नथ...............भाग-५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Oct 2014 - 7:19 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नथ.......भाग-१
नथ.......भाग-२
नथ.........भाग-३
नथ........भाग-४

नथ.........भाग-५
आईजान बाम्झाई...........(इस्माईलची आजी)
तो सगळा प्रकार बघून माझ्या मनात आमच्या पाहुण्यांबद्दल अपार आपलेपणा दाटून आला. मला आठवले ते माझे मी या घरात आले ते दिवस. चार दिवस निकाहचा कार्यक्रम चालला होता. पण मला आठवते ते आल्या आल्या आम्ही या आईजानपुढे उभे राहून ज्या शपथा घेतल्या त्या. माझ्या सासूबाईंनी माझ्या हातात ती नथ दिली होती व ती हातात घेऊन आईजानचा दुवा घ्यायला सांगितला. मुसलमान स्त्रियांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी भीती त्याच वेळी माझ्या मनातून गेली कारण माझ्या नवऱ्याने मी जिवंत असेपर्यंत दुसरा निकाह लावणार नाही ही त्या तैलचित्रासमोर घेतलेली शपथ. तसेच मुलींना शिकवेन ही एक शपथ मला घ्यायला लागली होती. असे मी कधी ऐकले नव्हते ना पाहिले होते. ते माझ्याच आयुष्यात घडते आहे हे बघून मी स्वप्नात तर नाहीना असे मला वाटत होते. तसेच उन्हाळ्यात हिजाब व बुरखा घेण्याची सुट, घरात बुरखा घेण्याची बंदी असे अनेक नवीन नियम मी प्रथमच ऐकले. आमच्या धर्मातील अनेक सण परंपरा पाळताना दिवाळीला दानधर्म करायचा हेही त्यातीलच एक. दिवाळी केव्हा असते हे जाणण्यासाठी खास लाहोरमधून कॅलेंडर आणले जाते.

आमच्या घराण्यात येणाऱ्या सूनांना या पहिल्या दिवशी काय वाटत असेल याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. बाहेरील कर्मठ वातावरणाच्या तुलनेत आमच्यासाठी हा स्वर्ग होता. जन्नत ! शिवाय घरात आल्याआल्या आमचे शिक्षणही सुरु झाले. त्यात येणाऱ्या आमदानीचा हिशेब ठेवणे शिकावे लागे. माझी सासू सांगायची हे सर्व आईजानमूळे झाले नाहीतर अफगाण घरात स्त्रियांना नौकरानीपेक्षा जास्त महत्व नव्हते. हेच वळण आमच्या जमातीतील इतर घरातही पसरले.

आईजानवर सगळ्यात जास्त टिका झाली होती जेव्हा तिने पेशावरहून एक इंग्रजी येणारा पंडीत आणून सगळ्यांनी इंग्रजी शिकावे हा हट्ट धरला तेव्हा. या प्रकरणात न्याय करण्यास जिर्गा बसणार ही बातमी म्हणे अहमदशाहबाबापर्यंत पोहोचल्यावर त्याने जिर्गा बसली होती तेथे निरोप घेऊन एक स्वार पाठवला होता. त्याने आणलेला निरोप ऐकून तेथे बरीच पळापळ झाली होती म्हणे. असो. त्यानंतर मात्र बाम्झाईंच्या वाटेस कोणी गेले नाही.

आईजानच्या ज्या काही आठवणी येथे काढल्या जातात त्यावरुन ती बाई एक बंडखोर, बगावत करणारी वाटायची व तरुणपणी आम्ही सर्व मुली आमच्या आमच्या परीने तिचा आदर्श समोर ठेऊन बंडखोरी करायचो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाम्झाई जमातीत स्त्री पुरुषांच्या संबंधात एक प्रकारची शिस्त आली ती आईजानमुळेच. हे आम्हीच नाही तर सारे अफगाणिस्थान सांगेल.

कर्मठ तालिबान्यांच्या काळात आमच्या घराण्यातील कर्त्या पुरुषांना या सगळ्याचे म्हणजे घरादाराचे व वसूलांचे रक्षण करताना किती रक्त सांडावे लागले याचा हिशेबच नाही. पण शेवटी बाम्झाईंनी तग धरला.... आज अब्दाल्लींपेक्षाही आम्ही जास्त ताकदवान झालो आहोत त्याचे सगळे श्रेय आईजानलाच जाते......कारण त्यांनी शिक्षणाची कास धरल्यामुळे हे दिवस आज आम्हाला दिसताएत..

