नथ..................भाग-४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Oct 2014 - 8:55 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नथ.......भाग-१
नथ.......भाग-२
नथ.........भा-३

नथ............भाग-४

वलिखान बाम्झाई.......
‘आमच्या धमन्यातून या स्त्रीचे रक्त वाहतेय’ हे वाक्य इस्माईलने म्हटले मात्र तेथे एकच गडबड माजली. सगळे एकदमच बोलण्याचा प्रयत्न करु लागले. मागे बसलेल्या क्रॉकर दांपत्याला काही कळेना. ते सारखे काय झाले ? काय झाले ? हे विचारु लागले. शेवटी थोडी शांतता पसरल्यावर इस्माईलने मला सगळा इतिहास सांगण्यासाठी फर्माविले. रात्र फार झालेली असल्यामुळे मी तो दुसऱ्या दिवशी सांगण्याचा प्रस्ताव मांडला. तेवढ्यात मिसेस आर्यने विचारले,

‘पण या बाईंचा काही ठाव ठिकाणा आहे का ? काही त्यांनी जपलेली कागदपत्रे ? दाग दागिने, ज्यात त्यांचे हिंदुस्थानातील काही नाव गाव सापडेल ?’

‘आहेत ना ! त्यातील जी फार्सीत लिहिली आहेत ती आम्ही वाचू शकलो पण काही अशा भाषेत आहेत की आम्हाला ती कुठली आहेत हेही कळत नाही’.

‘दाखवाल का मला प्लिज ?’

त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या पेटीतील एक जीर्ण कागद काढून त्यांच्या हातात दिला. त्याचे तुकडे पडत आले होते. घडीवर तर तो फाटलाच होता.

‘नीट !’ मी म्हणालो.

‘हं ऽऽऽऽ बाबा यावर मोडीत बरेच काही लिहिले आहे. तुम्हाला येते ना वाचता ?’ मिसेस आर्य.

‘येते पण एवढे नाही’ तिचे वडील म्हणाले.

‘‘ठीक आहे ! ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला उद्या सगळा इतिहास सांगतो. पण आत्ता एवढेच सांगतो की या बाईंचे आमच्यावर अगणित उपकार आहेत आणि आम्ही आत्ता जे काही आहोत त्याला याच बाई कारणीभूत आहेत’’.

सगळे झोपायला निघाल्यावर मि. क्रॉकरने मला बोलावून सांगितले की ते व आर्य उद्या सकाळीच परत जातील पण आर्यचे वडील व इतर येथे थांबतील. त्यांची व्यवस्था नीट बघा व त्यांना पाहिजे तेव्हा त्यांच्या घरी सोडा. आणि आता मला ही या भानगडीत रस निर्माण झाला आहे त्यामुळे सगळ्याचा रिपोर्ट मला करा. अर्थात हे काही आम्हाला सांगायची गरज नव्हतीच....

दुसऱ्या दिवशी बघतो तर सगळेच माझ्या अगोदर उठले होते व जेवणाच्या खोलीत त्या तैलचित्रापुढे ते बघत बसले होते. स्पष्टच होते की ते रात्री झोपले नव्हते. सगळे न्याहारी करुन माझीच वाट बघत होते. आर्य व क्रॉकर दांपत्य न्याहारी करुन जाण्याच्या तयारीत दिसत होते. ते गेल्यावर परत एकदा माझे कथाकथन सुरु होणार होते....

‘हंऽऽऽऽऽकुठपर्यंत आलो होतो मी........मी सुरवात केली.......

या बाईंना आम्ही आईजान म्हणतो....मी हे म्हणताच तेथे परत एकदा गडबड उडाली. आमच्या घराण्यात यांना एखाद्या देवतेचा मान आहे....पण त्या अगोदर तुम्हाला आमच्या घराण्याबद्दल सांगितले पाहिजे....आमच्या घराण्यात वयाने मोठ्या असलेल्या सर्वच स्त्रियांना आई म्हणायचीचे पद्धत आहे. म्हणजे बघा आमच्या आजीला आम्ही सगळे "आईजान" असेच हाका मारतो....

