नथ..........भाग-३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 5:53 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नथ.......भाग-१
नथ.......भाग-२

नथ..........भाग-३
सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले)
दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते. शिवाय मानसीचे रडणेही मी पाहिले होते. मी पहिल्यांदा ‘‘दिवाळीला कशाला काबूलला जावे लागते ? त्यांनाच येथे बोलावून घ्या’’ असे सांगून ते प्रकरण रद्द करण्याचा बराच प्रयत्न केला पण अमेरिकेहून अँगस- आम्ही सगळे त्यांना सिनियर अँगस म्हणतो व मुलगी-सरिता येणार आहे हे कळल्यावर माझा विचार हळुहळु बदलला. ह्यांना ते तसे होणार याची खात्रीच होती. मुलीची गाठ पडून बरीच वर्षे झाली होती... आईचे ह्रदय..तिची भेट होणार या आनंदाने एवढा धोका पत्करण्यास माझे मन तयार झाले असावे बहुदा.

एकदा ठरल्यावर मग मात्र तयारीची गडबड उडाली. फराळाचे काय घेऊन जायचे, काय अगोदर कुरियरने पाठवायचे, याच्या याद्या तयार हो़ऊ लागल्या. विमानाची माझी भिती आता सरली होती पण काबूलची भिती मात्र मनात कायम होती.
इथून मुंबई. मुंबईहून दिल्लीला व दिल्लीहून साफि का काफी एअरलाईन्सने काबूलला जावे लागणार होते. काबूलला विमान दुपारी चारला उतरणार. उतरल्या उतरल्या आम्हाला घ्यायला गाड्या येणार होत्या आणि मग म्हणे लगेच घरी न जाता एम्बसीच्या दवाखान्यात जावे लागणार होते.

‘आता गेल्यागेल्या दवाखान्यात कशाला ? इथे कोणाला कसली धाड भरली आहे मेली? ’ मी करवदले.

‘बर आता तुम्हाला आत्ताच सांगतो. तेथे डॉक्टर आपल्या अंगावर ट्रॅकर चिकटवणार आहेत्. म्हणजे आपले गोल बँडएड असते ना तसलीच पण खुपच छोटी कातड्याच्या रंगाची चकती असते. ती मांड्यांच्या आतील बाजूस चिकटवतात व त्यावर कसलासा स्प्रे मारतात. त्याने ती पडत नाही.’

‘‘आणि अंघोळ ?’’

’’त्यावरुन अंघोळ केली तरी चालते’’

‘‘हे कशाला ट्रॅकर का फॅकर म्हणे ?’’

‘‘अग याने आपण जेथे जाऊ ते ठिकाण मुख्यालयात समजते. ’’

‘‘मी म्हणते कशाला पाहिजे हे काबूल.....

‘‘झाल का सुरु तुमचं.......तुला यायचे नसेल तर येऊ नकोस बाई’’ हे वैतागून म्हणाले. मग मात्र माझे ते टुमणे मी बंद केले व निमुटपणे तयारीला लागले.

खरे तर यांनाही यावेळी जायचे नव्हते. त्यांचे कासवांवर कसलेसे संशोधन चालू आहे ना.....

आम्ही काबूलला जाणार म्हटल्यावर आम्हाला भेटण्यास येणाऱ्यांची घरी रीघ लागली. अर्थात काबूलला कोणी जाऊन आलेले नसल्यामुळे सल्ले जरा कमी मिळत होते नाहीतर अमेरिकेवारीवेळी इतके सल्ले मिळाले होते की मी कमीतकमी दहावेळा तरी सामान परत परत भरले होते.