हे तैलचित्र पाहिल्यानंतर आम्ही समोरच्या दिवाणखान्यात गेलो. तेथे तेवढ्याच आकाराचे आईजानचे मुसलमानी पोषाखातील तैलचित्र लावले होते. ते बघून सगळे चाट पडले. खरे सांगायचे तर या पोषाखात त्या खूपच सुंदर दिसत होत्या तर हिंदूस्थानीत त्या शांत भासत होत्या. या छायाचित्रासमोरची पेटी, पेटी कसली ती एक छोटा पेटाराच होता तो, उघडली. त्यात दागिन्यांचा खच पडला होता. पण पाहुण्यांना त्या काळ्या मण्यात जेवढा रस वाटत होता तेवढा यात वाटला नाही....
शेवटी आम्ही परत पहिल्या दिवाणखान्यात आलो. तेथे इस्माईलने एका पेटीतून अनेक कागदपत्रे काढली. व आर्यच्या बाबांच्या हातात दिली. ती उलगडताना त्याचे काही तुकडे पडले..

‘इस्माईल मला वाटते या कागदाना असे हाताळायला नको. तू एकदाच यांच्या प्रती काढून आण म्हणजे त्याचा अभ्यास करता येइल.’’

‘ठीक आहे मी उद्याच कार्यालयातील मशीनवर याच्या प्रती काढायला सांगतो’’

‘पण त्या वेळी त्या पांढऱ्या कागदावर ठेऊन काढायला सांग म्हणजे मागची अक्षरे त्यावर उमटणार नाहीत’’.
हे बोलताना त्यांनी शेवटचे पान उलगडाले त्यात मोडीत लिहिलेल्या मजकुराखाली ‘लेखन सीमा’’ व सही अगदी ठळकपणे दिसत होती.....

"।। लेखनसीमा ।।

सिताबाईसदाशिवभानू ...............

‘‘आम्ही ही भानू आहोत व आमचेही बरेच पूर्वज पानिपतावर गारद झाले आहेत. त्यांच्या समाध्या अजूनही आमच्या गावात म्हणजे वेळासमधे आम्ही जपल्या आहे. आता त्यातील कुठल्या भानूंची ही कन्या किंवा पत्नी आहे हे शोधायला लागेल. बघुया तिच्या लिखाणातून काही हाती लागते आहे का ते....‘‘

हे ऐकल्यावर मात्र वलिखानचा चेहरा उजळला. का भास झाला मला.....

संध्याकाळी पाहुण्यांचा निरोप घेताना डोळ्यात पाणी आले. दोनच दिवसांची आमची ओळख पण असे वाटत होते की आमची युगायुगाची ओळख आहे.....युगाची नसेल पण आईजानमुळे मला वाटते आम्ही दोनशे वर्षापूर्वीच जोडले गेलो आहोत. सगळ्यांच्या मनात याच भावना उचंबळून आल्या असणार. शेवटी त्यांचे आणि आमचे गाव एकच आहे ना!

मि. क्रॉकर....
हे सगळे कळल्यावर माझी उत्सुकता फारच ताणली गेली. मी इस्माईलला आमच्या खास डिपार्टमेंटमधे पाठवून त्या सगळ्या कागदपत्रांच्या उत्कृष्ठ प्रती काढून घेतल्या व फिल्मही काढून ठेवायला सांगितली. एक माझ्याकडे ठेवली, एक आर्य व एक इस्माईलकडे. कामाच्या धबडग्यात मला काही त्या कागदांवर नजर टाकण्यास वेळ मिळाला नाही. मी ती फक्त वरवर चाळली. मोडी व उर्दूची सरमिसळ ! बहुदा लोकांना समजू नयेत अशा वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी मोडीत व मातृभाषेत लिहिल्या असाव्यात. मधली अनेक पाने गहाळ झाली होती तर काहींचा फक्त चुराच हाती लागला.

पुढच्याच आठवड्यात माझ्या टेबलावर रजेचे तीन अर्ज येऊन पडले. एक होता आर्यचा व दुसरा इस्माईल व तिसरा होता वलिखानचा. ते हिंदुस्थानात चालले होते. कदाचित वलिखानचा ध्यास पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यांना अजून दीड महिन्याने रजा पाहिजे होती. आर्यचे वडील व इतरजण मात्र पुढच्याच आठवड्यात निघणार होते. कॅरोलिनला सांगून त्यांना एकदा चहासाठी बोलवायला पाहिजे.....

