी बराचसा सहमत. माझा जेपी यांना दिलेला प्रतिसाद माझी भुमिका अधिक स्पष्ट करेल

In reply to by प्रसाद भागवत

तेच होतय ना, जे चांगले आहेत इश्यु तिथे फारसे अलोकेशनच होत नाही. आणि ह्या उदाहरणात पण २०% फायदा असेल ( मी बघितले नाहीये ), पूर्वी सारखा ५०-१००% नाही. अवघड झाले आहे, सध्याच्या मार्केट मधे पैसे मिळवणे पूर्वी इतके सोप्पे राहिले नाही.

In reply to by प्रसाद१९७१

माझे म्हणणे थोडे वेगळे आहे,... शेअर्स मिळतच नाही असेही नाही बहुतेकदा मी अर्ज केलेच नाहीत अन्यथा शेअर्स मिळाले असते. 'ईंडीगो', केळकर...अर्ज केलेल्या प्रत्येकाला शेअर्स मिळालेच की.!!! VRL Logistic...माझी थोडीशी तांत्रिक चुक झाली असावी. बाकी ज्युबीलंट फुड्सचे आठवत नाही. आणि आठवडा/पंधरवडाभरात २०% फायदा...बस्स की अधिक हाव कशाला ??

In reply to by मोगा

शेअरबाजार आणि अनुषंगिक ताज्या घडामोडी यावर मी माझ्या कुवती व आकलनानुसार WAच्या माध्यमातुन भाष्य करित असतो. यात रस असलेल्या कोणी मला व्यनी करुन आपले नाव व भ्रमण्धवनी क्र. दिल्यास त्यांचा माझ्या यादीत समावेश करावयास आवडेल. अर्थात मी फक्त माझे स्वतःचेच अथवा अर्थविषयक महत्वाचेच पोस्ट करीत असल्याने अन्य सदस्यांसही GM/GN..RIP या वर्गातले वा ढकलपंची पोस्ट सक्तीने वर्ज्य आहेत. ,

भागवत सर तुमचे बहुतांशी लेख वाचलेत. खरच ज्ञान समृद्ध करणारे लेख असतात

सध्याची भांडवलशाही व्यवस्था, अमाप उत्पादन, ई मुळे पृथ्वीवरील सीमित नैसर्गिक स्त्रोत ताणले जात आहेत. पर्यावरणाची हानी होऊन हवामान बदलत आहे. या बाबत जागरूकता वाढत असून आपल्या जगण्यात, व्यवस्थेत मुलभुत बदल करण्याची गरज काही लोकांना जाणवू लागली आहे. मोठमोठ्या कंपन्या स्वत्तःच्या फायद्यासाठी निसर्गाची हानी करत आहेत हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत आहे. हा विचार वाढत जाईल हे नक्की. हि पार्श्वभूमी लक्षात घेता कधीतरी हि औद्योगिक, भांडवलशाही व्यवस्था जाऊन नवीन व्यवस्था येईल आणि शेअर बाजार पार बदलून जाईल असे वाटते.

In reply to by पथिक

एकीकडे तुम्हाला शेयर ट्रेडिंग शिकायचे आहे आणि त्या साठी तुम्ही धागा पण काढला आहे. तुम्हाला भांडवल शाही आवडत नसेल तर कशाला हा खटाटोप. का भांडवलशाही ला शिव्या घालायच्या आणी त्याचेच फायदे ओरपायचे हा भारतीय समाजवाद्यांचा खेळ तुम्ही खेळताय.

रच्याकने- तुम्ही कम्युनिस्ट ंआहात काय ?

In reply to by पथिक

मोठमोठ्या कंपन्या स्वत्तःच्या फायद्यासाठी निसर्गाची हानी करत आहेत हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत आहे
हे तुमचे विधान बाळबोध आहे हे नमूद करावसे वाटते. कंपन्या त्यांच्या ग्राहकांना जबरदस्तीक करतात का त्यांची उत्पादने घ्यायला. तुमच्या कडे शर्ट कीती आहेत? एक शर्ट तयार करायला एकुणात २५०० लिटर पाणी लागते. तुमच्या कडे ४-५ च्या पेक्षा जास्त शर्ट असतील तर तुम्ही निसर्गाची प्रचंड हानी करत आहात. :-)

In reply to by प्रसाद१९७१

मोठ्या मोठ्या कंपन्या सामन्यांची मानसिकता बदलत असतात, जाहिरातींचा, मिडीयाचा उपयोग करून. 'दात घासायला कोळसा वापरणे' अडाणीपणाचे आहे, किंवा 'जुना टीव्ही म्हणजे "डब्बा" आहे', असे न्यूनगंड निर्माण करून, सुखाची चुकीची व्याख्या लोकांच्या मनावर ठसवून. मी स्वत्तः फार आदर्श जगतो आहे असे नाही. पण या बाबतीतली जागरूकता वाढत चालली आहे. अस्वस्थपणा वाढत आहे. पहिल्या पायरीवर आहे… :-)

येथील कोणीतरी मित्राने ( नाव न आठवल्याबद्द्ल क्षमस्व..) L&T Infotech च्या IPO बद्दल चौकशी केली होती. हा इश्शु आता अपेक्षित आहे. बाकी कळेल तशी माहिती देत जाईनच. http://economictimes.indiatimes.com/markets/ipos/fpos/lt-infotech-gets-…

In reply to by प्रसाद भागवत

लेखाच्या खाली आलेल्या प्रतिक्रिया पण वाचा. रोचक आहेत. (कुणाच्याही सांगण्यावरून IPO मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी स्वतः अभ्यास करून निष्कर्श काढणे महत्वाचे आहे.)