तुम्हाला जर अहमदशहा बाबाचे चरित्र माहीत असेल तर तुम्हाला आठवत असेल की अहमदशहा बाबा म्हणजे तुमच्या अब्दाल्लीला, लहानपणी एका अल्झाई टोळीच्या प्रमुखाकडे सांभाळायला ठेवले होते. लढायांची धामधूम चालली होती. या टोळीचा प्रमुख होता हाजी इस्माईलखान अल्झाई. याची मुलगी दिली होती बाम्झाई टोळीतील एका वलिखान नावाच्या सरदाराला. हा वलिखान पुढे अब्दाल्लीचा अश्रफ-अल-वुरुन म्हणजे पंतप्रधान झाला. या वलिखानचा धाकटा भाऊ आमच्या घराण्याचा मूळ पुरुष म्हणायला हरकत नाही. त्याचे नाव होते खुदादाद बाम्झाई.

खुदादाद बाम्झाई स्वत: अत्यंत देखणा, शूर, व कवीमनाचा होता. त्याला आवडणारी कविता आमच्या झेंड्यावर अजूनही तुम्हाला वाचता येते. ही लिहिली नवव्या शतकात श्रेष्ठ कवी हंझाला बडघीस याने-

‘‘काय आहे ती ?’’ आर्यच्या वडिलांनी विचारले.

‘त्याचा अर्थ सांगतो .... ’’ मी म्हणालो.

तुझे सिंहासन असेल सिंहाच्या जबड्यात
असू देत. जा ते हिसकावून आण......

अब्दाल्लीने हिंदूस्थानावर अनेक स्वाऱ्या केल्या. अंदाजे ६ तरी केल्या असतील. त्यातील तुम्हाला फक्त एकच माहिती आहे ती म्हणजे पानीपतची लढाई. या लढाईत बाम्झाई जमातीचे सर्व सरदार व योद्धे सामील झाले होते. त्या युद्धाबद्दल मी आता सांगत बसत नाही कारण तुम्ही मराठे आहात व तुम्हाला ते सगळे माहीत असेलच. तुम्ही मराठा आहात हे आम्हाला कसे कळले असे तुम्ही मला विचाराल पण येथे आमच्यापासून काही लपून रहात नाही. आर्यचे आडनाव कँपबेल असले तरी त्याच्या नावावरुन आम्हाला त्याच्या हिंदूस्थानी वंशाची कल्पना आलीच होती. इस्माईलने वॉशिंग्टनमधून त्याची माहीती काढल्यावर त्याची आई मराठा ब्राह्मण आहे हे कळाले. ते निश्चित झाल्यावर ‘आईजानच्या जन्मस्थानाचा पत्ता काढण्याची आम्ही प्रतिज्ञाच केली’. मला स्वत:ला आमच्या जमातीचे आजोळ कुठले आहे हे शोधून काढायचा ध्यासच लागला म्हणाना ! इस्माईलनेही मला या कामी सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले मग सुरु झाली आमची धडपड....पण ते जाऊ देत...