‘‘इंदिराबाई, जाण्याअगोदर सतीचे दर्शन घेण्यास विसरु नका म्हणजे झाले’’
शेजारच्या काकूंनी आठवण दिली. आमच्या गावात सगळे पटवर्धन किंवा भानू किंवा खाजगीवाले. त्या सगळ्या घरांच्या पूर्वजांच्या समाध्या एका ठिकाणी होत्या व त्यांचे गावाला जाताना दर्शन घेण्याची पद्धत गावात पडली होती. पुरुषांनी समाध्यांचे व बायकांनी सतीवृंदावनांचे. नानाच्या बागेकडे अर्धातास चालले की एक शंकराचे देऊळ लागते. त्याच्याच आवारात छोटी छोटी देवळे व या समाध्या आहेत. थोरल्यापातींच्या मोठ्या समाध्या व वृंदावने आहेत. त्यांच्यावर मेघडंबऱ्या बांधलेल्या आहेत, तर इतर गावकऱ्यांच्या साध्या, तुळशीवृंदावनासारख्या आहेत. पण या आकाशाखाली असलेल्या शेवाळलेल्या समाध्यांवर डेरेदार वृक्षांनी छाया धरली आहे. शेजारी नदी संथपणे वहाते. तिरावरील समाध्यांचे तिला काय ? या जागेत खूपच शांत व गार असते. उन्हाळ्यात घरातील कामे संपल्यावर बायका गप्पांसाठी येथेच जमतात.
काही समाध्यांवर नावेही कोरली होती. पण ती आता बुजली आहेत. कोणाला वेळ आहे हल्ली मेलेल्यांसाठी ? येथे जिवंत माणसांसाठी कोणाला वेळ नाही....मी मनाशीच त्रागा केला. हे उघड बोलण्याची चोरी होती. लगेचच मी हे सरिताला उद्देशून बोलते आहे असा माझ्यावर आरोप झाला असता व पुन्हा वाद......

नकोच ते.........

पहाटेच उठले. आज मुंबईला जाण्यासाठी निघायचे. खालच्या आळीतील यमीला बरोबर घेतले व पहाटेच देवळाची वाट धरली. यमी म्हणजे भानूच पण बिचाऱ्यांच्या घरची गरीबी होती. त्यांचे खानदानच यजमानांकडे पुजाअर्चा करुन पोट भरायचे. आमच्याकडेही तिचेच वडील यायचे पुजेला. पण गावात त्यात कमीपणा वाटत नसे व लोकही सगळ्यांना मानाने वागवित.
शंकराचे दर्शन घेतल्यावर आम्ही वृंदावनांपाशी आलो.

‘काकू... हे वृंदावन कोणाचे आहे ते कळत नाही पण बाबा म्हणत होते आमच्या घरातील कोणाचे तरी आहे. पण आमच्या घराण्यात कोणीही सती गेली नाही तरी तिची समाधी बांधली गेली. हे कसे काय ?’ यमू म्हणाली.

‘जाऊ देत ग त्या जुन्या गोष्टी. चल लवकर आटप. मला आधिच उशीर होतोय..मी तिला गप्प केले व लगबगीने घरी परतले.......

विमानात बसल्यावर मात्र मला त्या समाध्यांची व नदीची सारखी आठवण येत होती.........मला त्या आठवणींनी डोळ्यात पाणी तरळल्याचा भासही झाला....खिडकीतून बाहेर बघण्याच्या निमित्ताने मी माझे डोळे टिपले खरे,

....... पण मन उदास झाले ते झालेच..........

यमू श्रीधर भानू....
गावात तालेवारांची घरे बरीच आहेत. आम्हीही भानूच मग आम्हीच एवढे गरीब का हा प्रश्न मला व दादाला नेहमीच पडतो. विशेषत: दिवाळीत. आम्हाला मुष्किलीने एखादा नवीन कपडा मिळतो तर काकूंच्याघरी कपड्यांचा ढीग पडलेला असतो.

