भय इथले संपत नाही (दोन)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
1 Oct 2014 - 12:02 pm

http://www.misalpav.com/node/28987

--------------------------

भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे.

भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे... आणि ते संपत नाही, हा ग्रेसचा काव्यविषय आहे.

प्रणय हा मनाला (आणि शरीराला) लाभलेला अपरिमित आनंदाचा सर्वात गहिरा रंग आहे. अत्यंत उत्कट रतीसंगाच्या तृप्तीनंतर अंतर्तमात एकच भावना उरते की बास, आता हा सगळा सोहळा संपन्न व्हावा... आता मृत्यू यावा! लेट देअर बी अ डीप सायलेंस...आता सगळं शांत व्हावं, आता पुन्हा भयचक्राच्या भोवरा नको.

ग्रेसची कविता, भय आणि प्रणय या दोन चित्तदशातली मनाची आंदोलनं, विविधांगांनी व्यक्त करते.
_________________________________

पहिल्याच ओळीत ग्रेस म्हणतो : `भय इथले संपत नाही,...मज तुझी आठवण येते'

ग्रेस सखीशी मनानं इतका एकरुप आहे की संध्याकाळच्या कातरवेळी, सैरभैर झालेल्या जीवाला आधार म्हणून, तो काय करत असेल तर तीनं दिलेलं गाणं गातो...

`मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते'!

अत्यंत साधे शब्द पण त्यात सखीशी असलेल्या कमालीच्या लोभस अनुबंधानंची अभिव्यक्ती आणि न संपणार्‍या भयाला हुलकावणी देण्याची किमया. मनाच्या तरलतम अवस्थेत आपण पहिली गोष्ट काय करत असू तर गुणगुणायला लागतो.

सुधीर मोघ्यांनी लिहिलंय :

माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले,
प्राण प्राण तुझे माझे, प्राण प्राण एक झाले ।

ग्रेसची सखी त्याच्याशी इतकी एकरुप आहे आहे की कातर संध्यासमयी तो तिनं शिकवलेलं गाणं गातो!

पहिल्या दोन ओळीतच ग्रेस (स्वतःच्या) मनाचा सगळा कॅनव्हास ओपन करतो आणि रसिकाला स्वत:शी समचित्त करुन घेतो.

`भय इथले संपत नाही`या ओळीसरशी आपला रोख, सगळं भान हरपून कवितेकडे वळतो. त्या मागोमाग, `मज तुझी आठवण येते' हा दिलासा मिळतो. आणि `मी संध्याकाळी गातो' यानं एक गहिरा महौल तयार करत ग्रेस म्हणतो, `तू मला शिकवली गीते!'

केवळ अप्रतिम शब्द संयोजन आणि लयकारीचा अलौकिक अंदाज. पहिल्या दोन ओळीतच ग्रेस रसिकाचं संपूर्ण अवधान वेधून घेतो आणि नकळत आपण पुढल्या ओळींप्रती उत्सुक होतो.
__________________________________________

`ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया '

हा अत्यंत व्यक्तिगत पण कमालीचा उत्कट अनुभव आहे. तो प्रत्येकाला असेल असं नाही, पण कल्पना बेभान करणारी आहे.

कधी चांदण्यारात्री, विस्तिर्ण मोकळ्या आकाशाखाली, अत्यंत निर्भयपणे तुम्ही निजला असाल आणि शेजेला सखी असेल तर, चंद्र-चांदण्यांची शीतलता दोन्ही देहात सावकाशपणे भिनायला लागते. या देह व्यापणार्‍या सुखद शीतलतेला ग्रेसनं कमालीची रुपकात्मकता दिलीये तो म्हणतो, `ते झरे चंद्र सजणांचे '!

आणि त्याहून कमाल म्हणजे देहाप्रती आपली जी अनाम प्रिती आहे तिला, एका क्षणात आसक्ती आणि विरक्तीची रुपकं बहाल करत ग्रेस लिहीतो, `ती धरती भगवी माया'! केवळ कल्लोळ केलायं शब्दांचा आणि अर्थांचा.

मग त्या अनंगरंगातून तो पुन्हा भयावर मात करुन जातो....

`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '!

माय गॉड, जस्ट इंपॉसिबल! जर ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती.
___________________________________

`तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला '

या ओळी तिच्या आवाजाचा गोडवा, तरलतम शब्दात सांगतात. पण ग्रेसची प्रतिभा पुन्हा नवी ऊंची गाठल्याशिवाय राहात नाही!

`सितेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला '

जर आयुष्य विजनवास असेल तर तिचा तो मंद हळवा बोल... राघवाच्या शेल्यासारखा आहे. आणि विजनवासाच्या एकाकीपणात कवीमनानं तो ल्यालेला आहे. ग्रेसच्या रुपकांची बिलोरी दुनिया किती अपूर्व आहे. रसिकाच्या अंतर्तम भावनेला आधारसम असलेल्या राघवाच्या शेल्याला, तो सखीच्या मंद हळव्या स्वराचं रुपक देतो. आणि राघवाचा शेला तरी बाह्य आहे, सखीचा मंद हळवा स्वर अंतर्बाह्य लेऊन, तो न संपणार्‍या भयाला सहज पेलू पाहातो!
_________________________________________

खरं तर हे गाणं ग्रेसनं आयुष्याच्या संध्याकाळी लिहिलंय आणि त्याची सखी देखिल आता केवळ स्मृतीरुप उरली आहे. कवितेच्या दुसर्‍या ओळीत येणारी संध्याकाळ, त्याच्या एकाकीपणाची संध्याकाळ आहे आणि त्याची सखी म्हणजे आता, त्याची कविताच आहे!

अत्यंत संवेदनाशिल इंद्रिये, जी व्यक्त जगाच्या बहुविध सौंदर्याला विविधांगांनी स्पर्शायची, ती आता केवळ देहाच्या जर्जरतेची खबर देतायंत.

मिर्झा ग़ालिबचा एक शेर आहे :

गो हाथको जुंबिश नही, आंखोंमे तो दम है,
रहेने दो अभी सागर-ओ-मीना, मेरे आगे |

हातात चषक धरण्याइतकी सुद्धा आता ताकत नाही, पण नजरेतली कामना बर्करार आहे. (सखे), तो मदिरेचा प्याला, असाच माझ्यासमोर राहू दे.

हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबचा उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे. तो म्हणतो :

`स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे'

पार स्त्रोतापासून आता दु:खं वर येतायंत, पण ती सुद्धा माझ्या इंद्रियांनी गायलेली दु:खाची गाणीच आहेत!

आणि मग एक क्षणात, ग्रेसची पराकोटीची सौंदर्यदृष्टी सगळा माहौल बदलवून टाकते! सगळा मोहरा पालटवून टाकते. सगळं वातावरण उजागर करुन टाकते. इतक्या विकलतेवर ती अशी काय मात करुन जाते की आपण थक्क होतो.

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे !

त्याच्या मांडणीची नज़ाकत पाहा. ‘भय इथले संपत नाही’ या ओळींनी वाटतं की आता कडेलोट झाला, सर्व शक्यता संपल्या. पण त्याच न संपणार्‍या भयाला तो अशी कलाटणी देतो:

‘हे सरता संपत नाही’... आणि काय तर, चांदणे तुझ्या स्मरणाचे !

सार्‍या विमनस्कतेवर, रुपकाचा निव्वळ चंदनलेप!

_______________________

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

1 Oct 2014 - 12:17 pm | नेत्रेश

मस्तच.
खुप आवडले.

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2014 - 12:31 pm | पिलीयन रायडर

प्रयत्न चांगलाय.. पण मला तितकासा भावला नाही...

एकच सजेशन... पटलं तर बघा...
थोडं अजुन तटस्थपणे रसग्रहण करता आलं तर जास्त छान वाटेल.. "काय लिहीलयं.. शब्दांचा कल्लोळ केलाय.." वगैरे विशेषणं प्रवाहीपणात मध्येच कचकन येताएत.. अर्थ कमी.. उलगडणं कमी आणि तुमच्या "वाह..क्या बात है!"ची दादच जास्त येतेय असं वाटलं.. अर्थात तुमची ती मनापासुन गेलेली दाद असेल.. पण लिहीताना ती इतक्यावेळा आली नसती तर अजुन जास्त उलगडुन दाखवता आलं असतं.. म्हणुन तुम्ही लावलेला अर्थ जरा वरवरचा वाटला...

अर्थात हे माझं मत झालं..

पहिल्या दोन ओळीतच ते गाणं ऐकणार्‍याला वेड लावतं, तटस्थता कशी साधणार?

लिहितांना फक्त एकच गोष्ट समोर असते `कविता'! आणि तिचा महौल असा काही असतो की अवर्तना-आवर्तनाला मनातून नकळत दाद दिली जाते. दाद अशी काही कुणी ठरवून देत नाही.

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2014 - 12:50 pm | पिलीयन रायडर

मान्य...