ही सगळी माहिती आमच्या घराण्यात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत चालत आली आहे. पानिपतच्या कटू आठवणी आपण काढायला नकोत. त्याने सर्वांनाच त्रास होईल. तर युद्धानंतर जी लुटालुट झाली त्यात स्त्रियांचे सगळ्यात जास्त हाल झाले. रोहिल्यांनी नाजूक सुंदर बायकांना फरफटवत रस्त्यावरुन धिंड काढत चालविले. अत्याचारांनी तर सीमा गाठली. हे सगळे झाल्यावर त्या सुंदर स्त्रियांना बाजारात उभे करुन त्यांचा लिलाव करण्यात आला. कित्येक स्त्रिया १० रुपायाला एक या भावात विकल्या गेल्या. हजारो स्त्रियांनी प्रणत्याग केला, विहिरीत उड्या मारल्या. जे श्रीमंत सरदार होते त्यांनी स्वत:च्या बायकांना लिलावात परत विकत घेतले, पण जे रणांगणात ठार झाले होते त्यांच्या स्त्रियांकडे बघण्यास कोणाला वेळ नव्हता. अशाच एका लिलावात रोहिल्यांची एक झुंड एका स्त्रीची बेअब्रू करत तिला ओढत चालले असताना खुदादादच्या नजरेस पडले. तरवारीच्या पहिल्याच घावात दोन रोहिल्यांची मुंडकी उडाल्यावर उरलेले पळत सुटले. त्या स्त्रीला पहाताच क्षणी खुदादादच्या मनात तिचे सुंदर डोळे भरले....त्याने तिला तसेच घोड्यावर घेतले व त्याच्या तंबूत घेऊन गेला....ही ती आमची आईजान....नंतर काबूलपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यात काय घडले, काय चर्चा झाली हे ज्ञात नाही, परंतू बाईंनी खुदादादबरोबर काही अटींवर संसार थाटण्याचे ठरविले असणार...नाहीतर आमचा वंश पुढे वाढता ना !

तुम्हाला वाटेल अशा अनेक स्त्रिया अफगाणिस्थानमधे आल्या असतील त्यात काय एवढे विशेष ? पण अफगाणिस्थानात फार कमी मराठा स्त्रिया आल्या. बहुसंख्य रोहिल्यांनी पळविल्या किंवा मारुन टाकल्या. ज्या एकदोन येथे आल्या त्यातील आमची आईजान फार म्हणजे फारच कर्तबगार निघाली. इतकी की तिने बाम्झाईंनाच बदलून टाकले. त्यांना लिहिता वाचता येत होते, त्यांची चित्रकला उत्कृष्ट होती. जात्याच हुषार असल्यामुळे त्या पश्तूही व फार्सी उत्कृष्ठ बोलू व लिहू शकत. अफगाणिस्थानमधे स्त्रिया दोन ओळींच्या कविता लिहितात किंवा रचतात. या कवितांमधे स्त्रियांची दु:खे, वेदना मांडल्या जातात. त्यांच्या कविता अफगाणिस्तानभर प्रसिद्ध आहेत. अर्थात त्या अनेकांनी आता स्वत:च्या नावावर खपविल्या आहेत ती गोष्ट वेगळी.

आईजानला प्रथम बराच त्रास झाला असणारच व विरोधही झाला. तिचे वय अफगाणीस्थानमधे आली तेव्हा अंदाजे २२/२३ असेल. पण खुदादाद स्वत: त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा होता. शिवाय वलिखानच्या बेगमेची ही मुलगी फार म्हणजे फार लाडकी होती. (वलिखानची बेगम म्हणजे ज्यांच्या माहेराने अब्दाल्लीला सांभाळायची जबाबदारी पार पाडली होती). थोडक्यात बाईंना अब्दाल्लीचे अप्रत्यक्ष अभय होते म्हटले तरी चालेल. असे म्हणतात ही एकच स्त्री आमच्या जमातीत होती की जी नवऱ्याबरोबर अफगाणिस्थानच्या उजाड माळरानांवर घोड्यावरुन रपेट मारायची. त्या उत्कृष्ठ भाला फेकत. काय काय सांगू......आमचे पणजोबा सांगायचे त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता तो म्हणजे लहान मुलांवर त्यांनी केलेले संस्कार व त्यांना वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट...हे असले काही आमच्या जमातीत कोणी पाहिले नव्हते. आमच्याच काय आख्ख्या अफगाणिस्थानमधे कोणी पाहिले असेल की नाही त्याची शंकाच आहे.....

हे त्यांचे तैलचित्र खुद्द खुदादाद खान यांनीच बनवून घेतले आहे. दुसरेही एक आमच्या जमातीच्या पारंपारीक पोषाखात आहे...ते या हॉलच्या बरोबर विरुद्ध असलेल्या खोलीत आहे. तेथे त्यांच्या इथे आल्यावर जमा झालेल्या आठवणी ठेवल्या आहे.
‘‘तुम्हाला त्याही बघायच्या असतील तर त्याही आपण बघूच...’’