आमची वाडीही छोटी, विहीर नसलेली. पण समुद्राच्या किनारी होती. तेथेच बाबांनी दोन खोल्या बांधल्या होत्या. दिवाळीच्या सुट्टीत कोणी रहायला आले तर तेचढेच दोन पैसे सुटायचे आम्हाला. पण इतर काळात संध्याकाळी समुद्राकाठी बसण्यात मला फार मजा येते....हे गाव सोडू शकेन का मी....का येथेच असेच दारिद्र्यात पिचायचे असे विचार माझ्या मनात नेहमीच यायचे. मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते पण बाबा म्हणायचे, ‘‘यमे तू खूप हुशार आहेस हे मान्य ! पण पैसे कुठून आणणार हा तुझा बाप ?’’ तेही खरेच होते म्हणा ! मी ती परिस्थिती स्वीकारली होती. दादाही बाबांना मदत करायचा त्यामुळे त्याला तर शाळेत जाण्यासही वेळ मिळत नसे. असे रडत खडत आमचे आयुष्य चालले होते.

पण तरुणपणी लोकांच्या श्रीमंतीचा राग सगळ्यांनाच येतो आणि तो कशावरतरी काढला जातो....पैसे नाहीत तर त्याची जागा दुसऱ्या कशाने तरी भरुन काढली जाते. मीही वेडी त्याला अपवाद नव्हते. आमच्या घराण्यातील एकमेव कोपऱ्यातील वाळीत टाकलेले सती वृंदावन मी असे चकचकीत ठेवले होते की पाहुणे जेव्हा दर्शनाला येत, तेव्हा त्यांची पावले त्याच वृंदावनाकडे वळत. कालच मला त्यावरील मागच्या बाजूचे नाव शेवाळ्याने बुजलेले दिसले. म्हणजे ती पुढची बाजू होती तर !
मानसीताईसारखे माझे लग्न परदेशात झाले तर किती बरे होईल ! दिसायला एखाद्या नटीपेक्षाही सुंदर आहे म्हणे मी.....पण या पांढऱ्या डागांमुळे तीही शक्यता मावळलीच आहे. येथे लग्न होणेच कठीण.....

एकदा तारेच्या ब्रशने ते वृंदावन चांगले खरवडून काढायला पाहिजे..........

त्याच ब्रशने अंगावरील हे डाग खरवडून काढता येतील का ..........

माधव गोविंद भानू (खाजगीवाले)
एकदाचे आम्ही पोहोचलो काबूलला. सगळे सोपस्कार पार पडल्यावर आम्ही आर्यच्या घरात आमचे बस्तान टाकले एकदाचे. तो पर्यंत संध्याकाळचे ७ वाजले होते. बाहेर हवा छान होती. आत मी व जावईबापू मस्तपैकी व्हिस्कीचे घोट घेत गप्पा मारत बसलो होतो. ती धुराचा वास येणारी व्हिस्की मला फार आवडते. अँगसने ती अमेरिकेहून खास माझ्यासाठी आणली होती. आई-मुलगी-सून यांच्या गप्पांना उत आला होता. पणतू मधे मधे सगळीकडे लुडबुड करत मजेत बागडत होता. झकासपैकी जेऊन आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी ताणून दिली.

दुसऱ्या दिवशी आर्य कार्यालयातून घरी आला तेच एक बातमी घेऊन.

‘बाबा आपल्याला पाडव्याला आमच्या दुतावासातील इस्माईल बाम्झाईकडे जेवायला जायचे आहे. त्याचे वडील बाम्झाई टोळीचे प्रमुख आहेत. खुर्द काबूलमधे त्यांची मोठी हवेली आहे. बराच जमीनजुमला, गाड्या घोडे, कार्स आहेत त्याच्याकडे. बरेच मोठे प्रस्थ आहे काबूलमधले’

‘मग तुझ्या हाताखाली कशाला काम करतो आहे तो ?’ आस्मादिक. संशयाने !

‘मलाही माहीत नव्हते पण मि. क्रॉकर यांनी मला आज बोलावून घेतले होते व इस्माईलने आमंत्रण दिल्यास त्याच्याकडे जायला हरकत नाही हे स्पष्ट सांगितले. कदाचित तेही येतील. ती आख्खी जमात आमच्यासाठी काम करते म्हणे आणि हे दोघे भाऊ त्यांचे आमच्या एम्बसीमधील वकीलच आहेत म्हणाना.....