माधव गोविंद भानू (खाजगीवाले)
सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही भारतात परतलो. इतके दिवस भारत न म्हणता हिंदूस्थान म्हणत होतो त्यामुळे जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटले खरे. पण लवकरच आम्ही वेळासला स्थिरस्थावर झालो. दोन दिवसाने मी ते सगळे बाड काढले व प्रत्येक पानावर क्रमांक घालून त्यावर सह्या केल्या व त्याच्या अजून तीन प्रती काढू ठेवल्या. आता माझ्यापुढे प्रश्न उभा होता तो म्हणजे असा माणूस शोधायचा की ज्याला फार्सी, उर्दू व मोडी लिहिता वाचता येते. सोमवारी मी पुण्याला भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट द्यायचे निश्चित केले. दुपारी तेथे गेलो तर तेथे स्मशान शांतता होती व मला माहिती देण्यासही कोणी नव्हते. परत संध्याकाळी परत चक्कर मारली. अधिक चौकशी अंती सी.डी.एस्.एस मधे एक कार्लेकर नावाचे गृहस्थ आहेत ते मदत करु शकतील असे समजले. त्यांना सकाळी फोन केला तर त्यांच्या अगोदर मला पाच जणांशी बोलावे लागले. बऱ्याच मोठ्या हुद्द्यावर दिसताएत कार्लेकर मी मनाशी म्हटले. अखेरीस माझे काय काम आहे कळल्यावर मात्र ते लागलीच भेटायला तयार झाले. आज होता मंगळवार....आम्ही गुरवारी त्यांच्या घरी भेटण्याचे ठरविले.

‘भानूसाहेब त्या कागदांची मूळ प्रत आणू नका. त्याची प्रत आणा’’ कार्लेकर.

‘हो ! हो ! मी म्हणालो व मनातल्या मनात हसलो.

‘कार्लेकरसाहेब आपण असे करुया का ? गुरुवारी आपण रात्री कुठेतरी बाहेरच भेटूया. तेथे चर्चा करु मग मी तुम्हाला ते दप्तर देतो व पुढच्या गुरुवारी परत येतो.’’ मी

‘‘चांगली कल्पना ! ते मोठ्याने हसत म्हणाले ! कुठे भेटूया ? अशा ठिकाणी की जेथे जास्त वर्दळ नसेल ! ठीक आहे कोहीनूर कार्यालयाजवळ प्रेसिडेंटमधे या संध्याकाळी सात वाजता. मी ऑफीसमधून सरळ तेथेच येतो’’

‘ठीक आहे मी पोहोचतो.’’

"हां आणि एक...माझे नाव आहे निनाद. ते साहेब वैगेरे सगळे बंद करुन आपण एकमेकांस नावाने हाका मारुयात. तुम्ही माझ्यापेझा वयाने खूपच मोठे आहात म्हणून मी तुम्हाला माधवराव म्हणेन तुम्ही मात्र मला निनाद म्हणूनच हाक मारायची. चालेल ना ?

गुरुवारी मी जरा लवकरच पोहोचलो व दरवाजा दिसेल असे टेबल पकडले. मला तशी सवयच आहे. दुसरा माणूस तुमच्याकडे जेव्हा चालत येतो तेव्हा त्याचा तुम्ही अभ्यास करु शकता. माझा अनुभव आहे की त्यातील बरेचसे आडाखे बरोबर निघतात. हे जरी कोणाला पटले नाही तरी दुसरा एक फायदा होतोच ! त्या माणसाला असे बघताना तुमच्यातील थोडे अंतर तुम्ही आधीच कमी करुन टाकता. तुमच्या बोलण्यात नाही म्हटले तरीही थोडीशी ओळख डोकावतेच व त्याने समोरचा जरा आपलासा होतोच. बरोबर ७ वाजून पाच मिनिटानी कार्लेकर दरवाजातून आत आले. ते आल्या आल्या मी त्यांना ओळखलेच. तसा त्यांचा फोटो मी एकदा वर्तमानपत्रात पाहिला होता म्हणा. उभा चेहरा, दात किंचितसे पुढे, जाड काड्यांचा चष्मा, मागे वळविलेले थोडेसे कुरळे केस, रुंद जिवणी, रंग रापलेला गोरा, अंगकाठी सडपातळ, अंगात सैलसर उंची शर्ट व थोडेसे उस्फुर्त डोळे.... निश्चितच तेच असणार शंकाच नाही.

