पत्रकार ब्रॅडली...

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
23 Oct 2014 - 9:38 am

वॉशिंग्टन पोस्टच्या एकेकाळच्या कार्यकारी संपादकाचे, बेन ब्रॅडलीचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या बायकोने मध्यंतरी गुपित फोडले त्यानुसार ब्रॅडलींना काही वर्षे अल्जायमर झालेला होता ज्यामुळे त्यांची स्मृती लयाला गेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०च्या सुरवातीस वॉशिंग्टन पोस्टने जे काही केले त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या स्मृती आजही अमेरीकन माध्यमात जाग्या असलेल्या दिसल्या.

बेन ब्रॅडली हे मुळचे बॉस्टनचे. हार्वर्ड मधून शिकल्यानंतर दुसर्‍या महायुद्धात भाग घेतला आणि परत आल्यावर वृत्तपत्रकारीकेत जाण्याचा आधी असफल प्रयत्न केला पण नंतर वॉशिंग्टन पोस्ट मधे संधी मिळाली आणि त्यात स्वतःचे आणि पोस्टचे सोने केले....

साठच्या दशकाचा उत्तरकाल हा अमेरीकेत एका अर्थी अस्वस्थ काल होता. व्हिएटनाम युद्धाचे अमेरीकवर होणारे परीणाम दिसत होते. त्या व्यतिरी़क्त शीतयुद्धामुळे हेरगिरी वाढलेली होती. अशा काळात १९६८ ला रिपब्लीकन निक्सन हे प्रथमच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. साधारण १९७०-७१ मधे न्यू यॉर्क टाईम्सला अमेरीकन डिफेन्स डिपार्टमेंटचे व्हिएटनाम युध्दावरील गोपनीय कागदपत्रे मिळाली आणि आधी न्यूयॉर्क टाईम्स आणि पाठोपाठ वॉशिंग्टन पोस्टने ती प्रकाशात आणली. ती आणू नये म्हणून निक्सन पार सुप्रिम कोर्टापर्यंत गेले पण काहीच उपयोग झाला नाही... तो निक्सन यांना मिळालेला पहीला दणका होता. तो अशा वेळेस मिळत होता जेंव्हा त्यांच्या दुसर्‍या वेळच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते.

या घटनेच्या पाठोपाठच वॉशिंग्टन पोस्टचे दोन पत्रकार बॉब वुडवर्ड्स आणि कार्ल बर्नस्टाईन यांना कोणी एका वरीष्ठ व्यक्तीने माहिती दिली त्यानुसार निक्सन हे अमेरीकन हेरगिरी यंत्रणा हे त्यांच्या विरोधातील डेमोक्रॅटीक पक्षासाठी वापरत असल्याचे समजले. वॉशिंग्टनच्या हॉटेल वॉटरगेट मध्ये डेमोक्रॅटीक नॅशनल कमिटीने ऑफिस बसवले होते. तेथे त्यांचे चोरून ऐकण्याची यंत्रणा बसवली होती. प्रकरण फारच गंभीर होते आणि अर्थातच देशाच्या सर्वोच्च नेत्याशी पंगा घेणारे होते. पण तसे घेण्याचा निर्णय ब्रॅडलींनी घेतला. अर्थात पदोपदी माहीती खरी आहे ना याची खात्री करून आणि त्याच बरोबर या दोन पत्रकारांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून. म्हणूनच या प्रकरणामुळे निक्सन यांना अखेर राजीनामा द्यावा लागला, त्याच्या नंतर दोन वर्षे झाली तरी ही बातमी फोडणारी नक्की व्यक्ती कोण हे त्यांना माहीत नव्हते आणि ते कळावे असा हट्ट देखील त्यांनी वुडवर्ड-बर्नस्टाईन यांच्यापाशी केला नाही. १९७२ सालच्या या प्रकरणातील व्यक्तीला केवळ डिप थ्रोट म्हणून ओळखले गेले. त्या व्यक्तीने (मार्क फेल्ट या एफबीआय अधिकार्‍याने) सांगितले की माझे नाव जाहीर केले तरी चालेल तेंव्हा म्हणजे २००५ मधे ते नाव जाहीर करण्यात आले.

निक्सन प्रेसिडेन्शिअल लायब्ररीने ब्रॅडली आणि वुडवर्डची मुलाखत घेतली होती त्यातील काही भाग...

Bradley

In 2005, Carl Bernstein, Bradlee and Bob Woodward attended a screening in New York of “All The President’s Men,” the 1976 movie based on Bernstein and Woodward’s book about Watergate. (Brad Barket/Getty Images) (दुवा)

त्यामुळे आणि अशा अनेक घटनांमुळे मानाचे पुलित्झर पारीतोषिक पोस्टला १८ वेळेस मिळाले. १९ व्यांदा मिळताना त्यातील पत्रकार खोटे बोलली होती हे नंतर लक्षात येता क्षणी ब्रॅडलींनी ते पारीतोषिक परत करून टाकले आणि राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली. अर्थात ती मानली गेली नाही.