पण मला ह्यात अजुन जास्त उलगडुन दाखवणं अपेक्षित होतं.. आवडलं असतं...

दाद मनापासुन असेल हे मी आधीच मान्य केलंय.. पण फक्त ती वाचताना रसभंग होइल इतल्या वेळा जाऊ नये.. (म्हणजे मैफिलीत शेजारचा मानूस प्रत्येक ओळीला "क्या बात है!" म्हणुन ओरडत असेल तर जसा वैताग येतो तसंच काहीसं..)

असो.. हे माझं मत आहे.. आपापल्या जागी आपण दोघेही बरोबर असु शकतो...

मैफिलीतला शेजारचा मनःपूर्वक दाद देत असेल तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटत आलंय कारण माझ्या अलिप्ततेपेक्षा त्याची तल्लीनता मोलाची असते. मग मी ही काठ सोडून प्रवाहात उतरतो, त्याची तल्लीनता साधायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं, खरंच की, क्या बात है!

एस's picture

1 Oct 2014 - 12:32 pm | एस

समीक्षेऐवजी रसास्वादाच्या अंगाने लिहिल्याने वाचनीय झाले आहे.

जेपी's picture

1 Oct 2014 - 2:07 pm | जेपी

आवडल.

खुप छान !!

सह्यमित्र's picture

1 Oct 2014 - 5:03 pm | सह्यमित्र

पं . हृदयनाथ आणि ग्रेस ह्यांची फार दृढ मैत्री होति. हृदयनाथांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमात ते नेहमी ग्रेस, शांताबाई, सुरेश भट ह्या त्यांच्या मैत्रांचा उल्लेख करत असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना भावलेला अर्थ सांगितला होता. तो काहीसा असा होता:

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.

अर्थात हे सहज आठवले म्हणून लिहिले. बाकी कवितेचे आपण केलेले रसग्रहण हे उत्तमच आहे. आणि आपण म्हंटल्या प्रमाणे ग्रेस सारखे कवी हे कवितेतून व्यक्त होत असताना एकदम थेट व्यक्त न होता ते रसिकांवर सोडून देतात. तुम्हाला काय अर्थ उलगडतो ते पहा आणि त्या प्रमाणे अनुभूती घ्या असे काहीसे हे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2014 - 5:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो.》》》
हे फार पूर्वी वाचले होते. पण नक्की संदर्भ आठवत नव्हता.

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2014 - 5:41 pm | पिलीयन रायडर

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.

आहा!!! हा ही अर्थ छान आहे!!

संजय क्षीरसागर's picture

1 Oct 2014 - 6:10 pm | संजय क्षीरसागर

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो

कमालीचा अँगल आहे! कविता दिवसाच्या (आणि रात्रीच्या) वेगवेगळ्या वेळी वाचली तेव्हा कुठे तरी, मला देखिल तसं जाणवलं, म्हणून वर एका ठिकाणी लिहिलंय :

हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबची उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे.

पण अनेक कडवी प्रतिभेसारख्या निर्वैयक्तिक पैलूपलिकडे जातात आणि त्यात व्यक्तिगत अनुभवांची सरमिसळ आहे.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2014 - 5:37 pm | विवेकपटाईत

अप्रतिम लेख आवडला.

`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '!
ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती.

सहमत.

हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे.

वाह! हा अर्थ असू शकतो हे वाचल्यावर जाणवतेय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2014 - 6:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडीचं गाणं आहे. समिक्षण आवडले.

अर्धवटराव's picture

1 Oct 2014 - 7:16 pm | अर्धवटराव

हि दु:खाची कविता आहे, पण हे दु:ख सामान्य रडतरावाचे रोजच्या जगण्यातले नाहि तर झाडाच्या मुळांचे प्राक्तन त्यात वर्णीले आहे. इथे दु:ख मुक्तीची आस नाहि, जर-तर ची अपेक्षा नाहि. प्रणयाचे सुखद आलिंगन तर अजीबात नाहि. असो.

चित्रगुप्त's picture

1 Oct 2014 - 7:29 pm | चित्रगुप्त

मला तर ही कविता वाचून आईची आठवण आली.

मित्रहो's picture

1 Oct 2014 - 7:56 pm | मित्रहो

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे

सह्यमित्र आपला ऋणी आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी तूच शिकवलेली गीते मी गात आहे. तू सोडून जाशील हे भय मात्र संपत नाही.