‘पण कोण होत्या त्या ? काही नावाचा पत्ता ?’ आर्यच्या सासऱ्यांनी विचारले.

‘’बाबा, तेच तर आम्हाला शोधून काढायचे आहे. काही कागदपत्रे आहेत ती मी तुम्हाला जेवणानंतर दाखवेन.’’

‘आणि ती नथ ?’’

‘‘ती नथ आणि काही दागिने त्यांनी स्वत:बरोबर आणले होते तर बाकी सगळे येथेच केले आहेत. तेही मी तुम्हाला दाखवेन ’’.

कोणाची जेवण्यासाठी उठण्याची तयारी दिसली नाही. मग मात्र इस्माईलच्या पत्नीने सर्वांना आग्रह करुन उठविलेच. आर्यचे बाबा मात्र एकटक कुठेतरी पहात लोडाला टेकले होते. त्यांची बहुदा विचारांची तंद्री लागली होती..... मी त्यांच्या खांद्याला हळूच स्पर्ष केला..ते दचकले व एकदम म्हणले,

‘‘त्यात वेळासचा उल्लेख आहे का कुठे ?’’.........

जेवणे झाल्यावर परत एकदा आम्ही त्या वस्तू पाहण्यास घेतल्या. आर्यच्या वडिलांनी एक भिंग मागून घेतले व ते त्या कागदाचा अभ्यास करण्यात रंगून गेले. मधेच स्वत:शीच काहीतरी पुटपुटत होते. समस्त स्त्रीवर्ग आईंचे दागिने पाहत होते. आर्यची सासू तर ती काळ्या मण्यांची माळ बघत असताना चक्क रडत होती. इतर बायकांचेही चेहेरे गंभीर झाले होते. त्या त्यांच्या भाषेत काहीतरी बोलत होत्या व परत रडत होत्या...

‘‘काय झाले ? मी मिसेस आर्यला विचारले...

‘ती म्हणतीये, काय झाले असेल या बाईचे त्यावेळी ? इकडे आल्यावर तिला तिकडची आठवण आली असेल का ? माहेर नसल्यामुळे ती कोणाच्या खांद्यावर डोके ठेऊन रडली असेल.....’’

त्यांना सांगा ‘‘वलिखानचे घर हे तिचे माहेर होते आणि अफगाणिस्थानमधे तिच्या माहेराला व त्या घरातील माणसांना एखाद्या सम्राटाचा मान होता....कारण वलिखानच्या सासुरवाडीने अब्दाल्लीचा सांभाळ केला होता. वलिखान व त्यांची बेगम यांनीच त्यांचा निकाह लावून दिला. तेच तिचे आई वडील असे समजा.’’

अफगाणिस्थानमधे नानावटी नावाचा एक प्रकार असतो. एखाद्याने एखाद्याच्या घरात आसरा घेतला की त्याचे प्राणपणाने संरक्षण केले जाते. मग घरात आश्रय मागणारा शत्रू असला तरीही. बाई वलिखानच्या घरात नानावटी होत्या असे म्हटले म्हणजे त्यात सर्व काही आले. अर्थात नानावटी हा प्रकार अफगाण स्त्रियांच्या बाबतीत नसतो पण मी उदाहरण म्हणून सांगितले.

‘‘ही बाई तालेवार घराण्यातील दिसते....एवढे दाग दागिने म्हणजे...’’ आर्यची आई म्हणाली....
तेवढ्यात आर्यचे सासरे मोठ्यांने जवळजवळ किंचाळलेच

‘‘वेळास ! वेळास ! माझी शंका खरी ठरली.....मानसी, इंदिरे येथे वेळासचा उल्लेख आहे.... अस्पष्ट आहे, पण आहे......आणि येथे त्यांचे नावही दिसते आहे.....