वृत्तपत्र अथवा प्रसिध्दी माध्यम चालवणे केवळ टिआरपीसाठी वर अवलंबून नसते तर त्यासाठी कष्ट घेणे आणि आपल्यावर विश्वास ठेवता येईल (आणि आपल्याला गुपित सांगता येईल) अशी वागणूक असणे महत्वाचे असते. त्यात सामाजीक भान असणे हे दुसरे महत्वाचे लक्षण असते.

पण एकंदरीत आजचे पत्रकार आणि त्यांना पोसणारी माध्यमे / मालक यांचा विचार केल्यास पत्रकारीता सध्या लोकशाही आणि सामाजीक कर्तव्य या साठी नक्की काय करते हा उत्तर मिळू न शकणारा प्रश्न पडतो. वर्तमानपत्रे ही अनेकदा मुखपत्रांसारखीच भासतात...

तरीदेखील, आपल्याकडे तत्कालीन मोठा भ्रष्टाचार उघड करण्याचे काम नक्की कोणी केले आठवत नाही, बहुदा शौरी असावेत, पण त्यामुळे अंतुलेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले हे निश्चित. तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांना जे जे हॉस्पिटलमधील गोंधळ भोवल्याचे या निमित्ताने आठवले.

आज ब्रॅडलींच्या निमित्ताने असे काही माहिती असलेले किस्से येथे अवश्य सांगावेत!

समाजराजकारणविचार

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 11:05 am | पाषाणभेद

एखाद्या स्थानिक किंवा भारतीय पत्रकाराची महती वाचायला मिळाली असती तर बरे झाले असते.
सुरूवातीच्या ओळी वाचून पुर्ण लेख अर्थातच वाचला नाही.

विकास's picture

23 Oct 2014 - 6:22 pm | विकास

तेच तर शेवटच्या वाक्यात विचारले होते ना! अर्थात शेवटपर्यंत वाचले असते तर समजले असते. :) नाहीतर तसे काय नावावरूनच भारतीय नसावा हे कळायला हरकत नव्हती! ;)

आज ब्रॅडलींच्या निमित्ताने असे काही माहिती असलेले किस्से येथे अवश्य सांगावेत!

अंतुल्यांचे उदाहरण दिले होतेच पण त्याहूनही अधिक असतील पण माहीत नाहीत. दुर्दैवाने सध्याच्या पत्रकारीतेत बर्‍याचदा "paid" पत्रकारीता दिसते तर कधी कधी टोकाची तात्विक बाजू घेऊन लिहीलेले अथवा वाहीन्यांवर दिसते. हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर अमेरीकेत देखील लागू आहे.

ब्रॅडली यांच्याबद्दल तशी कमीच माहिती आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
All the president's men हा चित्रपट पाहिला आहे. या सर्व घटनेनंतर काही वर्षामध्येच हा चित्रपट आला आणि एवढ्या कमी कालावधी मधेही घटनांची सुसंगती लावून जी पटकथा बनवली आहे ती सुंदर आहे. एक कलाकृती म्हणूनही हा चित्रपट उत्कृष्ट आहे.
आपण निक्सन यांच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या मुलाखतीवर असलेला Frost/Nixon हा चित्रपट पाहिला आहे का? जिथे All the president's men संपतो साधारणपणे तिथूनच Frost/Nixon सुरु होतो.
पत्रकारिता, TRP आणि माध्यमे यावर त्याच काळात आलेला अजून एक सुंदर चित्रपट म्हणजे Network. आपण पाहिला नसेल तर जरूर पाहा.
धन्यवाद.

विकास's picture

23 Oct 2014 - 6:23 pm | विकास

नेटवर्क चित्रपट पाहीलेला नाही. अवश्य पाहीन. माहितीबद्दल धन्यवाद!

तसाच अजून एक आठवलेला चित्रपट म्हणजे मला वाटते डस्टीन हॉफमन होता त्यात, "वॅग द डॉग".

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2014 - 2:42 pm | बोका-ए-आझम

त्यामुळे आणि अशा अनेक घटनांमुळे मानाचे पुलित्झर पारीतोषिक पोस्टला १८ वेळेस मिळाले. १९ व्यांदा मिळताना त्यातील पत्रकार खोटे बोलली होती हे नंतर लक्षात येता क्षणी ब्रॅडलींनी ते पारीतोषिक परत करून टाकले आणि राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली. अर्थात ती मानली गेली नाही.

ही पत्रकार होती जॅनेट कुक. तिने ' जिमीज वर्ल्ड ' या नावाने जिमी नावाच्या एका हेराॅईनचं व्यसन असलेल्या मुलाची कहाणी छापली होती. त्या कथेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि जॅनेट कुक व वाॅशिंग्टन पोस्ट यांना पुलिट्झरही मिळालं. पण नंतर अनेक पत्रकारांनी या कथेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातल्या विसंगती पुढे यायला लागल्या. शेवटी जॅनेट कुकने आपण पुलिट्झर पारितोषिक मिळावं म्हणून अशी कथा रचल्याचं कबूल केलं. त्यामुळे जॅनेट कुक किंवा वाॅशिंग्टन पोस्ट यांच्यापेक्षा पुलिट्झर पारितोषिकाची बदनामी झाली.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2014 - 2:53 pm | बोका-ए-आझम

ब्रॅडली यांच्याबद्दल प्रथमच माहिती मिळाली. एक सामाजिक अन नैतिक जाणीव असलेला पत्रकार म्हणून त्यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
ब्रॅडली यांना श्रद्धांजली.