Thyrocare Technologies च्या IPO ने गुंतवणुकदारंच्या पदरात भरभरुन यश टाकले.. माझ्या WA वरील यादींत असणार्या मिपाकरांना या ईश्शुबद्दल मी आधीपासुनच देत असलेल्या अपडेटस मिळाल्या, येथे मात्र लिहावयाचे राहिले. असो. आता बाजाराचे लक्ष वेधुन घेणारा आगामी IPO म्हणजे Mahanagar Gas IPO... लक्ष ठेवा. माझी मते मी WA वरुन अधिक नियमितपणे देत असतोच.

ह्ल्ली प्रत्येक IPO करिता 'ASBA' - Application Supported by Blocked Monly.. ही सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.. How to get it activated (1)You meet your banker with a request for the ASBA, (2)give your demat account details along with your PAN to him .. (3) get confirmation, he activates the facility.. Now here onwards (4)you don't give any cheque with any application.. (5)you give only bank details in the application, where this facility is activated.. (6)the amount required for the application is immediately 'blocked'. (7) Such 'blocked' funds paid/released, soon after the allotment.. Thus your don't lose interest on the application money for even a single day!!! SO get it done. Today only .-Prasad Bhagwat

In reply to by प्रसाद भागवत

तुमचा मोबाईल न. मिळेल का? तुम्हाला कायप्पा वर जॉइन होइन म्हणतो. थायरोकेयरच्या आईपीओला पैसे टाकले होते पण नाही लागले. उज्जीवनचे 70 लागले, सकाळी 240ला काढून तीन वाजता परत 232ला घेतले. दीर्घकाल ठेविन म्हणतो.

Mahanagar Gas Limited IPO details are announced.. Issue Open: Jun 21, - Jun 23, Issue Price: Rs. 380 - Rs. 421 Per Equity Share Minimum Order Quantity: 35 Shares Can be applied through ASBA only.. Seems to be a issue worth applying.. will try to post updates on this.. Interested ones should contact me if need some help.- Prasad Bhagwat

In reply to by माझीही शॅम्पेन

हा आय पी ओ का घ्यावा ... बाजारात सर्वाधिक महत्वाचे तत्वज्ञान आहे 'भाव हाच देव'. बाजारांतील प्रतिसाद पहाता चांगला भाव मिळेल असे दिसते. या निकषावर हा घ्यावा.. मिळाल्यास आपले सगळे वा शक्य तेवढे मुद्दल काढुन घावे. (अर्थात हे माझे व्यक्तिगत मत. कसलीही हमी नाही) बाकी कीस काढ्णे आवश्यक वाटत नाही.

एकंदरीत आयपिओ अ‍ॅट्रॅक्टीव वाटतोय ..

L & T इन्फोटेक IPO ११ जुलैला येतोय . पूर्णतः online मध्ये IPO साठी गुंतवणूक करता येईल का ? ASBA फॉर्म physically न भरता online भरायचा पर्याय असल्यास माहिती द्यावी. कारण सध्या कामानिमित्त गुरगावात वास्तव्य आहे नि बँकर ब्रोकर मुंबईतले आहेत .

In reply to by विअर्ड विक्स

काही विषिष्ट ठिकाणीच IPO ची online सुविधा उपलब्ध आहे..उदा कोट्कमध्ये फक्त. 3-in-1 Trinity Account holders नाच ही सुविधा आहे बाकीच्यांना नाही. बँकर ब्रोकर मुंबईतले आहेत..हा मुद्दा खरेतर अडचणीचा नसावा. कारण पुण्यांतुन मुंबईच्या क्लायंटसनी अर्ज भरल्याचे मला माहित आहे. मात्र आपली बॅके ASBA सुविधा पुरवित असावी. करणारच असाल अर्ज तर गोंघळ टाळण्याकरिता पहिल्याच दिवशी अर्ज भरावा असे सुचवेन..

In reply to by वेदांत

अरेरे कधी अलॉटमेंट झाली ? ४ लॉट्सचा अर्ज केला होता हायला मला पण एक शेयर मिळाला नाही , मला वाटल अजुन अलॉटमेंट व्हयायची आहे , स्टॉक कोड काय आहे ? सेकेंडरीला कितीला ओपन झालाय ?

In reply to by माझीही शॅम्पेन

जरा धीर धरा साहेब.. फक्त ॲलॉट्मेंट झाली आहे.. लिस्टींग नाही. .ते येत्या आठवड्यांत आहे..

In reply to by वेदांत

Oh..better luck next time...एक सुचवु का ?/ हल्लीच्या वाटप पध्द्तीत ०३ लॉटसच्या एका अर्जापेक्षा एका लॉटचेच पन तीन वेगवेगळॅ अर्ज केल्यास फायदा होतो असे कराने शक्य नसल्यास मग अर्ज ०१ लॉटसाठीच करावा.

In reply to by वेदांत

क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे उत्तरासाठी दिलेला प्रतिसद खाली वेगळा प्रकाशित झाला आहे. तो वाचावा..

In reply to by वेदांत

क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे उत्तरासाठी दिलेला प्रतिसद खाली वेगळा प्रकाशित झाला आहे. तो वाचावा..

मी 2 लॉट्साठी अर्ज केला होता, 1 अलोकेट झाला आहे ,तसा मेल आला आहे BSE कडून. मी या क्षेत्रात नवी आहे, मिसळ पावच्या अनेक लेखांमधून खूप माहिती मिळाली त्या बदल खरंच खूप आभारी आहे मी सर्वांचीच , असेच मार्गदर्शन मिळत राहीन हीच अपेक्षा. महानगर IPO मधून या क्षेत्रात पाहिले पाऊल टाकले आहे.

भागवतसाहेबांचे लेख चांगले असतात पण त्यावरील प्रतिक्रिया मला मर्णाच्या आवडतात वाचायला.