दोन वाक्यात कवितेचा नेमका अर्थ पोचला राव.

vikramaditya's picture

1 Oct 2014 - 9:43 pm | vikramaditya

सह्यमित्र ह्यांनी दिलेला संदर्भ मनाला पटकन भावतो कारण ज्याने यशाची उत्तुंग शिखरे पाहिली आणि ज्या प्रतिभेच्या जोरावर हे साध्य झाले, ती प्रतिभाच हळु हळु दूर जात असेल तर ही खरोखरच भयावह परिस्थिती असेल.
तुम्हाला भावलेला अर्थ तुमच्या संवेदनांप्रमाणे आपल्या जागी योग्य असेल.

शेवटी काय, कलेच्या प्रांतात, मॅथेमॅटीकल इक्वेशन सारखे LHS = RHS सिद्ध करणे आवश्यक नाही हे एकदा मान्य केले की कसला वाद आणि प्रतिवाद?

येस! त्यामुळे पूर्वभूमिका मांडतांना मी म्हटलं होतं :

त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.

शिवाय, हा अँगल :

"एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे."

कमालीचा आहे हे पूर्वीच मान्य असल्याचं नमूद केलंय. पण प्रतिसादकानं म्हटलंय :

`अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना (म्हणजे हृदयनाथांना) भावलेला अर्थ सांगितला होता'.

तस्मात, `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' हा दैहिक संदर्भ प्रतिभेशी कोणत्याही अंगानं सुसंगत नाही. तद्वत, `तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला' हा सुद्धा व्यक्तीसापेक्ष संदर्भ म्हणूनच भावतो.

त्यामुळे सगळी कविता केवळ `प्रतिभेच्या लयाचं भय आहे' हे मला तरी मंजूर नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2014 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif

मारवा's picture

2 Oct 2014 - 10:23 pm | मारवा

संजय जी
अद्वितीय कवितेचा अप्रतिम आस्वाद अतिशय आवडला !
पण दुर्देवाने वेगळीच विचारमालिका जी कदाचित या धाग्याचा दुर दुर देखील विषय नाही अशी डोक्यात सुरु झाली ती थोडी अशी की
ग्रेस हे महार होते क्षुद्र वर्णात जन्माला आले होते. या वर्णाला यात जन्माला आलेल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पुर्णपणे नाकारण्यात आला होता. वाचन लेखन अगदी पुर्णपणे वर्ज्य, मग अनेक वर्षांनी अनेकंच्या अथक प्रयत्नांनी थोडीफार सामाजिक क्रांति झाली या सर्वांना शेकडो वर्षांपासुन नाकारलेला शिक्षणाचा अधिकार मिळाला.
म्हणुन ते शिकु शकले वाचु शकले त्यातील एक माणिक गोडघाटे
आता त्यांनी जी काय सुंदर मराठी कविता लिहीली तिला तोड काय जोड देखील नाही. अनेक अप्रतिम शब्द कविता देउन या भाषेला त्यांनी श्रीमंत केले हे सर्व आपल्याला माहीतच आहे
प्रश्न असा आहे की नाकारलेल्यांना संधी मिळताच इतक काही उगवुन आलं
मात्र असे कीती ग्रेस असतील जे व्यक्त च होउ शकले नसतील त्यांची प्रतिभा असुनही तिला फुलण्याची संधीच मिळाली नाही म्हणुन कीती प्रतिभा अशीच वाया गेली असेल म्हणजे
सब कहॉ कुछ लाला ओ गुल मे नुमायॉ हो गइ
खाक मे क्या सुरते होगी के जो पिनहॉ हो गइ
असे गालिब म्हणतो तसे
आणि त्याने कीतीतरी कवितेच्या वह्या कोरया राहुन गेल्या असतील

मला ग्रेसच्या संवेनाशिलता आणि सौंदर्यदृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ग्रेसनं भारावून टाकलं आहे. ते कोण होते याचा विचारही कधी केला नाही. आणि ते समजल्यावर देखिल त्यांच्याबद्दल लगाव तसाच राहिला.

त्यानंतर खरं तर असं वाटलं की इतक्या दुर्धर परिस्थितीत जर एखादी व्यक्ती अश्या रचना करु शकत असेल तर तिची प्रतिभा काय कमालीची असेल.

व्यक्तीची ओळख त्याची निर्मिती आहे, जन्मप्राप्त परिस्थिती नाही. ग्रेससारखी लयीवर हुकूमत आणि नादपूर्ण शब्दांची नितांत सुंदर रुपकं माझ्यातर केवळ आवाक्याबाहेर आहेत. किमान त्यांच्या साहित्याप्रती कृतज्ञ राहून त्याचा आनंद घ्यावा इतकं तरी आपलं भाग्य आहे हे काय कमी आहे?