स्पा's picture

23 Oct 2014 - 4:32 pm | स्पा

छोटेखानी परीचय आवडला.

ब्रॅडली यांनी उघडकीस आणलेले प्रकरण वॉटरगेट म्हणून प्रसिद्ध झाले होते. ज्या हॉटेल मध्ये घडले होते त्याचे नाव वॉटरगेट होते. म्हणून आपल्या येथील माध्यमे कुठलाही घोटाळा उघडकीस आला की त्याच्यापुढे गेट शब्द जोडतात(उदा. कोलगेट, स्नूपगेट, राडियागेट, कॉफिनगेट). कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता.

विकास's picture

24 Oct 2014 - 12:26 am | विकास

कोणीतरी समजावले पाहिजे त्यांना वॉटरगेटचा आणि वॉटरचा काहीही संबंध नव्हता.
खरे आहे पण...

वॉटरगेट मधील गेट हे सफिक्स इतके लोकप्रिय झाले की ते सर्वत्रच कुठल्याही गैरकारभारासाठी वापरले जाऊ लागले. विकी वर तुम्हाला गेट वापरून उजेडात आलेल्या गैरव्यवहारांची वर्गवारी केलेली सुची बघता येईल!

सरते शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरीने ते सफिक्स म्हणून जाहीर केले (जसे आता google हे क्रियापद म्हणून जाहीर केले तसे).

तुम्ही म्हणत असलेल्या मुद्द्यावरून ब्रिटीश सिटकॉममधे केलेला विनोद (वॉटरगेटगेट) खाली पहाता येईल!

बोका-ए-आझम's picture

24 Oct 2014 - 12:01 am | बोका-ए-आझम

भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा १९९१ मध्ये सुरू झाल्या आणि सर्वात प्रथम झालेली नकारात्मक गोष्ट म्हणजे हर्षद मेहताचा शेअरबाजार घोटाळा. त्यावेळी ' इका‌ॅनाॅमिक टाइम्स ' मध्ये असलेल्या सुचेता दलाल यांनी हा घोटाळा उघडकीस आणला.

विकास's picture

24 Oct 2014 - 12:14 am | विकास

चांगली माहीती आणि दुवा!

धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

24 Oct 2014 - 12:43 am | श्रीरंग_जोशी

ब्रॅडली यांना श्रद्धांजली.

पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रॅडली यांचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे.

या लेखनाबद्दल धन्यवाद. चर्चेतही चांगली माहिती मिळत आहे. 'गेट' हे सफिक्स अतिवापराने आपली तीव्रता गमावून बसत आहे असे वाटू लागले आहे.

गेल्या पंधरा वर्षांत आपल्याकडे शोधपत्रकारितेच्या नावाखाली सनसनीखेज बातम्या घडवणे व प्रसारित करणे हा प्रकार रूढ झालेला आहे.

विनोद१८'s picture

24 Oct 2014 - 1:34 am | विनोद१८

एका खर्‍या व हाडाच्या पत्रकाराचा थोडक्यात पण उत्तम तर्‍हेने परीचय करुन देल्याबद्दल धन्यवाद.


पण एकंदरीत आजचे पत्रकार आणि त्यांना पोसणारी माध्यमे / मालक यांचा विचार केल्यास पत्रकारीता सध्या लोकशाही आणि सामाजीक कर्तव्य या साठी नक्की काय करते हा उत्तर मिळू न शकणारा प्रश्न पडतो. वर्तमानपत्रे ही अनेकदा मुखपत्रांसारखीच भासतात...


हे पटले, या संदर्भात भारतीय पत्रकारीतेने अंतर्मुख होउन विचार करावा व हा लोकशाहीचा चौथा खांब मजबुतीने राखावा. मला वाटते आपल्याकडेही त्यांच्या तोलामोलाचे पत्रकार झाले असावेत वा असतीलही, जाणकारांनी याविषयावर अधिक प्रकाश टाकावा असे वाटते. या निमित्ताने एका चांगल्या विषयावर उत्तम चर्चा व्हावी.

बहुगुणी's picture

24 Oct 2014 - 9:41 am | बहुगुणी

रेडिओवर हे कार्यक्रम ऐकले तेंव्हाच विकास यावर लिहीतील असं वाटलं होतं, चांगला लेख, धन्यवाद!

१९९५ ची ब्रॅडलीची मुलाखतः

२०१४ २२ ऑक्टोबरचा श्रद्धांजली कार्यक्रमः