‘अरे पण !’’

‘‘हे बघा बाबा, गेले महिनाभर तो माझ्या मागे लागला आहे. आणि आता तर साहेबांनी सांगितले आहे म्हणजे मला तर जावेच लागेल. मी, डॅड व आईतर जाणारच आहोत. तुम्हीव आजीही चला. जरा वेगळा अनुभव ! काय ?

मी क्षणभर विचार केला ‘घरी बसून तरी काय करणार ?’ जरा वेगळा अनुभव तर घेऊ.

‘ठीक आहे मीपण येतो’.

‘त्याने मला त्यांच्या हवेलीचा एक जुना फोटोही दिलाय. हा बघा.....त्याच्या बाह्यावतारावरुन जाऊ नका. आतून तो फारच आलिशान आहे म्हणे.

''त्यांच्याकडे काही फराळाचे घेऊन जायचे आहे का ? आत्ताच सांग बाबा. ऐनवेळी गडबड नको’’ इति सौ. ते ऐकल्यावर हॉलमधे हास्याचा फवारा उडाला.

‘‘आई काहीतरीच हं तुझं’’ कन्या. मानसी तर खो खो हसायलाच लागली.

‘‘हसू नका ! आजी तुझे बरोबर आहे. इस्माईलने लाडू व करंज्या आठवणीने आणायला सांगितल्या आहेत.

‘त्याला मेल्याला रे काय माहीत लाडू ?’’

‘‘अगं आमच्या गप्पातूनच ! तू चल तर घेऊन...नाही दिले तर परत आणू त्यात काय एवढे ?’’

दिवाळीला आठवडा राहिला होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही सर्वच जण इस्माईलकडे जायच्या दिवसाची उत्सुकतेने वाट पहात होतो. त्याच्या घरी कोण कोण आहे याची माहिती आर्यने आधिच विचारुन घेतली होती. त्यांचे एकत्र कुटुंब होते. हे दोघे भाऊ त्यांच्या बायका, वडील आई व दोन चुलत भाऊ व त्यांचे कुटुंबीय असा मोठा खाटला होता.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्या हवेलीच्या रस्त्यांवर अमेरिकन मरीन्सच्या चौक्या होत्या त्यामुळे सगळे अगदी निवांत होते. मरीन्स हा एक वेगळाच प्रकार असतो. त्याची एक घडलेली गंमत मी नंतर सांगेन.....नको... आता विषय निघालाच आहे तर सांगतोच. आमच्या बंगल्यासमोरच मरीन्सची एक चौकी होती. एकदा मी त्या सैनिकासमोरुन दोनदा गेलो पण त्याने एकदाही मला हाय् केले नाही. घरात आल्यावर मी आर्यला म्हटले सुद्धा ‘’त्याने काय ड्रग्ज वैगेरे घेतले आहेत की काय ! माझ्याकडे पहात होता पण डोळ्यात काही भावच नव्हते.....’’

‘चला दाखवा पाहू मला‘‘ मी दाखविल्यावर आर्यने मला माहिती पुरविली‘ अहो बाबा तो झोपलाय !’’ मरीन्सला डोळे उघडे ठेऊन झोपण्याची कला अवगत असते’’

‘असेल बुवा ! मी म्हटले....

मानसी आर्य कँपबेल..........
अखेरीस इस्माईलकडे जाण्याचा रविवार उगवला. सकाळपासूनच आमची गडबड उडाली होती. आर्य मला येऊच नको म्हणत होता पण मी हट्टच धरला.

‘एका अटीवर’’ आर्य म्हणाला.

‘’सांग’’ मी

’’तू बुरखा घालून ये !’’ डोळे मिचकावत आर्य माझी चेष्टा करत होता.