श्रीरंग_जोशी's picture

2 Oct 2014 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी

हे रसग्रहण वाचून प्रथमच ही कविता कळू लागली आहे असे वाटते.

सर्वप्रथम ही कविता सह्याद्रीवरील महाश्वेता या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ऐकली होती. ही मालिका फारशी पाहिली नसली तरी ती अत्यंत रटाळ होती. मालिकेच्या कथासुत्राचा प्रभाव माझ्या या कवितेबाबतच्या समजुतीवर पडला असावा.

अवांतर - हे रसग्रहण वाचल्यावर मला कविता हा विषय गणितासारखा वाटू लागला आहे. एक तर चांगले शिक्षक मिळायला हवेत किंवा आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड सोडून प्रयत्न करत राहिल्यास प्रथमदर्शनी अवघड वाटणारे गणित सोडवणे जमू शकते. तसेच काहीसे कवितांचेही आहे.

संजय क्षीरसागर's picture

2 Oct 2014 - 11:56 pm | संजय क्षीरसागर

काही सदस्यांना दोन ओळीत कवितेचा सारांश गवसलायं त्यांच अभिनंदन! इतकी तरलता असेल तर रसग्रहणाची सुद्धा गरज नाही, सरळ प्रतिभाच व्यक्त होईल (तशीही ती झालीच आहे म्हणा!).

ज्यांना `भय' म्हणजे केवळ `प्रतिभा सोडून जातेयं याची भीती' इतकाच अर्थ वाटतो त्यांच्यासाठी या कवितेतली (गाण्यात न घेतलेली) तीन कडवी उधृत करतो. त्यांचा प्रतिभेच्या लयाशी सुतराम संबंध नाही आणि अर्थाचं म्हणाल तर तो ग्रेसचा इतका व्यक्तिगत अनुभव असावा, की त्याच्या जीवनाचा आणखी खोलवर मागोवा घेतल्याशिवाय मला देखिल तो गवसत नाही. तस्मात, अर्थ न कळता लिहीण्याचा अप्रामाणिकपणा होणे नाही, पण सगळ्या ओळी आहेत मात्र एकसोएक !

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब |

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने |

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

प्रतिभा सोडुन जातेय इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही आणि समजा असेल तर वरील ओळींची कुठेही लिंक लागत नाही. हा अर्थ एक शक्यता असु शकते.
पण संजय जी त्याने ही काही फरक पडत नाही हॅरॉल्ड ब्लुम रील्के या कवि वरील समीक्षा निबंधात म्हणतो तसे एकदा कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो.व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते. ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.
आपल्या कडे बालकविंची औदुंबर या कवितेवर केलेल्या निरनिराळ्या सुंदर समीक्षा बघितल्यावर तर याची खात्री च पटते.

संजय क्षीरसागर's picture

3 Oct 2014 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो. व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते.

आणि हा अनुभव :

ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.

कुणी जाल का सांगाल का च्या रसग्रहणातून पुरेपूर आलेला आहे!

लावलेला अर्थ या संबंधात बघण्यासारखा आहे. कीती भिन्न द्रुष्टीने दोन्ही दिग्गज या कवितेकडे बघतात हे बघुन आश्चर्य वाटते. दोन्ही अतिशय ग्रेट अर्थ लावतात. आणि मग आणखी एक उत्सुकता लागुन राहते की खुद्द बालकविंना काय अर्थ अभिप्रेत असावा तो अस म्हणु की थर्ड डायमेन्शन ऑफ लुकींग अ‍ॅट वन ब्युटीफुल क्रीएशन

तुमच्याकडे ग्रेस आणि रेग्यांचे त्याविषयी लेख आहेत का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2014 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षी सेठ सुंदर रसग्रहण. कवितेबद्दलचा आपला संवाद अतिशय सुरेख ! असंच सुंदर लेखन येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

3 Oct 2014 - 2:07 pm | संजय क्षीरसागर

काल या दोन ओळींचा अर्थ अचानक उलगडला!

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

वेळ मिळाला की इथे लिहितो.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2016 - 5:38 pm | प्रसाद गोडबोले

आज काही कारणांमुळे ह्या गीताची आठवण झाली ... विषेष करुन ह्या कडव्याची .

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

गुगल केले तर हा लेख सापडला :)
खुपच सुरेख रसग्रहण सर !!

त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.

अगदी अगदी हेच म्हणु इच्छितो :)