"जमणार या माणसाचे आणि आपले जमणार'' मी मनाशी म्हटले.

जवळ आल्यावर मी उठलो व त्यांच्याशी हस्तांदोलन केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लाफ्रॉएग मागविली व आमची चर्चा सुरु झाली. माझी सर्व हकिकत ऐकत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव भराभर बदलत होते, पालटत होते. मला अशी माणसे आवडतात नाहीतर काहीजण मख्ख चेहऱ्याने ऐकतात. मधे मधे ते काही प्रश्र्न विचारत होते व मी उत्तरे देत होतो. अचूक प्रश्र्न व अचूक उत्तरे.....त्यात फार वेळ गेला नाही. रात्रीचे ११ वाजले व मी ते दप्तर त्यांच्या स्वाधीन केले. पुढच्या गुरुवारी येथेच भेटायचे असे ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.......

मीही वेळासला परत आलो.

बुधवारीच कार्लेकरांचा फोन आला.

‘’माधवराव तुमचे काम झाले आहे. उद्या निश्चित या. प्रकरण फारच भारी आहे. तुम्हाला काही सल्लाही द्यायचा आहे. मी सगळ्याचे पॅराग्राफप्रमाणे भाषांतर करुन ठेवले आहे म्हणजे तुम्हाला कशाचे काय भाषांतर आहे हे कळेल.’’

गुरुवारी आमची परत एकदा भेट झाली. परत तेच ठिकाण, तेच मद्यपान, त्याच गप्पा व तेच दोघांच्याही अवडीचे विषय. गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात. नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे. नशिबाने आमच्या नवीन मित्राचे आणि आमचे या बाबतीत अगदी जुळत होते. रात्रीचे ११ वाजले आणि कार्लेकरांनी ते दप्तर माझ्या हातात दिले.
गदगदत्या स्वरात ते म्हणाले, ‘कसे या बाईनी ते सगळे केले असेल ते परमेश्र्वरालाच ठावे !. धन्य तिची !’’

‘‘परत भेट ?’’

‘‘तुम्ही हे सगळे वाचा. पुढच्या गुरुवारी मीच वेळासला ये़ईन. अर्थात तुमची हरकत नसेल तर !

‘‘अहो हरकत कसली ! जरुर या ! मी करतो तुम्हाला फोन !’’

त्याच दरवाजापाशी आम्ही जड अंत:करणाने परत एकदा एकमेकांचा निरोप घेतला.

पहाटे वेळासला पोहोचताना गाडी देवळाशेजारुन गेली आणि त्या सगळ्या समाध्या मला दिसल्या व पानिपताचा अपमान माझ्या उराशी दाटून आला. माझे मन कुठल्यातरी दडपणाखाली गुदमरु लागले. पानिपतात भाग घेतलेल्या एका घराण्याने एका भानूंच्या स्त्रिला पळवून नेली त्या अपमानाने, का पराभवामुळे ? का आता माझा एक रक्ताचा नातेवाईक मुसलमान पठाण आहे म्हणून ? सिताबाईंची चूक होती का ? तिने प्राणत्याग करायला हवा होता.....हे असले जिवन जगण्यापेक्षा....पण मग त्या स्त्रियांना त्या युद्धभुमीवर नेण्याची अक्कल कोणाची ? त्यांना जाब कोण व कसा विचारणार ? विचार करुन माझ्या मेंदूच्या ठिकऱ्या उडायच्याच बाकी होत्या. पण इस्माईलची आठवण येताच माझे मन शांत झाले. या सगळ्यात बिचाऱ्याची किंवा खुदादातची काहीच चूक नव्हती.......झोप येण्याची तर आता शक्यताच नव्हती. इंदिराबाईंना चहाची विनंती केली.

‘चहा मिळेल का दमलेल्या या वाटसरुला एक कपभर ?’

‘काय मेलं बोलणं हे ! कोणी ऐकले तर म्हणेल या माणसाला या घरात काही किंमत आहे का नाही.’