दूपारपर्यंत सगळे तयार झाले. मी, सासूबाईंनी व आजीने ठेवणीतील साड्या नेसल्या, ठेवणीतील दागिने घातले. गाड्या आल्या. त्यात फराळाचे डबे न विसरता ठेवले व निघालो.

साधारणत: संध्याकाळी सहा वाजता आम्ही खुर्दकाबूलला इस्माईलच्या हवेलीवर पोहोचलो. त्या हवेलीचे फाटके तुटके चित्र आम्ही सर्वांनीच पाहिले होते पण ती हवेली प्रत्यक्ष पहाताना छाती दडपून जात होती. चित्रात पाहिल्याप्रमाणे त्या हवेलीचा पुढचा भाग जवळजवळ ढासळला होता. पण मुख्य दरवाजा अजूनही शाबूत होता. त्या अवाढव्य दरवाज्यावर फार्सीत काहीतरी कोरले होते. उजव्या बाजूला गणपतीचे अर्धवट कोरलेले शिल्प दिसत होते. त्याचे काही आम्हाला नवल वाटले नाही. असे अनेक वाडे काबूलमधे आहेत ज्यात जून्या देवळांची लाकडे वापरली आहेत्. पण बाबांना ते पाहून फार मनस्ताप झाला असणार. त्यांचा पडलेला चेहराच ते सांगत होता.

त्या पडलेल्या हवेलीच्या मुख्य दरवाजातून आम्ही आत गेलो. बाजूला आपल्याकडे असतात तशा देवड्या व त्यात अफगाणी सैनिक त्यांच्या पारंपारिक पोषाखात आमच्या स्वागताला उभे होते. थोडे आत गेल्यावर सुंदर बागेत खुद्द इस्माईल, त्याचे पिताजी व आई आमच्या स्वागताला उभे होते. इस्माईलच्या आईने हिज़ाब वैगेरे घातलेला दिसला नाही. मला आश्चर्य वाटले. नंतर कळाले त्यांच्यात ती पद्धतच नव्हती. सगळ्यात बुजूर्ग म्हणून बाबांचा हात पकडून इस्माईलच्या वडिलांनी त्यांना प्रथम आत नेले व त्यांच्या मागून आम्ही त्यांच्या बंगल्यात शिरलो. चंदनाचा सगळीकडे नुसता घमघमाट सुटला होता...एका कोपऱ्यात एका दिवाणावर संगीत चालले होते. रबाब, तबला, तंबूर व पेटी वाजत होती. बाकीचे वर्णन मी करु शकत नाही. माझे डोळे दिपून गेले. घुमटाच्या आकाराच्या उंच छतातून काचेचे लोलक असलेले झुंबर खाली लोंबत होते. भिंतीवर तऱ्हेतऱ्हेची शस्त्रे लटकत होती. त्या भल्यामोठ्या हॉलमधे ते युरोपियन फर्निचर फारच छोटे व केविलवाणे भासत होते...त्या हॉलला इतके दरवाजे होते की मी ते मोजणे सोडून दिले. ज्या दरवाजातून आम्ही आलो त्याच्या बरोबर समोरचा दरवाजा उघडा होता व त्यातून रेखीव आखीव परसबाग दिसत होती. बाकीच्या बंद दरवाजांवर रेशमाचे झुळझुळीत पडदे लोंबकळत होते.

तेवढ्यात एक दरवाजा उघडला व त्यातून इस्माईल व वलिखानचे कुटुंबीय आत आले. एकमेकांच्या ओळखी झाल्यावर गप्पा सुरु झाल्या. पुरुष एका बाजूला व बायका एका बाजूला असे झाल्यावर मग वेगवेगळ्या गप्पा सुरु झाल्या. आमच्या इथे असे असते तुमच्या इथे कसे...इ....इ...