‘‘सिताबाई सदाशिव’’

मला काही समजेना..."वेळास वेळास' म्हणजे काय ................आईचे मूळ नाव सिताबाई होते हे आम्हाला माहीत होते.
त्यांचे अफगाणिस्तानमधील नाव होते ‘‘अनाहिताबेगम‘‘ अनाहिता म्हणजे पाणी, नदी, सागराची देवता......

खुदादाद खान त्यांना ‘‘असलबीबी’’ म्हणूनही हाक मारायचे म्हणे...असल म्हणजे मध...
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

11 Oct 2014 - 9:11 am | अत्रन्गि पाउस

अप्रतिम ... vachtoy

काय प्रतिक्रीया द्यावी ?

तुषार काळभोर's picture

11 Oct 2014 - 9:44 am | तुषार काळभोर

भारी!!

काका आता पुढचा भाग येईपर्यंत मला झोप येणार नाही.
यावर एक सुंदर चित्रपट होऊ शकतो.

टवाळ कार्टा's picture

11 Oct 2014 - 10:43 am | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११

महेश मांजरेकरांना नेऊन द्या हे

अर्धवटराव's picture

11 Oct 2014 - 9:58 am | अर्धवटराव

पण काळ भी गोल है म्हणायचं का?

जयंतराव, दंडवत स्विकारा.
__/\__

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2014 - 10:28 am | पिवळा डांबिस

इतकीच दाद या भागाला देऊ शकतो!!
पुढला भाग टाका म्हणजे अजून दाद देईन!
:)
(या क्रमशः वाल्यांना कोणीतरी हाणा रे!!!!)
;)

राजाभाउ's picture

11 Oct 2014 - 11:37 am | राजाभाउ

जबरदस्त !!!

पुढचा भाग टाका हो लवकर

समिक्शा's picture

11 Oct 2014 - 12:10 pm | समिक्शा

सुंदर

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Oct 2014 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

सस्नेह's picture

11 Oct 2014 - 3:50 pm | सस्नेह

जबरी !
सर्वात हा भाग उत्कंठावर्धक आहे

बॅटमॅन's picture

11 Oct 2014 - 4:45 pm | बॅटमॅन

अंदाज आला होता याचा पण लिहिलेय लैच भारी. मान गये!!!!

प्यारे१'s picture

11 Oct 2014 - 5:33 pm | प्यारे१

अधिकाधिक उत्कंठावर्धक होत चाललीये कथा!

हरकाम्या's picture

11 Oct 2014 - 5:41 pm | हरकाम्या

श्री.पिवळा डाम्बिस यान्च्या मताशी मी सहमत आहे. असे क्रमशः लिखाण करुन उगीच उत्सुकता ताणुन ठेवतात
लेकाचे.

बहुगुणी's picture

11 Oct 2014 - 6:14 pm | बहुगुणी

शिकवता शिकवता कथाकथनाची सुंदर हातोटी!

विनोद१८'s picture

11 Oct 2014 - 6:15 pm | विनोद१८

.... :secret:

अनुप ढेरे's picture

11 Oct 2014 - 6:56 pm | अनुप ढेरे

भारी!

कौशी's picture

11 Oct 2014 - 7:10 pm | कौशी

प्रत्येक भाग अप्रतिम!!

रेवती's picture

11 Oct 2014 - 7:18 pm | रेवती

छानच लिहिलयत!

अजया's picture

11 Oct 2014 - 7:35 pm | अजया

लवकर टाका पुढचा भाग!!

आदूबाळ's picture

11 Oct 2014 - 8:03 pm | आदूबाळ

ये बात! आवडतंय.

आता याचा धागा अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीशी जोडला की तेही वर्तुळ पूर्ण होईल.

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 11:05 pm | मुक्त विहारि

आवडला...

पुभाप्र...

अतिशय जबरी झाला आहे हा भाग देखील. उत्कंठा शिगेला पोचली आहे की आता पुढे काय होणार?

पु.भा.प्र.

सविता००१'s picture

12 Oct 2014 - 11:26 am | सविता००१

पुभाप्र