मी हसलो. चहाची वाट बघत मी ते दप्तर उघडले.............पहिल्याच पानावर पाण्याच्या थेंबाने अक्षरे जरा फिसकटली होती. लिहितांना त्यांच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू ठिबकले असतील का ? माझ्या मनात विचार आला......

आणि माधवरावांच्या छातीत एक कळ आली. दरदरुन घाम आला. त्यांना ओरडायचे होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यांना इंदीरेची हाक पुसटशी ऐकू येत होती...त्यांना हळू हळू बोगद्याच्या पलिकडील तीव्र प्रकाश, जणू एक सूर्यच दिसायला लागला....त्यांनी तो पहाण्यासाठी इंदिरेला एक अस्पष्टशी साद घातली आणि तेथेच त्या बाडावर आपले मस्तक श्रांतपणे टेकले.......

क्रमशः
जयंत कुलकर्णी
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

12 Oct 2014 - 7:48 am | विनोद१८

...atta yaatali Natyamayata vaadhu laagaliya, quite interesting.

Ya sunder Lekhmaalebaddal abhar.

विवेकपटाईत's picture

12 Oct 2014 - 8:09 am | विवेकपटाईत

सुंदर लिखाण , वाचतो आहे....

खटपट्या's picture

12 Oct 2014 - 8:27 am | खटपट्या

आता हे एवढे सुंदर चालू आहे आणि…
शेवटच्या इटालिक परिच्छेदाने मला कसंसच वाटू लागले आहे.

अत्रन्गि पाउस's picture

12 Oct 2014 - 8:35 am | अत्रन्गि पाउस

पुढचा भाग संपूर्ण करून मगच टाका....
सतत कुंभक लागतोय वाचतांना ...
.
.
.
.
पण फारच जमलेली आहे भट्टी

अनुप ढेरे's picture

12 Oct 2014 - 9:02 am | अनुप ढेरे

कमाल!

प्रचेतस's picture

12 Oct 2014 - 9:31 am | प्रचेतस

अचाट आणि अफाट.
आताच सर्व भाग वाचून काढले.

अजया's picture

12 Oct 2014 - 10:59 am | अजया

जबरदस्त!पुभाप्र.

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2014 - 11:01 am | पिलीयन रायडर

Every day reading from mobile. Can not read "to be continued" now.. Please kaka.. Patkan pudhache bhag taka...

सविता००१'s picture

12 Oct 2014 - 11:34 am | सविता००१

काका, अफाट लिहिताय.
गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे.
हे खूप आवडले.

बहुगुणी's picture

14 Oct 2014 - 2:18 am | बहुगुणी

सर्वच कथाकथन बांधून ठेवणारं झालं आहे, पण ही शब्दरचना अप्रतिमच!

माधवरावांना काय झालं बुवा?

CDSSचा उल्लेख पाहून गंमत वअटली.

हरकाम्या's picture

12 Oct 2014 - 11:49 am | हरकाम्या

पुढचा भाग लवकर टाका राव. आता जास्त उत्सुकता ताणु नका राव.

शिद's picture

12 Oct 2014 - 12:07 pm | शिद

+१११११

एस's picture

12 Oct 2014 - 12:23 pm | एस

+२२२२२

पैसा's picture

12 Oct 2014 - 5:19 pm | पैसा

किती सुंदर लिहिताय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2014 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

दर लेखामागे मालिका जास्त जास्त उत्कंठावर्धक होत चालली आहे ! *OK*

पुभाप्र !!

इनिगोय's picture

12 Oct 2014 - 9:22 pm | इनिगोय

अरे! अहो... हे काय?

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 Oct 2014 - 9:57 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लैै लै लै भारी.....

अधाशासारखे वाचतिये. आता हे प्रकरण कुठून कुठे पोहोचणार याबद्दल उत्सुकता आहे.

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2014 - 5:50 am | बोका-ए-आझम

अप्रतिम! एकदम उत्कंठावर्धक! क्रमशः हा तर इमोशनल अत्याचारच आहे!

स्वाती दिनेश's picture

13 Oct 2014 - 11:32 am | स्वाती दिनेश

सगळे भाग आत्ता एका बैठकीत वाचले, "पुढे काय"? ची उत्कंठा लागून राहिली आहे..
स्वाती

सौंदाळा's picture

13 Oct 2014 - 1:47 pm | सौंदाळा

वाचतोय.
मधले काही कार्लेकर आणि भानुंच्या गप्पांचे परिच्छेदही खासच