खाण्यापिण्याची चंगळ होती. पुरुषांसाठी व्हिस्की, वाईन अशा अनेक प्रकारची पण उंची मद्ये होती तर न पिणाऱ्यांसाठी केशराचे शरबत होते. रसरशीत फळांना तर तोटाच नव्हता. मेजवानीला रंग चढत असतानाच मि. क्रॉकर सपत्नीक आल्याची वर्दी एक सैनिक घेऊन आला व त्याच्या स्वागतासाठी इस्माईल मी व आर्य बाहेर गेलो. जाताना इस्माईलनी मला चेष्टेने विचारले,
‘तो नाकातील दागिना नाही घातलात तुम्ही आज ?’

‘तो नेहमी नाही घालत फक्त सणावारी !’

‘पण आज तर दिवाळी आहे ना ?’

मी उत्तर टाळले व मि. क्रॉकरच्या पत्नीचे हात धरुन त्यांना आत घेऊन आले. आत आल्या आल्या मि. क्रॉकरने व मिसेस क्रॉकरने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व तेही मेजवानीत सामील झाले. वेळ कसा गेला ते कळलेच नाहे. बरे झाले रात्री हवेलीतच झोपण्याची सोय केली होती त्यामुळे परतायची घाई नव्हती. रात्री आठ वाजता जेवणगृहाचा दरवाजा उघडला व अजून एक घुमट असलेला हॉल आमच्यासमोर खुला झाला. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाडजूड गालिचा पसरला होता व मधे जेवणाची ताटे पसरली होती. त्या अन्नाच्या घमघमाटाने भूकेने जीव जातो की काय असे वाटत होते..... काय नव्हते जेवणात...पुलाव, कबाब, अनेक प्रकारची सॅलडस्, कुलचे, नान, मटनाचे अनेक प्रकार्.....बापरे !

त्या गालिच्याच्या एका बाजूला पुरुष मंडळी बसली तर दुसऱ्या बाजूल आम्ही. क्रॉकर जोडप्यासाठी तेथेच मागे टेबल लावण्यात आले होते. येथेही झुंबरे होतीच पण सगळ्यात डोळ्यात भरणारी एक वस्तू होती ती म्हणजे त्या हॉलची एक भिंत पूर्णपणे केशरी रंगाच्या रेशीम पडद्याने झाकली होती. त्याच्या समोर एक चंदनी टेबल होते व त्यावर दोन तीन शिसमच्या लाकडी पेट्या होत्या.

इस्माईलच्या बायकोस मी एक बायकी प्रश्न विचारलाच. ‘ तू इस्माईलची एकुलती एक बायको आहेस का अजून कोणी ?’’ तिने हसून नकार दिला.

‘आमच्या जमातीत एक पेक्षा जास्त लग्न करण्यास परवानगी नाही. २४० वर्षे झाली असतील’

‘चांगले आहे पण आश्चर्य आहे !’

‘त्याला कारणीभूत तुम्हीच आहात मॅडम....’ मला नीट ऐकू आले नसावे...मी दुर्लक्ष केले.

जेवणे संपली व पेंगुळलेल्या मुलांना त्यांच्या खोलीत झोपवून सगळ्या परत आलो. मधेच इस्माईल व वलिखान उभे राहिले व टाळ्या वाजवून त्यांनी आम्हा सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. आम्ही सगळे त्याच्या कडे पाहू लागलो त्या भल्या मोठ्या रेशमी पडद्याच्या एका बाजूला रेशमाची दोरी हातात घेऊन इस्माईल उभा होता तर दुसऱ्या बाजूला वलिखान.
आमची बडबड शांत झाल्यावर त्याने वलिखानला खूण केली व दोघांनी ती दोरी ओढण्यास सुरुवात केली. मी मनात म्हटले असेल कुठलेतरी महागडे तैलचित्र. हे श्रीमंत लिलावात घेतात तसली चित्रे व त्यांना त्याचे प्रदर्शन असल्या समारंभात करायचे असते.

हळुहळु पडदे दोन्ही बाजूला होत गेले आणि समोर जे दिसले त्यानी आम्ही उडालोच. समोर एका नऊवारीतील मराठी बाईचे भले मोठे तैलचित्र दिसू लागले. मागे बांधलेला आंबाडा त्यावर माळलेली फुले, ठसठसीत कुंकू, गळ्यात मंगळसुत्र, व मोत्याचा हार व चमकणारा नेकलेस व नाकात मोत्याची हिरे माणके जडवलेली नथ....तेजस्वी व करारी चेहरा. ते बघून आम्ही सर्व उडालोच. बाबा तर पडायचेच बाकी होते. इस्माईलच्या पुढील वाक्याने तर आम्ही सर्वच अवाक् झालो........
इस्माईलने समोर असलेली शिसमची पेटी उघडली व त्यातून एक चांदीची डबी बाहेर काढली त्यातून एक एक नथ काढून माझ्या समोर धरली............ अणि त्याच्या अफगाणी इंग्रजीमधे म्हणाला -

‘‘We Baamzais are descendents of this woman. Her blood flows in our veins'................

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

इस्माईल बाम्झाईंची हवेली एक जीर्ण फोटो. याच्या मागे त्याचे रहाते ठिकाण आहे. -
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

9 Oct 2014 - 6:10 pm | काउबॉय

पानीपत ? की आणखी काही ? जबरदस्त उत्सुकता.

बॅटमॅन's picture

9 Oct 2014 - 6:15 pm | बॅटमॅन

हाण तेच्या........हे तर लैच खत्रा की ओ. सर्व शंका फिटल्या. स्वारी.

जयंत कुलकर्णी's picture

9 Oct 2014 - 6:23 pm | जयंत कुलकर्णी

हा ! हा ! क्या फसाया.......आरं बाबा यहा सब वर्जिनल हाय........:-) पण तुम्हाला तसे वाटावे अशी दोन चार वाक्ये टाकावीत हे मातर तुम्च्या प्रतिक्रियेवरुन सुचल बरका.........

बॅटमॅन's picture

9 Oct 2014 - 6:27 pm | बॅटमॅन

हा हा हा... जो भी हो, कथा बाकी इथवर मस्तच जमली आहे. :)

रेवती's picture

9 Oct 2014 - 6:18 pm | रेवती

बाब्बौ!

>>त्यातून एक चांदीची डबी बाहेर काढली त्यातून एक एक नथ काढून माझ्या समोर धरली

माझी शंका खरी ठरली तर...

प्रसाद१९७१'s picture

9 Oct 2014 - 6:32 pm | प्रसाद१९७१

मस्तच

जबरदस्त! असंच काहीसं असणार असं वाटत होतं.

अवांतरः पानिपतानंतरच्या वाताहतीत काही मराठे हरियाणातच राहिले/स्थायिक झाले. त्यांना "रोड मराठे" म्हणतात. प्रीती झिंटा ही त्या रोड मराठ्यांच्या खानदानातली आहे.

बॅटमॅन's picture

9 Oct 2014 - 6:44 pm | बॅटमॅन

या रोड मराठा लोकांचे एक संमेलन होते १४ जानेवारीस दरवर्षी- अलीकडचाच प्रकार आहे हा. मी २०१३ साली पानपतास गेलो असता याच्या कमानीचा फटू काढला होता. संमेलनाआधी २ दिवस म्ह. १२ जानेवारीस गेल्यामुळे लोकांचा फटू काढता नै आला.

प्रसाद१९७१'s picture

9 Oct 2014 - 6:59 pm | प्रसाद१९७१

काय सांगता काय. नक्की चित्पावन असणार हे रोड मराठे.

भारतात असे फक्त मराठे वगैरे म्हणुन चालत नाही. मराठी-ब्राह्मण्-चित्पावन - ही खरी ओळख झाली.

वा.एकदम वेगळीच कलाटणी दिलीत की साहेब

मस्त कथा.आधीचे भागहि वाचले.पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2014 - 8:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! कथेचे वळण आवडले !!!

एस's picture

9 Oct 2014 - 9:27 pm | एस

अनुमोदन

विनोद१८'s picture

9 Oct 2014 - 11:37 pm | विनोद१८

...aamchi UtkanTha jabardast tanliya, Pudhcyaa bhagaachi Aas laagun raahili.

Dhanyavaad....!!

प्यारे१'s picture

10 Oct 2014 - 1:47 am | प्यारे१

वाचावं ते नवलच.
बाकी हे अगदी शक्य आहे. बरेच आफ्रिकन, अफगाणी, इराणी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले होते ना महाराजांच्या काळात, आधी, नंतर? तसं आपल्याकडचं कुणी गेलं असेल की तिकडं.
छान सुरु आहे कथा.

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 2:16 am | पिवळा डांबिस

सुरेख!!!

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 2:18 am | पिवळा डांबिस

आणि विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकवण्याची सफाईही आवडली...
फार कठीण असतं असं करायला...

खटपट्या's picture

10 Oct 2014 - 2:23 am | खटपट्या

मस्त चाललीय कथा !!
सर दिवाळी अंकात असंच कायतरी लीवा !!

रामपुरी's picture

10 Oct 2014 - 2:38 am | रामपुरी

थोडासा अंदाज आला होता पण अफगाणिस्तान्/अमेरिकन वकिलात इत्यादी संदर्भांमुळे कथेला वेगळं वळण मिळाण्याचीही शक्यता गृहित धरली होती.

स्पंदना's picture

10 Oct 2014 - 5:33 am | स्पंदना

काय कथानक आहे वळणदार.
त्यातच त्या गरीबाच्या पोरीचही मन किती सुरेख वर्णिल आहे.

मदनबाण's picture

10 Oct 2014 - 8:02 am | मदनबाण

जबरदस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, Japan to sign advance-pricing agreement to untie tax hassles

जेपी's picture

10 Oct 2014 - 10:26 am | जेपी

+१११११११११११११११

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 10:47 am | मुक्त विहारि

वाचत आहे...

सविता००१'s picture

10 Oct 2014 - 11:09 am | सविता००१

चला, आम्हाला वाटलं त्या वाटेनं पुढे नाही गेली कथा..

पैसा's picture

10 Oct 2014 - 11:58 am | पैसा

‘आमच्या जमातीत एक पेक्षा जास्त लग्न करण्यास परवानगी नाही. २४० वर्षे झाली असतील’
‘We Baamzais are descendents of this woman. Her blood flows in our veins'...

आणि गावातले सतीचे वृंदावन यातून काही संगती लागते आहे. पण माझा अंदाज आधी बोलत नाही!

कथा अप्रतिम जमली आहे! दुसर्‍या भागाच्या शेवट अनेक शक्यता वाटत होत्या, मात्र आता कथेला एक दिशा मिळाली आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

भाग २ आणि ३ आत्ताच वाचले.

जबरदस्त कलाटणी मिळाली आहे कथेला म्ह्णून उत्कंठा आणखीन वाढली आहे.

पु.भा.प्र.

आनंद's picture

10 Oct 2014 - 6:35 pm | आनंद

मस्त कथा.
विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकताना मला थोड कनफ्युज होतय.
सौ. इंदिरा गोंविद भानु हव कि सौ. इंदिरा माधव भानु हव.( नात्यांचा जरा घोळ्च होतो माझा.)

जयंत कुलकर्णी's picture

10 Oct 2014 - 6:44 pm | जयंत कुलकर्णी

चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद !

सौंदाळा's picture

10 Oct 2014 - 7:11 pm | सौंदाळा

आईशप्पथ,
उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार
पुढच्या भागाची वाट बघतोय.

मधुरा देशपांडे's picture

10 Oct 2014 - 9:50 pm | मधुरा देशपांडे

तीनही भाग वाचले. मस्तच.

तुषार काळभोर's picture

11 Oct 2014 - 9:32 am | तुषार काळभोर

...
आयची आन!!!! काय वरती नेऊन ठेवलीय गोष्ट!!